बांद्रा वेस्ट १०

Submitted by मिलिंद महांगडे on 7 November, 2020 - 11:18

बांद्रा वेस्ट- १० Bandra West-10

धाड…! सत्तु नावाच्या त्या राक्षसाने अस्लम आणि शौकतला जमिनीवर आपटलं. मॉन्ट्या आणि रॉड्रीकने समोर पाहीलं. एक चाळीस – पंचेचाळीस वयाची बाई समोर उभी होती. तिने काळ्या कलरची साडी नेसली होती. सावळा वर्ण, डोक्यावरचे काही केस पिकलेले., कपाळावर मोठी टिकली होती . इतकी मोठी कि त्याने कपाळाचा अर्धा भाग व्यापला होता . तिच्या डोळ्यात एकप्रकारचा क्रुरपणा आणि बेफिकीरी दिसत होती. डाव्या हातात पिस्तुल, आणि ते खाली तिच्या पायाशी लोटांगण घातलेल्या शौकत आणि अस्लमवर रोखलेलं ! उजव्या हातात सिगारेट होती . तिचे डोळे लाल भडक झालेले दिसत होते . त्या बाईंकडे बघुन मॉन्ट्याची चांगलीच तंतरली.

“आईचा घो…. अरे ही तर वैनीसाहेब…! ” मॉन्ट्या भुत पाहील्यासारखा चेहरा करुन म्हणाला

” कोण वैनीसाहेब ?” रॉड्रीकला काही कळेना.

” अरे, जाम बेकार बाई आहे… डॉन पापा खडांगळे ची बायको…! बिल्डर सिंघानिया मर्डरकेसमधे पापा आत गेला तेव्हापासुन त्याची गँग ही बाईच संभाळते. लेडी डॉन…! “.मॉन्ट्या हळु आवाजात रॉड्रीकच्या कानात म्हणाला. तो समोर त्या बाईंकडेच बघत होता. चेहऱ्यावरून ती अतिशय क्रूर वाटत होती . एखादी गुंडाची गँग चालवणं हे काही बाईमाणसाचं काम नाही, पण त्या बाईंची दहशत पाहुन तर ह्या बाई गँगच काय पण सरकारही चालवु शकतात. रॉड्रीकच्या डोक्यात विचार आला.. तसंही त्या बाई समांतर सत्ता चालवतंच होत्या.

” उठा हरामखोरांनो… उठा.. ” ती बाई जोरात ओरडली.

” वैनीसाब… हमको माफ करदो । हम आपका सारा पैसा लौटा देंगे । ” शौकत कळवळुन त्या समोरच्या बाईला सांगु लागला .

” भाड्यांनो, कदी देनार…? आं…? मी मेल्यावर….? ” वैनीसाहेब वैतागुन ओरडल्या आणि समोर आडव्या पडलेल्या शौतकच्या पेकाटात एक लाथ घातली. त्याबरोबर तो वेदनेने कळवळला.

अस्लमने तर डायरेक्ट तिचे पायच धरले. ” वैनीसाब, एक आखरी चान्स दो । आगेसे शिकायत का मौका नही देंगे । ” ते दोघे रडवेल्या सुरात म्हणाले. रॉड्रीक आणि मॉन्ट्याला तर कळेनाच की हा नक्की काय प्रकार आहे. समोर चाललेल्या नाट्ट्यावरुन इतकंच कळंत होतं की त्या दोन भावांनी समोरच्या बाईकडुन बरेच पैसे घेतले असावे आणि बऱ्याच वेळा मागणी करुनही ह्यांनी ते दिले नसावेत., त्यामुळे हा सगळा लवाजमा घेऊन ह्या बाई इथे आल्या असाव्यात.

” आखरी चान्स…? नय … सत्तु ह्यांना उचल … अन् गाडीत टाक. ”

‘गाडीत टाक’ म्हणल्यावर त्या दोघांनी तर आणखीनच गयावया करायला सुरुवात केली. ” वैनीसाब मै कसम खाता हुं… एक हफ्तेमे आपके सारे पैसे लौटा दुंगा । ” शौकत म्हणाला.

” एक हफ्ता …? एका हफ्त्यात तु माझे तीस लाख देनार ? कुठुन आननार एवढे पैशे ? तुझ्या बापाने तरी जमा केलते का तीस लाख एका हफ्त्यात ? सत्तु उचल साल्यांना ” वैनीसाहेबांनी रागावलेल्या सुरात त्या दानवाला आदेश दिला. हा सत्तु म्हणजे एखादा रोबो सारखा होता. वैनीसाहेब जे म्हणतील त्याची अंमलबजावणी लगेच करायचा. तो पुढे झाला आणि वैनीसाहेबांच्या पायाशी लोळणाऱ्या त्या दोघांना कॉलरला धरुन उचलले. हा सगळा प्रकार चालु असेपर्यंत रॉड्रीक आणि मॉन्ट्यावर वैनीसाहेबांचं लक्ष नव्हतं, ते आता गेलं.

” तुम्ही दोघं कोण रे ? ” त्यांची करडी नजर ह्या दोघांवर पडली.

” आ…. आ …. ” मॉन्ट्याला काही सुचेनाच. तो भितीने गडबडुन गेला.

” आ…. आ…. काय…? मुकाय का…? ” वैनीसाहेब खेकसल्या.

” नाही…. आम्ही असंच आलो आहोत. ” रॉड्रीक अडखळत म्हणाला.

” असंच ? इथं काय जेवान हाय ? खरा बोला कोण आहात ? आणि इथं काय काम आहे ..? ” वैनीसाहेबांनी त्याना दरडावुन विचारलं. आता काय सांगणार ? रॉड्रीकला काही सुचेना . मॉन्ट्या काहीतरी सांगेल म्हणुन तो शांत उभा राहीला. मॉन्ट्याचीही तीच अवस्था होती . त्याला मनातुन भिती वाटत होती. त्या दोघांकडुन काही उत्तर येईना हे बघुन वैनीसाहेब पुन्हा खेकसल्या, ” अरे बोला की…? ”

” आ…. आ… आम्ही त्या रिक्षावाल्याबरोबर आलो होतो. आमचे पण पैसे आहेत त्याच्याकडे….! ” मॉन्ट्या घाबरत घाबरत म्हणाला.

” आयला, तुमचे बी पैसे खाल्ले काय ह्या हराम्यांनी….? ” वैनीसाहेब अस्लम आणि शौकतकडे बघत म्हणाल्या, ” काय रे ए , अजुन किती जणांचे पैसे खाल्लेत भाड्यांनो ? “

” नाय वैनीसाब, तेंचे पैसे नाय खाल्ले, कायपण बोलतो ! क्या बे तुम्हारा पैसा किदर खाया ….? ” अस्लमने तोडकं मोडकं मराठीत बोलण्याचा प्रयत्न केला पण नंतर हिंदीवर घसरला.

” नहीं. पैसा खाया नहीं । लेकीन वो नोट … ” मॉन्ट्या पुढे काही बोलणार पण रॉड्रीकने नजरेनेच त्याला शांत रहाण्यासाठी खुणावलं . ‘ आधीच ती नोट मिळत नाही , आणि त्यात ह्या गुंडांना आपल्याकडच्या पैशाबाबत कळलं तर माकडाच्या हाती कोलित दिल्यासारखं होईल. ‘ रॉड्रीकने विचार केला. त्याने खुणावल्याने मॉन्ट्या मधेच बोलायचा थांबला. त्याला पुढे काय बोलावं त्याला कळेना.

” काय… काय म्हनत होता रे तु ? ” वैनीसाहेबांनी ते बरोबर ओळखलं.

” आमचे रिक्षाचे पैसे राहीलेले सुट्टे पैसे ह्या अस्लमकडुन घ्यायचे होते, त्याबद्दल बोलतोय तो. ” रॉड्रीकने मधेच तोंड घातलं. आणि मॉन्ट्यानेही लगेच त्याला दुजोरा दिला. ” हां … हां .. तेच पैसे. ” त्यांचं वागणंच असं होतं की वैनीसाहेबांना त्यांचा संशय आलाच. इतक्यात त्या गुंडांच्या गँगमधला एक जण वैनीसाहेबांच्या जवळ आला आणि त्याने त्यांच्या कानात काहीतरी सांगितलं. ते ऐकल्यावर तर त्यांचा संशय आणखीनच बळावला. काहीतरी विचार त्यांनी केला.

” हं… सत्तु ह्या दोघांना पण घाल गाडीत… ” सत्तुला फर्मान सुटलं आणि तो ह्या दोघांकडे चाल करुन आला.

” ए… ए.. एक मिनीट , वैनीसाहेब आमचा काही संबंध नाही ह्या रिक्षावाल्याशी. प्लीज ऐकुन घ्या. ” मॉन्ट्या मागे मागे सरकत म्हणाला. सत्तु तसाच पुढे येऊ लागला.

” वैनीसाहेब आम्ही काही केलं नाही. ” रॉड्रीक म्हणाला. सत्तुने त्या दोघांच्या कॉलरला पकडलं. आणि त्यांना खेचुन घेऊन जाऊ लागला. त्याच्या हातुन सुटण्याचा प्रयत्न करणेच मुर्खपणाचे ठरले असते इतकी त्याची पकड घट्ट होती. आता क्षणात वातावरण इतकं बदललं की त्यावर कुणाचाच अंकुश राहीला नाही. सत्तु त्या दोघांना फरपटत घेऊन जात असतानाच रॉड्रीकची नजर खाली जमिनीवर पडली. मघाशी सत्तुने फेकलेल्या त्या दहा रुपयांच्या नोटांमधे त्याची ती गांधीजींची लाल रंगाच्या चष्म्याची नोट त्याला दिसली. ‘ ओह गॉड …. माय नोट ‘ तो एवढंच बोलू शकला . ज्या नोटेसाठी तो दिवसभर फिरफिर फिरला, त्या ती नोट समोर दिसत असुनही त्याला काहीच करता येत नव्हतं. आणि कुणाला सांगताही येत नव्हतं. महाकाय सत्तु त्यांना खेचुन घेऊन जात होता. त्या नोटेवरचे गांधीजी मिश्कीलपणे त्याच्याकडे पहात असल्यासारखे त्याला वाटले.

क्रमशः

https://kathakadambari.com

माझी अर्धदशक नावाची कादंबरी वाचण्यासाठी खाली लिंक दिली आहे

https://www.mehtapublishinghouse.com/book-details/ARDHADASHAK/3048.aspx

Amazon link

https://www.amazon.in/Ardhadashak-Milind-Mahangade/dp/9353174163/ref=sr_...

Flipkart Link

https://www.flipkart.com/ardhadashak/p/itm7149b4896e81d?pid=978935317416...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users