कबंध घोडेस्वाराचे रहस्य : भाग १

Submitted by पायस on 3 January, 2021 - 03:47

पूर्वसूत्र येथे वाचू शकता - https://www.maayboli.com/node/77615

"ओह्ह अ‍ॅलेक्सी, आपण या भिकार हवामानात राहायला यायची चूक कशी करून बसलो? आपण एवढे मूर्ख कधी झालो?"
"आय बेग युवर पार्डन सर पण लंडनला बस्तान हलवायचा निर्णय तुमचाच होता सर."
"मग तुला मला सांगता नाही आलं की 'मास्टर ख्रिस, लंडनसारखं धुरकट हवामान सहन करण्यापेक्षा सर मॅक्सवेलना डार्टमूरला राहूनही काम करता येऊ शकतं हे पटवून द्या'! वॅलेट मालकापेक्षा हुशार असतात हा माझा गैरसमजच म्हणायचा."
"दोन गोष्टी सर - १) मी हे सांगितले होते, २) होम्सच्या गोष्टींमधले लंडनच्या धुक्याचे वर्णन वाचूनही माझा सल्ला डावलणारे तुम्हीच होते."
"अ‍ॅलेक्सी?"
"सर."
"आजच्यासाठी एवढा डोस पुरे. ब्रेकफास्ट आणि स्ट्रँडचे गेल्या ऑगस्टपासून एप्रिलपर्यंतचे अंक!"
"व्हेरी वेल, सर"
होम्सचे नाव काढल्यानंतर बॅस्करव्हिलचे पुनःपारायण करणे भाग होते. अ‍ॅलेक्सीला शंका होती की सध्या ख्रिस बॅस्करव्हिलचे पुनःपारायण करण्यासाठी ठरवून हा निरर्थक वाद उकरून काढतो. अर्थात बॅस्करव्हिलच्या निमित्ताने होम्सचे आठ वर्षानंतर पुनरागमन झाले होते आणि बॅस्करव्हिल होम्सच्या सर्वोत्कृष्ट केसेसपैकी एक होती. ब्रेकफास्टमध्ये हॉग्ज पुडिंग, सनी साईड अप, क्रिस्पी बेकन, बेक्ड बीन्स ऑन टोस्ट, स्टर फ्राईड बटन मश्रूम्स आणि टोमॅटो. सोबत व्यवस्थित लोणी लावून भाजलेले टोस्ट, ऑलिव्ह ऑईल आणि मेपल सिरप. जोडीला चहा हवाच. स्पोडच्या बोन चायनापासून बनवलेल्या टीसेटमध्ये चहाचे साहित्य तयारच होते. आजचा चहा होता युनान होंगचा (云南红茶). यात पानांसोबत कोंबांचाही समावेश असल्याने चव मुळातच गोडसर येते आणि आम्ल गुणधर्म जवळपास नसतातच. निम्न प्रतीचा युनान चहा अतिशय कडवट लागतो हे ख्रिसला माहित होते. त्यामुळे तो एका घोटात सांगू शकला असता की हा निश्चितच उत्तम प्रतीचा युनान चहा होता. रुपेरी तांबड्या रंगाच्या त्या अमृतात दूध मिसळून त्याची अवहेलना न करण्याचा सुसंस्कृतपणा ख्रिसमध्ये होता. सुख म्हणजे अजून काय असतं?

या सुखात मिठाचा खडा काय असतो हे मात्र ख्रिस व अ‍ॅलेक्सी दोघांनाही माहित होते. किंबहुना अ‍ॅलेक्सीच्या चेहर्‍याकडे बघूनच सर मॅक्सवेलसोबत मीटिंग आहे हे ख्रिसला लक्षात आले होते. डॅम इट! किमान वॉटसनची स्टेपलटनशी भेट होईपर्यंत तरी वाचू द्यायला काय हरकत होती म्हातार्‍याची?

~*~*~*~*~*~

सर हेन्री मॅक्सवेल एका उच्चभ्रू क्लबच्या मीटिंग रूममध्ये ख्रिसची वाट बघत होते. डार्टमूरला लागलेल्या आगीनंतर ख्रिसने लंडनला यायचा निर्णय घेतला तेव्हा हेन्रींना खूप आनंद झाला. त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये ख्रिससारख्या हुशार तरुणाची भर पडणे चांगलीच बाब होती. पण ख्रिस आपल्या वडलांच्या सावलीतून बाहेर आल्यानंतर त्याच्या अंगातला आळशीपणा आणि मूलभूत दर्जाचा कंटाळा दिसून आला. तरीही हेन्रींसाठी तो अतिशय महत्त्वाचा माणूस होता. ब्रिटिश साम्राज्याच्या राजकीय कटकटींपुढे सर्व स्वभावदोष माफ होते.
ख्रिसच्या अपार्टमेंटमध्ये भेटायला इतर वेळी हरकत नव्हती पण हे प्रकरण नाजूक होते आणि त्यांनी शक्य तितकी गुप्तता बाळगणे स्वाभाविक होते. ख्रिस आल्यानंतर हेन्रींच्या आवडत्या अर्ल ग्रेचे कप्स आले.

"लॉर्ड गॅविन हॉवर्ड" हेन्रींनी विषयाला तोंड फोडले.
"व्हायकाऊंट ऑफ कॅनहॅम्प्टन?"
"होय. त्यांच्याच संदर्भातील प्रकरण आहे." सर हेन्रींनी थोडक्यात 'विजय कॅनहॅम्प्टनला राहायला गेला' ही पार्श्वभूमी विशद केली. लिंडाने रात्री पाहिलेली घटनाही त्यांनी सांगितली.
"आणि लिंडाच्या सांगण्यावर कोणाचा विश्वास बसला?"
"अर्थातच नाही. 'कबंध घोडेस्वार दिसला' या दाव्यावर सगळेच हसणार."
"मग?"
"तिचा आवाज ऐकून घरातले बरेच जण धावत आले. आय थिंक विल्यम, विजय, आणि बटलर आल्बस एवढे तरी नक्कीच आले. गॅरेथने त्या सर्वांसोबत आसपासचा परिसर धुंडाळला पण त्यांना कोणी घोडेस्वार सापडला नाही."
"बस एवढंच? एवढीच बाब असती तर तुम्ही मला नक्कीच बोलावलं नसतं."
"ही तर कोड्याची केवळ सुरुवात आहे. खरा प्रकार दुसर्‍या दिवशी घडला. सकाळी विजय नेहमीप्रमाणे उठून न्याहारीकरता ग्रेट हॉलमध्ये आला. तेव्हा त्याला बर्टीकडून कळाले की सर गॅविन एकटेच रपेटीला निघून गेले. विजयही मग रपेट करायला बाहेर पडला. तो परत आला तरी गॅविन न परतल्याने सर्वांनाच चिंता वाटू लागली. बराच वेळ शोधाशोध केल्यानंतरही त्यांचा पत्ता लागला नाही. अखेर टेकडीवरच्या चॅपलवर शोध घेतला तेव्हा चॅपलच्या आत एका दगडी बैठकीवर गॅविन यांचे शव सापडले."
"ब्लडी हेल! आणि त्यांचे डोके ...."
"अपेक्षेप्रमाणे शिरच्छेद करून बैठकीजवळच असलेल्या टेबलवजा दगडावर ठेवलेले होते. आर यू गॉबस्मॅक्ड येट?"
अर्थातच केस शॉकिंग होती. सर गॅविन ब्रिटिश उमरावांच्या तळ्यातील तुलनेने छोटी मासोळी असले तरी त्यांच्या श्रीमंतीचे किस्से प्रसिद्ध होते. आणि पैसा बोलतो!

"पण आपली डोकेदुखी येथे संपत नाही." हेन्री पुढे बोलू लागले. "अपेक्षेप्रमाणे स्थानिक पोलिसांनी त्या भाकडकथेवर विश्वास ठेवला नसला तरी त्यांच्या तपासातून काही तापदायक गोष्टी निष्पन्न झाल्या आहेत. हा त्यांच्या तपासाचा अहवाल. त्यांनी असा निष्कर्ष काढला आहे की प्रिन्स विजय यांनी सर गॅविन यांचा खून केला."
"काहीही!"
"वेल, आय डोन्ट नो हाऊ मच वॉटर देअर अर्ग्युमेंट होल्ड्स पण तरीही आपण शाही समारंभासाठी आलेल्या पाहुण्यावर एवढा गंभीर आरोप इतक्या सहजासहजी लावू शकत नाही. त्यात किंग एडवर्ड यांचा अधिकृत राज्याभिषेक सोहळा अखेर ९ ऑगस्टला होणार आहे. म्हणजे आपल्याकडे जेमतेम तीन आठवडे उरले आहेत. त्याच्या आत या प्रकरणाचा निकाल लागलाच पाहिजे."
"म्हणजे मी ...."
"ही कॅनहॅम्प्टनची तिकिटे. अ‍ॅलेक्सीने ऑलरेडी सामानाची बांधाबांध केलीच असेल. नाऊ बॉब इज युवर अंकल अ‍ॅन्ड दॅट्स दॅट!"

~*~*~*~*~*~

"वेल सर लुक अ‍ॅट द ब्राईटर साईड. लंडनपासून आपली सुटका झाली म्हणायला हरकत नाही." अ‍ॅलेक्सी म्हणाला. गार्डाने बावटा दाखवून फार वेळ झाला नव्हता. गाडीने अजून म्हणावा तेवढा वेग पकडला नव्हता. ख्रिस चालत्या गाडीतही लिहू वाचू शकत असला तरी उगाच डोळे ताणण्यास त्याचा नकार होता. त्यापेक्षा वेग पकडण्याआधीच मुख्य मुद्दे डोक्यात साठवले की अ‍ॅलेक्सी सोबत चर्चा करणे अधिक सोयिस्कर होते.
"अ‍ॅलेक्सी?" अखेर त्याचे वाचन पूर्ण झाले होते.
"सर."
"खाण्याची सोय केलीस?"
त्यांच्या समोर खाद्यपदार्थ हजर झाले. प्रवास फार लांब नसला तरी त्यांच्या तिकिटांमध्ये असतील नसतील त्या सर्व सुखसोयींचा समावेश केला गेला होता. चाईव्हज, पार्सली आणि टॅरागॉन वापरून बनवलेले क्लासिक हर्ब्ज ऑमलेट्स आणि दूध घालून सिलोन चहा.
"प्राथमिक अहवालानुसार शव दुपारी बाराच्या सुमारास सापडले. मृत्युचे कारण स्पष्ट आहे. वार सफाईदार नसला तरी अवजड अशा धारदार हत्यारानेच असा शिरच्छेद करता येऊ शकतो. त्या भारतीय राजकुमाराकडे कसली तरी तलवार आहे म्हणे?"
"खंडा तलवार. ब्रॉडस्वोर्ड, युद्धात प्रतिस्पर्ध्याची खांडोळी करण्याकरिता विकसित झालेला तलवारीचा प्रकार. अहवालानुसार ती तलवार इतर कोणाला उचलताही येत नव्हती. ती तलवार वगळता शिरच्छेद करता येईल असे कोणतेच हत्यार त्या इस्टेटीवर नाही."
"त्याच्यावर संशय येण्याचे प्राथमिक कारण. त्याखेरीज तो रपेटीला गेला ती वेळ! शवविच्छेदनासाठी संध्याकाळपर्यंत पोलिसी डॉक्टरच्या ताब्यात आले. गॅविन यांचा मृत्यु सकाळी सात ते साडेसातमध्ये झाला असा डॉक्टरांचा निष्कर्ष आहे."
"यावेळी फक्त विजय घराबाहेर होता. इतरांकरता खात्रीलायक साक्षीदार नसले तरी त्यांच्या जबान्या खोट्या पाडण्यालायक पुरावाही नाही. त्यामुळे त्यांच्या विरोधात सिद्ध काहीच करता येत नाही."
"हम्म" ख्रिसने चहाचा घोट घेऊन खिडकीबाहेर नजर वळवली.
"सर?"
"संशयाची सुई विजयवर खूप सहजरित्या येते. पोलिसांच्यामते विजय आणि गॅविनमध्ये राजकारणासंबंधात काही वाद झाले असावेत आणि चिडून विजयने त्यांचा शिरच्छेद केला. हा सिद्धांत अमान्य केला तर दुसरे सोपे स्पष्टीकरण आहे की कबंध घोडेस्वाराच्या भाकडकथेवर विश्वास ठेवायचा आणि हे मान्य करायचे की कबंध घोडेस्वारानेच गॅविन यांना मारले. जर ही थिअरी कोर्टात सिद्ध करता आली असती तर...."
"तर तुम्ही विजयला सोडवून लंडनच्या हवेच्या नावाने शिमगा करत बॅस्करव्हिलचे पारायण करत बसला असतात."
"अ‍ॅलेक्सी यू नो मी टू वेल! पण...."
"तुम्हाला समाधानही मिळणार नाही. कारण असे पोकळ यश तुम्हाला मान्य होणार नाही."
"दॅट्स द प्रॉब्लेम अ‍ॅलेक्सी, दॅट्स द प्रॉब्लेम!"

थोडा वेळ शांततेत गेल्यानंतर ख्रिस पुन्हा बोलू लागला.
"या सगळ्यात बुचकळ्यात टाकणारा भाग आहे गॅविन यांचे शव! त्यांच्या मानेच्या थोडं खाली काहीतरी रुतल्याची जखम आहे. तिथेच कण्यामध्ये मायनर फ्रॅक्चर आहे. तसेच त्यांचे हात पाय बांधले असावेत अशा खुणाही आहेत. या सगळ्यावरून त्यांचा बळीचा बकरा व्यवस्थित योजना आखून बनवला हे स्पष्ट आहे. पण मर्डर वेपन काय असू शकेल? आणि ती रुतल्याची जखम कशाची असेल?"
उर्वरित प्रवास ख्रिस डोळे मिटून शांतपणे विचार करत होता. त्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरे कॅनहॅम्प्टनमध्ये होती. त्यांना रिसीव्ह करण्याकरता आल्बस स्टेशनवर हजर होता. थोड्याच वेळात ते होस्बोर्ग मॅनोरमध्ये दाखल झाले.

~*~*~*~*~*~

जेवण वगैरे आटोपून ख्रिस लायब्ररीत आला. त्याची आणि अ‍ॅलेक्सीची राहायची सोय विजयच्या खोलीत करण्यात आली होती. विजयची रवानगी तात्पुरती गावातल्या एका घरात केली गेली होती. सद्यस्थितीत केवळ त्या खंडा तलवारीमुळे तो संशयित होता. त्याला जामीन मिळवून देणे आणि त्याची लंडनला रवानगी करणे सहजसाध्य होते पण त्यामुळे खटला भरण्यास मान्यता दिल्यासारखे झाले असते. न्यायालयात विजय सहीसलामत सुटला असता पण तिथपर्यंत पोहोचणे हा ब्रिटिश सम्राटांच्या पाहुण्यासाठी अपमानास्पद बाब होती. हे टाळण्यासाठी ख्रिसला लवकरात लवकर पुरावे गोळा करणे भाग होते. जामीनापर्यंत बाब न जाऊ देण्यासाठी त्याच्याकडे एक आठवडा होता. तसे कळवणारे पत्र पोलिस अधिकार्‍यांकडे देणे हे ख्रिसने सर्वप्रथम केले. आजचा दिवस त्याने मॅनोरच्या रहिवाश्यांच्या मुलाखती घेण्याचे ठरवले. ते पुन्हा सर्व माहिती देण्यास नाखूष असले तरी त्यांच्याकडे फार काही पर्याय नव्हता.

"लिंडा तू म्हणतेस की तू कवच परिधान केलेल्या अज्ञात व्यक्तीला रात्री टरेट क्लॉकजवळ पाहिलेस."
"हो."
"गॅरेथ, तू लिंडासोबतच होतास. तू लिंडा म्हणते तशा कोणा व्यक्तीस पाहिलेस?"
"नाही. मी जेव्हा खिडकीतून बाहेर नजर टाकली तेव्हा क्लॉक टॉवरपाशी कोणी नव्हते. कानोसा घेतला तेव्हा घोड्याच्या फुरफुरण्याचा हलकासा आवाज आला. लिंडाची किंकाळी ऐकून पीटर धावत आला होता. मी त्यासोबत तडक खालच्या मजल्याकडे धाव घेतली. जिना उतरताना आयरीनचा आवाज आला. घाईत असल्याने धावता धावताच ओरडून मी तिला लिंडाची सोबत करण्याची सूचना केली. आल्बस, विल्यम आणि विजयही पश्चिमेकडच्या जिन्यापाशी गोळा झाले होते. मी त्यांना सोबत चलण्याची सूचना केली. बर्टीची झोप गाढ असल्याने त्याला उठवण्यात वेळ घालवण्यापेक्षा आम्ही स्वयंपाकघराच्या मागे असलेल्या पागेतून घोडे काढून थोडा वेळ शोध घेतला पण आम्हाला काहीच सापडले नाही. तोवर बर्टीही उठला होता. आम्ही त्याला सर्व घोड्यांना परत नीट बांधून ठेवण्यास सांगून झोपण्यास परतलो. आयरीन आमच्या खोलीत लिंडासोबत होती. मी तिला परत तिच्या खोलीत जायला सांगून झोपी गेलो."
"तुमच्याकडे किती घोडे आहेत?"
"दहा."
"पागेला कुलूप?"
"घालतो. दोन किल्ल्या - एक आल्बसकडे आणि दुसरी बर्टीकडे. याखेरीज सर्वांच्या मास्टर कॉपीज बाबांच्या खोलीत आहेत. त्या हरवलेल्या नाहीत, सर्व जागच्या जागी आहेत."
"लिंडा तुम्ही पाहिलेल्या व्यक्तीचे वर्णन करू शकता?"
"अगदी ढोबळ प्रमाणात. जुन्या पद्धतीचे कवच त्याने घातले होते हे नक्की. त्याची उंची सहा फूट असावी. जास्तच असेल पण कमी नक्की नाही. त्याचे डोके त्याने हातात धरले होते. डोक्यावर शिरस्त्राण होते त्यामुळे मला चेहरा दिसू शकला नाही. पण शिरस्त्राण नसते तर कदाचित मी चेहर्‍याचे वर्णन करू शकले असते."
"गॅरेथ शोधार्थ बाहेर पडल्यानंतर काय झाले?"
"मी खूप घाबरले होते. बिछान्यावरून जागची हललेच नाही. कधीतरी आयरीन माझ्याशेजारी येऊन बसली. गॅरेथ परत येईपर्यंत ती माझ्यासोबत थांबली. मग गॅरेथ परतल्यावर मी झोपण्याचा प्रयत्न केला."
"त्यानंतर काही आवाज किंवा काही इतर खटकलेले?"
"नाही. तो आधी आलेला कडाडसा आवाज, मग धप्पसा आवाज आणि ग्रीन नाईट. बाकी मला काहीच ऐकू नाही आले."

*********

"विल्यम दुसर्‍या दिवशीचा तुझा दिनक्रम काय होता?"
"मी थोडा उशीराच उठलो. मला झोपमोड फारशी सहन होत नाही. विजय रपेटीकरता बाहेर पडला होता. बाबा त्याच्याही आधीच रपेटीस निघून गेले होते. विजय परतला पण त्याने त्याला बाबा कुठे दिसले नाहीत असे सांगितले. बुचकळ्यात पाडणारी गोष्ट अशी की बाबांनी सकाळी रपेटीसाठी वापरलेला घोडा तबेल्यात परतला होता. हे लक्षात येताच गॅरेथने त्यांच्या शोधार्थ बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. मी, गॅरेथ आणि विजय चॅपलच्या दिशेने निघालो. बाबा चॅपलमध्ये बरेचदा जात हे मला आणि गॅरेथला माहिती होते. फार शोधाशोध करावी लागली नाहीच. चॅपलच्या हॉलच्या अवशेषांमध्येच ते टेबल आहे. आणि तिथे ....."
"इट्स ओके. आय अंडरस्टँड. तुम्हाला सर हॉवर्ड सापडले तेव्हा बारा वाजले होते?"
"हो. म्हणजे टरेट क्लॉकनुसार आम्ही घरातून साडेअकराच्या सुमारास बाहेर पडलो असू. चॅपलपर्यंत पोहोचायला अर्ध्या तासापेक्षा अधिक वेळ लागत नाही. ओह्ह दॅट रिमाईंड्स मी. बाबांचे घड्याळ मिसिंग आहे."
विल्यमने थोडक्यात ख्रिसला गॅविनच्या पॉकेटवॉचविषयी कल्पना दिली. ही माहिती ख्रिसकरता नवीन होती. भलेही या हत्येमागे चोरीचा उद्देश असणे अशक्यप्राय असले तरी अशा बारीकसारीक नोंदी करणे अनिवार्य होते.

"विजय आणि गॅविनमध्ये काही वाद?"
"छे छे. उलट विजयच्या राज्यातील कारखाने उभारण्याकरता भांडवल घालण्याचा बाबांचा विचार होता. यानिमित्ताने माझ्यासाठी तिथे एक व्यापारिक पद निर्माण झाले असते. आणि तुमच्यापासून काय लपवायचं .."
"त्याचा पुढे हिंदुस्तानातील वैयक्तिक राजकीय प्रगतीसाठी वापर करता येऊ शकला असता. आय गेट दॅट. शेवटचा प्रश्न - हे चॅपल तिथे किती वर्षांपासून आहे?"
"मलाही नक्की माहित नाही. जेव्हा होस्बोर्ग मॅनोर एक गढी होता तेव्हापासून ते चॅपल तिथे आहे. होस्बोर्ग यांनी जेव्हा गढीची पुनर्रचना केली तेव्हा त्यांनी गावात स्वखर्चाने एक नवीन छोटेखानी चर्च बांधले. त्यानंतर या चॅपलचा वापर बंद पडला आणि आता त्याला पार अवकळा आली आहे."
"ओह म्हणजे ते प्रोप्रायटरी चॅपल होते?"
"आय रेकन सो."
"लेट सर हॉवर्ड वगळता तिकडे कोणी जात असे?"
"पीटर तिथे कधी कधी जात असतो. पण बाकी कोणी नाही. ग्रीन नाईटच्या भितीने तिकडे कोणी फिरकत नाही."

**********

"पीटर..."
"पीटर सिमियन, सर"
"सिमियन? तू काँटिनंटवरून आलास का?"
"नाही सर. पण तुमचा अंदाज अगदीच चूक नाही. माझ्या माहितीनुसार एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस माझ्या आजोबांनी जर्मनीतून इंग्लंडमध्ये स्थलांतर केले."
"हम्म. तू इतिहासाचा अभ्यासक आहेस?"
"हो सर. मला सर गॅविन यांनी या चॅपलचा आणि त्यांच्या गराण्याचा इतिहास यासंबंधात कामावर नेमले होते."
"यू मीन घराण्याचा. सो तुला आश्रय नाहीतर काम दिले होते. एनीवे, मग या चॅपलसंबंधात काही विशेष सापडले?"
"हे चॅपल पंझराव्या, सॉरी पंधराव्या शतकात बांधले असावे."
"आर यू ओके?"
"येस सर. माझा जिव्हाजडपणा आड येतो सर. बट आय अ‍ॅम इंप्रूव्हिंग..."
"नॉट अ बोदर. प्लीज कंटिन्यू."
"तर हे चॅपल पंधराव्या शतकात बांधले असावे. इंग्लंडमधल्या सर्वात जुन्या चॅपल्स पैकी एक. आय सिंक हे आधी कोणा स्थानिक देवतेचे मंदिर असावे. पुढे त्याचे चॅपलमध्ये रुपांतर केले गेले. याला टिकवण्यासाठी बरेच प्रयत्न केले गेले असावेत. पण शंभरेक वर्षांपूर्वी अखेर या चॅपलची देखभाल न करण्याचा निर्णय घेतला गेला असावा. बांधकाम केव्हाच जीर्ण झालेले असल्याने पडझड होण्यास वेळ लागला नाही."
"ओके. ग्रीन नाईटच्या दंतकथेविषयी काय सांगू शकतोस?"
"मी काय सांगणार? ही दंतकथा नक्की कधी पसरली हे कोणीही सांगू शकणार नाही पण गावकर्‍यांचा या कथेवर गाढ विश्वास आहे. किंबहुना चॅपलची देखभाल थांबली हे कळल्यावर गावकर्‍यांमध्ये घबराट माजली होती. पण काहीही न घडल्यावर त्यांचा जीव भांड्यात पडला. बट ओल्ड फिअर्स हॅव डीप रूट्स. अजूनही तिकडे फिरकायला ते घाबरतात."

*********

"आल्बस तू हॉवर्ड घराण्याकडे कधीपासून काम करतो आहेस?"
"जेव्हा हे हॉवर्ड घराणे नव्हते तेव्हापासून, सर."
"गुड दॅट यू ब्रिंग इट अप. होस्बोर्ग, हॉवर्ड, नक्की काय आडनाव आहे यांचं?"
"होस्बोर्ग सर. ही इस्टेट वर्षानुवर्षे होस्बोर्ग्जची होती. मॅनोरचा एच आकार एच फॉर होस्बोर्ग आहे. मूळचे नॉर्दर्न आयरिश, मर्चा नावावरून यांच्या आयरिश लिनिएजचा अंदाज येऊ शकतो. सर हॉवर्ड इंग्लिश असले तरी त्यांची उमेदीची वर्षे ऑस्ट्रेलियात गेली."
"गॅविन यांनी होस्बोर्ग घराण्यात लग्न केलं?"
"होय. सुरुवातीस त्यांनी होस्बोर्ग आडनाव घेतलं होतं. पण लेडी होस्बोर्ग वारल्यानंतर त्यांनी मूळ नाव परत स्वीकारले."
"ओह्ह. मग त्यांचा वंशवृक्ष?"
"मी माहिती देऊ शकतो सर. पण त्याचा या केसशी काही संबंध असेल असे मला वाटत नाही."
"मलाही नाही आल्बस. केवळ उत्सुकता म्हणून. जर तुझी हरकत नसेल तर?"
आल्बसने क्षणभर विचार केला. ख्रिसला ही माहिती हवीच असेल तर त्याला ती इतर मार्गानेही मिळू शकते हे त्याच्या अनुभवी मेंदूने ताडले. अशावेळी अडेलतट्टूपणा करण्यात त्याचा कसलाच फायदा नव्हता.
"तुम्हाला बहुधा त्यांच्या तीन मुलांविषयी माहिती मिळाली तरी पुरेसे ठरावे. लेडी आयरीन सर्वांत थोरली आणि द लास्ट होस्बोर्ग! आयरीनच्या जन्मानंतर वर्षाभरातच लेडी होस्बोर्ग यांचे निधन झाले. लवकरच स्पष्ट झाले की सर गॅविन यांनी दुसरी बायको आधीच हेरली होती."
"लेडी होस्बोर्ग यांच्या मृत्युमागे काही ..."
"नो नो नथिंग लाईक दॅट. सर गॅविन यांचे नशीब जोरावर होते असे म्हणूयात. किंवा त्यांनी लग्न करतानाचा लेडी होस्बोर्ग यांची नाजूक प्रकृती विचारात घेतली असावी. पण मी त्यांना दोष देणार नाही. त्यांनी त्याच्या हिताचा विचार करून निर्णय घेतले."
"ओके. मग गॅरेथ आणि विल्यम दुसर्‍या पत्नीची अपत्ये. या सावत्र आई आणि आयरीनचे संबंध कसे होते?"
"कोल्ड! लेडी आयरीनचा छळ झाला असे मी म्हणणार नाही पण त्यांचे आणि लेडी हॉवर्डचे कधी पटलेही नाही. सर गॅविनसोबत आयरीनचे संबंध अधिक चांगले असले तरी सर गॅविनचा सहवास त्यांना लहानपणी फारसा लाभला नाही."
"ह्म्म. त्या रात्री जेव्हा तुम्ही सर्व बाहेर पडलात तेव्हा घराचे दरवाजे बंद होते? कोणी घरात घुसण्याची शक्यता?"
"सर मॅनोरमध्ये प्रवेश करण्याचे तीन मार्ग आहेत. उत्तरेकडचा मुख्य दरवाजा आणि दोन्ही क्लॉयस्टर्सची प्रवेशद्वारे. मी झोपण्यापूर्वी ही तीनही दारे आतून लॉक करतो. क्लॉयस्टर्समध्ये उघडणार्‍या इतर खोल्यांची दारे बहुतांश वेळा बंदच असतात पण ती उघडी असती तरी त्यांच्यामधून तुम्ही मॅनोरमध्ये प्रवेश करू शकत नाही. कारण मी पाहिले तेव्हा तळमजल्यावरच्या सर्व खिडक्या बंद होत्या."
"बंद होत्या म्हणजे नेमकं काय? लोटलेल्या होत्या, आतून कुलूप घातलेले होते, त्यांना आतून गज आहेत की आणखी काय?"
"नाही गज नाहीत, त्यांना आतून सरकवता येणार्‍या खिट्टीने बंद करण्याची सोय आहे. मी अगदी जवळ जाऊन खिट्ट्या तपासल्या नाहीत पण त्या खोल्यांत जर कोणी गेलेच नसेल तर ती खिट्टी कोणी उघडली असेल असे वाटत नाही. त्या खिडक्या उघडल्या तर केवळ उन्हं दाखवण्याच्या वेळी मी किंवा ग्रेटा उघडतो. आम्हा दोघांपैकी कोणीही त्या दिवशी खिडक्यांना हात लावला नव्हता."
"पण त्या रात्री बाहेर पडताना तुम्ही यातले एक दार उघडले असेलच?"
"आम्ही पश्चिमेच्या क्लॉयस्टरचे दार उघडले होते. तिथून कोणी आत शिरलेच तरी त्याला ग्रेट हॉलमधून जावे लागेल. मी ग्रेटाला तिथे पहारा देण्यास थांबवले होते. आम्ही गेल्यानंतर कोणीही ग्रेट हॉलमध्ये शिरले नव्हते."
आल्बसच्या बोलण्यावरून असा निष्कर्ष निघत होता की ग्रीन नाईट येनकेनप्रकारेण रातोरात दिसेनासा झाला होता. ती मॅनोरचीच कोणी व्यक्ती असती तर ती मॅनोरमध्ये परतली असती. मनोमन ख्रिसची खात्री पटली होती की जर या कबंध घोडेस्वाराची ओळख पटली तर या रहस्यावरचा पडदा उठू शकतो. आता एकच व्यक्ती उरते ....
"बर्टी? बर्टी आपल्या खोलीत कसा परत गेला?"
"दर रात्री बर्टी परत जाताना मला कळवतो. तोवर सर्व झोपी गेलेले असतात. तेव्हा मी बर्टीसोबत खाली उतरतो. सर्व दारे लॉक करतो आणि बर्टी पश्चिमेच्या क्लॉयस्टरमार्गे आपल्या खोलीत जातो. त्या रात्री बर्टी पीटरला कंपनी म्हणून अकरापर्यंत बसला होता. मी इतर दारे आधीच लॉक केली होती. त्यांचे पिणे झाल्यानंतर तो नेहमीप्रमाणे मला सांगून आपल्या खोलीत गेला आणि मी पश्चिमेच्या क्लॉयस्टरचे दारही लॉक केले."
"थॅंक यू आल्बस, यू मे गो नाऊ."

******

"बर्टी, सर गॅविनना शेवटचे जिवंत तू पाहिलेस. बरोबर?"
"नाही सर. मी एकटा नाही, आल्बसनेही त्यांना बाहेर पडताना बघितले होते."
"पण मला असे कळले की आल्बसशी त्यांचे संभाषण काहीच झाले नाही."
"हो जेव्हा आल्बसने मला हे सांगितले तेव्हा मलाही थोडं खटकलंच."
"थोडं विस्ताराने सांग की त्या रात्री आणि मग पुढल्या सकाळी काय घडले?"
"मग सर आदल्या संध्याकाळपासून सुरुवात करावी लागेल."
"अ‍ॅज यू डीम नेसेसरी."
"सर, संध्याकाळी लॉर्ड गॅविन आणि हिज हायनेस विजय लायब्ररीत चर्चा करत होते. त्यातले तपशील माझ्या आकलनापलीकडचे आहेत पण काहीतरी व्यापारिक बोलणी होती. लॉर्ड गॅविन यांनी स्वतःच मला बोलावले होते. मी पोहोचलो तेव्हा चर्चा संपली होती आणि हिज हायनेस वरच्या मजल्याकडे निघाले होते. गॅविन म्हणाले की त्यांना आज बरेच काम आहे तेव्हा ते डिनर लायब्ररीतच घेतील. त्यानुसार मी त्यांना रात्री डिनर सर्व्ह केला. त्यानंतर सर्वांचे जेवण झाल्यानंतर मी आणि पीटर व्हिस्की पीत होतो. फार नाही, दोन पेग घेतले असतील मी. मग नेहमीप्रमाणे मी आल्बसला गुडनाईट म्हणून आपल्या खोलीत परतलो."
"तेव्हा वेळ काय होती?"
"अंदाजे सव्वा अकरा. मग मी दुसर्‍या दिवशीच्या स्वयंपाकाची तयारी करून पावणे बाराच्या सुमारास झोपलो असेन. बाराच्या आधीच कारण मी मध्यरात्रीचे टोले नाही ऐकले. मला पाच-सहा तास झोप पुरते पण तेवढा वेळ मी अगदी गाढ झोपतो. त्या रात्री मात्र मला तीन ते चारच्या दरम्यान कधीतरी घोड्यांच्या खिंकाळण्याच्या आवाजाने जाग आली. मी उठून बघितले तर पागेचे कुलूप उघडून त्यातले पाच घोडे गायब होते. मी आधी बिचकलो पण कुलूप किल्ली वापरून उघडलेले बघून माझ्या ध्यानात आले की घोडे घरच्याच लोकांनी वापरले आहेत. आता का नेले असतील हे तेव्हा मला उमगले नाही पण मास्टर गॅरेथ व इतर परत येईपर्यंत मी पहारा देणे इष्ट समजले."
"ठीक. मग दुसर्‍या दिवशी काय घडले?"
"सकाळचा पहिला चहा आल्बस लायब्ररीत घेऊन जातो. गॅविन इतरांपेक्षा आधी उठतात. दुसरा चहा ते ग्रेट हॉलमध्ये सर्वांसोबत न्याहारीच्या वेळी घेतात. मध्ये ते रपेटीस जातात. त्या सकाळी मी त्यांना पागेतून घोडा काढताना पाहिले. आल्बसही मागून धावत आला. पण तोवर गॅविन रपेटीस निघून गेले होते."
"आल्बस का धावत आला?"
"सहसा ते आल्बस सोबत पागेपर्यंत चालत येतात. या वेळात दिवसातील नियोजित भेटींची माहिती जाणून घेतात. मग आल्बस आपली किल्ली वापरून कुलूप काढतो. मग ते रपेटीस जातात. पण त्या सकाळी बहुधा त्यांनी आपली किल्ली वापरून पागेचे कुलूप काढले."
"म्हणजे पागेचे कुलूप त्या सकाळी सर गॅविननी उघडले होते?"
"हो सर. त्याशिवाय त्यांना रपेटीकरता घोडा बाहेर कसा काढता येईल?"
ख्रिसने क्षणभर डोळे मिटले आणि मान डोलाविली.
"ठीक आहे बर्टी. तू जाऊ शकतोस."

******

"आयरीन. खून झाला त्या सकाळी तू कुठे होतीस?"
"मी माझ्या खोलीतच होते. मला त्या दिवशी उशीराने जाग आली. तुम्ही सुद्धा मान्य कराल की रात्री झोपमोड झाल्यानंतर सकाळी वेळेवर जाग येणे कठीण आहे."
"अगदी अगदी. त्यात तुम्ही लिंडाला सोबत केलीत. मी समजू शकतो. त्या रात्री काय घडले ते सांगू शकाल?"
"लिंडाचा आवाज ऐकून मी जागी झाले. कपडे ठीक करते तोवर पावलांचा आवाजही आला. ते बघून मी खोलीबाहेर आले तर गॅरेथ आणि पीटर जिना उतरताना दिसले. मी त्याला आवाज दिला तर त्याने घाईगडबडीतच मला लिंडाची सोबत करण्यास सांगितले. मग मी लिंडाशेजारी जाऊन तिला धीर देण्याचा प्रयत्न केला. झाल्या प्रकाराने ती चांगलीच घाबरली होती. आता ती सावरल्यासारखं दाखवत असली तरी असलं काही बघण्याची तिने खासच अपेक्षा केली नसावी. अजूनही ती शॉकमध्येच आहे. गॅरेथ परत आल्यानंतर मी त्या दोघांचा निरोप घेतला आणि मग परत आपल्या खोलीत जाऊन झोपले."
"अच्छा. आता सर गॅविनविषयी, खरे तर तुमच्या खासगी आयुष्याबद्दल मला काही प्रश्न आहेत. तुमची हरकत नसेल तर?"
"मी हरकत घेऊनही काय उपयोग आहे?" आयरीन सुस्कारा सोडत म्हणाली.
"नाही तसं नाही…"
"ख्रिस! सॉरी मला लॉर्ड काल्डवेल म्हणायला जमणार नाही. तसेही तुमची लॉर्डशिप शंभर वर्षेही जुनी नाही. मला एवढे माहित आहे की भारतीय राजकुमाराचे नाव गोवल्यानंतर लंडनहून कोणी तपासाकरता येत असेल तर त्याच्यावर कोणा प्रभावशाली व्यक्तीचा वरदहस्त असलाच पाहिजे. मला या उतरंडीतले माझे स्थान चांगलेच समजते."
"ठीक आहे तर. मग आयरीन तुला कल्पना असेलच की माझा प्रश्न होस्बोर्ग या नावासंबंधित आहे. जेवढे मला कळले त्यानुसार तू अखेरची होस्बोर्ग आहेस."
"हो. १८५० च्या दशकात माझे वडील ऑस्ट्रेलियात व्हिक्टोरिया प्रांतात वास्तव्यास होते. सोन्याच्या खाणींमुळे श्रीमंत झालेल्या नशीबवानांपैकी ते एक. त्यांचा जन्म कॅनहॅम्प्टनचाच असला तरी त्यांची सर्व उमेदीची वर्षे ऑस्ट्रेलियातच गेली. दशकभर भरपूर पैसा कमावल्यानंतर बाबांनी पुन्हा कॅनहॅम्प्टनमध्ये लक्ष देण्यास सुरुवात केली. त्यावेळी माझे आजोबा, कॉलिन होस्बोर्ग, होस्बोर्ग मॅनोरचे लॉर्ड होते. स्थानिक जहागीरदार आणि धनाढ्य व्यापारी; दोघांना सोयरिक पसंत पडली. मग गॅविन हॉवर्ड आणि अलीना होस्बोर्ग यांच्या पोटी माझा जन्म झाला. मी खूप लहान असतानाच किरा आमच्या घरात दिसू लागली. आजोबा माझ्या जन्माच्या दोन वर्षे आधी वारले होते. आईची तब्येतही नाजूकच असायची. किरा सामान्य घरातली पण दिसायला सुंदर स्त्री होती. ती माझी सावत्र आई. माझी तिच्याकडून काही तक्रार नसली तरी हेही मान्य करावेच लागेल की आमचे फारसे पटलेही नाही. काही वर्षांपूर्वी तिचेही निधन झाले. मधल्या कालावधीत गॅरेथ आणि विल्यमचा जन्म झाला. विल्यमशी माझे चांगले पटते. गॅरेथसोबत वाद नाही म्हणणार मी, पण त्याची फिरकी घ्यायला मजा येते."
"मला वाटते एवढे पुरे. तुम्ही जाऊ शकता."

~*~*~*~*~*~

अ‍ॅलेक्सीने चहाचे कप आणल्यानंतर ख्रिसने डायरी मिटली. चहा वासावरून तरी अर्ल ग्रे वाटत होता. पण चव खूपच सौम्य होती.
"हा खरंच अर्ल ग्रे आहे?"
"हो हो. आल्बसने सांगितले की अर्ल ग्रेमध्ये संत्रे आणि लिंबू यांची साल मिसळल्यास चव सौम्य होते. आयरीन आणि लिंडा शक्यतो हा सौम्य चहा पसंत करतात. त्यामुळे वरच्या मजल्यावरील पँट्रीत कायम हा चहा असतो."
"हम्म. आयरीन आणि लिंडा." ख्रिस चहाची चव जिभेवर खेळवत स्वतःशीच विचार करत होता.
"पण मला एक कळले नाही सर. तुम्ही त्या कबंध घोडेस्वाराच्या घटनेला अवास्तव महत्त्व का देत आहात?"
"कारण त्याशिवाय हे क्लोज्ड सर्कल आहे का नाही हे कसे कळणार?"
"म्हणजे?"
"सर गॅविन यांचा मृत्यु शिरच्छेद झाल्याने झाला हे स्पष्ट आहे. त्यांच्या कण्याचे फ्रॅक्चर क्षणभर बाजूला ठेवू. आता प्रश्न हा उठतो की त्यांचा खून कुठे झाला? जर त्यांचा खून चॅपलमध्ये झाला असेल तर तो खून कोणीही केला असू शकतो. भलेही विजयला बर्टीने बाहेर पडताना पाहिले असले तरी इतर कोणी बाहेर पडलेच नाहीत हे सांगणे अशक्य आहे. दुसरी शक्यता अशी की कोणा बाहेरील अज्ञात शत्रूने गॅविन यांना ठार करून पोबारा केला. तसे असेल तर या अज्ञात शत्रूचे अस्तित्त्व सिद्ध करणारा पुरावा शोधावा लागेल."
"ओके. आणि खून जर मॅनोरमध्ये झाला असेल तर यांच्या प्रतिरुपी शक्यता गृहीत धराव्या लागतील."
"बरोबर. खून चॅपलमध्ये झाला असेल तर अज्ञात शत्रूचे अस्तित्व सिद्ध करणे कठीण आहे. पण जर खून मॅनोरमध्ये झाला असेल तर अज्ञात शत्रू अस्तित्वात नाही हे सिद्ध करता येऊ शकते."
"ते कसे?"
"जर अज्ञात शत्रू अस्तित्वात असेल तर त्याने मॅनोरमध्ये प्रवेश केलाच पाहिजे. दोन शक्यता असू शकतात. एक त्याने दिवसाढवळ्या सर्वांची नजर चुकवून मॅनोरमध्ये प्रवेश केला आणि तो रात्रभर कुठेतरी लपून बसला. मग आल्बसने पहिला चहा गॅविन यांच्या खोलीत नेईपर्यंत तो थांबला. सर गॅविन यांचा खून केला आणि मग त्यांचे शव घोड्यावर टाकून चॅपलमध्ये टाकून तो पसार झाला. किंवा ग्रीन नाईटचा फार्स करून त्याने गुपचूप मॅनोरमध्ये प्रवेश केला आणि बाकी घटनाक्रम तसाच."
"पण आल्बसच्या जबानीवरून तर तसे झाले असेल असे वाटत नाही."
"म्हणजे त्याने रात्री प्रवेश केला नसणार. जर त्याने दिवसा प्रवेश केला तर त्याला लपणे तसे अवघड नाही. पण मग गॅविनना चॅपलमध्ये न्यायची काय गरज होती? त्या कबंध घोडेस्वाराच्या घटनेचा फायदा घेण्यासाठी? तसे असेल तर त्याला कबंध घोडेस्वाराविषयक पूर्व कल्पना होती. पण मग हा घटनाक्रम खूपच विसंगत आणि हास्यास्पद आहे. जर त्याने घोडेस्वाराचा वापर लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी केला आणि त्या कालावधीत पलायन केले तर समजू शकतो. पण मग गॅविनचा मृत्यु तीन ते चारच्या दरम्यान व्हायला हवा. आणि त्यांचा मृत्युची वेळ डॉक्टरांनी सकाळी सात ते साडेसात सांगितली आहे."
"याचा अर्थ अज्ञात शत्रू अस्तित्वातच नाही."
"किंवा अज्ञात शत्रूला मदत करणारे कोणीतरी या मॅनोरमध्ये आहे. कसेही पाहिले तरी या खुनामागे मॅनोरमधीलच कोणाचा तरी हात आहे. नाहीतर हा सगळाच घटनाक्रम अतिशय विसंगत आहे. पण याने आपली डोकेदुखी अधिकच वाढते."
"ती कशी?"
"हेतु. या सर्वांपैकी कोणाकडेच खून करण्यासाठी सबळ कारण नाही. असले तरी आपल्याला ते ठाऊक नाही. आणि प्रिन्स वगळता कोणाच्याच अंगात एका धडधाकट व्यक्तीचा एका फटक्यात शिरच्छेद करण्याइतकी ताकद नाही."

~*~*~*~*~*~

पुढील कथासूत्र येथे वाचू शकता - https://www.maayboli.com/node/77764

Group content visibility: 
Use group defaults

मस्त सुरू आहे कादंबरी... ख्रिस विजयला यातून कसा बाहेर
काढतो आणि खऱ्या गुन्हेगारापर्यंत कसा पोचतो याची जाम उत्सुकता आहे.

विजयला काही अपघात होईल असे मला वाटले होते कारण अंधश्रद्धेवर व लिंडावर विश्वास ठेवायचा तर त्या रात्री विजयने हवेत हलक्याने का होईना पण तलवार चालवली आणि
त्या रात्री ग्रीन नाईटचे डोके उडाले .

अलेक्सिचे डिटेलवार पदार्थ.आणि ते वेगवेगळ्या चवीचे चहा.... मजा येतेय वाचायला.

तो मॅनोरचा कोणी व्यक्ती असता तर तो मॅनोरमध्ये परतला असता>>>>

व्यक्ती हा शब्द वर दोन तीनदा वापरला गेला व तो पुरुष व्यक्तिरेखेसंदर्भात वापरल्यामुळे 'तो व्यक्ती' असे लिहिलेय. व्यक्ती हा शब्द स्त्रीलिंगी आहे. पुरुष व्यक्तिरेखेसंदर्भात वापरला तरी 'ती व्यक्ती' असेच लिहावे लागणार. हल्ली सगळीकडे तो व्यक्ती असेच वाचायला मिळते आणि दाताखाली खडा आल्यासारखे वाटते Sad Sad

अज्ञात शत्रू Lol
मस्त उत्कंठा वर्धक कादंबरी!
आणि खर्‍या गुन्हेगाराला अगदी वेगळं, दुर्लक्षित आणि, ज्याच्याबद्दल जराही शंका वाटणार नाही असं ठेवण्यातही तुम्ही यशस्वी झाला आहात! (बहुतेक!)

याबद्दल एक इंग्लिश काउंटी चहा माझ्याकडून!

साधना, जाई, जिज्ञासा, हर्पेन, आंबट गोड, ए_श्रद्धा, maitreyee, आसा - प्रतिसादांकरिता आभार Happy

हल्ली सगळीकडे तो व्यक्ती असेच वाचायला मिळते आणि दाताखाली खडा आल्यासारखे वाटते >> एक डाव माफी असावी. बदल केले आहेत.

व्हिस्काऊंट >> व्हायकाउंट असा उच्चार आहे ना? >> हो. दुरुस्ती केली आहे.

एक इंग्लिश काउंटी चहा माझ्याकडून! >> Happy

एक्स्ट्रा फीचर १

होस्बोर्ग मॅनोरचा नकाशा. नकाशा प्रमाणबद्ध नाही. तसेच बारीक सारीक तपशील जसे की वर्‍हांडे, दारे खिडक्या वगैरे दाखवलेले नाहीत. ख्रिसच्या बरोबरीने विचार करता यावा यादृष्टीने या नकाशांत पुरेशी माहिती आहे.

तळमजला

hosborg-manor-floor-0.png

* ने मॅनोरमध्ये प्रवेश करण्याचे मार्ग दाखवले आहेत. सर्व खोल्यांची दारे पूर्व/पश्चिम आहेत. खिडक्या बाहेरच्या बाजूला आहेत. रेषांकित भाग म्हणजे क्लॉयस्टर. याचा अर्थ उघडा वर्‍हांडा घेऊ शकता. बाहेरून क्लॉयस्टरमध्ये प्रवेश करत येईल पण मॅनोरमध्ये आणि वरच्या मजल्यावर नक्कीच जाता येणार नाही.

वरचा मजला

hosborg-manor-floor-1.png

रेषांकित भागात काही बांधकाम नाही.

एक्स्ट्रा फीचर २

बॅस्करव्हिल आणि स्ट्रँड मासिक

स्ट्रँड मासिकाची सुरुवात जॉर्ज न्यून्सने १८९१ मध्ये केली. मुख्यत्वे लघुकथांसाठी वाहिलेल्या या मासिकाची लोकप्रियता वाढण्यामागे शेरलॉक होम्सच्या कथांचा मोठा वाटा होता. पण त्या खेरीज वुडहाऊस, टॉलस्टॉय, एच जी वेल्स, किपलिंग इ. लेखकांनीही स्ट्रँडसाठी लेखन केले. डोरोथी सेयर्स आणि अ‍ॅगाथा ख्रिस्ती यांच्या रहस्यकथाही स्ट्रँड मासिकाने प्रकाशित केल्या. ही यशोगाथा १९५० पर्यंत चालू होती.

१९०१-०२ मध्ये स्ट्रँडने खपाचा उच्चांक गाठला. याचे मुख्य कारण होम्सचे पुनरागमन! १८९३ मध्ये डॉयलने आपल्या मानसपुत्राला मोरिआर्टीसमवेत निरोप दिला आणि लंडनकरांनी पुढील आठ वर्षे होम्स परत आणण्यासाठी धरणे धरले. अनेकांनी तर होम्स परत येईपर्यंत स्ट्रँडचे अंक विकत घ्यायला नकार दिला. अखेर डॉयलने चाहत्यांच्या आग्रहाचा मान राखून १९०१ च्या ऑगस्टमध्ये हाऊंड ऑफ बॅस्करव्हिलमधून होम्सला परत आणले. त्याचे अधिकृत पुनरागमन आणि मोरिआर्टीपासून तो कसा वाचला याचा उलगडा व्हायला ऑक्टोबर १९०३ उजाडावा लागला. ऑक्टोबर १९०३ मध्ये अखेर द अ‍ॅड्व्हेंचर ऑफ द एम्प्टी हाऊसमधून होम्स खर्‍या अर्थाने परतला.

आपले कथानक १९०२ च्या जुलैमध्ये घडते आहे. होम्स आणि डिटेक्टिव्ह फिक्शनचा चाहता या नात्याने ख्रिसकडे ऑगस्ट १९०१ - एप्रिल १९०२ (बॅस्करव्हिलचा प्रकाशनकाल) चे स्ट्रँडचे सर्व अंक असणे साहजिक आहे.

अवांतर : नुकताच नेट्फ्लिक्स वर गन्स ऑफ नॅव्हेरॉन बघितला....अप्रतिम युद्ध पट! पण त्यात एक चूक आढळली ती म्हणजे....
एकदा मॅलरी - सो व्हेरी हँडसम आणि देखणा - ग्रेगरी पेक - म्हणतो .. की फारतर ... हर मॅजेस्टीची जहाजं बुडतील! हा चित्रपट दुसर्‍या महायुद्धातला काळ दाखवतो ना? मग तेव्हा तर जॉर्ज सहावे गादीवर होते! हिज हायनेस् म्हणायला हवे होते ना?
पण हा सिनेमा प्रत्यक्षात १९६१ मधे रिलीज झाल्याने तेव्हा राणी गादीवर होती!

मला हे लक्षात आल्याने फार भारी वाटत आहे..म्हणून इथे लिहीले.

मस्त सुरू आहे. डिटेलिंग फारच भारी असतं तुमचं. जेवणाचे पदार्थ आणि चहाची वर्णनं वाचताना मजा येतेय.

मी नकाशा द्या असं सुचवणारच होते. नकाशाबद्दल धन्यवाद.

ओहो.....गॅविनचं घड्याळ गायब म्हणजे कोणीतरी मनोर्याच्या घड्याळ्याच्या वेळेत फेरबदल केलेला दिसतोय रात्री. खरी वेळ कळू नये म्हणून घड्याळ गायब केलंय बहुतेक. मजा येतेय वाचायला.

बाकी कश्यासाठी नाही तर ह्या ब्रेकफास्टसाठी तरी इंग्लिश व्हावंसं वाटतंय Proud

भारी लिहीलंय. एखादी इंग्रजी कादंबरी वाचतोय असं वाटलं.
यात एक नाव विजय आहे ते खटकतंय सारखं. भारतियांची असतात कि नावं जॉन, मायकेल अशी. हिंदू पण असतात रणछोडदास चा रॉनी.
नाहीतर मग बाकीच्या पात्रांची नाव गंगाक्का, रामभाऊ, दगडू अशी असती तर मजा आली असती.