तेलंगण अंडा बिर्याणी

Submitted by अश्विनीमामी on 3 January, 2021 - 05:03
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

साहित्यः सहा अंडी उकडून. तीन लाल कांदे, दावत बासमती राइस दोन वाट्या. काश्मिरी लाल तिखट रंगा साठी दोन चमचे. टोमाटो, पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची, आले , लसूण, खडा मसाला. चांगले थोडे आंबट दही एक वाटी, काजू तळलेले पाव वाटी - डेकोरेशन साठी. गरम मसाला पावडर एक मोठा चमचा/ मसाले भात मसाला/ चिकन मसाला तेल तळायला व साजुक तूप फोडण्यांसाठी.

क्रमवार पाककृती: 

जुन्या आंध्र प्रदेशात तीन भाग. कोस्टल आंध्रा, रायल्सीमा व तेलंगणा. रायलसीमा चे जेवण चिंचेचा वापर व गुंटुर चिली चा भरपूर वापर. कडक उन्हाळ्याचा प्रदेश असल्याने घाम काढणारे पदार्थ बनवले जातात आंबट व तिखट जास्त करुन. तेलंगणा अंडे बिर्याणी ही यु ट्युब वर व्हिलेज वंटकालु नावाचे चॅनेल आहे तिथे बघुन बनवली आहे. ही रेसीपी सांगणारी बाई अतिशय हळूबाई आहे. पण तिची रेसीपी एकदम झक्कास आहे. खालील दिलेल्या साहित्यात तीन लोकांना एक वेळीस व दोन लोकांना दोन वेळेस घेता येइल इतकी आहे. बाकी खाण्यावर आहे. पुरुष माणसे मजबूत खाणारी असतील तर त्या प्रमाणात करा.

पूर्वतयारी: अंडी साधारण मोठ्या भांड्यात मध्यम आचेवर दहा मिनिटे ठेवुन उकडून घ्या. प्रेशर कुकर मध्ये उकडू नका. ह्या कृतीत प्रेशर कुकर वापरायचाच नाही. ती भांड्यातच गार होउद्या. एकीक डे कांद्याचे लांब पातळ काप करुन घ्या किंवा तुमच्या दिमित्रीला हे काम द्या. काप टिशुपेपर मध्ये ठेवा व वरून मीठ शिंपडुन मिसळून घ्या. ह्याने पाणी निघेल. व वरुन पोळपाट वजन ठेवा. टिशु पेपर :कांदे: टिशुपेपरः पोळपाट असे लेयर असले पाहिजेत. हे तास दीड तास आधी करा.

बिर्याणी बनवायच्या आधी अर्धा तास बासमती तांदुळ भिजत घाला. टोमॅटो बारीक चिरून घ्या, आल्या लस्णाची पेस्ट बनवून घ्या, कोथिंबीर व पुदिना धुवुन चिरून घ्या. मिरचीचे बारीक लांब काप करा. कमीत कमी चार ते पाच तिखट मिरच्या लागतील.

कृती: खालील क्रमाने बनवल्यास अगदी कमी पसारा होतो व मागून फारसे आवरावे लागत नाही. मदतीस हात असतील तर अजुनच सोपे किंवा दोन चार बर्नरवाला गॅस असेल तर अजुनच सोपे.मी एकाच इंडक्षन कुक्टोप वर केली आहे त्यामुळे सर्व कृती एका मागुन एक अशी बनवली आहे.

१) प्रथम कांदे पिळून जास्तीचे पाणी काढून तळून घ्या. ब्राउन रंगाचे, कुरकुरीत झाले पाहिजेत. बाजुला ठेवा.
२) कांदे असतील त्यानुसार तळायच्या आधीच थोडा बाजुला ठेवा किंवा एखादा बारका परत कापून घ्या.

३) आता तांदुळ निथळून घ्या. एका भांड्यात पाणी उकळून घ्या व बाजूस ठेवा.
४) आता मोठ्या भांड्यात साजूक तूप दोन चमचे घालून ते गरम होउद्या. मग त्यात जिरे, मिरे, चक्री फूल, तेजपत्ता
लवंग मिरी व बारकी वेलची घालुन परता. आच मध्यमच ठेवा. आता त्यावर तांदुळ घालून परता. व आधी गरम केलेले आधणाचे पाणी त्यात घाला. हे तांदुळापेक्षा जास्त पाहिजे. तांदुळ वरच कणी -मोड शिजवायचे आहेत. व ह्यात चवी पुरते मीठ पण घाला. ह्यावर लक्ष ठेवून मग उरलेल्या भाज्या टोमॅटो व्गैरे चिरून घेता येतात अंडी सोलता येतात.
५) भात शिजला की चाळणीवर टाकून निथळून घ्या व बाजुला ठेवा.

६) आता त्याच किंवा दुसृया भांड्यात/ कढईत साजुक तूप गरम करा. एक डाव तरी तूप लागेल. त्यात काजु तळून बाजुला ठेवा.
७) आता थोडी हळद, तिखट धणे -जिरे पूड असल्यास किंवा चिमुट भर गरम मसाला घालुन मध्यम आचे वर सोललेली उकडलेली अंडी तळून घ्या. मी ह्या बरोबर एखादा मध्यम आकाराचा बटाटा पण चार लांब फोडी करून तळून घेते.
छान लागतो बिर्याणीत. एखादे ग्रेव्ही खाईन पण अंडे नको असे गेस्ट अस्तील तर त्यांना हा बटाटा वाढता येतो.
मी हाच खाते. बटाटा न तळता डिरेक्ट ग्रेव्हीत पण घालता येतो.

८) अंडी बाजुला ठेवून आता त्याच तुपात कांदा, आलेलसुण पेस्ट, हिरव्या मिरच्या, टोमॅटो घालुन परता. उरलेला खडा मसाला पण घाला व मसाला पाव्डर घाला. कश्मिरी लाल तिखट कलर साठी ते पण घाला. मिरचीचा कच्चे पणा गेला पाहिजे. मग ह्यात एक वाटी दही सारखे करून घाला. आणि ग्रेव्ही मंद आचेवर शिजू द्या. चवी पुरते मीठ घाला. शिजत असलेल्या ग्रेव्हीत अंडी व बटाटा तुकडे घालुन पाच मिनिटे ग्रेव्ही मिळून येउ द्या. आता ह्यात ते ब्राउन केलेले कांद्याचे तुकडे आहेत त्यातले मुठभर घालून मिक्स करा.

ग्रेव्हीचा गॅस बंद करून आता ब्रेक घ्या दोन मिनिटे. पाणी प्या. बसुन घ्या. आता फक्त असेंब्ली बाकी आहे.

९) आता जाड बुडाचे पातेले घेउन ( ज्यात भात उकडला होता ते ही चालेल) खाली एक चमचा तुप घ्या.
त्यावर ब्राउन केलेल्या कांद्याचा एक थर द्या व अर्धा भात पसरा. आता ग्रेव्हीतली तीन अंडी, अर्धे बटाट्याचे तुकडे व
थोडी ग्रेव्ही घाला. वरून उरलेला भात. व टॉपला उरलेली अंडी, तळलेले काजु, वरुन ग्रेव्ही, कांदा( ब्राउन केलेला)
व थोडी कोथिंबीर घाला. झाकण लावुन मंद आचेवर दहा मिनिटे ठेवा.
१०) सर्व्ह करताना हलक्या हाताने सर्व सारखे करुन मिसळून घ्या. वरून थोडीशी कोथिंबीर लागल्यास घाला फक्त. रोझ वॉटर वगैरे वापरायचे नाही. ते हैद्राबादी निझामी चोचले आहेत. आपली व्हिलेज बिर्याणी आहे. केशर वगैरे पण वापरलेले नाही. बरोबर तळलेले फिशचे तुकडे, कांदा काकडी घातलेले दह्याचे रायते देता येइल.

जास्तीची ग्रेव्ही बनवून ही पण बरोबर घेतात.

वाढणी/प्रमाण: 
तीन लोकांसाठी
अधिक टिपा: 

यन्जॉई. सर्व्ह करतान वातावरण निर्मितीसाठी युट्युब वर " दिमाग खराब" /सिनेमा चुपिस्ता मामा" ही गाणी लावा.
हीच प्ले लिस्ट स्पॉटिफाय वर तेलंगणा बीट्स म्हणून उपलब्ध आहे. माझी कृती सौम्य तिखट व माफक मसालेदार अशी आहे. व साजुक तुपाचा फ्लेवर मस्त येतो. फाय्नल लेव्हल इलेक्ट्रिक कुकर मध्ये करुन ऑफिसला पण नेता येइल.

जास्तीची ग्रेव्ही बनवून ही पण बरोबर घेतात.

लॉकडाउन मध्ये अंडेवाला येत होता पण चिकन वगैरे काही दिवस नव्हते भेटत तेव्हा ही रेसीपी करून बघितली.

माहितीचा स्रोत: 
व्हिले ज वंटकालु हे चॅनेल यु ट्युब वर आहे ती बघून .
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख आणि कमी पसार्‍याची बिर्यानी वाटतेय.
कालच बासमती तांदूळ आणला आहे ग्रोसरीत. आम्ही मात्र आपले हे ते आणि ऑफिशल वर्ड तुम्ही वापरलाय ते घालून करणार.

बाकी वेळी खायला पेशल नागपुरातून चिन्नोर आणलाय. मस्त सुगंधी भात होतो याचा (हा इथे पुण्यात का मिळत नाही नकळे, बरेच ठिकाणी पाहून झालंय आताशा.)

भारी रेसिपी अमा! मी न्यू इयर ला (इथल्या हेट क्लबमुळे फार आठवण झाल्याने) चिकन बिर्याणी केली होती . तेव्हा तुमची टिश्यू पेपर ची टिप वापरून मग कांदा तळला. फर्स्क्लास ब्राउन कुरकुरीत झाला आणि बिर्याणीला चार चांद लागले Happy

मीपण न्यू इयरलाच आणि इथल्या हेट क्लबमुळेच व्हेज बिर्याणी केली होती. पण तेव्हा ही कांदा कुरकुरीत करण्याची आयडिया मला माहिती नव्हती!

योकु, पुण्यात मिळतो की चिन्नोर. धायरीत मी रहायचे तिथेपण मिळायचा. गणेशनगर, २६ नंबरच्या गल्लीजवळ धारेश्वर किराणा. किंवा मार्केटयार्डात बी डी शिंगवी. अजून पण एक फेमस दुकान आहे पण नाव आठवत नाही. बहुतेक गेट नंबर ४ च्या जवळपास आहे. विविधभारती वर जाहिरात लागायची त्यांची त्यानुसार २-४ प्रकारच्या तांदळाचा भात शिजवून ठेवलेला असे नमुना म्हणून.