आयुष्याचा प्रवास , अध्यात्म इत्यादी

Submitted by राधानिशा on 5 November, 2020 - 09:14

दोन इंटरेस्टिंग कथा आहेत .. खऱ्या खोट्या देव जाणे पण अध्यात्मिक वाटचाल करू इच्छिणाऱ्यांसाठी मार्गदर्शक आहेत.

१ - बळीराजाच्या राजकुमारीला वामनावताराचं गोंडस रूप आवडलं .. तिच्या मनात इच्छा उत्पन्न झाली - अशा गोड बाळाला माझं दूध पाजावंस वाटतं .. ती इच्छा श्री विष्णूंना अंतर्ज्ञानाने कळली , मनात म्हणाले तथास्तु ... नंतर वामनाने विराटरुप धारण करून तिसरं पाऊल कुठे ठेवू असं बळीराजाला विचारत पुढे त्याला पाताळलोकी पाठवलं तेव्हा तिच्या मनात क्रोध उत्पन्न झाला .. मनात म्हणाली , असं जर कपटी बालक असेल तर त्याला मी स्तनाला विष लावून दूध पाजेन .... हीसुद्धा इच्छा मान्य झाली ... आणि पुढे पुतना राक्षसीचा जन्म घेऊन अनेक दुष्कृत्यं करावी लागली .. अनेक बाळांना यमसदनी धाडण्याचं पापकृत्य करावं लागलं ... आणि मग शेवटी श्रीकृष्णाच्या रूपाने भगवंताने मुक्ती दिली .. वामनावतार चौथा आणि कृष्णावतार आठवा .... क्षणिक क्रोधापोटी मुक्तीसाठी इतका काळ थांबावं लागलं .... दुष्कृत्यं करावी लागली ...

दुसरी गोष्ट मजेशीर आहे , व्हाट्सअप फॉरवर्ड म्हणून आली होती .. उपनिषदातली आहे म्हणे .. एका बाईला खूप वर्षं मूल होतं नव्हतं , त्यासाठी तिने व्रतवैकल्य , उपासतापास बरंच काय काय केलं पण काही उपयोग झाला नाही ... शेवटी लग्नानंतर तब्बल 20 वर्षांनी तिला दिवस राहिले .. तिच्या आनंदाला पारावार राहिला नाही ... मूल झालं .. तिला खूप आस होती की कधी एकदा त्याच्या तोंडून आई अशी हाक ऐकेन .... पण मूल काही दिवसांचं होतं न होतं तोवर मृत्यूमुखी पडलं ... तिला आभाळ फाटल्यासारखं दुःख झालं ... नेमके योगायोगाने श्री सद्गुरू त्यावेळी त्या गावात आले होते .. ती त्यांच्याकडे बाळाला घेऊन गेली , याला जिवंत करून द्या अशी मागणी केली ... ते म्हणाले , थांब तुझी क्षणभर या आत्म्याशी गाठ घालून देतो ... बाळाने डोळे उघडले .. तिने विचारलं - मला एकदाच तुझ्या तोंडून "आई" ऐकायचं होतं रे... असा कसा मला सोडून गेलास ? .. बाळ बोललं - " कसली आई ? कुठली आई ? गेल्या जन्मी तू माझी सवत म्हणून भेटलीस .. खूप विनवण्या केल्या होत्या मी तुझ्या पण माझ्या नवऱ्याला माझ्यापासून तोडून घेऊन गेलीस ... त्यावेळी मी रडत होतो ; आज तू रडते आहेस ... तुझा आणि माझा एवढाच हिशेब होता , तो चुकता करायला फक्त तुझ्यापोटी आलो .. आणि तो आत्मा बाळाचा देह सोडून निघून गेला .... नंतर सद्गुरूंनी तिला समजावलं की ही नाती - " आई , वडील , भाऊ , बहीण , मुलगा , मुलगी , नवरा , बायको ... सगळी नाती घेऊन कुठले ना कुठले राहिलेले हिशेब फेडायला आत्मे जन्म घेत असतात ... काही हिशेब चांगले - तिथे चांगले - प्रेमळ - जिव्हाळ्याचे संबंध ... काही हिशेब वाईट - तिथे मनाला क्लेश देणारे संबंध ... "

कथांमधला चमत्कार जाऊ द्या पण रूपक म्हणून तरी मार्गदर्शक आहेत ...

इच्छा त्या आत्म्याचीही नसते तुम्हाला त्रास देण्याची .. त्यालाही या चक्रातून सुटायचंच असतं .. सगळ्यांनाच सुटायचं आहे पण सुटता येत नाही ... कारण जिवंत असताना क्षमा करत नाहीत , राग - कटूपणा - ब्लेमिंग हे धरून ठेवतात मनात ... मग एक देह सोडला की दुसरा घेऊन परत परत येऊन ते नाटक पुढे खेळत राहावं लागतं ... इतरवेळी आसक्ती - प्रेम - जिव्हाळा हे सुटत नाहीत .. त्याची परिणती खूप चांगल्या , प्रेमाच्या नातेसंबंधांत होते ... रोल प्ले करतो आहोत हे विसरलं की पुन्हा पुन्हा जन्म घेण्यावाचून गत्यंतर नाही ...

काही नाती / परिस्थिती कटू , लादल्यासारखी वाटते , त्यातून सुटका व्हावी असं वाटतं ... अशावेळी विचार करावा - सतत भांडणाऱ्या चार मुलांना बाईंनी एकाच बेंचवर बसवलं आहे.. जोवर भांडण मिटवत नाही तोवर एकाच बेंचवर बसावं लागणार आहे .. पूर्ण वर्ष , त्यातही नाही संपलं तर त्यापुढंचं वर्ष आणि त्याहीपुढचं वर्ष ... आता बाईंना दोष देण्यापेक्षा भांडण मिटवणं किंवा बाईंना तुमच्या स्वभावात अपेक्षित असणारी सुधारणा घडवून आणणं सोपं आहे ..... बाई ( परमेश्वर ) आपल्या सगळ्यांच्याच लाडक्या आहेत , त्यामुळे त्यांनी घेतलेला निर्णय आपल्या भल्यासाठीच असणार असा विश्वास पाहिजे ... मी एकटा चांगला वागून काय उपयोग, बाकीचे चांगले वागत नाहीत अशी तक्रार नको ... बाईंना माहीत आहे सगळी कार्टी कशी आहेत ती ... त्या एकाही अशक्त मुलाला गुंड मुलाकडून मार खाऊ देत नाहीत ... आणि जर तसं दिसत असेल तर तो त्याच अशक्त मुलाने गेल्या वर्षी सशक्त असताना दिलेला मार त्याला परतून मिळतो आहे , हे निश्चित .... त्यामुळे रागावण्याचं कारण नाही ... आज आपण रागाने फटका मारला नाही की तो उद्या परतून येणार नाही... बाई सगळ्या नोंदी ठेवतात ...

अतिशय नावडती व्यक्ती सुद्धा माझ्या भगवंताचं बाळ आहे , त्याला प्रिय आहे .. आणि जन्मोजन्मीच्या प्रवासात स्वतःचा मूळ लखलखीत स्वभाव हरवून , काळवंडून जाऊन माझ्यासमोर आली आहे .... आणि ज्याअर्थी ती मला वेदना होण्यास कारणीभूत ठरत आहे , त्याअर्थी माझ्याकडून या व्यक्तीला कळत नकळत वेदना दिल्या गेल्या आहेत .... अशा नजरेने तिच्याकडे पाहिलं की राग येणार नाही , सहानुभूती निर्माण होईल ... हिच्यासाठी मला आता काय करता येईल अशी भावना निर्माण होईल ... उदाहरणार्थ शाळेतला तुमचा वर्गमित्र - अतिशय गोड स्वभावाचा , सगळ्यांना मदत करणारा , न समजलेली गणितं समजावून सांगणारा , टिफिन न आणणाऱ्या दोन मुलांसाठी आपल्या डब्यात 4 extra चपात्या आणि भाजी आणणारा , कध्धीच न चिडणारा , प्रामाणिक .. त्याला पुढे हलाखीच्या परिस्थितीतून जावं लागल्यामुळे गुंड , भ्रष्ट , लाचखाऊ झाल्याचं तुम्हाला समजलं तर कसे हळहळाल - एका सोन्यासारख्या स्वभावाची झालेली अधोगती पाहून ... त्याच नजरेने प्रत्येक नावडत्या व्यक्तीकडे पाहता आलं पाहिजे .. देवाने निर्माण केलेला आत्मा - देवाचं बाळ ... ते असंच असेल का पहिल्यांदा आलं तेव्हा ? किती गोड , किती संवेदनशील स्वभाव असेल ..... आणि आता असा स्वभाव व्हायला किती दुःख अनुभवलं असेल ? त्याचं फक्त या देहातलं आयुष्य बघू नका ... तुम्हाला माहीत नाही त्याचे याआधीचे अनेक जन्म कसे गेले आहेत ... काय भोगून , किती सोसून तो या देहात आला आहे ..... सहानुभूती शिवाय दुसरी कुठली भावना निर्माण होणार नाही ... आणि सहानुभूती निर्माण झाली की राग हळूहळू कमी होत नाहीसा होऊन जाईल .... क्षणिक राग ठीक आहे , कोण काही बोललं , काही मनाविरुद्ध झालं की क्षणिक राग येणं साहजिक आहे , त्यावर विजय मिळवायला संत व्हावं लागेल ( ते सुद्धा आपलं साईड गोल असावं ) पण दिवसाच्या शेवटी व्यक्तीबद्दल राग मनात राहता नये .... अमुक मला असं बोलला , माझा अपमान केला , माझी फसवणूक केली , माझा विश्वासघात केला .. अरे पण स्क्रिप्ट लिहिलं कोणी ? स्क्रिप्ट लिहिणारा तो वरचा आहे .. ज्याने अपमान केला / विश्वासघात केला तोसुद्धा फक्त लिहून दिलेला रोल करतो आहे .... त्यालासुद्धा मोकळीक नाहीये , हवं तसं वागायची ....

ज्यावेळी बेंचवर बसवलेल्या चार पैकी एक विद्यार्थी त्याच्या वागण्यात सुधारणा घडवून आणेल , ज्यावेळी तो उरलेल्या तिघांकडे रागाने नाही सहानुभूतीने बघू शकेल , ज्यावेळी त्याला त्यांच्याबरोबर एका बेंचवर बसणं ही शिक्षा वाटणार नाही , कदाचित स्वतःत आमूलाग्र सुधारणा घडवून आणण्याची संधी वाटेल , त्यावेळी कदाचित त्याला तिथून उठून दुसरीकडे जाऊन बसायची मुभा मिळेल ... बाईंचं प्रत्येकावर लक्ष आहे ... आणि फक्त वरवर चांगलं वागून अर्थातच उपयोग नाही , मनातून कटुपणा पूर्ण नष्ट झाला पाहिजे ... बाई अंतर्यामी आहेत ..

कधीकधी मला वाटतं , आयुष्य ही एक ट्रेन आहे .. डेस्टिनेशन परमेश्वर आहे .. त्याच्याकडे जायला म्हणून आपण गाडीत चढतो पण गाडीत बसलो की आपण कुठे जायला निघालो होतो तेच विसरून जातो ... मग कुठे बरोबरच्या पॅसेंजरशी दोस्ती कर , कुठे बरोबरच्या पॅसेंजरशी शत्रुत्व ओढवून घे ... स्टेशन स्टेशनवरची दुकानं भुरळ घालतात आपल्याला - कुठे वडा खायला उतर , कुठे भेळ , कुठे आणि काही विकत घ्यायला .... किंवा ट्रेन मध्ये विकायला येणाऱ्या वस्तूंनी भारून जातो आपण - आहा , इतकी सुंदर टोपी , इतका सुंदर मोत्यांचा ( ते पण कल्चर्ड ) हार ... हे मला घेतलंच पाहिजे .. अरे बाबा , जिथे निघाला आहेस , तिथे पोचलास तर ना तुला टोपीची गरज लागणार आहे , ना हाराची ... या प्रवासातच इतके गुंग होऊन जातो की कुठे पोचायचं म्हणून निघालो होतो तेच विसरून जातो ... मग माझ्यासारखे काहीजण ही कसली ट्रेन दिली , बसून प्रवास चालू आहे , झोपता येत नाही , विंडो सीट दिली नाही , ह्या सीटचा खिळाच टोपतो आहे मला म्हणून किरकिर करतात .... हे सगळं किती क्षुल्लक आहे .. पण केव्हा ? डेस्टिनेशन लक्षात असेल तेव्हा ... समजा तुम्ही खऱ्या ट्रेनमधून चक्क देवाला प्रत्यक्ष भेटायला निघाला आहात - देऊळ - मूर्ती नाही .. खऱ्या खऱ्या देवाला भेटायला .. अशावेळी पॅसेंजरशी हुज्जत घालाल का ? स्टेशन वर काहीतरी घ्यायला उतराल का चार तास ? पॅसेंजर वर जीव लावून , हा प्रवास कधी संपूच नये असं वाटतंय म्हणाल का ... किंवा सीटचं कव्हर फाटलं आहे , फॅन नाही डब्यात , गरम होतं आहे , खिळा बोचतो आहे अशा तक्रारी कराल का? नाही ... कारण या प्रवासाच्या शेवटी या सगळ्या समस्या क्षणात नाहीशा होतील हे तुम्हाला माहीत आहे आणि ह्या ट्रेनमध्ये जागा मिळाली हेच भाग्य आहे ... हेही माहीत असेल ... तरी करतील काहीजण तक्रार ... बरं हे तिकीट सुद्धा त्यानेच खास तुमच्यासाठी पाठवलं आहे , ही खिळा टोपणारी सीट सुद्धा त्याने स्वतः , पर्सनली तुमच्यासाठी निवडली आहे .. आता कराल तक्रार ? त्याला बघायचं आहे , कोण तक्रार , किरकिर न करता , इकडेतिकडे लक्ष विचलित न होऊ देता त्याच्याकडे येतं .... जेव्हा तुम्ही प्रवासातच गुंगून जाता तेव्हा तो म्हणतो , ठीक आहे , तू प्रवासात एवढा रंगतोस तर आणखी प्रवास कर .. डेस्टिनेशन उद्या आलं असतं ते माहिन्यावर लांबतं ... ज्याला पोहोचायची घाई झाली आहे तोच लवकर पोहोचेल , तोसुद्धा त्याच्या मर्जीप्रमाणे नाही , तर जेव्हा परमेश्वराची मर्जी होईल तेव्हा ... ठीक आहे, तुला समोशाचा मोह झाला , घेतलास तू ... त्यावेळी तुझ्याबरोबर गाडीच्या डब्यात 4 लोक आणखी होते , उपाशी .. तुझ्याकडे चौघांनाही समोसा घेण्याएवढे पैसे होते - ते तुझ्या खिशात कोणी ठेवले ? त्याने ठेवले .. त्यातून तू स्वतःपुरताच समोसा घेऊन खात असशील तर तुझी प्रवास संपायची वेळ यायला अजून खूप वेळ आहे , अजून मोह सुटलेले नाहीत .... संपत्ती मिळवली ( खरं म्हणजे ती सुद्धा त्यानेच दिली आहे , परीक्षा बघायला ) पण दुसऱ्यांना काहीतरी मदत करावी अशी बुद्धी होत नाही तर मग फिरत राहा , ट्रेन नंतर ट्रेन बदलत .. ट्रेनमध्ये चढल्यापासून तुम्हाला काय काय अनुभव येणार आहेत याचं स्क्रिप्ट लिहून ठेवलं आहे , प्रत्येक प्रसंगात तुम्ही कसे वागता त्यावरून अजून किती प्रवास करावा लागणार आहे हे ठरतं ... See , HE want only perfects to reach to Him . त्याचे आणखी किती निकष असतील माहीत नाही ... मॅन्युअल दिलं असतं तर बरं झालं असतं नाही ? मग संतांनी जे एवढे भारंभार ग्रंथ लिहून ठेवलेत , ते काय आहेत ? ती मॅन्युअलंच आहेत ... जोडोनिया धन उत्तम व्यवहारे , उदास विचारे वेच करी .. नि काय काय .. सेतू बांधायला मदत करणाऱ्या खारीची लीला कशासाठी घडवून आणली त्याने ? जेवढी तुझी शक्ती आहे , तेवढं चांगलं काम कर , माझी शक्ती कमी असा विचार करत बसू नकोस , तुझी शक्ती इवलीशी आहे ना मग तेवढीसुद्धा चांगली कामाला खर्ची घातलीस तर मी गोड मानून घेईन हे सांगण्यासाठी ... मी श्रीमंत असतो तर चांगलं काम केलं असतं हा पोरकटपणा करू नये यासाठी .. कित्ती कठीण आहे हे नाही ? पूजा घातली , दक्षिणा दिली , होम केला , यज्ञ केला , मुक्ती फिक्स झाली इतकं सोपं असतं तर किती बरं झालं असतं .. पण तो फार उलट्या काळजाचा आहे ( सॉरी ) किती कठोर अपेक्षा ठेवतोय बघ - फळाची अपेक्षा न ठेवता कर्म कर , जेव्हा सगळ्या वासना सोडायला जमेल , जेव्हा सगळे विकार सोडायला जमतील तेव्हा मी भेटेन .. पण हे लोकांना कठीण वाटतं ... काहीतरीच बाई .. त्यापेक्षा किती गुरुवार करू नि किती सवाष्णींची ओटी भरू नि देव्हाऱ्यात अमुक मूर्ती ठेवली तर चालेल का आणि प्रदक्षिणा सम की विषम , अभिषेकाला पिशवीचं दूध चालत नाही , धारोष्ण कुठल्या गोठयातून आणू ह्याच काथ्याकूटात जन्म घालवणं सोपं .. शबरीच्या बोरांची लीला कशासाठी घडवून आणली ? देव भावाचा भुकेला हे दाखवून देण्यासाठी .. पण ती या कानाने ऐकून त्या कानाने सोडून द्यायची आणि कुठलेतेरी स्वयंघोषित धर्मपंडीत सांगणार - सगळं रीत्तीप्रमाणे व्हायला पाहिजे बर्र का ! नाहीतर देव कोपेल .. यावर मात्र विश्वास ठेवतात ... जो ब्रह्मांंडाचा निर्माता तो तुम्ही पुजेत हयगय केली तर कोपणार ... म्हणजे जे त्याने एवढा अवतार घेऊन दाखवून दिलं त्याला शून्य महत्व आणि निरर्थक गोष्टींना अवास्तव महत्व द्यायचं ...

बरं ते सगळं सुद्धा त्याची भेट व्हावी म्हणून नव्हेच गाडीत एक सुंदर टोप्या विकणारा आला आहे पण टोपी घ्यायला माझ्याकडे पैसेच नाहीत , हे सगळं केलं की चार पैसे मिळतील मग मी ती सुंदर टोपी घेईन ..... किंवा हा जो पॅसेंजर आहे ना तो अजून राहावा माझ्यासोबत पुढचा सगळा प्रवास .... किंवा पॅसेंजरशी शत्रूसारखं वागत बसायचं एकाच डब्यात ... अरे तुझी सीट जशी त्याने स्वतः निश्चित केली आहे , तशीच त्या पॅसेंजरचीही त्यानेच केली आहे , तुम्हाला एका डब्यात सुदधा त्यानेच बसवलं आहे ... बघायचं आहे त्याला , कसे वागता तुम्ही .. मोहही बरा नाही आणि शत्रुत्व सुद्धा नको... प्रवासापुरती सोबत आहे , हे विसरू द्यायचं नाही .. त्याला उतरावं लागेल मधेच किंवा तुम्हाला .. ट्रेन बदलावी लागेल .. अशावेळी मोह असून उपयोग नाही , दुःख करून घेण्यात अर्थ नाही .. एवढीच सोबत होती .. योगायोगाने गाठ पडली , सूर जुळले ... तेही त्यानेच जुळवलेत बरं का , तुमची परीक्षा बघण्यासाठी , आणि त्या दुसऱ्या पॅसेंजरची सुद्धा , त्याने जर ते जुळवले नसते तर जन्मभर एका घरात राहून तुम्हाला एकमेकांबद्दल दोन पैशांचं प्रेम निर्माण झालं नसतं , त्यामुळे ती सुदधा परीक्षाच आहे विसरलात तर फसलात ... मग तो हसून म्हणतो , एवढा आवडतो प्रवास , कर मग आणखी ... जेव्हा प्रवासाने मन विटेल तेव्हा माझ्याकडे येण्यासाठी प्रयत्न कर ..

जर संसारातून ( या ट्रेनच्या प्रवासातून ) मन विटत नसेल , जर याच राग - लोभ - द्वेषात अडकून राहायला होत असेल तर त्याचीच प्रार्थना करावी ... म्हणावं - बघ तुझ्या मायेच्या जंजाळात मी पुरता अडकून गेलो आहे , तुला दया येत नाही का अजिबात ?? हे मायेचे पाश सोडव .. माझी दृष्टी स्वच्छ कर , त्यासमोरून हे मायेचं पटल दूर कर .. विकारांनी मला ग्रासलं आहे ,पायात साखळदंड आहेत .. तुझ्यापर्यंत येण्यासाठी लागणारे नियम पाळण्याची शक्तीही माझ्यात नाही.. ती सुद्धा तुलाच द्यावी लागेल .. तुझ्यापर्यंत पोचायला परफेक्ट व्हायला लागत असेल तर मला लवकर परफेक्ट कर निदान ऍक्सेप्टेबल तरी कर - तुझी परीक्षा तुच पास करून घे माझ्याकडून कर हेच रोज कळवळून मागावं ..

मी मागते आहे , थोडीशी शक्ती मिळाली आहे , बरीचशी मिळायचं आहे .. अजून विकारमुक्त झालेले नाही ... मी त्या किरकिऱ्या पॅसेंजर्स पैकी एक आहे ... बाकी मी काही ज्ञानी बिनी जाणकार अजिबातच नाही , इकडंचं तिकडंचं ऐकून जे वाटलं ती पोपटपंची केली आहे .... हे अंगी भिनायला अजून 10 वर्षं पण कमी पडतील ...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण ते नुसते समजून उपयोगी नाही. कृतीत यायला पाहिजे.
आणि समजा विकारांशी सध्या नाही झगडू शकत आपण, तरी स्वतः: ला दोष देऊन आत्मक्लेश करून घेऊ नये. विकारमुक्त होणे ही खूप उच्च पातळी आहे. हळूहळू जमेल. पण आपल्या ध्येयावर आणि तत्त्वांवर आपली श्रद्धा पाहिजे. श्रद्धा और सबूरी! आणि यश पूर्ण न मिळता अंशत: मिळाले तरी ती खूप मोठी अचीवमेंट असेल. बहुतेकांना अंशत:च मिळते यश. आपण सारे कोणी वेगळे नाही, इतरांसारखेच आहोत सध्यातरी. अनेक जण आहेत आपल्याबरोबर आणि सोबत. नाही का? Bw

नैराश्याचा अनुभव मांडणारा धागा आहे. बरेच वेळा हे आत्मप्रकटण असते, कल्पना आणि शब्द स्वैर वेगाने धावतात, कारण खूप काही लिहायचे असते, व्यक्त व्हायचे असते. आपल्याकडे काही सांगण्यासारखे असेल तर(च) लिहावे. गंभीर धागा आहे. टिंगलटवाळीचा नाही.

या सगळ्या थिअरीज आहेत आणि तेवढच महत्व त्यांना द्यायचं. एक्स्प्लोअर-एन्जॉय/क्वेश्चन-फर्गेट!!!
काय खरं न काय खोटं सांगायला कोणीही अजुन आलेला तिकडुन, नाही. पुराव्यानिशी तर नाहीच नाही. Happy

थँक यू हीरा ... असं कधी लिहायला सुचलं की ते पूर्ण शब्दात उतरेपर्यंत थांबता येत नाही ...

सामो , हो .

राधानिशा, मला डिप्रेशनमध्ये अचानक अतिशय रडू येई. काहीही कारण नसताना. ते हलकं वगैरे वाटणं इज ओके पण औषधोपचाराशिवाय कोणीही राहू नये, नैराश्य या रोगाची हयगय करु नये हा सल्ला. तुम्हालाच नाही इन जनरलच.

माझ्या आयुष्यात घडलेल्या अनेक नाटकिय घटनांवरुन तरी मी या निर्णयाप्रत आलो आहे की कुणी एक अद्रुष्य शक्ती ,नियती म्हणा हवे तर,ही तुमच्या आयुष्यातल्या घटना प्रसंग, त्यावर तुमची प्रतिक्रीया हे सगळे नियंत्रीत करत असते.त्यामुळे प्रत्येकाने अध्यात्म्याच्या अनुषंगाने एकदा तरी विचार करावा(अध्यात्मावर विश्वास असेल तर)

क्लिक बेट धागे आहेत . बोअर झाले मला. >> अमा, कमेंट नाही आवडली. कुणीतरी आतून जाणवलेलं इथे मनमोकळेपणे लिहिलेले असते. ही भावना सगळ्यांपर्यंत पोहोचेल असं नाहीये. प्रत्येकाच्या मनाची धारणा वेगळी असते. तुम्ही वाचा, आवडलं तर सांगा, एखादा मुद्दा पटला नाही तर तो तुमच्या दृष्टीकोनातून सविस्तर मांडा अथवा खोडून काढा. पण हे जनरल लेबलं लावणं आणि रुड कमेंट करणं थांबवलंत तर उत्तम. पहिल्या काही ओळी वाचल्यावर पुढे वाचायचं की थांबायचं आपल्या हातात असतं.

radhanisha , मला हा लेख फार आवडला आणि भावना पोहोचल्या. फार सुरेख मांडलंय.

Poorna vachayacha ahe.
Suruvaticha vachalela bhag awadala.
Nakki vachen.

Mami +1

लिखाण आवडले.
काया वाचा मने किंवा विचार उच्चार आचार असे आपण म्हणतो ह्यापैकी आचरणात येण्या आधीच्या पहिल्या दोन पायर्‍या पार पडल्या आहेत. हे ही मोठे काम झाले आहे.

अमा,
तुम्हाला नाही पटले ठीकच. मात्र क्लिकबेट वगैरे रुड कॉमेंटची गरज नव्हती. एखादी व्यक्ती मनापासून आलेले काहीतरी इथे मांडते आहे. ते विचार तुमच्याशी मेळ खात नाहीत तर 'पटले नाही' असे म्हणून पुढे जाता येते. तुमच्याकडे तुमचे स्वतःचे असे समृद्ध अनुभवविश्व आहे, त्याआधारे धागाकर्त्याच्या विचारांचे मुद्देसुद खंडनही करु शकता मात्र जजमेंटल होवून लेबलं लावणे टाळा.

राधानिशा, अहो किती सुरेख लिहिले आहे.सुरवातीच्या काही दिवस वाचायचे टाळले,पण हीरांचा प्रतिसाद लक्षात होता.आज वाचले. वाचल्यानंतर गळून्ही गेले.लिखाणाचा ओघ आवडला.खूप तलमळून लिहिलंय.

अतिशय आवडले लिखाण. काही विचार मनाला भिडले अगदी. नैराश्याच्या वर्तुळातून बाहेर पडून इतके खोलवर चिंतन केलेत त्याबद्दल कौतुक.

छान लिहिले आहे.
राधानिशा , एक सहज सुचवते आहे. सतत आध्यात्मिक विचार करण्याने मानसिक थकवा येऊ शकतो (स्वानुभव) म्हणून सगळ्या प्रकारचे 'रस' (लिखाण/वाचन / मनोरंजन , नवरस) यांच्या बद्दल विचार करा. पण लिहीत रहा व्यक्त होतं रहा. वयाच्या मानाने प्रगल्भ आहात Happy .

>> Submitted by अस्मिता. on 9 November, 2020 - 20:08

सहमत आहे. तुमचा प्रतिसाद खूपच अपेक्षित होता या धाग्यावर म्हणूनच इथे येऊन पाहिले Happy

अध्यात्म म्हणजे एका ठार आंधळयाने अमावास्येच्या रात्री एका काळ्या अंधार्या खोलीत काळे मांजर शोधणे होय, तेही त्या खोलीत मांजरच नसताना

IMG_20190517_004102_751.jpg

जाऊदे , आपण आपले गाणे ऐकूया खूप दिवसात नाही ऐकले
रात्र काळी घागर काळी

अध्यात्म हे वेगळेच आहे. कशाचाही शोध घ्यायचा नसतो. स्वतः: ला पाहायचे. "पाहावे आपणासी आपण" (दासबोध.) हळू हळू आतून स्थिर होत जायचे. स्वतः:चा श्वास जाणवून घ्यायचा. श्वास घेतोय ही जाणीव झाली पाहिजे. मग एकदम शांत वाटते.

हिवाळा सुरु होतोय. हा जो पानगळीचा ऋतु असतो तो बर्‍याच जणांना जड जातो. थकवा वाटतो, उदास वाटतं. सीझनल चेंजेस मुळे / ऋतुबदल. मला दर वर्षी होते मग हळूहळू बदलाला, सरावतो आपण.