कोथिंबिरीच्या वड्या

Submitted by सांज on 14 December, 2020 - 23:46

गॅस वर चहाचं आधण ठेऊन वसुधा ताईंनी कोथिंबिरीच्या जुडया निवडायला घेतल्या..

एरवी चार वेळा सांगूनही नेमकी कोथिंबीरच आणायला विसरणाऱ्या महेशरावांनी आज चक्क दोन जुड्या कोथिंबीर आणली होती आणि त्यामुळे वसुधा ताई सकाळी थोड्याशा वैतागल्याच होत्या. मनात म्हटलंही त्यांनी, इतकी वर्षं झाली आता तरी यांचा या बाबतीतला वेंधळेपणा काही कमी झालेला नाही!

तेवढ्यात, सोनाराने आपला एखादा नवीन घडवलेला सुरेख दागिना दाखवावा तशा उत्साहात त्या आणलेल्या कोथिंबिरीकडे बोट दाखवत महेशराव म्हणाले,
'पाहिलंस कशी ताजी लुसलुशीत कोथिंबीर आणलीय मी आज, तेही अगदी योग्य दरात! तू घालतेस तशी हुज्जत न घालता! नेहमी म्हणतेस नं कोथिंबीर विसरता म्हणून.. ही घे आज!'
त्यांच्या उत्साहाच्या फुग्यातील हवा क्षणार्धात काढून घेत वसुधा ताई म्हणाल्या,
'तुम्ही आज पण भाजीची यादी न्यायला विसरलात नं? आज कोथिंबीर आणू नका असं स्पष्ट लिहलं होतं त्यावर मी. दूधवाला आज सकाळी त्याच्या शेतातली ताजी कोथिंबीर देऊन गेलाय.. आता काय करु इतक्या साऱ्या कोथिंबीरीचं?’
आपण घातलेला गोंधळ लक्षात येऊन महेशराव म्हणाले,
'वड्या कर की. किती दिवसात केल्या नाहीस! तुझ्या हातच्या कोथिंबीर वड्या म्हणजे पर्वणीच की!’ कौतुकाच्या आडून बायकोचा राग शांतवण्याचा त्यांचा प्रयत्न चालू होता.
ते लक्षात येऊन ‘हो! माहितीय सगळं!’ अशा अर्थाचं मिश्कील हसू वसुधा ताईंच्या चेहऱ्यावर उमटलं. सगळ्या भाज्यांची वर्गवारी लावून त्या त्यांनी फ्रिजमध्ये जागच्या जागी ठेवून दिल्या. आणि कोथिंबीर मात्र ओल्या कपड्यात गुंडाळून ‘पाहू संध्याकाळी’ म्हणत तशीचं टेबलवर ठेवली.

गॅसवर मंद आचेवर चहा उकळत होता, त्याचा गोडसर सुवास स्वयंपाकघरात पसरु लागला. कोथिंबीरीची एकेक पानं देठापासून मोडताना वसुधा ताईंना वाटुन गेलं, या पदार्थाशी जोडलेल्या किती आठवणी आहेत. आपल्या घडणीला एक योग्य वळण मिळायला या वड्याच तर कारणीभूत आहेत की..

....

लग्न होऊन सासरी आल्यावर प्रथम इतक्या मोठ्या गोतावळ्याला पाहून तरुण वसुधा थोडीशी भांबावलीच होती. माहेरचं चौकोनी आटोपशीर कुटुंब सोडून त्या भल्या-थोरल्या, माणसांनी भरगच्च घरामध्ये प्रवेश करताना तिच्या मनात भितीयुक्त उत्सुकता जरुर होती. पण मग नंतर हळू-हळू त्या तिथल्या भिंतींमध्ये स्वत:ला फिट बसवता बसवता तिची तारांबळ उडू लागली. संस्कारांची नवी परिमाणं, ‘मान-पान’ या नवीनच विषयाशी झालेली ओळख, ते सोवळ्यातला स्वयंपाक.. कारल्याची चटणी.. मुगडाळीची धिरडी इ.इ. खडतर चाचण्यांमधून स्वत:ला धडपडत-ठेचकाळत पुढे रेटताना तिची दमछाक व्हायची. दुपारच्या वेळी घरातल्या बायकांची एकमेकींची उणी-दुणी काढणारी किंवा चेष्टा मस्करी करणारी सत्रं रंगायची. पुस्तकांमध्ये रमणारं वसुधाचं मन या अशा गोष्टींमध्ये रमायचं नाही. आणि मग त्यावरुनही तिची खिल्ली उडायची. आपण या सगळ्यांपेक्षा वेगळ्या का आहोत? किंवा या साऱ्याजणी म्हणतात तशा खरंच आपण अति लाडा-कोडामुळे एकलकोंड्या वगैरे झालोय का? असे प्रश्न त्या काळात सतत तिच्या डोक्यात मुक्कामाला असायचे. त्यातच पुढे ग्रॅज्युयेशनचा निकाल आला आणि त्यात विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या वसुधाला लगोलग नोकरीची संधीही चालून आली. लेकी-सुनांनी घराबाहेर न पडण्याच्या त्या काळात सासऱ्यांच्या आणि नवऱ्याच्या पाठिंब्यामुळे वसुधा नोकरी करु लागली. पण त्यामुळे झालं असं की तिच्या पुढ्यातल्या घरगुती अडचणी अजून वाढल्या. तिला पुर्वीपेक्षा अधिक कष्ट घेऊन घरात स्वत:ला सिद्ध करत रहावं लागलं. ही काल आलेली मुलगी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून बाहेर काम करते. स्वत:च्या पायांवर ऊभी आहे आणि आपण मात्र सारा जन्म रांधण्यात आणि उष्टी काढण्यात घालवतोय ही घरातल्या इतर बायकांच्या मनातील खंत वसुधाबद्दलच्या ईर्ष्येच्या स्वरुपात बाहेर पडू लागली. आणि ‘गळ्यात पर्स अडकवून बाहेर काय कोणीही जाईल.. शेरभर पुरण वाटून लुसलुशीत पोळ्या करुन दाखव म्हणावं मग मानेन हिला..’ सारखी वाक्य जाता-येता तिच्या कानांवर पडू लागली. त्यातच पूढे घडला तो कोथिंबीर वड्यांचा प्रकार..

....

उकळत्या चहाखालचा गॅस बंद करुन महेशराव वसुधा ताईंना म्हणाले,
‘काय गं, कुठे हरवली आहेस?’
‘अरेच्चा! उतू गेला का चहा?’
‘नाही! पण मी आलो नसतो तर गेला असता’ असं म्हणून त्यांनी चहा कपात ओतून घेतला.
चहा पिता पिता वसुधा ताईंच्या पुढ्यातला कोथिंबीरीचा पसारा पाहून महेशराव म्हणाले,
‘माझ्या वेंधळेपणामुळे तुझं काम वाढवून ठेवलं नं मी आज!’
वसुधा ताई खजील होऊन म्हणाल्या,
‘नाही हो! हे सगळं करायला आवडतं मला, फक्त वय वाढल्यामुळे आता थोडंसं थकायला होतं इतकंच!’
‘पूर्ण स्वयंपाकाला बाई लाव म्हणून किती दिवसांपासून सांगतोय तुला पण ऐकत नाहीस माझं.’ ‘लावलीय की पोळ्यांसाठी. पण बाकी नको हं.. मी रमते हो हे सगळं करण्यात!’ वसुधा ताई म्हणाल्या. ‘किती बदल होत जातात नं काळानुरूप आपल्यामध्ये! मला ती लग्न झाल्या झाल्या स्वयंपाकघरात पाऊल ठेवायलाही घाबरणारी वसुधा आठवतेय.. किती घाबरायचीस तू तेंव्हा!’
‘हम्म्म्म्.. ते दिवस गेले आता आणि ती माणसंही गेली. किती बाळबोध हेते नं मी तेंव्हा! पुस्तकांपलीकडचं आयुष्यच ठाऊक नव्हतं मला..’
एकत्र कुटुंब, दोघांच्या नोकऱ्या, मुलं-बाळं, त्यांचं शिक्षण, नंतर लग्नं.. या साऱ्यांमध्ये त्या दोघांना एकमेकांसाठी वेळ तसा मिळालाच नव्हता. निवृत्तीनंतर मात्र वसुधा ताईंनी ठरवलं होतं, मुलांना त्यांच्या त्यांच्या मार्गाने जाऊ द्यायचं आणि आपण आयुष्याची संध्याकाळ नवऱ्यासोबत छान घालवायची. इतक्यात फोन वाजला म्हणून महेशराव उठले. सुमेधने, त्यांच्या मुलाने, व्हिडीओ काॅल केला होता.. मग या दोघांचं मुलाशी, सुनेशी बोलणं सुरु झालं.
टेबलावरची कोथिंबीर पाहून सुनेने विचारलं,
‘आई.. काय करताय एवढ्या कोथिंबीरीचं?’
‘काही नाही गं.. कोथिंबीर वड्यांची फर्माईश आहे तुझ्या सासरेबुवांची!’
‘अरे वा! मला शिकायच्याच होत्या. यु-ट्युब वर पाहून मी ट्राय केल्या २-३ वेळा पण म्हणाव्या तशा जमल्याच नाहीत! आता पाहते तुम्ही कशा करता ते..’
‘चालेल की. पण तेवढा वेळ आहे का तुझ्याकडे? तासभर तरी लागेल.. नाहीतर मी कृती सांगु का तुला?’ वसुधा ताई विचारत होत्या.
‘लागुद्या हो आई.. करा तुम्ही, आज वेळ आहे माझ्याकडे.. आणि नुसती कृती ऐकुन पदार्थ जमत नाहीत हे आताशा समजलंय मला, ते नीट शिकुनच घ्यावे लागतात!’
सईचं बोलणं ऐकुन वसुधा ताईंना नलु आत्या आठवल्या.. हीच गोष्ट किती छान समजाऊन सांगितली होती त्यांनी आपल्याला तेव्हा! आपल्या सुनेला मात्र ती न समजावता समजली याचं क्षणभर त्यांना कौतुकही वाटलं.
महेशरावांनी मग फोनचा अॅंगल अॅडजस्ट करुन दिला आणि सासु-सुनेचं आॅनलाईन कोथिंबीर वडी वर्कशाॅप सुरु झालं..

....

त्या दिवशी वसुधाला घरी यायला जरासा उशीरच झाला होता. काॅलेजात परीक्षा चालू असल्यामुळे कामाचा ताण थोडा वाढला होता. त्यातही ज्युनियर प्रोफेसर असल्यामुळे सिनीअर्सची सद्दी सहन करणं तिला भाग होतं.
हात-पाय धुऊन आत आली तोच मोठ्या सासूबाईंनी फर्मान सोडलं,
‘वसुधा, आज जरा कोथिंबीर वड्या कर पाहू.. बाकी स्वयंपाक होत आलाय. वड्या तेवढ्या तू कर.’ ‘सासूबाई अहो पण मी कधी केल्या नाहीत त्या’ वसुधा गडबडली.
‘त्यात काय एवढं! तुझ्या सारख्या प्रोफेसरीण बाईला काय अवघड आहे? डाळीचं पीठ, आलं-लसूण, मीठ-मिरची लावून कोथिंबीर वाफवायची आणि मग तेलावर परतायची बास!’
‘बरं’ म्हणून वसुधाआत गेली आणि साडी बदलून लगोलग कामाला लागली. सासुबाईंकडून ऐकलेल्या ओझरत्या कृतीवरुन फार काही अवघड पदार्थ नाही असं तिला वाटलं पण मनात थोडी धाकधुक होतीचं. तिने कोथिंबीर धुवून घेतली आणि चक्क पालक-मेथी वाफवावी तशी कढईत तेल सोडुन वाफवायला ठेवली त्यात मग डाळीचं पीठ आणि पाणी टाकून सरळ हाटायला सुरुवात केली.. पण पाण्याचं प्रमाण जास्त झाल्यामुळे मिश्रण सैल झालं आणि मग ते मिळून येण्यासाठी तिने पीठाचं प्रमाण वाढवायला सुरुवात केली.
बाकीच्या साऱ्याजणी तिची गम्मत पहात होत्या पण आज त्यांनी ठरवलं होतं की तिला कोणीच काहीच सांगायचं नाही. तिलाही कळू देत स्वयंपाक करणं म्हणजे काही खायची गोष्ट नाही ते.. खूप प्रयत्नांनंतर वड्या पाडण्यात तिला यश आलं. मग एकेक करुन त्या तेलावर परतायला सुरूवात केली. पण जास्त पाणी आणि पीठामुळे वड्या तेल पिऊ लागल्या. तिने त्या तशाचं कशा बशा करुन सगळ्यांना वाढल्या. मोठ्या दीराने पहिल्याचं घासात,
‘या कोथिंबीरीच्या वड्या आहेत की पिठल्याच्या?’ असं म्हणून तोंड वेडंवाकडं केलं.
त्याला जोड देत सासरेबुवा म्हणाले,
‘सुनबाई, आम्ही तुम्हाला हुशार समजत होतो! पुन्हा असा तेलाने माखलेला पदार्थ वाढू नका कोणाच्या ताटात. आधी नीट शिकून घ्या.’
वसुधाला मेल्याहून मेल्या सारखं झालं. त्या दिवशी रात्री ती खूप रडली.
थोड्या वेळाने नलु आत्या तिच्यापाशी आल्या आणि तिच्या डोक्यावरुन हात फिरवू लागल्या. तरुणपणीचं यजमान निवर्तल्यामुळे सोवळ्या होऊन त्या कायमच्या माहेरी भावाकडे आल्या होत्या. तिच्या डोळ्यातलं पाणी पुसून त्या म्हणाल्या,
‘असं रडू नकोस बाळा, मला समजतंय हो तू खंतावली आहेस.. घरात, बाहेर दोन्हीकडे स्वत:ला सिद्ध करता करता मेटाकुटीला येतेयसं.. पण वसुधा, या घरातल्या बाकीच्या बायका आहेत नं, तुझ्या या सासवा, जावा, नणंदा.. यासुद्धा खंतावल्याचं आहेत गं .. त्यांची खंत तुझ्यापेक्षा निराळी आहे इतकंच. तुझ्यातल्या क्षमता सिद्ध करण्याची तुला जी संधी मिळाली ती त्यांना नाही गं मिळाली. इच्छा असो वा नसो त्या स्वयंपाकघराशी बांधल्या गेल्या आणि मग हळु-हळु त्यालाचं विश्व समजू लागल्या.. बरं, स्वयंपाक हे काही येरागबाळ्याचं काम नाही बरं! तीही एक कला आहे.. नुसती कृती कळली की पदार्थ बनतो असं नाही, त्याला अनुभव लागतो, हाताला चव असावी लागते, प्रमाणाचं गणित समजावं लागतं! आणि इतकं असुन त्यांचं हे काम दुय्यमच समजलं जातं.. ना पुरेसा मान मिळतो ना निर्णयप्रक्रियेत सहभाग. वर वाट्याला येतं ते परावलंबित्व. स्वत:साठी कधी काही घ्यावंसं वाटलं तर परवानग्या काढत बसावं लागतं.. तुझं तसं नाही, तु चार पैसे कमावतेस, स्वत:ची हौस पुरवण्याचं स्वातंत्र्य आणि क्षमता तुझ्यापाशी आहे.. त्यांचं दु:ख मोठं आहे बयो..’
नलु आत्यांचं ते बोलणं ऐकुन वसुधा अंतर्मुख झाली, त्या परिस्थितीकडे पाहण्याचा नवाच दृष्टिकोन तिला दिसला. ज्याचा तिनं आधी विचारच केला नव्हता.. ईर्ष्येमागची खंत आणि टोमण्यांमागचं कारुण्य तिला दिसायला लागलं होतं.

....

वड्यांचं मिश्रण कुकरमध्ये वाफायला ठेवून वसुधा ताई सुनेला म्हणाल्या,
‘बरं का सई, कोथिंबीर धुवून चिरायची मग कोरड्या कपड्यावर थोडी सुकू द्यायची.. आणि जास्तीचं पाणी शोषलं गेलं की मग त्याला पीठ लावायचं बरं, नाहीतर वड्या बिघडतात’
‘अच्छा! तरीचं मला काही केल्या जमत नव्हत्या. किती बारकावे असतात नाही प्रत्येक पदार्थाचे! सुमेध रोज तुमच्या स्वयंपाकाचं कौतुक करत असतो आणि माझी धांदल उडालेली पाहुन मला हसत असतो.’ ‘जमेल गं तुलाही.. अनुभवाने सारं काही जमायला लागतं. आपण आपल्या चुकांमधुन शिकत रहायचं फक्त! माणसांच्या स्वभावातली आणि स्वयंपाकातली गुंतागुंत समजायला याच गोष्टी उपयोगास येतात बघ!’ आयुष्यानं त्यांना शिकवलेली गोष्ट त्या त्यांच्या सुनेला समजाऊ पहात होत्या.
गप्पा मारता मारता मग त्यांनी वाफलेलं वड्यांचं पीठ बाहेर काढून थंड व्हायला ठेवून दिलं.

....

तो नवा दृष्टीकोन घेऊन वसुधा रोजच्या जगण्याला भिडायला लागली आणि तिचं तिला कळत गेलं गोष्टी किती सोप्या होत्या ते.. सासुबाईंच्या रागामागची माया कळायला लागली.. न बोलल्या गेलेल्या शब्दांमागचे भाव उमजायला लागले.. आणि जिथे जिथे शक्य तिथे तिथे कधी स्वत:कडे कमीपणा घेत तर कधी थोडंसं सामंजस्य स्वत:मध्ये भिनवत ती साऱ्यांमध्ये सहभागी होत गेली.. आणि हळु-हळु तिची खंत आणि इतरांचं कारुण्य दोन्हीही तिनं आपलंसं केलं.. ती मग त्या घरात अगदी अभिन्न होत गेली. आणि एक दिवस तिने प्रयत्नपुर्वक शिकुन घेतलेल्या कोथिंबीर वड्या सर्वांना बेहद्द आवडू लागल्या.

....

सुरीने छान एकसारख्या वड्या पाडून वसुधा ताईंनी त्या तेलावर छान खरपूस भाजून घेतल्या. आणि त्यांचा खमंग वास घरभर पसरला. महेशराव आत येत म्हणाले,
‘अरे वा! झाल्या वाटतं कोथिंबीर वड्या तयार!’
‘हो झाल्या.. हे घ्या चव घेऊन सांगा कशा झाल्यात ते’ म्हणत वसुधा ताईंनी वड्यांची प्लेट त्यांच्या समोर ठेवली आणि मग त्यातली एक वडी तोंडात टाकून ‘बहार!’ असं म्हणून त्यांनी वड्यांचा फज्जा पाडायला सुरुवात केली.
‘आई माझ्याही तोंडाला पाणी सुटलंय आता’ सई आणि सुमेध दोघंही एकदाचं म्हणाले.
‘अरे मग या की इकडे, तुम्ही आलात की परत बनवेन मी’ वसुधा ताई आनंदाने म्हणाल्या.
त्यावर सई लगेच म्हणाली,
‘नाही आई यावेळी मी बनवेन आणि तुम्हाला खायला देईन.. मग तुम्ही सांगा मी पास की फेल ते!’ आपली परंपरा पुढे चालत असलेली पाहून वसुधा ताई समाधानाने म्हणाल्या, ‘नक्की!’.

- सांज
https://chaafa.blogspot.com/2020/12/blog-post.html

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुपर्ब ! फार म्हणजे फारच आवडली कथा. आधी मी घाईत वाचल्याने मला वाटले की पाकृ टाकलीस की काय. पण एका दमात वाचुन काढली. Happy

ईर्ष्येमागची खंत आणि टोमण्यांमागचं कारुण्य... >> हा दृष्टिकोन खूपच आवडला. >> +१

ईर्ष्येमागची खंत आणि टोमण्यांमागचं कारुण्य... >>खरंय. छान ‌‌‌‌‌‌लि‌‌हिलंय

सुंदर लिहिलेय..
खरं आहे, आपला दृष्टीकोन बदलला कि खुपशा गोष्टी सोप्या होतात!

छान आहे कथा!!

ईर्ष्येमागची खंत आणि टोमण्यांमागचं कारुण्य... >> हा दृष्टिकोन खूपच आवडला. >>> +१

कथा अतिशय आवडली. साधासा विषय, शैलीमुळे आणि त्यातल्या काही वाक्यांमुळे अतिशय मस्त वाटली.

मी कॉलेजमध्ये असताना, आईची माहेर, मेनका, लोकप्रभा किंवा अशीच बरीच मासिकं वाचायचे. त्यातली एखादी जुनी कथा वाचल्याचा फील आला. हे मी सकारात्मक अर्थाने म्हणते आहे.

तुम्ही मॉमप्रेसोवर लिहिता का. ही कथा मी तिथे वाचली होती या आधी.>>> येस मलाही आधि कुठेतरी वाचल्यासारखी वाटत होती, छान आहे कथा.

मलाही आधी पाकृ वाटलेली धाग्याचे नाव वाचून .
ईर्ष्येमागची खंत आणि टोमण्यांमागचं कारुण्य... >> हा दृष्टिकोन खूपच आवडला. >> + 1

आजही, हॉउसवाईफ किंवा होममेकर( जरा बरासा शब्द ) स्त्रीकडे, हिला काय समजतं, नोकरीसाठी काय करावे लागते असे समजतात आणि उपेक्षा करतात..

झंपी यांचे बरोबर आहे. घरातील सदस्य जर गृहिणीला / स्त्रीला सन्मान देणारे असतिल तर कुठल्याही स्त्रिला आणखी काय हवे आहे.

कथा चांगली आहे.

स्पॉयलर

लेखिका आणि वाचक अजून किती काळ स्वयंपाकघरात गुंतून पडणार?

नोकरी करायला लागलेल्या स्त्रियांची सध्याची कितवी पिढी असेल? प्रत्येकी/काने आपल्याबाबतीत तपासून पहा.

ऑफिस , कामाबद्दलच्या कथा लेखिका लिहितात का?

इथे बर्‍याच जणींना गृहिणीच्या कामाचं मोल होत नाही याचं वैषम्य वाटतंय. कथानायिकेला ते काम येत नाही म्हणून तिचा अपमान केला गेला.
तिच्या नोकरीतल्या कामाला तुच्छ मानलं गेलं. ( ते कोणीही करेल)

<ईर्ष्येमागची खंत आणि टोमण्यांमागचं कारुण्य> दिल को बहलाने के लिए गालिब यह खयाल अच्छा है.

त्या मुलीला त्या तशा घरात स्वतः कमावलेला पैसा स्वतःच्या मर्जीने खर्च करायचं स्वातंत्र्य असेल? पगार झाल्या झाल्या अख्खं पाकीट घरातल्या वडिलधार्‍याकडे सोपवावं लागत असेल. आणि नसलं तर तुझ्या पैशाची आम्हांला काही गरज नाही (बायकांच्या पैशावर..... इत्यादि इत्यादि.)

कथेची मांडणी चांगली आहे. पण सगळंच खुप सरधोपट आहे. अमेरिकेला गेलेल्या मुलासकट.

भरत जी, तुमचा दृष्टिकोन शेअर केल्याबद्दल धन्यवाद.
कथेत ईर्ष्येचं आणि टोमण्यांचं समर्थन मी केलेलं नाही. फक्त त्याच्याही मागे एक डार्क साइड आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न इतकंच त्यात आहे.
बाकी, स्वयंपाकघरात गुंतून राहण्याचं म्हणाल तर स्वयंपाकघराइतकं महत्वाचं आयुष्यात दुसरं काही असतं असं मला वाटत नाही Happy आणि त्यावर एखादी कथा लिहावीशी वाटणं यात काही वावगं तर अजिबातच वाटत नाही.
माझी ‘विजिगीषा’ कथा मालिकाही तुम्ही नक्की वाचा. त्यावरचा तुमचा अभिप्राय वाचायला आवडेल (नोकरी/व्यवसाया संबंधी लिखाण वगैरे तुम्ही म्हणालात म्हणून सुचवतेय)

आणि हो, मुलगा अमेरिकेला गेलाय असा उल्लेख कथेत कुठेचं नाही. मला वाटतं तुम्ही तुमचा (सरधोपट) दृष्टिकोन त्यात मिसळलाय Happy

बाकी, तुमचं सडेतोड बोलणं आवडलं.

व्हिडियो कॉलवरून मुलगा अमेरिकेला कसं गृहीत धरलं . अशा
निवृत्त सुखवस्तू जोडप्यांच्या कथेतले मुलगे बहुधा अमेरिकेत असतात. म्हणून तसं डोक्यात बसलं.My bad.

पाकृ म्हणून धागा उघडला.

वैषम्याने बंद केला.

भमंचा प्रतिसाद वाचून पुन्हा एकदा जुनी माबो आठवली.

Pages