अडकलेली - भाग ३ : बंदिवास...!!

Submitted by रूपाली विशे - पाटील on 29 April, 2021 - 09:25

अडकलेली भाग-३ - बंदिवास..!!
_______________________________________

" आरोपी कादंबरी हिच्या विरोधात सादर केलेले सर्व साक्षी पुरावे ग्राह्य धरून आरोपी कादंबरी हिच्या वरचा अर्भक हत्येचा गुन्हा सिद्ध होत असून , हे न्यायालय आरोपी कादंबरी हिस आपल्या नवजात अर्भकाच्या हत्येप्रकरणी सात वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावत आहे. हे हत्या प्रकरण आई - मुलाच्या नात्याला काळीमा फासणारं असून सदर गुन्हेगाराला त्याने केलेल्या गुन्ह्यासाठी ठोठावलेली ही सजा योग्यच आहे..!!" असा शेरा मारत न्यायाधीशांनी अर्भक हत्या प्रकरणी कादंबरीला सात वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली ; आणि प्रकरण निकालात काढलं.

" तुम्हाला न्यायालयाला काही सांगायचे आहे का??" न्यायाधीशांनी कादंबरीला विचारलं. तिने नकारार्थी मान हलवली.

आता कादंबरीची रवानगी महिला कारागृहात झाली.

'तुरूंग', ' कारागृह' ' अंधार कोठडी' सामान्य माणसाच्या छातीत धडकी भरविणारे शब्द ..!! एका अल्लड, उमलत्या वयात येणार्‍या एका कळीचा प्रवास सुरु झाला .. तुरुंगातील बंदिवासाकडे...!!

नियतीने कादंबरीला एका आडवाटेला आणून सोडलं होतं.
ती महिला कारागृहाच्या दारात उभी होती. कारागृहाचा अजस्त्र दरवाजा मगरीच्या जबड्यासारखा 'आ ' वासून उभा होता... तिच्या आयुष्यातली उमेदीची सात वर्षे गिळंकृत करण्यासाठी..!! कादंबरीने कारागृहाच्या आत पाऊल टाकलं. ज्या वयात मुलीनं विवाह करून सासरच्या घराचा उंबरठा ओलांडून पाऊल टाकण्याचं स्वप्न पाहायचं असतं .. त्या वयात तिची गाठ पडली होती... जीवाचा थरकाप उडवणाऱ्या गुन्हे केलेल्या, निर्ढावलेल्या गुन्हेगारांशी ..!!

तुरुंग अधिकारी रोहिणी मॅडमनी तिच्या जवळच्या सगळ्या चीजवस्तू आपल्या ताब्यात घेतल्या. त्यांनी तिची पर्स उघडली. दोन पासपोर्ट साईजचे फोटो खाली जमिनीवर पडले. ती खाली वाकली. खाली पडलेले फोटो तिने उचलून घेतले. डोळे भरून दोन्ही फोटो पाहिले. एक आपल्या आईचा आणि दुसरा प्रणितचा फोटो पाहून ती दोघांच्या आठवणींनी व्याकूळ झाली. त्यांच्या प्रेमळ आठवणींनी डोळ्यांत येऊ पाहणारे अश्रू आज तिने निर्धाराने थोपवले.

आजपासून तिच्या आयुष्याला नवीन सुरुवात होणार होती. समाजापासून दूर असणाऱ्या एका जगात तिला मार्गक्रमण करावं लागणार होतं. एक असं जग, जिथे गुन्हा करून खितपत पडलेल्या गुन्हेगारांची एक वेगळी समाजव्यवस्था होती.. एक वेगळं जीणं होतं.. जे बाहेरच्या जगाने वाळीत टाकलेलं , निषिद्ध मानलेलं ...!!

कादंबरीला तुरुंगात कैद्यांसाठी असणारा पोशाख मिळाला. ताट- पेला, एक साबणाची वडी, चटई आणि अंथरुण मिळाले. त्यासोबत मिळाला बिल्ला नंबर ...३१५..!! आता ती कैदी नंबर ३१५ होती. तिचं नाव पुसलं गेलं होतं. ज्या समाज व्यवस्थेचा ती भाग बनली होती; तिथे ती आता कैदी नंबर ३१५ म्हणूनच ओळखली जाणार होती.

रोजच कैद्यांशी गाठ पडणाऱ्या रोहिणी मॅडमचं अंत:करण निष्पाप, निरागस चेहऱ्याच्या कादंबरीला पाहून गहिवरलं. निर्ढावलेल्या मनाने, सरावलेल्या हाताने वेगवेगळे गुन्हे केलेले असंख्य गुन्हेगार त्यांनी तुरुंगात पाहिले होते, परंतु त्यांच्या एवढ्या वर्षांच्या कार्यकाळात फक्त दोनच चेहरे त्यांना निष्पाप, निरागस, सोज्वळ भासलेले..! एक चेहरा कादंबरीचा आणि दुसरा कैदी नंबर २०५ चा..! जणू दोघी पाठच्या बहिणीच असाव्यात असं त्यांना वाटलं. दोघीही गुन्ह्यात नकळतपणे अडकल्या, अडकविल्या गेल्या असाव्यात, असं त्यांना राहून-राहून वाटत होतं. तिच्या चेहऱ्याकडे पाहत रोहिणी मॅडमनी एक दीर्घ श्वास घेतला.

तुरुंगाच्या बराक नंबर दोन मध्ये कादंबरीची रवानगी झाली.

दुनियेतली शहाणी आणि समंजस माणसं तुरुंगाला 'काळ कोठडी' म्हणतात ते उगाच नाही. बराकीच्या क्षमतेपेक्षा जास्त स्त्री कैदी बराकीत कोंबल्या होत्या. जनावराच्या कोंडवाड्यात जनावरं कोंडलेली असतात तश्या..!!..

कादंबरीने बराकीच्या आत पाऊल टाकलं. सगळ्या कैदी स्त्रिया तिच्याकडे पाहू लागल्या, थंड नजरेने... निर्विकार चेहऱ्याने..!!

असंख्य कोरडे, निर्विकार चेहरे पाहून कादंबरीचा जीव दबून गेला. तुरुंग कर्मचारी स्त्रीने तिला तिची जागा दाखवली. जागा कसली ..?? अंगाची वळकटी बनेल एवढीशी जमीन होती ती ..! तिला तुरुंगातील कैद्यांच्या रोजच्या दैनंदिन जीवनाची माहिती दिली गेली.

तुरुंगात रात्री आठ वाजता जेवण आलं. जेवणासाठी कैद्यांची भली मोठी रांग लागली. दोन चपात्या, एक भाजी, डाळ, भात असं जेवण कैद्यांना दिलं गेलं. तिने चपातीचा घास मोडला. तिच्या हातातला घास तोंडापर्यंत गेला आणि अचानक तोंडाजवळ गेलेला हात गळून पडल्यासारखा खाली आला. तिच्या डोळ्यांतून टिपं गळू लागली.

"आता डोळ्यातलं पाणी पिऊन पोट भरणार आहेस का..? 'अन्न हे पूर्ण ब्रम्ह' ..पोरी...!.. खाऊन घे दोन घास .. ..!!शेजारी बसलेली पिकल्या केसांची प्रौढ कैदी स्त्री तिच्याकडे पाहून मायेने म्हणाली.

त्या कैदी स्त्रीने भक्तीभावाने जेवणाच्या ताटाला हात जोडले. कादंबरीने तिच्याकडे पाहिलं. कादंबरीकडे पाहत तोंड पसरून ती स्त्री हसली. हसताना तिच्या तोंडातला समोरचा वाकडा, मोठा दात सुळ्यासारखा चमकला. तिला तसं हसताना पाहून कादंबरी दचकली.

"आता हेच आपलं जीवन आहे ...'आलिया भोगासी असावे सादर .." असंच म्हणतात ना..??" चपातीचा तुकडा मोडत ती कैदी स्त्री उद्‌गारली.

तू कुणाला मारलसं गं पोरी... ??" त्या कैदी स्त्रीने आपल्या ताटातला घास उचलत अचानक कादंबरीला प्रश्न केला.

कादंबरी शांत बसून राहिली. तिने त्या स्त्रीला काहीही उत्तर दिलं नाही.

"मी मारली माझ्या सवतीला आणि माझ्या नवऱ्याला... घातला वरवंटा दोघांच्या डोक्यात..!! " शांतपणे चपातीचा घास चावत, हाताने वरवंटा टाकण्याचा अभिनय करत ती स्त्री कादंबरीकडे पाहत सांगू लागली.

कादंबरी गांगरली. भयंकर भीती वाटली तिला त्या स्त्रीची .. तिच्या बोलण्याची...!!

"लई नाद होता त्याला बाईचा न् बाटलीचा... माझ्या डोक्यावर सवत आणून बसवतो काय ??? लई त्रास दिला त्याने मला. चांगली अद्दल घडवली दोघांना...!! बाई माणूस असलं म्हणून किती सहन करावं एखादीने..??" तिचा आवाज कापरा झाला.

"दोन पोरं आहेत माझी... तिथे लांब माझ्या बहिणीकडे राहून शिकतात. इथून सुटली की, नाही जाणार मी त्यांच्याजवळ. माझ्या काळ्या जीवनाची सावली नको पडायला त्यांच्यावर..!!??" ती डोळे पुसू लागली.

"आपली रोहिणी मॅडम आहे ना... ती लई चांगली बाई आहे. इथून सुटलेल्या बायांना पुढे लोकांमध्ये चांगलं जगता यावं , त्यांचं योग्य पुनर्वसन व्हावं म्हणून लई झटते...देव भलं करो रोहिणी मॅडमचं..!' ती स्त्री आपलं जेवण उरकून जागेवरून उठली.

सुन्न बसून राहिलेली कादंबरी ताटातच हातातला घास फिरवित राहिली... हताशपणे..!!

तुरुंगातली तिची पहिली रात्र. तिला एक क्षणही झोप लागत नव्हती. जेव्हा कधी डोळा लागत असे, तेव्हा तिला चित्र-विचित्र स्वप्नं पडू लागत. ती अचानक झोपेतून ओरडत उठली. बराकीत बाजूला झोपलेल्या कैदी स्त्रिया त्यांची झोपमोड झाल्याने तिला अर्वाच्य भाषेत शिव्या घालू लागल्या.

" ए बये, झोप की आता ... कशाला रातच्याला बोंबा मारतेस?" शेजारी झोपलेल्या स्त्रीने तिला हाताच्या कोपऱ्यानं टोकलं.

ती वरमली. तुरुंगाच्या छताकडे पाहत ती जागीच राहिली रात्रभर..!! विचारांची असंख्य वर्तुळं तिच्याभोवती फेर धरून नाचू लागली. लहान-मोठी... असंख्य वर्तुळं .... आणि त्या वर्तुळात अडकलेली ती ...त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू पाहणारी.... आणि त्या वर्तुळातून सुटण्याचा प्रयत्न करताना त्यात अजूनच अडकत, गुरफटत जाणारी ....!!

पहाटेचे सव्वा पाच वाजले. तुरुंगातली घंटा वाजली. कैद्यांचा दिवस सुरू झाला. बराकीत लगबग सुरू झाली. सकाळचे प्रातःविधी आणि आंघोळीसाठी कैद्यांची रांग लागली. कादंबरीने आपलं आवरून घेतलं. साडेसहा वाजता सगळ्या कैद्यांना चहा मिळाला. सात वाजता तुरुंगाच्या प्रांगणात सगळ्या कैदी स्त्रिया प्रार्थनेसाठी जमल्या. साऱ्याजणी शिस्तीत रांगेत उभ्या राहिल्या. त्यांच्यासमोर तुरुंगाधिकारी रोहिणी मॅडम उभ्या होत्या. सगळ्या कैदी स्त्रिया एकसुरात प्रार्थना म्हणू लागल्या.

इतनी शक्ती हमे देना दाता ...
मन का विश्वास कमजोर हो ना ...!
हम चले नेक रस्ते पे हमसे ...
भूल कर भी कोई भूल हो ना ...
!

कादंबरीच्या डोळ्यांतून अश्रूंच्या सरी बरसू लागल्या. आपला दुःखद भूतकाळ झरझर तिच्या मनपटला वरून सरकू लागला. तिने आपल्या भावनावेगाला आवरलं. प्रार्थने नंतर कैद्यांना सकाळच्या न्याहारीचं वाटप झालं. न्याहारी झाल्यानंतर सर्व कैदी स्त्रिया आपापल्या वाट्याला आलेल्या कामाच्या विभागात काम करण्यासाठी निघून गेल्या.

रोहिणी मॅडमने कादंबरीवर काम सोपवलं, तुरुंगातल्या वस्त्र विभागातलं..! कापडी पिशव्या, पर्स , टोप्या, रुमाल अश्या अनेक प्रकारच्या वस्तू वस्त्र विभागात कैद्यांमार्फत बनविल्या जात होत्या. तिचा आज पहिला दिवस असल्याने आणि तिचं कोवळं वय पाहून रोहिणी मॅडमनी तिला इतर कैद्यांच्या तुलनेत जरा सोपं काम दिलं.

तुरुंगातला तिचा पहिला दिवस सुरू झाला. दिवसां मागून दिवस सरू लागले. कादंबरी आता बऱ्यापैकी तुरुंगात रूळू लागली. आपल्या वाट्याला आलेली बंदिवासाची शिक्षा भोगू लागली.

तुरुंगातल्या प्रत्येक कैदी स्त्रीची एक वेगळी व्यथा, वेगळी कहाणी तिच्या मनात घर करू लागली. ती तुरुंगातलं आयुष्य जगू लागली. त्या कैदी स्त्रिया जसं एकमेकींचं दुःख, व्यथा जाणत होत्या , तसंच वेळ प्रसंगी एकमेकींवर कुरघोडी करत , एवढ्या - तेवढ्या कारणाने एकमेकींशी भांडत होत्या, एकमेकींच्या झिंज्या उपटत होत्या.

" ए, मला शिवू नको.. आज माझा उपवास आहे.. हो तिथे बाजूला.. तुझा मासिक धर्म चालू आहे ना..?? विटाळ लागेल मला..!! " आंघोळीसाठी लावलेल्या रांगेत एक प्रौढ कैदी स्त्री दुसऱ्या कैदी स्त्री वर डाफरली.

" ए.. म्हातारे, सुनेला हुंड्यासाठी जाळून मारलंस तेव्हा नाही लागला का गं तुला विटाळ...!! आलीयं मोठी उपवासाचं पुण्य पदरात पाडून घ्यायला !" दुसऱ्या कैदी स्त्रीने तिला प्रत्युत्तर दिलं.

" ए सटवे, माझी उणीदुणी नको काढू सांगून ठेवते तुला...! तू पण तर पैश्यांसाठी आपल्या मालकाला ठार मारलंस ना.. चोरी केलीस ना त्याच्या घरात? तू काय धुतल्या तांदळाची आहेस का?" प्रौढ कैदी स्त्री भडकली.

" पैश्यांसाठी नाही मारलं मी त्याला. माझ्यावर वाईट नजर होती त्याची .. माझ्या अंगावर हात टाकला त्याने, म्हणून संपवला मी त्याला..!!" दुसऱ्या कैदी स्त्रीच्या वर्मी बाण बरोबर लागला.

झालं.. ! दोघींच्या भांडणाचे आवाज वाढत गेले. दोघी हमरीतुमरीवर आल्या. एकमेकींना लाथा-बुक्क्यांनी तुडवू लागल्या. शेवटी आजूबाजूच्या कैदी स्त्रियांनी दोघींचं भांडण सोडवलं. अशी भांडण तुरुंगात नेहमीच होत असत.

"माझ्या अंगावर हात टाकला त्याने, म्हणून संपवला मी त्याला..!!" हे शब्द कादंबरीच्या कानात घुमत राहिले. अशी हिंमत आपण का दाखवू शकलो नाही ह्याचं वैषम्य तिला वाटू लागलं. त्या नराधमाने आपल्या दुर्बलतेचा फायदा उचलत आपल्यावर अन्याय केला आणि त्या अन्यायाचा बदला घेण्याच्या भावनेतून आपण एका निष्पाप आणि निरागस जीवावर अन्याय केला, त्याला यमसदनी धाडण्याचं धाडस केलं ... तेचं धाडस आपण त्या नराधमाचा जीव घेऊन दाखवायला हवं होतं. खरं तर त्या निष्पाप जीवाचा काहीच दोष नव्हता. आपण गुन्हेगार आहोत त्या बाळाचे..!! आपणं अर्भक हत्येचं पापं केलंय.. अपराध केलांय, आता आपल्यात आणि त्या नराधमात काय फरक राहिला?? ... एखाद्या मातीच्या वारुळातून असंख्य मुंग्या बाहेर पडू लागाव्या, तसे असंख्य विचार तिच्या मेंदूतून बाहेर पडू लागले. तिचं डोकं तापवू लागले.

तिचं मन पश्चात्ताप दग्ध झालं. परंतु एकदा धनुष्यातून सुटलेला बाण आणि तोंडातून बाहेर पडलेला शब्द मागे फिरून येत नाही , तसं आता हातून घडून गेलेल्या कृत्याबद्दल विचार करण्यात काहीही अर्थ नव्हता. पश्चात्ताप करण्याशिवाय तिच्या हाती काहीही उरलं नव्हतं. आपल्या हातून घडलेल्या गुन्ह्याची शिक्षा ती भोगणार होती .. नव्हे ..तिला ती भोगावीचं लागणार होती... परंतु तिचा खरा गुन्हेगार..? त्याचं काय...?? तो तर समाजात उजळ माथ्याने फिरत होता...!!

तुरुंगात कादंबरी कुणाच्याही अध्यात-मध्यात पडत नसे. 'आपण भले की आपलं कामं भलं ' ह्या प्रमाणे वागत होती. तुरुंगातल्या कजाग , भांडखोर स्त्रियां पासून चार हात लांबच राहत होती. तुरुंगाधिकारी रोहिणी मॅडम कडक शिस्तीच्या अधिकारी होत्या; जरी त्या कठोरपणे आपलं कर्तव्य बजावित असल्या तरी, त्यांचं हृदय आतुन कोमल होतं. प्रत्येक गुन्हेगार कैदी स्त्रीची पार्श्वभूमी त्यांना माहीत होती. कुठल्या परिस्थितीतून त्या स्त्रिया तुरुंगात आल्या आहेत, हे त्या जाणून होत्या.

तुरुंग म्हणजे आपल्या समाजव्यवस्थेचा एक भागच आहे. गुन्हा केलेले हा एक समान रोग असलेले कैदी इतर कैद्यांच्या सोबत राहून, एकत्र काम करत, एकत्र बंदिवासाची शिक्षा भोगत, कळत - नकळतपणे, अजाणतेपणे, थंड डोक्याने, रागाच्या भरात आपल्या हातून घडलेला गुन्हा ... आणि नंतर त्या कैद्यांना आपल्या हातून घडलेल्या कृत्याचा होणारा पश्चात्ताप ... त्या पश्चात्तापातून त्यांच्यातली गुन्हा करण्याची मानसिक विकृती नाहीशी व्हावी व एकमेकांबद्दल बंधुभाव , परस्पर सहकार्याची भावना निर्माण व्हावी , ह्या विचाराने प्रेरित झालेल्या रोहिणी मॅडम कैद्यांच्या भल्यासाठी नेहमीच पुढाकार घेत असत. त्यांनी तुरुंगात स्वयंसेवी संस्थेच्या आणि तुरुंग प्रशासनाच्या मदतीने अनेक उपक्रम कैद्यांसाठी राबवले होते, जेणेकरून त्यांच्या खडतर , रखरखीत अशा आयुष्यात हिरवळ, चैतन्य निर्माण होईल.

कैद्यांसाठी योग शिबीर, तज्ञांचे चर्चासत्र, त्यांच्या नातेवाईकांशी भेटीगाठी, पत्रव्यवहार, बाहेरच्या जगाशी त्यांचा संबंध येऊ देणं, कैद्यांसाठी मनोरंजन पर कार्यक्रम राबवणे, प्रत्येक धर्माच्या सणानिमित्त नवीन कार्यक्रमाची रूपरेषा आखणे; असे अनेक उपक्रम त्या राबवित असत.

कादंबरीचा मनमिळावू, जिद्दी, मेहनती स्वभाव आणि तिची तुरुंगातली चांगली वर्तवणूक पाहून रोहिणी मॅडमनी तिच्या खांद्यावर संध्याकाळच्या वेळेत कैद्यांसाठी प्रौढ साक्षरता वर्ग घेण्याचे काम सोपविले. तसंच तिला तिचं अर्धवट राहिलेलं शिक्षण यशवंतराव मुक्त विद्यापीठामार्फत पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे वचन दिलं.

न्यायव्यवस्थेने कैद्यांना तुरुंगात दिलेल्या सोयी- सवलतींचा कायद्याच्या कक्षेत राहून त्यांना त्या सवलतींचा लाभ देऊन भविष्यात त्यांना त्यांच्या पुर्नवसनासाठी कश्याप्रकारे फायदा होईल, यासाठी रोहिणी मॅडम कटाक्षाने लक्ष घालत असत. त्यांच्या सहकार्याने कादंबरीच्या खीळ बसलेल्या आयुष्यात नवचैतन्याचे वारे जोमाने वाहू लागले.

कादंबरीने तुरुंगात कैद्यांसाठी प्रौढ साक्षरता वर्ग घेण्यास सुरुवात केली, त्यासोबतच आपलं अर्धवट राहिलेलं शिक्षण पूर्ण करण्यास जोमाने अभ्यास करायला सुरुवात केली.

एके दिवशी साक्षरता वर्गात कैद्यांना शिकवत असताना अचानक तिचं लक्ष एका शांतचित्ताने बसलेल्या स्त्री कैदीकडे गेलं. चेहऱ्यावर निष्पाप , निरागस भाव असणारी ती स्त्री कैदी खरंच गुन्हेगार असेल , तिने कोणताही गुन्हा केला असेल असं तिला पाहून कुणालाही वाटलं नसतं. काय गुन्हा केला असेल बरं तिने..?? तुरुंगात शिक्षा भोगत असूनही तिच्या चेहऱ्यावर कुलीनतेचे भाव, घरंदाजपणा अन् सोज्वळ संस्कारांचे तेज चमकत होते. ती होती कैदी नंबर २०५ ...!

कादंबरीला उत्सुकता लागली, त्या कैदी स्त्री बद्दल जाणून घेण्याची..!!

कोण होती ती स्त्री..?? कादंबरी विचारात पडली. ती त्या शांत बसलेल्या स्त्री कैदीच्या दिशेने चालू लागली.

क्रमशः

धन्यवाद!

रुपाली विशे - पाटील
_______________________________________

टिप - १) सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील प्रसंग हे वाचनात आलेल्या वृत्तपत्रातल्या सुन्न करणाऱ्या बातम्या, कधीकधी कानावर पडणाऱ्या कथित कहाण्या यावर आधारीत असून तसेच कल्पनांती रचलेले आहेत. कथेचा प्रत्यक्ष जीवनाशी कुणाचा काहीही संबंध नाही. कथेत काही साध्यर्म आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. तसंच कथेत लिहिलेल्या काही प्रसंगांनी मन विचलित होऊ शकतं त्याबद्दल वाचकांची मी मनस्वी दिलगीर आहे. कथेद्वारे कुणाच्याही भावना दुखविणे हा कथा लेखिकेचा बिल्कुल उद्देश नाही.

२) कथेतील तुरुंग जीवन, तुरुंगातल्या कैद्यांच्या जीवनातील प्रसंग हे पूर्णपणे कल्पनेने रचलेले असून काही संदर्भ, तपशील हे वृत्तपत्रातल्या बातम्या, मासिकातले लेख यावर आधारीत आहेत.

__________________XXX_________________

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

काय मस्त वठलाय हा भाग. कोणताही ड्रामा नाही, नाट्य नाही पण कथा मनाची पकड घेतेय. तुरुंगवासाचे वर्णन व बारकावे कमालीचे आहेत.
>>>>>कारागृहाचा अजस्त्र दरवाजा मगरीच्या जबड्यासारखा 'आ ' वासून उभा होता... तिच्या आयुष्यातली उमेदीची सात वर्षे गिळंकृत करण्यासाठी..!!
हॅटस ऑफ टु यु.

जबरदस्त !!!
पुढील भागाच्या प्रतिक्षेत

खूप छान लिहिलय.वर्णने पण मस्तच.
नुकताच Beyond the clouds सिनेमा पाहिला होता. त्यातील स्त्रीकैद्यांचा तुरूंग डोळ्यासमोर आला वाचताना.
पुढील लेखनास शुभेच्छा!

मानवजी - धन्यवाद, तुमचा पहिला प्रतिसाद वाचून खूप आनंद झाला.

मनूप्रिया - धन्यवाद, प्रतिसादासाठी..!

जाई - धन्यवाद, तुझ्या नेहमीच्या प्रोत्साहनासाठी धन्यवाद..!

सामो - धन्यवाद, तु केलेल्या कौतुकाने मूठभर मांस चढलं माझ्या अंगावर..

बन्या - धन्यवाद, कथेवरच्या प्रतिसादासाठी..!

आबासाहेब - धन्यवाद, कथेवरच्या प्रतिसादासाठी.!

धनवन्ती - तुमच्या शुभेच्छांचा मनपूर्वक स्विकार करते.

शब्दवर्षा - धन्यवाद, प्रतिसादासाठी..!

मोहिनी - धन्यवाद, तुझ्या नेहमीच्या प्रोत्साहनासाठी..!

मृणाली - तुझ्या नेहमीच्या प्रोत्साहनासाठी धन्यवाद..! चित्रपट नाही पाहीला अजून पण नक्की पाहीन.

लावण्या - तुझ्या नेहमीच्या प्रोत्साहनासाठी धन्यवाद ..!

मामी - धन्यवाद , नेहमीच्या तुमच्या प्रोत्साहनासाठी.!

पुढचा भाग उद्या टाकेन..!

छान सुरू आहे कथा.
सिस्टम मध्ये लॉगिन करताना आधी तुमच्या कथेचा भाग आला आहे का हे बघूनच मग काम सुरु करते Happy

धन्यवाद सामी, तुमच्या प्रतिसादाने लेखन केल्याचं समाधान वाटलं.

रानभुली, वीरूजी - धन्यवाद , तुमच्या नेहमीच्या प्रोत्साहनासाठी..!

Please, don't be sorry Rupaliji, actually i wrote that comment because i am involved in the story deeply.
Eagerly waiting for next part. Nice going.

धन्यवाद वैशाली., तुम्हांला पुढचे भागही आवडतील अशी अपेक्षा करते.
धन्यवाद राणी, तुझ्या नेहमीच्या प्रतिसादासाठी..!

तुमची प्रत्येक कथा तर आवडतेच पण तुमची प्रतिसाद देण्याची पध्दतही खूप आवडली. Happy
पुढील भागाच्या प्रतिक्षेत......

स्वातीताई धन्यवाद, तुमच्या नेहमीच्या प्रोत्साहनासाठी..

गार्गी धन्यवाद, तुझ्या सुंदर प्रतिसादासाठी...