युवा कीर्तनकार महिला : हभप शिवलीला ताई पाटील महाराज

Submitted by ------ on 4 May, 2021 - 00:34
shivleela tai patil

ह भ प.
म्हटलं की डोक्यात पगडी घातलेले , घा-या डोळ्यांचे, गो-या रंगाचे , साठी उलटलेले , धोतर नेसलेले बुवा डोळ्यासमोर यायचे. गेल्या वीसेक वर्षात हे चित्र पालटले. कीर्तन म्हटलं की अभिजन या प्रतिमेला छेद गेला. त्याला कारणे देखील आहेत. परंपरागत व्यवसाय म्हणजे धार्मिक विधींचे पुरोहित, गुरूजी यासाठी अभिजन वर्गात मनुष्यबळ नाही. उच्चशिक्षण आणि परदेशी करीयर यामुळे उलट कुणी या व्यवसायात आलाच तर त्याला अर्थार्जनाची संधी आहे परदेशी.

वारकरी समुदायातून बहुजन समाजात कीर्तनकार घडवण्याची परंपरा गेल्या तीसेक वर्षात चांगली मूळ धरू लागली आहे. बरेचसे कीर्तनकार आता नावारूपाला आले आहेत. बाबामहाराज सातारकरांसारखे हभप होऊन गेले. आंधळे महाराज असतील किंवा अजून कुणी असतील. हे सर्व महाराज गंभीर प्रकृतीचे होते. थोडेफार हास्याचे शिडकावे करत प्रेक्षकांशी संवाद साधण्याचे यांचे कौशल्य त्यांना लोकप्रियता मिळवून देतात.

मात्र इंदूरीकर महाराजांनी खळखळून हसवणारी कीर्तनं सुरू केली आणि बघता बघता आख्ख्या महाराष्ट्रात त्यांच्या कीर्तनाने धुमाकूळ घातला. आज युट्यूब असो, व्हॉट्स अ‍ॅप असो, फेसबुक असो की टिकटॉक असो. इंदूरीकर महाराजांची कीर्तनं संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचतात. कीर्तनाच्या क्षेत्रात महाराजांनी क्रांतीच केली.

तरी देखील महिलांनी आजवर या क्षेत्रात म्हणावे असे नाव कमावले नव्हते. अभिजन वर्गातल्या तुरळक अशा महिला येत राहील्या. अपर्णाताई रामतीर्थकर यांच्या रूपाने पहिल्यांदा एखाद्या महीलेने इंदूरीकर महाराजांसारखी अमाप लोकप्रियता मिळवली. त्यांचे कीर्तनाचे किंवा प्रबोधनाचे विषय योग्य कि अयोग्य हा लेखाचा विषय नाही. महिला म्हणून त्या या क्षेत्रात उंचीवर गेल्या हे स्विकारायला पाहीजे. रूढ अर्थाने त्याला कीर्तन म्हणता येत नाही. पण उपदेश तसाच आहे. फक्त टाळकरी नसतील इतकाच काय तो फरक.

बहुजन समाजात मात्र महिला या क्षेत्रात येत नव्हत्या.
बालकीर्तनकार शिवलीला ताई पाटील यांच्या रूपाने महाराष्ट्राला पहिल्यांदा रूढ अर्थाने कीर्तनकार असलेली महिला मिळाली. अगदी शाळेत असल्यापासून त्या कीर्तन करतात. त्यांना कीर्तनासाठी वारकरी संघाकडून पुरस्कार मिळाले आहेत. ते ही लहान वयातच. तेव्हांपासूनच त्यांच्या कीर्तनाला खेड्यापाड्यात मागणी आहे.

shivleela2.jpg
आता त्यांना युवाकीर्तनकार असे संबोधण्यात येते.
शिवलीलाताई पाटील या इंदूरीकर महाराज यांच्याप्रमाणे खळखळून हसवतात. त्यांचा असा चाहता वर्ग आहे. एक महिला जेव्हां सांगते तेव्हां महिलांना ते पटते. त्या कीर्तन करताना प्रश्न विचारतात. त्या प्रश्नांची उत्तरं चिमटे काढत देतात. साधे साधे तत्वज्ञान सांगतात. खेड्यापाड्यात जे तत्त्वज्ञान प्रिय आहे तेच त्या सांगतात. त्यावर शिक्कामोर्तब करतात.

बाईच्या बाईपणाला मर्यादा घालणारे उपदेश त्यांच्या कीर्तनात असतात. त्याला गावकरी मंडळी माना डोलावतात. पुरोगाम्यांप्रमाणे त्या समजुतीला धक्का पोहोचवत नाहीत. स्त्री-स्वातंत्र्याची काही मतं कीर्तनात येतात पण दुपटीने बंधनं घालणारे उपदेश देखील येतात. बाईच्या डोक्यावर पदर का असला पाहीजे हे विनोदाच्या माध्यमातून त्या सांगतात.

कीर्तनकाराला अभिनय यावा लागतो हे त्यांच्याकडे पाहून पटते.
भर सभेत उभे राहून पुरूषांना अडचणीचे प्रश्न विचारत त्यांची टिंगल करणे हे महिलेसाठी सोपे काम नाही. गावाकडे राहीलेल्यांना त्याची कल्पना असेलच. पण ताई हे काम लीलया करतात. त्यांच्या नावातही लीला आहेच.
shivleela1.jpg
कदाचित महाराज असल्याने असेल, गावकरी देखील मान डोलावूना त्यांच्या विनोदाला दाद देतात.
काही काही तत्त्वं त्या सर्वांना पटेल अशी सांगतात.

संसारी माणसाची कर्तव्ये काय हे तर कुणालाही पटेल. लसावि काढायचा झाल्यास वादग्रस्त उपदेश वगळून ८०% भाग हा सामाजिक वर्तनाबद्दलचा असतो. नव-याने दारू पिऊ नये, मुलाबाळांकडे लक्ष द्यावं, मुलांनीही गुटखा - दारू - तंबाखू खाऊ नये, आईवडीलांना मान द्यावा, कामधंदा करावा, मुलीही अशा मुलांना नाकारू शकतात, त्यांना तो हक्क आहे हे त्या हसवून हसवून सांगतात.

काही बाबतीत त्या अपर्णा रामतीर्थकरांच्या शिष्या वाटतात. काही वेळा इंदूरीकर महाराजांचा प्रभाव जाणवतो. पण कॉमेडी कीर्तन म्हणून युट्यूबर त्यांची प्रवचने शेअर केलेली दिसतात. त्यांच्या फेसबुक पेजवरून देखील त्यांचे शेकडो व्हिडीओ व्हायरल होत असतात.
खूपच कमी कालावधीत ताईंना ही प्रसिद्धी लाभलेली आहे.

खेडोपाडी कीर्तनकार हा एक प्रभावी मीडीया आहे. विचारात बदल घडवून आणण्याची ताकद हभप महाराजांकडे असते. त्यांचे विचार पटत नसतील तर भूमी आपटण्यापेक्षा पुरोगामी विचार रूजवण्यासाठी कीर्तनाचा सहारा घ्यावा असे पुरोगाम्यांना वाटत नाही यातच त्यांचे अपयश आहे.

एक महिला म्हणून अशा क्षेत्रात पाय रोवून उभ्या राहणा-या आणि अनेक मुलींना या वेगळ्या वाटेवर येण्यास प्रवृत्त करणा-या ताईंचे अभिनंदन देखील करावेसे वाटते. त्या या क्षेत्रात येऊ शकतात आणि ते स्विकारले जाते हा सकारात्मक विचार आहे. पण त्यांचे काही विचार हा नक्कीच चर्चेचा विषय राहील.

त्यांच्या काही गाजलेल्या भाषणाच्या लिंक्स. जर इच्छा असेल तर आपण पाहू शकता.

१. आख्ख्या महाराष्ट्रात गोंधळ घालणारे कीर्तन
https://www.youtube.com/watch?v=rDniLYoPhEs

२. कॉलेजमधलं प्रेम
https://www.youtube.com/watch?v=ujMFAS-cAPA

३. सासू - सुनेचं भांडण
https://www.youtube.com/watch?v=5aYQA2hl05M

४. मामाला धमकी - तुझी पोरगी दे
https://www.youtube.com/watch?v=kx37uv3fG3Q

५. हभप शिवलीहभपताई पाटील महाराज यांची करी कहाणी ( त्यांच्याबद्दल दुस-यांनी बनवलेला व्हिडीओ )
https://www.youtube.com/watch?v=53ZhNJJnxWU

नमुना म्हणून एव्हढे पुरे. नाही आवडलं तर पहिल्यालाच बास कराल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages