वयात येणाऱ्या मुलामुलींशी संवाद

Submitted by राधानिशा on 16 November, 2020 - 15:29

रेप , लैंगिक शोषण , मुलीवर ऍसिड फेकणे हे गुन्हे घडताना आपण पाहत आहोत .... अजूनपर्यंत आपल्या देशात या गुन्ह्यांना कडक शिक्षा नाही . रेपला जास्तीत जास्त 7 वर्षं तुरुंगवास आहे आणि स्त्रीचा मृत्यू झाला तर फाशी ... तेही नक्की नाही .. आपण पाहिलं आहेच गेल्या काही वर्षांच्या घटनांमधून .. त्या डिटेल्स मध्ये पुन्हा जाण्याची गरज नाही ... मग लैंगिक शोषण किंवा ऍसिड हल्ला हे तर जणू अतिशय क्षुल्लक किरकोळ गुन्हे असल्यासारख्या शिक्षा होतात .. एकूण एक सिस्टीम एक भारतीय नागरिक म्हणून अत्यंत निराश करणारी आहे .... दुर्दैवाने त्याबाबत शासन आणि न्यायव्यवस्थेवर ताशेरे ओढण्यापलीकडे आपणा सामान्य माणसांच्या हातात काहीच नाही ......

पण आपल्या हातात जे आहे , तेवढं तरी आपण करायलाच हवं ना ?

दुसरा रेपिस्ट / दुसरा ऍसिड फेकणारा / दुसरा बॅड टचमधून समाधान मिळणारा समाजात निर्माण होऊ नये यासाठी काय उपाययोजना केल्या जातात ... ?

आईवडील कधीही आपल्या वयात आलेल्या मुलांना समोर बसवून - तुम्हाला आवडत असलेल्या मुलाला / मुलीलाही निवडीचं स्वातंत्र्य आहे किंवा वाईट नजरेने पाहणं म्हणजे काय , त्याने एखादी मुलगी कशी अनकम्फर्टेबल होऊ शकते , मनाविरुद्ध एखाद्याला स्पर्श करणं का बरोबर नाही , रेप ही किती भयंकर गोष्ट आहे याबद्दल बोलत नाहीत .... आमचा सोन्या तसं काही करणारच नाही हा आंधळा विश्वास असतो ... पण हे बॅड टच किंवा रेप करणारे कुणाच्या तरी घरचे सोन्येच असतात ... त्याला ही गोष्ट चूक आहे आणि का चूक आहे हे कधीच समजलं नाही तर 100 % तोच जबाबदार की आईवडीलही 50 % जबाबदार असतात ? गुन्हा आहेच आणि त्याला कठोरात कठोर दंड दिला गेलाच पाहिजे ....

पण एम्पथी , सहानुभूती , प्रामाणिकपणा , नीतिमत्ता ह्या गोष्टी जाणीवपूर्वक मुलांमध्ये निर्माण करण्यासाठी काही प्रयत्न केले जातात का .... की आपल्याला बघून मूल आपोआप शिकेल हा विश्वास असतो !!

मी कदाचित चुकत असेन इथे ... बहुतेक जण जे चांगले असतात त्यांना असं आईवडिलांनी वेगळं शिकवायची गरजच लागत नाही ... आपोआपच चांगले संस्कार होतात .... Except... सुशिक्षित आणि सुसंस्कृत घरातल्या अनेक स्त्रियांनी लहानपणी किंवा तरुणपणी कुटुंबातील एखाद्या सदस्याकडून लैंगिक शोषण झाल्याचे अनुभव सांगितले आहेत .... ह्याच्यासारखी दुःखद गोष्ट दुसरी नाही... हे शोषकही तथाकथित सुशिक्षित , सुसंस्कृत आणि सुखवस्तू कुटुंबातील असतात .... त्यांना असं वागण्याची दुर्बुद्धी का होते .... शिक्षा व्हायला हवी , ती सुद्धा होत नाही आपल्या देशात .. निदान कारणांच्या मुळापर्यंत जाऊन ती नष्ट करण्याचा प्रयत्न करावा हेही कोणाच्या ध्यानामनात येत नाही ...... समजा तुम्ही तुमच्या 14 - 15 वर्षाच्या मुलाशी एकदा या विषयावर बोललात तर आभाळ कोसळणार आहे का ? आईबाप आणि मुलात एवढाही मोकळेपणा का असू नये ? निदान सुशिक्षित कुटुंबात तरी ...... लैंगिक शिक्षण गेलं चुलीत ... ते यायला आपल्या देशात एक शतक जावं लागेल पण त्याहीपेक्षा हे शिक्षण शतपटीने महत्वाचं आहे .

बेसिक बाऊंडरीज , कन्सेंट ही गोष्ट आणि समोरची व्यक्ती ही हाडामांसाचं जिवंत माणूस आहे - तिला निवडीचा तुमच्याइतकाच अधिकार आहे आणि तिला तुम्ही रोमँटिकली आवडला नाहीत म्हणजे जग संपलं नाही .... it's not the end of the world . आवडणं ही गोष्ट अनेक फॅक्टर्स वर अवलंबून असते ... वयानुसार आवडीचे निकष वेगळे असतात .. आणि कधीही , कधीही .. कोणत्याही कारणाने दुसऱ्या व्यक्तीला हर्ट करणं साफ चूक आहे , भयंकर आहे .. तू कोणालाही हर्ट केलंस तर तुझ्या आईबाबांना अत्यंत दुःख होईल , तुझी लाज वाटेल हे लक्षात ठेव ... तुला 90% मिळाले नाहीत , तू खूप शिकून डॉक्टर इंजिनिअर झाला नाहीस तरीआम्हाला फरक पडत नाही पण तू वाईट माणूस झालेला , तू कोणाही मुलीशी चुकीचं वागलेला मला आणि तुझ्या आईला चालणार नाही .... असं का नाही बोलू शकत ?

मी कल्पना करू शकते - मुलगा कसा रिऍक्ट होईल .. ऑकवर्ड होईल , लाजेल , थोडासा चिडेल , होय हो , होय हो म्हणत पटकन तिथून सटकायला बघेल .... तुम्ही ऑकवर्ड न होणं महत्वाचं आहे .... ही जाता जाता बोलण्यासारखी गोष्ट नाही , सुरुवातच ये तुझ्याशी बोलायचं आहे अशी अजिबात करू नये .

तुझ्या बाबांना / आम्हाला तुझ्याशी बोलायचं आहे , जेवणानंतर बोलू / आज संध्याकाळी बोलायचं आहे ... असा वेळेचा गॅप ठेवून विषय काढावा .... त्यामुळे त्या गोष्टीचं महत्व त्याच्या मनावर ठसेल आणि तो सटकायचा प्रयत्न करणार नाही , लक्षपूर्वक ऐकून घेईल ..... आई वडील दोघे कम्फर्टेबल असतील तर दोघांनी किंवा जो कोणी मुलासोबत जास्त कम्फर्टेबल असेल त्याने मुलाशी बोलावं ....

13 - 14 - 15 हेच वय ऐकून घेऊन मनात मुरण्याचं असतं .... 18 - 20 ला बहुतेकांना शिंगं फुटलेली असतात , आपल्याला सगळ्यातलं सगळं कळतं , आईवडिलांकडे आपल्याला शिकवण्यासारखं काही ज्ञान आहे , हे पटत नसतं .

... त्यावेळी समजुतीचं बोलणं फक्त कानांवर पडतं , आत मेंदूपर्यंत पोहोचत नाही .... माती ओली असेपर्यंतच तिला आकार देतो.. ह्या महत्वाच्या वेळी ऑकवर्ड होईल असल्या क्षुल्लक कारणामुळे ही जबाबदारी टाळू नका .

ठीक आहे , पोरगा थोडा लाजेल , चिडेल ... काय बाबा पण , काहीही नको ते सांगतात असंही म्हणेल ... पण 25 व्या किंवा 30 व्या वर्षी , he will thank you .

तुमच्या 14 - 15 - 16 - 17 वर्षांचा राजूबद्दल - "आमच्या राजूला फुरसत कुठे आहे मुलींच्या भानगडीत पडायला / तो अजून लहान आहे / त्याचं सगळं चित्त त्या क्रिकेट मध्ये / कॉम्प्युटर गेम्स मध्ये आणि मित्रांमध्ये ... 80 - 85 % च्या खाली येत नाही , अभ्यासातून वेळ तरी आहे का त्याला मुलींकडे बघायला .... " असल्या गोड गैरसमजात राहू नका... निसर्ग आपलं काम न चुकता करत असतो .... मित्र - छंद - अभ्यास - क्लास असे 56 व्याप पाठीशी असले म्हणजे मुलाचं लक्ष मुलीकडे जात नाही असं होत नाही . शहाणे असतात ते अभ्यासावरून ढळत नाहीत पण शहाणपण सगळ्यांनाच लवकर येत नाही , ते 20 व्या किंवा 24 व्या किंवा 25 व्या वर्षी सुद्धा येऊ शकतं ... आणि अभ्यासाची सगळ्यात महत्त्वाची वर्षं ही 16 ते 22 - 23 हीच असतात ..... याच काळात तारुण्याची हार्मोन्स आतून मुलाला / मुलीला बदलत असतात ......

कदाचित विषय भरकटतो आहे पण जे विचारांच्या ओघात येतं आहे ते उतरवते आहे ..

सगळेच जण वायोलंट होतात असं नाही ... या एजग्रूप मध्ये माती खाण्याची प्रोबॅबिलिटी सगळ्यात जास्त असते ... त्यांचा दोष नाही - हार्मोन्स आंधळं करत असतात .... दुर्दैवाने हाच करियर डिफाईन करणारा सगळ्यात महत्वाचा काळ असतो ...

एकही 14 - 18 वयोगटातला मुलगा किंवा मुलगी मला अमुक एक जण आवडतो असं वडिलांजवळ किंवा आईजवळ चुकूनही बोलून दाखवत नाही ... मुलगा वडिलांकडे - मुलगी आईकडे ..... घरात बाकी कितीही मोकळं वातावरण असलं तरी हा विषय आईवडिलांशी बोलण्याचा नव्हेच ..... मग या काळात यांचे मार्गदर्शक कोण तर यांच्याच वयाचे मित्र आणि मैत्रिणी ... आणि ते देणार तो दिव्य सल्ला .... आणि फ्रॅंकली एखाद्या मुलाने / मुलीने हे रिस्पेक्टिव्हली वडिलांशी आणि आईशी शेअर करण्याचं धाडस केलंच तर काय रिऍक्शन येईल आपण इमॅजिन करू शकतो - संताप , राग ... अभ्यास कर - नसती थेरं सुचताहेत नि असेच अनंत रिस्पॉन्स ... मुलांनाही माहीत असतं आई / बाबा असेच रिऍक्ट होणार तेव्हा त्यांच्याकडे बोलण्याचा काही सवाल्लच उद्भवत नाही ..... शांतपणे त्याच्याशी / तिच्याशी बोलून विषय हाताळू शकतील असे किती पालक आहेत ?

माझ्या आईच्या मैत्रिणीची मुलगी , आम्ही वेगवेगळ्या गावात .. चौथीत स्कॉलरशिपच्या क्लासमध्ये मैत्री वगैरे झाली होती .. पुढे भेट नाही ... आईवडील दोघे हायस्कूल मध्ये शिक्षक ... हीला दहावीत 90+ % .. अकरावी झाल्यावर पळून जाऊन लग्न केलं .. आईवडील जाऊन परत घेऊन आले लाडक्या लेकीला ... पळून गेलीस - तू आम्हाला मेलीस म्हणणारे लोक असतात ... ह्यांचा जीव एकुलत्या एक लेकीत .. बाईसाहेबांनी विष घेतलं ... त्यातून बरी झाल्यावर आईवडिलांनी मुकाट्याने सासरी लावून दिली ... आता शिक्षण - करियर सोडून संसार करते आहे .. होपफुली सुखाने ... पण असला कसला प्रियकर जो तुझं शिक्षण पूर्ण होईपर्यंतही थांबायला तयार नाही ? की लवकर उरकलं नाही तर हातचा जाईल ही भीती ? परमेश्वर जाणे ....

दुसरे महाशय बारावी सायन्सला 94 % , स्टार स्टुडंट ..गर्लफ्रेंडने ब्रेकअप केलं ( कारण हा अतिसंशयी , इनसिक्युअर आणि हक्क गाजवणारा , कंट्रोल करू पाहणारा होता ... तिच्या घरच्यांनी ह्याच्या वडिलांकडे तक्रार केली ,थोडं मॅटर झालं होतं ).. ब्रेकअप झाल्यावर गेले डिप्रेशन मध्ये ... अभ्यास नको , काही नको .. एज्युकेशन लोन घेऊन आपल्या हुश्शार मुलाची इंजिनिअरिंगची फी भरणारा बाप इकडे हवालदील , कुठे सोन्यासारख्या पोराला दुर्बुद्धी सुचली म्हणून ... पुढे सगळं सुरळीत झालं .. एक दोन वर्षात , प्रेमापोटी अभ्यासाकडे दुर्लक्ष करण्यातला वेडेपणा महाशयांच्या लक्षात आला असावा ...

अस्मादिकांनी 11 वी 12 - 13 वी मध्ये एकतर्फी प्रेमात गाडाभर माती खाऊन नंतर हंडाभर अश्रू गाळले आहेत.. त्याचे डिटेल सांगत नाही , जनाची आणि मनाची अशी दोन्ही प्रकारची लाज वाटते Lol एनीवे घरात कोणालाही समजलं नाही ... त्यांच्यासमोर हॅपी फेस ...

सांगण्याचा मुद्दा हा की बुद्धीचा आणि ह्या वयात अक्कल जी पेंड खाते यांचा एकमेकांशी काही संबंध नाही .. बुद्धीच्या जोडीला शहाणपण अत्यावश्यक असतं आणि ते त्या वयात अजून आलेलं नसतं ...

ऍडमिट इट , तुमच्या 16 वर्षाच्या राजूच्या किंवा राणीच्या डोक्यात याबद्दल काय विचार आहेत याचा ते तुम्हाला पत्ता लागू देत नाहीत ... मग एकतर्फी प्रेमाला न मिळालेला प्रतिसाद / ब्रेकअप अशा कारणांमुळे पोरगा किंवा पोरगी सैरभैर होतात ... 10 वीला 90 % असलेला पोरगा 12 वीत 70 % वर येतो , 70 वाला 55 वर .. किंवा बारावीत नाही तर पदवीच्या वर्षांमध्ये ... तरी आई वडलांना शेवटपर्यंत पत्ता लागत नाही .... सगळे नाही पण 100 मधले किमान 20 जण तरी या वयात या कारणाने भरकटतातच .... तुमचा मुलगा / मुलगी नेमक्या त्या वीसातले होऊ नयेत यासाठी तुम्ही काळजी घेऊ शकता...

समजा साथीचा रोग आहे , 20 वर्षे वयाखालच्याच मुलांना होतो .... 100 पैकी 20 जणांनाच ... ज्यांची इम्युनिटी कमी आहे .... त्यावर लस निघाली तर तुम्ही असं म्हणणार का - " आमच्या राजुची इम्युनिटी खूप चांगली आहे , आमच्या घरात नेहमी चौफेर - पौष्टिक आहार असतो , तो रोज तासभर वेट ट्रेनिंग करतो ..त्याला किती वर्षात साधी सर्दीपण झालेली नाही ... त्याला असल्या लशीची गरज नाही ... त्याला होणारच नाही इन्फेक्शन " तुम्ही असं बोलणार नाही , पहिली त्याला जाऊन लस टोचून घ्याल .. मग याबाबतीत आंधळा कॉन्फिडन्स का .... कदाचित नाहीही फसणार तो / ती या वयातल्या आकर्षणाच्या जाळ्यात , तो / ती त्या 80 पैकीच असतीलही ..... पण लस टोचणे इज नेव्हर हार्मफुल ... ONE conversation at right time might save your child from a lot of pain and stop him / her making mistakes .

त्यामुळे ह्या वयात " आवडणारी व्यक्ती मला मिळालीच पाहिजे , तरच मी सुखी होईन .., त्या व्यक्तीला दुसरं कोणी आवडलेलं मला सहन होत नाही , ती व्यक्ती मिळाली नाही तर माझ्या आयुष्यात जगण्यासारखं बाकी काही नाही " हे सगळं म्हणजे प्रेम नाही .... हे या वयात प्रत्येकाला वाटतंच ... आणि प्रत्येकाला हेच प्रेम असं खात्रीपूर्वक वाटत असतं - प्र त्ये का ला .. हेच प्रेम आणि प्रेम प्रेम म्हणजे हेच ... असं वाटत असतं .

ठीक आहे मी तुला सांगणार नाही की तुला कुणी आवडत असेल तर ते प्रेम नाही , कारण मी सांगून काही उपयोग नाही.. मला माहिती आहे ... तुला ते पटणार नाही .... पण तुझी आई / बाबा म्हणून मला तुझं चांगलंच व्हायला हवं आहे यावर तुझा विश्वास आहे ना ? मग माझं फक्त एवढं ऐक - 23 - 24 वर्षांचा होईपर्यंत थांब आणि मग या प्रेमाचा विचार कर...

तू सात वर्षाचा होतास तेव्हा तुला वाटत होतं की बॅट बॉल किंवा क्रिकेट सेट ( ते मोठ्ठं टेडीबेअर किंवा बार्बी डॉलहाऊस ) मिळाला की आणखी काही मिळालं नाही तरी चालेल ... 10 वर्षांचा होतास तेव्हा तुला स्वतःचा कॉम्प्युटर मिळाला की मी खुश होईन मग आणखी काही नको असं वाटत होतं ..... पण आज तुझ्यासाठी त्या दोन्ही गोष्टींना फार महत्व नाही .... तसंच आज तुला त्या मुलीला तू आवडलास ( मुलीला - त्या मुलाला तू आवडलीस ) तर मग आणखी काही मिळालं नाही तरी चालेल असं वाटतं आहे किंवा वाटू शकतं काही दिवसांनी...

पण माझ्या सोन्या तसं होत नाही रे / गं ..... जसं जसं वय वाढतं तशा आवडीनिवडी बदलत जातात .... अपेक्षा बदलत जातात , आता तुला बॅट बॉल किंवा बार्बीने आनंद होणार नाही ... तुला आता वेगळ्या गोष्टी आवडतात ... तशाच 16 पासून 23 - 24 पर्यंत तुझ्या आवडीनिवडीत खूप फरक पडलेला असेल , माझ्यावर विश्वास ठेव बाळा ......

त्यावेळी आपल्यात योग्य व्यक्ती निवडण्याची अक्कल येते ... जर सात वर्षाच्या मुलाच्या हातात पैशाचं पाकीट दिलं तर तो सगळ्याचे बॅट्स , बॉल्स , रॅकेट खरेदी करून आणेल ... 10 - 15 हजाराचे .... मुलगी वेगळी खेळणी भरून आणील ... त्यामुळेच आपण त्यांच्या हातात सगळे पैसे देत नाही .. तुझ्यासाठी कशा प्रकारची व्यक्ती योग्य आहे , हे तुला आताच कसं समजेल ? स्वभाव , आवडीनिवडी , मतं सारखी बदलत असतात या वयात .... गेल्या वर्षीपर्यंत तुला केजरीवाल ग्रेट वाटत होते , आता मोदी वाटत आहेत .. उद्या आणखी कोणीतरी वाटेल ( किंवा असं कुठलंही उदाहरण घेऊ शकता , हे असंच घेतलं आहे , राजकारणाशी अजिबात संबंध नाही ) ... तेव्हा तुला आज जी मुलगी / मुलगा आवडतो तोच 25 व्या वर्षी आवडेल याची काय गॅरंटी आहे ? शिवाय ती / तो सुद्धा बदलतो आहे ना .... तो आता जसा आहे तसाच 25 व्या वर्षी असेल याची तरी काय गॅरंटी ? 25 व्या वर्षानंतर साधारण माणसात मोठे चेंजेस व्हायचे थांबतात , एक आवडनिवड - विचार सेट होते ... त्यानंतर हा प्रेमाबिमाचा विचार तू खुशाल कर पण तोपर्यंत प्लीज प्लीज अभ्यासाकडे लक्ष दे ....

आता मूळ विषयाबद्दल थोडं बोलून थांबते ... वायोलन्स म्हणजे ऍसिड फेकणे ही शेवटची पायरी म्हणता येईल ... पण हॅरॅसमेंट , ऑनलाईन हॅरॅसमेंट , ब्लॅकमेल , एखाद्या मुलीचा पाठपुरावा करून तिला अनकम्फर्टेबल करणं , प्रेमाला प्रतिसाद द्यावा म्हणून सतत मागे लागणं ... दिला नाही तर त्यात अपमान मानून सुडाची भावना निर्माण होणं , सेक्शुअल हॅरॅसमेंट , गाडी - गर्दीसारख्या ठिकाणी कुणा स्त्रीला जाणूनबुजून स्पर्श करणं ( कोणालाही कुठेही त्याच्या मनाविरुद्ध त्या प्रकारचा स्पर्श करणं ) एखादीकडे टक लावून पाहणं , नेत्रसुख घेणं या सगळ्या किती क्रिपी , चुकीच्या आणि विकृत गोष्टी आहेत , समोरची ती मुलगी / स्त्री किती अनकम्फर्टेबल होत असते , तिला असुरक्षित वाटतं , ते का वाटतं ...... हे तुमच्या मुलाला एकदा नीट समजावून सांगितलंत तर त्यात नुकसान काय आहे ? बहुतेकांना या गोष्टी आपसूकच उमजतात जसं वय वाढत जातं तशा .... पण अनेक सुशिक्षित कुटुंबातील तरुणांनाही ह्या गोष्टी कळत नाहीत ... त्यामुळे या गोष्टी हा विकृतपणा आहे आणि यातली एकही गोष्ट तू पुढे जाऊन कधीही केलीस तर आम्हाला तुझे आईवडील असण्याची लाज वाटेल आणि अत्यंत दुःख होईल हे लक्षात ठेव .... असं स्पष्ट सांगावं ...

पाहिलं तर अंगाला भोकं पडतात का ? नुसतं बघतोच ना आम्ही असा अज्ञानातून आलेला प्रश्न एका तरुणाने आपल्या एका वयाने - अनुभवाने मोठ्या मित्राला विचारला .. त्यावर त्याने सुरेख उत्तर दिलं .. जेव्हा तुम्ही हत्ती , गेंडा , वाघ , सिंह , लांडगा अशा प्राण्यांच्या जवळ असता तेव्हा हे प्राणी घाबरत नाहीत , कारण त्यांच्यात स्वयंसंरक्षणाची शक्ती आहे , त्यांना एका माणसाला बघून नर्व्हस होण्याचं कारण नाही पण इतर छोटे प्राणी , एखादा पक्षी , हरीण , ससा माणसाच्या वाऱ्याला थांबत नाहीत ... कारण ते स्वतःला डिफेन्ड करू शकत नाहीत... तुमच्या नुसत्या टक लावून बघण्याने किंवा असल्या एका साध्या स्पर्शाने एका बाईला किती खराब , घाणेरडं आणि असुरक्षित फील होतं , हे तुम्हाला कळत नाही.... आणि आपल्यामुळे जाणूनबुजून कोणाला असा त्रास अजिबात होऊ द्यायचा नाही ... याबाबत आपण खूप काळजी घेतली पाहिजे ....

कोणालाही तुझ्यामुळे खराब वाटलेलं आम्हाला आवडणार नाही .. इत्यादी इत्यादी ... जर पालकांना शक्य होणार नसेल तर शाळेने या विषयावर 13 ते 17 वयोगटातील मुलामुलींशी हसून खेळून बोलू शकेल असा एखादा वक्ता / बालमानसशास्त्रज्ञ वगैरे शोधून त्याची एक दोन सेशन्स करायला हरकत नाही .....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारतीय निती मत्ता,भारतीय संस्कार मुलांच्या वर अगदी लहान शिशु पासून झाले तर पुढे काहीच प्रश्न येणारं नाहीत.
टीव्ही,सिनेमा,इंटरनेट, ह्यांचा संबंध मुलांशी 16 वर्ष वया पर्यंत आलाच नाही पाहिजे.
फक्त शिक्षण,खेळ,व्यायाम,आणि आणि सकस माहिती वर आधारित कार्यक्रम हे मुलांना मिळाले तर सर्व समस्या नष्ट होतील.
ज्यांचा जन्म 1960 ते 1970 ह्या काळात झाला आहे त्यांचे अनुभव व्यक्त करायला सांगा.
वयाच्या 16 ते 18 वर्ष पर्यंत मुलगी ही पटवायची असते सेक्स साठी हेच त्यांना माहीत नव्हते
फक्त खेळणे ,व्यायाम आणि काम आणि जमेल तसा अभ्यास हेच ध्येय असायचे..
स्त्री ल हात लावायचा नसतो है तेव्हा मनावर बिंबावल होत.
मुली शी भांडण झाले तरी पट्टी ची वापर पण हात लावत नसे त्यांना.. .
त्या काळात acid हल्ला ,बलात्कार ह्या घटना घडल्याचं नसतील .
मुळात सेक्स ची भावना कमी वयात येत च नव्हती.
आता खूप च कमी वयात मुला मध्ये सेक्स ची भावना उत्पन्न होत आहे .

व्यापक विषय आहे हा
जगाच्या अंतापर्यंत राहील
आणि येथील स्त्री पुरुष असमानता देखील जगाच्या अंतापर्यंत राहील असे वाटते.

निसर्ग नीच भेदभाव केलेली स्त्री पुरुष
अ समानता कधीच नष्ट होणार नाही.
स्त्री पुरुष संघर्ष अगदी तीव्र होवून मानव जात nasht होईल पण समानता येणे मुश्किल आहे

खूप लांब लचक धागा आहे.थोडे नीट परिच्छेद पाडता आले तर बघा.
कंटेक्स्ट एका स्क्रोल मध्ये वाचता आला तर जरा बरे पडते.
विषय महत्वाचा आहेच.खरं तर आता यावर थिएटरमध्ये सिनेमा च्या आधी प्रचाराच्या जाहिराती लागायला हव्या इतका महत्वाचा.(अस्पताल के बाहर खडा होके फु फु कर रहा है सारख्या)
1. प्रत्येक आवडलेली मुलगी पिक्चर मध्ये दाखवतात तशी आपली खाजगी प्रॉपर्टी, ना मे हां वगैरे वाली नाही ही अक्कल मुलांना आणायला हवी.
2. ही अक्कल ज्यांना नाही त्यांना कडक शिक्षा हवी.
3. शारीरिक संबंध ही जबरदस्तीने मिळवण्याची नव्हे तर दोघांच्या आनंदाने करण्याची गोष्ट आहे हे आधी पटायला हवे.
4. रोल मॉडेल चांगले, हिरोईन ने नाही म्हटल्यावर थांबणारे, टिळक पटवण्यापूर्वी अभ्यास आणि नोकरी कडे लक्ष देणारे हिरो आणि कथा असेल असा मीडिया जास्तीत जास्त यायला हवा.मीडिया पूर्ण जबाबदार नाही पण हळूहळू इम्पॅक्ट नक्कीच पाडत जातो.

गम्भीर विषय आहे तसा पण ही स्त्रीची बाजू झाली फक्त. स्त्रियांसारखी नसली तरी मुलांची पण हऱ्यासमेन्ट होत असते कमी अधिक प्रमाणात. दिसायला बरे असलेल्या मुलांना मोठ्या वयाच्या स्त्रिया आणि पुरुष अश्या दोघांकडून वरचेवर असे अनुभव येत राहतात. मलातर शाळेपासून आतापर्यंतचे बरेच प्रसंग आठवत आहेत. अर्थात मीबी बेरकी होतो/आहे.

छान लिहिलंय. विषय गंभीर आहेच . मुलींसाठी असे वेगळे सेशन्स होतात शाळांमध्ये. तसे मुलांसाठी पण व्हायला हवे. टीनेज मुलाची माता असल्याने लेख रिलेट झाला. पुन्हा एकदा वाचणार आहे.

सध्या शाळेत व्हॅल्यू एज्युकेशन मध्ये गुड टच बॅड टच ची सेशन होतात ती मुलं मुली दोघांसाठी होतात(कदाचित मुलं मोठी झाल्यावर सेपरेट होत असतील सेशन.किंवा फक्त मुलींसाठी)

मैदानी खेळ,रोज व्यायाम हे तुमचे मन सशक्त ठेवतात. चांगली healthy शरीर वृष्टी असणारे विकृत मानसिकतेचे नसतात.
त्या मुळे मुलांना ह्या सवयी असायलाच havyat.
आणि चांगले मित्र हे गरजेचे आहेत.
आई वडील पेक्षा मित्र मंडळी जास्त जवळची असतात.

>>ज्यांचा जन्म 1960 ते 1970 ह्या काळात झाला आहे त्यांचे अनुभव व्यक्त करायला सांगा.
वयाच्या 16 ते 18 वर्ष पर्यंत मुलगी ही पटवायची असते सेक्स साठी हेच त्यांना माहीत नव्हते>>
>>मैदानी खेळ,रोज व्यायाम हे तुमचे मन सशक्त ठेवतात. चांगली healthy शरीर वृष्टी असणारे विकृत मानसिकतेचे नसतात.>>
हेमंत, तुम्ही ही असली सार्वत्रीकरण करणारी विधाने कशाच्या आधारे करत आहात. मी ६०-७० काळातील आहे. तेव्हाही हे सगळे प्रकार चालत. फक्त सोशल मेडीआ नव्हता, रेकॉर्ड करायला सेलफोन नव्हते. 'मुलीची अब्रू ' तेव्हा बोभाटा नको म्हणून प्रकरण लावून धरले जात नसे. व्यवस्थाही 'मुलंच ती, तुम्ही मुलीला बाहेर पाठवू नका' असे सांगे. सायकल वरुन पाठलाग करणे , कॉर्नरवर उभे राहून गलिच्छ नजरेने न्याहाळणे वगैरे प्रकार सर्रास चालत.
मैदानी खेळ , सुदृढ शरीर वाल्या जॉक्स बद्दल तर बोलायलाच नको. त्यांना तर मला 'नाही' म्हणूच कशी शकते? असे वाटे. त्या काळात 'नाही' म्हणजे 'हो' असा संदेश थेटरातून राजरोस मिळायचा.

स्वाती मत आवडले. पूर्वी प्रकरणे घरात दाबली जायची. अगदी सख्खी आई सुद्धा कोणाला सांगू नकोस असे सल्ले देत असे. आताच्या स्त्रिया अशी प्रकरणे लपवत नाहीत

शाळेत न जाणारी, घरात पोषक वातावरण नसणारी, झोपड्यात राहणारी, डोळ्यांसमोर घरात व घराबाहेर स्त्रीचा भोगवस्तू म्हणून वापर होत असताना बघणारी अशी कित्येक वंचित मुलेमुली वयात येत असतात... त्यांना कोण काय समजावणार? समजावणारे, दिशा दाखवणारे आहेत कुठे? परदेशात अशा मुलांसाठी सोयी असतीलही, फॉस्टर केअरच्या माध्यमातून अशा मुलांना पोषक वातावरण दिले जात असेलही. पण भारतात अशी कोणतीही व्यवस्था नाही. जिथे जन्मदातेच वंचित आहेत, त्यांना संवाद म्हणजे काय हे माहीत नाही तिथे मुलांशी संवाद ते कसे करू शकणार??

जिथे सर्व सोयी आहेत तिथे काही जन्मदाते स्वतःच्या आयुष्यात इतके गर्क असतात की त्यांना मुलांसाठी वेळ नसतो. पैशाने विकत घेण्यासारखी सर्व सुखे असूनही संवाद खुंटलेला असतो. तिथे कसा संवाद होणार?

हे सगळे आपल्या समाजाचेच भाग आहेत. समाजाचा एक मोठा भाग कसल्याही संस्काराशिवाय बाहेर पडत असेल तर त्याचा त्रास सगळ्यांनाच होणार.. सुसंस्कृत लोकांना असंस्कृत लोकांच्या हस्ते त्रास भोगावा लागतो हा आजवरचा मानवी संस्कृतीचा इतिहास आहे.

दुसरा रेपिस्ट / दुसरा ऍसिड फेकणारा / दुसरा बॅड टचमधून समाधान मिळणारा समाजात निर्माण होऊ नये यासाठी काय उपाययोजना केल्या जातात ... ?>>>>

दुर्दैवाने अशा कुठल्याही उपाय योजना सध्या नाहीयेत. बलात्काराचे गुन्हे सर्व थरात घडताहेत. शाळाकॉलेजात जाणाऱ्या मुलांनी आपल्याच वर्गमैत्रिणीला वाढदिवसाच्या पार्टीला बोलावून बलात्कार केल्याची घटना पार्ल्यात घडल्याचे वाचलंय. ही मुले समाजाच्या मते चांगल्या घरातील होती तरीही गुन्हा घडला.

समाज सध्या प्रचंड मटेरिअलिस्टिक झालेला आहे. अमुक गोष्ट हवी म्हणजे हवी, ती मिळत नसेल तर हिसकावून घेणार ही प्रवृत्ती सर्व थरात वाढतेय. याला आळा कोण व कसा घालणार?

नुकत्याच गोळी घालून मारल्या गेलेल्या निकिता तोमरच्या पालकांनी तिला गुड टच वगैरे सगळे शिकवले असणार पण तरी तिचा जीव वाचू शकला नाही. तो मुलगाही तिच्या वर्गात शिकत होता. म्हणजेच त्यालाही निकितासारखी शिकवण मिळाली असणार. पण त्याच्यावर परिणाम शून्य झाला. दोन वर्षे तो तिच्या मागे होता. त्या मुलाचे दोन वर्षात कोणी समुपदेशन केले होते का, त्याच्याशी संवाद घडला होता का याबद्दल माहिती नाही. निकिताला चांगले वाईट समजायची जितकी गरज होती तितकीच त्यालाही होती.

वयात येणार्‍या मुलामुलींना दोन प्रकारच्या मार्गदर्शनाची गरज असते.
१. समवयस्क मुलामुलींंसोबतचा वावर - यात शारीरिक आकर्षण ही नैसर्गिक बाब आहे, तुला वाटते ते काही जगावेगळे नाही हे समजावून सांगणे, इनफॅच्युएशन आणि प्रेम यातला फरक समजावणे, कंसेंटचे महत्व, नकार/डेटिंग- ब्रेकअप स्विकारणे, लैंगिक आरोग्य, मैत्रीच्या नाते- त्यातील आदर आणि विश्वास , स्वत:ला सुरक्षित ठेवणे, सशक्त नाते म्हणजे काय ते समजावून सांगणे, दुषित नात्याचे रेड फ्लॅग्ज ओळखायला शिकवणे , हॅरॅसमेंट, बुलिंग, कळपाची वृत्ती याबाबत बोलणे, कायद्यांची माहिती अश्या अनेक गोष्टी येतात.

२. मोठ्यांकडून शोषण होवू नये म्हणून काय काळजी घ्यायची/होत असेल तर कसे थांबवायचे याबद्दल बोलणे.
गर्दीच्या ठिकाणी संधी साधून सहेतुक स्पर्श करणारे सो कॉल्ड व्हाइट कॉलर ते ऑफिसमधे उद्दामपणे गैरवर्तन करु पहाणारे , ही मंडळीही कुणाची तरी पालक/शेजारी/ नातेवाईक-मित्र मंडळी असतात. आपल्या वयाचा/नात्याचा, विश्वासाचा गैरफायदा घेतात. १४-१६ वर्षांच्या मुलामुलींना बरेचदा जे घडत आहे ते शोषण आहे ही देखील समज नसते. विशेषत: मुलाचे शोषण होवू शकते ही शक्यताही विचारात घेतली जात नाही.

या दोन्ही प्रकारात शाळेतर्फे डॉक्टर्स , सायकॉलॉजिस्ट आणि पोलिस यांचे मार्गदर्शन मुलांना आणि त्यांच्या पालकांना मिळाले तर खूप उपयोग होतो. बरेच पालक आमच्या वेळी असे नव्हतेच पासुन आमच्या घरचे संस्कार, आमचे मूल असे वागणारच नाही वगैरे इगो ट्रिप, डिनायल मधे असतात. शाळेने/ वर्कप्लेसने पालकांसाठी कार्यशाळा आयोजित केली तर वेळीच योग्य मार्गदर्शन मिळाल्याने मुलांना त्यांच्याकडून चांगला आधार मिळेल, मुलांचे भरकटणे टाळता येइल.

सर्व काळजी घेवूनही विपरित घटना घडतात. त्यासाठी कायद्याचा धाक हवा. लूप होल्स नसलेले कायदे हवेत. अशा प्रकारचे गुन्हे कशाप्रकारे हाताळावेत यासाठी सर्व पातळींवर वेगळे ट्रेनिंग हवे. व्यवस्था म्हणजे कुणी वेगळे नसतात, समाजाचाच भाग असतात. व्यवस्थेतील सदस्यांची मानसिकता योग्य नसेल तर त्याचा परीणाम न्याय व्यवस्थेवर होतो. तात्पुरता उद्रेक, मेणबत्या , हाय प्रोफाईल केसेस आणि मेडीआ सर्कस या पलीकडे जावून योग्य पद्धतीने तपास, पुरावे जतन करणे, विलंब न होता न्याय मिळणे फार गरजेचे. छेडछाड ते रेप अशी मोठी रेंज लक्षात घेवून गुन्ह्यांचे योग्य वर्गिकरण /नोंदणी त्यानुसार योग्य पुरावे -शिक्षा, समुपदेशन, शिक्षेची नोंद, सेक्स ऑफेंडर म्हणून नोंदणी आणि ते पब्लिक रेकॉर्ड, बॅक ग्राउंड चेक करण्याची सोय वगैरे उपाय योजना हव्या.

समुदेशन म्हणजे चांगले काय आणि वाईट काय हेच समजून सांगणे ना?
गुन्हा करतात त्यांना आपण वाईट काम करतोय हे माहीत असते .
मुलांची लहानपणा पासून जडण घडण चांगली करायची असेल ,चांगले वळण लावायचे असेल तर चांगले संस्कार महत्वाचे आहेत.
आणि फक्त घरात च नाही तर शाळेत,सार्वजनिक ठिकाणी, समाजात उत्तम मूल्य असलेलं वातावरण असणे गरजेचे आहे.
स्त्री विषयी attraction वाटणे हे नैसर्गिक झाले पण तिच्या मना विरूद्ध ,तिच्या समंती विरूद्ध ते मिळवण्याची वृत्ती असणे हा संस्कार चा भाग झाला.
त्या साठीच मी मत व्यक्त केले होते मैदानी खेळ,व्यायाम,किंवा कोणता ही चांगला छंद माणसाला मानसिक दृष्ट्या निरोगी आणि संयमी बनवतो.