युवा कीर्तनकार महिला : हभप शिवलीला ताई पाटील महाराज

Submitted by ------ on 4 May, 2021 - 00:34
shivleela tai patil

ह भ प.
म्हटलं की डोक्यात पगडी घातलेले , घा-या डोळ्यांचे, गो-या रंगाचे , साठी उलटलेले , धोतर नेसलेले बुवा डोळ्यासमोर यायचे. गेल्या वीसेक वर्षात हे चित्र पालटले. कीर्तन म्हटलं की अभिजन या प्रतिमेला छेद गेला. त्याला कारणे देखील आहेत. परंपरागत व्यवसाय म्हणजे धार्मिक विधींचे पुरोहित, गुरूजी यासाठी अभिजन वर्गात मनुष्यबळ नाही. उच्चशिक्षण आणि परदेशी करीयर यामुळे उलट कुणी या व्यवसायात आलाच तर त्याला अर्थार्जनाची संधी आहे परदेशी.

वारकरी समुदायातून बहुजन समाजात कीर्तनकार घडवण्याची परंपरा गेल्या तीसेक वर्षात चांगली मूळ धरू लागली आहे. बरेचसे कीर्तनकार आता नावारूपाला आले आहेत. बाबामहाराज सातारकरांसारखे हभप होऊन गेले. आंधळे महाराज असतील किंवा अजून कुणी असतील. हे सर्व महाराज गंभीर प्रकृतीचे होते. थोडेफार हास्याचे शिडकावे करत प्रेक्षकांशी संवाद साधण्याचे यांचे कौशल्य त्यांना लोकप्रियता मिळवून देतात.

मात्र इंदूरीकर महाराजांनी खळखळून हसवणारी कीर्तनं सुरू केली आणि बघता बघता आख्ख्या महाराष्ट्रात त्यांच्या कीर्तनाने धुमाकूळ घातला. आज युट्यूब असो, व्हॉट्स अ‍ॅप असो, फेसबुक असो की टिकटॉक असो. इंदूरीकर महाराजांची कीर्तनं संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचतात. कीर्तनाच्या क्षेत्रात महाराजांनी क्रांतीच केली.

तरी देखील महिलांनी आजवर या क्षेत्रात म्हणावे असे नाव कमावले नव्हते. अभिजन वर्गातल्या तुरळक अशा महिला येत राहील्या. अपर्णाताई रामतीर्थकर यांच्या रूपाने पहिल्यांदा एखाद्या महीलेने इंदूरीकर महाराजांसारखी अमाप लोकप्रियता मिळवली. त्यांचे कीर्तनाचे किंवा प्रबोधनाचे विषय योग्य कि अयोग्य हा लेखाचा विषय नाही. महिला म्हणून त्या या क्षेत्रात उंचीवर गेल्या हे स्विकारायला पाहीजे. रूढ अर्थाने त्याला कीर्तन म्हणता येत नाही. पण उपदेश तसाच आहे. फक्त टाळकरी नसतील इतकाच काय तो फरक.

बहुजन समाजात मात्र महिला या क्षेत्रात येत नव्हत्या.
बालकीर्तनकार शिवलीला ताई पाटील यांच्या रूपाने महाराष्ट्राला पहिल्यांदा रूढ अर्थाने कीर्तनकार असलेली महिला मिळाली. अगदी शाळेत असल्यापासून त्या कीर्तन करतात. त्यांना कीर्तनासाठी वारकरी संघाकडून पुरस्कार मिळाले आहेत. ते ही लहान वयातच. तेव्हांपासूनच त्यांच्या कीर्तनाला खेड्यापाड्यात मागणी आहे.

shivleela2.jpg
आता त्यांना युवाकीर्तनकार असे संबोधण्यात येते.
शिवलीलाताई पाटील या इंदूरीकर महाराज यांच्याप्रमाणे खळखळून हसवतात. त्यांचा असा चाहता वर्ग आहे. एक महिला जेव्हां सांगते तेव्हां महिलांना ते पटते. त्या कीर्तन करताना प्रश्न विचारतात. त्या प्रश्नांची उत्तरं चिमटे काढत देतात. साधे साधे तत्वज्ञान सांगतात. खेड्यापाड्यात जे तत्त्वज्ञान प्रिय आहे तेच त्या सांगतात. त्यावर शिक्कामोर्तब करतात.

बाईच्या बाईपणाला मर्यादा घालणारे उपदेश त्यांच्या कीर्तनात असतात. त्याला गावकरी मंडळी माना डोलावतात. पुरोगाम्यांप्रमाणे त्या समजुतीला धक्का पोहोचवत नाहीत. स्त्री-स्वातंत्र्याची काही मतं कीर्तनात येतात पण दुपटीने बंधनं घालणारे उपदेश देखील येतात. बाईच्या डोक्यावर पदर का असला पाहीजे हे विनोदाच्या माध्यमातून त्या सांगतात.

कीर्तनकाराला अभिनय यावा लागतो हे त्यांच्याकडे पाहून पटते.
भर सभेत उभे राहून पुरूषांना अडचणीचे प्रश्न विचारत त्यांची टिंगल करणे हे महिलेसाठी सोपे काम नाही. गावाकडे राहीलेल्यांना त्याची कल्पना असेलच. पण ताई हे काम लीलया करतात. त्यांच्या नावातही लीला आहेच.
shivleela1.jpg
कदाचित महाराज असल्याने असेल, गावकरी देखील मान डोलावूना त्यांच्या विनोदाला दाद देतात.
काही काही तत्त्वं त्या सर्वांना पटेल अशी सांगतात.

संसारी माणसाची कर्तव्ये काय हे तर कुणालाही पटेल. लसावि काढायचा झाल्यास वादग्रस्त उपदेश वगळून ८०% भाग हा सामाजिक वर्तनाबद्दलचा असतो. नव-याने दारू पिऊ नये, मुलाबाळांकडे लक्ष द्यावं, मुलांनीही गुटखा - दारू - तंबाखू खाऊ नये, आईवडीलांना मान द्यावा, कामधंदा करावा, मुलीही अशा मुलांना नाकारू शकतात, त्यांना तो हक्क आहे हे त्या हसवून हसवून सांगतात.

काही बाबतीत त्या अपर्णा रामतीर्थकरांच्या शिष्या वाटतात. काही वेळा इंदूरीकर महाराजांचा प्रभाव जाणवतो. पण कॉमेडी कीर्तन म्हणून युट्यूबर त्यांची प्रवचने शेअर केलेली दिसतात. त्यांच्या फेसबुक पेजवरून देखील त्यांचे शेकडो व्हिडीओ व्हायरल होत असतात.
खूपच कमी कालावधीत ताईंना ही प्रसिद्धी लाभलेली आहे.

खेडोपाडी कीर्तनकार हा एक प्रभावी मीडीया आहे. विचारात बदल घडवून आणण्याची ताकद हभप महाराजांकडे असते. त्यांचे विचार पटत नसतील तर भूमी आपटण्यापेक्षा पुरोगामी विचार रूजवण्यासाठी कीर्तनाचा सहारा घ्यावा असे पुरोगाम्यांना वाटत नाही यातच त्यांचे अपयश आहे.

एक महिला म्हणून अशा क्षेत्रात पाय रोवून उभ्या राहणा-या आणि अनेक मुलींना या वेगळ्या वाटेवर येण्यास प्रवृत्त करणा-या ताईंचे अभिनंदन देखील करावेसे वाटते. त्या या क्षेत्रात येऊ शकतात आणि ते स्विकारले जाते हा सकारात्मक विचार आहे. पण त्यांचे काही विचार हा नक्कीच चर्चेचा विषय राहील.

त्यांच्या काही गाजलेल्या भाषणाच्या लिंक्स. जर इच्छा असेल तर आपण पाहू शकता.

१. आख्ख्या महाराष्ट्रात गोंधळ घालणारे कीर्तन
https://www.youtube.com/watch?v=rDniLYoPhEs

२. कॉलेजमधलं प्रेम
https://www.youtube.com/watch?v=ujMFAS-cAPA

३. सासू - सुनेचं भांडण
https://www.youtube.com/watch?v=5aYQA2hl05M

४. मामाला धमकी - तुझी पोरगी दे
https://www.youtube.com/watch?v=kx37uv3fG3Q

५. हभप शिवलीहभपताई पाटील महाराज यांची करी कहाणी ( त्यांच्याबद्दल दुस-यांनी बनवलेला व्हिडीओ )
https://www.youtube.com/watch?v=53ZhNJJnxWU

नमुना म्हणून एव्हढे पुरे. नाही आवडलं तर पहिल्यालाच बास कराल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लिंक्स शेअर केल्याबद्दल धन्यवाद. खुप प्रभावी किर्तनकार म्हणुन त्या ओळखल्या जातील यात शंकाच नाही.

स्टाईल, नाट्यमयता चांगली आहे
विचारांचं माहीत नाही.कदाचित त्या ज्या क्राऊड मध्ये कीर्तन करत असतील तिथे हे विचार चालत असतील.त्यातही थोडेफार चांगले मेसेज असतील.
खरं तर धार्मिक चा आग्रह नसेल तर ही मुलगी नाटक, सिनेमा, स्टँड अप टॉक शो मध्येही चांगले यश मिळवेल.अंगी कला आहे.

प्रचारकांचा प्रतिसाद बघूनच जुनं खोड असेल म्हणून बघितलं तर हे तर बेमांच्या आधीच्या काळातले निघाले Rofl
मला ओळखलं म्हणजे Lol

>> नाही आवडलं तर पहिल्यालाच बास कराल. ----- केले !
>> Submitted by अनिश्का on 4 May, 2021 - 17:19

Lol
(प्रतिसादाची पद्धत आवडली. "केले" ऐवजी "नाही केले" असते तरीही)
याचा अर्थ प्रतिसाद आवडला नाही असेही नाही किंवा आवडला असेही नाही Proud Light 1

मी एक खरं सांगू का,
कदाचित माझा इथला हा शेवटचा प्रतिसाद असेल.
पण राहवले नाही म्हणून लिहितोय.

मी गजर कीर्तनाचा ह्या कार्यक्रमाचे खूप एपिसोड्स पाहिलेले आहेत. त्यात या आलेल्या होत्या.
मध्यंतरी युट्यूब वर कुणीतरी म्हणाले की
"आत्ताच्या घडीचे सगळेच युवा कीर्तनकार हे इंदुरीकर यांची कॉपी करत आहेत! आणि ते त्यांनी थांबवावे"

आणि आता हे मला देखील पटायला लागलं आहे. पूर्वी मी याच्याशी सहमत नव्हतो!

पण मला इथल्या कुणीही खरंच सांगा कीर्तन हे कधी कॉमेडी असू शकतं का?
कॉमेडी हवे तर पुन्हा पुन्हा हेराफेरी, फिर हेराफेरी, ढोल, चुप चुप के असले चित्रपट पाहू की आम्ही!!

कॉमेडी कीर्तन म्हणजे... खरंतर एखाद्या सुंदर कवितेची जशी विडंबना केली जाते आणि त्यालाही दाद मिळते... त्यातला प्रकार आहे हा!
या लोकांनी एक प्रकारे कॉमेडी कीर्तन करून कीर्तन या सांप्रदायिक प्रतिष्ठित गोष्टीची विडंबना च केलेली आहे!!

तुम्हीच बघा ना,
"पोरीच्या मागे लागू नका, पोरीच्या बापाने येवून तुम्हाला म्हणले पाहिजे की माझी पोरगी तुमच्या घरात घ्या"
ही गोष्ट कुणीही सांगतोच की या जगामध्ये.
त्यासाठी कीर्तन कशाला हवं? आणि हि काय किर्तनात सान्गावयाचि गोश्ट आहे का?

काय मूर्खपणा आहे हा एकीकडे तुम्हीच सांगता की हे सर्व काही मोह माया आहे, हरिनाम हेच खरे आहे. तिथेच तुम्ही दुसऱ्या वेळी (उत्तरार्धात) असली नीच पातळीवरची उदाहरणे देता??
म्हणजे एकीकडे माणूस विरक्ती साठी कीर्तनात आलेला असतो.. मग तो तरणा, म्हातारा, सिंगल, married काहीही असो. मग त्यालाच तुम्ही विरक्तीच्या मार्गावर भोगाच्या कल्पना सांगता? It's so rediculous!!

मी कीर्तन का ऐकतो?
तर माझ्या कानांवरून नवनवीन श्लोक, अभंग जावेत म्हणून! हल्ली हातांत माळ घेऊन नामस्मरण करणारे दुर्मिळ आहेत. आणि किर्तनामार्फत तेवढेच नामस्मरण होऊन जाते. मग गजराचे का निमित्त असेना!!
पुराणातील नवनवीन गोष्टी माहीत व्हाव्यात या कुतूहलापोटी कीर्तन पाहणारे आहेतच की!

इंदुरिकर आणि तत्सम so called
कीर्तनकार लोक कधीकधी तर (खरंतर बऱ्याच वेळी) कमरेखालच्या गोष्टींवर विनोद करतात... आणि ते ही भर कीर्तनात. WTF?? आपला विषय काय? आपण करतोय काय?

केवळ असल्या गोष्टी कीर्तनासारख्या पवित्र गोष्टीत आणल्याने मी नंतर नारदीय कीर्तनाकडे वळालो!!
पूर्ण, संपूर्णपणे वळायचे ठरवले होते.
मग यांचे कीर्तन पाहिले.
https://youtu.be/mYW5y9YPc8M

आता मी मोजून ३ ते ४ वारकरी संप्रदायातील कीर्तनकार लोकांची कीर्तने पाहतो! जे खऱ्या अर्थाने कीर्तनकार आहेत!

बाकी नारदीय कीर्तन हेच खरे कीर्तन
ही आता माझी गाढ समजूत झालेली आहे.
आणि या शिकलीलाताई पाटील, इंदुरिकर यांनीच हे सिद्ध केलंय की खरे कीर्तन म्हणजे फक्त आणि फक्त नारदीय कीर्तन असते!

त. टी. - रामदासी कीर्तन सुद्धा नारदीय कीर्तनाच्या तोडीस तोड असते.
मी नारदीय आणि रामदासी कीर्तनाच्या links खाली देत आहे...
तुमचा तुम्हालाच फरक लक्षात येईल!! आणि बाकीच्या लोकांना देखील समजेल!!
Attachments area:-
https://www.youtube.com/watch?v=dEwnWDopuRg

https://www.youtube.com/watch?v=xWPhv2mJLSM

https://www.youtube.com/watch?v=Ca-z4knvQPg

https://www.youtube.com/watch?v=T_T_Bn8SIgc -----> हे कीर्तन पाहून तर मी स्वत:देखील भावविवश झालोय.

https://www.youtube.com/watch?v=mJekCf1SU18  Latest

https://www.youtube.com/watch?v=y0Gg81gFhKc

https://www.youtube.com/watch?v=PqNB3v_fAgs

https://www.youtube.com/watch?v=KjHnQUYiNnk

इत्यादी इत्यादी...

प्रगल्भ, अनुमोदन.
ही किर्तनं आणि स्टॅण्ड अप कॉमेडीत फारसा फरक वाटत नाही मला.

नाही आवडलं तर पहिल्यालाच बास कराल.>>> +१
या लोकांनी एक प्रकारे कॉमेडी कीर्तन करून कीर्तन या सांप्रदायिक प्रतिष्ठित गोष्टीची विडंबना च केलेली आहे!!>>+१

बाईच्या बाईपणाला मर्यादा घालणारे उपदेश त्यांच्या कीर्तनात असतात. त्याला गावकरी मंडळी माना डोलावतात. >>> समजले, नाही बघणार आणि पसरवणार तर बिलकुल नाही.
न बघताच निषेध.
अपर्णा बाई चे व्हिडेओ पाहून फार चिड्चिड झालि होती. सो मी दूर च बरी..

कीर्तनाला नियमांमध्ये कशाला बांधायला हवे, एखाद्याला हसवून कीर्तन करायला आणि ऐकणार्यालाही हसत हसत ऐकायला बर वाटत असेल तर? ह्यात आपली आपली आवड आहे, ज्याला जे आवडतं ते त्यांनी बघावं. पण हेच यौग्य ते अयोग्य हे बरोबर नाही. माझ्या लहानपणी कीर्तन असलं की सगळा गाव ऐकायला येत होता, आजकाल कीर्तन असलं की फक्त म्हातारे लोक असतात.
इंदुरीकर इत्यादी बोलताना चुकत असतील परंतु त्यांच्या किर्तनामध्ये जास्तीत जास्त चांगल्या गोष्टीच असतात आणि हे सांगताना ते त्यांच्या भागात वापरणारी भाषा वापरतात आणि ऐकणार्यालाही त्यात काहीही चुकीचे वाटत नाही म्हणूनतर लोक त्यांना आग्रहाने बोलवत असतात, उलट त्यांच्या सारख्या महाराजांमुळे कीर्तनाला अजूनही लोक गर्दी करत असतात आणि त्यांना आवडत नाही त्यांनी आपल्याला ज्या भाषेमध्ये कीर्तन आवडते अशी च कीर्तने ऐकावी.

लहानपणी रेडिओवर रविवारी संध्याकाळी कीर्तनाचा कार्यक्रम असायचा. बाबामहाराज सातारकर कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध झाले होते त्याच्याही आधीचा काळ. हे रेडिओवरचे कीर्तनकार फार प्रसिद्ध नसलेले असत पण किर्तन इतके प्रभावी, त्यात गोष्टीवेल्हाळता आणि संतवचनांची रेलचेल असे. सर्वकाही संयमी व शांत आवाजात. ऐकताना मन दंग होत असे. किर्तन म्हटले की अजूनही तीच किर्तने आठवतात.

हल्ली बरेच जण किर्तनकाराची आडनावं बघून ठरवतात की त्याचं कीर्तन कसं आहे ते..!

असो... ज्यांचं कीर्तन जनतेला आवडतं त्यांनाच सगळीकडे सुपार्‍या मिळतात. वैराग्य, त्याग हे शिकवत असताना सतत पांडुरंग.. पांडुरंग करणार्‍या एका महाराजांना सुपारी देण्यासाठी १५ वर्षांपुर्वी गेलेलो होतो. त्या वेळी या गाजलेल्या अन इथेही अनेक जणांनी नाव घेतलेल्यां त्या महाराजांनी ३ तासाचे ५ लाख, सगळ्या वृंदांना शुद्ध तुपातलं जेवण अन वेगळी बिदागी, सर्वांचं जाणं-येणं सोय हे सर्व सांगितल्यावर मनात लाखोल्या वाहिल्या होत्या हे यानिमित्ताने आठवलं.

अतुल अनुमोदन.

मला पण कीर्तन म्हंटल की लहानपणी आजोबांबरोबर विठ्ठल रखुमाई मंदिरात जात होते, तेथील लोक नावाजलेले नसले तरी कीर्तन करीत, संतांचे अभंग म्हणत,हरीपाठ तर रोजच. कधी कधी आळंदी आणि देहू ला पण जात होते त्या काळी इतकी गर्दी नसायची.
हे नवीन कीर्तनकार पाहिले की वाटते की आपला वारकरी संप्रदाय कुठे भरकटलेला आहे. माझे माहेर वारकरी घराणे असल्यामुळे खूप लहानपणा पासून कीर्तन ऐकायची सवय आहे. त्यामूळे आताचे कीर्तन स्टँड अप कॉमेडी वाटते.

माझे वै म . वाद नकोत.

सियोना, +1

फार स्टंटबाजी करतात या बाई महाराज! एकदम त्या इंदुरीकरांची नक्कल करतात या बाई!

याच पिढीतली नाशिकची मृणाल जोशी अतिशय संयत भाषेत कीर्तन करते.

नाशीकच्या मृणाल महाराज यांचंही कीर्तन ऐकलंय. एकदा ऐकण्या सारखं नक्कीच आहे. रोज-रोज गोडंवरण-भात जेवायला दिल्यावर जसं वाटेल तसंच वाटतं अगदी.

छान परीचय दिला. मला आवडते निवांत वेळेत किर्तन व प्रवचन ऐकायला. लहानपणी खूप प्रमाणात बघीतलीत आणी ऐकलीत देखील. मला इंदुरीकर महाराज जाम आवडतात. पांचट, परखड, रसाळ, गावरान अशी सरमिसळ असते त्यांच्या प्रवचनात. प्रबोधन चांगले करतात.

आता कसं बोलला वैनी. पांचट, परखड, रसाळ, गावरान अशी सरमिसळ हे सगळं असल्याशिवाय श्रोत्यांना कीर्तन ऐकु वाटणारच नाही. सपक-आळणी जेवण जेवल्यावर बद्धकोष्ठ होणारच... त्यासाठी सर्व चवींचा समावेश असलेलं जेवण असावं Bw

स्टाईल चांगली आहे, भाषेवर पकड पण जबरदस्त. वर कुणीतरी म्हंटलंय तसं सरळ सरळ स्टँड-अप कॉमेडी करावी ना! उपदेशाचे जाऊद्या. संतवचन वगैरे पण जाऊद्या.

पण खेड्यापाड्यातून कीर्तनाच्या नावाखाली होणार्‍या स्टँड-अप कॉमेडी शोज ना जायला मान आहे बहुधा. सरळ सरळ स्टँड-अप कॉमेडी म्हणून केलं तर कुणी फिरकायचं नाही! म्हणून कीर्तनाचं नाव. बाकी काही नाही. गंदा है पर धंदा है ये!!

तसं ताई चुकीचं बोलत नाहीत. बाई चंद्रावर गेली तरी स्वयंपाक आलाच पाहिजे हे म्हणणं बरोबरच आहे. फक्त ताई अर्धवट सांगत आहेत . 'बाईच काय, बाप्या जरी चंद्रावर गेला, तरी स्वयंपाक आलाच पाहिजे' हे सांगायला विसरत आहेत.

अपर्णा रामतीर्थंकर बैंचे मौलिक विचार ऐकून मी धन्य झाले....
नावर्याला घाबरा , सासु सासरे देवा समान, मी माझ्या माहेरी गेले नाही कधी जास्त , भाकरी आली च पहिजे , इंजीनियरिंग मुलींचे संसार टिकट नाही, flat संस्कृति ला उम्बरा नसतो , त्याचे महत्व अजुन बरेच क़ाय क़ाय...

Pages