बांद्रा वेस्ट १४

Submitted by मिलिंद महांगडे on 16 November, 2020 - 04:37

बांद्रा वेस्ट १४ Bandra West- 14 

" अरे, बाँब नाही ह्यात.  एवडा काय घाबरतोय ... " वैनीसाहेब गमतीने त्याच्या चेहऱ्याकडे बघत म्हणाल्या. मॉन्ट्याही सुन्न झाला होता. 

" वैनीसाहेब,  प्लीज.... " तो काय बोलणार हे जणु माहीत असल्यामुळे वैनीसाहेबांनी पुन्हा एकदा हातातली पिस्तुल मॉन्ट्याच्या समोर नाचवली. त्याचा नाईलाज झाला. 

" हे सामान कसं पोहोचवायचं खारला...?  " रॉड्रीक मुद्दयावर आला. 

" ही काय ... ह्याच मोटरसायकलवरुन तुम्हाला जायचंय . " मघाशी जो माणुस कोकेन घेऊन आला त्याच्याच बाईककडे वैनीसाहेब बोट दोखवुन म्हणाल्या. त्यांनी पाहीलं,  फक्त दोन चाकं आणि बसायला सीट म्हणुन त्या प्रकाराला गाडी म्हणायचं.... त्यावर नंबरप्लेटही नव्हती.  

" बरं,  काम झालं की त्या बाईकचं काय करायचं ?  " मॉन्ट्याने विचारलं. 

" तुम्हाला काय करायचंय ते करा.  आशीही ती बाईक चोरीची हाय ...! " 

" काय ?  " दोघेही आश्चर्याने ओरडलेच. हे म्हणजे आता जास्तच झालं. एकाच वेळेस ते कितीतरी गुन्हे करणार होते.  बाकी आता वेगळी  अपेक्षा तरी काय असणार म्हणा ...?  ह्या असल्या कामाला चांगली  , नवीकोरी  गाडी कोण देईल  ?  

" चला फुटा आता.  आधीच उशीर झालाय. " वैनीसाहेबांनी त्यांना जवळजवळ हाकललंच. ते दोघे गाडीजवळ आले. 

" गाडीची चावी ....?  " मॉन्ट्याने विचारलं. 

" चावी नाय तिला.  तशीच किक मार…  आणि ब्रेक नीट लागत नाय ... " बाईक घेऊन आलेला तो मघाचा माणुस म्हणाला. रॉड्रीकने एकदा त्याच्याकडे पाहीलं. अन् म्हणाला, " पेट्रोल तरी आहे का टाकीत...?  " 

 " रिझर्वला आहे गाडी. " 

" व्हेरी गुड.... " रॉड्रीक उपहासाने म्हणाला.  ' च्यायला,  कसली पनवती लागलीय ' मॉन्ट्या मनातल्या मनात म्हणाला  आणि बाईकवर बसला. त्याच्या मागे रॉड्रीक हातात तो पुडा घेऊन बसला. मॉन्ट्याने किक मारली. ब्रूम.... ब्रुम .... गाडीच्या फायरींगवरुन त्याने ही गाडी RX 100 आहे हे ओळखलं.  त्याची नेहमीची बाईक सुद्धा RX 100 होती.  त्यातल्या त्यात  जमेची बाजु ! काही प्रॉब्लेम आला तर गाडी बुंगाट सोडायची हे त्याने आधीच ठरवलं होतं. ते खारच्या दिशेने निघाले. 

" शिट मॅन... हे कसलं काम करतोय आपण.... " रॉड्रीक मागे बसुन बोलत होता. 

" जाऊ दे.  आता कसलाच विचार करायचा नाही. हे पार्सल तिकडे पोचवलं की  झालं. त्या राक्षसांच्या तावडीतुन तर सुटलो ना... " 

" ओके. पण व्हॉट अबाऊट दिस बाईक ?  " 

" ती सोडुन देउ कुठेतरी रस्त्यात. त्याची कशाला काळजी करायची.?  "

" हा बॉक्स फेकुन देऊया का?  " 

" नाही रे बाबा,  ते बघ एक मोटरसायकल आपल्याच मागावर आहे "  समोरच्या आरशात बघत मॉन्ट्या म्हणाला . 

" हो रे  बेंचोत. जाऊ दे सरळ.  मॉन्ट्या किती रुपीज चा माल असेल हा...? "

" आयला , मला काय माहीत  ?  मी काय रोज हे काम करत नाय.  " 

" तरी अंदाज... " 

" असेल दोन -तीन खोक्यांचा. " 

" काय बोलतो ....?  इतका कॉस्टली  ? " 

" मग काय !  तुला काय टाल्कम पावडर वाटली का का काय?  " रॉड्रीक विचार करायला लागला. नशा ही अशी गोष्ट आहे की माणुस स्वतःचा रहात नाही. त्यासाठी पाहीजे ती किंमत मोजायला तो तयार होतो.  आपल्या जिवाला घाबरुन आपण हे काम करायला तयार झालो ह्याचं त्याला राहुन राहुन वाईट वाटत होतं.  मॉन्ट्या सुसाट गाडी चालवत होता. त्याच्या हातात बाईक आली की तो राजा होतो. एक वेगळाच एटीट्युड त्याला येतो. मग तो त्याचा स्वतःचाही रहात नाही. गाडी चालवणं ही मॉन्ट्यासाठी नशाच आहे.... " काय रे काय झालं ?  गप्प का बसलास ? " मॉन्ट्याच्या प्रश्नाने तो भानावर आला. 

" अं .... काही नाही.  असाच विचार करत होतो. त्यांच्याकडे एवढी माणसं  असताना आपल्याला का सांगितलाय त्यांनी हे काम  ? व्होटस  दि रीझन  ? " 

“ काही माहित नाय यार … कायतरी लफडा दिसतोय . नायतर ओळख ना पाळख कोण कसा एवढा विश्वास टाकेल ?  पोलिसांचा तर लफडा नाय ना ? “ 

“ येस , देअर  मे  बी अ ह्यूज रिस्क .  नाहीतर आपल्याला एवढं  महत्वाचं  काम  ते सोपवणारच नाहीत . “

“ हम्म  हे लोक दरवेळी कोणीतरी बकरे शोधतच असतील “

“ हो आणि आपण नेमके त्यांना सापडलो . “ 

बोलता बोलता आता ते दोघे रिक्लेमेशन ओलांडुन लिंकींग रोडला लागले. 

" मॉन्ट्या,  आय हॅव स्ट्रॉंग फिलींग की काहीतरी प्रॉब्लेम होणार आहे. "

" काय ?  कसला प्रॉब्लेम ?  " 

" एक काम कर,  लिंकींग रोडने जाण्यापेक्षा आपण आतुन जाऊ. पाली हिल रोडने .... " 

" का ?  " 

" अरे  ह्या लिंकींग रोडवर कधीकधी पोलीस असतात. आत्ता रात्रीचे अडीच  वाजलेत... ते साले मामालोक नक्की अडवणार आपल्याला. " 

" हम्म्म्.... बरोबर... " मॉन्ट्याने पाली हिलच्या रोडवर गाडी घेतली. आतले रस्ते लहान असल्याने आता वेग थोडा कमी केला. समोरच्या आरशात त्याने पाहीलं . मागे एक गाडीचा हेडलाईट चमकला.  " आपल्या मागे त्या हरामखोरांची गाडी पण आली ... " त्याने आरशात बघुन एक शिवी हासडली आणि थोडा वेग वाढवला. रस्ता सुनसान होता. जिवंतपणाची कोणतीही खुण त्या रस्त्याच्या आजुबाजुला दिसत नव्हती.  सर्वत्र शांतता . फक्त त्याच्या गाडीच्या सायलेंसरचा आवाज त्या स्तब्ध वातावरणात घुमत होता. आणखी एक उजवं वळण घेतलं आणि समोर पाहतात तो त्यांचा त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसेना.   समोरुन लाल पिवळे दिवे चमकवत,  सायरन वाजवत पोलीसांची रात्रीची पेट्रोलींग व्हॅन येत असलेली  दिसली.  क्षणाक्षणाला ती जवळ येत होती.  ती व्हॅन नसून साक्षात मृत्युदेवताच आहे असं  दोघांनाही वाटलं . 

" आयचा घो ...! रॉडी मेलो आता.... " मॉन्ट्याच्या तोंडुन भेदरलेले उद्गार बाहेर पडले.  रॉड्रीक तर समोर विस्फारलेल्या डोळ्यांनी पहात राहीला. 

क्रमशः

https://kathakadambari.com

माझी अर्धदशक  नावाची कादंबरी वाचण्यासाठी खाली लिंक दिली आहे

https://www.mehtapublishinghouse.com/book-details/ARDHADASHAK/3048.aspx

Amazon link

https://www.amazon.in/Ardhadashak-Milind-Mahangade/dp/9353174163/ref=sr_...

Flipkart Link

https://www.flipkart.com/ardhadashak/p/itm7149b4896e81d?pid=978935317416...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users