गणितज्ञ गुरू लाभलेला एक इंजिनिअर कलाकार

Submitted by दिनेशG on 9 March, 2021 - 04:31

तुमची आवड हाच तुमचा व्यवसाय असेल तर तुम्हाला ‘काम’ करायला कधीच लागत नाही. जे आपण करता ते अगदी मनापासून आपसूकच आपल्या हातून घडते. परंतु कितीतरी असे लोक आहेत की ते आपल्या आवडीला व्यवसायात रूपांतर करण्यास कचरतात. आपण कितपत यशस्वी होऊ याची भीती त्यांच्या मनात असते. दोन दशकांच्या पेक्षा जास्त इंजिनिअरिंग च्या विद्यार्थ्यांना शिकविल्यावर एक गोष्ट मला कायम जाणवत आलीय ती म्हणजे कित्येक विद्यार्थ्यांना आपल्याला नक्की काय करायचे आहे याचा पुरेसा अंदाज आलेला नसतो. गर्दीचा भाग बनून इंजिनिअरिंग ला आलेले हे विद्यार्थी मग मनाजोगती नोकरी नाही म्हणून इकडे तिकडे पळत राहतात आणि मग पैशाच्या गरजेपोटी ज्यात त्यांना आनंद बिलकुल मिळत नाही असे काम आयुष्यभर करत राहतात.

पण त्याच बरोबर असे काही मोजके विद्यार्थी असतात जे आपली आवड आणि व्यवसाय याची व्यवस्थित सांगड घालतात आणि काहीतरी वेगळं घडवून दाखवतात. सॉफ्टवेअर कंपनी चालविणारा अनिल कुंबळे, संगीतकार शंकर महादेवन, लेखक, गीतकार आणि स्टॅण्डअप शो करणारा वरुण ग्रोव्हर अशी कितीतरी उदाहरणे आहेत ज्यांनी आपल्या इंजिनिअरिंगमध्ये आत्मसात केलेल्या कौशल्यांचा वापर करून एका वेगळ्या क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे.

उद्याच्या युगाचा विचार करता जर स्पर्धेत टिकून राहून स्वतःचे करिअर घडवायचे असेल तर STEAM म्हणजे Science, Technology, Engineering, Arts आणि Mathematics मधील एकत्रित ज्ञानावर आधारित नोकऱ्या आणि व्यवसाय यांच्याकडे जास्त लक्ष केंद्रित केले पाहिजे. बहुविध शाखांवर अवलंबून असणाऱ्या नोकऱ्या आणि व्यवसाय हे वाढत जाणार आहेत आणि आजच्या घडीला एखाद्या कलेमध्ये असलेल्या आपल्या आवडीला तुम्ही तंत्रज्ञानाची जोड देऊन खूप चांगले करिअर घडवू शकता.

चिन्मय कोल्हटकर हे भारतीय शास्त्रीय संगीताच्या जगातील एक प्रसिद्ध हार्मोनियम वादक आणि संगीतकार. पंडित बिरजू महाराज, उस्ताद झाकीर हुसेन, गानसरस्वती किशोरी आमोणकर या सारख्या दिग्गजांना हार्मोनियम वर साथ दिलेल्या व इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर असलेल्या चिन्मयने मी घेतलेल्या आपल्या मुलाखती मध्ये एक कलाकार त्याच्या इंजिनिअरिंग मधील कौशल्यांचा वापर करून आपल्या साधनेच्या जोरावर शास्त्रीय संगीतासारख्या क्षेत्रामध्ये आपले नाव कसे कमवू शकतो हे दाखवून दिले आहे. आजऱ्या सारख्या छोट्या गावात वाढल्यावर संगीताचे शिक्षण कोल्हापूर व अभियांत्रिकी शिक्षण वारणानगर येथे पूर्ण करून यानंतर प्रथम पुण्यात आणि आता गोव्यामध्ये स्थाईक झालेल्या चिन्मय यांचा अभियंता ते कलाकार हा प्रवास विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी नक्की मार्गदर्शक ठरेल.
गणित विषयात डॉक्टरेट असलेल्या श्री अरविंद थत्ते या गुरूंकडून शास्त्रीय संगीतामधील ज्ञान प्राप्त करणाऱ्या चिन्मय यांनी संगीत क्षेत्रामध्ये गणित आणि अभियांत्रिकी मधील ज्ञान किती आवश्यक आहे हे आपल्या मुलाखती मध्ये छान विशद करून सांगितले आहे. संपूर्ण मुलाखत आपण
https://youtu.be/xdPu2tEvISk येथे पाहू शकता.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्तच!

यावरून आठवलं शास्त्रीय गायक आनंद भाटे हेही मेरिट लिस्टमध्ये आलेले इंजिनियर आहेत. संगीत साधना करत असताना शिवाय अभ्यासातही टॉप करणं म्हणजे काय कमाल आहे. सरस्वती प्रसन्न आहे.