अतिलघुकथा: "हळदीकुंकू"

Submitted by shriramb on 31 January, 2021 - 12:07

मधल्या सुट्टीची घंटा वाजली आणि मुलं एकच कल्ला करत धावत वर्गातून बाहेर पडली. पहिलीच्या वर्गशिक्षिका असलेल्या महाजन बाईंनी पिशवीतून आपला डबा बाहेर काढला. त्या खाऊ लागणार इतक्यात एक मुलगा त्यांच्याजवळ काही तरी काम असल्यासारखा घुटमळत आला.
"काय हवंय रे?"
"काही नाही बाई.. तुम्हाला आज संध्याकाळी आमच्या घरी बोलावलंय हळदीकुंकवासाठी"
"तुझ्या आईनं सांगितलंय का तसं?"
"नाही.. मीच ठरवलं तुम्हाला बोलवायचं"
"बरं बरं.. पाहीन मी" बाई कौतुकानं हसत म्हणाल्या.

एरवी घरी हळदीकुंकू असलं की बाहेर धूम ठोकणारा तो त्या दिवशी मात्र घरीच थांबला. दर पाच मिनिटांनी बाहेर जाऊन बाईंची वाट पहात राहिला. सगळ्या बायका येऊन गेल्या, रात्रीचे साडेआठ वाजले, तरी बाई आल्या नाहीत, तसा तो अगदी हिरमुसून गेला. त्याचं काहीतरी बिनसलंय ते कळलं त्याच्या आईला.
"काय झालं रे?"
"मी आमच्या बाईंना पण बोलावलं होतं गं हळदिकुंकवाला.. आल्याच नाहीत बघ."
"अर्रे! कुठल्या बाईंना बोलावलं होतंस?"
"महाजन बाई. आमच्या वर्गशिक्षिका."
"अरे.. त्या कशा येतील? हळदिकुंकवाला फक्त सवाष्णी येतात."
"म्हंजे?"
"कळेल तुला मोठा झाल्यावर. चल आता जेवायला."

दुसऱ्या दिवशी बाईंना विचारायचं असं त्यानं ठरवलं खरं, पण शाळेत गेला तर बाई होत्या रजेवर. नंतर तो विचारायचं विसरूनच गेला!

Group content visibility: 
Use group defaults

निशब्द!
कदाचित लहानपणी निरागसता अज्ञानातून येत असावी.

हळदीकुंकू वगैरे विधवांना वगळणारे आणि फक्त लग्न झालय म्हणुन स्त्रियांना ग्रेट वागणूक देणारे समारंभ बकवास आहेत.

आवडली !

हळदीकुंकूच कश्याला एकूण एक धार्मिक समारंभात हेच असते. सवाष्ण बायकांचीच ओटी भरा कार्यक्रम असतो. लग्नसमारंभात नजर लागू नये म्हणून विधवांना दूरच ठेवतात. सत्यनारायण वा कुठल्याही पूजेला नवरा बायको जोडीनेच बसायचे असते. घरी असेही पाहुणे आले की निघताना विवाहीत बायकांनाच हळदी कुंकू लावायची पद्धत आहे. कुठून आली देवास ठाऊक. मुळात ते हळदी कुंकू मंगळसूत्र हिरव्या बांगड्या वगैरे सौभाग्याची लक्षणे हवीतच कश्याला समजत नाही..
पण कित्येक बायकांनाही याचे कौतुक असते म्हणा. मंगळसूत्रापासून बांगड्या पाटल्या नथ वगैरे सोन्याचे दागिने मिरवायचेही असतात. त्यामुळे या प्रथापरंपरा चालूही राहणारच..

चांगली लिहीली आहे.
हल्ली बर्‍याच जणी सर्व महिलांना सरसकट "चैत्रगौरीच्या दर्शनाला या" किंवा "वाण घ्यायला या" असे बोलावतात. सवाष्णच बोलवायची असे नसते, गौरीच्या निमित्ताने यजमानीण-पाहुणी यांची भेट होते, हितगूज होते हे महत्त्वाचे. प्रगती आहे; हे बदल स्वागतार्ह आहेत. पत्नी नसेल तरी पुरूषाला कडोसरीस सुपारी लावून सर्व धर्मकृत्ये करायची मुभा आहे. मग काळानुसार आता कुठल्याही स्त्रीला हळदी कुंकू, देवदर्शन इ मुभा असावी.

सीमंतिनी +111
मलाही 'चैत्र' सिनेमा आठवला.

पत्नी नसेल तरी पुरूषाला कडोसरीस सुपारी लावून सर्व धर्मकृत्ये करायची मुभा आहे. >>>>हे एकदा आजीकडून ऐकून "मग बाईने शेजारच्या पाटावर नारळ ठेवून शुभकार्य केलं तर चालेल ना?" असं मी लहानपणी विचारलं होतं. नशीब माझं, आजी खूप समजूतदार आणि त्या काळच्या मानाने पुढारलेल्या विचारांची होती म्हणून रट्टा नाही बसला पाठीत.
"बाबी गो, आमचं जगणं संपत आलं, पण तुम्ही शिकून मोठ्या व्हा, मग ठरवा काय ते" असं म्हणून विषय संपला.

"बाबी गो, आमचं जगणं संपत आलं, पण तुम्ही शिकून मोठ्या व्हा, मग ठरवा काय ते" >>> स्तुत्य दृष्टिकोन, आम्ही गेलो तरी तुम्ही असंच वागून परंपरा(?) सुरू ठेवली पाहिजे या दृष्टिकोनापेक्षा.

"बाबी गो, आमचं जगणं संपत आलं, पण तुम्ही शिकून मोठ्या व्हा, मग ठरवा काय ते" >>> Happy मग काय ठरवलं? सर्व स्त्रियांना हळदी-कुंकवाला बोलावण्याचा योग आला की अजून नाही? Happy फार आवडली तुझी आजी. त्यांना नमस्कार!

मग काय ठरवलं? सर्व स्त्रियांना हळदी-कुंकवाला बोलावण्याचा योग आला की अजून नाही? >>>
आला ना. चुलत साबा-साबु भारतात नसतील त्यावर्षी गौरी गणपती नैवेद्य आमच्या घरी असतो. दोन वर्षांपूर्वी त्या हळदीकुंकवाला सगळ्यांना बोलावलं होतं. शिवाय त्यातल्या एक काकू नातवाच्या बोरन्हाणाला औक्षणासाठी पुढे येईनात, त्यांना प्रेमाने सांगून त्यांच्या सूनबाई आणि मी असं दोघींनी औक्षणाचं तबक देऊन बाळाला ओवाळायला लावलं.
आमच्या कामवाल्या मावशी नवरा गेल्यावर गळ्यात मंगळसूत्र घालत पण ते सुरक्षित वाटावं म्हणून. त्यांना सुद्धा संक्रांतीच्या दिवशी वाण दिलं. मी काही फार मोठे तीर मारत नाहिये, पण कुठेतरी हे बदलावं यासाठी प्रयत्न असतो इतकंच.

वाह! हे मोठे तीर आहेत Happy कारण ही बदलाची सुरूवात आहे. सुरूवात अवघडच असते. समोर कुणी बोलले नसेल पण मागे कुजबूज होतेच. ते सगळ दुर्लक्ष करून आपल्याला जे शक्य आहे ते करत राहणे याला धैर्य लागते. इथे लिहील्याबद्दल धन्यवाद. त्याने अजून चार लोकांना चार नव्या कल्पना सुचतात.

छान लिहिलेय. मलाही चैत्र आठवली.
>>बाबी गो, आमचं जगणं संपत आलं, पण तुम्ही शिकून मोठ्या व्हा, मग ठरवा काय ते" >>> आजींचा दृष्टीकोन आवडला.
जवळच्या नात्यातल्या ४-५ लग्नांत आवश्यक ते सर्व विधी एकट्या स्त्रीने पार पाडले. ही लग्नं गेल्या २५ वर्षांच्या कालावधीतली. पहिल्या लग्नाच्या वेळी मुलीने मुलाकडच्यांना आधी कल्पना दिली, मुलाकडे त्यावर थोडी चर्चा होवून, त्यांच्याकडच्या जेष्ठांची समजूत घालून हे झाले. नंतरच्या लग्नात मुलाकडच्यांनी आधी कल्पना दिली आणि मुलीकडचे ठीक आहे म्हणाले. असेच एक लग्न मुलीकडच्यांनी सांगितले आणि मुलाकडचे ठीक म्हणून झाले. काही काळाने अजून एक लग्न, यात होणार्‍या सुनेने आधीच सांगितले की एकटे पालक म्हणून जबाबदारी निभावलेल्या सासूनेच सर्व केलेले मला आवडेल. अलिकडच्या काळात झालेल्या लग्नात वराच्या अगदी जवळच्या नात्यातील व्यक्ती घटस्फोटित स्त्री होती. यावेळी आधी सांगणे, चर्चा वगैरे काही झाले नाही. साखरपुडा, हळद वगैरे लग्नाआधीचे कार्यक्रम, लग्न विधी आणि नंतरचा गृहप्रवेश वगैरे सर्व कार्यक्रमात जवळच्या नात्यातील इतर स्त्रीयांसारखाच या मुलीचा सहभाग गृहित धरला गेला. हळू हळू का होईना बदल होतोय.

Under no circumstances a woman's existence is governed by whether there is a man attached to her In any capacity. This is all social conditioning supported by patriarchy. Neither is her sense of self.

मागच्या संक्रांतीला मी सोसायटीतल्या सगळ्या महिलांना हळदी कुंकवाला बोलावलं होतं.
त्यात काही विधवा स्त्रियांही होत्या.
त्यांनाही मी हळदी कुंकू दिलं.
ह्यात मी काही फार ग्रेट केलं असं अजिबातच नाही.
उलट असं जर सगळ्यांनीच वागायला सुरवात केली तर ज्याप्रमाणे विधवा स्त्रियांचे केशवपन, सती जाणे ई प्रथा बंद झाल्या
तश्या ह्याही होतील.

लोकहो, आय मीन महिलाओ, एवढेच करत आहात तर जरा अजून एक पाऊल पुढे टाकून पुरुषांनाही हळदीकुंकूला बोलवा..
मला लहानपणी आईसोबत हळदीकुंकूला जायला फार आवडायचे. तिथे तिळाचा लाडू मिळायचा. तो माझा जीव की प्राण. मग मी अजून एक मागायचो. लहान असल्याने मला एक मागितला की अजून दोन मिळायचे. मग घरी आलो की आईही आपल्या वाटणीचा द्यायची. असे दर घरटी किमान चार लाडू माझ्या पदरी पडायचे Happy
मोठा झालो आणि संपले हे सुख ... लहान असण्याची मजाच वेगळी, मी ते कुंकूही आवडीने लाऊन घ्यायचो Happy

<< एक पाऊल पुढे टाकून पुरुषांनाही हळदीकुंकूला बोलवा >>
लहानपणी पुरुषाचे किती कौतुक होते आणि मोठेपणी किती हाल होतात? असा धागा विणायचे पोटेनशियल आहे. जरूर विचार करावा.

ऋन्मेऽऽष, तूच कर की हळदीकुंकू आणि बोलव पुरूषांना, महिलांना. लहानपणीचे लाडू स्मरून प्रत्येक काकूला ८ लाडू दे. कशाला मागे राहतोस? बायका काय पुरूष कुंकू लावतो म्हणून मान वळवणार नाहीत. देवळात पुजारी लावतातच बायकांना टिळे, सवय असते बायांना त्याची. Happy

लहानपणी पुरुषाचे किती कौतुक होते आणि मोठेपणी किती हाल होतात? असा धागा विणायचे पोटेनशियल आहे. जरूर विचार करावा.>> झरूर, सुचवल्याबद्दल धन्यवाद Happy

@ सीमंतिनी,
मला तर आवडेल असे काही करायला, वःळवलीच एखाद्या बाईने मान तर काडीने कुंकू लावेन. पण मुळात मला ते एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन वगैरे करायला जमत नाही. कोणी केले आणि पुरुषांना बोलावलेच तर पहिली हजेरी मी लावेन, तसेही मला आवडते प्रवाहाविरुद्ध बागडायला Happy

बाकी हळदीकुंकू कार्यक्रमांमध्ये बायका मजाच करत असतील. प्रश्न आहे तो फक्त विधवा बायकांना स्थान न देणे वगैरे प्रथांचा. त्या बायकांनीच मोडीत घातल्या तर पुरुषांना काही मिरची लागायचा प्रश्न येऊ नये कारण या कार्यक्रमाशी पुरुषांचा तसा संबंध येत नाही.

प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद. इतकी चर्चा होईल असं वाटलं नव्हतं. Happy
खरं तर ही माझी स्वतःची आठवण आहे, सुमारे ३५ वर्षांपूर्वीची. शाळेच्या ग्रूपवर काही जुन्या आठवणी निघाल्या आणि त्यातून ही घटना आठवली. शतशब्दकथेत बसवायचा प्रयत्न केला, पण नाही जमलं.

सध्या "inclusion" ची खूप चर्चा सुरू असते. पण अशा छोट्या प्रसंगांतून कळत नकळत घडणारं exclusion कोणी फारसं विचारात घेत नाही. पण ज्याच्या बाबतीत ते घडतं, त्याला किंवा तिला ते खूप महत्वाचं असतं.

पण परिस्थिती हळूहळू सुधारते आहे. वर उल्लेख केलेले उपक्रम स्तुत्य आणि स्वागतार्ह आहेत!

आवडली. प्रतिसाद ही आवडले.
प्रज्ञा9, rucha- तुम्ही घेतलेल्या स्टेप आवडल्या. >>+1
मी स्वतः दोन्ही बाजू बघितल्यात. नवरा नसला (गेलेला किंवा सोडलेला) तरी आवर्जून हळदकुंकू, वाण घेणाऱ्या / बोलावणार्या आणि आवर्जून बोलावलं तरी न जाणाऱ्या.
यजमानांच्या घरातुन संध्याकाळच निघताना हळदीकुंकू लावायची पद्धत असते बरेच ठिकाणी , मला लावा तुम्ही म्हणलं तरी नको ,तुमचं तुम्ही लावून घ्या म्हणतात. अस्वस्थ होत तेव्हा की आपल्या आपल्यात पण का नाही बदलवत स्वतःला म्हणून.