कबंध घोडेस्वाराचे रहस्य : भाग ०

Submitted by पायस on 30 December, 2020 - 04:59

स्टॅफोर्डशायर परगण्याचा भूगोल अतिशय सुंदर आहे. विस्तीर्ण पसरलेली गवताळ मैदाने अर्थात मूर आणि त्या पटावर सागरगोट्यांप्रमाणे मांडलेल्या टेकड्या. टेकड्यांच्या माथ्यावरून ही मैदाने मोठी देखणी दिसतात. जणू उत्कृष्ट दर्जाचा हिरवा कॉर्सेट घालून एक तरुणी पहुडली आहे. अशा सुंदर प्रदेशात आपले घर असणे ही भाग्याची गोष्ट आहे. सर गॅविन हॉवर्ड हा असाच एक भाग्यवान पुरुष! हॉवर्ड घराण्याकडे कॅनहॅम्प्टन येथील लॉर्डशिप आहे. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस मर्चा (Murchadh) होस्बोर्ग यांनी इथल्या जुन्या घराचा कायापालट करून नवीन वास्तु बांधली. त्यालाच आज होस्बोर्ग मॅनोर नावाने ओळखतात. होस्बोर्ग मॅनोर अगदी आलिशान किंवा अवाढव्य नाही पण एखाद्या लॉर्डला शोभून दिसतो. त्याची शोभा वाढवणारे एक टरेट क्लॉक त्याच्या शेजारीच आहे. घड्याळ्याच्या मनोर्‍याची उंची मॅनोरपेक्षा किंचित अधिकच आहे. विशिष्ट मिश्रधातुने बनवलेल्या घंटेचे मंजुळ टोले देण्याचे काम ते चोख करते. या सर्व व्यवस्थेत नाव ठेवायला जागा म्हणून नाही. पण .....

मॅनोरपासून थोड्याच अंतरावर चढ सुरु होतो. किंबहुना रोज रपेट करता यावी या हेतुने मॅनोरची जागा अचूक निवडली आहे. टेकडीवर झाडी असली तरी रान माजले आहे असे म्हणता येणार नाही. माथ्यावरून होस्बोर्ग मॅनोर व घड्याळाचा मनोरा चित्रकारासाठी मांडून ठेवलेले स्टिल लाईफ दिसतात. दुर्दैवाने ही टेकडीच या मॅनोरला गालबोट लावून जाते. जेव्हा जेव्हा मी या परिसरात घडलेल्या त्या चमत्कारिक हकीगतीचा विषय काढतो तेव्हा तेव्हा ख्रिसचे डोळे क्षणभर चमकतात. अजूनही ख्रिस तिला "कबंध घोडेस्वाराचे रहस्य" असेच संबोधतो.
- अ‍ॅलेक्सी

~~~~~~~

होस्बोर्ग मॅनोर
कॅनहॅम्प्टन, स्टॅफोर्डशायर
जुलै १९०२

घोडागाडी मॅनोरपाशी येऊन थांबली. गाडीवान लगबगीने सामान उतरवायला धावला. तोवर गाडीतून उतरणार्‍या दोघा तरुणांचे स्वागत करायला बटलर आल्बस हेंडरसन पुढे सरसावला. यातील एकाची हेंडरसनशी चांगलीच ओळख होती. तो होस्बोर्ग मॅनोरच्या मालकांचा मुलगा विल्यम हॉवर्ड होता. विल्यम बावीस वर्षांचा होता. तपकिरी केस, मूळचा पांढरा गोरा पण आता काहीसा रापलेला चौकोनी चेहरा, मध्यम उंची. शरीर पीळदार नसले तरी बांधेसूद होते. मिसरुड फुटले असले तरी मित्राप्रमाणे व्यवस्थित मिशी यायला अजून अवकाश होता. त्याचा मित्र सहा फूट तरी उंच असावा. दिसायला समवयस्क, काळे केस, काहीसा लांबुळका पण राजबिंडा चेहरा, गहुवर्ण, पीळदार शरीर. पाश्चिमात्य कपड्यांची सवय नसल्याने काहीसा अवघडला असला तरी राजघराण्याची चिन्हे लपत नव्हती. विल्यमला ओळख करून द्यावी नाही लागली.
"वेलकम प्रिन्स विजय! वेलकम टू द होस्बोर्ग मॅनोर!"

*******

१९०२ ब्रिटिश इतिहासात आपले आगळे स्थान राखून आहे. १९०१ मध्ये व्हिक्टोरिया राणीचे निधन झाल्यानंतर प्रिन्स एडवर्ड यांच्याकडे राजपद आपसूकच आले. आपला राज्यारोहण सोहळा भव्य व्हावा ही त्यांची इच्छा पूर्ण करण्याकरिता सोहळा आयोजकांनी दीड वर्ष खर्चून भव्य सोहळ्याचे आयोजन केले. २६ जून १९०२ रोजी हा समारंभ होणार होता. याकरिता देशोदेशींचे राजे-रजवाडे लंडनमध्ये दाखलही झाले. यात अनेक भारतीय संस्थानिकांचाही समावेश होता. पण आयत्या वेळी राजे सातवे एडवर्ड यांना अपेंडिसायटिस झाल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्या सर्जरीच्या कारणाने तारीख पुढे ढकलावी लागली. एडवर्ड यांच्या आग्रहाखातर ठरल्या दिवशी मेजवानी आणि काही नियोजित कार्यक्रम पार पाडले गेले. पण मुख्य समारंभासाठी सर्व राजे, खासकरून भारतीय पाहुणे थांबणे कठीण होते. त्यानुसार काही संस्थानिक भारतात परतले. विजय सिंहचे वडील भारतात परतणे पसंत करणार्‍यांपैकी एक होते. विजयला मात्र परत जायची आवश्यकता नव्हती. त्याला विल्यमकडून होस्बोर्ग मॅनोरच्या पाहुणचाराचे आमंत्रण होते.

विजय पंजाबातील एका संस्थानाचा युवराज होता. विल्यमला हळूहळू राजकारणात आणावे या हेतुने गॅविन यांनी त्याची पंजाबात एक वर्ष नेमणूक करवून घेतली. विल्यम काम कितपत शिकला हा वेगळा मुद्दा आहे. पण या निमित्ताने त्याने विजयचे आदरातिथ्य उपभोगले. आता यजमान बनण्याची पाळी विल्यमची होती. विजय स्वतः पूर्वी शिक्षणाकरिता इंग्लंडमध्ये राहिला होता. त्याचे इंग्रजी अगदी फर्डे नसले तरी स्थानिकांना सहज समजण्यासारखे होते. तिशी ओलांडायला अजून दोन वर्षे असली तरी तुलनेने समज चांगली होती. आपले संस्थान तुलनेने छोटे असल्याने एखाद्या लॉर्डशी सौहार्द संबध जोडण्याचे फायदे-तोटे त्याला कळत होते. सारासार विचार करून त्याने हे आमंत्रण स्वीकारले होते. तसेही लंडनच्या रुक्ष वातावरणापेक्षा कॅनहॅम्प्टनचा निसर्गरम्य प्रदेश कोणीही पसंत केला असता. गॅविन यांनाही या पाहुण्याचे महत्त्व ठाऊक होते. त्यानुसार जवळ जवळ महिनाभर मुक्काम करून, राज्यारोहण समारंभास हजेरी लावून मग विजय स्वगृही परतणार असे ठरले.

राजकारणाचा भाग सोडला तरी विजयला लंडनपासून दूर असा निवांतपणा हवाहवासा वाटण्याचे आणखी एक कारण होते. सततच्या अंगरक्षकांच्या गराड्याला तो कंटाळला होता. विदेशात शिक्षण घेतानाही त्याच्या सोबत एक नोकर दिलेला असायचाच. आता त्याला काही काळ तरी शांतता हवी होती. गॅविन यांनी त्याच्या सुरक्षेची हमी दिली तेव्हा कुठे राजासाहेबांनी, म्हणजे विजयच्या वडलांनी विजयला एकट्याला जाऊ दिले होते. गॅविनना वैयक्तिक पातळीवर ही व्यवस्था कितपत पसंत होती हे सांगणे कठीण होते. कदाचित विल्यमवरील प्रेमापोटी त्यांनी होकार दिला असू शकेल. कदाचित त्यांचा काही इतर स्वार्थही असू शकेल. तसेच विल्यम आणि विजयची मैत्री भविष्यात कितपत टिकेल, समजा टिकली तरी त्यातला निखळपणा असाच कायम राहिल का हे आणि असे इतर अनेक प्रश्न विचारून काथ्याकूट अनंत कालावधीपर्यंत करता येईल. पण आपल्या रहस्यापुरते लळीत 'विजय होस्बोर्ग मॅनोर येथे एकटा राहायला आला' एवढेच पुरे!

मॅनोरमध्ये प्रवेश करण्याचा मुख्य मार्ग कोर्टयार्डमधून होता. दुतर्फा निगा राखलेल्या रोपांची रांग होती. त्या रांगेच्या मागे मॅनोरच्या दोन विंग होत्या. मुख्य दरवाज्यातून प्रवेश करताच एक छोटीशी खोली होती. इथे बटलर किंवा इतर नोकरांनी पाहुण्यांना रिसीव्ह करणे, त्यांची कोटटोपी, काठी ताब्यात घेणे इ. सोपस्कार पार पाडणे अपेक्षित होते. या खोलीचे दुसरे टोक पुन्हा प्रशस्त अशा मोकळ्या जागेत उघडत होते. समोरच दोन्ही विंग्जच्या वरच्या मजल्यांना जोडणारा एक जिना होता. या जिन्याच्या पायर्‍यांवर उत्तम दर्जाचे कापड होते. जिन्याला जिथे फाटा फुटत होता तिथे मर्चा होस्बोर्ग यांची तरी तसबीर होती.

"तुमची खोली उजव्या अंगास वरच्या मजल्यावर आहे. तुमचे सामान तुमच्या खोलीत पोहोचवण्याची सोय आधीच करण्यात आली आहे. खोलीला जोडूनच न्हाणीघर आहे. तुम्ही ताजेतवाने झालात की सर गॅविन तुमची लायब्ररीत भेट घेतील." आल्बसने आपल्या मागून यायचा इशारा केला. जिना चढून ते एका प्रशस्त दिवाणखान्यात प्रवेश करते झाले. या दिवाणखान्याच्या दोन टोकांना दोन वर्‍हांडे निजण्याच्या खोल्यांकडे जात होते. कोर्टयार्डातून दिसणार्‍या खिडक्या बेडरूम्सच्या होत्या तर, विजयने मनोमन नोंद केली. त्याची खोली विल्यमच्या शेजारीच होती. दिवाणखान्याला मात्र कोर्टयार्डाच्या विरुद्ध दिशेला खिडक्या होत्या. तिथून मॅनोरच्या बागेचे दर्शन घडत होते. पण मॅनोरचे संपूर्ण दर्शन घेण्याआधी प्रवासाने आलेला थकवा दूर करणे गरजेचे होते. विजयने कपडे बदलून विल्यमसोबत लायब्ररीची वाट धरली. तळमजल्यावर उजव्या अंगाला, त्यांच्या बेडरूम्सच्या खाली लायब्ररी आणि गॅविन यांची खोली होती. लायब्ररीत जाण्याकरिता ग्रेट हॉलमधून रस्ता जात होता. एखाद्या उमरावाला साजेसा ग्रेट हॉल होस्बोर्ग मॅनोरमध्ये होता. लायब्ररीत सर गॅविन काहीतरी वाचत बसले होते. विजय दिसताच ते उठून त्याला भेटले. उंची साधारण विल्यम इतकीच पण रंग अधिक गोरा, पिंगट केस कल्ले राखलेले, डोळ्यांवर सोनेरी काड्यांचा चष्मा, रुंद चेहरा, बसके नाक, गुळगुळीत केलेली दाढी. अंगात ऑफ-व्हाईट रंगाचा शर्ट, त्यावर हिरवे जाकीट आणि त्याच रंगाची पँट, रेघारेघांचा सैलसर टाय. वरकरणी छाप पाडणारे रुपडे नसले तरी डौलदार हालचालींमधून त्यांचा प्रभाव जाणवत होता. हस्तांदोलन करताच विजयला समजले की अजूनही पकडीत जोर कायम आहे. दोन हात करायची वेळ आली तर म्हातारा कोणापेक्षाही कमी नाही.

"प्रवास कसा झाला? वाटेत काही अडचण तर नाही आली?"
"नाही. विल्यम सोबत होताच आणि इथल्या ट्रेन अतिशय आरामशीर आहेत. त्यात खिडकीतून दूर जाणारे धुरकट लंडन आणि हा जवळ येणारा हा सुंदर प्रदेश बघितल्यावर कोणाचीही चर्या खुलून येईल."
"आय सी दॅट यू हॅव अ वे विथ वर्ड्स. आय लाईक दॅट." गॅविनची नजर विजयवर खिळली असली तरी ती भेदक वगैरे अजिबातच नव्हती. विजयला मोकळे वाटायला लावणारा अदबशीर सूर आणि जोडीला मंद स्मित!
"थकला असाल. हा तजेला तात्पुरताच असतो. दुपारच्या जेवणाला थोडा अवकाश आहे पण आपण थोडं खाऊन घेऊया. रात्रीच्या जेवणापर्यंत सर्वांशी भेट होईलच. अर्थात तुझी काही हरकत नसेल तर?"
"छे छे हरकत कसली." विजयला भूक लागली होतीच. ते तिघे ग्रेट हॉलमध्ये आले. त्यांच्यासाठी टेबल खुर्च्या मांडल्या होत्या. आल्बस सोबत आणखी एक तरुण होता. त्याने झपाझप ताटं मांडली. मग तो ओटकेक्स घेऊन आला.
"हा बर्ट्रांड उर्फ बर्टी. होस्बोर्ग मॅनोरचा अधिकृत कुक. बर्टी स्वयंपाकघराचा मुखत्यार आहे. काहीही फर्माईश असेल तर बर्टीला सांग. त्याला भारतीय स्वयंपाकही चांगला येतो."
बर्टी आपल्या कौतुकाची दखल घेण्यापुरता हसला. त्याने प्रत्येकाच्या ताटात दोन दोन ओटकेक्स वाढून सुरुवात केली. ओटकेक्समध्ये सारण म्हणून चीझ आणि मशरुम्स होती. सोबत उत्कृष्ट दर्जाचा घरगुती टोमॅटो सॉस होता. स्थानिक भाज्यांचे सॅलड होते. प्रत्येकाच्या आवडीनुसार दूध-साखर घालून चहाचे कपही तयार झाले.
"ओहो, बर्टीचे स्पेशल ओटकेक्स!"
लेमन यलो रंगाचा ड्रेस घातलेली एक युवती त्यांच्याच दिशेने येत होती.
"आयरीन डिअर! जॉईन अस. विजय, ही आयरीन, माझी मुलगी. आयरीन हिज हायनेस विजय, प्रिन्स ऑफ ___"
आयरीनने विजयच्या समोरची खुर्ची ओढली. वयाने ती विजय एवढीच वाटत होती, उंचीला विल्यमपेक्षाही दोन इंच बुटकीच, निळे डोळे, काळेभोर केस. तिच्या चेहर्‍यावर एक खेळकर हास्य होते.
"अ प्रिन्स! व्हॉट अ‍ॅन एक्स्ट्राऑर्डिनरी गेस्ट यू हॅव ब्रॉट विल! पण प्रिन्स विजय, मी हिज हायनेस म्हणत बसणार नाही. फार फार तर प्रिन्सपर्यंत मजल जाईल." विजयने हसून मान डोलाविली. ही भेट वगळता अल्पोपाहारादरम्यान विशेष काही घडले नाही. विल्यम आणि आयरीनने विजयला मॅनोरची धावती भेट घडवून आणली. त्यातच जवळ जवळ सर्व दिवस गेला.

रात्रीच्या जेवणात ताजा ब्रेड, चित्रा राजमा घालून केलेले गूज सूप, स्टफ्ड क्रीम मशरूम्स होते. डेझर्टमध्ये कॅबिनेट पुडिंग. मॅनोरमध्ये राहणार्‍या सर्वांशी ओळखही झाली. गॅविन यांची पत्नी वारल्याला काही वर्षे होऊन गेली होती. त्यांना तीन मुले - आयरीन, गॅरेथ आणि विल्यम. आयरीन व विल्यम अजूनही अविवाहित होते. गॅरेथचे वर्षाभरापूर्वीच लग्न झाले होते. त्याची पत्नी लिंडा एका प्रतिष्ठित स्थानिक घराण्यातील होती. गॅरेथ कॅनहॅम्प्टनच्या इस्टेटीचा कारभार पाहत होता. आयरीन कलाकार होती. तिने लंडनला जाऊन चित्रकलेचे धडे घेतले होते. कदाचित ती लेखिकाही बनू शकली असती. पण एकसुरी कामधंदा करायचा नाही हे पक्के होते. तर विल्यम हिंदुस्तानात अधिकारी बनण्याची वाट चालू लागला होता. विजयला तरी हे एक सुखी कुटुंब वाटले. घरात वास्तव्य करणारे तीनच नोकर होते. आल्बस आपल्या पत्नीसोबत, ग्रेटासोबत राहत होता. घराची बहुतांश व्यवस्था त्या दोघांकडे होती. तर बर्टी एकटा जीव स्वयंपाकघराची जबाबदारी सांभाळत होता. दिवसा गरज असेल त्याप्रमाणे त्यांच्या मदतीला कॅनहॅम्प्टनमधून काहीजण येत असत. पण सूर्य मावळायच्या आत ते गावात परतलेले असत. याखेरीज पीटर म्हणून एक अभ्यासक त्यांच्या आश्रयास होता. पीटर तसा अबोलच दिसला. विजयच्या मते जसे मायदेशात गुणीजनांना आश्रय द्यायची पद्धत आहे तसाच हा प्रकार होता. मग त्यानेही फार विषय वाढवला नाही. कुठल्यातरी क्लिष्ट विषयावर चर्चा करण्यासाठी तो तिथे आला नव्हता. सर्वांना गुडनाईट म्हणून विजयने बिछान्यावर अंग टाकले तेव्हा तो खूपच समाधानी होता. त्याला अपेक्षित असलेला निवांतपणा इथे होता. त्याला कधी गाढ झोप लागली त्याचे त्यालाही कळले नाही.

~*~*~*~*~*~

पुढचा आठवडा विजयच्या अपेक्षेप्रमाणेच शांततेत पार पडला. त्याला जो सावकाश वेगाने चालणारा दिनक्रम अपेक्षित होता तो बव्हंशी प्रत्यक्षात उतरला. सूर्योदयासोबत होणार्‍या पक्ष्यांच्या किलबिलाटाने जागे व्हायचे. ग्रेट हॉलमध्ये गॅविन आणि आयरीन सोबत न्याहारी करावी. गॅविनसोबत रपेटीकरिता जवळच्याच टेकडीची चक्कर मारावी. दुपारच्या जेवणापर्यंत कॅनहॅम्प्टन किंवा आसपासचा निसर्ग भटकण्यात वेळ घालवावा. नंतर घराजवळच्याच एखाद्या झाडाखाली हलकी डुलकी घ्यावी. किंवा विल्यमसोबत सश्यांची शिकार करावी. किंवा आयरीनसोबत त्यांची फुलांची बाग बघावी. गॅरेथसोबत त्यांच्या इस्टेटवर चक्कर मारावी. त्यांच्या कारखान्याला भेट देण्यास वेळ झाला नसला तरी पुढच्या आठवड्यात एक दिवस तिकडे जाण्याचा त्याने नक्की केले. यानिमित्ताने कायद्याच्या चौकटीतून काही व्यापारिक संबंध जोडता आले, तर तेही फायद्याचेच होते. या अनुषंगाने तसेच इतर विषयांवर गॅविन यांच्यासोबत लायब्ररीत चर्चा करावी. जेवणाची तयारी होईपर्यंत थोडा वेळ वाचन करावे. ग्रेटाचे पियानो वादन ऐकता ऐकता सुग्रास जेवणाचा आस्वाद घ्यावा. रात्री घड्याळाच्या टोल्यांच्या निनादात झोपी जावे.

अरे हो, मॅनोरच्या मुख्य आकर्षणाविषयी, त्या घड्याळ्याविषयी तर काही बोलणे झालेच नाही. होस्बोर्ग मॅनोर एका लॉर्डचे घर आहे. कालपरत्वे त्याची डागडुजी, नूतनीकरण झाले असले तरी भूतकालाच्या खुणा मागे राहतातच. तर होस्बोर्ग मॅनोर एका लॉर्डचे घर आहे. आज तो मॅनोर असला तरी कधी काळी ती विस्तीर्ण अशी गढी होती. आजचे कॅनहॅम्प्टन म्हणजे तुरळक घरांची वस्ती होती. त्यातील अनेक घरे तर गढीच्या कोटाच्या आत होती. अशा गढीमध्ये सहसा एक कीप असते. कीप म्हणजे तटबंदी केलेली मनोरावजा इमारत. हिचा उपयोग मुख्यत्वे टेहळणीकरिता होतो. कधी काळी लॉर्ड होस्बोर्ग यांनी जेव्हा होस्बोर्ग मॅनोरची बांधणी केली तेव्हा या कीपचे रुपांतर टरेट क्लॉकमध्ये करण्यात आले. टरेटचा अर्थ इथे टॉवर असा घ्यायचा. मुख्य मुद्दा असा की मनोर्‍याच्या टोकाला चारही बाजूंनी क्लॉक डायल्स असतात. एका मोठ्या लंबकाला काटेकोर यांत्रिकी रचनेने ही सर्व डायल्स, त्यांचे काटे जोडले जातात. घड्याळ्याच्या घंटेचा मिश्रधातु विचारपूर्वक मंजुळ आवाज देणारा निवडला जातो. हा मनोरा ५० फूट उंच होता. याची डायल्स साधारण ८ फूट व्यासाची होती. मिनिट काटा ३ फूट तर तास काटा १ फूट लांब. मनोर्‍यातील घड्याळाचे काटे क्रोम स्टीलचे होते. क्रोम स्टील सहसा विविध अवजारांसाठी वापरतात जसे की सुरी, चाकू, नट-बोल्ट्स, बॉल बेअरिंग्ज इ. यामुळे घड्याळाचे काटे गंजण्याची शक्यता कमी होती आणि देखभाल सुलभ. दोन्ही काट्यांना लीडिंग-ऑफ रॉडवर फिट केले होते. ही रॉड बेव्हल गिअर्सच्या मदतीने ग्रासहॉपर एस्केपमेंटच्या मदतीने ३९ इंच लांबीच्या पेंड्युलमला जोडली होती. एस्केपमेंटच्या गिअरचे दातांची लांबी काटेकोर मोजमाप केलेली होती. दोन काट्यांमध्ये या सर्व असेंब्लीला तोलून धरणारा नट बसवला होता. त्याची रुंदी जवळ जवळ ३ इंच होती. एकदा मनोर्‍यात हे सर्व बसवले की त्या मनोर्‍याचा उपयोग केवळ वेळ दर्शवणे एवढाच उरतो. पण अजूनही वैयक्तिक घड्याळे ही चैन असल्यामुळे टरेट क्लॉक्स प्रचलित होती.

कॅनहॅम्प्टनमध्ये हे मनोर्‍याचे घड्याळ वगळता केवळ सर गॅविन यांच्याकडे एक पॉकेट वॉच तेवढे होते. तसे रेल्वे स्टेशनमध्येही एक घड्याळ होते पण रोज रोज स्टेशनमध्ये केवळ वेळ पाहण्यासाठी कोण जाईल? मनोर्‍याच्या घड्याळाचे टोले दूरवर ऐकू जात आणि तेवढे पुरेसे होते. गॅविन यांच्या श्रीमंतीची कल्पना या पॉकेटवॉचवरून करता येते. ते घड्याळ लांगे आणि झूनं या ग्लासहुटं येथील प्रसिद्ध जर्मन क्लॉकमेकर्सनी बनवले. लांगे आणि झूनं यांची घड्याळे दस्तुरखुद्द कैसर विल्हेम वापरतात. पण इतरांची भिस्त या मनोर्‍याच्या घड्याळावरच होती.

विजय तो मनोरा बाहेरून रोजच बघत असे. त्याच्या खिडकीतून केवळ एक डायलच तेवढे दिसत असे. टोले मात्र अगदी सुस्पष्ट ऐकू येत असत. होस्बोर्ग मॅनोरचा आकार यास कारणीभूत आहे. मॅनोर एच अक्षराच्या आकारात बांधलेला आहे. हा एच उत्तर-दक्षिण पसरला आहे. पूर्वेला लंडनकडून येणारे रस्ते कॅनहॅम्प्टनमधून जाणार्‍या मुख्य रस्त्यास मिळतात. हा रस्ता असाच पुढे जाऊन आधी या घड्याळापाशी पोहोचतो. पूर्वी घड्याळ्याच्या जागी असलेल्या कीपमधून या वाटेवर नजर ठेवली जात असणार. मग एचचे वरचे टोक, म्हणजे लायब्ररी आणि बेडरुम्सच्या विंग्ज येतात. पुढे हाच रस्ता समुद्रास जाऊन भिडतो. मॅनोरचा मुख्य दरवाजा उत्तराभिमुख आहे. या दरवाज्यातून प्रवेश केला की एचमधील आडवी रेष म्हणजे तळमजला व ग्रेट हॉल लागतात. एचच्या उभ्या रेघा पूर्ण करण्यासाठी दोन्ही बाजूंना दक्षिणेस लांबलेले क्लॉयस्टर्स आहेत. इतर खोल्यांची दारे या क्लॉयस्टर्समध्ये उघडतात. क्लॉयस्टर्सच्या डोक्यावर, वरच्या मजल्यावर गेस्ट बेडरुम्स, आयरीनकरता बांधलेला एक छोटेखानी स्टुडिओ, बटलर्स क्वार्टर आहेत. तसेच एक छोटेखानी किचनही आहे. पण त्याचा उपयोग आयत्या वेळी हुक्की आलीच तर चहा किंवा चीझ सँड्विचेस बनवण्यापुरताच! पूर्वेच्या क्लॉयस्टरमध्ये संग्रहाच्या खोल्या आहेत. हौसेने जमवलेली पेंटिंग्ज, शिल्पकलेचे नमुने, दुर्मिळ पुस्तके, परंपरागत चालत आलेली काही शस्त्रे, चिलखते अशा गोष्टी इथे आहेत. पश्चिमेकडेच्या खोल्यांचा मुख्य उपयोग स्टोररुम म्हणून केला जातो. इथे विशिष्ट प्रसंगांसाठीचे खास कपडे, वाद्ये, क्रिकेटचे साहित्य असे काहीबाही असते. वेळ पडल्यास पार्टिशन पाडून आणखी एक बेडरुमही तयार करता येते. पश्चिमेकडच्या क्लॉयस्टरपासून एक छोटी पायवाट स्वयंपाकघराकडे जाते. स्वयंपाकघराला लागूनच बर्टीची खोली आहे. बर्टी व विल्यमचे विजयला स्वयंपाकघराच्या तळघरात वाईन चाखण्याचे खुले आमंत्रण होते. विजयने अजून भेट दिली नसली तरी त्याची खात्री होती की उत्तम प्रतीच्या वाईनची बॅरल्स त्या तळघरात असणार.

एकंदरीत नावे ठेवायला जराशीही जागा नव्हती. पण हे कोणास ठाऊक होते की होस्बोर्ग मॅनोरच्या या प्रखर दिव्याखालचा अंधार लवकरच आपले अस्तित्त्व दाखवून देणार होता.

~*~*~*~*~*~

मॅनोरच्या दक्षिणेस एक सुंदरशी टेकडी आहे. आज वेगळी वाट म्हणून गॅविन व विजय या टेकडीवर आले होते. टेकडी चढता चढता विजयला एका फांदी चाटून गेली. किरकोळ खरचटले तेवढे होते. विजय ओशाळून हसले. गॅविन यांनीही डोळे मिचकावत विचारले,
"तुझा दंतकथांवर कितपत विश्वास आहे?"
"विशेष नाही. का?"
"माझाही फारसा नाही पण इथल्या दंतकथांवर विश्वास ठेवायचा तर तुला ही फांदी तोडण्याचा हक्क आहे. नव्हे तू ही फांदी तोडलीच पाहिजेस."
"हं. मग तर ही दंतकथा ऐकलीच पाहिजे."
"खरंतर दंतकथा कमी आणि पुराणकथाच म्हणावी लागेल. पण हरकत नाही तेवढाच विरंगुळा. ब्रिटिश बेटांमध्ये किंग आर्थरहून दुसरे मोठे नाव नसेल. किंग आर्थर, मर्लिन, मॉर्गन ल फे ही नावे आम्ही सर्व लहानपणापासून ऐकतो. किंग आर्थरच्या नाईट्सच्या कथाही प्रचंड लोकप्रिय आहेत. यामध्येच एक आहे सर गवेन आणि ग्रीन नाईटची कथा."
"ग्रीन नाईट?"
"हो. कारण त्याचे चिलखत, शिरस्त्राण इत्यादी हिरव्या रंगाचे आहे. एनी वे मी फार पाल्हाळ लावत बसणार नाही. थोडक्यात सांगायचे तर हा ग्रीन नाईट एकदा आर्थरच्या दरबारात आला. त्याने एक विचित्र घोषणा केली. दरबारातील कोणीही त्याच्यावर एक वार करावा. तो मागे हटणार नाही. त्या बदल्यात एका वर्षानंतर वार करणार्‍याने ग्रीन चॅपल येथे यावे आणि ग्रीन नाईटचा वार झेलावा. सर गवेनने हे आव्हान स्वीकारून ग्रीन नाईटचा शिरच्छेद केला. पण आश्चर्यजनकरित्या ग्रीन नाईटने आपले डोके उचलले आणि वचनाची आठवण करून तो निघून गेला. त्यानंतर अनेक गोष्टी घडतात पण अखेरीस सर गवेन जाऊन ग्रीन नाईटचा वार झेलतो. वचन पाळल्यामुळे गवेन जिवंत राहतो आणि अनेक जादुई भेटवस्तुंसहित परततो."
"म्हणजे हा ग्रीन नाईट हेडलेस हॉर्समन?"
"बरोबर. मी जेवढे ऐकले आहे त्यानुसार अमेरिकेत या गोष्टीचे अतिरंजित रुपांतर होऊन हेडलेस हॉर्समन जन्माला घातला गेला. ग्रीन नाईट या कबंध घोडेस्वाराचे उगमस्थळ म्हणता येईल. हिंदुस्तानात पण कोणी हेडलेस हॉर्समन प्रसिद्ध आहे का?"
"तशी राजपुतान्यात झिंझर नामे लोककथा आहे. यातला हेडलेस हॉर्समन एक राजपूत राजकुमार आहे जो त्याच्या जनतेचे लुटारूंपासून रक्षण करतो. एनीवे, पण या कथेचा या टेकडीशी काय संबंध?"
"असे म्हणतात की ग्रीन चॅपल एका टेकडीवर होते. स्थानिकांची समजूत आहे की गवेनच्या कथेतील ग्रीन चॅपल याच टेकडीवर आहे."
"काय?"
"अशी समजूत आहे." गॅविन 'समजूत' वर जोर देत म्हणाले.
"या टेकडीच्या माथ्यावर एक पडझड झालेली वास्तू आहे. गावकरी म्हणतात की कधी काळी ते चॅपल होते. पण ते भग्नावशेष एका चॅपलचेच आहेत असा दावा मी तरी छातीठोकपणे करणार नाही."
"आणि ते अवशेष चॅपलचे नाहीतच असाही दावा करता येत नसावा."
उत्तरादाखल गॅविननी दिलखुलास हास्य केले.
"तात्पर्य असे की या टेकडीत ग्रीन नाईटचे, त्या कबंध घोडेस्वाराचे राज्य आहे अशी भोळसट समजूत आहे. जर कबंध घोडेस्वाराने तुमच्यावर वार केला, तुम्हाला जखमी केले तर तुम्हालाही त्याला जखमी करण्याची संधी मिळते."
"आणि जर प्रथम वार तुम्ही केलात तर ...."
"तर कबंध घोडेस्वार तुमच्यावर पलटवार केल्याखेरीज राहत नाही."

********

"ओह व्हॉट अ लोड ऑफ हॉगवॉश. इथल्या गावकर्‍यांकडून ही सांगोवांगी न जाणे किती शतके पसरवली जाणार आहे देव जाणे. आणि बाबांनाही त्या टेकडीवर नेऊन सगळ्या पाहुण्यांना ही गोष्ट सांगण्याची प्रचंड हौस!" गॅरेथला डिनर टेबलवर ग्रीन नाईटची चर्चा साफ नामंजूर होती. किंबहुना त्याला ती चर्चा कुठेही, कधीही नामंजूर होती. त्याचा या थोतांडावर कणभरही विश्वास नव्हता आणि त्याचे प्रामाणिक मत होते की अशा अंधविश्वासाला खतपाणी घालणे धोकादायक आहे. शेवटी प्रश्न तत्त्वाचा होता. आणि अ स्मॉल मॅटर ऑफ द फॅक्ट की लिंडाला, त्याच्या बायकोला, ग्रीन नाईटच्या अस्तित्वावर तिळमात्रही शंका नव्हती. ही 'छोटीशी' बाब कधी अवघड जागेचे दुखणे बनेल सांगणे कठीण होते.

"ते हॉगवॉश वगैरे इथे बोलायला ठीक आहे. उद्या आला तो ग्रीन नाईट समोर तर काय घ्या? तुम्ही तर ते चॅपल फोडायला निघाले होते."
"फोडायला नाही, रिनोव्हेट करायला! त्या कपचा उडालेल्या भिंतींमध्ये पुरातत्व विभागाची लोकंही आता रस घेत नाही आहेत. त्याची किमान डागडुजी करायला नको?"
"मुद्दा तर पटण्यासारखा आहे." विजय नकळत बोलून गेला.
"बघा. प्रिन्सनाही माझं म्हणणं पटतंय. बाबा का ऐकत नाहीत ते कळत नाही. त्यात कामगारांना हे सर्व ठाऊक असल्यामुळे तेही ग्रीन नाईटचा बागुलबुवा करून काम करायला तयार होत नाहीत."
"सर आणि मादाम! असेच भांडत राहिलात तर डिनर टेबलचा र्‍हाईनलँड व्हायला वेळ लागणार नाही. कॅन वी प्लीज पॉज ऑन ड मॅटर? आय सिंक् बर्टी आपण वाग्युद्धविराम कधी घेतो याचीच वाट बघत उभा आहे. सॅंक् यू!" पीटरला खरंच भूक लागली असावी. अन्यथा पाहुण्याला न साजेशा आवेगात त्याने वादावर पडदा टाकला नसता.
"थँक यू पीटर. आत्ता चर्चेत हिरवा नाही लाल रंग असायला हवा. माझ्या स्पेशल कॅरट सूपचा रंग. याचा क्रिमी फ्लेवर फ्रेश योगर्टमुळे आहे. ऑलस्पाईससोबत जिरे-धणे-दालचिनी घालून बनवलेला माझा स्पेशल मसाला. त्याशिवाय भाजून घातलेल्या भोपळ्याच्या बिया. एंजॉय!"
"बर्टी, बाबा कुठे आहेत?"
"लॉर्ड गॅविन काही कामात गुंतले आहेत. त्यांनी डिनर लायब्ररीत पाठवून द्यायला सांगितले आहे."
यानंतर जेवण फारशी चर्चा न होता पार पडले. आयरीनने बाखचा 'प्रिल्यूड इन सी मेजर' पियानोवर वाजविण्याची ग्रेटाला विनंती केली. पीटरने जेवणानंतर लगेचच त्यांची रजा घेतली तर इतर डेझर्टमध्ये ग्रेटाच्या वादनाचा आणि ट्रायफलचा आस्वाद घेत होते. विजयने कौतुकासाठी नजर वळवली तर बर्टी हातात एक बाटली घेऊन जिना चढताना दिसला.
"पीटरसाठी व्हिस्कीचा पेग बनवायला जात असावा. कदाचित एखादा पेग तोही घेणार असेल" विल्यमने खुलासा केला.
"अच्छा. पण हे ट्रायफल हे अगदीच जमून आलंय. मी तर अजून एक प्लेट घेईन."
"प्रिन्स हळू बरं. यात शेरी आहे. उद्या सकाळी हँगओव्हरसोबतच जाग यायची."
"ओह फॉर गॉड्स सेक आयरीन! हिज हायनेस, यातलं मद्याचं प्रमाण अत्यल्प आहे. नि:संकोचपणे याचा आस्वाद घ्या." गॅरेथला आपल्या बहिणीची थट्टा पसंत पडली नाही हे उघड होते. त्याने भराभर आपल्या वाट्याचे ट्रायफल संपवून लिंडासोबत त्यांचा निरोप घेतला.
"व्हॉट अ रिअ‍ॅक्शन टू द ट्रायफल मॅटर" आयरीनच्या कोटीवर विल्यम मनसोक्त हसला. कोटी कळली नसली तरी विजयनेही हास्यात आपला सूर मिसळला. ग्रेटाला गुड नाईट म्हणून ते तिघे जिना चढू लागले. त्यांची पावले आधी विजयच्या खोलीकडे वळाली.
"हीच ती खंडा तलवार!" विजयकडे एडवर्ड यांना राज्यारोहण प्रसंगी देण्यासाठी नजराण्याच्या काही वस्तु होत्या. यात एक भारतीय बनावटीची ब्रॉडस्वोर्ड होती. तिच्यावर स्थानिक कारागीरांकरवी कलाकुसर करण्यात आली होती. ग्रीन नाईटचा विषय निघाल्यावर गप्पांच्या ओघात या तलवारीचाही विषय निघाला. आयरीनने ही तलवार बघण्याचा हट्ट धरला. मग ठरल्यानुसार जेवणानंतर ती विल्यमसोबत खंडा तलवार बघायला आली होती.

तलवार अजस्त्र होती. एकूण लांबी एक मीटरपेक्षा अधिक, पात्याची लांबी साधारण तीन फूट. हिंदू पद्धतीचे बास्केट हिल्ट, पॉमेलजवळ स्पाईक्ड सपोर्ट देऊन योद्ध्याची ताकद पूर्णपणे वारात उतरण्याची सोय केलेली. पाते काहीसे काळे होते. निश्चितच कार्बन वापरून बळकट केलेल्या पोलादाचा वापर केला गेला होता. दोन्ही बाजूंना नजाकतदार नक्षी कोरलेली होती. ती नक्षी सोन्याच्या वर्खाने रंगवली होती. तलवारीला दुहेरी धार होती. तिचे पाते टोकदार नसून बोथट आणि पसरट होते. तिचा अपेक्षित वापर स्पष्ट होता. ही तलवार खुपसण्याकरिता नव्हे तर झटक्यात दोन तुकडे करण्याकरता, शिरच्छेद करण्याकरता परिपूर्ण केली गेली होती. विल्यम व आयरीन दोघांनाही एका नजरेत लक्षात आले की हे प्रकरण आपण पेलू शकत नाही. विजयने हसून दोन हातांनी ती तलवार उचलून पावित्रा घेतला. हवेतल्या हवेत तलवार फिरवून त्याने हलकी झलक दाखवली पण अतिशय सावधगिरीने.
"मोकळ्या मैदानात हिची करामत नजरेत भरेल. इथे यापेक्षा अधिक काही करणे धोकादायक आहे." त्याच्या प्रेक्षकांनी मान हलवून मूक संमती दिली आणि शुभरात्री म्हणून निरोप घेतला. यावेळी टरेट क्लॉकने रात्रीचे दहा वाजल्याचे कळवले.

********

लिंडाची झोप अगदी सावध होती. कसला तरी आवाज झाला होता खास! आधी कडाड असा आणि मग धप्प असा आवाज. आवाज पूर्वेकडून आलेला. चंद्र मावळतीला झुकला होता. तीनचा सुमार असावा. ती तडक उठून बसली. गॅरेथ स्वस्थपणे झोपला होता. एवढा स्पष्ट आवाज झालेला असून याला जाग कशी येत नाही? आपल्या नवर्‍यावर विसंबण्यात अर्थ नाही हे ताडून तिने खिडकीतून बाहेर नजर टाकली. चंद्र पश्चिमेला झुकला असल्याने पूर्वेस मॅनोरची लांबलचक सावली पडली होती. प्रकाशही तसा अंधुकच होता पण चांदण्यामध्ये घड्याळाचा मनोरा, मनोर्‍याचा तळ आणि तळाशी असलेली ती आकृती सहज दिसून येत होती. तो कोणी घोडेस्वार होता. त्याला बहुधा लिंडाची चाहूल लागली असावी कारण पुढल्याच क्षणी तो घोड्यावरून उतरला. आता त्याची पाठ लिंडाकडे होती. सर्वांगावर कवच होते. एक मिनिट!!

लिंडाला अचानक आपल्या अस्वस्थतेचा उलगडा झाला. या घोडेस्वाराचे डोके गायब होते. तो वाकून काहीतरी उचलत होता. तो जेव्हा पुन्हा ताठ उभा राहिला तेव्हा लिंडाला त्याचे नीट दर्शन घडले. त्याच्या हातात शिरस्त्राणाने संरक्षित त्याचे शिर होते.
'ग्रीन नाईट!' लिंडा उद्गारली. कोणीतरी ग्रीन नाईटचा शिरच्छेद केला होता. लिंडाचा या तथाकथित सांगोवांगीवर पूर्ण विश्वास होता. ग्रीन नाईट घोड्यावर स्वार होऊन दक्षिण दिशेने निघाला होता. त्याने आपल्या वचनानुसार कोणालातरी वार करू दिला होता. आता तो चॅपलमध्ये जाऊन 'त्या'ची वाट बघणार होता.

लिंडाच्या तोंडातून निघालेली किंकाळी गॅरेथला जागे करण्यास पुरेशी होती. लिंडाची अवस्था बघून त्याला इतर काही प्रश्न विचारण्याची आवश्यकता नव्हती. त्याने लिंडा इशारा करत असलेल्या दिशेकडे खिडकीतून पाहिले. त्याला मोकळ्या गवतात उभ्या असलेल्या क्लॉक टॉवर खेरीज काही दिसले नाही. कोणी ग्रीन नाईट असलाच तर तो अंधारात दिसेनासा झाला होता.

~*~*~*~*~*~

पुढील कथासूत्र येथे वाचू शकता - https://www.maayboli.com/node/77668/

Group content visibility: 
Use group defaults

ख्रिस, अलेक्सि नावे वाचूनच बरे वाटले.

जास्त वाट बघायला न लागता सगळे भाग मिळतील ही अपेक्षा आहे, जी पुरी होईल याची खात्री आहे.

थोडी थोडी करत वाचून काढली , मस्तच आहे. मॅनॉर, क्लॉक टॉवर डोळ्या पुढे उभा राहिला
पुभाप्र

bdw , कबंध म्हणजे शीर नसलेला का?

दोन दिवसांपूर्वीच, 'पायस' यांचं नवीन लिखाण दिसत नाही, असा विचार मनात आला होता आणि सकाळी माबोवर तुमची नवी कथा समोर.... Bw
नेहमीप्रमाणे छान सुरुवात.... पुभाप्र.

सही रे पायस!

ब्रीजरटन संपल्यावर लगेच एक ब्रिटीश रहस्यकथा. पट पट येऊ दे Happy

Curious for the next part!!! भराभर पुढचे भाग येऊ द्या Happy

जेम्स बॉन्ड, धनवन्ती, साधना, ए_श्रद्धा, अमितव, संज, च्यवनप्राश, Diggi12, जिज्ञासा, maitreyee, माउमैया, rmd, स्वाती२, धनि, हर्षल_चव्हाण >> प्रतिसादाकरिता धन्यवाद Happy

सर्व वाचकांचे आभार Happy

ही कथा प्रतीलीपी आहे का सर? >> तुम्ही जर प्रतिलिपी संस्थळ/app बद्दल बोलत असाल तर नाही. सध्यातरी ही कथा फक्त मायबोलीवर आहे/असेल. इतरत्र चौर्यकर्म झाल्याचे निदर्शनास आले तर कळवणे.

साधना यांनी अचूक ओळखले आहे. ही ख्रिस-अ‍ॅलेक्सी कथा आहे. दुसऱ्या शब्दांत फ्री या माझ्या मायबोलीवरील पूर्वप्रकाशित कादंबरीचा स्पिन ऑफ. पण हे कथानक समजण्याकरता फ्री वाचण्याची जरूर नाही हे नमूद करू इच्छितो.

पुढचा भाग सोमवारपर्यंत नक्की येईल. पण विकांताला जमवण्याचा प्रयत्न करेन.

मस्त कथा. पुढचा भाग लवकर टाका.
कधीकधी डिटेल्स वाचताना जरा जास्तच आहेत असं वाटतं. कदाचित मराठीत एवढे डीटेल्स असलेल्या कथा वाचायची सवय नाही. डीटेल्स थोडी कमी करता आली तर पहा. अर्थात हेमावैम

पायस....! Happy

मला तर आधी (प्रतिसाद वाचेपर्यंत! ) अनुवादच वाटला.
खूपच चित्रदर्शी लिखाण. आणि व्यक्ती, पदार्थांची नावं तरी केव्हढी मस्त ! ऑथेंटिक!

मस्त सुरुवात.
डोळ्यासमोरच सुरु आहे कथानक असे वाटत होते वाचतांना.

<<कधीकधी डिटेल्स वाचताना जरा जास्तच आहेत असं वाटतं. कदाचित मराठीत एवढे डीटेल्स असलेल्या कथा वाचायची सवय नाही.>> सहमत. .
मी तर ते घड्याळाचे पण सगळे बारकावे नीट वाचून काढले... न जाणो, पुढच्या रहस्याशी काही तरी संबंध असला तर? ??

धन्यवाद पायस नवीन मेजवानीकरिता!
फ्री सारखीच वाचतांना मजा येणार याची खात्री आहे.
येणाऱ्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा.
पुभाप्र!!

MazeMan, हर्पेन, आंबट गोड, वीरु, अंकु, विवेक. , जाई >> प्रतिसादाकरिता धन्यवाद.

कबंध म्हणजे शीर नसलेला का? >> हो. रामायणात या नावाचा राक्षस होता ज्याचे फक्त धडच होते. म्हणून हेडलेस अर्थाने कबंध शब्द वापरला आहे.

डिटेल्स >> Happy तुम्हाला जर डिटेक्टिव्हच्या जोडीने रहस्य सोडवायचे असेल तर या डिटेल्स तर लागणार.

एक्स्ट्रा फीचर्स

१. सर गवेन आणि ग्रीन नाईट

ही खूप प्रसिद्ध आर्थरकथा आहे. कथेत तिचा उहापोह केला आहेच. मुख्य मुद्दा असा की ग्रीन नाईट, त्याची बायको आणि गवेन हे तिघे या चक्रात अडकण्याचे कारण मॉर्गन ल फे असते. मॉर्गन आर्थरकथांमधली घाऊक व्हिलन आहे. तिच्या मते गवेन किंवा इतर कोणीही नाईट मूळचे भित्रे आणि खोटारडे आहेत. त्यामुळे ती गवेनची परीक्षा घेते. गवेन निधड्या छातीने ग्रीन नाईटला सामोरा जातो. त्याच्या खरेपणाचा पण एक प्लॉट पॉईंट आहे. सारांश असा की ग्रीन नाईटच्या मागे मॉर्गन ल फेचा हात होता आणि मॉर्गन ग्रीन नाईट आणि त्याच्या बायकोला गवेन विरोधात वापरून घेते.

२. बर्टीचे ओटकेक्स

ओटकेक्स म्हणजे ओटची भरड पिठात मिसळून केलेली बिस्किटे. पण बर्टीने बनवलेले ओटकेक्स हे स्टॅफोर्डशायर ओटकेक्स आहेत. स्टॅफोर्डशायर ओटकेक्सचे साहित्य सारखेच असले तरी पिठात यीस्ट मिसळून त्याची बिस्किटे करण्याऐवजी पॅनकेक्स बनवले जातात. हे टेक्श्चरला आपल्या क्रिस्पी डोश्याच्या जवळ जातात. मला व्यक्तिशः त्यांचे टेक्श्चर डिट्टो बान्ह शिओ (Banh Xeo) सारखे वाटते. यात सारण म्हणून सॉसेजेस, स्टर फ्राईड मशरुम्स, कांदा-टोमॅटो, चीझ इ. घालतात.

३. बर्टीचे ट्रायफल

ट्रायफल फळांचे काप, कस्टर्ड आणि फोर्टिफाईड वाईनमध्ये (सोप्या शब्दांत ब्रँडी मिसळलेली वाईन) भिजवलेले स्पंजकेकचे तुकडे यांचे थर देऊन तयार केले जाते. व्हिप्ड क्रीम आणि सुकामेवा वापरून हे सजवता येते. बर्टीची रेसिपी पुढीलप्रमाणे

स्वीट सॉसमध्ये स्ट्रॉबेरीचे काप हलकेच परतून घ्या. सॉस बेरीजना कोट होणे एवढेच अपेक्षित आहे. दुसर्‍या एका भांड्यात साखर घालून दूध उकळत ठेवा. साखर विरघळेपर्यंत अंडी फेटून घ्या. साखर विरघळली की दूध अंड्याच्या भांड्यात ओता. हे करताना अंडी फेटत रहा नाहीतर गुठळ्या होतील. मिश्रण एकजीव झाले की गॅसवर शिजवायला ठेवा. पाच ते सात मिनिटात पुडिंगसारखे दिसू लागले की एग कस्टर्ड तयार. हे गरम असतानाच दोन चमचे शेरी कस्टर्डमध्ये मिक्स करून घ्या. कस्टर्ड थंड होईपर्यंत स्पंजकेकचे तुकडे शेरीत भिजवून घ्या. आता सर्व्हिंग बॉलमध्ये स्पंजकेकचे तुकडे, कस्टर्ड, फळांचे काप या क्रमाने थर रचा. क्रिम आणि बदाम-पिस्त्याचे काप वापरून सजवा.

ही ट्रायफल ची कृती मस्त आहे! उगीच रेचेल सारखे वरचे खालचे न करता करावे लागेल, नाही तर ट्रायफल मध्ये सॉसेजेस, स्टर फ्राईड मश्रूम वगैरे जातील Lol

उगीच एक बाल की खाल शंका - प्रिन्स विजयला ग्रीन नाईटची कथा ऐकल्यावर हेडलेस हॉर्समन आठवतो याचे नवल वाटले. त्या काळात भारतीय उच्चभ्रू लोकांना अमेरिकन गोष्टी माहीत असतील का? "अमेरिकन" गोष्टींना महत्त्व असण्याचा (viral होण्याचा) काळ नाही ना हा खरंतर.

दोन्ही रेसिपीज भारी आहेत!

Pages