पुरून उरिन! ('माझ्या नेटक्या गोष्टी'तुन."

Submitted by सुरेशकुलकर्णी on 1 March, 2021 - 03:24

खंडूआण्णा म्हणजे बारा बोड्याचा माणूस. खप्पड गाल, चेहऱ्यावरचं मास झडून गेलेलं, त्यामुळे कोरड्या कवटीला जून कातडं घट्ट चिटकवल्या सारखा तो दिसायचा. अंधारात काय, उजेडात सुद्धा, नवखा माणूस घाबरून जायचा. वय जनरीतीला धरून, वर्षात मोजल तर पासष्ठीला एक वर्ष कमी, आणि त्याला विचारलं तर---! नका ना विचारू त्याला.
का?
पहा विचारून!
'किती असेल हो तुमचं वय?'
' कशाला? पोरगी लग्नाची आहे का? माझी तयारी आहे! तिला विचारून ये!'
म्हणाल नव्हतं नका विचारू म्हणून! हा कुठल्याच प्रश्नाला धड उत्तर देत नाही! अचकट विचकट बोलतो. घाणेरडी, पट्ट्या पट्ट्याची उंडरवेल घालून आपले, सुकलेले पाय गावभर मिरवतो! या अश्या वागण्याने, वय झालं तरी, त्याला कोणी मान देत नाही!आख्खी आळी या बाबाला कंटाळलेली आहे.
याची बायको, सुंदरी! साठी पार! खंडू सारखी ती तुसडी नाही. चार चौघात मिसळून रहाते. न राहून काय करते म्हणा? त्या शिवाय तिचा उद्देश, कसा सफल होणार? हिच्या जगण्याचा एकमेव उद्देश आहे, जमेल तेव्हडी खंड्याची नालस्ती करणे! ओळखीचा भेटलाच तर (कसा भेटणार? ओळखीचे लोक एव्हाना सुज्ञ झालेत!) ठीक, नसता अनोळखी माणसाची ओळख करून घेते. अन मग, हिची एमपी थ्री, नॉन स्टोपेबल एक्सप्रेस सुरु होते.
'अण्णा, तुम्ही माझ्या भावासारखे. म्हणून सांगते. घरच्या गोष्टी कुणाला सांगायच्या? आपल्याच घरच्यांना ना? या खंडुबा बरोबर लग्न केलं अन माझं मेलीच नशीबच फुटलं! कैक जवान पोर माग गोंडा घोळायची, अजूनही मागच्या आळीतला भुजंगा माझ्यावर टपून आहे! पाहिजेतर विचारा त्याला. पण माझ्या बापानं ह्यो मुडदा गळ्यात बांधला! या मेल्याला मी एके दिवशी जित्ता पुरीन! मेला कधी ज्वानीत प्रेमानं बोलला नाही अन आता म्हातारपणी सुद्धा बोलत नाही! कायम दारू पितो. आता दारू पियाला, मी काय नग म्हणते काय? आपण प्यावी, मला हि पाजावी! ते तर लांबच राहील, एकटाच बाहेर झोकून येतो! मीच का म्हणून, त्याची मिजाज चालवून घ्यायची? एकटीच पिते! आता तुम्हीच सांगा, किती म्हणून सोसायचं माणसानं? असल्या बहेख्याली माणसा बरोबर, मी म्हणूनच संसार केला! सकाळ पासून कुठं उलथालय कोणास ठाऊक? तुम्ही पाहिलात का त्याला?' ऐकणारा भांबावून जाणार नाही तर काय?
परमेश्वराला, असे छातीस नंबरी लोक हुड्कावून, गाठ मारायला, किती वेळ गुगल करत बसावे लागत असेल?तो, ते गुगलच जाणे.
तर,असे हे सडेतोड जोडपे. जेव्हा जेव्हा आमने सामने येतात, तेव्हा तर, कुठलेही सेन्सर बोर्ड, पास न करू शकणारे डायलॉग, फ्री टू एयर व्हायरल होतात! असो त्या नवरा - बायकोच्या भांडणात आपल्याला पडायचे नाही म्हणा.
काय म्हणता?
झलक एकायचीयय!
ठीक तर मग व्हा तयार! अर्थात तुमच्या रिस्कवर. मंजूर?
स्थळ: कुठलं हि घर (त्यांचं किंवा कुणाचंही, तुमचं सुद्धा चालेल!), घरच पाहिजे असे काही नाही!
काळ: वाईट!(तुमचा! कारण ते तुम्हाला, त्यांच्या भांडणात ओढणार! कोणाचीही बाजू घेतली तर, दुसरा तुमची xxx मारणार! कुणाचीच घेतली नाही तर दोघेमिळून!)
पात्र: तीन. ती दोघे अन तुम्ही!
चला तर सुरु करू! सुंदरी घरीच 'घेऊन' बसली आहे. तिला फक्त सिंगल माल्ट लागते! खंडुबा, स्वदेशी पुरस्कर्ते! देशी खंबा!(तुंबा, काय पन, चालतंय कि!) ऍक्शन!
खंडू - काय? तुमि इथं, काय करता?( तुम्हाला उद्देशून! जीभ जडवलेली, देहबोली डगमगती.)
तुम्ही- कुठं काय? मी सहज जात होतो. बाजारात निघालोय.
खंडू- झूट! आमच्या बायकोवर लाईन मारायला, माझ्या घरावरून चकरा मारताय! मी घरात नाही बघून!
तुम्ही- भलतंच! काय तोंडाला येईल ते बरळताय!
(सुंदरी घरातून अंगणात डुगडुगत येत. तुम्हाला उद्देशून. )
सुंदरी- आता तुमीच बगा! असला नवरा असलं तर काय करावं?
तुम्ही- काहीच बोलत नाहीत.
सुंदरी- अरे बोल कि, भाड्या! दातखीळ बसली का?(तुम्हाला उद्देशून.)
खंडू- कसलं बोलल बेन! मला बघून त्याची बोलती बंद झालियय! कसा आईनं टायमाला टपकलोय? तुमा दोघांच्या पिल्यानंचा धुव्वा केला, या गब्रून!
सुंदरी- तुमि काय धुव्वा करावं, आमचा डाव? ह्या हैच माझा यार! तुमच्या तोंडावर सांगते! तुमंचात काय दम राहिला नाही! तूमीआता खुड झालायस! मला माझं बगाव लागतंय! तुमच्या सारखा नवरा असून काय फायदा नाही!
(इतकी पिली असून सुंदरी चुकूनही आपल्या नवऱ्यास एकेरी संबोधत नाही, हे तुमच्या लक्षात आलेच असेल. यालाच म्हणतात संस्कार!)
खंडू- मायला, तुझ्या तर xxxx तुझा मुडदा पाडीन!(हात उगारून सुंदरी कडे जाण्याच्या नादात धडपडतो. संधी साधून तुम्ही दूर सरकता.)
सुंदरी - धड, दोन पायावर उभा रहाता येईना ,अन म्हन मुडदा पडतो! तुम्ही कसला माझा मुडदा पडता? मीच तुम्हाला पुरून उरिन!
खंडू- मला गाडणार! टवाळी कुठली! मला गाडलं, तरी मी कबर खोदून, वर येईन! तुला, तू, जित्ती हैस तोवर, झिंज्या पकडून छळिन!
दोघेही सुन्न झालेत. फुल टाईट! मग लुडकलेले!
तर हा एक नेहमीचाच, पण सौम्य करून सांगितलेला प्रवेश.
पण शेवट नेहमी असाच. मी तुम्हाला पुरून उरन,असं सुंदरी म्हणणार, आणि कबर खोदून बाहेर येऊन तुला छळिन, खंडू ढोस देणार.
पण खंडूआण्णाचं काही खरं नाही. जिंद भूत आहे. अवसपूनवेल काय काय करतो. दहीभात, लिंब, टाचण्या, काळ्या भावल्या, हा त्याचा खेळ चाललेला असतो. त्याला आडवं आलं कि लगेच 'मूठ मारिन! भानामती करीन! कपंडचोपड जाळून टाकील!' हि त्याची भाषा असते! तो मेला तर खरच भूत होऊन, कबर खोदून वर येणार! यात माझ्या सारखी बरेच जणांना शंकाच नाही.

आणि एक दिवस काय झाले माहित नाही. खंडू,आख्या गावाला आनंदी करून गेला! झोपेतच मरून गेला.
आख्या आळीने उस्फुर्तपणे वर्गणी करून खंडूच्या कलेवरची, फुलात सजवलेल्या आसनावर बसवून मसणवट्यापर्यंत दणका मिरवणूक काढली!
सुंदरा शब्दाला जगली. खरच ती खंडूला पुरून उरली होती!
सगळं कार्यभाग उरकून अंतयात्रेची, नाचून दमलेली मंडळी आपापल्या घरी चिडीचूप पडली.
सुंदरी मात्र, जवळच्या बार मध्ये जाऊन आपले स्वातंत्र्य सेलिब्रेट करत होती. हि बातमी भुजंगाला लागली तसे तो हि बार मध्ये पोहंचला. पाहतो तर काय?
हि बया, रट्टाऊन पीत होती, नाचत होती! तो तिच्या जवळ गेला.
"अग, सुंदर काय करती आहेस? नवरा मरून चोवीस तासहि झालेले नाहीत अन तू हे तुफानी सेलिब्रेशन करती आहेस? तुझं मनाचं काही नाही पण जनाची तरी लाज बाळग!"
"भुजंग्या! मला शान्पण शिकवू नकोस! मला ते नाटकी वागणं जमत नाही! मला खुप्प आनंद झालाय अन मी तो माझ्या मर्जी प्रमाणे साजरा करणार!"
"तुला भीती नाही वाटत?"
"भीती? अन कशाची?"
"हेच. जर खरच खंडू, कबर खोदून वर आला आणि तुझ्या झिंज्या पकडून मारू लागला तर? त्याने तशी कित्येकदा तुला धमकी दिलेली आख्या गल्लीने ऐकली आहे."
" भजंग्या! मी त्याचा बंदोबस्त करून टाकलाय! खोदु दे कितीही दिवस. तो काही बाहेर येऊ शकणार नाही!"
"खोदूनही त्याला बाहेर येता येणार नाही? हे कस काय? म्हणजे तू नेमक केलंस तरी काय?"
"सिम्पल! मी त्याला पालथा पुरलाय! तो जसा खोदत जाईल तसा पाताळा कडे जाईल ना! वर कसा येईल?"
भुजंगा सुंदरीकडे थोबाड वासून पहातच राहिला.
बायका या अशाच असतात!

सु र कुलकर्णी. आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय. पुन्हा भेटूच, Bye.
(मूळ कल्पना नेट वरून.)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा हा हा....

मस्त लिहीलंय. मजा आली वाचून...