वैष्णवजन तो ....

Submitted by बाख on 13 April, 2021 - 09:53

वैष्णवजन तो ....

मराठी भाषेत जे स्थान संत तुकारामाचे आहे तेच स्थान गुजराती भाषेत आद्यकवी नरसिंह
मेहताचे आहे. तुकारामानी "अभंग" रचून आपल्याला समृध्द केले तर नरसिंह मेहतानी "पद" रचून गुजराती
भाषा आणि संस्कृतीला श्रीमंत केले. नरसिंह मेहतांनी विविध छंदांमध्ये अनेक रचना केल्या, ज्यात "झुलणा" नावाच्या छंद त्यांचा आवडता आहे. नरसिंह मेहतावर मराठीतील संत नामदेवांचा प्रभाव पडला होता.
त्याची प्रचीती त्यांच्या 'पदां' मध्ये येणाऱ्या मराठी भाषेच्या छटा वरुन येते. त्यांच्या काव्यलेखनात
आपल्याला नरसैयाचा स्वामी, मानिनीचा मन मोहे रे, अथवा कुसुमाची वृष्टि होये , 'आपूला
भक्त का विसरी गेला' या सारख्या अनेक मराठी मिश्रित गुजराती पंक्ति आढळतात.

"वैष्णवजन तो तेने कहिए जे पीड पराइ जाणे रे;"

हे त्यांचे गुजराती भाषेतले भजन फक्त भारतातच नव्हे तर भारता बाहेरही सुविख्यात आहे. या अफाट लोकप्रियतेचे कारण नरसिंह मेहताची काव्यप्रतिभा
तर नक्कीच पण थेट तळागाळापर्यंतच्या लोकांकडून हे भजन मुखोद्रत करविण्याचे
श्रेय महात्मा गांधींना दिले जाते. लता मंगेशकर सारख्या महान गानसाम्राज्ञीस आणि तशाच इतर
अनेक गायकांना या भजनाने समोहित केले आहे.

हे मूळ गुजराती भजन आणि त्याचे मराठीकरण खालील प्रमाणे:

वैष्णवजन तो तेने कहीए जे पीड पराई जाणे रे;
परदुःखे उपकार करे ने मन अभिमान न आणे रे.
सकळ लोकमां सहुने वंदे, निंदा न करे केनी रे;
वाच-काछ-मन निश्चल राखे, धन धन्य जननी तेनी रे.
समदृष्टि ने तृष्णा त्यागी, परस्त्री जेने मात रे;
जिह्वा थकी असत्य न बोले, परधन न झाले हाथ रे.
मोह-माया लेपे नहि तेने, दृढ वैराग्य तेना मनमां रे;
रामनाम शुं ताळी लागी, सकळ तीरथ तेना तनमां रे
वणलोभी ने कपटरहित छे, कामक्रोध जेणे मायां रे;
भणे नरसैयोः तेनुं दर्शन करतां कुळ एकोतेर ताया रे.

वैष्णव जन तर त्यास म्हणावे जो परपीडा जाणी रे:
परदुःखें उपकार करी तरी मन अभिमान न आणी रे.
सकळ जनी सर्वांना वंदी, निन्दत नाही कुणासी रे;
वाचा काया मन ही निश्चल, धन्य तयाची जननी रे.
समदृष्टी अन तृष्णा त्यागी, परस्त्री ज्यासी आई रे;
जिव्हा काही असत्य न बोले, परधन घेई ना हाती रे.
मायामोही गुंतत नाही, दृढ वैराग्य वसे मनी रे;
रामानंदी टाळी लागे, सकल तीर्थ वसती तनी रे.
लोभरहित अन कपटरहित जो, कामक्रोधासी मारी रे;
नरसैया म्हणे दर्शन करिता कुळ एक्हात्तर तारी रे.

........

Group content visibility: 
Use group defaults