गरम आणि ‘ताप’दायक

Submitted by कुमार१ on 18 October, 2020 - 02:06

सस्तन प्राणी या वर्गानुसार आपण प्राणिमात्रांत उत्क्रांतीच्या सर्वोच्च पातळीवर आहोत. पृथ्वीवर आपण वेगवेगळ्या खंडांत राहतो. विशिष्ट खंडानुसार आपल्या सभोवतालचे तापमान ऋतूनुसार बदलते असते. कडाक्याच्या थंडीतील उणे ४० C ते भर उन्हाळ्यातील ५२ C हून अधिक, एवढा त्याचा व्यापक पल्ला आहे. आपण बाह्य तापमानाच्या एवढ्या विविधतेने गुरफटलेले असूनही आपल्या शरीराचे तापमान मात्र कायम स्थिर असते. शरीरातील विशिष्ट दमदार यंत्रणेमुळे आपल्याला हे अचंबित करणारे वैशिष्ट्य मिळाले आहे. निरोगी अवस्थेत आपण आपले तापमान सरासरी ३७ C ( ९८.६ F) इतके ठेवतो. विविध आजारांमध्ये हे तापमान वाढते. काही प्रसंगी ते कमीही होऊ शकते. ताप येणे हे बऱ्याच आजारांचे प्राथमिक व महत्त्वाचे लक्षण असते. त्याबाबत आपण संवेदनशील असतो. ताप येण्याची प्रक्रिया समजण्यासाठी आधी आपले तापमान नियंत्रण समजून घेणे इष्ट आहे. त्यासाठीच हा लेख.
या लेखात निरोगी शरीराचे तापमान व त्याच्या मापन पद्धती, त्यातील नैसर्गिक बदल आणि आजारांमध्ये होणारे चढ-उतार याचा आढावा घेतो.

तापमान मोजण्यासाठी दोन मापनांचा वापर प्रचलित आहे.

C = Celsius व
F = Fahrenheit
यातील C चे अंक हे वापरायला आणि लक्षात ठेवायला सोपे असल्याने या लेखात फक्त त्यांचाच वापर करेन.
इथे एक लक्षात घ्यावे की शरीर तापमान हे एकाच अंकावर स्थिर नसते. 24 तासांच्या कालावधीत त्यामध्ये मर्यादित चढ-उतार होत असतात. तसेच आपण शरीराच्या कुठल्या भागात ते मोजत आहोत, यानुसारही मापनाचे अंक बदलतात.

temp therrmo.jpgशरीराचे तापमापन
हे नेहमी चांगल्या दर्जाच्या वैद्यकीय तापमापकाने करावे. शरीराच्या विविध भागात तापमान हे थोडेफार भिन्न असते. प्रथम हा फरक समजून घेऊ.

१. तोंड : तोंडाच्या आतील तापमान हे सरासरी 37 डिग्री C असते.
२. काख: इथले तापमान तोंडापेक्षा अर्धा डिग्री C ने कमी असते.
३. शरीरगाभा : इथले तापमान तोंडातीलपेक्षा अर्धा ते एक डिग्री C ने अधिक असते. हे मोजायचे झाल्यास तापमापक अन्ननलिका, गुदद्वार किंवा योनीत ठेवावा लागतो.

निरोगी अवस्थेतही आपले तापमान काही कारणांमुळे थोडेफार कसे बदलत असते ते आता पाहू.
१. चोवीस तासांचा कालावधी : या संपूर्ण कालावधीत तापमान ३६.३ – ३७.३ C या टप्प्यात बदलत राहते. पहाटे ४ च्या वेळेस ते सर्वात कमी तर संध्याकाळी ६ च्या सुमारास सर्वाधिक असते.

२. वय : एक वर्षाच्या आतील बाळात तापमान थोडे जास्त असते आणि बर्‍यापैकी अस्थिर असते. कारण त्यांच्या संबंधित नियंत्रक यंत्रणा पूर्णपणे विकसित नसतात. तसेच म्हातारपणी तापमान प्रौढांपेक्षा काहीसे कमी असते.

३. व्यायाम : हा करीत असताना त्याच्या तीव्रतेनुसार तापमान १-२ C ने वाढू शकते.

४. लिंगभेद : स्त्रियांमध्ये चयापचयाची गती पुरुषांच्या तुलनेत कमी असल्याने त्यांचे तापमान थोडे कमी असते.
५. स्त्रियांचे मासिक ऋतुचक्र : या चक्रामध्ये हॉर्मोन्सचे चढ-उतार होत असतात. त्यापैकी प्रोजेस्टेरॉन हे हार्मोन तापमान वाढवणारे असते. मासिक चक्राच्या साधारण मध्यावर ovulation ही घटना होते. त्या दिवशी सकाळी झोपेतून उठल्यानंतरचे तापमान वाढलेले असते. या दिवसानंतर पुढे चक्राच्या दुसऱ्या संपूर्ण टप्प्यात शरीर तापमान ३६.७ – ३७.२ या वाढीव टप्प्यात राहते.

६. अन्नग्रहण : विशेषतः प्रथिनयुक्त आहारानंतर तापमान थोडे वाढते.
७. भावना : भावनिक आंदोलनानंतर तापमान वेळप्रसंगी २ डिग्री C पर्यंतही वाढू शकते.

शरीरातील विविध प्रकारच्या प्रक्रियांमुळे उष्णता निर्माण होते. या उष्णतेतील काही भाग आपले तापमान स्थिर राखण्यासाठी वापरला जातो. याव्यतिरिक्त जी उष्णता असते ती विविध प्रकारे शरीराबाहेर टाकली जाते. अशा प्रकारे उष्णतेचा समतोल राखला जातो. उष्णतेचे निर्मिती आणि तिचे उत्सर्जन याचे मार्ग आता समजून घेऊ.

उष्णता निर्मिती :
ही खालील क्रियांमुळे होते:

१. चयापचयातील क्रिया : यामध्ये प्रथिनांचा वाटा सर्वाधिक असतो.
२. व्यायाम : याच्या प्रमाणानुसार उष्णता निर्मिती होते.
३. शरीराची थरथर : आपल्या नकळत होणाऱ्या स्नायूंच्या आकुंचनामुळे ही उष्णता निर्मिती होते. थंडीच्या दिवसात ही खूप उपयुक्त ठरते.
४. याव्यतिरिक्त वातावरणातील विशिष्ट सूर्यलहरी आणि काही आकाशलहरीपासूनही आपल्याला उष्णता प्राप्त होते.

उष्णतेचे उत्सर्जन :
हे खालील मार्गांनी होते :

१. आपली त्वचा आणि सभोवतालच्या वातावरणातील तापमानात फरक असतो. ज्या प्रमाणात हा फरक असेल त्यानुसार त्वचेतून उष्णता सतत उत्सर्जित होत राहते.

२. बाष्पीभवन : यात शरीरातील पाणी बाष्परूपात बाहेर पडते. या उत्सर्जनाचे मार्ग असे आहेत :
a. त्वचेद्वारा : इथल्या घर्मग्रंथींच्याद्वारा बाष्प बाहेर पडते. यालाच आपण घाम म्हणतो. जेव्हा शरीर तापमान नेहमीपेक्षा वाढू लागते तेव्हा घामाद्वारा अतिरिक्त उष्णता बाहेर टाकली जाते. उन्हाळ्याच्या दिवसात हे काम अत्यंत महत्त्वाचे ठरते.

b. आपल्या उच्छ्वासातून.

थंडी आणि उन्हाळा या दोन भिन्न ऋतूंमध्ये आपण उष्णतेचे उत्सर्जन आणि निर्मिती यांच्यावर बाह्य घटकांतून प्रभाव पाडतो. थंडीत आपल्याला शरीरातील उष्णता टिकवायची असते. म्हणून आपण उबदार कपडे घालतो आणि गरजेनुसार आपले घर गरम करतो. बरोबर याउलट उन्हाळ्यात घडते. तेव्हा बाहेरील उष्णता शरीराला मिळू न देणे महत्त्वाचे असते. म्हणून आपण कमी व सैलसर कपडे घालतो आणि आपले घर थंड करतो.

उष्णतेची निर्मिती आणि उत्सर्जन या दोन्ही क्रिया मेंदूतील हायपोथॅलॅमस या ग्रंथीच्या नियंत्रणात असतात. तिचे कार्य आता समजून घेऊ.

हायपोथॅलॅमसचे कार्य

tem hypo.jpg

या ग्रंथीत तापमानसंवेदी चेतातंतू असतात. त्यातले काही तंतू उष्णसंवेदी तर काही शीतसंवेदी असतात. नेहमी या दोघांच्या समन्वयातून तापमानाचा प्रमाण बिंदू ३७ C वर स्थिरावतो. जेव्हा वातावरणातील तापमानामुळे शरीर तापमान वाढू किंवा कमी होऊ पाहते, तेव्हा तिथे विशिष्ट घडामोडी होतात आणि तापमान प्रमाण बिंदूवर नियंत्रित केले जाते.
उन्हाळा व हिवाळा या दोन्ही ऋतुत इथे कशा विरोधी घडामोडी होतात ते आता सविस्तर पाहू.

उन्हाळा :
या ऋतूत बाह्य तापमान शरीरापेक्षा खूप जास्त असते >> त्वचा, अवयव आणि रक्तामधून या ग्रंथीला संदेश जातात >> उष्ण चेतातंतू ते संदेश स्वीकारतात >> आता उष्णतेचे उत्सर्जन वाढवणे आणि निर्मिती कमी करणे असे दुहेरी उद्दिष्ट ठरवले जाते. उत्सर्जन वाढवण्यासाठी खालील गोष्टी होतात :

१. त्वचेकडील रक्तप्रवाह वाढतो आणि तिथल्या वाहिन्या प्रसरण पावतात.
२. घामाचे प्रमाण खूप वाढते
३. श्वसनगती काहीशी वाढते. त्यामुळे अधिक बाष्प बाहेर पडते.

त्याच बरोबर उष्णता निर्मिती कमी होण्यासाठी या घडामोडी होतात :
१. स्नायूंचा टोन कमी होतो
२. काही हार्मोन्सच्या प्रक्रियांमधून आपली भूक आणि चयापचय मंद केला जातो.
३. आपल्याला थंड पाणी पिण्याची आणि थंड हवामानात जाण्याची इच्छा निर्माण होते.

हिवाळा

या ऋतूत बाह्य तापमान शरीरापेक्षा खूप कमी असते >> त्वचा, अवयव आणि रक्तामधून या ग्रंथीला संदेश जातात >> शीत चेतातंतू ते संदेश स्वीकारतात >> आता उष्णतेची निर्मिती वाढवणे आणि उत्सर्जन कमी करणे असे दुहेरी उद्दिष्ट ठरवले जाते. निर्मिती वाढवण्यासाठी खालील गोष्टी होतात :
१. शरीराची थरथर वाढते.
२. स्नायूंचा टोन वाढतो
३. थायरोइड आणि अड्रीनल ग्रंथींच्या हार्मोन्सच्या प्रक्रियांमधून आपली भूक आणि चयापचय वाढवले जातात.
४. आपल्याला गरम पेये पिण्याची आणि उबदार हवामानात जाण्याची इच्छा निर्माण होते.

याचबरोबर उत्सर्जन कमी करण्यासाठी खालील गोष्टी होतात :
१. त्वचेकडील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि त्यामुळे रक्तप्रवाह कमी होतो.
२. शरीर आक्रसून घेतले जाते.
३. आपण उबदार कपडे घालतो.

आतापर्यंत आपण निरोगी अवस्थेतील तापमान नियंत्रण समजून घेतले. विविध आजारांमध्ये हे नियंत्रण बिघडते आणि त्यामुळे तापमान जास्त किंवा कमी होते. वाढून राहिलेल्या तापमानाला आपण “ताप आला” असे म्हणतो. त्याची कारणमीमांसा आता पाहू.

ताप येण्याची प्रक्रिया
जेव्हा शरीर तापमान ३८ C च्यावर टिकून राहते त्या अवस्थेला ताप (fever)असे म्हणतात. त्याच्या मापनानुसार त्याचे वर्गीकरण असे आहे :
* तापमान ३८ – ३९ सौम्य
* ३९ – ४० मध्यम
* ४० – ४२ उच्च
* >४२ तीव्र (hyperpyrexia)

इथे एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो. जेव्हा आपल्याला ताप आला आहे की काय याबद्दल साशंकता वाटते, तेव्हा बऱ्याचदा आपण दुसऱ्या व्यक्तीला आपल्या कपाळावर हात ठेवून पाहण्यास सांगतो. ही अत्यंत सामान्य स्वरूपाची चाचणी आहे आणि ती संवेदनक्षम नाही. कित्येकदा शरीराचे मोजलेले तापमान 39 C चे वर असतानादेखील कपाळ गरम लागत नाही. असे बऱ्याच रुग्णांचे बाबतीत दिसून येते. तेव्हा तापाची खात्री करण्यासाठी ताप प्रत्यक्ष मोजणे हे महत्त्वाचे आहे.

ताप येण्याची महत्त्वाची कारणे :
१. जंतुसंसर्ग: यात प्रामुख्याने जीवाणू व विषाणूच्या आजारांचा समावेश आहे.
२. थायरॉईड हार्मोन्सचे अधिक्य
३. हायपोथॅलॅमसचे आजार
४. दीर्घकाळ प्रखर उष्ण हवामानाला सामोरे जाणे.

यापैकी जंतुसंसर्गाने येणारा ताप ही नित्याची घटना आहे. आपण सर्वांनी ती आयुष्यात कधी ना कधी अनुभवलेली असते. म्हणून त्याची मीमांसा करतो.
१. सूक्ष्मजंतू त्यांचे विष शरीरात सोडतात
२. त्याचा प्रतिकार रक्तातील पांढऱ्या पेशी करतात
३. या दोघांच्या लढाईतून काही तापजनक रसायने (pyrogens) सोडली जातात.

४. ही रसायने हायपोथॅलॅमसमध्ये पोचतात आणि तिथल्या चेतातंतूंना सतत उत्तेजित करतात.
५. त्यातून काही रासायनिक घडामोडी होऊन तापमान नियंत्रक बिंदू वरच्या पातळीवर नेला जातो.
६. म्हणजेच शरीर तापमान वाढते = ताप येतो

जंतुसंसर्गामुळे येणारे ताप हे मर्यादित काळापुरते (साधारण ४-१० दिवसांपर्यंत) टिकतात. एखाद्याला आलेला ताप दोन आठवड्यांनंतर देखील हटलेला नसेल, तर मात्र अशा तापाची गूढ कारणे शोधावी लागतात आणि त्यासाठी शरीराच्या सखोल तपासण्या कराव्या लागतात. अशा काही कारणांपैकी कर्करोग हे एक महत्त्वाचे कारण आहे.

विविध आजारांनुसार तापाची काही वैशिष्ट्ये असतात. काही आजारांमध्ये तापाच्या जोडीने रुग्णाला खूप थंडी वाजते. काहींमध्ये रात्री भरपूर घाम येतो. काही ताप सलग स्वरूपाचे असतात. तर अन्य काहींमध्ये दिवसरात्रीच्या चक्रानुसार तापमानाचे कमी-अधिक चढ-उतार होत राहतात. रुग्णाच्या अशा लक्षणांकडे बारकाईने लक्ष दिल्यास रोगनिदानास चांगली मदत होते.
तापामुळे आपल्या शरीरामध्ये अन्य काही बदल देखील घडतात. ते असे आहेत :

१. चयापचयाची गती बऱ्यापैकी वाढते. त्यामुळे अधिक ऊर्जा खर्ची पडते. त्यातून रुग्णास अशक्तपणा येतो.
२. हृदयाच्या ठोक्यांची गती आणि रक्तदाब दोन्ही वाढतात
३. श्वसनाची गती देखील वाढते.
४. भूक मंदावते आणि तापाच्या प्रमाणानुसार डिहायड्रेशन होते.

जंतूसंसर्गातून येणारा ताप हा एक प्रकारे शरीराच्या प्रतिकार शक्तीचा एक भाग असतो हे वर स्पष्ट झाले असेल. मात्र वाढता ताप हा रुग्णाला नक्कीच अस्वस्थ करतो. यासंदर्भात एक मूलभूत प्रश्न असा उपस्थित होतो, की अशा प्रसंगी आलेला ताप खरेच फायदेशीर असतो का ? हा बराच क्लिष्ट व वादग्रस्त विषय आहे. जुन्या थिअरीनुसार त्याचे उत्तर ‘हो’ असे होते. परंतु, नवीन संशोधनानंतर आलेल्या थिअरी नुसार ते उत्तर ‘नाही’ कडे झुकलेले आहे.
आता थोडक्यात या दोन्ही थिअरीज समजून घेऊ.

जुन्या थिअरीनुसार ताप फायदेशीर असतो कारण –
१.त्याच्यामुळे रक्तप्रवाहाची गती वाढते. त्यामुळे लढाऊ पांढऱ्या पेशीना संसर्गाच्या जागेवर जायला मदत होते. तसेच त्यांची मारक शक्तीही वाढते.
२.चयापचय वाढल्याने पेशींमधील दुरुस्ती प्रक्रिया वेगाने होतात.
३. काही प्रमाणात जंतूंचे पुनरुत्पादन कमी होऊ शकते

कालौघात या जुन्या थिअरीवर खूप काथ्याकूट झाला आणि तिला आव्हानही दिले गेले. त्यात म्हटल्यानुसार विविध मुद्यांसाठी ठोस पुरावे मात्र देता आले नाहीत. त्यामुळे ती मागे पडली.

नव्या थिअरीनुसार घडामोडी अशा असतात :
१. तापामुळे शरीरातील दाहप्रक्रिया वाढते.
२. चयापचयाची गती वाढल्यामुळे त्याचा शरीरावर एक प्रकारे ताण पडतो. त्यातून रुग्णाची अधिक ऊर्जा खर्ची पडते. जर का रुग्णाला हृदय किंवा श्वसनाचा दीर्घकालीन आजार पूर्वीच असेल, तर हा वाढलेला ताण त्रासदायकच ठरतो.

३. ताप जर आठवड्यातून अधिक काळ टिकून राहिला तर शरीरातील नाइट्रोजन आणि पाणी यांचा समतोल बिघडतो. डीहायड्रेशनही होऊ शकते.
४. तापातून मज्जासंस्थेला इजा पोहोचून फिट्स येऊ शकतात.

या सर्व मुद्यांचा साकल्याने विचार करता आता असा दृष्टीकोण ठेवावा लागतो. जंतूसंसर्गानंतर ताप येणे ही अटळ घटना आहे खरी, परंतु एका मर्यादेवरील ताप हा शरीरासाठी योग्य नाही. त्यामुळे तो औषधांच्या वापराने नियंत्रित केला पाहिजे.

अतितीव्र ताप आणि उष्माघात

शरीराचे तापमान 43 C च्या वर जाणे अत्यंत घातक आहे. तीव्र उन्हाळ्यात व दमट वातावरणात जर प्रत्यक्ष श्रमाचे काम बराच वेळ केले, तर त्यातून मृत्यू उद्भवू शकतो. अशा वातावरणात शरीरातील उष्णतेचे उत्सर्जन होत नाही. त्याचबरोबर शरीरातील पाणी व सोडियम निघून जातात परिणामी रक्ताभिसरण कोलमडते.
काही देशांमध्ये तीव्र उन्हाळ्यामध्ये जेव्हा बाह्य तापमान ५० C चे वर जाते तेव्हा उघड्यावर काम करणाऱ्या श्रमजीवी व्यक्तींना सक्तीने सुट्टी जाहीर करण्याचे कायदे केलेले आहेत .
. . .
वातावरणातील तापमानात कितीही टोकाचे चढ-उतार झाले तरी मानव आणि काही सस्तन प्राणी त्यांचे अंतर्गत तापमान स्थिर ठेवतात. हे निसर्गाने त्यांना दिलेले एक मोठे वरदान आहे. हे तापमान स्थिर राखण्यासाठीच्या शरीरातील यंत्रणांची माहिती आपण या लेखाद्वारे करून घेतली. विविध जंतूसंसर्गामध्ये ताप येण्याच्या घटना नित्याच्याच आहेत. त्याचीही प्राथमिक माहिती या लेखात करून दिली आहे. अशा ‘ताप’दायक घटना आपल्या आयुष्यात कमीत कमी वेळा येवोत, या शुभेच्छेसह समारोप करतो.
……………………………………………………………………………………………….

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेख डॉक्टर. आमचे लहान मुलांचे डॉक्टर १०० अंश F च्या वर ताप गेला तर औषध द्या असंच नेहमी सांगतात. १०० च्या खाली असलेल्या तापाला ते सीरियसली घेत नाहीत (१/२ दिवसच असेल तेव्हा)
एक विनंती आहे. एरवी आपण सेल्सिअस वापरत असलो तरी ताप मोजण्यासाठी फॅरनहाइट वापरायची सवय पहिल्यापासून आहे. त्यामुळे कृपया कंसात तेही आकडे द्याल का?

उत्तम लेख.

शरीराचे तापमान मोजायचे असल्यास सर्वात अचूक मोजमाप हे गुदद्वारात होते असे वाचनात आहे. तिथे ते सर्वात अचूक का व कसे?

सर्वांना धन्यवाद.
वावे,
C चे F मध्ये रूपांतर जालावर अगदी सहज करून मिळते. म्हणून मी तो जाणीवपूर्वक आळस केलेला आहे !
पण आता तुमच्या सूचनेनुसार सवडीने बघतो.

मानव
शरीराच्या गाभ्यामध्ये काय तापमान आहे हे सर्वात महत्त्वाचे असते आणि इथले तापमान लेखात वर्णन केलेल्या हायपोथॅलॅमस यंत्रणेशी थेट निगडित असते. म्हणून त्याचे महत्त्व आहे. अर्थात व्यवहारांमध्ये सुलभतेचा भाग अधिक राहतो. त्यामुळे आपण तिकडे फारसे लक्ष देत नाही.

मी याबद्दल आधी विचारलं होतं. खूपच नवी माहिती मिळाली.

व्यक्तिपरत्वे तसेच ऋतुमानानुसार शरीराचे'सामान्य' तापमान बदलते का?

व्यायामाप्रमाणेच शारीरिक श्रम केल्यानेही तापमान वाढत असावे. ते वेगवेगळ्या अवयवांत कमीअधिक वाढते का?

हा प्रश्न बिन्डोक वाटू शकतो. पण गेले काही दिवस डोक्यात फिरतो आहे. हाताने काम केल्यावर हाताचे तापमान इतर भागांपेक्षा अधिक तर चालणे, धावणे केल्यावर पायांचे तापमान अधिक असे होऊ शकते का?

भरत,
१. व्यक्तिपरत्वे तसेच ऋतुमानानुसार शरीराचे'सामान्य' तापमान बदलते का? >>
वयपरत्वे व लिंगपरत्वे तापमानातील फरक लेखात दिलेच आहेत. व्यक्तिपरत्वे ३६.३ -ते ३७.३ दरम्यान फरक असतात.

२. ऋतुमानानुसार >>> नाही. म्हणून तर आपण ‘उष्ण’रक्त प्राणी आहोत.

३. व्यायामाप्रमाणेच शारीरिक श्रम केल्यानेही तापमान वाढत असावे. ते वेगवेगळ्या अवयवांत कमीअधिक वाढते का? >>
आरामाच्या अवस्थेत देखील हात व पायांच्या टोकाचे तापमान २९ – ३३ C असे कमी असते.
थोडक्यात,
गाभा सर्वात उष्ण आणि तिथून पृष्ठभागाकडे जाताना तापमान कमी होत जाते.

व्यायामातून स्नायूंमध्ये उष्णता निर्मिती होते. अर्थात अल्पावधीत ती शरीरभर सम प्रमाणात विखुरते.

छान उपयुक्त माहिती आहे.
बर्याच शंकांचे निरसन झाले..जसे कि ताप फायदेशीर कसा?

माझी मुलगी दिड वर्षाची असताना तीला seizure आले होते..सकाळी ताप होता म्हणून मी पैरासिटामल सिरप दिले आणि संध्याकाळी नवरा आल्यावर दवाखान्यात न्यावे असे ठरवले पण संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास तीला seizure आले.मला त्याबद्दल काहीच माहित नव्हते..मुलाला कधी असा त्रास झाला नव्हता.. त्यानंतर डॉ. नी frissium5 tablet नेहमी घरात ठेवायला सांगितले आहे.. ताप आल्यावर दवाखान्यात न्यायच्या आधी ती टैब्लेट देण्यास सांगितले...
त्यानंतर सुदैवाने तसा त्रास परत नाही झाला तीला.. आता ती 2वर्षे 10 महिन्यांची आहे.

सर, लहान मुलांमध्ये ताप आणि seizures याबद्दल अधिक माहिती देऊ शकाल का?

मृणाली
लहान मुलांमध्ये ताप आणि seizures याबद्दल अधिक माहिती >>

हा विशेष तज्ञांचा व्यापक विषय आहे. सवडीने त्यावर वाचून ठरवेन.
लहानशा प्रतिसादात उरकण्यात मजा नाही.

वावे
तुमच्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर माझ्याकडे नाही. लहान मुलांत तापमान यंत्रणा विकसित होत असतात. त्यामुळे शरीराचा गाभा व पृष्ठभाग यातील असमतोल अधिकच जाणवतो असा एक अंदाज.

बघतो अजून काही सापडले तर.

छान माहितीपर लेख,नेहमीप्रमाणेच !
एक प्रश्न आहे. कर्करोगाच्या पेशंट्सना ताप कशामुळे येतो?

साद ,
चांगला प्रश्न.
कर्करोगींना ताप येण्याची विविध कारणे असू शकतात :

१. हा आजार वाढलेल्या स्थितीत जंतुसंसर्गाची शक्यता खूप वाढते.
२. काही विशिष्ट कर्करोगात (उदा. ल्युकेमिया ) त्या कर्करोगपेशी तापजनक रसायने सोडतात >> Prostaglandins ना उत्तेजन मिळते >> हायपोथॅलॅमस वर परिणाम >> ताप. हा ताप जंतुसंसर्गाविना येतो हे विशेष.

३. या रोगाच्या काही उपचारांमुळे रक्तातील पांढऱ्या पेशी कमी होतात. त्यामुळे देखील ताप येऊ शकतो.

चांगला लेख !
लहानपणापासून माझे अंग कायम इतरा स्त्रीपुरुषांच्या मानाने गरम असते. तसा कायम फीडबॅक मिळत असतो मला. याचे शास्त्रीय कारण काय असेल?

जिद्दू ,
समाजात निरोगी माणसांमध्येही जवळपास एक डिग्री C रेंजमध्ये तापमान फिरत असते. काही लोकांचा हायपोथॅलॅमस मधील प्रमाणबिंदू इतरांपेक्षा थोडा वर ‘set’ असतो इतकेच.
बाकी त्याला काही महत्त्व नाही.

तुमचे लेख सोप्या व चांगल्या भाषेत, सुरेख व माहितीपूर्ण असतात. Happy
मला नेहमीच एक प्रश्न पडतो , बरेचदा आपण ताप उतरवण्यासाठी गार पाण्याच्या पट्ट्या कपाळावर ठेवतो , त्याने खरंच फरक पडतो का , आणि सर्दीचा ताप असेल तर असे करू नये म्हणतात , म्हणजे हे करणे खरेच फायदेशीर आहे का आणि याला शास्त्रीय आधार आहे का ?

धन्यवाद कुमारसर.

अस्मिता, धन्यवाद.
चांगला प्रश्न.

मुलांमध्ये ताप उतरवण्यासाठी कपाळावर पाण्याच्या पट्ट्या ठेवणे हा एक तात्पुरता प्रथमोपचार आहे. त्याचा परिणाम लवकर दिसतो, पण तो ही क्रिया चालू असेपर्यंतच टिकतो. याउलट तापविरोधी औषधाचा परिणाम सुरू व्हायला वेळ लागतो, पण तो पुढे काही तास टिकतो.

म्हणून, डॉक्टर अथवा औषध उपलब्ध होईपर्यंत एक तात्पुरता उपचार म्हणून पाण्याच्या पट्ट्या ठीक आहेत. अलीकडे त्यासाठी गार ऐवजी कोमट पाणी (32 ते 35 C) वापरण्याची शिफारस केली आहे.

ताप जर जास्त असेल तर फक्त कपाळावरच नाही तर पूर्ण अंग कोमट पाण्याने सतत पुसण्यास पण सांगितले जाते..

मृणाली,
पूर्ण अंग कोमट पाण्याने सतत पुसण्यास >>>
अगदी बरोबर !

@ mrunali.samad
तुम्ही म्हणताय त्याला बहुतेक 'febrile convulsion' असं नाव आहे. माझ्या मुलीला ही झालं होतं, ती दोन वर्षाची असताना.
आमच्या Dr. चा सल्ला - पाच वर्षांचीहोईपर्यंत काळजी घ्यायची. ताप आला तर शक्यतो temperature वाढणार नाही अशी काळजी घ्यायची - ओल्या टॉवेल ने पुसणे, रुमालाच्या घड्या etc. १०१ च्या वर ताप गेला तर च freesium देणे.

होय चिन्मय, बरोबर आहे.
सेम सल्ला आम्हालाही डॉ. नी दिला होता.

मुलासाठी आम्ही डिजिटल तापमापक वापरतो ज्याचा प्रोब कानात घालायचा आहे. तो इन्फ्रारेड सेन्सरच्या सहाय्याने काम करतो.

convulsion वयाच्या पाचपर्यंत जास्त धोका आहे अस म्हणतात, हो का? माझ्या मुलीला ती तीनची होती तेव्हा असे झाले, तिला त्याआधी दोन दिवस ताप होता. वयाच्या मानाने वजन कमी असल्याने प्रतिकारशक्ती कमी असे डोक्टर म्हणाले. तिला फुड पॉयझन झालेले, अन त्यातून ताप आलेला.. तापाचे औषध चालू होतेच .. पुन्हा एकदा सहाव्या वर्षी खूप ताप अन असेच झाले, त्यावेळी तिला मामीने बादलीत गार पाण्यात बसवले होते. डॉक्टर कडे जाणे पूर्वी..
यावर लेख आवडेल वाचायला डॉक्टर.. Happy नातवांसाठी कामी येइल.. Happy
बाकी तुमचे लेख मी नियमित वाचते, प्रतिसाद द्यायचे राहून जाते..

Pages

नवीन प्रतिसाद लिहा