शिंपल्याचं दार

Submitted by ज्येष्ठागौरी on 2 November, 2020 - 09:49

शिंपल्याचं दार

मध्यंतरी The Crown नावाची वेब सिरीज बघितली.एलिझाबेथ राणीचा जीवन प्रवास त्यात अतिशय सुंदररीत्या चित्रित केला आहे.आपली दीडशे वर्षांची गुलामी मनात ठेवूनच सिरीज बघितली पण एक प्रवाही कादंबरी वाचते आहे असा भास झाला आणि त्या अनुषंगाने दुसरं महायुद्ध आणि इंग्लंडमधली तेंव्हाची परिस्थिती त्यावरचं भाष्य ह्या सगळ्यामुळे ही सिरीज फार चांगली झाली आहे. अभिनय वेशभूषा, नेपथ्य, रंगभूषा सर्वच अप्रतिम आहे उच्च दर्जाचं आहे ,अनेक बक्षीस ह्या मालिकेने मिळवली आहेत आणि क्लेअर फॉयच्या अभिनयाबरोबर लक्षात राहिली ती राणीची वेशभूषा आणि आणि तिच्या गळ्यातले मोती..पाश्चात्य देशांमध्ये मोती हा तिथल्या बायकांचा फार आवडता,fashion fades but style remains असं म्हणणाऱ्या विदेशी स्त्रिया!आणि आपण तरी काय अपवाद आहोत!मोत्यांना असणारा एक विशिष्ट भारदस्तपणा आणि उच्च अभिरुची आपल्याला नेहमी जाणवते, त्याचं सौन्दर्य वेगळंच असतं.they never fail!
आपल्याकडे मोत्याला नेहमी पूर्णतेचं आणि पावित्र्याचं प्रतिक समजतात.त्यामुळे आपल्या संस्कृतीत मोत्याला एक विशेष महत्व प्राप्त झालं आहे .बहुतेक बायकांकडे मोती असतात.कान टोचल्यावर जे कानात घालतात त्यातला एक छोटा मोती अगदी गोड असतो.अगदी तिसऱ्या वर्षी भाचीला परकर पोलकं शिवून आपल्याकडे हिरव्या मण्यांची ,मोत्याची दूड ही आत्यानंच घालायची असते.मोत्यांच्या दागिन्यांचा प्रवास असा सुरु होतो.चिंचपेटी,कंठा,तन्मणी अशी यादी वाढत जाते.
माझ्या आईला मोत्याचे दागिने आवडायचे,तिला छान दिसायचे आणि माझंही झुकतं माप मोत्याच्या जुन्या दागिन्यांना असतं.आई मोठ्या मोत्याच्या कुड्या घालायची,तिचा म्हणजे माझ्या आजीचा अक्कांचा तन्मणी फार देखणा आहे.आईनं मला तिच्या एका कुड्यांचा चौकडा करुन दिलाय. सासूबाईंच्या मोत्याच्या पाटल्या आणि माझ्या आजेसासूबाईंची वंशपरंपरागत नथ माझ्याकडे आली आहे.टपोरे मोती आणि खड्यांची सुबक जुळणी! खूप पूर्वीपासून मोत्याचं प्रेम आहेच आहे.लहानपणी मोत्याच्या माळा आवडीनं घातल्यामुळे आणि शिंपल्यात मोती असतो हे कोणीतरी सांगितल्याने, माझी,समुद्रकिनारी हे मोतीवाले शिंपले सापडतात का ते बघायची फार धडपड चालायची आणि परिणामी भरपूर संख्येनं बिन मोत्यांचे शंख शिंपले घरी जमायचे. असं मिथक आहे की स्वाती नक्षत्राचा पाऊस शिंपल्यात पडला की मोती,अळवावर पडला की कापूर आणि सर्पमुखी पडला की विष!आणि खगोलतज्ञ सप्तर्षी,हस्त चित्रा आणि स्वाती ह्यांना मोत्याची माळ म्हणतात!
शाळेत शास्त्र शिकताना कळलं की शिंपल्याच्या आत जर वाळूचा कण किंवा अन्य काहीतरी गेलं तर आतला जीव त्याभोवती एक स्राव सोडतो,म्हणजे त्या आगंतुक पदार्थाला नेकर nacre मध्ये गुंडाळून ठेवतो आणि तो स्राव कठीण होऊन मोती तयार होतो.तो खरा मोती, आणि त्या शिंपल्यात मुद्दाम काही कण घालून तयार होणारा कल्चर्ड आणि एक खोटा किंवा इमिटेशन मोती अशी त्याची उतरती भाजणी!
खरे मोती फार दुर्मिळ असतात म्हणून किंमतीही असतात, तसेच संवर्धित(cultured) मोतीही स्वस्त नसतात वगैरे गोष्टी कानावर पडल्यात , आजी ,आई, काकू ह्यांच्या बोलण्यातून.
मला मात्र ह्या सगळ्यातून भावली ती मोती तयार होण्याची प्रक्रिया. एखादी गोष्ट त्रास म्हणून वाट्याला आलेल्या परिस्थितीचं पूर्णतः रुप पालटून टाकणारा तो जीव.आपल्या आयुष्यातही कधी माणसं किंवा परिस्थिती,शारीर किंवा मानसिक दुर्बलता, त्रासदायक कणांसारखे घुसतात. काही लोक त्याच्याशी झगडत राहतात आणि काही त्याचा चक्क स्वीकार करुन मोती बनवून टाकतात.मोती आवडणारी माझी आई अगदी अशीच होती.आलेल्या त्रासदायक परिस्थितीला बिनतक्रार स्वीकारुन ती आपल्या जगण्याचा हिस्सा बनवून टाकायची.लहानपणी आई गेल्याचं दुःख,संसारातली अटळ दुःख, कष्ट,उपेक्षा,त्रास,मनस्ताप उतारवयातला पुत्रवियोग आणि
कर्करोगाच्या दोन शस्त्रक्रिया, त्यानंतरचे उपचार,त्याचबरोबर तिला जवळजवळ पूर्ण परावलंबी केलेला,दीर्घकाळ सोबत असणारा जबरदस्त संधिवात ह्या सगळ्याला तिनं इतक्या मोठ्या मनानी स्वीकारलं आणि त्याचा तिनं चक्क मोती बनवून टाकला,मंद शांत भारदस्त सौन्दर्य असलेला!प्रतिकाराची संधीही नसलेली संकटं.पण त्या गोष्टींचा स्वीकार तिनं केला आणि त्या परिस्थितीभोवती एक छोटं, चांगल्या भावनांचं,शहाणपणाचं, समजूतदारपणाचं वलय करुन टाकलं.सामान्यतः अशा वेळेला एक स्वतःची कीव करायची लाट येते आणि त्या संकटातून बाहेर पडल्यानंतर येणारा अहं सुदधा, पण त्याला तिनं पूर्ण नकार दिला.मागे एकदा माझ्या मैत्रिणींमध्ये असं बोलणं झालं होतं की ज्यांच्या वाट्याला खूप पराकोटीची दुःख येतात ,त्यांचं बाह्य सौन्दर्य आतली वेदना लपवताना उजळतं. आईचं मला वेगळं वाटलं, ते आणखी सौम्य शांत,भारदस्त वाटलं.ती उजळली पण शिंपल्याच्या आत मोत्यासारखीच!तिच्या चेहऱ्यावर अगदी सहज, नैसर्गिक असं समाधान होतं.एक वस्तुपाठ व्यक्तिमत्व म्हणून जिच्याकडे बघावं असं व्यक्तित्व बनली ती!She was a pure soul but she became more kind,more compassionate in later life.सामान्यतः म्हातारी माणसं जिथे कुरकूर सुरु करतात,त्या सुमारास हिचा प्रवास,दुखण्यांबरोबर शांतपणे सुरु राहिला.अगदी सहज, तिच्याही नकळत.
आत्यंतिक शारीरिक आणि मानसिक वेदनेला तोंड देताना तक्रारीचा शब्द नाही.तिनं तिच्या आयुष्यातल्या लढ्याबद्दल चार शब्दही लिहून ठेवले नाहीयेत कुठे.तिच्या शिंपल्याचं दार उघडलं तर तिच्या वेदनांचा मागमूस कुठे दिसणार नाही.त्याचा तिनं कधीच मोती तयार करुन ठेवला होता.शिंपला उघडला तर आत फक्त एक सौम्य सौन्दर्य,मौक्तिक तेज असलेलं पण शांत.अगदी सहज आणि अनमोल!
आईच नाही तर अशा किती व्यक्ती आपल्या आजूबाजूला असतात, ज्यांनी आपल्या आयुष्यात आगंतुक आलेल्या कणांना आवरणात ठेवून त्यांचे मोती तयार केले आहेत
माझ्या आजीला,आईच्या आईला मी कधी पाहिलं नाही पण पणजी पाहिली, अगदी मी कॉलेजला जाईपर्यंत भेटणारी मोठी आई, अशीच होती, तरुण वयात आलेलं वैधव्य आणि भला मोठा संसार ओढूनही,मला आठवते ती पणजी अशीच लखलखीत होती.
ह्या खरं तर सामान्य जीवन जगणाऱ्या पण असामान्य धैर्य आणि जीवनाचं अतिशय वेगळं सुंदर तत्वज्ञान असणाऱ्या स्त्रिया!अशा अनेक व्यक्ती( स्त्री पुरुष दोन्ही)आपल्या भोवती असतात.पण त्यांना आपण गृहीत धरत असतो. त्यांच्या वागण्याला आपल्या मापदंडानी तोलत असतो.त्यांचे हे वैयक्तिक पातळीवरचे लढे हे खूप काळ आपल्या लक्षात येतंच नाहीत. त्यांच्या ठायी असलेलं हे मौक्तिक तत्व आपल्याला दिसतंच नाही.जाणवत नाही.अर्थात मोती हे खोल समुद्रातच मिळतात हे आयुष्याच्या सुरुवातीला कळतंच नाही म्हणा आणि ती खोली गाठल्याखेरीज मोत्याची पारखही होत नाही.
शिंपल्याचं दार उघडतं तेंव्हा बाहेरच्या माणसाला आत कुठला कण गेला होता ते समजत नाही,इतकं सुंदर आवरण त्याला चढलेलं असतं. आणि ते दिखाऊ नसतं, आलेल्या त्रासदायक परिस्थितीला तोंड देण्याची एकदम वेगळी युक्ती म्हणा किंवा पद्धत म्हणा,असते ती,काहींना उपजत असते काहींना अनुभवांनी,काहींना परिपक्वपणानी येते. शिंपल्याचं दार उघडल्यावर दिसतं ते जीवनाचं खरं सौन्दर्य.कठीण काळाशी केलेले चार हात आणि ते इतके देखणे की दुसऱ्याला समजूही नये.
आता अशा अनेक शिंपल्यांची दारं मी उघडली आहेत.अगदी त्यांच्या नकळत!इतके सुंदर मोती आपल्या आयुष्यात रेशीम धाग्यात बांधले गेले आहेत ह्याची सुखद जाणीव झालीय.
Pearl is a healed woundअसं म्हणतात तेच खरं आहे.पण त्या मोत्याची किंमत ही खरोखरंच करता येत नाही.आधीपासून आवडणारा मोती आता अजून आवडायला लागला आहे.
Grit,Grace and Glory and Gratitude असलेली ही आयुष्यं!प्रत्येक कुटुंबात अशा समईच्या वाती असतात त्यामुळे अनमोल मोती अनुभवायचा असेल तर मात्र खोल समुद्रात जाऊन अगदी अलगद शिंपल्याचं दार उघडायलाच पाहिजे.
ज्येष्ठागौरी

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

सुरेख! मोत्याच्या तयार होण्याच्या प्रक्रियेची आयुष्यातल्या तापत्रयांशी घातलेली सांगड आवडली.

किती किती सुंदर लिहल आहेस.
मोती हे खोल समुद्रातच मिळतात हे आयुष्याच्या सुरुवातीला कळतंच नाही म्हणा आणि ती खोली गाठल्याखेरीज मोत्याची पारखही होत नाही.>>> +१००

खूप सुंदर लेखन , तुमच्या आई च्या व्यक्तिमत्त्वातून निर्माण झालेल्या मौल्यवान मौक्तिकास वंदन . >>> + ९९९

फार सुंदर.. मनाला भिडणारे लेखन..
मोत्याच्या तयार होण्याच्या प्रक्रियेची आयुष्यातल्या तापत्रयांशी घातलेली सांगड आवडली. >>> अगदी.. +१