हिंजवडी चावडी: ऐटीत आयटी

Submitted by mi_anu on 22 December, 2018 - 04:57

मांजर दिवसा अखेर मिटिंग रूम मध्ये बसला होता.'आज तू काय काय केलंस' असे प्रश्न विचारणं आणि त्याची एकापेक्षा एक सुरस चमत्कारिक उत्तरं ऐकणं हे त्याचं सध्याचं काम होतं.

खरंतर हे मांजर कष्टकरी, म्हणजेच प्रोग्रामर.दिवसभर एसीत घाम गाळावा, कोपऱ्यात बसून एकटं एकटं कीबोर्ड बडवावा, बाहेर आसमंतात भूकंप, वादळ, मोर्चा ,मिरवणूक,प्रलय काहीही असलं तरी आपण आत 11 तास खुर्चीवर बसावं.दणादणा कीबोर्ड बडवावा, टकाटका क्लिक करून काम झाल्याचं मेल पाठवावं, आखडलेली पाठ सरळ करून घरी जाऊन दुधपोळी खाऊन झोपावं असं सरळसोट काम.पण मांजराचे केस गळायला लागले, वजन आणि पोट वाढायला लागलं तसं वरच्या गलेलठ्ठ बोक्यांनी गुरगुरून त्याला आता मोठा झालास,गुरं हाकायला लाग असं सांगितलं.त्यामुळे मांजर आता काम न करता नुसतंच दिवसातून 4 मिटिंगमध्ये बडबड करतं.काम न करण्यापेक्षा काम करणं जास्त सोपं आहे हा दृष्टांत त्याला रोज होतो.अश्याच दिवसातल्या शेवटच्या बडबडीची ही मिटिंग.

"पक्या, तू आज काय केलंस?"
"आज काही जास्त केलं नाही.आयटी वाल्यानी मशीन फॉरमॅट करायला मागितलं मी दिलं."
जिच्याशी आपल्याला लग्न करायचं आहे ती हिरॉईन भांडून कायमची परदेशी जावी तसं उत्कट दुःख मांजराच्या डोळ्यात तरळलं.

"अरे पण त्याच्यावर आपला टीम सर्व्हर होता.तो उद्या 10 जण वापरणार होते.तू देऊन टाकलं मशीन?असंच?काही बोलला नाहीस?"
"बोललो.मग त्या माणसाने तक्रार पोर्टल वर 'मला फॉरमॅट नाही करायचं' असा इश्यू उघडायला सांगितला.ते तक्रार पोर्टल उघडलं नाही.मग आयटीवाल्याने 'तक्रार संबंधित हेल्पलाईन' वर चॅट करायला सांगितलं.मग त्या चॅट सुंदरी ने गाऱ्हाणं पोर्टल वर जाऊन 'तक्रार पोर्टल चा दरवाजा माझ्यासाठी उघडा' असा इश्यू टाकायला सांगितला.गाऱ्हाणं पोर्टल 3 तास मेंटेनन्सधे होतं.इश्यू टाकल्यावर त्याला तुझं, प्रोजेक्ट मॅनेजर चं, आणि डायरेक्टर चं अप्रुव्हल लागेल.डायरेक्टर जपान मध्ये आहे.तो ऑफिसात आल्यावर त्याला सांगेन अप्रुव्हल दे म्हणून."
मांजर नव्याने आपल्या कंपनीतल्या लाल फीत कारभाराबद्दल खिन्न झालं.
"कधी होणार फॉरमॅट?"
"चहा पिऊन येतो आणि चालू करतो म्हणाला."

अचानक देश सोडून निघालेल्या हिरॉईनचं विमान लेट आहे कळल्यासारखं मांजर आणि त्याचे 2 सिनियर गुर्गे(म्हणजे कोंबडे नाही, विश्वासाचे भिडू ) आयटी वाल्याच्या बोळकांडीतल्या खोलीकडे धावले.

आयटीवाला साहेबराव(हे विशेषण नाहीये, त्याचं नाव साहेबराव लक्ष्मीप्रसाद रनडवले' असं भारदस्त आहे.प्रत्यक्षात हा प्राणी 2 वर्ष अनुभव वाला 42 किलो वजनाचा चिमुकला किरकोळ जीव आहे.याचं पूर्ण नाव इंग्लिश मध्ये लिहून उभं केल्यास याच्या उंचीइतकंच होतं.) खुर्चीत रुतून बेनेडिक्ट चा पिक्चर बघत होता.याचे खुर्चीत रेललेले फोटो आरामात पहुडलेल्या शेषशायी विष्णू सारखे दिसतात.फक्त बेंबीतून कमळाऐवजी कंबरपट्ट्यातून हेडसेट हा एक फरक.कंपनीत नव्या आलेल्या माणसांसाठी हा खडतर तपश्चर्येने पावणारा देवच आहे.

"काये?"
"फॉरमॅट करू नका.आम्हाला पाहीजेय मशीन.सर्व्हर आहे त्याच्यावर."
"इश्यू टाका."
"वेळ नाही.परवा डिलिव्हरी आहे."
"डायरेक्टर चं अप्रुव्हल आणा."
"वेळ नाही.परवा डिलिव्हरी आहे."
"तात्काळ पोर्टल मध्ये शो स्टॉपर इश्यू टाका."
"वेळ नाही.परवा डिलिव्हरी आहे.तात्काळ पोर्टल ला प्रोजेक्ट मॅनेजर ऍक्सेस आहे."
"प्रोजेक्ट मॅनेजर ला सांगा इश्यू टाकायला."
"तो ट्रेनिंगं मध्ये आहे.तिथे ऑफिस मेल आणि नेटवर्क चालत नाही.वेळ नाही.परवा डिलिव्हरी आहे."

हेच मांजर 4 वर्षांपूर्वीचं पिल्लू असतं तर पहिल्या 2 वाक्यात नम्र आवाजात ओके म्हणून परत आलं असतं.पण पाठीत अनेक झाडूचे रट्टे बसल्याने मांजर आता निर्ढावलं होतं.इथे उभं राहून संभाषण लांबवल्यास आयटीवाला पिक्चर बघणं लवकर चालू व्हावं म्हणून मार्ग सुचवेल हे त्याला माहिती होतं.

"मॅनेजर,डायरेक्टर, माझा लीड,माझा मॅनेजर यांना सीसी ठेवून मेल करा.इश्यू टाकून ठेवा.मला स्क्रीनशॉट पाठवा.मी करतो.आणि पुढच्या वेळी असं करू नका."

मांजराचे गुर्गे मांजराकडे अतीव आदराने बघू लागले.आयटीवाला हा निश्चयाचा महामेरू "मी अप्रुव्हल शिवाय काम करतो" म्हणण्याइतका मऊ करणं शिकणं याच्या मोबदल्यात मांजराच्या अनेक फालतू व्हॉटसप जोक ना लोल पाठवणं आणि त्याला जागेवर जेवणाचं पार्सल आणून देणं अगदीच किरकोळ किंमत होती.

परत मिटिंग रूम मध्ये येऊन मोबाईल मध्ये खुपसलेली टाळकी वर आणायला 5 मिनिटं लागली.

"विश्या तू आज काय केलंस?"
"मी 2 मोठे बग सोडवले.तिसरा सोडवायला गेलो तर सॉफ्टवेअर थांबलं.वेळ जायला नको म्हणून आयटी वाल्याला विचारलं तर त्याने आपण ट्रायल व्हर्जन वापरतो म्हणून त्याच्या मॅनेजर ला सांगितलं.मग मॅनेजर ने ऑडिट मध्ये आपण ट्रायल व्हर्जन वापरून त्यापासून काहीतरी बनवून पैसे कमावतो हे कळेल म्हणून ते काढायला लावलं.आता ऑफिशियल लायसन्स मिळालं की काम चालू होईल.तसं पण आपण ऑफिशियल मिळाल्यावरच काम चालू करायला पाहिजे होतं.याकडे हायर मॅनेजमेंट ने लक्ष द्यायला हवं होतं.काहीही चाललंय इथे."

विश्या एका लहान आणि कुटुंबासारखं गोडीगुलाबीने सहकार्य करत कामं करणाऱ्या एका कंपनीतून जास्त पैसे मिळवायला या 10000 माणसांच्या कंपनीत 1 वर्षापूर्वी आलाय.गावातल्या दुधदुभतं,प्रेमळ माणसं असलेल्या मोठ्या वाड्यातून गर्दीच्या शहरात चाळीत नांदायला आलेल्या मुलीसारखा तो भंजाळलाय.त्याच्या मनाला बसलेला धक्का नोटपॅड घ्यायला मॅनेजर अप्रुव्हल लागतं हे ऐकून चालू झालाय तो अजून संपलाच नाही.'काहीही चाललंय इथे' हे वाक्य तो कामावर आल्यावर दिवसातून दोनदा तरी म्हणतोच.जग छान चालावं, प्रत्येकाने प्रत्येकाला कामं करायला मदत करावी, स्वतःवर असलेलं काम प्रत्येकाने नीट जबाबदारीने करावं,असं कुठेच मिळत नसेल तर तसं काम चालणाऱ्या कोणत्यातरी परदेशात आपण जावं आणि आयुष्यभर राहावं या स्वप्नावर हा चालतो.आठवड्यातून एकदा रस्त्यावर नियम न पाळणाऱ्या लोकांशी भांडण करतो.त्या भांडणाबद्दल मोठ्या फेसबुक पोस्ट लिहितो.स्वतःच्या गल्लीत पोहचायला चुकीच्या बाजूने कट मारणारे सगळे पंटर त्या पोस्ट ला लाईक करतात.

"विश्या बाळा लायसन्स मिळायला एक महिना लागतो आणि प्रोजेक्ट दीड महिन्याचा आहे म्हणून ट्रायल व्हर्जन टाकलं ना आपण?आयटीवाल्याना विचारायचे असतात का हे प्रश्न?आता रक्ताचा वास लागलेल्या व्हॅम्पायर सारखे ते सगळ्यांची मशीन चेक करतील बाबा.त्या शेजारच्या टीम मधला पंटर रजेवर गेलाय त्याला थोडे दिवस तुझ्या मशीन वर काम करतो सांग."

"निल्या तू काय केलंस दिवसभर?"
"3 बग, सिस्टम अपग्रेड,एक नवं इंस्टॉल."
मांजर निल्या कडे आदराने बघू लागले.हा टीम चा जुगाड भाई.तो कधीही अडचणी सांगत नसे.
"तू अपग्रेड एका दिवसात कसा केला?मागच्या वेळी आपल्याला 2 दिवस लागले होते."
"काल संध्याकाळी लावला, मग आयटी वाल्याला सांगितलं एकदा बघ म्हणून, मग रात्री 12 ला लॉंग ड्राईव्ह ला आलो होतो तेव्हा येऊन पुढचा भाग लावला, आणि सकाळी 10 ला फिनिश."
"आयटी वाल्याला तू बघ म्हणून सांगितलं?"
"तो भिडू माझा सुट्टा फ्रेंड आहे.त्याला आठवड्यातून एकदोन वेळा मार्लबोरो घेऊन देतो त्याला.आम्ही पार्टी करतो महिन्यातून एकदा.सब सेट."

"सुन्या, तू इंटरव्ह्यू घेतले का?"
"हो.पमी पाटील बरी आहे म्हणून फीडबॅक दिलाय मी."
"तिच्यापेक्षा जास्त मार्क त्या मन्या ला मिळाले होते ना?"
"मन्या चांगलाच आहे.पण पमी ला टीम मध्ये घेणं ही दूरदृष्टी आहे."
"ऑ?"
"पमीचा नवरा आहे आयटी हेड विश्वनाथ पाटील."
सगळ्यांनी "हो हो, पमीच बरी.पमीलाच घेऊया" म्हणून एकमताने कल्ला केला.

आता मिटिंग चा शेवट म्हणजेच भाषण देणे हा मांजराचा आवडता पार्ट आला.
"हे बघा, आयटी वाले अडवणार.कस्टमर ऐकणार नाही.मॅनेजर्स ऐकून पुढच्या कॉन्फरन्स ला जाताना विसरणार.इथे असणं, कामं चांगली होणं,कस्टमर ला पाहिजे ते पाहिजे त्या वेळात देणं ही आपली गरज आहे.आपल्याला त्याचा मोठा पगार मिळतो.कधी एका एक्सेल शीट मध्ये दोन ओळी लिहून आणि कधी शनिवार रविवार कुत्र्यासारखं काम करून.त्यात अडचणी येणार.मशीन क्रॅश होणार.लोक उद्दाम सारखे अडवणार.लायसन्स मिळणार नाहीत.10 ओळींचा प्रोग्राम कोणीही लिहिल.12 वीच्या हुशार मुलाला शिकवला तर तोही करेल.तो 10 ओळींचा प्रोग्रॅम लिहिण्या साठी लागणाऱ्या गोष्टी तयार करताना तुम्ही जे काही करता तो खरा एक्सपिरियन्स."
मांजर बोका बनायच्या योग्य मार्गावर आलं होतं!

(अनुराधा कुलकर्णी)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मायक्रोसॉफ्ट वाले या बाबतीत जळू आणि व्हॅम्पायर दोन्ही आहेत.ते लोकांना कँडी देऊन म्हणजे सोपे स्पूनफीड यु आय देऊन भुलवतात.मग नंतर लोकांना 'आमचं नवं व्हर्जन घ्याच,जुनं बंद करतो' म्हणून रक्त पितात.पब्लिक ला विंडोज व्हीस्टा घ्यायला लावणे,विन8 मध्ये स्टार्ट मेनू न ठेवून लोकांना जेरीस आणणे, वर्ड एक्सेल मधले फाईल आणि इतर मेनू चे टेक्स्ट काढून फक्त चित्र/आयकॉन मेनू ठेवणे हे त्यांचे काही वात्रटपणे. ज्याचा मूळ उद्देश विंडो ची प्रॉडक्ट शिकणे/त्यात वेळ घालवणे/त्यांचं कौतुक करणे हा नसून कमी वेळात त्यांची प्रॉडक्ट वापरून गिऱ्हाईक वा अन्य कोणाला काही दाखवणे हा असतो त्यांची वाट लागते.

नंतर लोकांना 'आमचं नवं व्हर्जन घ्याच,जुनं बंद करतो' म्हणून रक्त पितात+११११११११११११११११११११११ खरंय
पण मी ओपन सोर्स वाली, त्यामुळे कमी संबन्ध येतो, जेव्हढा आलाय त्यात जाम डोकं खाल्लय त्या व्हीसुअल स्टूडीओ / MS azure cloud ने

MicroSoft चाच सख्खा भाऊ AutoDesk ! ते तर चार पाउले पुढेच आहेत.
१.२५ लाखाच्या लायसेन्सला दर वर्षी चालू ठेवण्यासाठी ०.६० लाखाचे अ‍ॅन्युअल सबस्किप्शन विकत घ्यायला लागतं आजकाल !

लिखाण एकदम मार्मिक ! आवडलं नाही तरच नवल ....

आय टी वाल्यांचा एकच प्रॉब्लेम असतो, त्यांच्या खाली कोणी नसतं -

जेंव्हा एखाद्या सॉफ्टवेअर कंपनी ला कळतं की त्यांच सॉफ्टवेअर नॉन पर्सनल कामासाठी ट्रायल व्हर्जन वर वापरलयं, ते सी आय ओ ला धमकीवजा पत्र पाठवतात.
हे वरपासून खालपर्यंत येतं. आणि त्या साहेबराव लक्ष्मी प्रसाद पर्यंत तर "भोसडीच्या, जेंव्हा ट्रायल व्हर्जन इंस्टॉल होत होतं तू काय बेनेडिक्ट चा पिक्चर बघत होता काय? परत असं काही झालं तर गांडीवर लाथ मारून हाकलून देईन" अशा स्वरूपात येतं.

काही जणांना अतिशयोक्ती वाटेल पण आई टी मध्ये अश्या लज्जास्पद शब्दात अपमान केला जातो ही वस्तुस्थिती आहे. एस डी मध्ये असं कल्चर अभावानेच असतं.

वरून क्वालिटी वाले पगार कापतात त्यांचा तो वेगळाच.

एवढं सगळं करूनही (नियम पाळून), त्याचं पोर्टल वर निगेटिव्ह सर्व्हे येतो...
कीव येते बिचाऱ्यांची. तोंड दाबून बुक्क्यांचा मार.

एकदम खरं आहे शून्य शून्य एक साहेब.
हा लेख विनोद या दृष्टीने लिहिला असला तरी आयटी वाल्यांच्या कष्टांची जाणीव आहे.
लॉकडाऊन 1 चालू होण्याच्या 3 दिवस आधी यांना सकाळी 9 ते रात्री 10 सर्वाना लॅपटॉप द्यायला, त्याविषयी टेस्टिंग करायला, गेट पास भरायला, 'आमच्या इंटरनेट चा खर्च कोण भरून देणार' म्हणून ज्याच्या हाती काही नाही त्याच्याधी भांडणाऱ्या लोकांशी सामना करायला लागलेला पाहिलाय. जेवणाचा डबा बाहेर काढून ठेवलेला आणि 3.30 झाले तरी कोणी ना कोणी लॅपटॉप घ्यायला येतंय, सर्वाना काम आहे म्हणून भुकेपोटी काम करताना पाहिलंय.त्याबद्दल मनापासून चांगले फीडबॅकही दिलेत.

वरच्या लेखातले सॅम्पल मात्र जाम भयंकर होते.

मस्त अनु.
मी आय टी सपोर्ट मध्ये आहे...सो..साहेबराव च्या साईड ची! Happy

Pages