भयज्योतिष

Submitted by प्रकाश घाटपांडे on 11 April, 2021 - 06:53

एखाद्याची पत्रिका वा हात पाहून ज्योतिषाने भावी आयुष्यातील एखाद्या घटनेची दाट शक्यता सांगितली म्हणजेच केवळ ’भविष्य’ नव्हे. तर वर्तमान काळातील एखादी अज्ञात असलेली गोष्ट जरी सूचित केली तरी ते ’भविष्य’म्हणूनच गणले जाते. एवढच कशाला भूतकाळातील एखादी घटना जरी त्याने शक्यता या प्रांतात सूचित केली तरीही ते ’भविष्य’.म्हणजे भविष्य हा शब्द केवळ कालवाचक नाही तर तो अज्ञाताचा घेतलेला कुठल्याही मार्गाने घेतलेला कालातीत शोध असा आहे. त्याला चिकटलेली आश्चर्य, अदभूत, गूढ अशी गुणवाचक वैशिष्ट्ये भविष्य या विषयाचे आकर्षण वाढवतात. आपल्या भविष्यात काय वाढून ठेवलय याच एकीकडे भय ही असते तर दुसरी कडे आकर्षण ही असते. भविष्यकाळाविषयी सुखद स्वप्ने रंगवणे हा एक मानवी मनाचा खेळ असतो. त्यामुळे जगात बरेचसे व्यवसाय ’भय’ आणि ’स्वप्न’ यावरच चालतात. वैद्यकीय क्षेत्रात आजारी पडण्याचे भय व बरे होण्याचे स्वप्न दाखवून आरोग्य पुरवण्या ’प्रबोधनाचे’ तथा ’जागरुकतेचे’ काम करतात. बिल्डर घराचे स्वप्न दाखवतो. पोलिस,वकील कायद्याचे भय दाखवतात. बॉलिवूड तर अनेकांना हिरो हिरॉईन बनण्याचे स्वप्न दाखवते. लठ्ठ स्त्रियांना झिरो फिगर करण्याचे स्वप्न व सडपातळ स्त्रियांना लठ्ठ होण्याचे भय दाखवून देखील ब्युटी डाएट जिम इंडस्ट्रीज चालतात. ज्योतिषात ही तशा प्रकारचे लोक आहेत. कालसर्प योगाचे भय दाखवून नारायण नागबली विधी करायला लावणारे भरपूर पैसे उकळणारे लोक आहेतच. त्याचबरोबर काळजी करु नका कुलदेवतेच स्मरण करा व आपली सदसद विवेक बुद्धी जागृत ठेवा असे सांगून धीर देणारे ज्योतिषी देखील आहेत. ग्रहपीडेचे भय आणि परिहार वा तोडगा काढून त्याचे निवारण केल्याने चांगले दिवस येतील हे स्वप्न दाखवून जातकाला दिलासा दिला तर त्यालाही लुबाडल्यासारखे वाटत नाही हे धूर्त व चाणाक्ष ज्योतिषांना माहित असते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भय आणि स्वप्नं ह्यांचा सुपरसेट "अनिश्चितता" हा आहे असे वाटते. काही लोकांना अनिश्चितता फार काळ सोसवत नाही म्हणून ते ज्योतिषाचा आश्रय घेतात. जसे की लग्नाच्या बाबतीत, वधू आणि वर सर्व बाबतीत परिपूर्ण असून पण घटस्फोट होतात. तिथे कुठलेच नियम असे लागू होत नाहीत. मग पुढच्या अनिश्चितेला आधार म्हणून पत्रिकेचा टेपू दिला जातो.
परिचयातले एक नास्तिक आणि ज्योतिष्यावर अजिबात विश्वास नसलेल्या पण आयुष्यात बराच संतुलित वाटणाऱ्या व्यक्तीच्या मुलीला काहीतरी गंभीर आजार झाला. बरेच टेस्ट्स वगैरे करून काहीच ठोस असे निदान झाले नाही. ह्या अनिश्चितेला कंटाळून एकदा तो एका ज्योतिषाकडे गेला हे ऐकून मला फार आश्चर्य वाटले होते. त्याच्या अगतिकेतून असे दिसून आले की पुढे जे काही चांगले-वाईट होणार आहे ते त्याला समजायला हवे होते. त्या वेळी त्याला फार भय वाटत नव्हते but uncertainty was killing him. मुलीच्या पत्रिकेत कोणत्यातरी स्थानात शनी-मंगळ युती होती म्हणे. ती मुलगी पुढे कँसरनी वारली.

सतत सावध असलेले आणि वर्तमानकाळाची स्थिती पुढे तशीच राहील का बदलेल याविषयी जागरूक असणारे निरनिराळे उपाय आणि वाटा तपासत असतात. त्यात ज्योतिषही आले.

ह्या अनिश्चितेला कंटाळून एकदा तो एका ज्योतिषाकडे गेला हे ऐकून मला फार आश्चर्य वाटले होते.>>>>>हळू हळू लोक ज्योतिषा ऐवजी कौन्सिलर मानसोपचार तज्ञ यांचेकडे जाउ लागले आहेत. भविष्यातले बाबा बुवा हे सायकॉलॉजिस्ट, सायकियाट्रिस्ट व कौन्सिलर असणार आहेत. अर्थात आम्ही हे भविष्य केव्हाच वर्तवल होत.पाहिजे तर पुरावा म्हणुन लिंक देतो उपक्रमावरची. http://mr.upakram.org/node/773
मानसोपचारात दोन प्रमुख स्कूल ऑफ थॉटस आहेत. एक बायोमेडिकल ॲगल ने जाणारा व दुसरा थेरपी ॲगलनी जाणारा! दोन्हींचे महत्व आपापल्या जागी आहेच. मुद्दा येतो तो प्राधान्यक्रमाचा. मानसतज्ञ ही प्रथम माणसेच असतात. म्हणजे होमो सेपीयन सेपीयन! राग लोभ मद मत्सर मोह लोभ हे सगळच आलं. त्यांचेही वैचारिक पिंड त्यांच्या व्यवसायात प्रतिबिंबित होत असतात. शिवाय मानसशास्त्रात अबस्ट्रॅक्ट गोष्टी फारच असतात. मानसशास्त्रात गेल्या दहा पंधरा वर्षात अनेक नवीन संशोधन मोठ्या प्रमाणात आली आहेत. त्यामुळे त्यातील वर्गीकरण ही थोडे बदलावे लागले आहे. मनोविकारांचा मागोवा या डॉ श्रीकांत जोशी यांच्या पुस्तकाच्या अलिकडच्या आवृत्त्यांमधे त्याचा उल्लेख आहे.