नैवेद्य

Submitted by रानभुली on 17 March, 2021 - 11:38

(कल्पनाचित्र जालावरून साभार)

आमचं घर गावाच्या बाहेर होतं.
मोठं प्रशस्त. लाकडी बांधकाम होतं.
सागवानी लाकडाचे मोठ मोठे कॉलम आणि बीम्स होत्या.
जोधपूरच्या रातनाडा पॅलेसचं बांधकाम केलेले राजस्थानी कारागीर त्या वेळच्या देशमुखांसाठी इथे राबले होते.

तेव्हांपासून देशमुखांचा पिढ्यान पिढा दबदबा आहे इथे.
मी कोण नाही सांगितलं का मी ?
असंच होतं नेहमी. माझ्याबद्दल सांगायचंच राहतं माझ्याकडून.
म्हणजे माझ्याबद्दल काय आहे सांगण्यासारखं ?
सगळं तर इतर मधेच आहे.

नवीन आईला सांगताना पण असंच झालेलं. तेव्हां दादा म्हणजे माझे बाबा मला ओरडले होते,
ओरडले कसले, फक्त एकच शब्द.
पण केव्हढी प्रचंड दहशत होती त्यात.

माझी सख्खी आई गेल्यानंतर दादा खूप शांत होते.
तेव्हांच मी दादांचं वेगळं रूप पाहीलं होतं. आजीला पोरगा असा शांत झालेला बघवला नाही.
तिने पुन्हा लग्नाचा घाट घातला होता.

मी वर पाहीलं, ती कोप-यातून हळूच बाहेर आली होती.
तिची आणि माझी केमिस्ट्रीच वेगळी.
एकदाच मी तिला
हो पण मी कोण अजून नाही सांगितलं का मी ?

मी गोदाला पण माझ्या रहस्यात सामील करून घेतलं होतं.
गोदा फक्त माझ्यासाठी होती. ती इतर कुणाला दिसायची नाही.
माझी आई असताना पाल सतत ये जा करायची.

आई किती छान होती.
किती सुंदर !
देशमुखांच्या घराण्यात आजवर पंचक्रोशीत सुंदर म्हणून नावाजलेल्या स्त्रियाच सून म्हणून आल्या.
एकदा आत आल्यानंतर त्या पुन्हा उंब-याबाहेर पडल्या नाहीत.
त्यांच्या घरचे कधी विचारणा करायला आले नाहीत.
देशमुखांची सून हेच खूप मोठं बिरूद असे.
मुलगी लग्न होऊन गेल्यानंतर तिचा मोह धरायचा नसतो असं मानणारे लोक असत त्या काळापासून.
ते आजच्या काळातही ही परंपरा चालूच होती.
काळ बदलत होता. पण देशमुखांना चालून येणा-या स्थळांची कधी कमी झाली नाही.
देशमुखांना मुलगी दिल्यानंतर कदाचित त्या त्या कुटुंबांची राजकीय भरभराट होत असेल.
मला कानावर पडायचं तेव्हढीच माहिती.

खूप दिवसांनी देशमुखांच्या घरात मी मुलगी म्हणून जन्माला आले होते. या पिढीत मुलगा नव्हता.
गादीला वारस नव्हता,
या पिढीत देशमुखांची मुलगी बाहेर लग्न करून जाणार होती.

--------------------------------------------------------------------------

आई जितकी सुंदर तितकीच प्रेमळ होती.
दादांचं हे दुसरं लग्न होतं. आधीच्या पत्नीला मूलबाळ नव्हतं.
तिच काय झालं हे समजलं नाही.
पण ती कधी मला दिसली नाही. तिच्याबद्दल कुणी बोलायचं नाही.
आजीला तिचा विषय आवडायचा नाही.
मला गोदाने सांगितलं होतं. तिला समज खूप होती.

आईला थोडीफार माहिती होती. पण पूर्ण माहिती होती का ?
नसावी.
दादा खूप आतल्या गाठीचे होते.
त्यांच्याकडे येणारे लोक नेहमी दबक्या आवाजात बोलायचे.
मग गावातून कुणीतरी गायब व्हायचं.
पोलीस वाड्यावर येत.
ओशाळं हसत. दादा त्यांना पुडकी देत.
ती कसली हे आजपर्यंत समजलं नाही मला कधी.

-----------------------------------------------------------
सकाळचा फेरफटका झाला की दादा घरी येत.
त्यांचा दिवाण आणि ते वह्या काढून बसत. मग जेवणं झाली की दोघेही ओसरीवर लवंडत.
दिवाण आणि दादांचं खूप पटायचं आपसात. त्याला ब-याच गोष्टी माहीत असत.
पण त्याच्याकडून काढून घेणं ब्रह्मदेवाच्या बापालाही शक्य झालं नसतं.
दुपारी चारनंतर दादा बाहेर जात.

कधी कधी दुस-या दिवशी येत. कधी आठवड्याने येत.
कधी त्याच दिवशी रात्री उशिरा येत.
ते बाहेरगावी गेले की कुठल्यातरी बाईकडे गेले हे आता आईला समजले होते.
( मला हे गोदा सांगायची. कानात खुसूर फुसूर करून)
तिला ब्र काढायची हिंमत नव्हती. तशी सोयच नव्हती.
पहिलीला मोठी आई म्हण असे आजी म्हणायची.
मग मी तिचं काय झालं सांग तर म्हणेन म्हणायचे.
आजी मग चिडायची.

दादा रात्री उशिरा घरी आले की त्यांच्या तोंडाला भपकारा यायचा.
मला हे दादा खूप भयंकर वाटायचे.
हे माझे दादा नव्हते असं वाटायचं.
त्यांचा दरारा होता. पण ते दादा वेगळे आणि हे वेगळे होते.
त्यांची नजर एखाद्या जनावरासारखी असायची.
अचूक सांगायचं तर लांडग्यासारखे त्यांचे डोळे लकाकायचे.
ते दादा नव्हते.
जनावर होतं.

त्या आधी आईने मला खाऊ पिऊ घातलेलअसायच्मं. खायला टंगळमंगळ केली की एक धपाटा मारून ,
"मी आहे तोपर्यंत खाऊन घे. नंतरचं कुणी बघितलंय" म्हणून डोळ्यांना पदर लावायची.
माझी भूक जायची. पण ती रडतेय म्हणून खाऊन घ्यायचे.
तिला कितीही विचारलं तरी सांगायची नाही.

ती मला झोपवत दादांची वाट बघायची. दादा यायच्या आत झोपून घे म्हणायची.
मला आता कळतंय ती तसं का म्हणत असायची.
-----------------------------------------------------------

दादांच्या त्या वासाने मला जाग यायची.
मी डोळे किलकिले करायचे.
दादा आईला वरच्या खोलीत यायला भाग पाडायचे. आई हात जोडायची, पाया पडायची.
पण दादा शिव्या द्यायचे. या अशा घाण शिव्या ऐकून कानात कुणीतरी गरम शिशाचा रस ओततंय असं वाटायचं.
हे दादा नाहीत.
ते आईला केसाला धरून का ओढत नेतील जिन्यावरून ?
तिला लागत असेल ना दादा ?
ही अशी वाक्ये तोंडातून बाहेरच पडायची नाहीत.

-------------------------------------------------------------

मी पाहीलंय. दादा तशा अवतारात आले की ती बाहेर यायची.
आनंदाने ती एकडे तिकडे धावायची.
आणि मग आईच्या दबक्या किंकाळ्या ऐकू यायच्या. तशी ती आनंदाने खोलीकडे बघताना मी पाहिलीय तिला.
तिचे डोळे लकाकायचे.
तिच्या चेह-यावर क्रूर हसू पण उमटायचं.
ती भिंतीवर इकडून तिकडे जायची. आणि
मी पाहीलंय म्हणून
ती आकाराने मोठी व्हायची.
तिचं शेपूट आता तडाखा दिला तर इमारत कोसळेल असं मजबूत व्हायचं.
आईच्या त्रासागणिक तिच्या अंगावर केस यायला लागले होते.

दादा केव्हांतरी बाहेर येत.
तेव्हां तिथे खोलीभरून एक पाल फिरत असायची.
पाल कसली ती ?
ती किंवा तो किंवा ते वेगळंच काहीतरी होतं.
काही देवांना रक्त लागतं.
काहींना नैवेद्य.

हिला काय हवं होतं ?

------------------------------------------------------------------------------------

आई एकदाच म्हणाली " ती कशी मेली मला कळतंय "
मग मी खोदून खोदून विचारल्यावर शपथा घालत राहिली,
वाड्याचं रहस्य कधिच बाहेर गेलेलं नव्हतं.
आजी एकदा म्हणालेली की कोणताच देशमुख अपवाद नव्हता.
आजी टिकली कारण ...
काय कारण ? कोण सांगणार मला ?
ते ही एक रहस्यच.

जुन्या वाड्यात अनेक रहस्यं दबा धरून बसलेली असतात.
सत्ता, मग्रुरी, अहंकार, वासना यातून काहीतरी जन्म घेत असेल अशा वास्तूत.

---------------------------------------------------------------------------

वाडा एका बाजूला.
नदी काही फर्लांगावर होती.
रात्री अपरात्री कधी कधी चिता जळताना दिसायची.
मग आजी खिडक्या बंद करून घेत असे.

आज ती दादा यायच्या आधीच बाहेर आलेली.
ती आता दादांची वाट बघू लागलेली.
तिला कसली भूक होती ?
ती हल्ली हल्ली आताच प्रचंड होत चाललेली दिसायची.

त्या दिवशी मला झोप नव्हती येत.
नाटक केलं होतं.

दादांनी नेहमीप्रमाणे शिवीगाळ करण्याआधीच आईने स्वतःला त्यांच्या स्वाधीन केलं.
" काय मारायचं ते एकदाच मारून टाका "
ती कधी नव्हे ते उंच स्वरात बोलली.
ही आई आहे ? आईला बोलता येतं असं ?
हे प्रश्न एका तडाख्यानिशी बरखास्त झाले.
मी त्या दिवशी खूप भेदरले होते.

बाहेर चिता जळतना दिसली.
ती भिंतीवर येरझारा घालत होती.

एखाद्या जनावराला मांसाचा तुकडा दिसावा आणि तो मिळेपर्यंत त्याची उलघाल व्हावी तसंच ते वाटत होतं.
मला तिची शिसारी आली.
तिने माझ्याकडे बघितलं.
लाल माणकासारखे डोळे.
आईचे हुंदके येत होते.

तिचा आकार प्रचंड होत चालला होता.
अंगावर केस दिसायला लागले. एक केसाळ प्राणी भिंतीवरून खाली उतरताना मला दिसला आणि माझी शुद्ध गेली

----------------------------------------------------------

सकाळी उठले तेव्हां आई चौकात झोपली होती.
तिच्या नाकात कापूस होता.
पांढ-या शुभ्र वस्त्रात ती होती.
लोक जमले होते.
म्हणजे दिवाण, ब्राह्मण आणि चार खांदेकरी.
बाकीचे वाड्यापासून दूर उभे होते. ते ही देशमुखांच्या भीतीपोटी आले असावेत.

आई गेली तेव्हां मी खूप रडले.
तीन दिवस रडत होते. मग ग्लानीने बेशुद्ध झाले.
मला घरीच सलाईन लावलं होतं. हॉस्पिटलमधे नेलं नव्हतं.

मग हळू हळू मला तिचं स्मरण झालं.
ती दिसत नव्हती.
मग एकदा फटीत ते डोळे दिसले.
केव्हढी बारीक झाली होती.
पण डोळे ?

ते लाल लाल डोळे आजीकडे बघत असायचे.
आजी अस्वस्थ व्हायची.
हिंस्त्र जनावराला शिकार मिळू नये तसं तिचं झालं होतं.

दादा एका खांबाला टेकून बसत.
कधी कधी मला बोलावत. मायेने थोपटत.
केसात बोटं फिरवत.
हे दादा मी कधीच पाहिलेले नव्हते.
मी स्वप्नात आहे का ?
दादा गप्प गप्प असत.

आजी दिवाणशी चर्चा करताना दिसायची.
मग खूप हालचाली सुरू झाल्या.
सतत माणसं यायला लागली.

एक दिवस मग घरातले मला ठेवून भारीतले कपडे करून बाहेर गेले.
तेव्हां ती आनंदाने बाहेर आली होती.
होती बारीकच. कुठल्याही पालीएव्हढी.

-------------------------------------------------

आणि मग नवीन आई आली.
नवीन आई मला विचारत होती
"तुझं नाव काय बाळ ?"
आजी म्हणाली "माझ्यानंतर ही टिकेल या घरात. ही वंशाचा दिवाही देईल "
आजी नवीन आईला काहीतरी सांगत होती.

नवीन आई रडत होती.
त्या दिवशी पाल घरभर फिरली.
दादा त्या दिवशी रात्रीचे पिऊन आले.
हे माझे दादा नाहीत. दादा मला थोपटून झोपवू शकतात.
हे माझे दादा नाहीत.
त्या दुष्ट पालीला ठाऊक आहे सगळं.
दादा असे आले की तिला कोण आनंद होतो.
काय मिळतं तिला ?
नवीन आई माझ्या आईप्रमाणेच वेदनांनी ओरडली असावी, पण तिचा आवाज दबला गेला होता.
ती भिंतीवर वेगात फिरू लागली होती.
आजी किलकिल्या नजरेने भिंतीवर बघत होती.
पहाटे केसाळ प्राणी भिंतीवरून झाली येताना पाहिला.
पण मी बेशुद्ध नाही झाले.
मला आता सवय झाली होती.
--------------------------------------------------------------------

नवीन आईला बहुतेक दिवस गेले होते.
वाड्यात आनंदाचं वातावरण दिसत नव्हतं. कुणी कुणाशी बोलत नव्हतं.
डॉक्टरांनी बेकायदेशीर चाचण्या करून मुलगी आहे असं सांगितलं.
पाल भिंतीवर आनंदाने कान टवकारत होती.

-------------------------------------------------

नवीन आईच्या किंकाळ्यांनी वाडा भरून गेला होता,
पण ऐकायला कोण होतं स्मशानाशिवाय ?
पाल आनंदाने चित्कारत होती.
हो, तो अभद्र आवाज मी जन्मात विसरणार नाही.

नवीन आई दोन दिवस खाली आली नाही.
जेव्हां आली तेव्हां तिचं पोट सपाट होतं.
तिच्यात त्राण नव्हतं.
माझ्या काळजात चर्र झालं.

आजी म्हणाली " आता ही टिकणार. तिने नैवेद्य दिला"
माझे अंग अंग शहारून उठले.
मला बहुतेक सगळं कळालं होतं.
--------------------------------------------------

नवीन आई आणि मी.
दोघी अशाच घरात जन्माला आलेलो.
ती ही अशीच पुरूषांच्या वाड्यात कित्येक वर्षांना जन्मलेली.
कि वाचलेली ?
मग मी ?

आणि मी ही अशाच वाड्यात जाणार ?
आणि टिकण्यासाठी मी ही ?

मला भोवळ येत होती.
मी कोण ?
मलाच कळेनासं झालं होतं

मी कशी सांगू मी कोण ते ?
मी जिथे जाणार तिथेही ती माझी वाट बघत असेल.
मी जगणार कि टिकणार ?
शी शी शी...
नैवेद्यावर अवलंबून !!

मी नाही सांगू शकत मी कोण.
शरणागत ?
(गोदा म्हणत होती ऐक त्यांचं नाही तर तुझ्या आईच्या कर्माने जाशील).

समाप्त.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जबरदस्त कथा पण मला एक सांगावसं वाटतंय की जशी गानू आज्जीची गोष्ट आहे. म्हणजे कथा आपल्याला आवडते, भयानक वाटते पण मनात कुठेतरी येतं की भयानाकतेच्या जोडीला एक अभद्रपणा(शब्दशः अर्थ घेऊ नका, कुठेतरी अस्वस्थ करणारे कथानक) या कथेत आहे तसंच काहीसं या कथेचं वाटतंय. एक अभद्रापणाची किनार जोडलेली आहे. हेमावैम.

बोकलत, किल्ली धन्यवाद.
बोकलत ही "भय"कथा नाही. भय असेल तर कशाचे हे तुम्हीच ठरवा.
मलाही उत्सुकता आहे. वाचकांना काय वाटते वाचल्यावर हे जाणून घेण्याची.

भयंकर डेंजर आहे
आणि स्किलफुली लिहिली आहे.कल्पनेला थोडा वाव ठेवला आहे.कथा घाबरवणारी असली तरी आवडली.

वातावरण निर्मिती आणि फ्लो मस्त आहे.
येऊ घातलेल्या अशुभाची नांदी पाल, हिंसाचाराने लहानगीच्या मनातली रुजलेली भिती, तिला पालीसारखे त्या खानदानाच्या भिंतीवरून सरपटणार्‍या शापाचे रूपक, मुलगा/वारस मिळेपर्यंत ईतरांचा बळी म्हणजे त्या पालीच्या रूपाने वावरणार्‍या शापित शक्तीला नैवेद्य हे दुसरे रूपक... आणि हे विशिअस सर्कल अनेक मुलींच्या नशिबी...अशी मला कळली

मी जगणार कि टिकणार ? >> हे वाक्य फार सॉलिड आहे.
ते वरचे चित्र मात्र आऊट ऑफ प्लेस वाटले. कथाच छान आहे चित्राची गरज नाही.

स्त्रीजन्मा ही तुझी कहाणी धाटणीची कथा भयकथा का वाटावी तीही गानू आजीशी तुलना करावी अशी?

समाजातलं कटू वास्तव रहस्यकथेचा तडका देत छान मांडले आहेस कथेत..!
आवडली कथा..!!

जबरदस्त जमलीय. मला पाल म्हणजे आधीची गेलेली पत्नी वाटली. की माझा बळी देऊन हे सुख घेतोय . बळी गेलेल्या संख्येप्रमाणे भिंतीवर पाली.

खूपच परिणामकारक लिहिले आहे.
एक शंका आहे - नैवेद्य हा शब्द का वापरला आहे? नैवेद्य हा पवित्र आणि देवतांच्या संदर्भात वापरला जातो. तर अशा बिभत्स शक्ती साठी बळी किंवा उतारा असा शब्द वापरला जातो.

वातावरण निर्मिती आणि लिखाणाचा ओघ मस्त आहे.
ते वरचे चित्र मात्र आऊट ऑफ प्लेस वाटले. कथाच छान आहे चित्राची गरज नाही.
स्त्रीजन्मा ही तुझी कहाणी धाटणीची कथा भयकथा का वाटावी तीही गानू आजीशी तुलना करावी अशी?

हाब +१

सर्वांचे मनःपूर्वक आभार.
हाब रसग्रहण आवडले. धनवन्ती - मला माहीत नाही. गावाला उग्र देवतांना निवद देतात. म्हणजेच नैवेद्य.
उतारा वेगळा प्रकार आहे. वेताळबाबाला बकऱ्याचा निवद हे ऐकून आहे. पण इथे सर्व प्रतिमा आहेत.

रानभूली, खूप भारी लिहिलंय, काळजाला भिडले.

गानू आजी चे लेखक कोण आहेत
मूळ कथा धारपांची आहे का? असल्यास त्याचे नाव काय?

ऑनलाइन वाचायला मिळेल का गानू आजी ची कथा

गानू आजी चे लेखक कोण आहेत
मूळ कथा धारपांची आहे का? असल्यास त्याचे नाव काय? >> हृषीकेश गुप्ते ह्यांच्या "अंधारवारी" ह्या पुस्तकातील कथानक आहे.

मस्त मस्त! असे प्रकार फार पूर्वीपासून आहेत अस्तित्वात. भिंतीपलीकडचा तो जंगली क्रास्टर रात्रीच्या राजाला त्याचे नवजात शिशु द्यायचा.. पण फक्त मुलगा असेल तरच. मुलगी झाली तर तो आपल्याच घरी त्यांना ठेवायचा.

जबरी

Pages