सोसायटीतील बायकांशी कसे भांडण करावे?

Submitted by ऋन्मेऽऽष on 2 May, 2021 - 20:10

धाग्याचे शीर्षक काहीच्या काही वाटले तरी विषय विवाहीत पुरुषांसाठी गंभीर आहे प्लीज !

काल संध्याकाळची वेळ होती. कानाला हेडफोन लाऊन गाणी ऐकत माझे वर्क फ्रॉम होम चालू होते. अचानक गाण्याचे बीट्स वेगळे वाटले म्हणून हेडफोन काढला तर ते खालून गार्डनमधून ऐकू येत होते. वॉssव नवीन सोसायटीतले पहिले भांडण म्हणून लगेच किचनच्या बाल्कनीच्या आडोश्याला ऊभा राहून मजा लुटू लागलो.

म्हटले तर सोसायटीच्या व्हॉटसप ग्रूपवर शाब्दिक मारामार्‍यांची काही कमी नव्हती. कोणाच्या घरात चालू असलेल्या ईंटेरीअर कामाचा शेजार्‍यांना त्रास, तर कोणाच्या एसीतून गळणार्‍या पाण्याचा खालच्यांना त्रास, कोणाला नॉनवेज आणि मच्छीच्या वासाचा त्रास, तर कोणाला वरच्या फ्लोअरवरील पोरांच्या दंग्याचा त्रास, कोणाची पोरे स्विमिंगपूलच्या पाण्याने पिशव्या भरून रंगपंचमी खेळतात, तर कोणाची लिफ्टची सारी बटणे दाबून पळून जातात. अजून अर्धी जनता अर्ध्या जनतेला ओळखत नाही तरी अमुक तमुक फ्लॅट नंबरचे संदर्भ देत सोसायटी व्हॉटसपग्रूप केवळ भांडणासाठीच वापरला जातो.

नाही म्हणायला कधी स्वातंत्रदिनादिवशी, कधी खर्‍याखुर्‍या होळी रंगपंचमी दिवशी, कधी मुलांचे एकत्र खेळतानाचे, नाच करतानाचे, स्विमिंगपूलमध्ये डुंबतानाचे ग्रूप फोटो पडले की सगळे एक होत वाह वाह सुद्धा करतात. पण ते हंगामी असते. मूळ उद्देश भांडणाचाच. जुन्या चाळीतील नळावरची भांडणे आता या व्हॉटसपग्रूपवर आलीत असे म्हणू शकतो. फक्त यथेच्छ शिवीगाळ न करता तुच्छतेने संसदीय आणि व्याकरणद्रुष्ट्या अतिशय चुकीच्या ईग्रजी भाषेत टोमणे मारले जातात. काय करणार, सोसायटी हायफंडू वाटायला हवी तर येत असो वा नसो, ग्रूपवर ईंग्लिश कंपलसरी असे बरेच जणांना वाटते.

तर ते एक असो, ईथे फक्त व्हॉटसप वाचाळवीरच भरले आहेत याला छेद देणारे एक खरेखुरे प्रत्यक्ष भांडण समोर आकार घेत होते. पण ज्या दोन आकारांच्या माणसात ते चालू होते त्यात काही ताळमेळ नव्हता. एकीकडे ९० वजनी गटातील पस्तिशीची महिला, तर दुसरीकडे तेरा-चौदा वर्षांची एक तडतडीत मिरची. आकारांवरून चिडवायचा हेतू नाही, पण पहिल्यांदा डोळ्यात भरले ते त्यांच्या वयासोबत साईजमधील फरक. आणि मिरचीही एवढ्यासाठीच की ती अंगाने अगदीच सडपातळ असूनही त्या दणकट बाईला तोडीस तोड अ‍ॅटीट्यूडने ऊत्तर देत होते. स्त्री-सक्षमीकरण म्हणतात ते हेच का म्हणत मी प्रभावित होत त्या मुलीकडे बघत होतो.

त्यांचा वाद कश्यावरून चालू होता हे मी ईथे सांगणार नाही. अपने सोसायटी की बात अपने सोसायटी मे रहे तो ही अच्छा है. पण ती बाई आपल्या लहान पोरासाठी तिच्याशी भांडायला आलेली एवढे समजले. आता त्यात कोण चूक आणि कोण बरोबर याचा मी प्रत्यक्षदर्शी नसल्याने उगाच जज करून सांगण्यात अर्थ नाही. पण एक मात्र नक्की, मुलगी भले अ‍ॅटीट्यूड दाखवत असली तरी "आंटी", "आप", "प्लीज" असे शब्द वापरून वयाचा आदर करूनच भांडत होती. (आता आंटी म्हटल्याने जर ती बाई आणखी चिडत असेल तर तो तिचा प्रॉब्लेम)

पण अचानक रंग पलटू लागले. एवढीशी मुलगी आपल्याला दाद देत नाही हे बघून मोठी बाई अचानक तडकली आय मीन भडकली. डोन्ट आर्ग्यू विथ मी, आई विल स्लॅप यू, एक चाटा मारूंगी तो गिर जायेगी यही, तेरी लीडरगिरी तेरे चमचों मे दिखा, मेरे नाद को मत लग..... अचानक हमरीतुमरीची भाषा हातापाईवर आली. आता मात्र ती मुलगी लहान असल्याने घाबरली. रडवेली झाली. ईथे मला कळेना की आता वरतून शुक शुक करत आवाज द्यावा की खरेच ती बाई पटकन काही मारणार नाही यावर थोडा वेळ विश्वास ठेऊन पुढे काय घडतेय ते बघत राहावे. पण नंतर मात्र मला स्वतःचीच लाज वाटली की त्या जागी आपली पोरगी असती तर आपण बाल्कनीतूनच थेट उडी घेतली असती त्या बाईच्या अंगावर, मग दुसर्‍याच्या मुलीबाबत असे क्षणभर का होईना विचार करत मुखदुर्बळासारखे थांबलो हे चूकच झाले. क्षणभर ईतक्यासाठीच की लगेच तिच्या बाबांनी विंगेतून एंट्री घेतली.

आपल्या लहान मुलीशी एक दांडगट बाई अश्या चाटा मारूंगी वगैरे भाषेत भांडतेय हे ऐकून त्यांचीही नक्कीच सटकली असेल. त्यामुळे ते सुद्धा नरमाईने न भांडता समोर एक महिला आहे हे विसरून आवाज चढवूनच भांडू लागले. ते बघून लगेच त्या बाईसोबत तिच्या घरच्या दोन बायका जे ईतका वेळ बाजूला बसून तमाशा बघत होत्या त्या पुढे सरसावल्या. एक तिच्याच वयाची बहुधा तिच्या नवर्‍याची बहिण आणि दुसरी तिची म्हातारी सासू असावी. आणि मग बघता बघता माझ्या डोळ्यासमोर त्या भांडणाला असे रूप दिले गेले की पोरांच्या भांडणात हा एक पुरुष बघा कसा बायकांशी दादागिरी करत चढ्या आवाजात भांडतोय. वाढते भांडण पाहून गार्डनमध्ये फेरफटका मारायला आलेल्या अजून दोनचार बायका तिथे जमल्या. त्यांनाही त्या आधीच्या बायकांनी हेच चित्र दाखवले. आणि ईथे मला वाटले की आता त्या बिचार्‍याच्या मदतीसाठी आपली खाली जायची वेळ आली आहे.

मी तडक बेडरूममध्ये आलो. पँट चढवली. बायकोने विचारले कुठे चाललास आता. तिला एका वाक्यात कोणाचे भांडण चालू आहे हे सांगितले. तसे बायको म्हणाली, "हो, ती पोरगी जरा आगाऊच आहे". सहसा ज्या बायकांची स्वतःची पोरं आगाऊ असतात त्यांना ईतरांचीही आगाऊच वाटतात म्हणून मी तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि म्हणालो, असेल! .. पण आता मी तिच्या बाबांसाठी चाललो आहे !

ईथे मी लिफ्ट चढवून पँटची वाट न बघता घाईघाईत जिन्याने खाली गेलो तर बघ्यांची गर्दी वाढलेली दिसली. बायांसोबत बाप्येही जमले होते. आणि ते अपेक्षेप्रमाणे त्या बाईचीच बाजू घेत होते. "भाई साहब आपको भाभीजी से ऐसी बात नही करनी चाहिये थी, बच्चों के तो झगडे होते हि रहते है" असे म्हणत त्या माणसालाच खरीखोटी सुनावत होते. पुन्हा माझा मुखदुर्बळपणा आड आला. त्या बाईने एका तेराचौदा वर्षे वयाच्या मुलीशी कशी अरेरावीची भाषा वापरली होती हे मी तिथे सर्वांसमोर सांगू शकलो असतो. पण आपली कोणाशी ओळख नाही, कोण कसा आहे याची कल्पना नाही, आपली पोरं या सर्वांच्या पोरांशी खेळतात. तर उगाच कोणाचीही एकाची बाजू घेत न्यायनिवाडा करण्याऐवजी त्यांच्यात मांडवली कशी होईल हेच मी बघितले. आणि थोड्यावेळाने ती झालीही.

रात्री पोरांना घेऊन मी खाली गार्डनमध्ये गेलो असताना, पुन्हा तो सदगृहस्थ भेटला. आता ओळखीचा झाला होता. संध्याकाळच्या भांडणात मी अगदी त्याची बाजू घेतली नसली तरी त्याच्या बाजूला उभा राहिलेलो हे त्याला जाणवले असावे. त्यानेच मग विषय काढला. त्याने वरून पाहिले होते की ती बाई कशी वचावचा आपल्या मुलीशी भांडत होती. मी सुद्धा त्याला दुजोरा दिला. आणि तेच पाहून मी देखील खाली आलो म्हणालो. तो पुढे म्हणाला की त्याला त्या बाईच्या कानाखाली मारावीशी वाटत होती. मी मनातल्या मनात म्हटले, तुझ्याजागी मी असतो तर मलाही तसेच वाटले असते. पण प्रत्यक्षात त्याने ती मारली नाही हेच चांगले झाले असे वाटले. अन्यथा एका बाईशी नुसते आवाज चढवून बोलले की ती ईतका कांगावा करत असेल तर कानाखाली मारल्यावर बिचार्‍याला पोलिसच पकडून घेऊन गेले असते आणि माझ्यासारखा एखादा मुखदुर्बळ तेव्हाही चारचौंघासमोर त्याची बाजू घ्यायला घाबरला असता.

पण मग करायचे काय? मुलांच्या भांडणात समोरून त्या मुलाची आई भांडायला आली तर नेहमी आपल्याही मुलांच्या आईला म्हणजे आपल्या बायकोलाच पुढे करावे की पुरुषही भांडलेला चालतो एखाद्या बाईशी? आणि कसा? काय काळजी घ्यावी? कसे शब्द वापरावेत? काय हातवारे करावेत? कितपत आवाज चढवावा?.... आई मीन, नेमके कसे हॅण्डल करावे असे एखादे प्रकरण?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जुन्या चाळीतील नळावरची भांडणे आता या व्हॉटसपग्रूपवर आलीत असे म्हणू शकतो.
--------------भांडणांचा विडिओ बनवून पोस्ट केला असतात तर प्रकरणाला वेगळे वळण मिळाले असते. विथ प्रूफ .

हे आयडीअल असेल पण प्रॅक्टीकल नाही. जे ओरडून सांगितले जाते तेच सत्य समजले जाते. >>>>मी कुठेतरी ऐकले होते कि समोरचा माणूस/बाई मोठ्याने-तावातावाने भांडायला लागला तर ‘तुमच्या दातात काहीतरी अडकले आहे’ असे सांगायचे. त्यामुळे त्याचे/तिचे लक्ष विचलीत होते. परिणामी ती व्यक्ती शांत होते.

सोसायटीतील पुरूषांशी कसे भांडावे , असाही धागा असायला हवा.. कारण
आमच्या सोसायटीत एक आहेत, त्यांच्या मुलांचे खेळता खेळता कुणाशीही भांडण झाले तरी त्या मुलांच्या घरी हेच महाशय भांडायला जातात. एकदा माझ्या ही घरी आले.
नवर्याला भांडता येत नाही आणि मलाही नाही. मी ठिकै,ओक्के,रागावते मुलाला म्हणून वेळ मारून नेली.
पण इथे योग्य मार्गदर्शन झाले तर मलाही पुढच्या वेळी भांडता येईल. Lol

भांडणांचा विडिओ बनवून पोस्ट केला असतात तर प्रकरणाला वेगळे वळण मिळाले असते.
>>>>>>>
हो पण त्यात बायकापोरींचे लपून छपून विडिओ काढतो म्हणून बदनामीचा धोका जास्त होता.

सोसायटीतील पुरूषांशी कसे भांडावे , असाही धागा असायला हवा.. कारण...
>>>>>>>
ते कारण लिहून स्वतंत्र धागाही काढू शकता, पण त्यात मजा नाही. कारण पुरुषांशी, स्पेशली विवाहीत पुरुषांशी कसे भांडावे हे खूप सोपे आहे. प्रेमाने (प्रेमाचे नाही) चार शब्द बोललात की विवाहीत पुरुष भावनिक होतात. कारण ते त्यांना घरून ऐकायला मिळत नाहीत Happy

हो पण त्यात बायकापोरींचे लपून छपून विडिओ काढतो म्हणून बदनामीचा धोका जास्त होता.>> तुमच्या सोसायटीतले लोक मायबोली वर पण असु शकतात. घरची भांडणं चव्हाट्यावर आणतो म्हणुनही तुमची बदनामी होऊ शकते.

लपून छपून व्हिडीओ काढा असे कुणी म्हटलेय का ? चांगले सांगून काढा.
अजूनही त्या सर्वांना पुन्हा बोलवा. व्हिडीओ घ्यायचाय असे सांगून परवासारखे भांडा असे सांगा. भांडणाचं कसं असतं, ते पुन्हा पहिल्यापासून सुरू होऊ शकतं. डायलॉग्ज बदलतील थोडेफार. पण नेमका काय प्रॉब्लेम आहे हे लक्षात येईल.
त्याशिवाय आम्ही मदत करू शकत नाही. सॉरी !
सल्ला मागितला आहे, तर डेटा तर पाहीजे ना बॉस ?
अर्धवट अभ्यासावर इथे सल्ले दिले जात नाहीत.

- प्रो. आत्मानंद सल्लागार

पण video कशाला काढायला पाहिजे??? आजकाल बहुतेक सोसायटीच्या आवारात CCTV असतातच ना! जरी आवाज रेकॉर्ड नसेल पण नेमकी सुरुवात कुठून, कशी झाली ते तर कळेल ना.

हो पण त्यात बायकापोरींचे लपून छपून विडिओ काढतो म्हणून बदनामीचा धोका जास्त होता.
Submitted by ऋन्मेऽऽष on 3 May, 2021 - 11:31
---------तुम्ही एखाद्या गारुडीचा नंबर घेऊन ठेवा. पुन्हा भांडण झाल्यावर एखादा साप सोडा भांडणांमध्ये (नक्कीच बिनविषारी). पण पळापळ पाहायला पण तेवढीच मज्जा येईल. आणि भांडण आपसूक मिटेल.

भांडण आपसूक मिटेल.>>>> त्यांना भांडण मिटवायचे नाही आहे. भांडण कसे करावे हा प्रश्न आहे.

_/\_ आहे का आता... Lol का गरीबाची थट्टा करता.... मनुष्याने आपण लिहीलेलं आपण स्वतः वाचलं तर जगाच्या निम्म्या समस्या कमी होतील Wink

रश्मीशी सहमत Lol
सी, मगं माझ्यासारख्या लेख न वाचणाऱ्यांनी फक्त हायलाईट्ससाठी येणाऱ्यांंनी कुठं जावं.

सिमंतीनी, अगं खरच बोलतेय मी. तुझे प्रतीसाद खरच मोजक्या शब्दात छाप उमटवुन जातात. Happy बर्‍याच वेळा लिहीन लिहीन म्हणले आणी आज रहावलेच नाही, म्हणून सांगीतले.

आता तुम्ही जर टारझन सारखे या पारंबीवरुन त्या पारंबीवर पळत होता तर तुम्हाला कसे समजणार मी काय म्हणले ते. Proud

सिमंतीनीचे प्रतीसाद याबद्दल बोलत होते मी.

रश्मी वैनी बाळा साहेबांची तुलना कोणाशीही करून बाळा साहेबांचा अपमान करू नका

हजार येतील हजार जातील पण ते बाळासाहेबांशी कोणाचीही तुलना होऊ शकत नाही, या बयेची तर बिलकुल नाही Angry

नम्र विनंती

करेक्ट आहे समाधी, मी पण तेच म्हणाले तिला. पण आता त्यावरून रागवून भांडण नको सुरू करू नायतर परत ऋन्मेष लिफ्ट घालून खाली यायचा.

हो, लिफ्टची सर्व मजल्यांची बटणे दाबा.
>>
आमच्या ऑफिसमध्ये जर चुकीचे बटन दाबले तर आम्ही भरभर सर्व बटणे दाबतो, असे केले की सर्व बटने रिसेट होतात आणि मग
पुन्हा हवे ते बटन दाबता येते. अर्थात
प्रत्येक लिफ्ट्चे प्रोग्रामिंग वेगवेगळे असणार!

मेरे नाद को मत लग.....
हाहा Happy
Submitted by Sparkle on 4 May, 2021 - 00:53
>>>>>>>>>

हो ना, मलाही हे विचित्र वाटले. म्हणजे बोलणारी आणि ऐकणारी, दोघीजणी हिंदी भाषिक होत्या. तरी नाद हा मराठी शब्द का घुसडला? की हिंदीवालेही बंबैय्या हिंदीत असे बोलतात?

Pages