कोळंबी लोणचं

Submitted by डीडी on 5 October, 2020 - 09:06
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 
  • १/२ किलो कोळंबी (सोललेली आणि मधला धागा काढलेली)
  • 1 टीस्पून. हळद
  • 2 टीस्पून. तिखट
  • 1 टेस्पून. आलं लसूण पेस्ट
  • 100-150 मिली मोहरी तेल
  • 1 टेस्पून. मोहरी
  • २ टीस्पून. हिंग
  • पाऊण कप लसणीचे मध्यम आकाराचे तुकडे
  • अर्धा कप आल्याचे मध्यम आकाराचे तुकडे
  • 3 टेस्पून. लोणचं मसाला
  • चवीनुसार मीठ
  • लिंबाचा रस किंवा व्हाईट व्हिनेगर चवीनुसार
क्रमवार पाककृती: 

आज जवळ जवळ ५ वर्षाने मायबोलीवर पाकृ लिहिताना बरं वाटतंय.. इतका ब्रेक का घेतला, माझं मलाच माहित नाही.. असो..

चला सुरु करू.. कोळंबीला हळद, मीठ, तिखट, आलं लसूण पेस्ट लावून किमान अर्धा तास मुरवत ठेवा. मोहरीचं तेल तापवून त्यात मुरलेली कोळंबी माध्यम आचेवर तळून घ्या. कोळंबी थोडी डार्क ब्राउन तळावीत, जेणेकरून कोळंबी क्रिस्पी होतील आणि लोणचं टिकाऊ होईल.
तळणीच्या राहिलेल्या तेलात मोहरी आणि हिंगाची फोडणी करून घ्या.

आता थोडा ब्रेक.. पुढचं काम तळलेली कोळंबी आणि फोडणी पूर्ण थंड झाली की....

एका भांड्यात तळलेली कोळंबी, आल्या-लसणाचे तुकडे, तिखट, मीठ आणि लोणचं मसाला प्रेमाने एकजीव करा. थोडक्यात कोळंबीला मसाजच करा.. आता त्यावर फोडणीचे तेल, मोहरी घालून, मस्त लिंबू पिळा. लोणचं एकजीव करून काचेच्या सुक्या जार/बरणीत काढून घ्या..

पोळी, भाकरी किंवा डाळ-भात, सोलकडी-भातासोबत लोणचं म्हणजे स्वर्गसुख.. हे लोणचं किती दिवस टिकू शकेल नाही माहित, कारण आमच्याकडे आठवड्यात बरणी रिकामी झाली.. हां, दिलेल्या जिन्नसांत फोटो मधील दोन बरण्या भरतील इतकं झालं लोणचं..

या लॉकडाऊनच्या काळात आणि खासकरून मागील एक महिन्यात विडिओग्राफी वर काम चालू केलं.. त्यामुळे यावेळी फोटोसोबत पाकृ चा विडिओ बनवायचा प्रयत्न केलाय. पहिलाच प्रयत्न आहे.. तो प्रयत्न इथे चिकटवतोय.. काही सूचना असतील तर त्यांचं मनापासून स्वागत..

https://www.youtube.com/watch?v=cHdaSPE7Lrc

वाढणी/प्रमाण: 
नो प्रमाण.. जस्ट गो ऑन
अधिक टिपा: 
  • शक्यतो लहान कोळंबी घ्यावीत, चवीला जास्त चांगली लागतात
  • आम्ही इथे बेडेकर लोणच्याचा तयार मसाला वापरलाय
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आभार ShitalKrishna, खुप धन्यावाद.. आपल्या प्रतिक्रियेमुळे हुरूप वाढला Happy

रेसिपी आणि फोटो खासच.

आता कोलंबी फार खाता येत नाही पण नवरा (आणि मुलं) आवडीने खातात. त्यांच्यावर प्रयोग करुन पाहिन Wink

फार्फार वर्स्।आंनी लिहिल्याबद्द्ल आभार्स Happy

पाकृ आणि फोटो आवडल्याबद्दल आभार सामी, वेका आणि रूपाली..
नक्की करून बघा आणि कळवा कसं झालं ते..
अप्रतिम होणारच Happy