निरांजने

Submitted by santosh watpade on 25 October, 2020 - 22:10

पुन्हा एकदा पेटली मध्यरात्री तिच्या पापणीआड निरांजने
पुन्हा मौनही बोलके होत गेले पुन्हा हिंदळू लागली काकणे...

कुणी टाकली नेमकी आज ठिणगी तिला ना कळे ..ना मलाही कळे
जळू लागले वैभवी रान सारे सुगंधीत झाली तिची राउळे..

फुलू पाहणार्‍या कळ्या मालतीच्या हळूवार स्पर्शामुळे लाजल्या
तमोधुंद पायातल्या साखळ्याही पुन्हा स्वैर होऊनिया वाजल्या...

कळ्यांची फुले शेवटी होत गेली फुलांची बनू लागली अत्तरे
मुके प्रश्न होते तरी वेदनेला मिळू लागली लाघवी उत्तरे...

निळेभोर आभाळ होते कधीचे ढगांनी अचानक भरू लागले
भिजू लागले श्वास ओथंबलेले जणू थेंब काही झरू लागले..

क्षणार्धात ओलावल्या पायवाटा तरी पावले चालली धावली
मिटू लागली पापणी वादळाची मिठीतून डोकावली सावली....

-- संतोष

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults