आहे तसा भृंग मी

Submitted by आर्त on 5 May, 2021 - 05:58

संस्कृत/मराठी मध्ये एक शार्दूलविक्रीडित नावाचं वृत्त आहे, ज्याची मला अलीकडेच एका मित्राने तोंडओळख करून दिली. ह्या वृत्तात बरेच प्रसिद्ध मंत्र/स्तोत्र आणि कविता आहेत. उदाहरणार्थ मंगलाष्टकं, प्रारंभी विनंती, रामो राजमणी आणि कवितांमध्ये आजीचे घड्याळ, आम्ही कोण? अशा ह्या वृत्तातली ही कविता.
.
आहे तसा भृंग मी

मी एथेन्स मधील सुंदर किती, खिंडार ते पाहिले,
कोलोजीयम रोमचे बघितले, प्राचीन होतो भले.
मी पॅरीस मधील ऐफल उभे, पाहून झालो खुळा
भूमध्यात विशाल सागर वसे, स्वप्नांतला तो निळा.

विएन्नात उभे महाल इतके, ते वैभवी भासले
क्रॅकोवात तुरुंग ते, अजुनही मुक्तीस उत्कंठले.
स्वित्झर्लंड मध्ये निसर्ग अन ती संपन्नता भावली,
वाड्यांची बघ जर्मनीत, उमदी माला जणू लागली.

गीझाचे भलते पिरॅमिड, खरी जादू जगाची असे,
ते दिव्यत्व उभारण्यास बहुदा, केले रिकामे खिसे.
तुर्कीचे गुणगान गात उसळे, रक्तात उत्कर्ष हा,
माझा भारत वाटतो मज तरी, या पंगतीचा शहा.

कोनाड्यात हरेक, भेटत असे, काही शिकाया नवे,
आता फक्त मनात स्वैर उडती हे आठवांचे थवे.
काही आणि बघावया नवनवे, मार्गस्थ मी राहतो,
मार्गी त्या हरवून मीच मजला तेथे नवा भेटतो.

आर्त
०२.०५.२०२१

Group content visibility: 
Use group defaults

छान रचना..

कवितेच्या रचनेबद्दल नवी माहिती मिळाली..!

रचना मस्त झाली आहे. 'ते दिव्यत्व उभारण्यास बहुदा, केले रिकामे खिसे' ही ओळ विशेष आवडली.

व्वा!! व्वा!!!!
काय लिहिलंय आर्त साहेब!!
☺️☺️ प्रचंड आवडली.