गरम आणि ‘ताप’दायक

Submitted by कुमार१ on 18 October, 2020 - 02:06

सस्तन प्राणी या वर्गानुसार आपण प्राणिमात्रांत उत्क्रांतीच्या सर्वोच्च पातळीवर आहोत. पृथ्वीवर आपण वेगवेगळ्या खंडांत राहतो. विशिष्ट खंडानुसार आपल्या सभोवतालचे तापमान ऋतूनुसार बदलते असते. कडाक्याच्या थंडीतील उणे ४० C ते भर उन्हाळ्यातील ५२ C हून अधिक, एवढा त्याचा व्यापक पल्ला आहे. आपण बाह्य तापमानाच्या एवढ्या विविधतेने गुरफटलेले असूनही आपल्या शरीराचे तापमान मात्र कायम स्थिर असते. शरीरातील विशिष्ट दमदार यंत्रणेमुळे आपल्याला हे अचंबित करणारे वैशिष्ट्य मिळाले आहे. निरोगी अवस्थेत आपण आपले तापमान सरासरी ३७ C ( ९८.६ F) इतके ठेवतो. विविध आजारांमध्ये हे तापमान वाढते. काही प्रसंगी ते कमीही होऊ शकते. ताप येणे हे बऱ्याच आजारांचे प्राथमिक व महत्त्वाचे लक्षण असते. त्याबाबत आपण संवेदनशील असतो. ताप येण्याची प्रक्रिया समजण्यासाठी आधी आपले तापमान नियंत्रण समजून घेणे इष्ट आहे. त्यासाठीच हा लेख.
या लेखात निरोगी शरीराचे तापमान व त्याच्या मापन पद्धती, त्यातील नैसर्गिक बदल आणि आजारांमध्ये होणारे चढ-उतार याचा आढावा घेतो.

तापमान मोजण्यासाठी दोन मापनांचा वापर प्रचलित आहे.

C = Celsius व
F = Fahrenheit
यातील C चे अंक हे वापरायला आणि लक्षात ठेवायला सोपे असल्याने या लेखात फक्त त्यांचाच वापर करेन.
इथे एक लक्षात घ्यावे की शरीर तापमान हे एकाच अंकावर स्थिर नसते. 24 तासांच्या कालावधीत त्यामध्ये मर्यादित चढ-उतार होत असतात. तसेच आपण शरीराच्या कुठल्या भागात ते मोजत आहोत, यानुसारही मापनाचे अंक बदलतात.

temp therrmo.jpgशरीराचे तापमापन
हे नेहमी चांगल्या दर्जाच्या वैद्यकीय तापमापकाने करावे. शरीराच्या विविध भागात तापमान हे थोडेफार भिन्न असते. प्रथम हा फरक समजून घेऊ.

१. तोंड : तोंडाच्या आतील तापमान हे सरासरी 37 डिग्री C असते.
२. काख: इथले तापमान तोंडापेक्षा अर्धा डिग्री C ने कमी असते.
३. शरीरगाभा : इथले तापमान तोंडातीलपेक्षा अर्धा ते एक डिग्री C ने अधिक असते. हे मोजायचे झाल्यास तापमापक अन्ननलिका, गुदद्वार किंवा योनीत ठेवावा लागतो.

निरोगी अवस्थेतही आपले तापमान काही कारणांमुळे थोडेफार कसे बदलत असते ते आता पाहू.
१. चोवीस तासांचा कालावधी : या संपूर्ण कालावधीत तापमान ३६.३ – ३७.३ C या टप्प्यात बदलत राहते. पहाटे ४ च्या वेळेस ते सर्वात कमी तर संध्याकाळी ६ च्या सुमारास सर्वाधिक असते.

२. वय : एक वर्षाच्या आतील बाळात तापमान थोडे जास्त असते आणि बर्‍यापैकी अस्थिर असते. कारण त्यांच्या संबंधित नियंत्रक यंत्रणा पूर्णपणे विकसित नसतात. तसेच म्हातारपणी तापमान प्रौढांपेक्षा काहीसे कमी असते.

३. व्यायाम : हा करीत असताना त्याच्या तीव्रतेनुसार तापमान १-२ C ने वाढू शकते.

४. लिंगभेद : स्त्रियांमध्ये चयापचयाची गती पुरुषांच्या तुलनेत कमी असल्याने त्यांचे तापमान थोडे कमी असते.
५. स्त्रियांचे मासिक ऋतुचक्र : या चक्रामध्ये हॉर्मोन्सचे चढ-उतार होत असतात. त्यापैकी प्रोजेस्टेरॉन हे हार्मोन तापमान वाढवणारे असते. मासिक चक्राच्या साधारण मध्यावर ovulation ही घटना होते. त्या दिवशी सकाळी झोपेतून उठल्यानंतरचे तापमान वाढलेले असते. या दिवसानंतर पुढे चक्राच्या दुसऱ्या संपूर्ण टप्प्यात शरीर तापमान ३६.७ – ३७.२ या वाढीव टप्प्यात राहते.

६. अन्नग्रहण : विशेषतः प्रथिनयुक्त आहारानंतर तापमान थोडे वाढते.
७. भावना : भावनिक आंदोलनानंतर तापमान वेळप्रसंगी २ डिग्री C पर्यंतही वाढू शकते.

शरीरातील विविध प्रकारच्या प्रक्रियांमुळे उष्णता निर्माण होते. या उष्णतेतील काही भाग आपले तापमान स्थिर राखण्यासाठी वापरला जातो. याव्यतिरिक्त जी उष्णता असते ती विविध प्रकारे शरीराबाहेर टाकली जाते. अशा प्रकारे उष्णतेचा समतोल राखला जातो. उष्णतेचे निर्मिती आणि तिचे उत्सर्जन याचे मार्ग आता समजून घेऊ.

उष्णता निर्मिती :
ही खालील क्रियांमुळे होते:

१. चयापचयातील क्रिया : यामध्ये प्रथिनांचा वाटा सर्वाधिक असतो.
२. व्यायाम : याच्या प्रमाणानुसार उष्णता निर्मिती होते.
३. शरीराची थरथर : आपल्या नकळत होणाऱ्या स्नायूंच्या आकुंचनामुळे ही उष्णता निर्मिती होते. थंडीच्या दिवसात ही खूप उपयुक्त ठरते.
४. याव्यतिरिक्त वातावरणातील विशिष्ट सूर्यलहरी आणि काही आकाशलहरीपासूनही आपल्याला उष्णता प्राप्त होते.

उष्णतेचे उत्सर्जन :
हे खालील मार्गांनी होते :

१. आपली त्वचा आणि सभोवतालच्या वातावरणातील तापमानात फरक असतो. ज्या प्रमाणात हा फरक असेल त्यानुसार त्वचेतून उष्णता सतत उत्सर्जित होत राहते.

२. बाष्पीभवन : यात शरीरातील पाणी बाष्परूपात बाहेर पडते. या उत्सर्जनाचे मार्ग असे आहेत :
a. त्वचेद्वारा : इथल्या घर्मग्रंथींच्याद्वारा बाष्प बाहेर पडते. यालाच आपण घाम म्हणतो. जेव्हा शरीर तापमान नेहमीपेक्षा वाढू लागते तेव्हा घामाद्वारा अतिरिक्त उष्णता बाहेर टाकली जाते. उन्हाळ्याच्या दिवसात हे काम अत्यंत महत्त्वाचे ठरते.

b. आपल्या उच्छ्वासातून.

थंडी आणि उन्हाळा या दोन भिन्न ऋतूंमध्ये आपण उष्णतेचे उत्सर्जन आणि निर्मिती यांच्यावर बाह्य घटकांतून प्रभाव पाडतो. थंडीत आपल्याला शरीरातील उष्णता टिकवायची असते. म्हणून आपण उबदार कपडे घालतो आणि गरजेनुसार आपले घर गरम करतो. बरोबर याउलट उन्हाळ्यात घडते. तेव्हा बाहेरील उष्णता शरीराला मिळू न देणे महत्त्वाचे असते. म्हणून आपण कमी व सैलसर कपडे घालतो आणि आपले घर थंड करतो.

उष्णतेची निर्मिती आणि उत्सर्जन या दोन्ही क्रिया मेंदूतील हायपोथॅलॅमस या ग्रंथीच्या नियंत्रणात असतात. तिचे कार्य आता समजून घेऊ.

हायपोथॅलॅमसचे कार्य

tem hypo.jpg

या ग्रंथीत तापमानसंवेदी चेतातंतू असतात. त्यातले काही तंतू उष्णसंवेदी तर काही शीतसंवेदी असतात. नेहमी या दोघांच्या समन्वयातून तापमानाचा प्रमाण बिंदू ३७ C वर स्थिरावतो. जेव्हा वातावरणातील तापमानामुळे शरीर तापमान वाढू किंवा कमी होऊ पाहते, तेव्हा तिथे विशिष्ट घडामोडी होतात आणि तापमान प्रमाण बिंदूवर नियंत्रित केले जाते.
उन्हाळा व हिवाळा या दोन्ही ऋतुत इथे कशा विरोधी घडामोडी होतात ते आता सविस्तर पाहू.

उन्हाळा :
या ऋतूत बाह्य तापमान शरीरापेक्षा खूप जास्त असते >> त्वचा, अवयव आणि रक्तामधून या ग्रंथीला संदेश जातात >> उष्ण चेतातंतू ते संदेश स्वीकारतात >> आता उष्णतेचे उत्सर्जन वाढवणे आणि निर्मिती कमी करणे असे दुहेरी उद्दिष्ट ठरवले जाते. उत्सर्जन वाढवण्यासाठी खालील गोष्टी होतात :

१. त्वचेकडील रक्तप्रवाह वाढतो आणि तिथल्या वाहिन्या प्रसरण पावतात.
२. घामाचे प्रमाण खूप वाढते
३. श्वसनगती काहीशी वाढते. त्यामुळे अधिक बाष्प बाहेर पडते.

त्याच बरोबर उष्णता निर्मिती कमी होण्यासाठी या घडामोडी होतात :
१. स्नायूंचा टोन कमी होतो
२. काही हार्मोन्सच्या प्रक्रियांमधून आपली भूक आणि चयापचय मंद केला जातो.
३. आपल्याला थंड पाणी पिण्याची आणि थंड हवामानात जाण्याची इच्छा निर्माण होते.

हिवाळा

या ऋतूत बाह्य तापमान शरीरापेक्षा खूप कमी असते >> त्वचा, अवयव आणि रक्तामधून या ग्रंथीला संदेश जातात >> शीत चेतातंतू ते संदेश स्वीकारतात >> आता उष्णतेची निर्मिती वाढवणे आणि उत्सर्जन कमी करणे असे दुहेरी उद्दिष्ट ठरवले जाते. निर्मिती वाढवण्यासाठी खालील गोष्टी होतात :
१. शरीराची थरथर वाढते.
२. स्नायूंचा टोन वाढतो
३. थायरोइड आणि अड्रीनल ग्रंथींच्या हार्मोन्सच्या प्रक्रियांमधून आपली भूक आणि चयापचय वाढवले जातात.
४. आपल्याला गरम पेये पिण्याची आणि उबदार हवामानात जाण्याची इच्छा निर्माण होते.

याचबरोबर उत्सर्जन कमी करण्यासाठी खालील गोष्टी होतात :
१. त्वचेकडील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि त्यामुळे रक्तप्रवाह कमी होतो.
२. शरीर आक्रसून घेतले जाते.
३. आपण उबदार कपडे घालतो.

आतापर्यंत आपण निरोगी अवस्थेतील तापमान नियंत्रण समजून घेतले. विविध आजारांमध्ये हे नियंत्रण बिघडते आणि त्यामुळे तापमान जास्त किंवा कमी होते. वाढून राहिलेल्या तापमानाला आपण “ताप आला” असे म्हणतो. त्याची कारणमीमांसा आता पाहू.

ताप येण्याची प्रक्रिया
जेव्हा शरीर तापमान ३८ C च्यावर टिकून राहते त्या अवस्थेला ताप (fever)असे म्हणतात. त्याच्या मापनानुसार त्याचे वर्गीकरण असे आहे :
* तापमान ३८ – ३९ सौम्य
* ३९ – ४० मध्यम
* ४० – ४२ उच्च
* >४२ तीव्र (hyperpyrexia)

इथे एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो. जेव्हा आपल्याला ताप आला आहे की काय याबद्दल साशंकता वाटते, तेव्हा बऱ्याचदा आपण दुसऱ्या व्यक्तीला आपल्या कपाळावर हात ठेवून पाहण्यास सांगतो. ही अत्यंत सामान्य स्वरूपाची चाचणी आहे आणि ती संवेदनक्षम नाही. कित्येकदा शरीराचे मोजलेले तापमान 39 C चे वर असतानादेखील कपाळ गरम लागत नाही. असे बऱ्याच रुग्णांचे बाबतीत दिसून येते. तेव्हा तापाची खात्री करण्यासाठी ताप प्रत्यक्ष मोजणे हे महत्त्वाचे आहे.

ताप येण्याची महत्त्वाची कारणे :
१. जंतुसंसर्ग: यात प्रामुख्याने जीवाणू व विषाणूच्या आजारांचा समावेश आहे.
२. थायरॉईड हार्मोन्सचे अधिक्य
३. हायपोथॅलॅमसचे आजार
४. दीर्घकाळ प्रखर उष्ण हवामानाला सामोरे जाणे.

यापैकी जंतुसंसर्गाने येणारा ताप ही नित्याची घटना आहे. आपण सर्वांनी ती आयुष्यात कधी ना कधी अनुभवलेली असते. म्हणून त्याची मीमांसा करतो.
१. सूक्ष्मजंतू त्यांचे विष शरीरात सोडतात
२. त्याचा प्रतिकार रक्तातील पांढऱ्या पेशी करतात
३. या दोघांच्या लढाईतून काही तापजनक रसायने (pyrogens) सोडली जातात.

४. ही रसायने हायपोथॅलॅमसमध्ये पोचतात आणि तिथल्या चेतातंतूंना सतत उत्तेजित करतात.
५. त्यातून काही रासायनिक घडामोडी होऊन तापमान नियंत्रक बिंदू वरच्या पातळीवर नेला जातो.
६. म्हणजेच शरीर तापमान वाढते = ताप येतो

जंतुसंसर्गामुळे येणारे ताप हे मर्यादित काळापुरते (साधारण ४-१० दिवसांपर्यंत) टिकतात. एखाद्याला आलेला ताप दोन आठवड्यांनंतर देखील हटलेला नसेल, तर मात्र अशा तापाची गूढ कारणे शोधावी लागतात आणि त्यासाठी शरीराच्या सखोल तपासण्या कराव्या लागतात. अशा काही कारणांपैकी कर्करोग हे एक महत्त्वाचे कारण आहे.

विविध आजारांनुसार तापाची काही वैशिष्ट्ये असतात. काही आजारांमध्ये तापाच्या जोडीने रुग्णाला खूप थंडी वाजते. काहींमध्ये रात्री भरपूर घाम येतो. काही ताप सलग स्वरूपाचे असतात. तर अन्य काहींमध्ये दिवसरात्रीच्या चक्रानुसार तापमानाचे कमी-अधिक चढ-उतार होत राहतात. रुग्णाच्या अशा लक्षणांकडे बारकाईने लक्ष दिल्यास रोगनिदानास चांगली मदत होते.
तापामुळे आपल्या शरीरामध्ये अन्य काही बदल देखील घडतात. ते असे आहेत :

१. चयापचयाची गती बऱ्यापैकी वाढते. त्यामुळे अधिक ऊर्जा खर्ची पडते. त्यातून रुग्णास अशक्तपणा येतो.
२. हृदयाच्या ठोक्यांची गती आणि रक्तदाब दोन्ही वाढतात
३. श्वसनाची गती देखील वाढते.
४. भूक मंदावते आणि तापाच्या प्रमाणानुसार डिहायड्रेशन होते.

जंतूसंसर्गातून येणारा ताप हा एक प्रकारे शरीराच्या प्रतिकार शक्तीचा एक भाग असतो हे वर स्पष्ट झाले असेल. मात्र वाढता ताप हा रुग्णाला नक्कीच अस्वस्थ करतो. यासंदर्भात एक मूलभूत प्रश्न असा उपस्थित होतो, की अशा प्रसंगी आलेला ताप खरेच फायदेशीर असतो का ? हा बराच क्लिष्ट व वादग्रस्त विषय आहे. जुन्या थिअरीनुसार त्याचे उत्तर ‘हो’ असे होते. परंतु, नवीन संशोधनानंतर आलेल्या थिअरी नुसार ते उत्तर ‘नाही’ कडे झुकलेले आहे.
आता थोडक्यात या दोन्ही थिअरीज समजून घेऊ.

जुन्या थिअरीनुसार ताप फायदेशीर असतो कारण –
१.त्याच्यामुळे रक्तप्रवाहाची गती वाढते. त्यामुळे लढाऊ पांढऱ्या पेशीना संसर्गाच्या जागेवर जायला मदत होते. तसेच त्यांची मारक शक्तीही वाढते.
२.चयापचय वाढल्याने पेशींमधील दुरुस्ती प्रक्रिया वेगाने होतात.
३. काही प्रमाणात जंतूंचे पुनरुत्पादन कमी होऊ शकते

कालौघात या जुन्या थिअरीवर खूप काथ्याकूट झाला आणि तिला आव्हानही दिले गेले. त्यात म्हटल्यानुसार विविध मुद्यांसाठी ठोस पुरावे मात्र देता आले नाहीत. त्यामुळे ती मागे पडली.

नव्या थिअरीनुसार घडामोडी अशा असतात :
१. तापामुळे शरीरातील दाहप्रक्रिया वाढते.
२. चयापचयाची गती वाढल्यामुळे त्याचा शरीरावर एक प्रकारे ताण पडतो. त्यातून रुग्णाची अधिक ऊर्जा खर्ची पडते. जर का रुग्णाला हृदय किंवा श्वसनाचा दीर्घकालीन आजार पूर्वीच असेल, तर हा वाढलेला ताण त्रासदायकच ठरतो.

३. ताप जर आठवड्यातून अधिक काळ टिकून राहिला तर शरीरातील नाइट्रोजन आणि पाणी यांचा समतोल बिघडतो. डीहायड्रेशनही होऊ शकते.
४. तापातून मज्जासंस्थेला इजा पोहोचून फिट्स येऊ शकतात.

या सर्व मुद्यांचा साकल्याने विचार करता आता असा दृष्टीकोण ठेवावा लागतो. जंतूसंसर्गानंतर ताप येणे ही अटळ घटना आहे खरी, परंतु एका मर्यादेवरील ताप हा शरीरासाठी योग्य नाही. त्यामुळे तो औषधांच्या वापराने नियंत्रित केला पाहिजे.

अतितीव्र ताप आणि उष्माघात

शरीराचे तापमान 43 C च्या वर जाणे अत्यंत घातक आहे. तीव्र उन्हाळ्यात व दमट वातावरणात जर प्रत्यक्ष श्रमाचे काम बराच वेळ केले, तर त्यातून मृत्यू उद्भवू शकतो. अशा वातावरणात शरीरातील उष्णतेचे उत्सर्जन होत नाही. त्याचबरोबर शरीरातील पाणी व सोडियम निघून जातात परिणामी रक्ताभिसरण कोलमडते.
काही देशांमध्ये तीव्र उन्हाळ्यामध्ये जेव्हा बाह्य तापमान ५० C चे वर जाते तेव्हा उघड्यावर काम करणाऱ्या श्रमजीवी व्यक्तींना सक्तीने सुट्टी जाहीर करण्याचे कायदे केलेले आहेत .
. . .
वातावरणातील तापमानात कितीही टोकाचे चढ-उतार झाले तरी मानव आणि काही सस्तन प्राणी त्यांचे अंतर्गत तापमान स्थिर ठेवतात. हे निसर्गाने त्यांना दिलेले एक मोठे वरदान आहे. हे तापमान स्थिर राखण्यासाठीच्या शरीरातील यंत्रणांची माहिती आपण या लेखाद्वारे करून घेतली. विविध जंतूसंसर्गामध्ये ताप येण्याच्या घटना नित्याच्याच आहेत. त्याचीही प्राथमिक माहिती या लेखात करून दिली आहे. अशा ‘ताप’दायक घटना आपल्या आयुष्यात कमीत कमी वेळा येवोत, या शुभेच्छेसह समारोप करतो.
……………………………………………………………………………………………….

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गन ऐवजी आॅक्सिमीटर >>>
तुमचा बहुतेक गैरसमज होतोय .

'गन' शरीराचे तापमान अंदाजे मोजण्यासाठी आहे, तर पल्स ऑक्सीमिटर हा रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण मोजतो. यावर स्वतंत्र धागा आहे (https://www.maayboli.com/node/76797)

राज्यात उकाडा वाढला; उष्माघाताचे ८२ रुग्ण
https://www.loksatta.com/nagpur/maharashtra-heat-wave-82-cases-of-heat-s...

जेव्हा शरीराचे तापमान 40°C (104°F) या मर्यादेच्या वर जाते तेव्हा मेंदू कार्यावर विपरीत परिणाम होतो. सध्याच्या तापमानात तान्ही मुले, वृद्ध आणि दीर्घकालीन मोठे आजार असणाऱ्या व्यक्तींची विशेष काळजी घेतली पाहिजे. तसेच प्रत्यक्ष उन्हातील श्रम टाळले पाहिजेत.

भारतीय हवामानात प्रौढांनी 24 तासाला सुमारे साडेतीन लिटर पाणी प्यावे. तसेच दिवसभरात नियमित अंतराने नैसर्गिक पौष्टिक पेये आणि पाणीदार फळांचे सेवन करणे हित्यवाह.

>>>>>>>हित्यवाह
हितकर किंवा हितावह असा शब्द असावा. हित्यवाह शब्दसुद्धा आहे का? जाणकारांनी प्रकाश टाकावा.

पाणी कितीही प्यायले तरीही उन्हाळे जाणवत आहेत . अश्यवेळी काय करावे डॉक्टर ? सब्जा प्यायला तर चालेल का ?

सब्जा >>>> याबद्दल माझा काही अभ्यास किंवा अनुभव नाही. ज्यांचा आहे त्यांनी सांगावे.
पाण्याच्या जोडीने क्षारांची पण काळजी घेतली जावी म्हणून नैसर्गिक पेये / सरबते आणि पाणीदार फळे घेत राहावीत असे सुचवतो.

ऊन्हाळे लागायचा त्रास असेल तर अर्धा चमचा मिसळण्याच्या डब्यातला धने / जिरे फुलपात्र भर पाण्यात रात्री भिजत घालून सकाळी ते पाणी प्यायचे. शू करताना होणारी जळजळ बंद होते. मी सध्या ORS चे दोन तीन पॅक घरी आणून ठेवले आहेत. एखादे वेळेस फारच गळाल्यासारखे. वाटले .. स्पेशली ऊन्हातून ऑफीस ला पोचल्यावर तर मला याचा फायदा होतो. आठवड्यात एकदा पिते. बाकी साध्या पाणी सोडून पन्हे, ताक, लिंबू/ कोकम सरबत असे रोज पिते आहे. अजुन तरी ऊन्हाचा खूप त्रास नाही जाणवला.
जर काशाची वाटी असेल तर तळपायाला कैलास जीवन किंवा नारळ तेल लाऊन घासा. आराम वाटतो.

प्राजक्ता : छान उपाय सुचवले आहेत. ORSचे काही सॅशे मी ही बाळगते.
सर्वानीच शुगर स्पाईकची काळजी घेऊन इतर सरबतांबरोबर नारळपाणीही घ्या. कलिंगड, टरबूज सारखी फळे स्नॅक म्हणून किंवा एका वेळचे जेवण म्हणून ही घ्यायला हरकत नाही.
खाण्यात काकडी, पांढरा कांदा वगैरे कोशिंबीर स्वरूपात जरूर वापरा. दुधी, घोसाळे वगैरे पाण्याचे कन्टेन्ट जास्त असलेल्या भाज्या कमीत कमी मसाले घालून जेवणात घ्या.

प्रखर उन्हाळ्यात शरीरातील जलसमतोल कसा राखता येईल यासंबंधी काही सोप्या सूचना इथल्या माहितीपत्रकात वाचता येतील (https://www.cdc.gov/niosh/mining/UserFiles/works/pdfs/2017-126.pdf).

त्यातले महत्वाचे मुद्दे अधोरेखित करतो :
. बंदिस्त जागेत काम करणाऱ्या सर्वसाधारण माणसाला योग्य प्रमाणात पाणी पिणे हे पुरेसे आहे. त्याचबरोबर जेवणाच्या वेळाही नियमित पाळाव्यात.
पाणी पिण्यासंबंधी काही उपयुक्त सूचना :
१. प्रत्यक्ष तहान लागण्यापूर्वीच पाणी प्यावे.
२. खूप वेळाने एकदम जास्त पाणी पिण्याऐवजी कमी अंतराने सामान्य प्रमाणातील पाणी पित राहणे अधिक महत्त्वाचे.
३. लघवीचा रंग ही जलसमतोल पारखण्याची सर्वात सोपी स्वयंचाचणी !

. खालील पेये टाळावीत :
१. तथाकथित 'शक्तिवर्धक' कृत्रिम पेये : यांच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात कॅफीन असते.
२. अतिरिक्त गोड असलेली पेये
३. मद्य

* Water is generally sufficient for hydration *
अन्य नैसर्गिक पेयांचा आस्वाद आपापल्या आवडीनुसार घ्यावा Happy

कडक उन्हाळ्यामध्ये बऱ्याच जणांना गोड पदार्थ खाण्याची तीव्र इच्छा होते. यामागे मेंदूतील रासायनिक घडामोडी आहेत.

एरवी सुद्धा जेव्हा आपण गोड पदार्थ खातो तेव्हा मेंदूतून डोपामिन आणि अन्य काही चेतना रसायने मोठ्या प्रमाणात स्त्रवतात. त्यामुळे आपल्याला सुखद तृप्तीची भावना होते आणि हा अनुभव पुन्हा घ्यायचा वाटतो. याला शरीरशास्त्रात reward यंत्रणा असे म्हटले जाते.

उन्हाळ्यात डोपामिनचे प्रमाण वाढलेले असते आणि जर श्रम झाले असतील तर वरील यंत्रणा नेहमीपेक्षाही अधिक प्रमाणात चेतविली जाते.

Pages