दिवाळीचा किल्ला

Submitted by Athavanitle kahi on 5 November, 2020 - 03:55

दिवाळीचा किल्ला

शाळेत असताना हमखास दिवाळीच्या आधी सहामाही परीक्षा असत. त्यामुळे ज्या दिवशी परीक्षा संपल्यानंतर त्या दिवशी किल्ला करायचा हे ठरलेले असायचे. शेवटच्या पेपर आवरून घरी आले, जेवलो की जे आम्ही बाहेर जात असू ते अगदी तिन्हीसांजेला भरपूर मळके कपडे घेऊन परत येत असू. सगळ्यात प्रथम सायकलवरून माती आणायला जाणे. घराजवळच एक डोंगर होता तिकडे खणून ती पोत्यांमध्ये भरून माती आणायची. त्यासाठी एखाद दुसरी प्लास्टिकची गोणी हेरून ठेवलेली असायची. कारण त्यावेळेस प्लास्टिकच्या मोठ्या पिशव्या, गोण्या हे सर्रास मिळत नव्हते. गल्लीतील मोठी मुले सांगतील तसं काम लहान मुलांनी करायचं हा अलिखित नियम. मुलींनी माती चाळणे, त्याचे गोळे तयार करणे, बाजूला रांगोळीसाठी गेरूने सारवणे ही कामे विभागलेली असायची. एका दिवशी दोन ते तीन किल्ले आमची टीम तयार करायची. आमच्या घरी किल्ला करायला परवानगी असल्यामुळे, आम्हाला जरा कन्सिडर केलं जायचं. मोठमोठे दगड जमवणे हे थोडं मेहनतीचं काम मोठी मुले करायची. बाकी वाड्यातील आजूबाजूला दिसणारे दगड खापऱ्या जमा करून एका ठिकाणी नेताना रामसेतू बांधणार्‍या माकडान प्रमाणे सगळ्या मुला मुलींचे आणि त्याच्यामध्ये खारीचा वाटा असणार्‍या लहान मुलांचे सगळ्यांचे हात कामाला लागायचे. एवढे काम झाले की मोठ्या मोठ्या गोष्टी सुरू होत आणि त्यावरून भांडणे होत. यावर्षी सिंधुदुर्ग करायचा, प्रतापगड करायचा का रायगड करायचा अशी चर्चा होई. प्रत्यक्षात मात्र वेगळाच किल्ला होत असे. आमच्या गल्लीमध्ये असे दोन ते तीन ग्रुप होते, त्यामुळे दुसर्‍या गृप पेक्षा आपल्या ग्रुपचा किल्ला चांगला कसा दिसेल ही चढाओढही असायची. किल्ल्यामध्ये बुरुज भुयार, कारंजी, विहीर, वाघाचा पिंजरा हे सगळे असले पाहिजे. शिवाय किल्ल्याच्या आजूबाजूला शेती हवी. किल्ल्यावरचे वर जाण्यासाठी खापराच्या पायऱ्या लावायचा. आणि शिवाजी महाराजांसाठी एखाद्या टाइल्सचा तुकडा मिळाला की राजसिंहासन व्यवस्थित झाले समजायचे. माती कालवायला घेतली की सगळ्यांचेच कपडे खराब होत. अगदी झोकून देऊन सगळी मुले काम करत असत. मला आठवते आहे एक वर्ष मी जाळीच जॅकेट असलेला फ्रॉक घातला होता त्या जाळीमधून आम्ही माती चालली होती. त्यानंतर घरी सक्त ताकीद असायची, किल्ला करायला जाताना जुने कपडे घालून जायचे. कपड्यां बरोबरच पाण्याची बादली, मग या गोष्टींही जुन्याच मिळू लागल्या. तरीही त्यात आनंद होता. आता दगड मांडून मग त्यावर मातीने लिंपून किल्ला आकार घेऊ लागलेल असायचा. आणि त्यातच एखाद्या मोठ्या बुरुजाच्या जागेवरून दोन मोठ्या दादांमध्ये मारामारी व्हायची. मग समजवा समजावी झाली तर ठीक. नाहीतर आमच्या ग्रुपचे दोन भाग होत असत. परीक्षा संपल्या असल्यामुळे तसं कोणी पालक विचारायलाही येत नव्हते, पण कोणाच्यातरी आजोबांची दुपारी झोप मोड झाली, म्हणूनही आता अर्धवट किल्ला ठेवून संध्याकाळी या असं सांगण्यात येई. अशा अनंत अडचणी असल्या तरीही आमचा उत्साह अजिबात कमी होत नसे. शेवटी संध्याकाळपर्यंत एका सुंदर कलाकृतीची निर्मिती आमच्याकडून होत असे. किल्ल्याच्या आजूबाजूची जागा गेरूने सारवायचे. रांगोळीसाठी वेगळा चौकोन ठेवायचा. एका बाजूला किल्ल्याची शेती विहीर कारंजी कसे तयार करायचे. त्यानंतर गेल्यावर्षीचे मावळे आणायचे. त्यातील काही मावळे मोडलेले असायचे मग त्यातल्या त्यात चांगले मावळे निवडायचं. शिवाजी महाराज चांगले हवे. एखाद-दोन मावळ्यां साठी पैसे मिळायचे मग शिलेदार आणायचा का बाजीप्रभू आणायचा यावरून पुन्हा चर्चा. किल्ल्यावर ती मग धान्य पेरणी करायची. तीन ते चार दिवसांमध्ये छोटी रोपे उगवत असत. रोज किल्ल्यावरती पाणी मारायचे काम हे आळीपाळीने ठरवले असायचे. एवढे होईपर्यंत रात्र व्हायची. कसे बारीक सारीक काम आणि मोडिफिकेशन दिवाळीच्या दिवसापर्यंत चाले. कारण आजूबाजूचे किल्ले पाहून नवीन काही गोष्टी सुचत असत. तरीही इतरांपेक्षा आपला किल्ला जास्त चांगला झाला आहे हे फिलिंग असायचं. हल्ली किल्ले विकतही मिळतात. पण त्यावेळेस किल्ला स्पर्धा ही होत असत. अशा स्पर्धा आजही होतात. आमचा किल्ला अगदी कमीत कमी खर्चा मध्ये असायचा. दिवाळीच्या दिवशी पहाटे किल्ल्यावरती पणत्या लावायच्या. बाजूला सुंदरशी रांगोळी काढायचे. त्या पहाटेच्या वेळी पण त्यांच्या प्रकाशामध्ये उजळलेला किल्ला खूप सुंदर दिसायचा.दिवाळीच्या त्यावेळेस किल्ल्याचा फोटो काढला गेला नाही. तरीही ते क्लिक आजही मनामध्ये जपलेलं आहे.
@CR आठवणीतले काही

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

बरं केलंत धागा काढलात.. मी ह्या वर्षी भाच्यांसोबत किल्ला बनवणार आहे.. फोटो टाकेन.. माबोवर दिवाळी निमित्त किल्ला बनवण्याची स्पर्धा नसते का?

धन्यवाद नीरो,

धन्यवाद म्हाळसा.
किल्ला बनवत की फोटो शेअर करा ह

छानच. आम्ही इंजिनियरिंगला असताना सरांची परवानगी काढून कॉलेजमध्ये एक किल्ला केला होता. ती मजा काही औरच!

मस्त आठवणी. छान लिहिलं आहेस. रेडिमेड किल्ल्याची मजा येत नाही. मातीत हात ,पाय, कपडे माखून जो काही किल्ला बनतो तो मस्त दिसतो.

सुंदर आठवण.
आम्ही आमच्या अंगणात किल्ला करत असू. एके वर्षी माझ्या काकांनी किल्ल्यावर सलाईनची बाटली टांगून ठिबक सिंचनाची आणि कारंजाची सोय करून दिली होती.
आकाश कंदील घरी तयार केलेला असायचा. तेव्हा मामाच्या गावात वीज नव्हती त्यामुळे त्या कंदीलाच्या आत पणती ठेवून तो कंदील उंच खांबावर लावला जायचा.