अडगळीतला साप (गूढकथा)

Submitted by करभकर्ण on 9 May, 2021 - 23:29

अडगळीतला साप (गूढकथा)

तसा तो दोन दिवसांपूर्वीच माझ्या नजरेस पडला होता. पण तेव्हा मी त्याकडे दुर्लक्ष केले. त्या रात्रीच्या मंद प्रकशात, मला बहुतेक त्याची शेपटी दिसली असावी. पण मी अर्धवट झोपेच्या अवस्थेत असल्याने, त्याकडे निरखून पाहिले नाही. असेल एखादी दोरी, ती लोंबत असेल अशी बोळवण करून, मी झोपलो होतो. खरेतर सकाळी उठल्यावर, वर पत्र्याकडे पाहणे माझे काम होते. त्या पत्र्याच्या कोपऱ्यावर, रात्री आपण काहीतरी पाहिले होते. तेव्हा ती आपल्याला दोरी वाटली, पण सकाळी उठल्यावर तेथे दोरी असायला हवी होती. पण घाईगडबडीत मी ते सगळे विसरून गेलो. आणि तो तिथेच वरती, त्या पत्र्याच्या अडगळीत, तसाच बसून राहिला होता. बऱ्याच दिवसांपासून तो तेथेच असावा.
                दहा बाय पंधराची खोली असूनही, तेथे उंदराचा बराच सुळसुळाट होता. बाहेरच्या गवतातून, ते खोलीत येत असावेत. वर मातीची भिंत आणि पत्रा यात बरीच मोठी खिंड असल्याने, त्यांना तेथे चांगलाच ठिकाणा सापडला होता. त्यांची खडखड रात्री झोपताना मला बऱ्याच वेळा ऐकायला यायची. पण दिवसभराच्या मेहनतीने मला सपाटून झोप लागायची. त्यामुळे त्या त्यांच्या खडबडाटीचा, माझ्यावर विशेष असा परिणाम व्हायचा नाही. कधी कधी मोकळा वेळ मिळाला की, मनात  तो विचार डोकावून जायचा. या उंदराच्या अशा उपस्थितीमुळे, कधी कधी खोलीत सापही येऊ शकतो. पण कधी साप नजरेस पडला नव्हता. त्यामुळे मला त्याच्या रात्रीच्या दिसण्याने, तेव्हा काही विशेष जाणवले नाही. त्यामुळे अगदी ती दोरी समजून मी माझ्या दैनंदिन व्यवहारात गुंतून गेलो होतो.
             
  आज सकाळपासूनच जरा कामाचा ताण जास्त जाणवत होता. त्यात थोडीशी तब्येतही कुरकुर करू लागली. खरेतर आजकाल अधूनमधून असेच घडत होते. एकटा जीव असल्यामुळे आवश्यक त्या गोष्टी भेटत नव्हत्या. त्यामुळे मनाला समाधान देणारे, स्थैर्य लाभत नव्हते. मी जसा पहिला होतो, तसाच अजूनही आहे. दूर खेड्यातून या शहरात येऊन मला आज, दोन अडीच वर्षे पूर्ण झाली असतील. पण माझ्या व्यक्तीमत्वात काही सुधारणा झाली नव्हती.
     मी कमालीचा अंतर्मुख होतो. एकलकोंडी आयुष्य मी स्वतःवर कधी ओढवून घेतले, हेही मला कळले नाही. मी एकटाच होतो. ना कोणी नातेवाईक, ना जिवाभावाचे सोबती. खरेतर मी ठरवले असते, तर मला अनेक सोबती मिळाले असते. एखादी जोडीदारही भेटली असती. पण माझा स्वभाव नेहमी आड येत होता. बुजरा स्वभाव, कोणाशी बोलताना चेहऱ्यावर नसणारा विश्वास, आपणहून कधीच कोणाला न बोलणे, एकटेच राहणे पसंद करणे, या अशा गोष्टींमुळे मी एकटाच उरलो होतो. माझा मीच सोबती होतो.
    कधी कधी माझ्या भावनांचा स्फोट व्हायचा. अंतर्गत घुसमट टोकाला जायची. मनात साचलेल्या विचारांना, मोकळी वाट करून देण्याची इच्छा अनावर व्हायची. पण हे सारे व्यक्त कोणासमोर करणार?  काहीच इलाज नसायचा. आतल्या आत मी कुढत बसायचो. त्याने अजूनच माझी घुसमट वाढत असे. हळूहळू मी टोकाचा अंतर्मुख होत गेलो. यंत्रवत काम करायला लागलो. भावनाना आतल्या आत दाबायला लागलो. आणि त्याचा हळूहळू परिणाम माझ्या शरीरभर व्हायला लागला. मी एकटा एकटा पडत चाललो होतो. पुढे माझे काय होईल, याची आता माझी मलाच शाश्वती उरली नव्हती.
             आज शरीर दमले होते. काम करणे मुश्किल झाले होते. मुकादमाला विचारून मी अर्धी सुट्टी घेतली. आणि खोलीकडे निघालो. खोली जेमतेम दीड दोन किलोमीटर असेल. सायकल होती. पण ती चालवण्याचे त्राण शरीरात नव्हते. त्यामुळे पायीच निघालो. आता खोलीवर जाऊन झोपून जाऊ. अंगाचा मुडपा झाला आहे. आराम करावा लागेल. नाहीतर अजुन तब्येत बिघडायची. वाटेतच एका खानावळीत कसेबसे दोन घास खाल्ले. इच्छा नव्हती, पण पुन्हा खोलीवर गेल्यावर परत जेवायला यायची इच्छा झाली नसती. मनात अनेकरंगी विचार करत करत, कधी खोलीच्या दारापर्यंत आलो कळालेच नाही.
            
  खोलीचे दार उघडून आत आलो. खोलीत सकाळचा पसारा तसाच पडलेला होता. दुपारची वेळ असल्याने, खोली चांगलीच तापली होती. वरच्या पत्र्याचा तो परिणाम असावा. उन्हाच्या वेळेत खोलीत चांगलेच गरम होते. वर एक जुना पंखा होता, पण त्याने कधीच जीव टाकलेला होता. त्यामुळे, आता या अशा गरमीत झोपण्याशिवाय गत्यंतरच नव्हते. खरेतर मला त्याची सवयच झालेली होती. त्यामुळे त्या गरमीचे विशेष असे काही जाणवत नव्हते. मी दार लोटून घेतले आणि खालच्या अंथरुणात अंग टाकले. सर्व हालचाल बंद झाल्याने, शरीराला आराम जाणवला.
       
आणि अचानक रात्रीची ती लोंबती दोरी की दुसरे काय ते आठवले. अनाहूतपणे नजर त्या पत्र्याच्या कोपऱ्यात गेली. अंगावर सरसरून काटा उभा राहिला. शरीराचे तापमान एकदम वाढले. तिथे त्या कोपऱ्यात त्याची ती चांगली दीड दोन फुटांची शेपटी हवेत तरंगत होती. त्याचे बाकीचे सगळे शरीर, त्या पत्र्याच्या आणि भिंतीच्या सांधीत आत गेलेले होते. केवळ तेवढी शेपटी बाहेर लोंबकळत होती. म्हणजे काल पाहिलेली ती दोरी नव्हतीच. मला पुन्हा एकदा भीती वाटली. झोप तर कधीच उडाली होती. घरात हे एवढे मोठे ध्यान असताना झोप तरी कशी लागेल? मी झटदिशी अंथरुणातून बाजूला झालो. दरवाजा जवळ जाऊन उभा राहिलो. त्या शेपटीकडे बघू लागलो. त्याचे डोळे आत सांधित असल्याने, तो मला पाहू शकत नव्हता. परंतु मी मात्र त्याला पाहू शकत होतो. तो स्थिर होता. तो त्या सांधित सुस्त पडला असावा. शेपटी तेवढी संथपणे हलत होती. अगदी संथपणे! त्याच्या शेपटीच्या आकारानुसार तो चांगलाच लांब आणि जाड असावा. आठ नऊ फूट तर नक्कीच असावा. वर काहीसा करडा रंग आणि पोटाखालची बाजू फिकट पांढरी होती. मनात भीतीचे तरंग उमटवण्यासाठी त्याचा रंग, जाडी, लांबी पुरेशी होती. मी टक लाऊन त्याकडे बघत होतो. रात्री आपण याच्या सान्निध्यात झोपलो होतो, नुसते हे आठवले तरी अंगावर काटा उभा राहत होता. त्याची शेपटी अजूनही संथपणे हलत होती. मी अगदी नजर न हटवता त्याच्या त्या हालचालींकडे बघत होतो. खरेतर त्याची ती शेपटी, त्याचा रंग, ती हालचाल कमालीची आकर्षक वाटत होती. भितीच्या दडपणाखाली कदाचित तो कोणाला आकर्षक वाटला नसता. पण भीतीचे सावट जरासे दूर करून, जर त्याच्याकडे असे टक लाऊन पाहिले, तर तो निश्चितच आकर्षक वाटेल.
      मी जरा चिंतेत पडलो. झोप तर येत होती. शरीराला आराम हवा होता. पण हा समोर असा एवढा मोठा वैरी असताना, या खोलीत झोपण्याची हिम्मत तरी कोण करेल?
"मग आता काय करावे?"
हा प्रश्न ठळकपणे माझ्या समोर उभा होता. कारण काहीतरी कृती करणे भाग होते. नुसते स्वस्थ बसून कसे चालणार? आता माझ्यापुढे दोन पर्याय होते. एकतर तो त्याच्या मनाने बाहेर जाईपर्यंत, वाट बघत बसणे, किंवा मग आपण स्वतः काहीतरी हालचाल करून त्याला खोलीबाहेर काढणे.पहिला पर्याय मला काहीसा पटला नाही. कारण कालपासून तो तसाच पहुडलेला होता. तो स्वतः त्याच्या मनाने निघून जाईल, ही शक्यता कमीच होती. मग उरला दुसरा पर्याय. मलाच काहीतरी हालचाल करावी लागेल.
             पण नेमके करणार काय? आता हा मोठा प्रश्न माझ्यासमोर पडला. एखादी मोठी मजबूत काठी घेऊन त्याला मारणे, हे तर माझ्याच्याने शक्यच नव्हते. कारण तेवढी हिम्मत माझ्यात नव्हतीच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, का कोण जाणे? पण त्याला काही इजा पोहोचावी अशी माझी इच्छा नव्हती. त्याला काठीने ठेचून मारावे असेही वाटेना. कदाचित मी असा एकटा असणारा माणूस, ज्याला कोणी मित्र नाही, ज्याच्याकडे कोणी पाहुणे येत नाहीत, त्याच्याकडे किमान पाहुणा म्हणून तरी तो आला होता. मग त्याला मी असा मारू कसा? ते काहीही असो पण त्याला मी मारणार नव्हतो.
  त्याला कसाही करून खोलीबाहेर काढावे लागणार होते. त्याची ती शेपटी अजूनही हवेत तरंगत होती. मला एका गोष्टीचे मात्र आश्चर्य वाटत होते. वरचा पत्रा एवढा गरम झालेला होता, वातावरणात एवढी गरमी होती, तरी तो त्या पत्र्याच्या आणि भिंतीच्या सांधीत, कसा सुस्त पडला असेल? गरमीने त्याने इतरत्र हलायला हवे होते. तो तर त्या सांधीत मुंडके घालून, आरामात पहुडला होता. आणि आपली ती शेपटी बाहेर काढून हवेत हलवत होता.
 मी हळूच दरवाजा उघडला. आवाज होणार नाही याची काळजी घेतली. त्या आवाजाने तो पुन्हा आत जाण्याची शक्यता होती. मी खोलीबाहेर आलो. बाहेर ऊन चांगलेच तापलेले होते. माझ्या कोणी मदतीला येईल ही तर आशाच नव्हती. मी काहीसा हताश मुद्रेने इकडे तिकडे बघू लागलो. खोलीच्या पाठीमागच्या बाजूला एक जुनी पुराणी शिडी पडलेली आहे, हे मला आठवले. मी लगेच खोलीच्या पाठीमागे आलो. शिडी समोरच पडलेली दिसली. शिडी कामात आली असती. बाजूलाच एक पाच सहा फुटाची काठीही पडलेली दिसली. स्वतःच्या रक्षणासाठी काठी हवी होती, तीही मिळाली. मी पुढे आलो. शिडी आणि काठी हातात घेतली. खोलीसमोर आलो. आवाज होणार नाही, अशा पद्धतीने शिडी आणि काठी आत खोलीत आणली.
   दरवाजा काहीसा लोटून घेतला. पूर्ण लावला नाही.  कदाचित काही विपरीत घडले तर, दरवाजातून बाहेर पळता आले पाहिजे. एकदा वर नजर टाकली. शेपूट तशीच होती. त्यात काहीही बदल झाला नव्हता. मी हळूच शिडी हातात घेतली, आणि शिडी तो ज्या भिंतीत लपलेला होता, अगदी त्याच्या काटकोनात लावली. माझा उजवा हात त्याच्याकडे राहील याची काळजी घेतली. उजव्या हाताने जोर जास्त लावता आला असता, हे त्यामागचे कारण. अलगदपणे शिडी भिंतीला टेकवली. शिडी भिंतीच्या अगदी वर पर्यंत गेली होती. त्याच्यापासून पाच सहा फुटाच्या अंतरावर ती उभी होती. अगदी टप्प्यात होती.
   मी खाली थोडा घुटमळलो. शिडीवर चढण्याची काही हिम्मत होत नव्हती. मला भीती वाटत होती. कधी असा प्रसंग हाताळलेला नव्हता. पुन्हा त्यात मी एकटाच होतो. काही प्रसंग गुदरलाच तर, मला काहीच करता येणार नव्हते. वर जाऊ की नको? याच द्विधेत मी होतो. पण काहीतरी करावेच लागणार होते. नाहीतर मग एकदा रात्र झाली की, काहीच करता आले नसते. पुन्हा खोलीत झोपताही आले नसते. त्यामुळे आता वर जाण्याशिवाय दुसरा पर्यायच शिल्लक नव्हता.
मी जरा हिम्मत एकवटली. आणि शिडीवर चढू लागलो. शिडीची एक एक पायरी चढताना, माझ्या ह्रदयाचे स्पंदने वाढू लागले. मी कसातरी वरपर्यंत पोहोचलो. आणि ते लक्षात आले. मी काठी खालीच विसरलो होतो. काठीशिवाय तर मी काहीच करू शकत नव्हतो. मी जरासा तसाच शांत शिडीवर उभा राहिलो. जरासा स्थिर होऊ लागलो. स्पंदने पूर्वपदावर येण्याची वाट बघू लागलो. मी उजवीकडे नजर वळवली. त्याची ती करडी पांढरी शेपटी, माझ्यापासून अवघ्या काही फुटांवर होती. मी थोडासा पुढे होऊन, हात लांबवला असता तर, तिला हात लागला असता. मी त्या शेपटीकडे टकमक बघू लागलो. किती रुबाबदार वाटत होती ती? तिचा तो रंग, तिची इकडून तिकडे होणारी हालचाल, टोकाकडे निमुळता होत गेलेला आकार, वरच्या बाजूला असलेले खवले, त्यावरचे काळया रंगाचे बारीक ठिपके, सगळे कसे देखणे दिसत होते?
  माझ्या या भकास व्यक्तिमत्त्वापेक्षा, त्याचे ते अंग कितीतरी रुबाबदार होते. तो त्याच्या जमातीत श्रेष्ठ तरी होता. इथे माझे हाल तर कुत्रासुद्धा खाईना. एका कोपऱ्यात खितपत पडलेला क्षुद्र जीव आहे मी. ना कोणाचे लक्ष जाते! ना कोणी ढुंकून आपल्याकडे पाहतो. कोणाचे लक्ष वेधून घ्यावे असे काहीतरी होते का माझ्यात? काहीच नव्हते. त्यापेक्षा याची साधी शेपटीही किती मोहक वाटत होती. कोणीही तिच्याकडे मंत्रमुग्धपणे पाहिले असते. या अशा माझ्या एकलकोंड्या आयुष्यात, कधी कोणी पाहुणा आला नव्हता.  माझ्या एकटेपणाची कोणी दखल घेतली नव्हती. किमान हा तरी आला होता. तो दुनियेच्या नजरेत वैरी जरूर असेल, पण ज्या जगाने माझ्याकडे दुर्लक्ष केले होते, त्या जगाला झिडकारून तो माझ्या या खोलीत आला होता. मला सोबती तरी राहिला होता. मला या साऱ्या जगावर कमालीचा क्रोध वाटत होता. आणि त्याच्या उलट याच्यावर काहीसा लोभ वाटत होता. खरेतर एवढ्या दिवसांच्या एकटेपणाची सारी घुसमट, यावेळी मनात दाटून येत होती. खरेतर या अशा निर्वाणीच्या वेळी, असे विचार मनात येणे कितपत योग्य होते? पण त्याला इलाज तरी काय होता? विचार तर मनात येत होते.
खाली जाऊन काठी आणण्याचा विचार माझ्या मनातून एकदम निघून गेला. त्याच्या अंगाला काठी लावावी हाच विचार मला कसातरी वाटला. तो आपल्याकडे आलेला पाहुणा आहे, मग त्याला असे वागवणे, कितपत योग्य आहे? मी तसाच टक लाऊन त्याच्या त्या शेपटीकडे बघू लागलो.
काय झाले काही कळले नाही, पण मनात तो विचार एकदम डोकावून गेला. त्याच्या त्या शेपटीला स्पर्श करायची इच्छा अनावर झाली. माझ्या खोलीत आलेला तो माझा सोबती होता. त्यामुळे मला फिकीर करायची काही गरज नव्हती. उलट मला त्याविषयी आदर, ममत्व, सहानुभूती वाटू लागली. त्याने माझी मनस्थिती किती अचूक ओळखली होती? मला कोणाच्या तरी सोबतीची गरज आहे, हे ओळखूनच तो माझ्याकडे आला असावा. आता माझे विचार स्वैरपणे उधळू लागले.
   आता मला राहवेना. मला त्याला स्पर्श करायचा होता. मी डाव्या हाताने शिडीचा एक पाय घट्ट पकडला. तोल सावरत मी माझा उजवा हात त्याच्या शेपटीकडे नेत होतो. आता मला फारशी भीती वाटत नव्हती. उलट अधीरता मनाला धक्के देत होती. माझा हात त्याच्या शेपटीपासून अवघ्या काही इंचावर आला होता. माझी अधीरता वाढत होती. मी माझा हात अजुन पुढे नेला. आणि अखेर तो थंड आणि लिबलिबीत स्पर्श हाताला लागलाच.
एक वेगळीच अनुभूती शरीरभर पसरत गेली. कित्येक काळापासूनची एकलकोंडी जाणीव संपुष्टात आल्यासारखी वाटली. मनाला अपार सुख झाले. मी पुन्हा एकदा त्याला स्पर्श केला. पुन्हा तीच जाणीव झाली. अगदी सुखद जाणीव. मी त्याला दोन वेळा स्पर्श केला. पण त्याच्याकडून मात्र काहीच प्रतिसाद आला नाही. तो अजूनही शांत होता. खरेतर मला आता वाटत होते, त्याने काहीतरी हालचाल करावी. माझी दखल घ्यावी. मी त्याला माझा सोबती मानले होते. मग त्यानेही तसे मानावे. पण तो स्तब्ध होता. काहीच हालचाल करत नव्हता. पण मी हार मानणारा नव्हतो. मी अजून थोडा पुढे झालो. आता मी अगदी त्याच्या नजीक होतो. त्याची ती मनमोहक शेपटी संथपणे इकडून तिकडे हलतच होती. मी हात पुढे करून अलगद त्या शेपटीच्या वरच्या भागावरून फिरवू लागलो. अनेकार्थाच्या संवेदना मनात उमटून जाऊ लागल्या. पण त्या सगळ्या संवेदना सकारात्मक होत्या. मनाला खोलवर ओलावा देणार्‍या होत्या. माझा विश्वास आता वाढत होता. माझा हात फिरविण्याचा वेग वाढतच होता. आता मी शेपटीच्या खालच्या भागाकडे हात फिरवायला सुरुवात केली. तो पोटाकडचा भाग, वरच्या भागापेक्षा अतिशय थंड आणि लिबलिबीत जाणवला. मला एकदम कसतरी झाले.
आणि तेवढ्यात ते घडले. त्याची ती शेपटी अचानक हलली.  झट्दिशी ती त्या सांधीत गेली. आणि काही कळायच्या आत, उलट फिरून त्याचे ते मस्तक बाहेर आले. फणा काढलेले ते मस्तक, अगदी माझ्यासमोर उभे होते. त्याची ही कृती एवढ्या कमी अवधीत झाली की, मला कुठला विचार करायला, हालचाल करायला वेळच भेटला नाही. तो चांगला मोठा फणा काढून माझ्यासमोर अगदी ऐटीत उभा होता. बहुतेक माझ्या स्पर्शाची त्याला जाणीव झाली असावी. त्याला धोका जाणवला असावा. आणि त्यातूनच अती शीघ्रगतीने त्याने तो आपला लांबलचक फणा बाहेर काढला असावा.
आता माझ्यासमोर त्याचा तो लांबलचक फणा होता. मी त्याच्यापासून अगदी काही फुटांवर उभा होतो. आम्ही दोघे एकमेकांकडे बघत उभे होतो. माझी मघाची मनस्थिती तशीच होती. तो अजूनही मला माझा सोबतीच वाटत होता. माझ्या स्पर्शाने तो थोडासा चलबिचल झाला होता एवढेच! कदाचित माझे असे हात फिरवणे त्याला पसंद पडले नसावे. तो नाराज झाला असावा माझ्यावर. पण काही हरकत नाही. माझ्या डोळ्यांत आता एक चमक आली होती. त्याच्याप्रती एक विश्वास डोळ्यात दाटून आला होता. कुठल्यातरी अनामिक संवेदनांनी त्याने माझी ती मनस्थिती, माझ्या डोळ्यातला विश्वास अचूक ताडला असावा. त्याने वर काढलेला फणा अलगद काहीसा खाली घेतला. कदाचित आता त्याला माझ्यापासून काही धोका नाही, याची जाणीव झाली असावी. मला बरे वाटले. त्याने माझ्यावरचा नाराजी कदाचित दूर केली असावी.
   त्याने आता आपला फणा सगळा खाली घेतला. त्या मातीच्या भिंतीला डोके टेकून, तो माझ्याकडे बघत होता. मीही अगदी त्याच्या डोळ्यांतच बघत होतो. आम्ही बराच वेळ असेच एकमेकांच्या डोळ्यात बघत होतो. माझी ममत्वाची भावना पुन्हा ऊचंबळून आली. आपल्याही आयुष्यात आता कोणीतरी सोबती मिळाला आहे, या विचाराने एक मोठा आवंढा कंठात दाटून आला. त्याची मला आपुलकी वाटू लागली. आणि मी माझा उजवा हात पुन्हा एकदा पुढे केला. तो माझ्याकडेच बघत होता. आता तो त्याच्या दिशेने येणाऱ्या, त्या माझ्या हाताकडे बघत होता. मी अतिशय शांतपणे तो हात, त्याच्या मस्तकाकडे नेत होतो. त्याने अजूनही काहीच हालचाल केली नव्हती. मी अलगद त्याच्या डोक्याला स्पर्श केला. त्याची थोडीशी हालचाल झाली. पण त्याने घातकी अशी कोणतीच प्रतिक्रिया केली नाही. जागेवरून एक छोटीशी विरोधी हालचाल केली. बस्स तेवढीच. मला आनंदाचे उधाण आले. मी त्याच्या मस्तकाला स्पर्श केला होता. तरीही त्याने मोठी अशी प्रतिक्रिया दिली नव्हती. म्हणजे त्यानेही आता मला सोबती असल्याचे कदाचित मान्य केले होते. मला आता हसायला येऊ लागले. मी आता एकटा उरलो नव्हतो. मलाही आता माझा सोबती मिळाला होता. मी थोडावेळ तसाच त्याच्या मस्तकावर हात फिरवत राहिलो. तो तसाच पडून, मिणमिणत्या छोट्याश्या डोळ्यांनी माझ्याकडे बघत राहिला. बराच वेळ आम्ही अशाच अवस्थेत राहिलो. बराच अवधी निघून गेला होता.

माझे अंग तापाने फणफणत होते. दुपारपासून मला थोडी थोडी त्याची जाणीव झाली होती. पण त्याच्यासोबतच्या  त्या प्रसंगाने मला त्या तापाकडे लक्षच देता आले नाही. काहीसा अशक्तपणाही शरीराला जाणवत होता. परंतु या सगळ्या गोष्टींचे मला विशेष असे कष्ट जाणवत नव्हते. या सगळ्या गोष्टी गौण होत्या. मला आता सोबती मिळाला होता. हीच गोष्ट महत्वाची होती. मी शिडीच्या खाली आलो होतो. त्याच्याकडे पाहून हसत होतो. मी खालच्या अंथरुणात अंग टाकले. आणि पडल्या पडल्या अगदी वरच्या भिंतीवर त्याच्याकडे बघू लागलो. तोही माझ्याकडे खाली वाकून बघत आहे हे मला माहीत होते. शेवटी मीही त्याचा मित्र झालो होतो ना! बराच वेळ मी पडल्या पडल्या त्याच्याकडेच बघत होतो. त्याच धुंदीत मला कधी झोप लागली कळालेच नाही.
              तिसरा प्रहार नेमकाच टळून गेला होता. मला जरा जास्तच झोप लागली होती. अंगात ताप असल्याने तसे झाले असेल. मी गडबडीने झोपेतून उठलो. सगळे प्रसंग मन:पटलावरून झरझर करत पुढे गेले. मी जागेवरून उठलो. शिडी अजूनही तेथेच लावलेली होती. मी शिडीवरून वर गेलो. त्या सांधीत नजर टाकली. अंगाचे वेटोळे करून तो सुस्त पडलेला होता. कदाचित तो निद्रेत असावा. मला त्याची उगीचच दया आली. आपण तरी खोलीभर फिरू शकतो, पण त्याला तर तेवढेही करता येत नसेल. गेल्या दोन रात्री आणि दिवस तो तेथेच होता. त्याने काही खाल्ले तरी असेल का? मला उगाच अपराधीपणा वाटला. मी खाली आलो. अंगात सदरा चढवला आणि खोलीबाहेर आलो. हातात दूध घेऊन मी परत खोलीत आलो. स्वतःसाठी कधी मी दूध आणल्याचे आठवत नाही. पण आता इथे स्वतःचा प्रश्न नव्हता. इथे माझा मित्र भुकेला होता. त्याला दूध देणे गरजेचे होते. मी छोटीशी वाटी घेतली. त्यात ते दूध ओतले आणि शिडीवर चढून, पुन्हा वर पत्र्याच्या जवळ गेलो. तो अजूनही तसाच गुंडाळलेल्या अवस्थेत होता. मी अलगद दुधाची वाटी त्याच्या समोर ठेवली. आणि तिथेच उभा राहत तो उठण्याची वाट बघत होतो. त्याच्याकडे टक लाऊन पाहताना मनात अनेक भावनांचे पेव फुटत होते. मला हे खरे वाटत होते. स्वतःच्या कोशात आत्तापर्यंत मी केवळ घुसमट अनुभवलेली होती. मनात आकांत उत्पन्न करणारा एकांत अनुभवला होता. कधी खाली कोसळून पडलो तरी, हात देऊन वर उठवणारे कोणी नव्हते. मनात उठणारे हजारो प्रश्न विचारायला कधी कोणी माझ्यासमोर हजर नव्हते. मी असाच एकटा एकटा पडत होतो. कधी कधी याच एकटेपणातून मी ठार वेडा झालो असतो. किंवा आत्महत्या करण्याच्या टोकापर्यंत पोहोचलो असतो. पण कदाचित तसे व्हायचे नव्हते. मानवी समूहातील भले मला कोणी भेटले नसेल, पण एक जीव मात्र अनाहूतपणे माझ्या आयुष्यात आला होता. मी त्याला आता गमावणार नव्हतो. त्यामुळे मला त्याची काळजी करावीच लागणार होती ना? त्याची तहान, भूक, निद्रा या सगळ्या गोष्टींची मी काळजी घेणार होतो.
 दुधाची वाटी ठेऊन बराच वेळ झाला होता, पण त्याची अजुन काही हालचाल झाली नव्हती. त्याला आता उठवावे लागणार होते. असे उपाशी राहणे त्याच्या हिताचे नव्हते. मी एक हात पुढे करून, त्याच्या अगदी पोटावर हलवले. तोच थंड स्पर्श झाला. त्याचे शरीर चांगलेच वजनदार होते. माझ्या हालचालीचा त्याच्यावर काहीच परिणाम झाला नव्हता. मी पुन्हा एकदा जोरात त्याला हलवले. पुन्हा थोडा जोर लावला. कदाचित तो त्याला जाणवला असावा. एक जोरात उसळी मारून तो जागेवर फणा काढून उभा राहिला. मी झटकन हात बाजूला घेतला. मी जरा जास्त जोरात हळवल्याने तो गोंधळला असावा. नाहीतर तो असा अचानक क्रोधित नसता झाला. तो काहीवेळ तसाच फणा काढून थांबला. माझ्याकडे बघत त्याने एक दोनदा फुस्sss फुसssss  असा आवाजही काढला. मला त्याच्या त्या कृतीचा अर्थ काही समजला नाही. पण तो भुकेला असावा अशी जाणीव झाली. मी बोटाने त्या वाटीकडे निर्देश केला. पण तो तिकडे बघत नव्हता. तो माझ्याकडेच बघत होता. मग हळूहळू त्याने तो फणा खाली घेतला. मी हळूच वाटी त्याच्या तोंडाजवळ नेऊन ठेवली. पण त्याने वाटीकडे साधे लक्षही दिले नाही. मला थोडेसे दुःख झाले. कदाचित माझे वर्तन चुकले असावे. मी उगीच त्याच्यावर बळजबरी करत होतो. त्यालाही थोडेसे स्वातंत्र्य द्यायला हवे. त्याला सारखा सारखा व्यत्यय नको करायला. मी त्याच्याकडे बघत हलके हलके शिडीवरून खाली आलो. भुकेची जाणीव होईल तेव्हा तो आपोआपच ते दूध पिऊन टाकेल. आपण जास्त चिंता नको करायला.
              

मला आता काहीच नको होते. मला फक्त माझा सोबती हवा होता. कसेबसे दोनतीन घास मी पोटात उतरवले. आणि अंथरुणात अंग टाकले. रात्र झाली होती. खोलीत पिवळा दिवा मंदपणे मिणमिणत होता. मी वरच्या सांधीकडेच पाहत होतो. वातावरणात गारवा वाढला होता. दिवसा जाणवणारी गरमी आता नाहीशी झाली होती. त्याची जागा आता या अशा थंडीने घेतली होती. मी अंगाभोवती पांघरून घेऊन वर त्या सांधीकडे बघत होतो. अचानक काहीतरी आठवले. बाजूला पडलेले एक जाड कापड मी हातात घेतले, वर शिडीवर गेलो. आणि त्याच्या अंगावर ते कापड अलगद टाकले. त्याला थंडी वाजू नये, असे मला वाटत होते.
    माझ्यात आता बराच बदल झाला होता. मी आता अंतर्मुख उरलो नव्हतो. तो ज्या दिवसांपासून माझ्या खोलीत आला आहे, तेव्हापासून मी या खोलीतच आहे. आता मला बाहेरचे जग नकोसे झालेय. बाहेर सगळा एकांत आहे. माणसांचा समूह आपल्यासाठी नाही. त्यात आपण एकटे पडतो. तेथे कोणीच आपली दखल घेत नाही. पण या खोलीत तसे नव्हते. तो माझ्या सोबत होता. मी त्याला स्पर्श करत होतो, तो फणा काढून माझ्याकडे बघत होता. माझी दखल घेत होता. मी त्याला खायला देत होतो. त्याची काळजी घेत होतो. तोही माझ्यासोबत हळूहळू रुळत जात होता. त्याची हालचाली मला अनुकूल अशा होत होत्या.
     किती काळ, किती दिवस उलटले हे काहीच कळत नव्हते. दिवस संपून रात्र येत होती. रात्र संपून दिवस येत होता. मी नित्यनेमाने त्यावरून हात फिरवत होतो. तो शांत पडून राहत होता. कधी कधी लांबलचक फणा काढून तो माझ्याकडे बघत असे. मी त्याला काहीतरी खायला देत असे. कधी दूध, कधी भाकरी, कधी तांदळाचे दाणे, जे मिळेल ते. तो तेथून हलायचा नाही. पण त्याने मी जे जे खायला दिले, ते कधीच खाल्ले नाही. मला अतीव दुःख व्हायचे. मला खाताना लाज वाटायची. आपला सोबती उपाशी असताना, आपण तरी कसे खायचे? कसेबसे दोन तीन घास मी घशाखाली घालायचो.
    मला शरीर थकल्यासारखे वाटू लागले. माझा चांगलाच घाणेरडा अवतार झाला आहे हेही जाणवू लागले. खोली सतत बंद असल्याने, खोलीत एक कोंदट वास पसरून गेला होता. ठिकठिकाणी जाळे पसरत चालले होते. दाढी चांगलीच लोंबली होती. सगळे अंग मळके झाले होते. पोटभर खायला न मिळण्याने अंगावर केवळ हाडे शिल्लक उरली होती. त्यात आता आजारपणा वाढला होता. शरीर शक्तिपात झाल्यासारखे वाटत होते. पण मला त्याचे काहीच अप्रूप वाटत नव्हते. मी माझ्या मित्रासोबत खुश होतो. फक्त एकच दुःख होते. तो काहीच खत नव्हता. मी एवढे त्याला खायला टाकत होतो. पण तो ते काहीच खात नव्हता. कधी उंदीर, पाल, बेडूक खात असेल, तर तेही नजरेस पडत नव्हते.
   त्याच्याशिवाय आता चैनच पडत नव्हती. चोवीस तास त्याला पाहत राहावे असे वाटत होते. पण आता काही मर्यादा येत होत्या. शरीर कमालीचे खंगले होते. मनाचा कितीही उभार असला तरी, शरीराने मनाची साथ सोडली होती. मला शिडीच्या पायऱ्या चढवत नव्हत्या. पण मला काहीही करून वर जायचेच होते. त्याला पाहायचे होते. त्याच्या अंगावरून हात फिरवायचा होता.
    त्या दिवशी रात्र ओलांडून गेली होती. दुपारचा प्रहर आला होता. मला त्याला  पाहायचे होते. त्याला स्पर्श करण्याची इच्छा एकदम अनावर होत होती. त्याला पाहिल्याशिवाय मला चैन पडणार नव्हती. मी अंथरुणातून उठण्याचा प्रयत्न केला. पण उठताच येईना. शरीर जड पडले होते. कित्येक दशकांपासून मी जागेवर पहुडलेला आहे, असे वाटत होते. पण त्याला पाहण्याची ओढ तर अनावर होत होती.
मी तसाच खुरडत खुरडत शिडीकडे जाऊ लागलो. माझा मित्र काय करत असेल? सुस्त पडला असेल का? की फणा काढून बसला असेल? मला त्याच्याकडे जाण्याची घाई झाली होती. शिडीला हाताचा जोर देऊन मी शिडीवर चढण्याचा प्रयत्न करू लागलो. पण मी धडपडू लागलो.  पुन्हा पुन्हा मी वर जाण्याचा प्रयत्न करू लागलो. एक एक पायरी मी वर जाऊ लागलो. शरीरावर सगळा भार पडत होता. पण त्याला पाहण्याच्या उर्मीतून, ती वर जाण्याची शक्ती मला भेटत होती.
   अखेर मी शिडीच्या वरच्या पायारीपर्यंत पोहोचलो. मला हर्ष झाला. एकदाचा मी त्याच्याजवळ पोहोचलो होतो. मी त्याच्याकडे नजर टाकली. तो आपला नेहमीप्रमाणे सुस्त पडलेला होता. त्याच्यावर नजर जाताच मला आनंद वाटला. माझा मित्र! माझा सोबती! किती शांतपणे पहुडला आहे. मी हात पुढे करून अलगद त्याच्या शरीरावरून फिरवू लागलो. तोच तो थंड स्पर्श शरीराला जाणवू लागला. मी डोळे बंद केले आणि तो त्याचा स्पर्श अनुभवू लागलो. त्याच्या स्पर्शात एक जादू होती. नशा होती. ज्याने माझ्या शरीरभर एक सकारात्मक ऊर्जा प्रकट होत असे. मला आता त्याच्या स्पर्शाची सवय झाली होती. त्याचे व्यसन कधी झाले हेच कळले नाही. मला अन्नाच्या गरजेपेक्षा त्याचा स्पर्श गरजेचा वाटत होता. मी विचारात गर्क होतो. डोळे मिटून त्याच्या अंगावरून अलगद हात फिरवत होतो. मधेच त्याने थोडीशी चुळबुळ केली. मी जरासा हात मागे घेतला. तो पून्हा शांत झाला. मी पुन्हा त्यावरून हात फिरवू लागलो.
    आता मला एक प्रकारची समाधी लागली होती. मी आजूबाजूचा भोवताल विसरत चाललो होतो. मी त्याच्या त्या भक्तीत लीन झाल्यासारखा, त्याच्या शरीरभर हात फिरवत चाललो. विरक्त अवस्थेत मन पोहोचू लागले. हळूहळू सभोवतालच्या सगळ्या वस्तू अदृश्य वाटू लागल्या. माझा मनोव्यापार केवळ त्याच्याच स्पर्शाने भारून जात होता. आता मला तोच हवा होता. माझ्या मनात आता केवळ तोच तो भारला जात होता. माझे अस्तित्व लीन पावत होते. त्याच्या अस्तित्वाने माझे अस्तित्व अंतर्धान पावत होते. मला कशाची शुद्ध जाणवत नव्हती. मी आता अविरतपणे त्याच्या सर्वांगवरून हात फिरवू लागलो. माझ्या हातांचा जोर वाढत होता. मी आवेगाने त्यावरून हात फिरवत होतो.
    मला आता दिसू लागले, की तो हळूहळू हलत होता. त्याला कदाचित जाग येत असावी. त्याने शेपटी हलवली. स्वतःभोवती गुंडाळलेली शेपटी त्याने अलगद बाजूला काढली. ती काहीशी हवेत तरंगती झाली. तो जागा होऊ लागला. त्याचे शरीर वळवळ करू लागले. माझा हात अजूनही त्यावर फिरू लागला. आता मला दिसले की, त्याचे मस्तक वर येत आहे. आता तो फणा काढणार होता. भला मोठा फणा! अगदी दीड दोन फुटांचा, लांबलचक फणा! माझ्या ओठांवर हास्य आले. आता मी त्याच्या डोळ्यात पाहणार! पुन्हा ती आनंदाची अनुभूती वाट्याला येणार!
अचानक त्याच्या डाव्या बाजूला काहीतरी हालचाल मला दिसली. माझे लक्ष विचलित झाले. माझी नजर त्या हालचालींवर गेली. तेथे एक काळा कुळकुळीत उंदीर आला होता. तो तेथून पळण्याचा प्रयत्न करत असावा. मला राग आला. मी कमालीचा संतप्त झालो. कोण कुठला हा क्षुद्र उंदीर, आमच्या दोघांच्या मध्ये असा लुडबुड करत आहे. बरे झाले, त्याची नजर त्या उंदरावर पडली नाही. नाहीतर माझ्यावरचं लक्ष काढून त्याने उंदरावर दिले असते. त्याचा फडशा पाडला असता. आणि मला ते पटले नसते. त्या उंदराला येथून हाकलून द्यावे लागेल. नाहीतर तो येथेच घुटमळला तर, आमच्या दोघांच्या मूक संभाषणात व्यत्यय यायचा.
  इकडे तो हळूहळू आपला फणा वर घेत होता.
आणि अचानक ती घटना घडली. तो उंदीर त्याच्या डोक्यावरून पलीकडे उडी मारण्याच्या पवित्र्यात होता. ती गोष्ट माझ्या लक्षात आली. पुन्हा मला राग आला. त्याची लुडबुड वाढत होती. उंदीर आता उडी मारायला तयारच होता. आणि उंदराने ती उडी मारली. मला आधीच त्या उंदराचा संताप आला होता. मी अंगात जेवढे त्राण उरले होते, तेवढ्या शक्तीने त्याला झटकून टाकण्यासाठी, जोरात हवेत हात फिरवला. हाताच्या पंजाने त्याला झटकून टाकणार होतो. पण दुर्दैवाने वेळ साधली होती. मी हवेत हात फिरवायला, त्यावेळी त्याने आपला लांबलचक फणा काढायला, आणि उंदराने पलायन करायला एकच वेळ झाली. माझा हवेतला हात सपकन त्याच्या त्या लांबलचक फण्यावर जाऊन आदळला. उंदीर तसाच पुढे निघून गेला.
               क्षणभर मला कशाचाच काही बोध झाला नाही. पण उजव्या हातावर मोठा डंख झाला आहे, ही जाणीव मात्र तीव्र झाली. आणि त्या निमिषार्धात घडलेला तो प्रसंग आठवला. माझा हात जेव्हा त्याच्या फण्यावर लागला, तेव्हा तो प्रचंड चवताळला असावा. त्याला माझ्यापासून धोका वाटला असावा. त्याने तो फणा तसाच वेगाने पुढे करत, माझ्या हातावर तीव्रतेने डंख केला. माझा हात प्रतिक्षिप्त क्रियेने पाठीमागे आला. एक वेदनेची लहर अंगभर पसरून गेली.
तो माझ्यासमोरून जात होता. त्याने ती जागा सोडली होती. आपले बस्तान दुसरीकडे मांडायला तो निघाला होता. भिंतीवरून पुढे जात तो दरवाजाच्या जवळ पोहोचला, तेथून दरवाजाने खाली जात तो दाराबाहेर निघून गेला. अगदी माझ्या अंतर्मनातूनही. माझा थोडाही विचार न करता. मी अजूनही त्या शिडीवर बसलेलो होतो. हाताची प्रचंड वेदना, शरीरभर धक्के देत होती. मनात अनेक उलथापालथी होत होत्या. मी पुन्हा एकदा एकलकोंडा झालो होतो. एकटा पडलो होतो. त्याने मला दंश केला याचे दुःख मला वाटत नव्हते. पण मला पुन्हा एकदा अशा एकलकोंड्या अवस्थेत सोडून तो गेला होता. पुन्हा मी एकटा पडलो होतो. मला असा एकाकी सोडून तो बिनधास्त गेला होता. त्याने एकदाही मागे वळून पाहिले नव्हते. मला अतीव दुःख झाले. माझ्या डोळ्यांसमोर अनेक वर्तुळे उमटत होते. दृष्टी अंधुक होत चालली होती. तोल ढासळला जात होता.
  आता मी असाच या खोलीत पडून राहणार. अगदी  एकटाच. आणि काही कळायच्या आत मी शिडीवरून सरळ सरळ खाली कोसळलो. अगदी कायमचा! पुन्हा कधीही न उठण्यासाठी!

(समाप्त)
वैभव नामदेव देशमुख.

Group content visibility: 
Use group defaults

king of net,
ही कथा मिसळपाववर आधी टाकलेली आहे.
तिथे वाचली असेल.

कथेवर प्रतिसाद देत नाही शक्यतो. पण गूढकथा असल्याने देत आहे. तुमची वर्णन शैली अप्रतिम आहे. उत्कंठा वर्धक आहे. कथानायकाची मानसिक स्थिती उलगडण्याचा प्रयत्न चांगला आहे. तो अजून नेटका होऊ द्यावा.

शक्यतो गूढ कविता, गूढकथांमधे प्रतिमांचा वापर केला जातो. साप किंवा नाग (फणा असल्याने) हे कशाचे प्रतिक आहे याचा उलगडा न झाल्याने न राहवून प्रतिसाद दिला आहे. जर ही प्रतिमा म्हणून वापरली नसेल तर नायकाने हात लावल्यानंतरही इतके दिवस दंश न करणे, जागा न बदलणे आणि थंड जागेत पडून राहण्याऐवजी पत्र्याच्या गर्मीत राहणे हे समजले नाही.

तुम्ही लिहीत रहा. चांगले लिहीत आहात. योग्य ते बदल केल्यास. ही कथा मासिकात छापून येईल.

पारंबीचा आत्मा,
साप म्हणजे एक प्रतिमा आहे. एकलकोंडेपणाची प्रवृत्ती प्रामुख्याने त्यात दाखवायची होती.
तुमच्या अभिप्रायचा नक्की विचार करेल.
त्याप्रमाणे बदल करण्याचा प्रयत्न करेल.
असा प्रामाणिक अभिप्राय आला की, लिहिण्याचा अजून उत्साह वाढतो.

चांगली आहे कथा.
वाचताना काहीशी नारायण धारपांच्या 'अंधारातील उर्वशी' नावाच्या कथेसारखी वाटली. स्पेशली तो अशक्त, घाणेरडा होत जातो तो भाग.

कथा डेंजर आहे
हो अंधारातली उर्वशी थोडी अशी आहे.पण त्यातलं पात्र अजून जास्त घातकी आहे.
धारपांचीच एक सापवाली कथा पण आहे. थोडा बाज असाच आहे.

तुमची लेखनशैली खूप प्रभावी आहे.लिहीत रहा. पुढेमागे या कथांचा एक संग्रह बनवून अमेझॉन वर इ बुक बनवता येईल.

हो अंधारातली उर्वशी थोडी अशी आहे.पण त्यातलं पात्र अजून जास्त घातकी आहे. >>> हो हो. पण ती पूर्ण सुपरनॅचरल अंगानेच जाणारी कथा आहे. सापवाली कथा कुठली म्हणतेयस? लक्षात नाही आली.

साप वाली एक कथा आहे.कोणत्या संग्रहात ते आता आठवणार नाही.
कपाटात साप असतो.नायकाच्या आयुष्यातल्या पराभवानुसार हा साप जास्त जास्त अशक्त होत जातो आणि एक दिवस मरतो अशी काहितरी कथा आहे.

'फडताळातील साप' - काळ्या कपारी कथासंग्रह. >> मलाही तीच आठवली सुरूवातीचा भाग वाचून. नंतर हि फारकत घेत गेली.

धनवन्ती,
thank you very much.
लिहीत आहे.
तुम्हीही अशाच कथा वाचत चला.

अतिशय परिणामकारक कथा. डिटेलिंग फारच उत्तम आहे आणि कथा सांगण्याची हातोटीही फार उच्च आहे.

मामी,
मनःपूर्वक आभार.
भारी वाटत असा अभिप्राय आल्यावर.

फार फार आवडली. मी धारपांच्या कथा वाचल्या नाहीत. पण ह्या कथेला कुठल्याही तुलनेची गरज नाही. ही स्वयंसिद्ध आहे. आणि सर्वात महत्वाचेे
'All horror stories are not ghost stories.And all ghost stories are not horror stories !

प्रभुदेसाई,
खूप खूप आभार आपले.
माझ्या कथांवर असेच प्रेम राहूद्या.
लिहिण्याचा उत्साह अजून वाढतो.