सोसायटीतील बायकांशी कसे भांडण करावे?

Submitted by ऋन्मेऽऽष on 2 May, 2021 - 20:10

धाग्याचे शीर्षक काहीच्या काही वाटले तरी विषय विवाहीत पुरुषांसाठी गंभीर आहे प्लीज !

काल संध्याकाळची वेळ होती. कानाला हेडफोन लाऊन गाणी ऐकत माझे वर्क फ्रॉम होम चालू होते. अचानक गाण्याचे बीट्स वेगळे वाटले म्हणून हेडफोन काढला तर ते खालून गार्डनमधून ऐकू येत होते. वॉssव नवीन सोसायटीतले पहिले भांडण म्हणून लगेच किचनच्या बाल्कनीच्या आडोश्याला ऊभा राहून मजा लुटू लागलो.

म्हटले तर सोसायटीच्या व्हॉटसप ग्रूपवर शाब्दिक मारामार्‍यांची काही कमी नव्हती. कोणाच्या घरात चालू असलेल्या ईंटेरीअर कामाचा शेजार्‍यांना त्रास, तर कोणाच्या एसीतून गळणार्‍या पाण्याचा खालच्यांना त्रास, कोणाला नॉनवेज आणि मच्छीच्या वासाचा त्रास, तर कोणाला वरच्या फ्लोअरवरील पोरांच्या दंग्याचा त्रास, कोणाची पोरे स्विमिंगपूलच्या पाण्याने पिशव्या भरून रंगपंचमी खेळतात, तर कोणाची लिफ्टची सारी बटणे दाबून पळून जातात. अजून अर्धी जनता अर्ध्या जनतेला ओळखत नाही तरी अमुक तमुक फ्लॅट नंबरचे संदर्भ देत सोसायटी व्हॉटसपग्रूप केवळ भांडणासाठीच वापरला जातो.

नाही म्हणायला कधी स्वातंत्रदिनादिवशी, कधी खर्‍याखुर्‍या होळी रंगपंचमी दिवशी, कधी मुलांचे एकत्र खेळतानाचे, नाच करतानाचे, स्विमिंगपूलमध्ये डुंबतानाचे ग्रूप फोटो पडले की सगळे एक होत वाह वाह सुद्धा करतात. पण ते हंगामी असते. मूळ उद्देश भांडणाचाच. जुन्या चाळीतील नळावरची भांडणे आता या व्हॉटसपग्रूपवर आलीत असे म्हणू शकतो. फक्त यथेच्छ शिवीगाळ न करता तुच्छतेने संसदीय आणि व्याकरणद्रुष्ट्या अतिशय चुकीच्या ईग्रजी भाषेत टोमणे मारले जातात. काय करणार, सोसायटी हायफंडू वाटायला हवी तर येत असो वा नसो, ग्रूपवर ईंग्लिश कंपलसरी असे बरेच जणांना वाटते.

तर ते एक असो, ईथे फक्त व्हॉटसप वाचाळवीरच भरले आहेत याला छेद देणारे एक खरेखुरे प्रत्यक्ष भांडण समोर आकार घेत होते. पण ज्या दोन आकारांच्या माणसात ते चालू होते त्यात काही ताळमेळ नव्हता. एकीकडे ९० वजनी गटातील पस्तिशीची महिला, तर दुसरीकडे तेरा-चौदा वर्षांची एक तडतडीत मिरची. आकारांवरून चिडवायचा हेतू नाही, पण पहिल्यांदा डोळ्यात भरले ते त्यांच्या वयासोबत साईजमधील फरक. आणि मिरचीही एवढ्यासाठीच की ती अंगाने अगदीच सडपातळ असूनही त्या दणकट बाईला तोडीस तोड अ‍ॅटीट्यूडने ऊत्तर देत होते. स्त्री-सक्षमीकरण म्हणतात ते हेच का म्हणत मी प्रभावित होत त्या मुलीकडे बघत होतो.

त्यांचा वाद कश्यावरून चालू होता हे मी ईथे सांगणार नाही. अपने सोसायटी की बात अपने सोसायटी मे रहे तो ही अच्छा है. पण ती बाई आपल्या लहान पोरासाठी तिच्याशी भांडायला आलेली एवढे समजले. आता त्यात कोण चूक आणि कोण बरोबर याचा मी प्रत्यक्षदर्शी नसल्याने उगाच जज करून सांगण्यात अर्थ नाही. पण एक मात्र नक्की, मुलगी भले अ‍ॅटीट्यूड दाखवत असली तरी "आंटी", "आप", "प्लीज" असे शब्द वापरून वयाचा आदर करूनच भांडत होती. (आता आंटी म्हटल्याने जर ती बाई आणखी चिडत असेल तर तो तिचा प्रॉब्लेम)

पण अचानक रंग पलटू लागले. एवढीशी मुलगी आपल्याला दाद देत नाही हे बघून मोठी बाई अचानक तडकली आय मीन भडकली. डोन्ट आर्ग्यू विथ मी, आई विल स्लॅप यू, एक चाटा मारूंगी तो गिर जायेगी यही, तेरी लीडरगिरी तेरे चमचों मे दिखा, मेरे नाद को मत लग..... अचानक हमरीतुमरीची भाषा हातापाईवर आली. आता मात्र ती मुलगी लहान असल्याने घाबरली. रडवेली झाली. ईथे मला कळेना की आता वरतून शुक शुक करत आवाज द्यावा की खरेच ती बाई पटकन काही मारणार नाही यावर थोडा वेळ विश्वास ठेऊन पुढे काय घडतेय ते बघत राहावे. पण नंतर मात्र मला स्वतःचीच लाज वाटली की त्या जागी आपली पोरगी असती तर आपण बाल्कनीतूनच थेट उडी घेतली असती त्या बाईच्या अंगावर, मग दुसर्‍याच्या मुलीबाबत असे क्षणभर का होईना विचार करत मुखदुर्बळासारखे थांबलो हे चूकच झाले. क्षणभर ईतक्यासाठीच की लगेच तिच्या बाबांनी विंगेतून एंट्री घेतली.

आपल्या लहान मुलीशी एक दांडगट बाई अश्या चाटा मारूंगी वगैरे भाषेत भांडतेय हे ऐकून त्यांचीही नक्कीच सटकली असेल. त्यामुळे ते सुद्धा नरमाईने न भांडता समोर एक महिला आहे हे विसरून आवाज चढवूनच भांडू लागले. ते बघून लगेच त्या बाईसोबत तिच्या घरच्या दोन बायका जे ईतका वेळ बाजूला बसून तमाशा बघत होत्या त्या पुढे सरसावल्या. एक तिच्याच वयाची बहुधा तिच्या नवर्‍याची बहिण आणि दुसरी तिची म्हातारी सासू असावी. आणि मग बघता बघता माझ्या डोळ्यासमोर त्या भांडणाला असे रूप दिले गेले की पोरांच्या भांडणात हा एक पुरुष बघा कसा बायकांशी दादागिरी करत चढ्या आवाजात भांडतोय. वाढते भांडण पाहून गार्डनमध्ये फेरफटका मारायला आलेल्या अजून दोनचार बायका तिथे जमल्या. त्यांनाही त्या आधीच्या बायकांनी हेच चित्र दाखवले. आणि ईथे मला वाटले की आता त्या बिचार्‍याच्या मदतीसाठी आपली खाली जायची वेळ आली आहे.

मी तडक बेडरूममध्ये आलो. पँट चढवली. बायकोने विचारले कुठे चाललास आता. तिला एका वाक्यात कोणाचे भांडण चालू आहे हे सांगितले. तसे बायको म्हणाली, "हो, ती पोरगी जरा आगाऊच आहे". सहसा ज्या बायकांची स्वतःची पोरं आगाऊ असतात त्यांना ईतरांचीही आगाऊच वाटतात म्हणून मी तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि म्हणालो, असेल! .. पण आता मी तिच्या बाबांसाठी चाललो आहे !

ईथे मी लिफ्ट चढवून पँटची वाट न बघता घाईघाईत जिन्याने खाली गेलो तर बघ्यांची गर्दी वाढलेली दिसली. बायांसोबत बाप्येही जमले होते. आणि ते अपेक्षेप्रमाणे त्या बाईचीच बाजू घेत होते. "भाई साहब आपको भाभीजी से ऐसी बात नही करनी चाहिये थी, बच्चों के तो झगडे होते हि रहते है" असे म्हणत त्या माणसालाच खरीखोटी सुनावत होते. पुन्हा माझा मुखदुर्बळपणा आड आला. त्या बाईने एका तेराचौदा वर्षे वयाच्या मुलीशी कशी अरेरावीची भाषा वापरली होती हे मी तिथे सर्वांसमोर सांगू शकलो असतो. पण आपली कोणाशी ओळख नाही, कोण कसा आहे याची कल्पना नाही, आपली पोरं या सर्वांच्या पोरांशी खेळतात. तर उगाच कोणाचीही एकाची बाजू घेत न्यायनिवाडा करण्याऐवजी त्यांच्यात मांडवली कशी होईल हेच मी बघितले. आणि थोड्यावेळाने ती झालीही.

रात्री पोरांना घेऊन मी खाली गार्डनमध्ये गेलो असताना, पुन्हा तो सदगृहस्थ भेटला. आता ओळखीचा झाला होता. संध्याकाळच्या भांडणात मी अगदी त्याची बाजू घेतली नसली तरी त्याच्या बाजूला उभा राहिलेलो हे त्याला जाणवले असावे. त्यानेच मग विषय काढला. त्याने वरून पाहिले होते की ती बाई कशी वचावचा आपल्या मुलीशी भांडत होती. मी सुद्धा त्याला दुजोरा दिला. आणि तेच पाहून मी देखील खाली आलो म्हणालो. तो पुढे म्हणाला की त्याला त्या बाईच्या कानाखाली मारावीशी वाटत होती. मी मनातल्या मनात म्हटले, तुझ्याजागी मी असतो तर मलाही तसेच वाटले असते. पण प्रत्यक्षात त्याने ती मारली नाही हेच चांगले झाले असे वाटले. अन्यथा एका बाईशी नुसते आवाज चढवून बोलले की ती ईतका कांगावा करत असेल तर कानाखाली मारल्यावर बिचार्‍याला पोलिसच पकडून घेऊन गेले असते आणि माझ्यासारखा एखादा मुखदुर्बळ तेव्हाही चारचौंघासमोर त्याची बाजू घ्यायला घाबरला असता.

पण मग करायचे काय? मुलांच्या भांडणात समोरून त्या मुलाची आई भांडायला आली तर नेहमी आपल्याही मुलांच्या आईला म्हणजे आपल्या बायकोलाच पुढे करावे की पुरुषही भांडलेला चालतो एखाद्या बाईशी? आणि कसा? काय काळजी घ्यावी? कसे शब्द वापरावेत? काय हातवारे करावेत? कितपत आवाज चढवावा?.... आई मीन, नेमके कसे हॅण्डल करावे असे एखादे प्रकरण?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ईथे मी लिफ्ट चढवून पँटची वाट न बघता घाईघाईत जिन्याने खाली गेलो तर बघ्यांची गर्दी वाढलेली दिसली. >> सहाजिक आहे! लिफ्ट घातलेला माणूस मीही पाहिलेला नाही. त्यात सोसायटीतल्या लोकांची चूक नाही. Happy टायपो असेल तर प्लिज दुरूस्त करा. उगाच धाग भरकटल्याचा दोष माझ्यावर नको. धाग्याच्या टीआरपीसाठी ठेवायचे असेल तरी हरकत नाही.

मास्क ही घालून जावे. एवढंच सांगायला आले. मी विवाहीत पुरूष नसल्याने ह्या विषयाचा गांभिर्याची कल्पना नाही. तुम्ही योग्य तेच वागला असाल.

म्हणजे आपल्या बायकोलाच पुढे करावे की पुरुषही भांडलेला चालतो एखाद्या बाईशी?>>> त्या बाईलाच विचारावे मी भांडलो तर चालेल का कि बायकोला बोलवू?

आई मीन, नेमके कसे हॅण्डल करावे असे एखादे प्रकरण?>> त्यात काय तुमच्या एखाद्या डु आयडी ला पाठवून द्या.

फिजिकल डिस्टंसींग राखलेय कि नाही याची खात्री केलीत का ? नाहीतर कोरोनाकाळात कसं वागायचं याचे ऑनलाईन क्लासेस चालू करा.

मी अनेक भांडणे सोडवली आहेत. खडाखडी चालू असताना ती सोडवायला गेलो तेव्हां कुठे झिंजा उपटून मारामारीला सुरूवात झालेली आहे. या अनुभवाचा फायदा सर्वांना द्यावा ही सदिच्छा !
पण खडाखडी न करता थेट भांडणा-या अशा सोसायटीचा अनुभव नाही. शिवाय लिखित माध्यमाला मर्यादा पडतात. भांडणात आवाजाचा टोन, त्यातला उपहास, तळतळाट हे लिहून समजत नाही. तरी एक व्हिडीओ अपलोड करावा म्हणजे अचूक सल्ला देता येईल.

त्या बाईला आदराने आंटी म्हणावे, भांडायची गरज नाही...>> आणि जास्तच आदर वाटला तर सरळ आज्जी म्हणावे. भांडणाचे मुळ कारण कोणाला आठवतही नाही.

मुलगी तर नाही मला अजुन पण माझ्या आई ला एक शेजारची बाई शिवीगाळ करत होती तेव्हा तिला नीट सांगितलेलं की जा तु जरा जास्त बोलते आहेस. गप्प रहा नाहीतर मी काय काय बोलेल बघ तर तिचा नवरा आला नी धक्का देऊन बोलला काय.... एकच ठेवली होती 5-6 वर्ष झाले ना भांडण ना तंटा...

आधीच्या घरी उजवीकडच्या शेजारी बंगाली कुटुंब होते. ते जोडपे आपसात खूप भांडत असे आणि शेजाऱ्यांशीही, म्हणजे आमच्याशीही.
माझ्याशी सुरवातच गमतीशीर झाली. आमची इमारत रो हाऊस सारखी होती, तळमजला आणि पहिला मजला फक्त, एका रांगेत खाली आणि वर मिळून अवघे चौदा फ्लॅट्स.
तेव्हा एका फ्लॅटच्या अंगणात संपचं काम सुरू झाल. सकाळीच कार घेऊन गेल्याने परत आल्यावर मी कार रस्त्यावर बाजूला लावली होती. त्या रस्त्याने अजिबात रहदारी नसल्याने, सगळे कार एकदा बाहेर काढली आणि नंतर परत बाहेर जायचे असेल तर अशी रस्त्याच्या बाजूला लावत.
त्यादिवशी माझ्या सारखीच त्या बंगाली माणसानेही लावली होती. संप खोडकामाची बरीच माती रस्त्यावर आणि त्यात पाणी जाऊ त्याचा चिखल रस्त्यावर आला.
त्यावरुन एखादी बाईक गेली तरी कारवर चिखलाचे शिंतोडे उडू लागले. बाल्कनीतून हे मी पहिले आणि मग खाली जाऊन कार दुसरीकडे लावली.

आणि शेजारधर्म म्हणुन मी त्या बंगालीला सांगायला गेलो.
त्या बाइने दार उघडले आणि मी तिला खाली काय चाललेय ते सांगून कार हलवायला सांगीतले. मला वाटले ती आता ओके थॅंक्यु म्हणेल. पण झाले भलतेच. " हो हो नेहमी आमचीच कार काढायची का? आमच्याच कारचा तुम्हाला त्रास होतो" वगैरे करत ती बाई भांडायलाच लागली.
मी तिला सांगायला लागलो "बाई, तुम्हाला कळलं नाही मी काय म्हणतोय ते, तुमच्या कारवर चिखल उडतोय, म्हणुन मी शेजारधर्म नात्याने तुम्हाला सांगायला आलोय."
तर ती बया "हो माहिती आहे मोठा शेजारधर्म पाळणारे! मागच्या वेळेला अमुक तमुक झालं तेव्हाही आमच्याच दारा समोर खोदलं"... तेवढ्यात तो बंगाली माणुसही आला आणि आम्हाला न सांगता सम्पचं काम सुरूच कसं केलं म्हणून माझ्याशी भांडायला लागला. मग मी अक्षरशः "बस!! दोघंही चूप! दोघं ही चूप!" ते काही बोलले तरी "दोघं ही चूप!" करत त्यांना क्षणभर गप्प केलं. आणि मग त्यांना "मला तुमच्या कारवर चिखल उडताना दिसला. सम्पचं काम मी नाही सुरू केलं आणि मलाही आताच दिसलं. मी माझी कार मी काढली, तुमची काढायची असेल तर काढा नाहीतर नका काढु. मी फक्त एवढंच सांगायला आलो!" असे ओरडून सांगितले. "कळलं का? की परत सांगू?" विचारले.
माझ्या आवेशाने तर क्षणभर अवाक झाले आणि काहीच बोलले नाही. मॅटर मिटले समजून मी परत जायला वळलो. माझी पाठ फिरताच तो माणुस "पहा पहा कसा ओरडतो! ही काय बोलायची पद्धत आहे? आम्ही इकडे सकाळच्या कामात, त्यात येऊन कार काढायला सांगतात, वरून आम्हालाच दटावतात" वगैरे सुरू झाला. पण मी मात्र काही थांबलो नाही तिथे. निघून आलो, ते दोघेही काही वेळ बडबडत होते.
इतर शेजारचे कुणीही मध्ये बोलायला आले नाहीत.
एकाने मात्र नंतर तुम्ही नवीन आहात, ते असेच भांडखोर आहेत असे सांगितले. सोसायटीच्या मिटिंग मध्येही ते भांडणास प्रसिद्ध होते.

तर असे हे शेजारी जवळपास दहा वर्षे होते. त्यात आमची अनेक भांडणे झाली, त्यातील बहुतेक त्या बाईशीच.
पण एक समाधानाची बाब म्हणजे मी भांडत असतानाही त्या बाईने भांडणात "स्त्री दाक्षिण्य नाही का? बायकांशी कसं बोलावं कळत नाही का? बाईशी भांडता! " असले कार्ड्स कधीही काढले नाहीत, स्त्री-पुरुष वळण देण्याचा कधी प्रयत्न केला नाही. त्यामुळे मला त्या बाईचा आदरही वाटायचा.

दहा वर्षांनी त्यांनी नविन मोठा फ्लॅट घेतला आणि या फ्लॅटमध्ये त्यांचेच बंगाली नातेवाईक रहायला आले. त्यांनी मात्र छान शेजारधर्म निभावला, अजूनही भेटत असतो तिकडे गेलो की.

लॉकडाऊन मधिल मरगळ घालवणारा धागा काढल्याबद्दल ऋन्मेष चे अभिनंदन. सगळ्यांचे भांडणाचे किस्से येऊ देत. तेवढच आपला टाईम पास

बायकांशी किंवा पुरुषांशीही भांडायचं असेल तरी एकच सल्ला.

आवाज न चढवता आणि अपशब्द न वापरता आपला मुद्दा ठामपणे सांगत रहाणे. ( पट्टी खाली )

@ सीमंतिनी,
टायपो नाहीये. ते रूपक आहे. लिखाणातून वेंधळेपणा आणि वेंधळेपणातून घाई दर्शवली आहे.
मास्क पॅंटच्या खिशातच रुमालासोबत असतो. तो बाहेर पडताना आपसूक घातला जातोच. तसेही हे मास्क चढवणे बाय डिफॉल्ट घ्यावे. आता रुटीन लाईफ झाले आहे आपले. धागा भांडणाचा आहे पण तिथेही चार प्रतिसाद मस्क आणि सोशल डिस्टंन्सिंगचे Happy

आम्हाला न सांगता सम्पचं काम सुरूच कसं केलं म्हणून माझ्याशी भांडायला लागला. >>> Proud गाडी काढताना तुमच्याही अंगावर थोडा चिखल वगैरे नव्हता ना उडाला Happy

पण एक समाधानाची बाब म्हणजे मी भांडत असतानाही त्या बाईने भांडणात "स्त्री दाक्षिण्य नाही का? बायकांशी कसं बोलावं कळत नाही का? बाईशी भांडता! " असले कार्ड्स कधीही काढले नाहीत,
>>>>>>
हाच खरा प्रश्न आहे. अश्या कार्डना कसे हॅण्डल करावे

आवाज न चढवता आणि अपशब्द न वापरता आपला मुद्दा ठामपणे सांगत रहाणे. ( पट्टी खाली )
>>>
हे आयडीअल असेल पण प्रॅक्टीकल नाही. जे ओरडून सांगितले जाते तेच सत्य समजले जाते. म्हणून तर त्या बाईच्या कांगाव्याला नंतर आलेले बळी पडले.

मास्क पॅंटच्या खिशातच रुमालासोबत असतो. तो बाहेर पडताना आपसूक घातला जातोच.>> असे नका करु. प्रत्येक वेळी स्वच्छ धुतलेला मास्क वापरा.

गाडी काढताना तुमच्याही अंगावर थोडा चिखल वगैरे नव्हता ना उडाला >>> लक्षात नाही पण तो मुद्दा नाही. तो फ्लॅट विकत घेण्यापूर्वीच मी त्यांच्याकडेही चौकशी केली होती, तुमचा संभाव्य भावी शेजारी असे सांगून, आणि गृहप्रवेश पार्टीला त्यांनाही निमंत्रण दिले होते आणि ते आले होते. हे आपले शेजारी हे त्यांना चांगलेच ठाऊक होते.

म्हणजे गरिबांचे शाहरुख आणि स्वप्निल मुखदुर्बळ असतात तर! हा माणूस मुखदुर्बळ आहे तसा टाईपदुर्बळ का नाही? असले दुर्बळ टाईप आमच्याच वाट्याला का?

हो, आई धुवुन रुमालासोबत मास्क खिशात ठेवते.>> अरे देवा..किती ते परावलम्बित्व.
आई ला सन्सर्ग झाला तर?

मी धागा भरकटवणार, जसा लेखक सर्व धागे भरकटवतो Wink

वहिनी आहेत ना? (त्यांना धुवायला लागणे हे सुद्धा चूकच आहे. पण बहुतेक घरात सून असताना सासू रूमाल धुवून देते हे पाहिले नाही).

वहिनी आहेत ना? (त्यांना धुवायला लागणे हे सुद्धा चूकच आहे. पण बहुतेक घरात सून असताना सासू रूमाल धुवून देते हे पाहिले नाही).
Submitted by रानभुली on 3 May, 2021 - 12:56

तुम्ही 'अग्गबाई सासुबाई' पाहिली नव्हती काय???

(धागा भरकटवण्यात माझाही थोडा हातभार!!!)

चांगले noise cancellation headphones आहेत ना तुझ्याकडे. त्यांचा रिव्यू दे.

अरे देवा..किती ते परावलम्बित्व..
>>>>>
त्यात काय? आमच्या घरात कामे वाटून घेतली आहे. प्रत्येकाने आपला रुमाल, आपले कपडे धुवायला वेगवेगळी मशीन लावायची का? प्रत्येकाने आपले जेवण बनवायला वेगवेगळा कूकर लावायचा का?

पण बहुतेक घरात सून असताना सासू रूमाल धुवून देते हे पाहिले नाही
>>>>>
ऊत्तर हेच, कामे वाटून घेतली आहेत. प्रत्येकाची शारीरीक क्षमता, कौशल्य, आवड ईत्यादी निकषांवर..

मी धागा भरकटवणार, जसा लेखक सर्व धागे भरकटवतो Wink
>>>>
काही हरकत नाही, वेलकम. या विषयात तुम्हाला वा ईतरांना आणखी रुची दिसली, आणखी पोस्ट आल्या तर मी नवीन धागा काढेन Happy

चांगले noise cancellation headphones आहेत ना तुझ्याकडे. त्यांचा रिव्यू दे.
>>>>
हे noise cancellation काय असते. ऑफिसनेच दिलेत दोन हेडफोन. एक काम करायला एक गाणी ऐकायला.

Pages