कोथिंबिरीच्या वड्या

Submitted by सांज on 14 December, 2020 - 23:46

गॅस वर चहाचं आधण ठेऊन वसुधा ताईंनी कोथिंबिरीच्या जुडया निवडायला घेतल्या..

एरवी चार वेळा सांगूनही नेमकी कोथिंबीरच आणायला विसरणाऱ्या महेशरावांनी आज चक्क दोन जुड्या कोथिंबीर आणली होती आणि त्यामुळे वसुधा ताई सकाळी थोड्याशा वैतागल्याच होत्या. मनात म्हटलंही त्यांनी, इतकी वर्षं झाली आता तरी यांचा या बाबतीतला वेंधळेपणा काही कमी झालेला नाही!

तेवढ्यात, सोनाराने आपला एखादा नवीन घडवलेला सुरेख दागिना दाखवावा तशा उत्साहात त्या आणलेल्या कोथिंबिरीकडे बोट दाखवत महेशराव म्हणाले,
'पाहिलंस कशी ताजी लुसलुशीत कोथिंबीर आणलीय मी आज, तेही अगदी योग्य दरात! तू घालतेस तशी हुज्जत न घालता! नेहमी म्हणतेस नं कोथिंबीर विसरता म्हणून.. ही घे आज!'
त्यांच्या उत्साहाच्या फुग्यातील हवा क्षणार्धात काढून घेत वसुधा ताई म्हणाल्या,
'तुम्ही आज पण भाजीची यादी न्यायला विसरलात नं? आज कोथिंबीर आणू नका असं स्पष्ट लिहलं होतं त्यावर मी. दूधवाला आज सकाळी त्याच्या शेतातली ताजी कोथिंबीर देऊन गेलाय.. आता काय करु इतक्या साऱ्या कोथिंबीरीचं?’
आपण घातलेला गोंधळ लक्षात येऊन महेशराव म्हणाले,
'वड्या कर की. किती दिवसात केल्या नाहीस! तुझ्या हातच्या कोथिंबीर वड्या म्हणजे पर्वणीच की!’ कौतुकाच्या आडून बायकोचा राग शांतवण्याचा त्यांचा प्रयत्न चालू होता.
ते लक्षात येऊन ‘हो! माहितीय सगळं!’ अशा अर्थाचं मिश्कील हसू वसुधा ताईंच्या चेहऱ्यावर उमटलं. सगळ्या भाज्यांची वर्गवारी लावून त्या त्यांनी फ्रिजमध्ये जागच्या जागी ठेवून दिल्या. आणि कोथिंबीर मात्र ओल्या कपड्यात गुंडाळून ‘पाहू संध्याकाळी’ म्हणत तशीचं टेबलवर ठेवली.

गॅसवर मंद आचेवर चहा उकळत होता, त्याचा गोडसर सुवास स्वयंपाकघरात पसरु लागला. कोथिंबीरीची एकेक पानं देठापासून मोडताना वसुधा ताईंना वाटुन गेलं, या पदार्थाशी जोडलेल्या किती आठवणी आहेत. आपल्या घडणीला एक योग्य वळण मिळायला या वड्याच तर कारणीभूत आहेत की..

....

लग्न होऊन सासरी आल्यावर प्रथम इतक्या मोठ्या गोतावळ्याला पाहून तरुण वसुधा थोडीशी भांबावलीच होती. माहेरचं चौकोनी आटोपशीर कुटुंब सोडून त्या भल्या-थोरल्या, माणसांनी भरगच्च घरामध्ये प्रवेश करताना तिच्या मनात भितीयुक्त उत्सुकता जरुर होती. पण मग नंतर हळू-हळू त्या तिथल्या भिंतींमध्ये स्वत:ला फिट बसवता बसवता तिची तारांबळ उडू लागली. संस्कारांची नवी परिमाणं, ‘मान-पान’ या नवीनच विषयाशी झालेली ओळख, ते सोवळ्यातला स्वयंपाक.. कारल्याची चटणी.. मुगडाळीची धिरडी इ.इ. खडतर चाचण्यांमधून स्वत:ला धडपडत-ठेचकाळत पुढे रेटताना तिची दमछाक व्हायची. दुपारच्या वेळी घरातल्या बायकांची एकमेकींची उणी-दुणी काढणारी किंवा चेष्टा मस्करी करणारी सत्रं रंगायची. पुस्तकांमध्ये रमणारं वसुधाचं मन या अशा गोष्टींमध्ये रमायचं नाही. आणि मग त्यावरुनही तिची खिल्ली उडायची. आपण या सगळ्यांपेक्षा वेगळ्या का आहोत? किंवा या साऱ्याजणी म्हणतात तशा खरंच आपण अति लाडा-कोडामुळे एकलकोंड्या वगैरे झालोय का? असे प्रश्न त्या काळात सतत तिच्या डोक्यात मुक्कामाला असायचे. त्यातच पुढे ग्रॅज्युयेशनचा निकाल आला आणि त्यात विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या वसुधाला लगोलग नोकरीची संधीही चालून आली. लेकी-सुनांनी घराबाहेर न पडण्याच्या त्या काळात सासऱ्यांच्या आणि नवऱ्याच्या पाठिंब्यामुळे वसुधा नोकरी करु लागली. पण त्यामुळे झालं असं की तिच्या पुढ्यातल्या घरगुती अडचणी अजून वाढल्या. तिला पुर्वीपेक्षा अधिक कष्ट घेऊन घरात स्वत:ला सिद्ध करत रहावं लागलं. ही काल आलेली मुलगी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून बाहेर काम करते. स्वत:च्या पायांवर ऊभी आहे आणि आपण मात्र सारा जन्म रांधण्यात आणि उष्टी काढण्यात घालवतोय ही घरातल्या इतर बायकांच्या मनातील खंत वसुधाबद्दलच्या ईर्ष्येच्या स्वरुपात बाहेर पडू लागली. आणि ‘गळ्यात पर्स अडकवून बाहेर काय कोणीही जाईल.. शेरभर पुरण वाटून लुसलुशीत पोळ्या करुन दाखव म्हणावं मग मानेन हिला..’ सारखी वाक्य जाता-येता तिच्या कानांवर पडू लागली. त्यातच पूढे घडला तो कोथिंबीर वड्यांचा प्रकार..

....

उकळत्या चहाखालचा गॅस बंद करुन महेशराव वसुधा ताईंना म्हणाले,
‘काय गं, कुठे हरवली आहेस?’
‘अरेच्चा! उतू गेला का चहा?’
‘नाही! पण मी आलो नसतो तर गेला असता’ असं म्हणून त्यांनी चहा कपात ओतून घेतला.
चहा पिता पिता वसुधा ताईंच्या पुढ्यातला कोथिंबीरीचा पसारा पाहून महेशराव म्हणाले,
‘माझ्या वेंधळेपणामुळे तुझं काम वाढवून ठेवलं नं मी आज!’
वसुधा ताई खजील होऊन म्हणाल्या,
‘नाही हो! हे सगळं करायला आवडतं मला, फक्त वय वाढल्यामुळे आता थोडंसं थकायला होतं इतकंच!’
‘पूर्ण स्वयंपाकाला बाई लाव म्हणून किती दिवसांपासून सांगतोय तुला पण ऐकत नाहीस माझं.’ ‘लावलीय की पोळ्यांसाठी. पण बाकी नको हं.. मी रमते हो हे सगळं करण्यात!’ वसुधा ताई म्हणाल्या. ‘किती बदल होत जातात नं काळानुरूप आपल्यामध्ये! मला ती लग्न झाल्या झाल्या स्वयंपाकघरात पाऊल ठेवायलाही घाबरणारी वसुधा आठवतेय.. किती घाबरायचीस तू तेंव्हा!’
‘हम्म्म्म्.. ते दिवस गेले आता आणि ती माणसंही गेली. किती बाळबोध हेते नं मी तेंव्हा! पुस्तकांपलीकडचं आयुष्यच ठाऊक नव्हतं मला..’
एकत्र कुटुंब, दोघांच्या नोकऱ्या, मुलं-बाळं, त्यांचं शिक्षण, नंतर लग्नं.. या साऱ्यांमध्ये त्या दोघांना एकमेकांसाठी वेळ तसा मिळालाच नव्हता. निवृत्तीनंतर मात्र वसुधा ताईंनी ठरवलं होतं, मुलांना त्यांच्या त्यांच्या मार्गाने जाऊ द्यायचं आणि आपण आयुष्याची संध्याकाळ नवऱ्यासोबत छान घालवायची. इतक्यात फोन वाजला म्हणून महेशराव उठले. सुमेधने, त्यांच्या मुलाने, व्हिडीओ काॅल केला होता.. मग या दोघांचं मुलाशी, सुनेशी बोलणं सुरु झालं.
टेबलावरची कोथिंबीर पाहून सुनेने विचारलं,
‘आई.. काय करताय एवढ्या कोथिंबीरीचं?’
‘काही नाही गं.. कोथिंबीर वड्यांची फर्माईश आहे तुझ्या सासरेबुवांची!’
‘अरे वा! मला शिकायच्याच होत्या. यु-ट्युब वर पाहून मी ट्राय केल्या २-३ वेळा पण म्हणाव्या तशा जमल्याच नाहीत! आता पाहते तुम्ही कशा करता ते..’
‘चालेल की. पण तेवढा वेळ आहे का तुझ्याकडे? तासभर तरी लागेल.. नाहीतर मी कृती सांगु का तुला?’ वसुधा ताई विचारत होत्या.
‘लागुद्या हो आई.. करा तुम्ही, आज वेळ आहे माझ्याकडे.. आणि नुसती कृती ऐकुन पदार्थ जमत नाहीत हे आताशा समजलंय मला, ते नीट शिकुनच घ्यावे लागतात!’
सईचं बोलणं ऐकुन वसुधा ताईंना नलु आत्या आठवल्या.. हीच गोष्ट किती छान समजाऊन सांगितली होती त्यांनी आपल्याला तेव्हा! आपल्या सुनेला मात्र ती न समजावता समजली याचं क्षणभर त्यांना कौतुकही वाटलं.
महेशरावांनी मग फोनचा अॅंगल अॅडजस्ट करुन दिला आणि सासु-सुनेचं आॅनलाईन कोथिंबीर वडी वर्कशाॅप सुरु झालं..

....

त्या दिवशी वसुधाला घरी यायला जरासा उशीरच झाला होता. काॅलेजात परीक्षा चालू असल्यामुळे कामाचा ताण थोडा वाढला होता. त्यातही ज्युनियर प्रोफेसर असल्यामुळे सिनीअर्सची सद्दी सहन करणं तिला भाग होतं.
हात-पाय धुऊन आत आली तोच मोठ्या सासूबाईंनी फर्मान सोडलं,
‘वसुधा, आज जरा कोथिंबीर वड्या कर पाहू.. बाकी स्वयंपाक होत आलाय. वड्या तेवढ्या तू कर.’ ‘सासूबाई अहो पण मी कधी केल्या नाहीत त्या’ वसुधा गडबडली.
‘त्यात काय एवढं! तुझ्या सारख्या प्रोफेसरीण बाईला काय अवघड आहे? डाळीचं पीठ, आलं-लसूण, मीठ-मिरची लावून कोथिंबीर वाफवायची आणि मग तेलावर परतायची बास!’
‘बरं’ म्हणून वसुधाआत गेली आणि साडी बदलून लगोलग कामाला लागली. सासुबाईंकडून ऐकलेल्या ओझरत्या कृतीवरुन फार काही अवघड पदार्थ नाही असं तिला वाटलं पण मनात थोडी धाकधुक होतीचं. तिने कोथिंबीर धुवून घेतली आणि चक्क पालक-मेथी वाफवावी तशी कढईत तेल सोडुन वाफवायला ठेवली त्यात मग डाळीचं पीठ आणि पाणी टाकून सरळ हाटायला सुरुवात केली.. पण पाण्याचं प्रमाण जास्त झाल्यामुळे मिश्रण सैल झालं आणि मग ते मिळून येण्यासाठी तिने पीठाचं प्रमाण वाढवायला सुरुवात केली.
बाकीच्या साऱ्याजणी तिची गम्मत पहात होत्या पण आज त्यांनी ठरवलं होतं की तिला कोणीच काहीच सांगायचं नाही. तिलाही कळू देत स्वयंपाक करणं म्हणजे काही खायची गोष्ट नाही ते.. खूप प्रयत्नांनंतर वड्या पाडण्यात तिला यश आलं. मग एकेक करुन त्या तेलावर परतायला सुरूवात केली. पण जास्त पाणी आणि पीठामुळे वड्या तेल पिऊ लागल्या. तिने त्या तशाचं कशा बशा करुन सगळ्यांना वाढल्या. मोठ्या दीराने पहिल्याचं घासात,
‘या कोथिंबीरीच्या वड्या आहेत की पिठल्याच्या?’ असं म्हणून तोंड वेडंवाकडं केलं.
त्याला जोड देत सासरेबुवा म्हणाले,
‘सुनबाई, आम्ही तुम्हाला हुशार समजत होतो! पुन्हा असा तेलाने माखलेला पदार्थ वाढू नका कोणाच्या ताटात. आधी नीट शिकून घ्या.’
वसुधाला मेल्याहून मेल्या सारखं झालं. त्या दिवशी रात्री ती खूप रडली.
थोड्या वेळाने नलु आत्या तिच्यापाशी आल्या आणि तिच्या डोक्यावरुन हात फिरवू लागल्या. तरुणपणीचं यजमान निवर्तल्यामुळे सोवळ्या होऊन त्या कायमच्या माहेरी भावाकडे आल्या होत्या. तिच्या डोळ्यातलं पाणी पुसून त्या म्हणाल्या,
‘असं रडू नकोस बाळा, मला समजतंय हो तू खंतावली आहेस.. घरात, बाहेर दोन्हीकडे स्वत:ला सिद्ध करता करता मेटाकुटीला येतेयसं.. पण वसुधा, या घरातल्या बाकीच्या बायका आहेत नं, तुझ्या या सासवा, जावा, नणंदा.. यासुद्धा खंतावल्याचं आहेत गं .. त्यांची खंत तुझ्यापेक्षा निराळी आहे इतकंच. तुझ्यातल्या क्षमता सिद्ध करण्याची तुला जी संधी मिळाली ती त्यांना नाही गं मिळाली. इच्छा असो वा नसो त्या स्वयंपाकघराशी बांधल्या गेल्या आणि मग हळु-हळु त्यालाचं विश्व समजू लागल्या.. बरं, स्वयंपाक हे काही येरागबाळ्याचं काम नाही बरं! तीही एक कला आहे.. नुसती कृती कळली की पदार्थ बनतो असं नाही, त्याला अनुभव लागतो, हाताला चव असावी लागते, प्रमाणाचं गणित समजावं लागतं! आणि इतकं असुन त्यांचं हे काम दुय्यमच समजलं जातं.. ना पुरेसा मान मिळतो ना निर्णयप्रक्रियेत सहभाग. वर वाट्याला येतं ते परावलंबित्व. स्वत:साठी कधी काही घ्यावंसं वाटलं तर परवानग्या काढत बसावं लागतं.. तुझं तसं नाही, तु चार पैसे कमावतेस, स्वत:ची हौस पुरवण्याचं स्वातंत्र्य आणि क्षमता तुझ्यापाशी आहे.. त्यांचं दु:ख मोठं आहे बयो..’
नलु आत्यांचं ते बोलणं ऐकुन वसुधा अंतर्मुख झाली, त्या परिस्थितीकडे पाहण्याचा नवाच दृष्टिकोन तिला दिसला. ज्याचा तिनं आधी विचारच केला नव्हता.. ईर्ष्येमागची खंत आणि टोमण्यांमागचं कारुण्य तिला दिसायला लागलं होतं.

....

वड्यांचं मिश्रण कुकरमध्ये वाफायला ठेवून वसुधा ताई सुनेला म्हणाल्या,
‘बरं का सई, कोथिंबीर धुवून चिरायची मग कोरड्या कपड्यावर थोडी सुकू द्यायची.. आणि जास्तीचं पाणी शोषलं गेलं की मग त्याला पीठ लावायचं बरं, नाहीतर वड्या बिघडतात’
‘अच्छा! तरीचं मला काही केल्या जमत नव्हत्या. किती बारकावे असतात नाही प्रत्येक पदार्थाचे! सुमेध रोज तुमच्या स्वयंपाकाचं कौतुक करत असतो आणि माझी धांदल उडालेली पाहुन मला हसत असतो.’ ‘जमेल गं तुलाही.. अनुभवाने सारं काही जमायला लागतं. आपण आपल्या चुकांमधुन शिकत रहायचं फक्त! माणसांच्या स्वभावातली आणि स्वयंपाकातली गुंतागुंत समजायला याच गोष्टी उपयोगास येतात बघ!’ आयुष्यानं त्यांना शिकवलेली गोष्ट त्या त्यांच्या सुनेला समजाऊ पहात होत्या.
गप्पा मारता मारता मग त्यांनी वाफलेलं वड्यांचं पीठ बाहेर काढून थंड व्हायला ठेवून दिलं.

....

तो नवा दृष्टीकोन घेऊन वसुधा रोजच्या जगण्याला भिडायला लागली आणि तिचं तिला कळत गेलं गोष्टी किती सोप्या होत्या ते.. सासुबाईंच्या रागामागची माया कळायला लागली.. न बोलल्या गेलेल्या शब्दांमागचे भाव उमजायला लागले.. आणि जिथे जिथे शक्य तिथे तिथे कधी स्वत:कडे कमीपणा घेत तर कधी थोडंसं सामंजस्य स्वत:मध्ये भिनवत ती साऱ्यांमध्ये सहभागी होत गेली.. आणि हळु-हळु तिची खंत आणि इतरांचं कारुण्य दोन्हीही तिनं आपलंसं केलं.. ती मग त्या घरात अगदी अभिन्न होत गेली. आणि एक दिवस तिने प्रयत्नपुर्वक शिकुन घेतलेल्या कोथिंबीर वड्या सर्वांना बेहद्द आवडू लागल्या.

....

सुरीने छान एकसारख्या वड्या पाडून वसुधा ताईंनी त्या तेलावर छान खरपूस भाजून घेतल्या. आणि त्यांचा खमंग वास घरभर पसरला. महेशराव आत येत म्हणाले,
‘अरे वा! झाल्या वाटतं कोथिंबीर वड्या तयार!’
‘हो झाल्या.. हे घ्या चव घेऊन सांगा कशा झाल्यात ते’ म्हणत वसुधा ताईंनी वड्यांची प्लेट त्यांच्या समोर ठेवली आणि मग त्यातली एक वडी तोंडात टाकून ‘बहार!’ असं म्हणून त्यांनी वड्यांचा फज्जा पाडायला सुरुवात केली.
‘आई माझ्याही तोंडाला पाणी सुटलंय आता’ सई आणि सुमेध दोघंही एकदाचं म्हणाले.
‘अरे मग या की इकडे, तुम्ही आलात की परत बनवेन मी’ वसुधा ताई आनंदाने म्हणाल्या.
त्यावर सई लगेच म्हणाली,
‘नाही आई यावेळी मी बनवेन आणि तुम्हाला खायला देईन.. मग तुम्ही सांगा मी पास की फेल ते!’ आपली परंपरा पुढे चालत असलेली पाहून वसुधा ताई समाधानाने म्हणाल्या, ‘नक्की!’.

- सांज
https://chaafa.blogspot.com/2020/12/blog-post.html

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@जिज्ञासा, तुमचं निरिक्षण आणि तुमची कल्पनाही चांगली आहे.
वेगवेगळे दृष्टिकोन जाणून घ्यायला मलाही आवडेल. >> सांज, तुमचा प्रतिसाद वाचून छान वाटले! कथेवरची चर्चा तुम्ही personally घेत नाही आहात ही फार छान गोष्ट आहे. Kudos to you for this.

पुढे सासवा-नणंदेच्या बोलण्याचा त्रास तिला होईनासा झाला. दर सहामाहीला ती नवी पर्स घेऊ लागली. दर एक तारखेला ती कराचीवाला स्वीटस मधून जिलबी-कोथिंबीरवडी आणू लागली. कराचीवाला मिठाईमुळे सैपाकाचा त्रास कमी झाला म्हणून सासू वसुधालाच 'बहार' म्हणू लागली" >>

सिमन्तीनी जी, हाही दृष्टीकोण छानच आहे. मला आवडला.
पण समजा, एखादीला वाटलं शिकावसं आणि स्वत: करून बघावसं तर त्यातही काही चुकीचं नाही. मी अशा बर्‍याच जणी पाहिल्या आहेत ज्यांना पूर्वी स्वयंपाकात काहीच रस नव्हता. पण नंतर रुचि निर्माण होत गेली आणि आता त्या अक्षरशः सुगरणी आहेत.

सांज, तुमचा प्रतिसाद वाचून छान वाटले! कथेवरची चर्चा तुम्ही personally घेत नाही आहात ही फार छान गोष्ट आहे. Kudos to you for this.>>

धन्यवाद @जिज्ञासा Happy

बरं! लेखिकेने मनावर घेऊन अजुन एकदा कोथिंबीर वड्या करायल्या घ्याव्यात.
वसुधा 'गळ्यात पर्स अडकवून बाहेर काय कोणीही जाईल.. शेरभर पुरण वाटून लुसलुशीत पोळ्या करुन दाखव म्हणावं मग मानेन हिला.' हे ऐकुन जी पिसाळली की तिने को व न करता बेसन पिठलं केलं. सगळ्यांच्या पुढ्यात पातेलं आपटुन सरळ खोलीत निघुन गेली.
को व करण्यासाठी माझी वाट बघत बसल्या. करायच्या होत्या ना. दिवसभर काय कामं करतात ह्या बायका? नुसती जेवणं, धुणी भांडी आणि रिकाम्या वेळात कुचाळक्या. ह्यांना काय कळणार नोकरी कशी करतात ते. अडाणी बायका. हुं! काहीबाही मनात बडबडत राहिली. रागाने धुमसत तिने आयुष्या कधी को व न करण्याची शपथ घेतली.
--महेशरावांनी आज चक्क दोन जुड्या कोथिंबीर आणलेली बघुन तिचं डोकंच फिरलं. तिने त्यातली एक जुडी दोन शेजारणींमधे वाटुन टाकली अशा न घडलेल्या कोव ची कथा लिहिली पाहिजे. >>

हाहा सस्मित, हे फारच आवडलं Happy तुमच्या इतर प्रतिक्रियाही वाचनीय आहेत.
मला नाही वाटत, दुसर्‍यांदा कथा लिहण्याची गरज आहे. मला जे मांडायचं होतं ते माझं मांडून झालय. आता जो तो ज्याचा त्याचा चष्मा लावून कथेचे निष्कर्ष काढणार आणि ते साहजिकही आहे. Happy

कथा छान Happy
प्रतिसाद विशेष आवडले Happy

ती एक कुठल्याशा तेलाची जाहिरात येते युट्यूबवर - माँ हमेशा किचनमें क्यूँ होती है? मला वाटलं व्वा चांगला संदेश असेल तर शेवटी वाक्य काय की आमच्या तेलामुळे पदार्थ अधिक काळ ताजे राहतात म्हणून मग आईचा सगळा वेळ किचनमधे जात नाही - किचन के अलावा भी म्हणजे जणू किचनमधे आईची जागा ही by default असतेच>>>> आणि त्यात ती आई ढीगभर वेगवेगळ्या प्रकारचा स्वयंपाक करून झाकून मग मुलीबरोबर डान्स करायला तयार होते हे तर त्याहून भयंकर! माझं तर डोकं फिरलं होतं! म्हणजे "घरचं सांभाळून(च) तुझी नोकरी (किंवा तुझं आवडीचं जे काही असेल ते ) कर असा तो अर्थ.
"तुला आवड आहे ते कर, वेळ पडली तर घरातलं मी बघीन जे लागेल ते" असं कोणीच म्हणत नसेल तर अवघड आहे. भरत म्हणतायत ते पटलं.

खोडसाळ स्वभावाचे लोक काहीही कारणावरून खोड्या काढतात-सीमंतिनी अनुमोदन.
कथा आवडली होतीच परंतु प्रतिसादही विचार करायला लावणारे आहेत.
पण "आम्ही नाही का केलं" हा दृष्टिकोन दर मागल्या पिढीचा पुढच्यांकरिता दिसतो बरेचदा. मग ते पालक - मूल नातं असो वा सा-सू.

भरत यांचे प्रतिसाद पटले आहेत. मी ही लिहिणार होतेच पण टाळलं . हल्ली मनातलं लिहालायही नकोसे वाटते. समोरचा कसा घेईल प्रतिसाद कोणास ठाऊक ! >> अगदी अगदी

भरत सगळे प्रतिसाद मस्त.
प्रत्येकाने थोडी थोडी मुरड घालायला हरकत काहीच नाही.
यशस्वी जीवनाचे सूत्र आहे ते .
पण हे सतत एकाच जेंडर कडून अपेक्षा करत राहण - पटत नाही.

(अगदी बंडखोर बाईसुद्धा हे करत असतेच बऱ्याचदा.)

वर कुणीतरी म्हणाले सुनेला नाही ना सांगितलं म्हणजे बदल झाला.
पण सून ऐवजी ऐवजी कधीतरी चुकून तरी मुलाने रेसिपी विचारली असती, आई तुझ्यासारख्या वड्या शिकलो , असे कौतुकाने म्हटले असते- तर तो बदल म्हणता आला असता.

आपल्याही नकळत आपण ह्या पट्ट्या आजूबाजूच्या बायकांना लावत फिरतो. आपल्याकडे जेवायला आलेल्य माणसांमध्ये- "बाईने मागे थांबावे" अशी आपली अपेक्षा असते. ती स्वतःच्या नवऱ्याकडूनही नसते बऱ्याचदा.

मला सांज यांची लेखनशैली आवडते. ही कथाही त्याला अपवाद नाही . स्वयंपाक हे महत्वाचे बेसिक स्किल आहे. आवड असेल तर एक कलाही आहे. मात्र बरेचदा नव्या घरात रुळायचा प्रयत्न करणार्‍या सुनेच्या बाबतीत स्वयंपाक हा एखाद्या शस्त्रासारखा वापरला जातो. अगदी स्वयंपाक येत असला तरी खुसपटे काढून हिरमोड करणे चालते. मलाही कथा क्युटही नाही वाटली आणि डेटेडही नाही वाटली. आजही बर्‍याच जणींसाठी हेच वास्तव आहे.
>> ईर्ष्येमागची खंत आणि टोमण्यांमागचं कारुण्य... >> हे कथानायिका समजून घेते पण तरी सासरच्या घरातल्या स्त्रीयांचे तसे वागणे मुळातच अयोग्य. नवरा, सासरे यांच्या परवानगीने नोकरी करा, त्याच पुरुषांनी कोथिंबिरीच्या वड्या जमल्या नाहीत म्हणून हुशारीही काढायची, अनुभवी स्त्रीयांनी कोंडीत पकडायचे हे सगळेच किती दु:खद. नायिकेला त्या घरात स्विकारले जाण्यासाठी , सिद्ध करण्यासाठी जे धडपडावे लागते , स्वतःला कमीपणा घेत, मिटवून टाकत जगावे लागते , असे जगणे खूप थकवते आणि त्याच्या खुणाही सोडते. कितीही दृष्टीकोन बदलला की गोष्टी सोप्या असे म्हटले तरी ते तसे सरधोपट कधीच नसते. समोरच्या व्यक्तीची इर्षा, असुया आपल्या हातात नसते. अगदी स्वतः नोकरी केलेल्या स्त्रीया देखील सुनेच्या बाबतीत ईर्षा-असूया दाखवतात. बर्‍याच जणींची उमेदीची वर्षे या धडपडीत जातात. हे असे खोड्साळपणे वागणे इतके कॉमन की एखाद्या घरात जेव्हा योग्य वागणूक मिळते तेव्हा चक्क चांगले वागवतात म्हणून कौतुक केले जाते. Uhoh
कथा नायिका सुनेशी योग्य वागते ही जमेची बाजू मात्र विडीओ कॉल , युटुबवर रेसीपी वगैरे वरवर आधुनिक असले तरी सुनेच्या संसारात आईच्या स्वयंपाकाचे कौतुक आणि पत्नीच्या धावपळीला हसणे करणारा नवरा आहेच, त्यात फारसा बदल नाही. हे मुलगे आपल्या आई सारखा स्वयंपाक करायला स्वतः कधी शिकणार असे मनात आलेच!

हे असं काही ऐकवणं हा एक स्वभावाचा भाग आहे. तर कधी वर लिहिल्याप्रमाणे इर्षेचा भाग आहे. चित्र सगळीकडे असंच आहे असं नाही. ही कथा ह्या अशा एका घरातली आहे. असं घडतं हे माहित आहे, बघितलंय म्हणून ते पटलंय. ते बरोबर आहे असं कुणालाही इथे वाटत नाहीये. त्यामुळे लेखिका आणि वाचक स्त्रिया ग्रो झालेल्या नाहीत असा समज करुन घेऊ नये.
काही घरात अगदी न शिकलेली सासुपण 'असुदे. अजुन इतकं नाही येत तिला स्वयंपाकाचं. पण हुशार आहे मोठ्या पगाराची नोकरी करते. असं म्हणुन आपल्याला जे नाही करता आलं ते तिला करता यावं असा विचार करते. तर कधी सरकारी नोकरीत असलेली सासु पण आम्ही नाही का नोकरी करुन केलं सगळं असं म्हणते.>>>>>>>> , सहमत. अशा दोन्ही प्रकारच्या सासवा पाहिल्यात . बाकी प्रतिसादही आवडलेत.

सांज, नायिकेला सैपाक आला, हौशीने तिने तो शिकला ह्याबद्दल मला आक्षेप अजिबातच नाही.

मला एकच वाक्य आवडलं नाही - 'तिने स्वतःकडे कमीपणा घेऊन इ इ'. व्यवहारात असा कमीपणा घ्यावा लागतो हे खरं आहे. पण कथा कादंबर्‍यात तरी आता हे बदलायला हवे आणि आपणच आपल्या नायिकांना conflict resolution skills दिले नाही तर बदल कसा घडणार. मुलांना शिकवताना 'साम, दाम, दंड, भेद' ह्या चार पद्धती शिकवतो. 'कमीपणा' ह्यात नाही. सामोपचार म्हणजे कमीपणा नाही. समोरच्या पार्टीचेही काही एफर्ट असते सामोपचारात. कमीपणामध्ये नाही. मुलींना 'तू जुळवून घे' ही टेप वाजत राहते. मिडीयाला मुलींना कमीपणा शिकवतात म्हणून बोल लावतो पण सोशल मिडीयावर आपणच तर 'मिडिया' असतो! स्वतःला कमी न करता/लेखता इतरांना आपल्या बरोबर घेण्याचे सामर्थ्य नायिकात २०२१ मध्ये येऊ दे अशीच माझी इच्छा असेल.
(असंच करा हा माझा आग्रह नाही. तर हे माझ्या लेखनापुरते आखलेले guiding principle आहे. इतर काही लेखक/लेखिका असं लिहीत नाहीत म्हणून माझे लेख/कथा यांना ४-५ नियमित वाचक आहेत Wink Happy )

प्रतिसाद आवडत आहेत.

प्रत्येक व्यक्तीची, मग ती स्त्री असो वा पुरुष, कॉन्फ्लीक्टशी डील करण्याची पद्धत वेगळी असते. वरच्या कथेत कितीतरी वेगळ्या शक्यता आहेत.
१. नायिका टोमण्यांकडे दुर्लक्ष करते. कोथिंबीर वड्या शिकत नाही, करतही नाही.
२. नायिका कोथिंबीर वड्या शिकतेच आणि नंतर अजून २-४ टोमणे इतर स्त्रियांना देते.
३. नायिका रडत बसते. नोकरी सोडते आणि कोथिंबीर वड्या शिकते.
४. नायिका भांडते. कोथिंबीर वड्या शिकते किंवा शिकत नाही.
५. नायिका टोमण्यांकडे दुर्लक्ष करते. कोथिंबीर वड्या शिकते. तिला त्यातच विजय वाटतो.
६. नायिका नोकरी करत रहाते. इतर कामांना हातही लावत नाही.
....... अशा आणि अजूनही कितीतरी शक्यता असू शकतात.

लेखिकेला एका पद्धतीची नायिका दाखवायची आहे. त्यांची नायिका/कथा आपल्याला आवडायलाच हवी हा आग्रह नाही. तसेच आपल्या आवडीची किंवा आपल्याला पटेल अशीच नयिका किंवा कथा त्यांनी लिहावी असा आग्रह धरणेसुद्धा बरोबर नाही.

ईर्ष्येमागची खंत आणि टोमण्यांमागचं कारुण्य तिला दिसायला लागलं होतं.>> ह्यातून मला कंपॅशनेट नायिका दिसते. मी स्वतः अशा दृष्टीकोनातून कधी विचार केला नव्हता. कंपॅशन वाटणं ह्यात काहीच चूक नाही. पण प्रत्येकीला ते वाटलंच पाहिजे हा आग्रह मात्र बरोबर नाही. ह्या कथेत कुठेही असा आग्रह मला दिसला नाही.

@सीमंतिनी
तुमचा मुद्दा समजला आणि पटलाही.

मला हा खालील पॅराग्राफ अत्यंत आवडला Happy

>>>>>>
तीही एक कला आहे.. नुसती कृती कळली की पदार्थ बनतो असं नाही, त्याला अनुभव लागतो, हाताला चव असावी लागते, प्रमाणाचं गणित समजावं लागतं! आणि इतकं असुन त्यांचं हे काम दुय्यमच समजलं जातं.. ना पुरेसा मान मिळतो ना निर्णयप्रक्रियेत सहभाग. वर वाट्याला येतं ते परावलंबित्व. स्वत:साठी कधी काही घ्यावंसं वाटलं तर परवानग्या काढत बसावं लागतं.. तुझं तसं नाही, तु चार पैसे कमावतेस, स्वत:ची हौस पुरवण्याचं स्वातंत्र्य आणि क्षमता तुझ्यापाशी आहे.. त्यांचं दु:ख मोठं आहे बयो..’
नलु आत्यांचं ते बोलणं ऐकुन वसुधा अंतर्मुख झाली, त्या परिस्थितीकडे पाहण्याचा नवाच दृष्टिकोन तिला दिसला. ज्याचा तिनं आधी विचारच केला नव्हता.. ईर्ष्येमागची खंत आणि टोमण्यांमागचं कारुण्य तिला दिसायला लागलं होतं.
>>>>>>

मस्त !
मायबोली मला याचसाठी आवडते. ती एकाच घटनेचे किती कंगोरे दाखवते, तिच्याकडे किती विविध दृष्टीकोनातून बघायला शिकवते, सगळ्यांचे विविध विचार आपल्या विचारांना आणखी प्रगल्भ किंबहुना संतुलित करतात.

बाकी माझा ईथे रुमाल, ईतके प्रतिसाद पाहून नेहमीचा स्त्री -पुरुष आणि स्वयंपाकघर हा वाद पेटला आहे हे समजलेय Happy प्रतिसाद सविस्तर जेवून वाचतो. अजून काही नवीन दृष्टीकोन जरूर मिळतील..

सांज, धन्यवाद. हल्ली पोस्टी न वाचाताच घाईघाई प्रतिसाद देणार्‍यांच्या गर्दीत "मुद्दा समजला" हे सुद्धा फार मोठं यश वाटतं बघं. मोकळ्या मनाने ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद.

तुम्ही मांडलेल्या मुद्द्यासाठी तुमचेही आभार, सीमंतिनी!
आज बरेच नवे आयाम जाणून घेता आले त्यासाठी हिरिरीने चर्चेत सहभागी झालेल्या साऱ्यांचेच आभारही आणि अभिनंदनही Happy

आता वाचले प्रतिसाद
ईथे कथेवर चर्चा करताना एक प्रॉब्लेम होतो हे मला येथील काही प्रतिसादांवरून जाणवले. चुकत असेल तर कर्रेक्ट करा.

‘गळ्यात पर्स अडकवून बाहेर काय कोणीही जाईल.. शेरभर पुरण वाटून लुसलुशीत पोळ्या करुन दाखव म्हणावं मग मानेन हिला.> हे वाक्य बहुतेकींना पटलेलं दिसतंय. मला ते वाक्य रामतीर्थकर बाईंच्या भाकरी आली-च पाहिजे टोनमध्ये ऐकू आलं.
>>>>>>>>>

हे वाक्य सस्मित म्हणतात तसे कथेतील एका पात्राचे आहे. ते पात्र सुद्धा मागच्या पिढीतले जॉईंट फॅमिलीतले आहे. तेव्हा अशी वाक्य कानावर पडायचीच. आजही पडत असतील ते सोडा. म्हणजे कथेत समाजातील सत्यपरीस्थितीनुसार संवाद आले आहेत. आता ज्यांना हि कथा आवडली त्यांना हे वाक्य पटले, हे विचार पटले असा अर्थ काढायची यात घाई झाली आहे. असे नाही का वाटत. कारण मूळ लेखिकेनेही ते वाक्य नकारात्मक वर्तन म्हणूनच नायिकेला त्रास देणार्‍यांच्या तोंडी दाखवले आहे.

तर सांगायचा मुद्दा हा की एखादा विषय चर्चेचा बनवण्याच्या नादात आणि प्रत्येक गोष्टीत आदर्शवाद शोधायच्या प्रयत्नात कथा हा प्रकार समजून घेण्यात आपण गल्लत करत आहोत का?
(हा एक प्रतिसाद तसा ठळक जाणवला म्हणून कोट केला, गैरसमज नसावा, पण या लाईनीत ईतरही काही प्रतिसाद आढळले)

रून्मेष, चांगला प्रश्न. ह्या कथेच्या अनुषंगाने नाही तर एक जेनेरिक प्रतिसाद देते. मला पर्स गळ्यात बद्दल आक्षेप नाही.

सत्य किती जवळून हाताळायचं याचे काही अकथित सामाजिक संकेत असतात. उदा: समाजात धूम्रपान मुबलक लोकं करतात, गुटखा भरपूर लोकं खातात. पण मायबोलीवरच्या कथांत फार कमी नायक अशाप्रकारे व्यसनी असतात. (आहेत काही कथा ज्यात नायक/नायिका विडी, सिग्रेट इ. शिलगवतात. पण तो "ट्रेंड" नाही). इथल्या लेखक मंडळींना कुणी हा आग्रह केला नाही, आपसूक घडलं. कमीपणा घेणारी स्त्री ही सत्यपरिस्थिती असली तरी लेखनात ते किती येऊ द्यायचं हा विचार या निमित्ताने प्रत्येकाने केला तर ठीक आहे.
तसेच conflict रंगवताना सत्याच्या किती जवळ जायचं याचेही प्रत्येकाच्या मनात काही आडाखे असतात. रस्त्यात दोन पुरूष भांडताना एम.सी/बी.सी म्हणलेलं ऐकतो. अगदी सुशिक्षित लोकं सहज म्हणतात. पण कथेत फार थोड्यावेळा तसं लिहीलेल दिसतं. मग स्त्रीपात्राला "ह्या काही शिव्या नाहीत" म्हणून तिला जे जे ऐकू येत त्याच त्याच टेप वाजवात रहायचं का? (मला ह्या कथेबद्दल आक्षेप नाही. हा एक जेनेरिक प्रतिसाद आहे.)

चर्चा फक्त कथेपुरती राहिलेली नाही. इथे अनेकींनी आम्हीही यातून गेलोय-जातोय असं लिहिलं आहे.

गृहिणी हा शब्द आलेला पहिला प्रतिसाद माझा नाही.

पूर्णविराम.

मला कथा व चर्चा आवडली.

इथे कुठेही बायकांनी चूल मूल च करावं असा मेसेज दिल्याचं वाटलं नाही. उलट वैफल्यग्रस्त आणि करुण आयुष्य नको असेल तर चुकूनही गृहीणीपद स्वीकारू नका असाच मेसेज आहे आणि तो योग्यच आहे. कोथिंबीर वड्या किंवा पुरणपोळ्या करणं हेही महत्वाचं skill आहे पण ते मोनेटाईझ करता यायला हवं. युट्यूबवर शिकवा, ऑर्डर्स घ्या- पैसाच पैसे.

पात्र सुद्धा मागच्या पिढीतले जॉईंट फॅमिलीतले आहे. तेव्हा अशी वाक्य कानावर पडायचीच>>>> मूळ कथा ज्या काळात घडलेली दाखवलीय, तेव्हा स्त्रीने नोकरीसाठी बाहेर पडणे हा नवीन बदल होता. तेव्हा हा संघर्ष होताच. स्वयंपाकघरात स्वतःला सिद्ध करून दाखवणे, हे तेव्हा महत्त्वाचे मानले जायचे.
आताची परिस्थिती वेगळी आहे. बाहेर जेवणे, बाहेरून मागवणे, स्वयंपाकासाठी बाई ठेवणे ( इथेही ' बाई' आहेच); हे आता आपापल्या सोयीनुसार करणे शक्य आहे.
त्यामुळे जुन्या काळातील गोष्टीला आजच्या चष्म्यातून बघून वाद घालण्यात काहीच अर्थ नाही. हे तेव्हाच वास्तव होतं.

आजही टोमणे मारणाऱ्या स्त्रिया आहेत, मस्करीत का होईना बायकोला नीट स्वयंपाक येत नाही हे सुनावणारे पुरुषही आहेत. पण ते प्रमाण आता कमी होतंय. आणि ऐकून घेणारी स्त्रीही आता रडूबाई नाही राहिलीय. दुर्लक्ष करणे, सडेतोड उत्तर देणे; हे जमतं हल्लीच्या पिढीला.

कथेतील सून तिच्या हौशीने को.व. करायला शिकतेय. वसुधाने तिला हे जमलंच पाहिजे असं नाही सांगितलं. कथा ही कथेसारखीच वाचावी. आपल्या मनातले सगळे आदर्श दुसऱ्यांंच्या कथेत वाचायला मिळावे, अशी अपेक्षा ठेवू नये. लेखक त्याच्या मनातील कथा लिहित असतो आणि कदाचित त्यामागचा लेखकाचा दृष्टिकोन वेगळा असतो.

लेखिकेला एका पद्धतीची नायिका दाखवायची आहे. त्यांची नायिका/कथा आपल्याला आवडायलाच हवी हा आग्रह नाही. तसेच आपल्या आवडीची किंवा आपल्याला पटेल अशीच नयिका किंवा कथा त्यांनी लिहावी असा आग्रह धरणेसुद्धा बरोबर नाही.

ईर्ष्येमागची खंत आणि टोमण्यांमागचं कारुण्य तिला दिसायला लागलं होतं.>> ह्यातून मला कंपॅशनेट नायिका दिसते. मी स्वतः अशा दृष्टीकोनातून कधी विचार केला नव्हता. कंपॅशन वाटणं ह्यात काहीच चूक नाही. पण प्रत्येकीला ते वाटलंच पाहिजे हा आग्रह मात्र बरोबर नाही. ह्या कथेत कुठेही असा आग्रह मला दिसला नाही. >>> +१

कथा आहे ती. लेखनस्वातंत्र्य नावाची गोष्ट असते.

आता ज्यांना हि कथा आवडली त्यांना हे वाक्य पटले, हे विचार पटले असा अर्थ काढायची यात घाई झाली आहे. असे नाही का वाटत. >> +१

ऋन्मेष, सहमत. प्रश्नही चांगला आहे.

हर्पेन,
'सगळ्यांना आवडेल असे लिहिता येणे अवघडच नाही तर जवळपास अशक्यच आहे.' हे तुमचं वाक्य आणि 'सावली' वर तुम्ही दिलेला प्रतिसाद यावेळीही माझ्या खूप कामी आला, धन्यवाद Happy

Pages