मायबोलीकर युट्यूबर्स - नी मेक्स (नीधप)

Submitted by नीधप on 7 January, 2021 - 00:26
Mix media wall art by Nee

हल्लीच मी आणि अजून काही मायबोलीकरांनीही आपापले युट्यूब चॅनेल्स सुरू केलेत. त्याबद्दल मायबोलीवर सांगावे यास्तव हा धागाप्रपंच. मी माझ्या चॅनेलंबद्दल सांगेन. बाकीचे आपापल्या चॅनेलबद्दल सांगतील.

मी गेले नऊ वर्ष तांब्यापितळ्याच्या तारांपासून स्वतः डिझाईन करून दागिने व कलाकृती बनवते आहे. साडेपाच वर्षे झाली नी याच नावाने माझा छोटासा ब्रॅण्डही आहे तारांचे दागिने आणि इतर वस्तूंचा. काही मायबोलीकरांशी माझा इतर ठिकाणी संपर्क आहे त्यामुळे त्यांना माझ्या या सगळ्या उद्योगांबद्दल माहिती आहेच.

1 ऑक्टोबर 2020 ला माझ्या तेव्हा येऊ घातलेल्या कलेक्शनची स्केचेस बघून एका नुकतीच ओळख झालेल्या मित्राला प्रश्न पडला की 'हे सगळे अश्याच प्रकारचे मला कुठून मिळणार दागिन्यांच्यात गुंफायला? ' मग त्याला माझ्या तारेच्या भेंडोळ्यांचा फोटो पाठवून सांगितले की "बाबारे यातून हे सगळे चित्रविचित्र आकार मी हाताने बनवते." त्याचा विश्वास बसेना. मग त्याला दाखवायला म्हणून एक पेंडंट बनवण्याची पूर्ण प्रक्रिया शूट करून युट्यूबवर टाकली आणि अश्या तऱ्हेने माझ्या युट्यूब चॅनेलची सुरुवात झाली.
माझ्या आर्ट क्राफ्ट डिझाईनबद्दल सांगणारा माझा ब्लॉग आहे नी मेक्स नावाचा. म्हणून मग युट्यूब चॅनेलचे नावही तेच ठेवायचे ठरवले.
तर हा माझा युट्यूब चॅनेल
नी मेक्स

त्या मित्राला दाखवण्यासाठी बनवलेल्या व्हिडिओची ही लिंक
Intro and a pendent

त्यानंतर अजून दोन व्हिडीओज झाले ते चॅनेलच्या लिंकवर दिसतीलच.

दोनच दिवसांपूर्वी माझा चौथा व्हिडीओ युट्यूबवर टाकला आहे. इथे धाग्यात जी मिक्स मेडिया आर्टची इमेज आहे त्या आणि अजून एका झाडाबद्दल सांगणारा व्हिडीओ.
झाडांची गोष्ट

जरूर बघा आणि कसा वाटतोय हा नवीन उद्योग त्याबद्दल नक्की सांगा.

(ह्या धाग्याने कुठल्या नियमाचा भंग होत नसावा अशी आशा आहे.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभिनंदन ! Youtube वर सर्फिंग करताना तुमचा एक विडिओ बघितला होता. खूप छान समजावून सांगत होतात. नवीन उपक्रमासाठी अनेक शुभेच्छा !!!
मात्र मायबोलीवर तुमच्या कथा फार मिस करतोय.

अप्रतिम सर्वच, शुभेच्छा.

झाडांची गोष्ट तर फार गोड. आवाज ऐकत राहावा आणि बोटांची किमया थक्क होऊन बघत रहावी. नजाकतीने करतेस.

अभिनंदन आणि शुभेच्छा! ज्वेलरीचे आधी पाहिले होतेच, हा लेटेस्ट पीस आणि झाडांची गोष्ट व्हिडिओ तर फार सुंदर झालाय.

गोड दिसतंय झाड.या सर्व तार कामात प्रचंड मेहनत आणि नजाकत आहे(हा शब्द अनेक वर्षांनी वापरायला मिळाला.लहानपणी आमच्याकडे नजाकत मेहंदी डिझाईन नावाचं पुस्तक होतं तेव्हाच वापरला जायचा Happy )

मस्त व्हिडिओ, नी! आणि हे फोटोमधलं झाड तर फारच छान झालं आहे. अगदी नाजूक कलाकुसर.
धाग्याची आयडिया आवडली.

सुंदर आहेत एकेक डिझाईन्स नीधप. कष्ट आहेत बरेच.
तुझ्याकडून एक नेकलेस करून घेण्याची खूप ईच्छा आहे माझ्या सन साईन वरून.

नी चे सगळेच व्हिडिओज वेगळ्याच लेव्हलचे आहेत !
प्रत्येक व्हिडिओ ही एक कलात्मक शॉर्टफिल्म आहे Happy >>>>> काल जे काही व्हिडीओ पाहिले तेव्हा हेच वाटलं. आज उरलेले बघणार आहे.

तुमचे विडिओ पाहिले. छान आहेत.

एक असाच प्रश्ण पडला( मला आलेल्या अनुभवाने म्हणून),

तुम्ही आपली कला, व चित्रे चोरीपासून कशी सुरक्षित ठेवता? इतक्या मेहनतीने काढलेली चित्रे ईंटरनेट चोरी पासून कशी काय जपता... खास करून दागिन्यांचे डिसाईन अगदी वेगळे आहे...

तुम्हाला शुभेच्छा!

सगळ्यांचे खूप आभार. सुचनांचेही स्वागत आहे.

>> तुम्ही आपली कला, व चित्रे चोरीपासून कशी सुरक्षित ठेवता? इतक्या मेहनतीने काढलेली चित्रे ईंटरनेट चोरी पासून कशी काय जपता... <<<
नाही जपता येत. संकल्पना, शैली किंवा प्रत्यक्ष मोटिफ हे कॉपी होत असते. ते पकडता येणे व थांबवता येणे अशक्य आहे.कणभर बदल करून कॉपी करणारा 'माझं वेगळंच आहे.' असं म्हणू शकतो. डिझाईन रजिस्टर करण्याची प्रोसेस किचकट आणि माझ्या आवाक्याबाहेरची आहे. आणि तेवढे करूनही त्यातुन फार काही घडत नाही. पण नुसते डिझाईन घेऊन काय होते? शेवटी हे तारकाम कॉपी करायचे तरी हातानेच करावे लागते आणि तेवढी स्किल लेव्हल नसेल तर जे होईल ती वाईट नक्कल एवढीच होऊ शकते. माझी भलीबुरी स्किल लेव्हल आणि माझी जी काय असेल ती क्रिएटिव्हिटी माझीच आहे. ती नाही ढापू शकत कोणी. मग जे माझे आहे ते माझेच आहे हे दुनियेला माहिती असावे म्हणून जोरदार प्रमोशन करायचे इतकेच उरते माझ्या हाती. ते मी करते आणि बाकी त्रास करून घेत नाही डोक्याला.

ह्म्म.. असेच होते ( चोरी थांबवू शकत नाही).
पण डोक्याला त्रास न करणे आपल्यासाठी उत्तम हे शिकतेय अजून.

पण तुमची कलाक्षमता कोणीच चोरु शकत नाही हेच खरे. मला एखादा नेकलेस करायचा आहे. मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करेनच.

थँक्स सगळे!
अंजली_12 आणि देवीका, कधीही संपर्कातून निरोप धाडू शकता. किंवा फेबु पेजवरही.

Pages