बांद्रा वेस्ट १

Submitted by मिलिंद महांगडे on 20 October, 2020 - 12:44

बांद्रा वेस्ट १

बोरीवलीला जाणारी शेवटची लोकल धडाडत बांद्रा स्टेशनमधे शिरली. मध्यरात्रीच्या १.३१ च्या त्या लोकलने एकजण बांद्रा स्टेशनवर उतरला, काहीसा धडपडतच..! तो बांद्रा स्टेशनवर उतरला खरा , पण त्याला नक्की समजेना आपण कुठे आहोत ! नेहमी एक नंबर प्लॅटफॉर्मवर येणारी ट्रेन आज तीन नंबर प्लॅटफॉर्मवर आली होती. ' अरे यार....!!! ' वैतागुन त्याने तोंड वाकडं केलं. बांद्रा स्टेशनवर तुरळक माणसे होती , अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील इतकी. हॉर्न देऊन लोकल पुढच्या स्टेशनकडे निघाली. धडाक - धडाक करत लोकल गेली . तो तसाच प्लॅटफॉर्मवर उभा राहीला. भन्नाट वेगात असलेल्या लोकलच्या मागुन जाणाऱ्या वाऱ्याच्या झोतात तो काही वेळ तसाच उभा होता. थंडगार वारा चेहऱ्यावर आल्याने त्याला जरा बरं वाटलं. ' आता निघालं पाहीजे. ' त्याने कदाचित विचार केला आणि पावलं अडखळत ब्रिजकडे वळली. पायऱ्या चढतानाही तो थोडासा धडपडलाच. ' शिट… ! आज जरा जास्तच झाली. त्या साल्या मॉन्ट्याला काय अक्कल नाही.... स्टूपीड , इडियट , रास्कल ! शेवटचा शेवटचा करुन पाच पेग झाले. बास...! आता उद्यापासुन दारु बंद...! ' मनाशी पक्का निर्धार करुन तो अतिशय कष्टाने पायऱ्या चढु लागला. वर पोहोचल्यावर अापण अगदी एवरेस्ट चढुन आलोय असं वाटुन तो धापा टाकु लागला... ' व्हॉट द हेल … ! काय साले हे लोक किती उंच ब्रिज बांधतात...? ' तो मनातल्या मनात त्या ब्रिज बांधणाऱ्या कोण कुठल्या इंजिनीयरला शिव्या घालु लागला. खरं तर अगदी निरर्थकच होतं ते....! पण त्याला तसं केल्यामुळे जरा बरं वाटु लागलं. त्याच धुंदीत तो निघाला. बारमधली गाणी गुणगुणत तो प्लॅटफॉर्म नंबर एकवर उतरणाऱ्या पायऱ्या अंगाला झोके देतच उतरु लागला. सगळ्या पायऱ्या उतरून झाल्या. हुश्श...! स्टेशनबाहेर पडणार इतक्यात...
" ए हिरो. , कुटं चाल्लाय यवड्या रात्री...? " एक खडा आवाज त्याच्या कानी पडला अन् थोडं चमकुन त्यानं त्या दिशेला पाहिलं. समोर खाकी घातलेला ' मामा ' हातात दांडुक घेऊन त्याला विचारत होता.
" नमस्कार साहेब... " दोन हातांचा कोपरापासुन नमस्कार घालुन तो अगदी सावधान स्थितीत उभा राहीला . त्याच्या ह्या कृतीचं खरं तर हवालदाराला हसुच आलं. तो त्याला खालुन वर न्याहाळु लागला . पायात लाल कॅनवास शुज, वर जीन्स, त्यावर चेक्सचा अर्धी इन बाहेर आलेला फुलशर्ट, त्याच्या बाह्या दुमडलेल्या , गळ्यात लटकणारे इयरफोन., उभट चेहरेपट्टी, खुरटी दाढी , तशीच मिशी, गव्हाळ वर्ण.. पेंगुळलेले डोळे... आणि विस्कटलेले केस अशा अवतारात तो हवालदारासमोर उभा होता.
" काय रे ए.... नाव काय तुझं....? " हवालदाराने त्याच आवाजात विचारलं.
" रॉ ... रॉ....रॉड्रीक " त्याने अडखळत उत्तर दिले.
“ पूर्ण नाव सांग ” हवालदाराने दरडावून विचारलं
“ रॉड्रीक जोसेफ डिमेलो साहेब ” एकदम सरळ उभा रहात त्याने उत्तर दिले .
हवालदाराने पुन्हा एकवार त्याला वरखाली न्याहाळले. त्यालाही जरा समोरच्या त्या पिलेल्या तरुणाची खेचण्याची इच्छा झाली.
" कुटं रातोस ? "
" बांद्र्यालाच... " का ... कार्टर रोडला... "
" एवड्या रात्री कुटुन आलायस....? "
" साहेब, आज माजा वाढदिवस होता ... मित्राने पार्टी ठेवली होती . बाकी काय लफडा नाय .... खरा बोलतो... " रॉड्रीक गळ्याला चिमटा काढून शपथ घेत हवालदाराला स्पष्टीकरण देऊ लागला.
" किती वर्षाचा घोडा झालास...? "
त्याला लवकर आठवेनाच. ! थोडा मेंदुला ताण दिल्यासारखं केल्यावर त्याची ट्युब पेटली... " २७ साहेब... २७... "
" ठिकाय ... ठिकाय... इथुन सरळ घरी जायचं... मदीआदी कुटं थांबायचं नाय ... काय..? चल निघ.... " हवालदारानेही जास्त ताणलं नाही.
" थँक्यु .. साहेब... " जाताजाता रॉड्रीकने त्या हवालदाराला सलाम केला. आणि बाहेर येऊन सुटकेचा निश्वास सोडला... ' सालं बरं झालं जास्त काय झालं नाही...ह्या मामालोकांचा काय भरवसा नाय... ' तो मनातल्या मनात म्हणाला आणि रिक्शा कुठे दिसते का ते पाहु लागला... त्याच्या सुदैवाने एक रिक्शा तिथं उभी होती...
" रिक्शा.... कार्टर रोड ... " त्यालाही कदाचित लगेच निघायचे होते. मीटर डाउन करुन त्याने लगेचच रिक्शा सुरु केली. रात्रीच्या शांततेला चिरत रिक्शा निघाली... रस्त्यांवरची वळणे घेत रिक्षा चालली . एस्सल वर्ल्ड मधल्या एखाद्या राईडवर बसल्यासारखं त्याला वाटलं . डोळे मिटून तो दारूच्या नशेत इकडून तिकडे अन तिकडून इकडे डुलत होता . त्याची चांगलीच तंद्री लागली होती . कार्टर रोड कधी आलं त्याला कळलंच नाही....
" साब... आ गया... " रिक्शावाला त्याला सांगत होता...
“ क्या आगया … ? ” डोळे न उघडताच तो बोबड्या सुरत म्हणाला .
“ कार्टर रोड आ गया साब …”
“ इतना जल्दी कैसे आया ? अभी तो रिक्षा मै बैठा … ! “ रिक्षावाला कदाचित आपल्याला फसवत तर नाही ना ? असा त्याला प्रश्न पडला असावा . ह्या रिक्षावाल्यांचं काय खरं नाही .
“ अरे बाबा, सच्ची आ गया , बाहर देखो “ हे ऐकल्यावर एकदम झोपेतुन जागा झाल्यासारखा तो उठला... कसाबसा रिक्शाबाहेर पडला. प्रथमच त्याने बारीकसे डोळे उघडले आणि ते परत मिटत त्याने मागे पाकिटाला हात घातला " कितना हुआ...? "
"साठ हुआ... "
पाकीट चाचपुन त्याने कशीतरी १०० ची नोट काढली आणि रिक्शा वाल्याच्या हातात टेकवली...
" छुट्टा दो ना साब... " रिक्षावाल्याने आपले नेहमीचे वाक्य रॉड्रिकच्या अंगावर फेकले. रिक्षा चालवायला शिकायच्या आधी ह्या लोकांना सुट्ट्या पैशाचा हा डायलॉग शिकवत असावेत . ह्या रिक्शावाल्यांना अगदी टांकसाळीचे मालक केले तरी हे सुट्टे मागणारच...! वैतागुन त्याने बाकीचे खिसे तपासले...
" नै यार..."
" दस रुपय है क्या ....? पचास है मेरेपास.... " रिक्शावाल्याने शेवटचा प्रयत्न केला... आयला काय वैताग आहे म्हणुन रॉड्रीकने पुन्हा जिन्सच्या मागच्या खिशातुन पाकीट काढलं आणि त्यात तो सुट्टे पैसे शोधू लागला . शोधता शोधता आतल्या चोरकप्प्यात सांभाळुन ठेवलेली " ती " दहा रुपयाची नोट रिक्शावाल्याच्या हातात ठेवली... पण त्यावेळी त्याला कुठे माहीत होतं की दारुच्या नशेत त्याच्या आयुष्यातली सर्वात मोठी घोडचुक ठरणार आहे ती....!!! oh Rodrik you have made big mistake !!!

क्रमशः

माझी वेबसाईट - एकदा नजर टाका
https://kathakadambari.com

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नमस्कार मिलिंद.
तुम्ही मराठी भाषिक दिसता. कथा मराठीत आहे. मराठी वाचकांसाठी आहे. मराठी माध्यमावर प्रकाशित केली आहे.
असे असताना गावाचे नाव, परभाषेतील अपभ्रंश नाव का वापरले आहे?
कृपया, शीर्षकामधे मुळ मराठी नाव वांद्रे वापरावे.

@अभि_नव
आपल्या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे आणि त्याचा आदर करतो . परंतु कथेचा नायक ख्रिश्चन आहे . त्याची भाषा सुद्धा इंग्लिश मिश्रित मराठी आहे . त्याच्या आजूबाजूची परिस्थिती ह्यांचा विचार केला आणि कथा आणखी खरी , सद्य स्थितीस धरून असावी , असे वाटले . कथेच्या पात्रांच्या तोंडची भाषासुद्धा इंगजी , हिंदी आणि मराठी मिश्रित आहे . त्यामुळे नाव तसे आले आहे . आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद