अज्ञातवासी - भाग २९ - प्रेमवेडे!

Submitted by अज्ञातवासी on 6 March, 2021 - 12:55

भाग २८ - https://www.maayboli.com/node/78213

"दररोज इथे येऊन उभं राहण्याची गरज आहे?"
"खानसाहेब, आजकाल तुम्ही माझ्यावर जास्तच वैतागायला लागला आहात."
"कारण दादासाहेब, तुम्ही वेडेपणा केलात... पण यावेळी तुम्ही अविचार करताय."
"करू द्या मग! एकदा या राजशेखर शेलारालाही चुकू द्या!" दादासाहेब गरजले.
खानसाहेब गप्पच बसले.
हवेलीत अजूनही ये जा चालू होती... येणारे जाणारे दादासाहेबांकडे चोरटा कटाक्ष टाकून आत जात होते.
त्यांच्यापैकी एक उत्साही म्हातारा दादासाहेबांकडे आला...
"जिस हवेलीके चिराग को आपने बुझा डाला, ऊस हवेलीके सामने खडे रहनेको आपको डर नही लगता? अभी भी उसके लोग मौजूद है हवेलीमे।"
"चाचा..." खानसाहेब रागाने पुढे आले.
"थांबा खानसाहेब..." दादासाहेबानी हात वर केला.
खान जागीच थांबले.
"चाचा, नाव काय तुमचं?"
"साकीब."
"तो सुनो साकीबचाचा, आप दिनरात हवेलीमे रहते हो, या बाहरभी जाते हो."
"दुकान है मेरी, उधर जाना पड़ता है।"
"आपको डर नही लगता?"
"किस बात का डर?"
"कि इस दादासाब के लोग पूरे नासिकमैं है?"
चाचा सर्दच झाला.
"जसे तुम्ही संपूर्ण नाशकात बेझिजक फिरू शकतात, तसा मीही हवेलीसमोर उभा राहूच शकतो...
...पण ज्यादिवशी मी हवेलीसमोर उभा राहणार नाही, त्यादिवशी तुम्हाला नाशकात फिरता येणार नाही..."
खानसाहेबांच्या चेहऱ्यावर हलकेच हसू उमटलं.
दादासाहेबही हसू लागले.
"निवांत हवेलीत जा.. आणि आम्हाला बघू द्या."
...तो म्हातारा निमूट आत निघून गेला.
हवेलीच्या एका खोलीत ती मोठ्या आरशासमोर बसली होती...
तिने हळुवारपणे डोळ्यांना सुरमा लावला, व डबी बंद केली.
"आपा...आपा... जान लोगी आप मेरी. इतनी खूबसुरत क्यू हो आप? मुझे जलन होती है आपसे!"
"सकिना, इतकी तारीफ करशील ना माझी, तर डायबेटीस होईल मला."
"नाही आपा... खोटी तारीफ नाही, मी आजपर्यंत तुमच्याइतकी सुंदर औरत बघितली नाही."
ती फक्त हसली...
"आपा, अगर आप नही होती, तो!"
"चूप. काहीही नाही बोलायचं. जा खाली."
"ठीक तर बोलतेय ती!" एक वयस्कर स्त्री आत येत म्हणाली.
"सुशीलाचाची!" ती उठुन उभी राहिली.
"ही हवेली, इथली माणसे सांभाळणं खायचं काम नाही... संपूर्ण मुळासकट उपटून टाकलेलं झाड तू परत लावलं मुमताज. अजूनही या हवेलीतले लोक ताठ मानेने जगताय, तुझ्यामुळेच."
"अल्लाची कृपा!"
"नाही मुमताज, आज प्रत्येकाचा छोटा मोठा का होईना व्यवसाय आहे, पोरं शिकताय, सगळं तुझ्यामुळे."
ती काहीही बोलली नाही.
"मुमताज...?"
"काय चाची?"
"बोल ना! तुझ्या मनातली चलबिचल स्पष्ट जाणवतेय मला."
"भाई!" तिचा कंठ दाटून आला.
"शांत रहा, जखमी शेरणी आहेस तू, शांत राहा..."
ती काहीही बोलली नाही.
"तो दररोज असा उभा असतो इथे?" चाचीने विचारले.
"हो."
"मी बोलू त्याच्याशी?"
"गरज नाही चाची..."
"मुमताज, त्याला माहिती आहे तू कोण आहेस?"
"हो?"
"तरीही?"
"पागल आहे तो, त्यादिवशी बंदुकीच्या टोकावर त्याला धमकावून आले, तरीही तेच."
"बंदूक का चालवली नाहीस मुमताज?" चाचीने तिच्याकडे रोखून बघितले...
"चालवली असती तर आतापर्यंत पुन्हा ही हवेली खंडहर होऊन गेली असती चाची.." ती म्हणाली.
चाची क्षणभर गप्प बसली.
"का इतकी हिम्मत आहे त्याच्यात? का?"
"हिम्मत आहे चाची, पण भरोसाही आहे आणि वेडेपणाही!"
"मुमताज?"
"हो. त्याच्याबरोबर आता फक्त एकजण उभा आहे. तोही मुसलमान आहे. त्याच्याकडे बंदूक नाही, आणि त्याची नजर फक्त माझ्या खिडकीकडे आहे. याक्षणी कुणीही त्याच्यावर हमला करू शकत, त्याची त्याला फिकीर नाही..."
"काय आहे हा माणूस?" चाची उद्गारली!
"वेताळ!" मुमताजच्या तोंडातून उस्फुर्त उद्गार बाहेर पडले.
◆◆◆◆◆
"महाराज, बऱ्याच दिवसांनी... यावे... या..."
वाडा शांत झालेला होता, खुर्ची धगधगत होती...
"यावे मोक्षा, यावे! प्रगती आहे..." खुर्चीवरून आवाज आला.
"बाबा आशीर्वाद हवाय..."
"मी शाप देऊ शकतो, आशीर्वाद नाही."
"तुमचा शापही मी आशीर्वाद समजेन!"
"घे मग..." खुर्चीवरच्या माणसाचे डोळे आता आग ओकू लागले होते...
"मोक्षा, महाराजा... राज्य करा... तांडव करा... स्रीहत्यारी व्हा, गुरुहत्यारी व्हा, स्त्रीहत्यारी व्हा, भ्रातृ, पितृहत्यारी व्हा... मातृहत्यारी व्हा...
...आणि राज्य करा... जा..." तो ओरडला...
"हा शाप अभिमानाने मी भाळी मिरवेन. मोक्ष म्हणाला..."
आणि खाडकन त्याला जाग आली.
त्याचा चेहरा घामाने डबडबलेला होता...

सकाळी सूर्याची किरणे झोयाच्या चेहऱ्यावर पडली. तशी ती जागीच होती, पण आता उठून बसली, व तिने बेल दाबली...
"मी येऊ का?" बाहेरून आवाज आला.
"मोक्ष?" ती आश्चर्यचकीत झाली.
"अरे तू कसा, ये!"
मोक्ष ट्रे घेऊन आत आला.
"युवर स्पेशल ब्लॅक टी."
"थँक्स... पण तू..."
"केव्हाचा बाहेर थांबलो होतो. एकदा तर चहा पुन्हा गरम केला..."
"अरे आत येऊन मला उठवायचस."
"नोप. जर तू कॉम्प्रोमायझिंग पोजिशन मध्ये असतीस, तर उगाच..."
"पुरे... कळलं मला. बरं, तू घेतलास?"
"हा शेजारचा कप माझाच आहे."
"गुड. पण इतक्या सेवेचं प्रयोजन?"
"कारण इथला मुक्काम हलवण्याची वेळ आलीये झोया... थोडे दिवस. म्हटलं गुरूदक्षिणा द्यावी..."
झोया त्याच्याकडे बघतच राहिली.
"अग, काय झालं?"
"नाही रे, काही नाही... बरं, मग आता कुठे मुक्काम." ती गडबडून म्हणाली.
"वाड्यावर. पुन्हा एकदा..." तो म्हणाला.
"ऑल द बेस्ट! पण आता पळ बाहेर. मला चेंज करायचंय..." ती त्याला म्हणाली.
"ओके." तो बाहेर निघून गेला.
... आणि इतके क्षण थांबवून ठेवलेला एक चुकार अश्रू झोयाच्या गालावर ओघळला.

क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users