प्रिया...

Submitted by अज्ञातवासी on 13 February, 2021 - 09:33

"तुझे डोळे खूप सुंदर आहेत."
"आय नो!" ती हसली.
"आणि तुसुद्धा..."
"येस हेही मला माहितीये."
"मग नवीन काय सांगू आज?" तो शांतपणे म्हणाला.
"काहीही"
"तुला रिलेशनशिपमध्ये असणं जरुरी आहे?"
"पाच वर्षे झालीत रे आता. त्याच्याशिवाय नाही जाऊ शकत दुसरीकडे."
"कळतंय पण वळत नाही असं झालंय माझं.
आणि मलाही कळतंय, तुझं माझ्यावर प्रेम आहे, पण मलाही एक चांगला मित्र सोडवत नाही."
"कधीकधी वैताग येतो ग, फक्त मित्र बनून राहण्याचा. असं वाटत, माझ्यातच काही कमी आहे."
"नाही वेड्या. उलट, कुठलीही मुलगी तुझ्यावर जीव तोडून प्रेम करेन."
"पण तू नाही करू शकत ना..."
"आपल्याला भेटूनच किती दिवस झालेत रे. पाच दिवसाच्या ओळखीसाठी पाच वर्षाचं नातं नाही तोडता येत."
"हम्म. चल जाऊदे."
पुन्हा एकदा शांतता पसरली.
"संध्याकाळी येणार आहेस ना?"
"जमलं तर येईन."
"नक्की ये. वाट बघेन." तो उठला...
"एक सांगू?"
"बोल ना."
"तू माझ्यासाठी जगातला सर्वात चांगला कलाकार आहेस, पण..."
"माझं नाव प्रिया असलं तरीही मी एकावेळी एकाचीच प्रिया होऊ शकते..."
तो हसला आणि निघून गेला.
ती बराच वेळ शांत बसून राहिली.
थोड्यावेळाने तिचा फोन वाजला...
"प्रिया, काय करतेय?"
रोहनचा फोन.
"अरे बसलीये, आपल्या नेहमीच्या कॉफी शॉपमध्ये."
"एकटीच ना?" त्याचा आवाज थोडा बदलला.
"हो..."
"गुड. म्हटलं माझी प्रिया मला सोडून कुणाबरोबर बसलीये." तो हसत म्हणाला.
तीसुद्धा हसली.
"प्रिया, मी खूप लकी आहे ग. खूप. पाच वर्षांपासून तू फक्त आणि फक्त माझी आहेस. इतकी कमीटमेंट आजकालच्या जगात नाही मिळत."
तिला काय बोलावं तेच सुचेना.
"सॉरी, मी लांब राहतोय, पण लवकरच येईन जवळ."
"रोहन, आता भेट ना माझ्या आईबाबांना." ती अगतिक होऊन म्हणाली.
"थोडे दिवस ग, येतोच."
"अरे पाच वर्षे झालीत आता."
"थोडे दिवस प्रिया. मी येईन, ओके?"
"हम्मम." ती शांतपणे म्हणाली.
"चल बाय. बोलूयात नंतर. लव यु." त्याने फोन कट केला.
ती शांतपणे बसून राहिली, आणि निघाली...
"वेट!"
मागून आवाज आला.
"येस?" तिने प्रश्नार्थक चेहरा केला.
"तुझ्या हातातलं पुस्तक बघू?" त्या व्यक्तीने तिला विचारले.
"हो..." तिने ते पुस्तक त्याच्याकडे दिले.
त्याने पुस्तकावर सही केली.
ती आश्चर्याने त्याच्याकडे बघतच राहिली.
"मीच हे पुस्तक लिहिलंय. मायसेल्फ प्रेमकुमार..."
"तुम्ही... आय मिन सॉरी, पण... थँक्स... म्हणजे..."
"हो. या शहरात मला हीच जागा आवडते लिहायला."
"मला तुमची पुस्तके खूप आवडतात. त्यातल्या स्त्रियांचा कणखरपणा, धडाडीचे निर्णय..."
तो हसला.
"बसशील थोड्यावेळ?"
"हो."
"तुझं बोलणं ऐकतोय केव्हाच. आणि तुझ्या टेबलावर ठेवलेलं पुस्तक बघूनच वाटलं तुझ्याशी बोलावं."
"मी खूप वेडी आहे." ती हसली.
"नाही, खूप चांगली आहेस. एकनिष्ठता हा गुण आजकाल रेअर झालाय. मेबी, इट विल लीड टू पतिव्रता गुण अल्सो." तो हसला.
तीही हसली.
"माझ्या कथेतल्या स्त्रिया कधीही धडाडीने निर्णय घेत नाहीत. मात्र त्या सुवर्णमध्य शोधतात.
लग्न ठरलेली, पण आयुष्यात कधीही गावाची वेस न ओलांडलेली नैना, मुंबईत येते, लग्न ठरलेलं असूनही प्रेमात पडते. सगळा विचार करून, आनंदी होते, आणि आयुष्याचं सार घेऊन सुखाने लग्नाला उभी राहते.
कावेरीचं बघ. लग्नाआधी जरी माझा कुणा पुरुषाशी संबंध आला असला, तरी मी व्यभिचारी नाही, असं ठणकावून सांगते.
ती शांत झाली.
एकनिष्ठता हा गुण आहे, पण रिलेशनशिपमध्ये असताना दुसरं कुणी आवडणं, किंवा त्याच्यावर मन बसणं, ही मानवी मनाची गुंतागुंत.
यावर कुणी कुणाला व्यभिचारी ठरवू नये. आणि या सो कॉल्ड एकनिष्ठतेवरच जर संपूर्ण नातं अवलंबून असेल ना...
...तर इतर गुणांची गरजच नाही...
समजलं?"
"हो," ती हसली.
"मनाचं ऐक... आणि, ऐकत राहा." तो म्हणाला आणि तिथून निघून गेला.
ती त्याच्याकडे बघतच राहिली.
◆◆◆◆◆
संध्याकाळी त्या हॉलमध्ये गर्दी असूनही शांतता होती.
तो समोरच उभा होता. तिला बघून त्याच्या चेहऱ्यावर एक हलकसं स्मित उमटलं.
ती त्याच्यासमोरच्या टेबलावर बसली...
'ऐसी लागी लगन...
लागी लागी रे लगन, लागी लागी रे लगन...'
त्याने सूर पकडला, आणि त्याक्षणी तिच्या अंगावर रोमांच उठले...
'ऐसी लागी लगन, मीरा हो गई मगन...'
वाह... अनेक उस्फुर्त उद्गार निघाले.
तीही त्या गीतात कितीतरी वेळ गुंतून गेली...
भानावर आली टाळ्यांच्या कडकडाटानेच!!!
गाणं संपलं, बरेच लोक त्याचं अभिनंदन करत होते.
तो बॅकस्टेज त्याच्या रूममध्ये गेला.
"खूप छान गायलास."
ती तिथेच उभी होती.
"थँक्स फॉर कमिंग," तो म्हणाला.
"मी रडले नाही, नशीब समज." ती हसून म्हणाली.
तो फक्त हसला.
"वेडी आहे रे मी, तुझ्या गाण्यासाठी. पण नाही सोडू शकत मी त्याला."
"आय नो प्रिया."
"थोडे दिवस मला चोरशील प्लिज?" ती निर्धाराने म्हणाली.
"काय?" तो आश्चर्याने म्हणाला.
"हो, थोडे दिवस मला चोर त्याच्यापासून. मला तुझ्यासोबत ठेव. फक्त गुंतून पडू नकोस
कारण मी त्याच्याकडेच जाईन परत... आहे कबूल? थोडे दिवस मलाही या नात्याचा आनंद घेऊ दे...
...आणि शेवटही आनंदाने करू दे."
तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.
त्याने फक्त दोन्ही हात मोकळे केले...
आणि ती त्याच्या मिठीत स्थिरावली...

समाप्त

Group content visibility: 
Public - accessible to all site users