प्रेमा तुझा रंग कसा ?

Submitted by Kavita Datar on 17 February, 2021 - 03:01
हिरवाईने सजलेल्या एकांत जागी ती आणि संजय हातात हात घेऊन, एकमेकांच्या नजरेत हरवून बसले होते. अवखळ वाऱ्याने तिच्या कपाळावर आलेली केसांची बट त्याने त्याच्या बोटांनी मागे सारली, तिचा चेहरा हाताच्या ओंजळीत धरला आणि तिच्या कपाळाचे हलकेच चुंबन घेतले. त्याचे ओठ तिच्या डोळ्यांवर, गालांवर टेकत तिच्या ओठांपाशी आले....तेव्हढ्यात तिने आपला हात त्याच्या ओठांवर ठेवत त्याला थोपवले आणि मान हलवत खुदकन हसली.

टाळ्यांच्या कडकडाटात मृणालीने स्टेजवर जाऊन पुरस्कार स्वीकारला. स्टेजवरून खाली उतरताना तिचे लक्ष पहिल्या रांगेत बसलेल्या संजयकडे गेले. त्याने तिच्याकडे हसून पाहून, कौतुकाने अंगठा वर करून तिचे अभिनंदन केले.

मृणाली, शहरातील विद्यापीठात एम एस्सी च्या दुसऱ्या वर्षाला शिकणारी, सुंदर, हुशार मुलगी. गोरीपान, उंच, टपोऱ्या भावदर्शी डोळ्यांची, लांब केसांची मृणाली पाहताक्षणी कोणाच्याही मनात भरणारी. तिच्या वर्गातली आणि विद्यापीठातली बरीच मुलं तिच्या सौंदर्य आणि विद्वत्ते मुळे तिच्यावर जीव ओवाळून टाकायला तयार होते. मृणाली चे मन मात्र संजयने, तिच्या संजय सरांनी काबीज केलं होतं.

संजय गेल्यावर्षीच विद्यापीठात लेक्चरर म्हणून रुजू झाला होता. अध्यापनाची प्रचंड आवड असल्याने, कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी मध्ये एमटेक झाल्यावर, चालून आलेली भारी नोकरी नाकारून, या छोट्या शहरातील विद्यापीठात तो रमला होता.

विद्यापीठाच्या हिरव्यागार, रमणीय परिसरात संजयला रहायला क्वार्टर मिळालं होतं. नोकरीचा नऊ ते पाच हा वेळ संपल्यावर, विद्यापीठातील सांस्कृतिक कार्यक्रमात नाटकं बसवण्याच्या आवडत्या कामात त्याचा वेळ मजेत जात होता. महिनाभरापूर्वी त्याने दिग्दर्शित केलेल्या, शाकुंतल या महाकवी कालिदास लिखित मूळ संस्कृत नाटकाचा, मराठी अनुवादाचा प्रयोग, विद्यापीठाच्या संस्कृतीक सप्ताहात चांगलाच गाजला. या नाटकात शकुंतलेची भूमिका मृणालीने तन्मयतेने निभावली होती. मृणाली अक्षरशः भूमिका जगली होती.

नाटकाच्या सरावाच्या निमित्ताने मृणाली संजयच्या सहवासात आली. सावळा, उंच, प्रसन्न चेहऱ्याच्या संजय कडे मृणाली आकर्षित झाली. वर्गात एकाग्रतेने डेटा सायन्स शिकवणाऱ्या संजयला तेवढ्याच तन्मयतेने नाटकाचे दिग्दर्शन करताना, सीन समजावून सांगताना पाहिलं की, मृणाली ला कौतुकमिश्रित आश्चर्य वाटायचं. तिच्या मनात यायचं, एव्हढं उमदे व्यक्तिमत्व, उच्चशिक्षण, हुशारी असून देखील हा माणूस किती साधा, सरळ आणि शांत आहे... नाहीतर तिच्यासोबत शिकणारी काही मुलं....फारसे काही गुण नसताना, बापाच्या पैशावर महागड्या बाईक्स फिरवणारी, मुलींच्या अवतीभवती गोंडा घोळणारी....

रोज कॉलेजमध्ये आल्यापासून मृणाली संजयची एक झलक पाहण्यासाठी आतुर असायची. तिच्या वर्गावर त्याचे लेक्चर असायचे, तेव्हा ती एकटक त्याला शिकवताना बघत रहायची. त्याचे लेक्चर संपूच नाही असं तिला वाटत रहायचं. नाटकाच्या सरावाच्या वेळी तर शकुंतलेचे संवाद बोलताना समोर दुष्यंत बनलेल्या मुला ऐवजी तिला संजय दिसायचा. त्यामुळे आपसूकच तिची भूमिका जिवंत व्हायची.

सराव संपून प्रयोगाचा दिवस आला, तेव्हा तर तिला आता संजय सरांचा सहवास जास्त लाभणार नाही, म्हणून फार हुरहुर वाटली. आज उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार घेताना पुरस्कार मिळाल्याच्या आनंदापेक्षा संजय सरांच्या कौतुकाने तिचे रोम रोम शहारले.

डायनिंग टेबलवर तिच्या आई-बाबांसोबत जेवायला बसलेली मृणाली, कसल्यातरी विचारात हरवलेली पाहून आईने तिला विचारले,
"काय गं ! कसला विचार करतेस ?आज बक्षिसानेच पोट भरलय का ? जेवणात लक्ष नाहीये तुझं..."
"तसं नाहीये ग आई ! आज फारशी भूकच नाहीये..."
"वसुधा ! तू शकुंतलेच्या काळात बनवले जाणारे पदार्थ तिला करून घालायला हवे होते. मग ती नक्कीच जेवली असती."
मृणाली चे बाबा हसून म्हणाले.
"काय हो बाबा !!!"
लटक्या रागाने त्यांच्याकडे पहात मृणाली बोलली.
"काहीतरीच तुमचं... प्रत्येक गोष्टीत चेष्टा सुचते तुम्हाला..." खुर्चीतून उठून टेबल आवरत मृणालीची आई म्हणाली.

वर्गात येऊन मृणाली तिच्या नेहमीच्या जागेवर, मेघा जवळ येऊन बसली. पहिलं लेक्चर संजय सरांचं होतं. संजयने वर्गात येऊन शिकवायला सुरुवात केली. मृणाली त्याच्याकडे एकटक पहात त्याच्यासोबतच्या दिवास्वप्नात हरवली.

हिरवाईने सजलेल्या एकांत जागी ती आणि संजय हातात हात घेऊन, एकमेकांच्या नजरेत हरवून बसले होते. अवखळ वाऱ्याने तिच्या कपाळावर आलेली केसांची बट त्याने त्याच्या बोटांनी मागे सारली, तिचा चेहरा हाताच्या ओंजळीत धरला आणि तिच्या कपाळाचे हलकेच चुंबन घेतले. त्याचे ओठ तिच्या डोळ्यांवर, गालांवर टेकत तिच्या ओठांपाशी आले....तेव्हढ्यात तिने आपला हात त्याच्या ओठांवर ठेवत त्याला थोपवले आणि मान हलवत खुदकन हसली.

संजय चे लक्ष तिच्याकडे गेले. त्याने शिकवलेल्या टॉपिक वर तिला प्रश्न विचारला. तिचे लक्षच नव्हते. तिने ऐकले नसावे असे वाटून त्याने पुन्हा प्रश्‍न रिपीट केला. मृणाली जवळ बसलेल्या मेघाने तिला हलवले आणि उभं राहण्याची खूण केली. ती स्वप्नातून जागी होत भानावर आली आणि जागेवर उभी राहिली. या सर्व प्रकाराने वर्गात खसखस पिकली. मृणाली वरमली. संजयने विचारले,
"कुठे लक्ष आहे मृणाली तुमचे ? मी शिकवलेले समजले नाही का ?"
"समजले सर...पण... पण आज डोकं दुखतंय म्हणून..."
"ठीक आहे. Sit down...Be attentive from next time..."
"Sorry Sir.."

वर्गातील प्रसंगाने मृणाली चे मन खट्टू झाले. पुढचे लेक्चर अटेंड न करता मेघा, मृणाली ला घेऊन तिच्या हॉस्टेल रूमवर आली.

"काय चाललंय हे तुझं मृणू ? मी खूप दिवसांपासून बघतेय, त्या संजय सरांबद्दल तू फारच सिरीयस झालेली दिसतेस ?? अगं अभ्यासातलं लक्ष उडालय तुझं..."
"काय करू ग मेघा ? मी त्यांच्या प्रेमात पूर्ण बुडालेय...मला दुसरं काही सुचतच नाहीये..."
"अगं पण त्यांच्या बाजूने असं काही असावं असं वाटतंय का तुला?"
"नाही माहित गं..."
"माहीत नाही ? मग कशाला स्वतःच्या मनाशी खेळतेहेस ?? त्यांच्या मनात असं काही नसलं तर तुला किती वाईट वाटेल ???"
"नको ग असं बोलूस... मी त्यांच्या शिवाय जगू शकणार नाही..."
"वेडी आहेस का ? अगं ते आपल्याला शिकवतात. सर आहेत ते आपले..."
मेघाने मृणालीला समजावण्याचा हरतऱ्हेने प्रयत्न केला. पण मृणाली काही ऐकायच्या मनस्थितीत नव्हती.

दिवसेंदिवस मृणाली संजय वरच्या प्रेमात आकंठ बुडत गेली. तिला जिथं तिथं संजय दिसायचा. एक तर ती संजय सोबतच्या दिवास्वप्नात रमायची किंवा त्याच्या मनात आपल्या बद्दल प्रेम नसलं तर ? आपलं काय होईल ?? आपण कसं जगायचं ??? याचा विचार करत रहायची. तिचं अभ्यासातलं लक्ष पूरतं उडालं. सेमिस्टर एक्झाम जवळ येत होती. पण तिचा अभ्यासाचा मूड काही होत नव्हता. मृणाली च्या आईच्या, वसुधाच्या चाणाक्ष नजरेतून तिची ही अवस्था लपली नाही.

वसुधाने मृणाली ला विश्वासात घेऊन बोलतं केलं.
"मृणू ! काय झालं बाळा ? तू आजकाल कुठेतरी हरवलेली, गप्प-गप्प असतेस ??"
"काहीच नाही ग आई..."
मृणालीने आईला टाळण्याचा प्रयत्न केला.
"हे बघ... माझ्याशी मोकळेपणाने बोल. काहीही लपवून ठेवू नकोस. प्रेमात वगैरे पडली आहेस का?"
वसुधाने असं विचारताच मृणाली तिच्या कुशीत शिरून हमसून हमसून रडू लागली. तिच्या पाठीवरून मायेने हात फिरवत वसुधा तिचे रडणे ओसरण्याची वाट पाहू लागली.

वसुधा चे तिच्या एकुलत्या मुलीशी मैत्रिणी सारखे नाते होते. आईपासून काहीही लपवायचे नाही, असा विचार करून मृणाली ने वसुधाला संजय सरांबद्दल आणि तिला त्यांच्याबद्दल वाटणाऱ्या विलक्षण प्रेमाबद्दल सगळं काही सांगितलं.
"मृणाली ! तरुण वयात कोणाबद्दल मनात प्रेमाची भावना निर्माण होणं, यात गैर काहीच नाही. पण त्या भावनेच्या भरात किती वाहवत जायचं ? स्वतःला किती त्रास करून घ्यायचा ? याला मर्यादा नक्कीच असाव्यात. तुझ्या मनात संजय सरांबद्दल ज्या भावना आहेत, त्याच भावना त्यांच्या मनात तुझ्याबद्दल आहेत का ? याचा तू अंदाज घ्यायला हवा होता. अजूनही वेळ गेलेली नाहीये...त्यांच्याशी बोल. त्यांना विचार.. त्यांच्या मनाचा अंदाज घे... तू प्रस्ताव ठेवल्यावर कदाचित ते तुझा विचार करतील किंवा नाही. जे होईल त्याला धीराने सामोरं जा. कोणाबद्दल वाटणारे प्रेम हे जगण्या-मरण्याचा प्रश्‍न होऊ शकत नाही. आणि मुख्य म्हणजे अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नकोस."
"खू...प मोकळं वाटतंय आई तुझ्याशी बोलून... लवकरच मी त्यांच्यापर्यंत माझ्या भावना पोचवेन. ते काय म्हणतात ते बघू. पण मला तुझं म्हणणं पटलं. त्यांचे उत्तर काहीही असले तरी, मी धीराने त्याला सामोरं जाईन."

दोनच दिवसांनंतर मृणाली ला तशी संधी मिळाली. लेक्चर संपल्यावर संजयच्या मागोमाग मृणाली वर्गाबाहेर पडली.
"एक्सक्युज मी सर..."
"येस... बोला मृणाली... काही डिफिकल्टी आहे का ?"
"नाही सर... मला तुमच्याशी थोडं बोलायचंय..."
"बोला ना..."
"इथं नाही सर..."
"थोडं कॉन्फिडेंशीयल आहे... आपण कुठे भेटू शकतो का ?" "तुम्हाला चालणार असेल तर, कॉलेज सुटल्यानंतर तुम्ही माझ्या घरी येऊ शकता. क्वार्टर नंबर 26... ठीक साडेपाच वाजता.. ओके ?"
"ओके सर..."

विद्यापीठाच्या कॅम्पस मध्ये असलेल्या संजयच्या क्वार्टरची डोअरबेल दाबताना मृणाली च्या हृदयाची धडधड प्रचंड वाढली. संजयने दार उघडून मृणालीचे स्वागत केले. आत येऊन बैठकीतल्या सोफ्यावर अवघडून बसलेल्या, हाताची अस्वस्थ हालचाल करणाऱ्या मृणाली समोर पाण्याचा ग्लास धरत संजय म्हणाला,
"रिलॅक्स मृणाली... कॉफी घेणार का ? मग तुम्हाला जे बोलायचेय ते निसंकोचपणे बोला..."
"नको सर... कॉफी वगैरे काही नको.."
"ओके... पुन्हा कधीतरी.."
"सर...सर...मला तुम्ही खूप आवडता... आय ऍम badly इन लव्ह विथ यू..."
धीर करून मृणाली बोलली. तिच्या बोलण्याने संजय अवाक झाला.
"तुम्ही विचार कराल, ही मुलगी किती निर्लज्ज आहे... पण... पण... गेल्या काही महिन्यांपासून ची ही घुसमट मला आता सहन होत नाहीये... म्हणून तुम्हाला हे सांगायचं ठरवलं. तुमचे उत्तर काहीही असले तरी मला मान्य आहे."
"मला माहितीये... लेक्चर चालू असताना तुझं माझ्याकडे एकटक बघणं... गर्दीत मला शोधत असणारी तुझी आतुर नजर...मला माहितीये, तुझं माझ्यावर प्रेम आहे... आणि... आणि... मलाही तू खूप आवडतेस...मृणाली"
"खरंच ???"
अत्यानंदाने मृणालीचे डोळे भरून आले. आपण स्वप्नात तर नाही ? असं तिला क्षणभर वाटलं. तिचे भरून आलेले भावदर्शी डोळे तिच्या थोपवण्याच्या प्रयत्नाला न जुमानता अविरत पाझरू लागले. संजय जागेवरून उठून तिच्या जवळ येऊन बसला. तिचे डोळे पुसत त्याने तिला जवळ घेतले.
"सर...मला का नाही कधी बोललात?"
"सर नाही...संजय... तुझा संजय... तुला कसं प्रपोज करावं याच विचारात होतो तो प्रश्न तूच सोडवलास."
संजयने हसून तिचा चेहरा दोन्हीं हातात घेऊन तिच्या डोळ्यांत बघत म्हटले. ती ही त्याच्या नजरेत हरवली.
"मी या विकेंडला घरी जाऊन येतो..."
"का ?"
"का म्हणजे ? आई-बाबा खूप दिवसांपासून लग्न कर म्हणून मागे लागले आहेत. त्यांना सांगायचय मी मुलगी शोधली म्हणून..."
मृणाली गोड लाजली.
"चल तुला घरी सोडतो... तुझ्या आई-बाबांनाही भेटायचंय."

मृणाली संजय च्या मागे बाईकवर बसली. आकाश नारंगी रंगाने भरुन गेलं होतं. संधिप्रकाश पसरला होता. पक्ष्यांच्या जोड्या घरट्याकडे परतत होत्या. ही जोडी मात्र घरटे वसवण्याच्या विचारात मजेत विहरत निघाली होती.

***********************************************

©कविता दातार

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults