कोथिंबिरीच्या वड्या

Submitted by सांज on 14 December, 2020 - 23:46

गॅस वर चहाचं आधण ठेऊन वसुधा ताईंनी कोथिंबिरीच्या जुडया निवडायला घेतल्या..

एरवी चार वेळा सांगूनही नेमकी कोथिंबीरच आणायला विसरणाऱ्या महेशरावांनी आज चक्क दोन जुड्या कोथिंबीर आणली होती आणि त्यामुळे वसुधा ताई सकाळी थोड्याशा वैतागल्याच होत्या. मनात म्हटलंही त्यांनी, इतकी वर्षं झाली आता तरी यांचा या बाबतीतला वेंधळेपणा काही कमी झालेला नाही!

तेवढ्यात, सोनाराने आपला एखादा नवीन घडवलेला सुरेख दागिना दाखवावा तशा उत्साहात त्या आणलेल्या कोथिंबिरीकडे बोट दाखवत महेशराव म्हणाले,
'पाहिलंस कशी ताजी लुसलुशीत कोथिंबीर आणलीय मी आज, तेही अगदी योग्य दरात! तू घालतेस तशी हुज्जत न घालता! नेहमी म्हणतेस नं कोथिंबीर विसरता म्हणून.. ही घे आज!'
त्यांच्या उत्साहाच्या फुग्यातील हवा क्षणार्धात काढून घेत वसुधा ताई म्हणाल्या,
'तुम्ही आज पण भाजीची यादी न्यायला विसरलात नं? आज कोथिंबीर आणू नका असं स्पष्ट लिहलं होतं त्यावर मी. दूधवाला आज सकाळी त्याच्या शेतातली ताजी कोथिंबीर देऊन गेलाय.. आता काय करु इतक्या साऱ्या कोथिंबीरीचं?’
आपण घातलेला गोंधळ लक्षात येऊन महेशराव म्हणाले,
'वड्या कर की. किती दिवसात केल्या नाहीस! तुझ्या हातच्या कोथिंबीर वड्या म्हणजे पर्वणीच की!’ कौतुकाच्या आडून बायकोचा राग शांतवण्याचा त्यांचा प्रयत्न चालू होता.
ते लक्षात येऊन ‘हो! माहितीय सगळं!’ अशा अर्थाचं मिश्कील हसू वसुधा ताईंच्या चेहऱ्यावर उमटलं. सगळ्या भाज्यांची वर्गवारी लावून त्या त्यांनी फ्रिजमध्ये जागच्या जागी ठेवून दिल्या. आणि कोथिंबीर मात्र ओल्या कपड्यात गुंडाळून ‘पाहू संध्याकाळी’ म्हणत तशीचं टेबलवर ठेवली.

गॅसवर मंद आचेवर चहा उकळत होता, त्याचा गोडसर सुवास स्वयंपाकघरात पसरु लागला. कोथिंबीरीची एकेक पानं देठापासून मोडताना वसुधा ताईंना वाटुन गेलं, या पदार्थाशी जोडलेल्या किती आठवणी आहेत. आपल्या घडणीला एक योग्य वळण मिळायला या वड्याच तर कारणीभूत आहेत की..

....

लग्न होऊन सासरी आल्यावर प्रथम इतक्या मोठ्या गोतावळ्याला पाहून तरुण वसुधा थोडीशी भांबावलीच होती. माहेरचं चौकोनी आटोपशीर कुटुंब सोडून त्या भल्या-थोरल्या, माणसांनी भरगच्च घरामध्ये प्रवेश करताना तिच्या मनात भितीयुक्त उत्सुकता जरुर होती. पण मग नंतर हळू-हळू त्या तिथल्या भिंतींमध्ये स्वत:ला फिट बसवता बसवता तिची तारांबळ उडू लागली. संस्कारांची नवी परिमाणं, ‘मान-पान’ या नवीनच विषयाशी झालेली ओळख, ते सोवळ्यातला स्वयंपाक.. कारल्याची चटणी.. मुगडाळीची धिरडी इ.इ. खडतर चाचण्यांमधून स्वत:ला धडपडत-ठेचकाळत पुढे रेटताना तिची दमछाक व्हायची. दुपारच्या वेळी घरातल्या बायकांची एकमेकींची उणी-दुणी काढणारी किंवा चेष्टा मस्करी करणारी सत्रं रंगायची. पुस्तकांमध्ये रमणारं वसुधाचं मन या अशा गोष्टींमध्ये रमायचं नाही. आणि मग त्यावरुनही तिची खिल्ली उडायची. आपण या सगळ्यांपेक्षा वेगळ्या का आहोत? किंवा या साऱ्याजणी म्हणतात तशा खरंच आपण अति लाडा-कोडामुळे एकलकोंड्या वगैरे झालोय का? असे प्रश्न त्या काळात सतत तिच्या डोक्यात मुक्कामाला असायचे. त्यातच पुढे ग्रॅज्युयेशनचा निकाल आला आणि त्यात विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या वसुधाला लगोलग नोकरीची संधीही चालून आली. लेकी-सुनांनी घराबाहेर न पडण्याच्या त्या काळात सासऱ्यांच्या आणि नवऱ्याच्या पाठिंब्यामुळे वसुधा नोकरी करु लागली. पण त्यामुळे झालं असं की तिच्या पुढ्यातल्या घरगुती अडचणी अजून वाढल्या. तिला पुर्वीपेक्षा अधिक कष्ट घेऊन घरात स्वत:ला सिद्ध करत रहावं लागलं. ही काल आलेली मुलगी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून बाहेर काम करते. स्वत:च्या पायांवर ऊभी आहे आणि आपण मात्र सारा जन्म रांधण्यात आणि उष्टी काढण्यात घालवतोय ही घरातल्या इतर बायकांच्या मनातील खंत वसुधाबद्दलच्या ईर्ष्येच्या स्वरुपात बाहेर पडू लागली. आणि ‘गळ्यात पर्स अडकवून बाहेर काय कोणीही जाईल.. शेरभर पुरण वाटून लुसलुशीत पोळ्या करुन दाखव म्हणावं मग मानेन हिला..’ सारखी वाक्य जाता-येता तिच्या कानांवर पडू लागली. त्यातच पूढे घडला तो कोथिंबीर वड्यांचा प्रकार..

....

उकळत्या चहाखालचा गॅस बंद करुन महेशराव वसुधा ताईंना म्हणाले,
‘काय गं, कुठे हरवली आहेस?’
‘अरेच्चा! उतू गेला का चहा?’
‘नाही! पण मी आलो नसतो तर गेला असता’ असं म्हणून त्यांनी चहा कपात ओतून घेतला.
चहा पिता पिता वसुधा ताईंच्या पुढ्यातला कोथिंबीरीचा पसारा पाहून महेशराव म्हणाले,
‘माझ्या वेंधळेपणामुळे तुझं काम वाढवून ठेवलं नं मी आज!’
वसुधा ताई खजील होऊन म्हणाल्या,
‘नाही हो! हे सगळं करायला आवडतं मला, फक्त वय वाढल्यामुळे आता थोडंसं थकायला होतं इतकंच!’
‘पूर्ण स्वयंपाकाला बाई लाव म्हणून किती दिवसांपासून सांगतोय तुला पण ऐकत नाहीस माझं.’ ‘लावलीय की पोळ्यांसाठी. पण बाकी नको हं.. मी रमते हो हे सगळं करण्यात!’ वसुधा ताई म्हणाल्या. ‘किती बदल होत जातात नं काळानुरूप आपल्यामध्ये! मला ती लग्न झाल्या झाल्या स्वयंपाकघरात पाऊल ठेवायलाही घाबरणारी वसुधा आठवतेय.. किती घाबरायचीस तू तेंव्हा!’
‘हम्म्म्म्.. ते दिवस गेले आता आणि ती माणसंही गेली. किती बाळबोध हेते नं मी तेंव्हा! पुस्तकांपलीकडचं आयुष्यच ठाऊक नव्हतं मला..’
एकत्र कुटुंब, दोघांच्या नोकऱ्या, मुलं-बाळं, त्यांचं शिक्षण, नंतर लग्नं.. या साऱ्यांमध्ये त्या दोघांना एकमेकांसाठी वेळ तसा मिळालाच नव्हता. निवृत्तीनंतर मात्र वसुधा ताईंनी ठरवलं होतं, मुलांना त्यांच्या त्यांच्या मार्गाने जाऊ द्यायचं आणि आपण आयुष्याची संध्याकाळ नवऱ्यासोबत छान घालवायची. इतक्यात फोन वाजला म्हणून महेशराव उठले. सुमेधने, त्यांच्या मुलाने, व्हिडीओ काॅल केला होता.. मग या दोघांचं मुलाशी, सुनेशी बोलणं सुरु झालं.
टेबलावरची कोथिंबीर पाहून सुनेने विचारलं,
‘आई.. काय करताय एवढ्या कोथिंबीरीचं?’
‘काही नाही गं.. कोथिंबीर वड्यांची फर्माईश आहे तुझ्या सासरेबुवांची!’
‘अरे वा! मला शिकायच्याच होत्या. यु-ट्युब वर पाहून मी ट्राय केल्या २-३ वेळा पण म्हणाव्या तशा जमल्याच नाहीत! आता पाहते तुम्ही कशा करता ते..’
‘चालेल की. पण तेवढा वेळ आहे का तुझ्याकडे? तासभर तरी लागेल.. नाहीतर मी कृती सांगु का तुला?’ वसुधा ताई विचारत होत्या.
‘लागुद्या हो आई.. करा तुम्ही, आज वेळ आहे माझ्याकडे.. आणि नुसती कृती ऐकुन पदार्थ जमत नाहीत हे आताशा समजलंय मला, ते नीट शिकुनच घ्यावे लागतात!’
सईचं बोलणं ऐकुन वसुधा ताईंना नलु आत्या आठवल्या.. हीच गोष्ट किती छान समजाऊन सांगितली होती त्यांनी आपल्याला तेव्हा! आपल्या सुनेला मात्र ती न समजावता समजली याचं क्षणभर त्यांना कौतुकही वाटलं.
महेशरावांनी मग फोनचा अॅंगल अॅडजस्ट करुन दिला आणि सासु-सुनेचं आॅनलाईन कोथिंबीर वडी वर्कशाॅप सुरु झालं..

....

त्या दिवशी वसुधाला घरी यायला जरासा उशीरच झाला होता. काॅलेजात परीक्षा चालू असल्यामुळे कामाचा ताण थोडा वाढला होता. त्यातही ज्युनियर प्रोफेसर असल्यामुळे सिनीअर्सची सद्दी सहन करणं तिला भाग होतं.
हात-पाय धुऊन आत आली तोच मोठ्या सासूबाईंनी फर्मान सोडलं,
‘वसुधा, आज जरा कोथिंबीर वड्या कर पाहू.. बाकी स्वयंपाक होत आलाय. वड्या तेवढ्या तू कर.’ ‘सासूबाई अहो पण मी कधी केल्या नाहीत त्या’ वसुधा गडबडली.
‘त्यात काय एवढं! तुझ्या सारख्या प्रोफेसरीण बाईला काय अवघड आहे? डाळीचं पीठ, आलं-लसूण, मीठ-मिरची लावून कोथिंबीर वाफवायची आणि मग तेलावर परतायची बास!’
‘बरं’ म्हणून वसुधाआत गेली आणि साडी बदलून लगोलग कामाला लागली. सासुबाईंकडून ऐकलेल्या ओझरत्या कृतीवरुन फार काही अवघड पदार्थ नाही असं तिला वाटलं पण मनात थोडी धाकधुक होतीचं. तिने कोथिंबीर धुवून घेतली आणि चक्क पालक-मेथी वाफवावी तशी कढईत तेल सोडुन वाफवायला ठेवली त्यात मग डाळीचं पीठ आणि पाणी टाकून सरळ हाटायला सुरुवात केली.. पण पाण्याचं प्रमाण जास्त झाल्यामुळे मिश्रण सैल झालं आणि मग ते मिळून येण्यासाठी तिने पीठाचं प्रमाण वाढवायला सुरुवात केली.
बाकीच्या साऱ्याजणी तिची गम्मत पहात होत्या पण आज त्यांनी ठरवलं होतं की तिला कोणीच काहीच सांगायचं नाही. तिलाही कळू देत स्वयंपाक करणं म्हणजे काही खायची गोष्ट नाही ते.. खूप प्रयत्नांनंतर वड्या पाडण्यात तिला यश आलं. मग एकेक करुन त्या तेलावर परतायला सुरूवात केली. पण जास्त पाणी आणि पीठामुळे वड्या तेल पिऊ लागल्या. तिने त्या तशाचं कशा बशा करुन सगळ्यांना वाढल्या. मोठ्या दीराने पहिल्याचं घासात,
‘या कोथिंबीरीच्या वड्या आहेत की पिठल्याच्या?’ असं म्हणून तोंड वेडंवाकडं केलं.
त्याला जोड देत सासरेबुवा म्हणाले,
‘सुनबाई, आम्ही तुम्हाला हुशार समजत होतो! पुन्हा असा तेलाने माखलेला पदार्थ वाढू नका कोणाच्या ताटात. आधी नीट शिकून घ्या.’
वसुधाला मेल्याहून मेल्या सारखं झालं. त्या दिवशी रात्री ती खूप रडली.
थोड्या वेळाने नलु आत्या तिच्यापाशी आल्या आणि तिच्या डोक्यावरुन हात फिरवू लागल्या. तरुणपणीचं यजमान निवर्तल्यामुळे सोवळ्या होऊन त्या कायमच्या माहेरी भावाकडे आल्या होत्या. तिच्या डोळ्यातलं पाणी पुसून त्या म्हणाल्या,
‘असं रडू नकोस बाळा, मला समजतंय हो तू खंतावली आहेस.. घरात, बाहेर दोन्हीकडे स्वत:ला सिद्ध करता करता मेटाकुटीला येतेयसं.. पण वसुधा, या घरातल्या बाकीच्या बायका आहेत नं, तुझ्या या सासवा, जावा, नणंदा.. यासुद्धा खंतावल्याचं आहेत गं .. त्यांची खंत तुझ्यापेक्षा निराळी आहे इतकंच. तुझ्यातल्या क्षमता सिद्ध करण्याची तुला जी संधी मिळाली ती त्यांना नाही गं मिळाली. इच्छा असो वा नसो त्या स्वयंपाकघराशी बांधल्या गेल्या आणि मग हळु-हळु त्यालाचं विश्व समजू लागल्या.. बरं, स्वयंपाक हे काही येरागबाळ्याचं काम नाही बरं! तीही एक कला आहे.. नुसती कृती कळली की पदार्थ बनतो असं नाही, त्याला अनुभव लागतो, हाताला चव असावी लागते, प्रमाणाचं गणित समजावं लागतं! आणि इतकं असुन त्यांचं हे काम दुय्यमच समजलं जातं.. ना पुरेसा मान मिळतो ना निर्णयप्रक्रियेत सहभाग. वर वाट्याला येतं ते परावलंबित्व. स्वत:साठी कधी काही घ्यावंसं वाटलं तर परवानग्या काढत बसावं लागतं.. तुझं तसं नाही, तु चार पैसे कमावतेस, स्वत:ची हौस पुरवण्याचं स्वातंत्र्य आणि क्षमता तुझ्यापाशी आहे.. त्यांचं दु:ख मोठं आहे बयो..’
नलु आत्यांचं ते बोलणं ऐकुन वसुधा अंतर्मुख झाली, त्या परिस्थितीकडे पाहण्याचा नवाच दृष्टिकोन तिला दिसला. ज्याचा तिनं आधी विचारच केला नव्हता.. ईर्ष्येमागची खंत आणि टोमण्यांमागचं कारुण्य तिला दिसायला लागलं होतं.

....

वड्यांचं मिश्रण कुकरमध्ये वाफायला ठेवून वसुधा ताई सुनेला म्हणाल्या,
‘बरं का सई, कोथिंबीर धुवून चिरायची मग कोरड्या कपड्यावर थोडी सुकू द्यायची.. आणि जास्तीचं पाणी शोषलं गेलं की मग त्याला पीठ लावायचं बरं, नाहीतर वड्या बिघडतात’
‘अच्छा! तरीचं मला काही केल्या जमत नव्हत्या. किती बारकावे असतात नाही प्रत्येक पदार्थाचे! सुमेध रोज तुमच्या स्वयंपाकाचं कौतुक करत असतो आणि माझी धांदल उडालेली पाहुन मला हसत असतो.’ ‘जमेल गं तुलाही.. अनुभवाने सारं काही जमायला लागतं. आपण आपल्या चुकांमधुन शिकत रहायचं फक्त! माणसांच्या स्वभावातली आणि स्वयंपाकातली गुंतागुंत समजायला याच गोष्टी उपयोगास येतात बघ!’ आयुष्यानं त्यांना शिकवलेली गोष्ट त्या त्यांच्या सुनेला समजाऊ पहात होत्या.
गप्पा मारता मारता मग त्यांनी वाफलेलं वड्यांचं पीठ बाहेर काढून थंड व्हायला ठेवून दिलं.

....

तो नवा दृष्टीकोन घेऊन वसुधा रोजच्या जगण्याला भिडायला लागली आणि तिचं तिला कळत गेलं गोष्टी किती सोप्या होत्या ते.. सासुबाईंच्या रागामागची माया कळायला लागली.. न बोलल्या गेलेल्या शब्दांमागचे भाव उमजायला लागले.. आणि जिथे जिथे शक्य तिथे तिथे कधी स्वत:कडे कमीपणा घेत तर कधी थोडंसं सामंजस्य स्वत:मध्ये भिनवत ती साऱ्यांमध्ये सहभागी होत गेली.. आणि हळु-हळु तिची खंत आणि इतरांचं कारुण्य दोन्हीही तिनं आपलंसं केलं.. ती मग त्या घरात अगदी अभिन्न होत गेली. आणि एक दिवस तिने प्रयत्नपुर्वक शिकुन घेतलेल्या कोथिंबीर वड्या सर्वांना बेहद्द आवडू लागल्या.

....

सुरीने छान एकसारख्या वड्या पाडून वसुधा ताईंनी त्या तेलावर छान खरपूस भाजून घेतल्या. आणि त्यांचा खमंग वास घरभर पसरला. महेशराव आत येत म्हणाले,
‘अरे वा! झाल्या वाटतं कोथिंबीर वड्या तयार!’
‘हो झाल्या.. हे घ्या चव घेऊन सांगा कशा झाल्यात ते’ म्हणत वसुधा ताईंनी वड्यांची प्लेट त्यांच्या समोर ठेवली आणि मग त्यातली एक वडी तोंडात टाकून ‘बहार!’ असं म्हणून त्यांनी वड्यांचा फज्जा पाडायला सुरुवात केली.
‘आई माझ्याही तोंडाला पाणी सुटलंय आता’ सई आणि सुमेध दोघंही एकदाचं म्हणाले.
‘अरे मग या की इकडे, तुम्ही आलात की परत बनवेन मी’ वसुधा ताई आनंदाने म्हणाल्या.
त्यावर सई लगेच म्हणाली,
‘नाही आई यावेळी मी बनवेन आणि तुम्हाला खायला देईन.. मग तुम्ही सांगा मी पास की फेल ते!’ आपली परंपरा पुढे चालत असलेली पाहून वसुधा ताई समाधानाने म्हणाल्या, ‘नक्की!’.

- सांज
https://chaafa.blogspot.com/2020/12/blog-post.html

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सांज, त्याचे काय इतकं पण धन्यवाद.

सगळेजण तुम्ही चांगले लिहिता असेच म्हणत आहेत. चांगले लिखाण अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचत असल्याने त्यातून सुयोग्य तो संदेश जावा असे वाटून तुम्ही लिखाणातून 'असे असे दाखवले तर अधिक चांगले' असे लोकांना वाटणे स्वाभाविक आहे.

पण तुम्ही तुम्हाला भावेल ते आणि तसे लिहिणे सोडू नका.

सगळेजण तुम्ही चांगले लिहिता असेच म्हणत आहेत. चांगले लिखाण अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचत असल्याने त्यातून सुयोग्य तो संदेश जावा असे वाटून तुम्ही लिखाणातून 'असे असे दाखवले तर अधिक चांगले' असे लोकांना वाटणे स्वाभाविक आहे. >> +१

पण तुम्ही तुम्हाला भावेल ते आणि तसे लिहिणे सोडू नका. >>
हो Happy

या धाग्यावर हर्पेन, भरत आणि आ. रा. रा. सोडून एकाही पुरूष आयडीने प्रतिसाद दिला नाहीये >>> जिज्ञासा, त्याचे कारण धाग्याचे नाव Happy आधी पाकृ वाटली होती कारण सध्या अनेक पाकृ धागे वर आहेत. मग ८०+ प्रतिसाद दिसले तेव्हा लक्ष वेधून घेतले Happy

कथेबद्दल - काल आधी प्रतिसाद वाचताना कथा नुसतीच वरवर स्कॅन केली होती आणि इथे भरत वगैरेंनी म्हंटले तशीच क्लिशे वाटली होती. पण आज नीट वाचली आणि आवडली. खूप छान लिहीले आहे. यातील क्लिशे वाटणारा जो भाग आहे तो आधीच्या पिढीतील वर्णनाचा आहे. सध्याचे जे वर्णन आहे ते सध्या साधारण दिसते तसेच चित्र आहे.

लिहीण्याची स्टाइलही आवडली. फ्लॅशबॅक, घरात रूळण्याबद्दल उत्तर सापडणे आणि तेथून पुन्हा सध्याच्या काळात परत - हे सगळे जमले आहे.

भरत - मलाही त्या दोन तीन दशकांपूर्वीच्या माहेर छाप कथा पकावू वाटतात पण ही तशी वाटली नाही.

बाकी यातले महेश"राव" काय किंवा तो मुलगा काय, कोणीही स्वयंपाक करताना वगैरे दाखवले नाहीत ते सगळे अगदी कॉमन चित्र आहे. ते अनेकांना खटकेल आणि खटकायलाच हवे पण वस्तुस्थिती अनेक ठिकाणी तशी आहे हे तर खरे आहे. पण प्रत्येक कुटुंबातील प्रचलित पद्धतीपासून पुढे ही gradual progress असते. अगदी कर्मठ, मानापमान, मर्यादा, "आमच्या यांना हे लागतं" छाप घरे ही शून्य धरली आगदी प्रागतिक, सर्वांना समान संधी व स्वातंत्र्य असलेली जर १०० धरली, तर मधल्या मोठ्या रेंज्मधे बहुतांश कुटुंबे असतील आणि गेल्या काही वर्षात हळूहळू ती बदलत आहेत. तो बदल या कथेतील दोन काळांतही दिसतोच की.

छा न कथा , म्हणजे कथा म्हणून छान फुलवली आहे, मला प्रतिक्रिया अधिक भावल्यात. लेखिकेच्या व वाचकांच्याही.

मला वाटते कथानायिका जरी आपल्या आईच्या कालातली असली तरी आजही असे प्रसंग घडतात.

मीही वयाच्या २५ पर्यंत स्वयंपाकघरात जबाबदारी घेतली नाही. MD झाल्यावर थोडेफार वेल हाती असे तेव्हा हौस म्हणून YouTube व एक मैत्रिण कृपेने (तिचा food blog आहे) बरेचसे पदार्थ (गुजा, पुपो, कलाकंद, रसगुल्ला, खांडवी, ढोकला, पोहा, पकोडा, पुरी, ब वडा ई) बनवू लागले. रोजचे जेवण अथ पासून इति पर्यंत बनवणे ही माझी आवड नाही, पण गरज लागली तर palatable बनवत असे.

अब कहानी मे ट्विस्ट
लग्नानंतर काही दिवसांनी मी स्वतः चा टिफिन बनवून नेऊ लागले, लवकर निघायचे असे .

संध्याकाली
नवर्याची आई व बहिण प्रत्येक पदार्थ बरोबर detailed scrutiny , history , dissection e.g. बडी इलाईची चा स्वाद छोले मध्ये जास्त झालाय नं , बिरयानी त जायपत्री नाही का? , इ.स. .... मध्ये काकीनी बनवलेले छोले कित्ती छान झाले होते-त्या काकू इ.स..... नंतर डाईरेक्ट आमच्या लग्नात उगवलेल्या हेही मला त्याच चर्चेत समजते- पुन्हा छोले बनवले की repeat telecast- असा सोहला असे.

प्रत्येक पदार्थ चे विश्लेषण झालेच पाहिजे. सोबत 'आमच्याकडे' 'आमच्यात' अशी'च' पद्धत आहे हे वाक्य कमीत कमी एकदा! रोजचे वरण सुद्धा यातनं सुटले नाही!
सहा सात महीन्यात मला प्रत्येक पदार्थ ची हिस्ट्री माहित झाली. नंतर समजले की हे ऐकण्यात माझा बराच वेल जातोय , मी दुपारी सुदैवी असते व मी काढता पाय घेऊ लागले. (तसे ही होस्पिटल मधून बरेच फोन येत Proud )

मी टिफिन ची भाजी जास्त बनवत असे (अंदाज नसल्याने) तीसंध्याकाल उरली तर समजायचे चव बरी नसणार. (मी चवीचा जास्त विचार नाही करत.) त्या भाजीचीही scrutiny होत असे हे वे सां न. (सोबत आमच्याकडे....पद्धत.....) मीतर ऐकून हसून सोडून देई.

पण नंतर लाईव commentary चालू झाले नवर्याच्या वडिलांचे (कारण सकाली ९ला मी जैवण बनवतांना त्यांची बायको मुलगी व मुलगा तिन्ही झोपलेले असत) . उ. आम्ही चपात्याना तेल लावतोच. आमच्या चपात्या मोठ्या असतात. ईई. (माझे फुलके कोरडे असत) व इतर वेली शिक्षण वरून बोलणे !

नंतर एकदा मला thyroiditis झालेला तेव्हा hyperthyroidism नी tremor होत असल्याने भाजी व्यवस्थित झाली नाही . संध्याकाली माझ्या भाजीची scrutiny होऊ लागली. त्यात टोन असाच ( को. व. सारखा )

मी शांंतपणे नवर्याला सांगितले cook बघ. (त्याला कशाशीच काही देणं नाही- बायकोच्या शिक्षण चा अपमान केला जेवणामुले तरी मौनं सर्वार्थ साधनम् जेवण मिलंतयं ना आपण लक्ष द्यायचं नाही हा त्याचा बाणा!- आहे तोही मायबोलीवर) मी तोवर मोजू मापून जेवण बनवू लागले. नंतर पुलाखालून बरंच पाणी गेलं. Complicated pregnancy मुले मी माहैरी गेले होते . आत्ता पर्यंत cook नाही सापडलांय बरं, मी मला जमेल ते बनवते -मला येते तसे -व खाते . कधी काही चविष्ट असेल तर नवराही थोडं खातो.

जय हिंद जय महाराष्ट्र

वि.सू. माझी स्टोरी खूप मोठी झालीय (ओरिजनल कथेपेक्षा)याची जाणिव आहे. मला तेव्हा खूप वाईट वाटलेलं (may b hyperthyroidism) , एकदा वाटलं overreact तर नाही ना केलं ( जरी कधी भांडण नाही झालं), पण या बाबतीत निर्विकार नवर्याला बघून ,आत्ता फक्तत स्वतःचं व मुलांचं जेवण बनवतांना काही वाटत नाही.

मेघाएस्के, बिग हग! इतकं सगळं डोक्यावर बर्फ ठेवून पार पाडायला नि मांडायला फार धीर लागतो... कौतुक...

(आता छान आहे सगळं नि सावरलीस म्हणून एक वात्रट मैत्रिणीचा न मागितलेला सल्ला - ग्लोव्ह्ज पासून पेशंटस पर्यंत, माहेरापासून पगारापर्यंत काय काय ऐकलंस ते माहिती नाही. पण आता एक पर्स घे चांगली.... इथे सासू ही वाचणार असेल नि राहिली असेल तिची पर्स टोमण्याची हौस तर फिटेल... इतकं केलं, तिथे अटकी टेप और कंपॅशन के नाम पे एक और सही... Wink )

MeghaSk
आपलं घर सोडून येणं, नव्या घराशी जुळवून घेणं, नोकरी-व्यवसाय सांभाळणं आणि आपल्या एकेका कृत्याची चिरफाड होऊन सतत काही ना काही ऐकावं लागणं हेखरंच खूप थकवणारं आणि मानसिकरित्या उद्विग्न करणारं असतं. त्यात आपली बाजू घेणारं, आपल्याला समजून घेणारं जर कोणी जवळ नसेल तर मग ते अजून जीवघेणं!
तुम्ही या सगळ्यातून गेलात, त्यावर तुमचा असा एक मार्ग शोधून आनंदाने जगता आहात, तुमच्याविषयी खरंच आदर वाटतो आणि कौतुकही Happy
* महेशची को व गोष्ट लिहायला मलाही आवडेल Happy

फा, धागा पाककृती विभागात नाही कथा/कादंबरी विभागात आहे. मीही आधी याच गोंधळामुळे उघडला नव्हता. माझा मुद्दा हा आहे की पुरुष आयडींचे प्रतिसाद न येण्याचं कारण कदाचित त्यात काही रिलेट होण्यासारखं न सापडणं असं असू शकतं. पुरूष आयडींनी कथा वाचलीच नाही असं मला म्हणायचं नाहीये. पण सहसा प्रतिसाद आपल्या आवडीच्या/कौशल्याच्या अनुषंगाने दिले जातात. त्या दृष्टीने पाहीलं तर या साऱ्या किचन पॉलिटिक्स प्रकारात पुरूष सहसा पडलेले दिसत नाहीत so they hardly have anything to contribute as their response. स्वयंपाक न येण्यावरून वर्षांनुवर्षे टोमणे ऐकण्याचा अनुभव किती पुरूषांना येतो? Majority of the households are probably moving towards 100 but unfortunately many are stuck at a lower score for too long Sad मेघा यांचा अनुभव हेच सांगतो की अजून बराच बदल घडायला हवा आहे.

मेघाएस्के, मला तुमचा प्रतिसाद आणि दृष्टिकोन आवडला. "मी शांतपणे नवर्‍याला सांगितले...." हा परिच्छेद तर खूपच आवडला

मी कधी कथा लिहिली नाहीए. पण एका कोथिंबीर वडीची दुसरी गोष्ट लिहायचा मोह होतोय. बघू.

@भरत
तुमच्या कथेचं स्वागत आहे. वाचायला नक्की आवडेल.
या निमित्ताने ‘पुरूष’ ‘स्वयंपाकघरात’ रस घेऊन कथा लिहणार असतील तर ते मात्र नक्कीचं ‘ग्रो’ होताहेत म्हणायला हरकत नाही.
हे मी माझ्या सरधोपट कथेचं यश मानते Happy

मी कधी कथा लिहिली नाहीए. पण एका कोथिंबीर वडीची दुसरी गोष्ट लिहायचा मोह होतोय. बघू.>>>>>>>>

आवडेल वाचायला !

सांज, प्रत्यक्ष स्वयंपाकघरात मी खूप आधीपासूनच रस घेतो आहे. त्यासाठी मला तुमच्या कथेच्या निमित्ताची गरज नाही.
. हं , मी कथा लिहिली तर त्याचं निमित्त तुमची कथा असू शकेल.

मी कथेविषयीच बोलतेय भरत जी Happy
आपला विषय कथा-लेखिका-वाचक-स्वयंपाकघर-ग्रो होणं इ. इ. मार्गांनी सुरू झाला. तो धागा धरून प्रतिसाद दिला मी. बाकी तुम्ही स्वयंपाकघरात सक्रिय असाल तर तो वाखाणण्याजोगा गुण आहे. मलाही ते अजून तितकसं जमत नाही.

मी हा धागा पाकृ समजून उघडला होता (हो, हा पाकृ विभागात नाही, पण नीट बघितले नव्हते) आणि मग कथा आहे हे लक्षात आल्यावर नंतर वाचू म्हणुन बंद केला.
कथा वाचली, ठीक ठीक वाटली, लेखनशैली आवडली.

स्वाती२ यांचा प्रतिसाद, त्यातील मुद्दे कथेला धरून कथेच्या पात्रांंसंबंधी आहेत, आवडले.

भरत यांचा मुद्दा पटला पण थोडे जजमेंटल झाले असे वाटले.

इतरही बरेच प्रतिसाद चांगले वाटले.

या धाग्यावर हर्पेन, भरत आणि आ. रा. रा. सोडून एकाही पुरूष आयडीने प्रतिसाद दिला नाहीये >>> जिज्ञासा, त्याचे कारण धाग्याचे नाव Happy आधी पाकृ वाटली होती

>>>>

थोडक्यात पुरुषांना पाककृती वा स्वयंपाक यात एकूणच रस कमी असतो. आजचा मेनू खाऊ गल्ली या धाग्यावर देखील पुरुषांच्या पोस्ट कमी असतात जसे त्या क्रिकेटच्या धाग्यावर किंवा तुम्ही दारू कशी पिता या धाग्यावर महिलांच्या कमी अस्स्तात. आणि ज्या असतात त्यातही किती पदार्थ पुरुषांनी स्वता बनवले आहेत तेच मोजले तर प्रमाण आणखी कमी होईल.

असो
पण जसे स्वयंपाक न जमणारया स्त्रियांना टोमणे खावे लागतात तसे हल्ली स्वयंपाक न येणारया, वा स्वयंपाकाची आवड नसलेल्या पुरुषांनाही जज केले जाते असा अनुभव आहे.

कथा वाचली, ठीक ठीक वाटली, लेखनशैली आवडली.>>>>>>+१.
सीमंतिनी,सस्मित्,स्वाती २ यांचे प्रतिसाद आवडले.
मेघाएस्के,सीमंतिनी बोलल्या तसे डोक्यावर बर्फ ठेऊन वागलात की! कठीण आहे.

हल्ली स्वयंपाक न येणारया, वा स्वयंपाकाची आवड नसलेल्या पुरुषांनाही जज केले जाते असा अनुभव आहे.

>>>
हे बरोबरच आहे. ज्याला पोट आहे/ भूक लागते अशा प्रत्येक व्यक्तीला स्वयंपाक आलाच पाहिजे. साग्रसंगीत बनवू नका पण पोट भरेल इतकं तरी बनवता आलंच पाहिजे

कथा ठीकठाक वाटली. नलूआत्याचा दृष्टिकोन आवडला.

सहज वाटले की ह्या कथेत को व च्या जागी ऑफिसमधील एखादा प्रोजेक्ट असता, सासू ननंदेच्या जागी भोचक कलिग्स असते, टीका करणाऱ्या सासर्याच्या जागी हुकलेले प्रमोशन असते आणि पुढच्या वर्षी वसुधेने दुसरा प्रोजेक्ट यशस्वी करून प्रोमोशन मिळवले असते, भोचक तोंडे बंद केली असती तर प्रतिसाद कसे आले असते? प्रोजेक्ट हे टीमवर्क असल्यामुळे भोचक लोकांची आवश्यक तिथे मदत, प्रसंगी स्वाभिमान थोडा बाजूला ठेऊन घ्यावी लागली असे दाखवले असते तर चालले असते का....

प्रॉजेक्टवर कधी थोडी बोलाचाली होणे वेगळं नि सातत्याने एखाद्या नवीन व्यक्तीला रॅगिंग घेतल्यासारखे दिर्घकाळ वागवणे वेगळ. ऑफीसची कथा असती तरी तिथे प्रॉजेक्ट मॅनेजर काय म्हणाला? एच आर झोपलं होतं का? तिला दुसरी नोकरी नसती का शोधता आली? अशाच प्रतिक्रिया आल्या असत्या. (निदान मी दिल्या असत्या.) कुठेही दिर्घकाळ कमीपणा घेऊन रहाणे अवघड असते. कंपॅशन म्हणून दुसर्‍याला मदत करणे वेगळे, त्यांचे प्रश्न सोडवणे वेग़ळे नि स्वतः कमीपणा घेणे, दरवेळी धारातीर्थी पडणे वेगळे.

“जिथे जिथे शक्य तिथे तिथे कधी स्वत:कडे कमीपणा घेत तर कधी थोडंसं सामंजस्य स्वत:मध्ये भिनवत ती साऱ्यांमध्ये सहभागी होत गेली.. “

@ सीमंतिनी

तुमचा मुद्दा समजला आणि पटल्याचं मी आधी सांगितलंय. पण, वरील वाक्याचा अर्थ तिने ‘दरवेळी’ स्वत:कडे कमीपणा घेतला किंवा मुळूमुळू रडत बसली किंवा दुसऱ्यांचे प्राॅब्लम्स सोडवत स्वत:ला विसरून गेली असा होत नाही!
‘जिथे शक्य तिथे’ मध्ये सगळं येतं. ही एक शब्दमर्यादा असलेली कथा आहे. केवळ एका प्रसंगावर बेतलेली. नायिकेचं चरित्र नाही. कथेत मी कोणालाच पूर्ण वाईट/चुकीचं अथवा चांगलं/बरोबर दाखवलेलं नाही. खऱ्या आयुष्यातही तसं नसतं. बरं-वाईट प्रत्येकात असतं. ते नायिकेमध्येही आहे आणि तिच्या घरच्यांमध्येही!
घरातल्या इतर बायका सिरियल्स मध्ये असतात तशा पूर्णत: कुटील-कारस्थानी मला अपेक्षित नाहीत. जुन्या बायका बोलतात तशा मायाही अफाट करतात असा माझा अनुभव आहे. त्यावर कथा बेतलेली आहे. सगळ्याच तशा असतात असं माझं म्हणणं नाही. पण मी पाहिलेल्या आहेत.
कोथिंबिर वडी हा काही नायिकेने पहिल्यांदा केलेला पदार्थ नाही. याही आधी तिने पदार्थ बनवलेयत आणि प्रसंगी ते चुकलेयत देखील पण त्या त्या वेळी इतर जणींनी तिला मदत केली ती या वेळेस केली नाही असंही कथेत लिहलेलं आहे. आणि तिच्या सासवा नोकरीहून आली की करेल म्हणत पूर्ण कामं तिच्या गळ्यात मारुन तिची उणी-दुणी काढत बसलेल्या नाहीत!
इतरांच्या बाजू समजून घेणे, वेगळ्या दृष्टीने प्रसंगाकडे पाहणे इतकंत कथेत सांगितलेलं आहे. वसुधा बिच्चारी आणि स्व हरवून बसलेली नाही. तुम्ही तिला तशी पोर्ट्रे करू नका! उलट या प्रसंगातून तिचा ‘स्व’ अधिक विवेकी झालेला मी दाखवलाय.

हे सगळं खरंतर मला लिहत बसायचं नव्हतं. तो माझा स्वभाव नाही. पण, माझ्या नायिकेचं स्वरूपच बदललं जातंय असं दिसलं म्हणून बोलावं लागलं.

*ही एक कथा आहे!

Happy सांज, हो तू म्हणतेस ते मला आधीच समजले आहे. रून्मेष, आणि साधना दोघांना दिलेले प्रतिसाद ह्या कथेवरून नाहीत. रून्मेषनंतरच्या प्रतिसादात तसे स्पष्ट लिहीले. साधना नंतर दिलेल्या प्रतिसादात लिहीले नाही, त्यामुळे गैरसमज झाला असावा. No, I am not reading too much into your story. I'm just participating in general discussion. मला कथा चांगली वाटल्याचे मी पहिल्याच प्रतिसादात लिहीले आहे.
(साधना यांच्या पोस्टीत वर्षाचा उल्लेख आल्याने, प्रमोशन हुकणे which again is usually a long term performance, etc. वर्षभर भोचक लोकांनी रॅगिंग केल्यासारखे वागवणे इ अर्थाने पोस्ट वाचावी. कथेच्या अनुषंगाने वाचू नये.)

मात्र माझ्याएव्हढंच किंबहुना माझ्यापेक्षा कमी शिकलेल्या भावाला मात्र ही वाक्य बोलून दाखवली जात नाहीत.

<<

बँग ऑन.

@ सीमंतिनी
तसं असेल तर तुमच्या मुद्दयांशी पूर्णपणे सहमत Happy

अजुन कोव तळल्या जात आहेत. Happy
मेघाएस, आर यु रीयल? नाही म्हणजे एवढं होऊन भांडणच नाही झालं? असं कसं चालेल? Lol हलके घ्या. Happy

जीवन तळणे का नाम
तळते रहो सुबह हो श्याम
माबो तेलाची जाहिरात ..

Pages