जैसे ज्याचे कर्म तैसे....

Submitted by बाख on 22 April, 2021 - 06:26

जगात इतकी विषमता का असावी असा प्रश्न कधी तरी प्रत्येकाला पडतोच. एखादी व्यक्ती जन्मजात गरीब असते ती गरिबीतच मरते. काही रॅग्ज टू रीचेस कथा असतात तर जन्मापासूनच काही जण स्टिंकिंग रिच असतात. दोन बालकं एकाच इस्पितळात एकाच वेळी जन्म घेतात पण नंतर त्यांच्या आयुष्यात फरक पडतो. एकाला दूध महाग तर दुसऱ्याच्या तोंडाला सोन्याचा चमचा.
दोन्ही बालके निष्पाप, देवाचे अंश, मग असं फक्त एकाच्याच वाट्याला का? काहीजण गौतम बुद्ध प्रवृत्तीचे, संतवृत्तीचे तर काही हिटलर, पॉल पॉट. कोणी जन्मजात कलाकार, शास्त्रज्ञ उत्कृष्ट लेखक, कवी किंवा गणितज्ञ असतात तर काही जण
जन्मजात व्यंग घेऊन जन्मतात. काही जण इतरांना दुखवताना असं करू का नको याचा दहा वेळा विचार करतात तर काहींना इतरांचा पाणउतारा करण्यात आसुरी आनंद मिळतो. सुदृढ आई वडील आणि मूल दिव्यांग अशीही उदाहरणे दिसतात. एखादा सज्जन माणूस दुर्धर आजाराने ग्रस्त असतो तर बॉम्ब स्फोट घडवून निष्पाप लोकांचा बळी घेणारा स्वर्गसुख उपभोगत असतो. सगळीच माणसे लहानपणी देवाची लेकरे तर ही अशी विषमता का असावी? त्याचे कारण म्हणजे ज्याचे त्याचे कर्म. आपण ज्या काही बऱ्या वाईट गोष्टी जाणीव पूर्वक करत असतो त्या.

संस्कृत "क्रि" या धातू पासून बनलेला कर्म हा शब्द युनिव्हर्सल लॉ ऑफ कॉज अँड इफेक्ट समजल्यानंतर पाश्चात्य देशात मूळ संकल्पना न बदलता कर्मा असा वापरला जातो. युनिव्हर्सल लॉ अशासाठी की हा कायदा, ब्रह्मांडात जितकी लोकं आहेत, जसे भूलोक, भुवर्लोक, स्वर्गलोक, महलोक, जनलोक, तपलोक, सत्यलोक अशी उच्च पातळी तर तल, अतल, वितल, सुतल, तलातल, रसातल आणि पाताळ अशी नीच पातळी या सर्व ठिकाणी चालतो. माणसाच्या आयुष्यात जशी विचारसरणी असेल, बरे वाईट कर्म असतील तसा त्याचा प्रवास मृत्यूनंतर या लोकांत होत असतो आणि पुनर्जन्म किंवा मोक्ष त्याच्या कर्माप्रमाणे ठरत असते.

जीवनात विषमता का दिसते तर त्या त्या माणसाचा मागील जन्मातील संचित, प्रारब्ध आणि क्रियमाण कर्म. प्रत्येक आत्म्याचा पुनर्जन्म होत असतो आणि त्या त्या जन्मात जी जी काही चांगली कामे केली आहेत त्याची बेरीज म्हणजे संचित कर्म. ह्या संचित केलेल्या कर्माचे फळ ह्या जन्मात मिळणे ते प्रारब्ध कर्म आणि क्रियमाण कर्म म्हणजे ह्या जन्मात जे जाणून बुजून वाईट कर्म केलेले आहे त्याची पुढील जन्मात मिळणारी बरी वाईट फळे.

आपण प्रत्येक जण भोवतालचा निसर्ग, पशुपक्षी,समाज, कुटुंब आणि आताच्या काळात आभासी जग यांच्याशी कर्माचं नातं निर्माण करत असतो. यांच्याशी असणारे चांगले वाईट नातेसंबंध कर्माचा जमाखर्च निर्माण करतात. ही कर्माची देणी घेणी फेडण्यासाठी मृतात्मे परत परत जन्म घेत असतात आणि जो पर्यंत जमाखर्च शून्यावर येत नाही तो पर्यंत वेगवेगळ्या जन्मात भेटत राहतात. हिंदू तत्वज्ञाना प्रमाणे देहाला पुनर्जन्म असतोच. गीतेत श्रीकृष्ण म्हणतो तसे
वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि । तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही ॥ २-२२ ॥
कठोपनिषद - मृत्योहो सा मृत्यूम् गच्छंती य इहा नानेव पिष्यतीl

जैन धर्म -
नाणाविहाई दुक्रवाइऐ अणुहोति पुणोपुणो
संसार चक्कावालाम्मि मच्चुवहि जराकुले
उच्चावयाणि गच्छंता गबभमेस्सांति णंतसो ।
नायपुत्ते महावीरे एवमाह जिणुत्तमे ।
म्हणजे मृत्यू, व्याधी व जरा यांनी युक्त असलेल्या ह्या संसारचक्रामध्ये ते पुनःपुन्हा नाना दुःखे भोगतात. ते उच्च व कनिष्ठ स्थितीमध्ये जाणारे अनंत गर्भात जन्म घेतात, असे ज्ञानवंशातील राजपुत्र जो जिनश्रेष्ठ महावीर याने
सांगितले आहे.

बौध्द धर्म - धमःपद तन्हावग १५
मुनच् पुरहा पच्छतो मन्हे मुन्च भवस्सा परागु
सबभा विमुथा मनसो ना पुन जाहीजमृ उपेहिसि ।
म्हणजे तुमच्या इच्छा, वासना संपून मन निर्विकार होऊन जेव्हा मन संसारातून मुक्त होतं, तेव्हाच तुमचे पुनर्जन्माचे फेरे थांबतात. पुनर्जन्मावरील गाढ विश्वासामुळेच दलाई लामा व पंचेन लामा आपला उत्तराधिकारी कुठे मिळेल, म्हणजेच आपण कुठे जन्म घेणार आहोत, ते मृत्यूआधीच लिहून ठेवतात.

कर्माचा वैश्विक कायदा देखील सर्व धर्मग्रंथात मान्य केलेला दिसतो. उदा:

भगवद्गीता-ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति । एवं त्रयीधर्ममनुप्रपन्ना गतागतं कामकामा लभन्ते ॥ ९-२१ ॥

यदा सत्त्वे प्रवृद्धे तु प्रलयं याति देहभृत्‌ । तदोत्तमविदां लोकानमलान्प्रतिपद्यते ॥ १४-१४ ॥

रजसि प्रलयं गत्वा कर्मसङ्गिषु जायते । तथा प्रलीनस्तमसि मूढयोनिषु जायते ॥ १४-१५

तानहं द्विषतः क्रूरान्संसारेषु नराधमान्‌ । क्षिपाम्यजस्रमशुभानासुरीष्वेव योनिषु ॥ १६-१९ ॥

जैन धर्मातील तत्वार्थ सूत्रात अध्याय आठ, नऊ आणि दहा मध्ये कर्म आणि मोक्ष याबद्दल लिहिलेले आहे.

बौद्ध धर्मातील अंगुत्तरानिकाय यातल्या कर्मपिटीकेतील हा उतारा -" .......व्यक्ती जन्माने नाही, तर विचार, स्वभाव, वृत्ती, वर्तन आणि कर्म यांमुळे मोठा होत असतो. कुलीनतेच्या नावाखाली माणसांचा वारंवार अपमान करणे, अशी कृती त्या माणसाची हीन वृत्ती दर्शवत असते....."

कुराण मधील जलजला आयात, पारसी धर्मातील यास्ना ग्रंथातील तिसरी आणि अकरावी गाथा, बायबल मधील ओल्ड आणि न्यू टेस्टामेंट, या सर्वात ह्या युनिव्हर्सल लॉ बद्दल लिहिलेले आहे.

कर्म म्हणजे केवळ दिसणारी कृती नव्हे तर अगदी मनात येणारे सूडबुद्धीचे विचार पण कर्मातच मोडतात. आपण बाहेर टाकलेले नकारात्मक विचार आणि वाणीतून बाहेर पडलेले शिव्याशाप एक नकारात्मक ऊर्जेचे कंपन तयार करतात आणि त्याचे नकारात्मक आवरण आपल्या सभोवताली तयार होते जे कालांतराने हानिकारक ठरते.

मानसिक गाळणी पद्धतीच्या विचारात काही माणसे
(मेंटल फिल्टरिंग )कोणत्याही प्रसंगात फक्त नकारात्मक बाजूच बघतात. त्यातल्या सकारात्मक बाजूकडे ते हेतुतः दुर्लक्ष करतात. सकारात्मक बाबी लक्षपूर्वक सरळ गाळल्या जातात. त्यातून त्या व्यक्तीत कडवटपणा येतो. त्याची परिणीती मानस शास्त्रात ज्याला काळे किंवा पांढरे विचार ( ब्लॅक ऑर व्हाईट थिकिंग) म्हणतात त्यात होते. दोन टोकाचे विचार. कोणत्याही प्रसंगाला फक्त काळी किंवा पांढरीच बाजू असणार, मधला मार्ग नाही अशी मानसिक स्थिती निर्माण होते. या टोकाच्या विचाराचा परिणाम म्हणून
टोकाच्याच भावना निर्माण होतात आणि टोकाचीच कृती केली जाते. त्याचा परिणाम त्यांच्या स्वत:वर, नातेसंबंधावर होतो. त्यांच्या लेखी इतरांना माफी नसतेच.

आपत्तीजनक पद्धतीने विचार करणारे समस्या आहे त्यापेक्षा खूप मोठी करुन ठेवतात. त्यांच्या लेखी आयुष्यापेक्षाही ती समस्या मोठी होऊन जाते. आणि त्याहून जास्त महत्त्वाचं काहीच उरत नाही.

नावे ठेवणारे विचार (लेबलिंग) करण्याची सवय असणारे मात्र इतरांचा सहजगत्या अपमान करून जातात. नाव ठेवण्याची वृत्ती असल्यामुळे त्या त्या प्रसंगापुरते न पाहता सरसकट विचार करुन मोकळे होतात त्यामुळे समस्येच्या मुळाशी जाऊन वेगळा विचार करायचा असतो हे त्यांना ठाऊकच नसते. एखादं काम नाही जमलं तर त्याला सगळ्याच बाबतीत सरसकट अकार्यक्षम आहे असं ठरवून मोकळे होतात. पूर्वग्रहदूषित मानसिकता ठेवणाऱ्या व्यक्ती देखील सहजगत्या लेबलिंग करतात.

कोकणातील काहीं लोकांचे आंब्याच्या, केळीच्या किंवा तत्सम झाडांशी भावनिक गुंतवणूक झालेली असते असे ऐकले आहे. आपण आपल्या मुलाबाळांशी जसे बोलतो,वागतो, ओरडतो त्याच पद्धतीने ही माणसे आपल्या झाडांशी बोलतात आणि अशा पद्धतीने जीव लावतात. विशेष म्हणजे ह्या झाडांना पण ते कळत असतं आणि मालकाला हवा तसा प्रतिसादही देत असतात. म्हणजे झाडांनाही मन आणि भावना असतात असा त्याचा अर्थ निघतो.

आपल्या इच्छा आणि विचार हे नेहमी स्वच्छ आणि सकारात्मक असावेत. विचार आणि कृती यातील वायरलेस कनेक्शन लक्षात घेतले पाहिजे. आयुष्याच्या कारच्या स्टिअरिंग सारखे आपले विचार असतात. गाडी चालवताना खाच खळगे असलेला रस्ता आला की आपण गाडी हळू चालवतो, दक्ष राहतो आणि अपघात होऊ नये याची काळजी घेऊन स्टिअरिंग फिरवतो तद्वतच आपल्या विचारांची दिशा आपण ठरवली पाहिजे म्हणजे मार्गक्रमणा करताना अडचण येणार नाही.

......

Group content visibility: 
Use group defaults

@ वेमा, admin, आश्चर्य आहे. बाख नाव वाचल्या नंतर केवळ नकारात्मकच प्रतिसाद देणारे, प्रतिसादात प्रश्नचिन्ह टाकणारे, पूर्वग्रह बाळगणारे मायबोलीकर गेले कुठे? आता हे वाचल्यानंतर हा प्रतिसाद उडवा असे तुम्हाला सांगतील. काय करणार? सरड्याची धाव..... किंवा मियांकी दौड़......!

असं काही नसतं. मागचा जन्म वगैरे थोतांड आहे. फक्त इन्स्टंट कर्मा हेच खरंय. मागच्या जन्मातलं कर्म वगैरे अर्थहीन आहे.

हम को मालूम है जन्नत की हक़ीक़त लेकिन
दिल के ख़ुश रखने को 'ग़ालिब' ये ख़याल अच्छा है |

बस्स.. जे मजेत आहेत त्यांना सगळे थोतांड.....

जे नाहीत त्यांनी कर्मसिद्धांत वाचून आपल्या दुःखाला फुंकर घालावी... 'मीच का?' ह्या छळवादी प्रश्नाला कर्मसिद्धांतात उत्तर शोधायचे शेवटी..