थोडंसं पेंच आणि बरंचसं ताडोबा – भाग ४

Submitted by अरिष्टनेमि on 3 October, 2020 - 16:35

एकदा अशीच मजा. पेंचमध्ये सलामा-भिवसनच्या मध्ये जाता जाता मला दिसला ब्लॅक राजा. म्हणजे फुलपाखरू आहे हे. फर्र करून उडून गेलं. पण ते येणार हे नक्की. कारण वाघाच्या पहाटेच्याच विष्ठेवर ते बसलं होतं. मी तिथंच थांबलो.

तोवर भिवसनकडून गाडी आली. “वाघीन हाये वाघीन. ती नाय का तर बसूनसनी हाय. तीन बच्चे घेऊन. बिलकूल रोडावर.”

“खरं म्हणता काय? बरं जातोच.”

जायचं होतं, पण जीव राजात गुंतलेला. त्याची आशा सुटेना. तो आला. कुठून तरी अज्ञातातून आल्यासारखा अवतरला आणि असा डाव्या हाताला वर एका पद्धतशीर पानावर बसला. घ्या आता. थांबू की जाऊ? थांबू की जाऊ? थांबू की जाऊ? थांबूच म्हटलं शेवटी. तो उतरणारच.

होता करता अजून एक गाडी आली. “दीड घंटा झाला, वाघीण रोड सोडत नाय. आन बच्चे तीन. खेळतेत. रोडा-रोडानीच बिलकूल. पावरझोडीच्या पहिले मोड हाये नाय का जी; बास, थितंच.”

गाडी गेली आणि राजा उतरला. पुन्हा वाघाच्या विष्ठेवर स्थिरावला. सकाळच्या उन्हात सुंदरच दिसत होता. काय सांगू? एक मिनीट. शोधून टाकतोच इथं. हे घ्या.

_MG_1110.jpg

या राजानं तासभर खाल्ला. पुढं जायचं होतं भिवसनकडूनच. जाईस्तोवर ऊन तापलं. वाघीण काय अशा उन्हाला बसून राहील होय बच्चे घेऊन? नावच काढू नका. ती उठून कुटूंब-कबिला घेऊन पोहोचली असणार पाण्याला मॅगझीन नाल्यात म्हणा किंवा अजून कुठं.

पण खरं तर आपण इनटेकपासून सुरू केलं होतं ना! या इनटेकची दुसरी आठवण सांगतो आता. ही ब्लॅक राजाची आठवण अशीच उडत-उडत मध्येच घुसली. ती काही इनटेकची नव्हे. इनटेक राहिलं तिकडंच आणि आपण आलो सलाम्याकडं.

तर इनटेकचं काय झालं एकदा, एकाने इनटेकला गाडी उभी केली अन् कट्ट्यावर बसला गडी. रस्त्याकडेच्या गवतानं चरत चरत आलेली सांबरं एकदम ओरडून सैराट धावली. हा वळून बघतो तर मागून वाघोबा. मग हा फटकन उठून गाडीत घुसला. वाघाला काय घेणं ना देणं याच्याशी. वाघ त्याच्याच तंद्रीत काही जुगाड जमवायच्या नादात होता. तो याच्या गाडीपुढून सरळ पाय-या चढत वरच्या विश्रामगृहाच्या अंगणात निघाला आणि पुढं चालता झाला.

हा जरा छपरीच होता वाघ. काय काय गमती याच्या. तसा दोन-तीनदा याला पाहिला, पण कॅमेरा नसताना. पेंचला इनटेकला गेलात तर तिथं देवमन भेटेल. देवमनला विचारा, तो कसा उभा होता खाली आणि वरुन पाय-यांनी हा बदमाश वाघोबा उतरला. देवमन जाईल कुठं? एकुलत्या वाटेनं वाघ उतरून आल्यावर? त्यानं मागचा-पुढचा विचाऱ न करता क्षणात आहे तशी तोतलाडोहात १०० फुट खोल पाण्यात उडी मारली. वाघ जाईपर्यंत तो पाण्यातच राहिला. आता हा वाघ खोडसाळ म्हणून गंमत करून पळाला. खरं त्याला देवमन पाहिजे म्हणून उतरला असता तर? वाघ पट्टीचे पोहतात. मागच्या भागात मी लिहिलं आहे. कसा वाघानं पाण्यात पाठलाग केला आणि माकडाची शिकार केली.

आणि तोतलाडोहात तशा मगरी नाहीत. इनटेकच्या खोल पाण्यात तर नाहीतच. मॅगझीन नाल्यात एक दिसत होती अलीकडच्या काळात. तुमडीमट्ट्यावरून कधी उन्हाला पडलेली दिसे. बाकी अवजड मगरी म्हणाल तर सा-या धरणाच्या खाली. मग सहसा रस्त्यावरून दिसणार नाही अशा ठिकाणी खाली कुसुमखडकला या बिलामती झोपून राहायच्या. तोंडं सताड उघडून. कुसुमखडकला वळायच्या आधी झाडो-यातून एक सापट होती. अगदी तिथून पाहिलं की ही काळी धुडं दिसत नेमकी. पण त्यांना माहीत नव्हतं की त्यांना कोणी पहात आहे. पण पुढं कुसुमखडकपाशी पोहोचून पाहायचं म्हटलं तर तेवढा कौशल्यविकास झालेल्या माणसाचंच काम ते. इथून कसं एकदम असं चुपचाप पाहायचं. स्लो मोशनमध्ये पाहायचं. अडम-धडम जाल तर या मगरी काही थांबत नाहीत. जर्रा काही जोरात हालचाल जाणवली की पाण्यात सूर. हे बघा असं.

Croc-in-pench.jpg

असू द्या. आपण कुठून कुठं निघालो? इनटेकला पाहिलेल्या मत्स्यगरुडाची आठवण मला झाली होती आणि आलो कुठं!
डावी उजवी करत हल्लू हल्लू आगे.

तर आपण ताडोबा तळ्याकडं होतो ना? सर्पगरुड पहात. इथून आता एकतर पांढरपौनी, येनबोडी करत जामणीकडं निघायचं.
या पांढरपौनी, येनबोडीला वाघ बसतो उन्हाचा. पांढरपौनीला तर सारे पर्यटक वाघाच्या नादाने गाड्या लावून वाट बघतात. पलिकडून गवतात वाघाची झोपायची जागा. शिकाऱ खाऊन पाणी प्यायचं आणि तंगड्या ताणून गवतात पडी मारली की मारली. नादावलेले पर्यटक इकडं घामाघूम. मध्येच एखाद्या वेळाने मग तो लमडीचा वाघ डोकं उचलून जागेवरूनच अदमास घेतो, हे गाड्यावाले गेले की आहेत?

एकदा तिकडं जाता-जाता म्हणून गेलो अन् वानराच्या मोहात पडलो. काही म्हणा पण प्रेमात पडावं तर माकडाच्या, वांद्राच्या. काय काय आणि कसे कसे खेळ शोधून काढतात!

मारुती चितमपल्ली साहेबांच्या एखाद्या पुस्तकात वाचलं असेल की माकडं डोळ्याने चेंडू खेळतात. म्हणजे अशी गंमत, की दोन जण आमोरा-समोर बसतात. एकानं भुवईनं टुईंग करून काल्पनिक चेंडू उडवायचा, तो दुस-यानं भुवयांनी टॉईंग करून परतवायचा. अर्थात वांद्रं काय चेंडू-बिंडू मानून खेळत नसतील. हा आपला कल्पनाविलास झाला. पण खाणं-पिणं उरकलं की कधी कधी ती असा चाळा करतात हे मात्र खरं. मी स्वत: पाहिलं आहे.

शिवाय एका फांदीवर नाहीतर दगडावर बसून शेपट्या ओढून एकमेकांना पाडायचं आणि त्याच्या जागेवर आपण बसायचा खो-खो खेळायचा. वांद्रं मोठी गमतीची. यांचे खेळ पहावेत, नजरेचे चाळे पहावेत. वेळ कुठं जातो काही समजत नाही.

रस्त्याच्या या बाजूला मोहाचा वृक्ष. वानरांचा फिरस्ता कळप तिथं पोहोचला. मोहाच्या टोळ्या; फळं, खाली पडली होती. ओलीनं त्याला कोंब फुटले. पेरभर मूळ मातीत घुसलं. नखभर पानाची जोडी बी फाकलून बाहेर येऊ बघत होती. तुम्हाला माहितीये बहिणाबाईंनी काय सुरेख सांगितलंय या पानांचं रहस्य?

ऊन वा-याशीं खेयतां एका एका कोंबांतून
पर्गटले दोन पानं जसे हात जोडीसन
टाया वाजवती पानं दंग देवाच्या भजनीं
जसे करती कारोन्या होऊं दे रे आबादानी

बहिणाबाई एक अद्भुत व्यक्तिमत्व.

तर मी काय पाहिलं त्या दिवशी की वांद्रं एकेक बी उचलून मोठ्या चवीनं खात होती.

Langur.jpg

अगदी गोव्याच्या रानात फिरताना जमिनीतून काढून खाल्लेल्या अशा काजू बियांचीच आठवण झाली. मध्येच या माकडीणीला वाटलं असेल, ‘आता गं बाई! काय सारखी ती फुकणी आमच्याकडं करुन बघतो रे? जेऊ दे की गप.’

langur2.jpg

या पांढरपौनी, येनबोडीसारखंच जामणीत पक्कं पाणी. पाणी आणि गवत म्हटलं की जनावरं रमतात. सांबरं गळा-पोट पाण्यात उतरतात.

_MG_3836.jpg

पाण्याखाली मुंडकं घालून त्यात उगवलेलं लुसलुशीत गवत मोठ्या मजेने खातात. कधी-कधी एखादा गवाही असं करताना दिसतो खरा, पण ही गव्याची अस्सल सवय नाही. ताडोबा तळ्यात एकदा असं रमलेलं सांबर उभ्या-उभ्याच मगरींनी फाडून खाल्लं.

मगर आणि कोळसुंदे यांना कधी शिकार करताना नाजूक मनाच्या माणसानं पाहू नये. मगरीची जी काही धांदल होते ती पाण्यात. पण कोळसुंदे म्हणजे रानकुत्रे पळत्या जनावराला झोंबतात, फाडत राहतात. जनावर पळत राहतं, कुत्रे खात राहतात. रक्ताळलेलं जनावर मग कुठंतरी पडतं. तसं पडून डोकं उचलून बघत राहतं आणि कुत्रे त्याच्या देखता डोळा त्याला तोडतात, खात राहतात. असो.

तर त्या जामणीत अशी सांबरं, तरी पाच-दहा असतीलच; गवत खात होती. खाता-खाता-खाता एकदम दचकली. भैताड असलं तरी त्या जनावराला समजलं की ही रणभूमी आपली नाही. मगर असो की वाघ, या पाण्यात आपलं जे शस्त्र, वेगवान धाव; हे चालणार नाही. म्हणून आधी त्यांनी पळायला सुरुवात केली आणि जमिनीवर उभे राहिले, तेंव्हाच वळून पाहिलं.

9E3A5130.jpg

या जामणीच्या मैदानात मी नाही म्हटलं तरी दोनेक हज्जार चितळं एका वेळी पाहिलीत. कितीतरी गवे, सांबरं इथं असतातच. एकदा खातोड्याहून येताना चितळाचा कळप होता, कोसेकनार रस्त्याला. बरं, जाता जाता एक; या रस्त्याला एक चट्टेरी घुबड असतं बरं का! म्हणजे Mottled Wood Owl.
असू द्या.

तर असा त्या जामणीत चितळांचा कळप, कोसेकनार रस्त्याला. आपण तिथं अशा वेळी गेलं की ही चितळं अगदी हमखास जामणी तळ्याकडून आपल्याला आडवी होऊन रानात पळतात. असा जवळपास साराच कळप गेला, एक चितळ मानेला झटके देत काही खात होतं. जवळ गेलो तरी त्याला ते जे काय खात होतं त्याची लालूच सुटेना. बरं तर बरं मी होतो म्हणून. ‘आला जर वाघ म्हणजे तुला काय भावात पडंल रे हा मोह?’ बहुधा माझं स्वगत त्यानं मनावर घेतलं आणि तोंडातला जो काय मुद्देमाल असेल, तो टाकून धूम पळाला गडी. मी पाहिलं, अशी काय चीज आहे ही? ते होतं चितळाचं गळून पडलेलं शिंग. चावून चघळून वीतभर राहिलं असेल आता.

असं दिसूनही जातं कधी, ही हरणं गळून पडलेली शिंगं चघळतात. थोडं विस्तारानं सांगतो. काय आहे की आपण सा-याला नुसतीच हरणं-बिरणं म्हणतो.

चितळ काय? हरीण.
सांबर काय? हरीण.
नीलगाय काय? हरीण.
चौशिंगा काय? हरीण.

तर असं आपण गवत खाणारं, लाल रंगाचं, चार पायावर जे येईल त्याचं मुटकुळं हरणात टाकतो. काय वाट्टेल ते आलं तरी हरणाची रेष काही ओलांडत नाही. पण हरणाचे प्रकार दोन; सारंग आणि कुरंग. ज्या हरणाची शिंगं दरवर्षी गळून पडतात आणि नवीन येतात ते सारंग. ज्यांची शिंगं आयुष्यभर गळत नाहीत ते झाले कुरंग.

म्हणजे काळवीट, नीलगाय, चौशिंगा हे झाले कुरंग; antelopes. कुरंगाची शिंगं म्हणजे कायमची. फेव्हिकॉल का मजबूत जोड. यांच्या शिंगांना फाटे-फुटे काही नसतात.

सांबर, चितळ, भेडकी हे झाले सारंग; deers. या सारंगांना मग शिंगं येतात. त्यावर रेशमी मलमली आवरण असतं. अगदी हात लावून पहावा असं.

म्हणजे हे बघा असं.
9E3A5175.jpg

म्हणजे साधारण तुम्हाला सांगतो बघा, ते किवी म्हणून फळ येतं ना आजकाल? ते पाहिलं की मला हरणाची मलमली शिंगं आठवतात.

शिंगांची वाढ पूर्ण झाली की त्यांना अज्ञात कॉल येतो, ‘झालं बे, घास की आता!’ अशी हरणं मग शिंगं झाडाच्या खोडावर घासतात. वरची मलमल घासून काढतात. खाऊन टाकतात. हो, एवढी प्रथिनं काय वाया घालवणार उगाचच्या उगाच? शिंगं मग उजळतात, टोकदार होतात.

आपल्याला डौल वाटतो, पण मोठा नर असला ना सांबरा-बिंबराचा, तर ८-१० किलोचं एक शिंग असतं. हे ओझं कशाला तर म्हणे स्वयंवरासाठी. मग असा मजबूत धिप्पाड नर असा शिंगांचा डोलारा घेऊन माद्यांना इम्प्रेस करत फिरतो. अशा वेळी बाकी नवतरुण कुठं काही आपलंही सूत जमतंय का पाहतात. पण हे त्या जुनाट नरानं जर पाहिलं तर काही धडगत नाही. तुफान हाणामारी होते मग आणि हारलेला नर जीव वाचवून बुंगाट पळतो; पुढच्या वर्षीची संधी घ्यायला. एक चितळ मी बघितलं होतं असं. मारामारी करायला गेलं आणि समोरच्यानं खच्च्याक करून वीतभर शिंग त्याच्या मानेत खांद्याशी खुपसून मोडलं. त्याचं शिंग मोडलं, पण याची हौसच मोडली. मग धूम-तकाट पळाला हा. मानेत मोडलेलं शिंग तसंच.

असा नवख्याला सूत न जुळवू देणारा हा थोराड विजेता नर मग अख्ख्या कळपात सूतंच सूतं करून टाकतो. सा-या हरिणी भरतो आणि स्वत:चाच वंश टिकेल असं पाहतो. हे महत्वाचं काम झालं, की शिंगं गळतात आणि नर बोडका होतो. किस्सा खतम.

पण पुढच्या वर्षी परत हे १० न् १० म्हणजे २० किलो डोक्यावर उगवायचे म्हणजे गंमत नाही राव! हे कॅल्शियम येणार कुठून इतकं? मग कॅल्शियम भरपूर असणा-या कुरणात चरणं, सापडलेली शिंगं चघळणं असे कॅल्सीरिच उपाय सुरू होतात. तेंव्हा कुठं शिंगं आणि तेंव्हा कुठं सुतावर सूतं. असं हे आहे बघा.

सारई असते ना सारई, म्हणजे आपलं साळींदर. त्यालाही अंगभर काटे यायला हवे असतात. कधी एखादा वाघ नादावतो याच्या मांसाला, कधी बिबटाला हाव सुटते. मग मेहनतीनं उगवलेले आणि काळजीनं सांभाळलेले काटे खर्ची घालावे लागतात. गंमत वाटते खरी पण या साळूच्या काट्यानं फट् म्हणता वाघ मेलेत. कधी कधी हे काटे अंगात घुसून वाकतात आणि निघत नाहीत. जखमा सडतात. जनावर चिडचिडं होतं, त्रासतं. तर असे हे काटे गेले तर साळींदराला ते परत यायला हवे असतात. लवकर यायला हवे असतात म्हणजे Z डिग्री प्रोटेक्शन चालूच राहतं. मग ही साळू अशी रात्री मुळं-फळं धुंडाळत निघाली की हरणाची शिंगंपण शोधते. चघळते.

गंमत अशी की माणसांनाही ही शिंगं हवी असतात. काही तरी शोभेच्या वस्तू-बिस्तू, औषधं बनतात. कफासाठी आयुर्वेदात मृगशृंग भस्म वापरतात ते याचंच. पण अशी शिंगं जवळ बाळगणं गुन्हा आहे. आपल्याकडं सापडलं तर कायद्याचा भुंगा लागतोच आपल्या मागं.

तर मी सांगत होतो जामणीपासून पुढं कसं-कसं, काय-काय. डावी उजवी करत हल्लू हल्लू आगे.

कोसेकनार रस्ता धरून मग खातोड्यातच निघता येतं. नाहीतर मगर टाक्याकडून चितळ रोड पकडा किंवा जामुनबोडीच्या पठारावरून खाली उतरा, विशेष फरक नाही. मी ब-याचदा जामुनबोडीवरून जातो बहुधा. एक छोटासा तुकडा आहे हा, पण मला भारी फील येतो इथं. तो प्रत्येकालाच येईल असं नाही. मला येतो. गवत हिरवं असताना सांबराचे भारीभन्नाट फोटो कुठं मिळत असतील तर ते इथंच.

9E3A8591b.jpg

अर्थात असं मी म्हणतो. तुम्हाला पटलंच पाहिजे असं काही नाही बरं का? अंदाज अपना अपना.

9E3A8567a.jpg

खरं सांगू काय? रानात कुठंही असो. छान वाटत नाही असं काही नसतं. अहो आपल्या घरच्या झाडांच्या कुंड्या ठेवलेल्या गच्चीत किंवा समोर हिरवी टेकडी दिसणा-या खिडकीतसुद्धा मन किती प्रसन्न होऊन जातं?

_MG_3390b.jpg

समजा इकडं नको तर मग पंचधारेतून निघा आपलं सरळ सरळ आणि रेंज ऑफिसपासून सरळ परतीचा रस्ता. या पंचधारेत मी पाहिला होता पहिल्यांदा टी-५४. हे असा मजबूत बॉडीबिल्डर. आता फोटो म्हणाल तर नाही. त्या दिवशी कॅमेराच नव्हता. जामणीकडून पंचधारेकडं येता येता, मगर टाक्याच्या आधी उजव्या हाताच्या नाल्यातून एकदमच हा निघाला. थोडी हालचाल दिसली म्हणून पाहिलं तर टी-५४. हे वाघ ना, खरं म्हणजे खरं भीक घालत नाहीत. त्यानं कौतुक सोडा हो, किमान नैसर्गिक उत्सुकता म्हणून तरी पाहायला हवं ना, की बाबा कोण हा? काय करतोय? बरा आहे का? काही भानगड करतोय का माझ्यासोबत? काय नाय. सरळ आपला चाल्ला. बैलाच्या शिंगावर माशी बसली म्हणून बैलाला काय फरक पडतो? त्याच्या चेह-यावर काय वेगळ्या भावना येतात? काय नाय. तस्साच हा. चाल्ला. लय इन्सल्ट केला राव. बघू पण नाही त्यानं? माणूसकी तर संपलीच म्हणतात, पण आता जनावरकी पण नाय राहिली जगात. बरं आता हे असं एकदा घडलं म्हणून नाही हो!

बघा आता या गेल्या काल-परवाच्या हिवाळ्यात काय झालं, एक ब्लॅक रेडस्टार्ट बसला होता. मराठी नाव लय भारी शोधून ठेवलं आहे ‘कृष्ण थिरथिरा’. याच्या जवळ गेलं की हा उडून पुढं जाणार, पुन्हा जवळ गेलं की उडून पुढं जाणार. असं घुमवत घुमवत नेलं त्यानं. याच्या जवळ जायचं म्हणजे धीराचं काम. मी एक गाणं पण लिहिलं याच्यावर –

थिरथिरा, कृष्ण थिरथिरा
थांबा, धीर जरा धरा
जवळ जरा येऊद्या
मग फोटो निघतो बरा
बोलो ताराराऽऽ, बोलो तारारा ऽऽ

अजून गाणी लिहिणारच होतो. कौतुकानं आमच्या 'हिला' पण ऐकवलं. पण वेगळाच इफेक्ट झाला राव. तर असं गाणं ऐकवल्यावर ते अ‍ॅटॉमिक रिअ‍ॅक्शन की काय ते असं म्हणतात ते झालं बहुतेक आणि मला बायकोनं प्रेमानं जवळ बसवून सांगितलं की, “बघ बाबा रे, तू काही माझा असा जवळचा किंवा खास असा शत्रू नाहीस. पण हे असलं हे, हे लिहून ऐकणा-याचे केस उभे करण्यापेक्षा लॉकडाऊन आहे, रविवारी रिकामा असतोस तर घरी भांडी-बिंडी घास की. उठ”

काऽऽही कदर नाही हो, काऽऽही कदर नाही!

मी तसा शीघ्र कवि, पण रसिकांचा तुटवडा आहे; करता काय? असू द्या आता. भांडी घासण्यापेक्षा काही नं लिहिता गप कोप-यात बसणं आरोग्याला हितकारक आहे अशा एकंदरीत निष्कर्षाला मी पोहोचलो. एक गाणं लिहिण्यापेक्षा दहा पानं लिहावीत. शिवाय त्यामुळं आपला नवरा भलताच हुशार आहे, एकटाकी लिहितो असा बायकोचा समज होतो. ती तशा कृपादृष्टीने माझ्याकडे पाहते. घटिका भरली असली तर हातात भरल्या चहाचा कप देते. मग मी हळूच बघतो, माझ्याही डोक्यावर सांबराची शिंगं उगवलीत की काय?

अरे, अरे अरे! कुठून कुठं पार गेलो मी?

तर मी त्या याच्या मागं, म्हणजे आपल्या त्या ब्लॅक रेडस्टार्टच्या मागं होतो. मग तो एका उघड्या-वाघड्या फांदीवर टुलू-टुलू झोके घेत बसला.

Redstart.jpg

मी त्याच्यावरचा डोळा न हलवता तिथं पोहोचलो. हे भलं डोक्याच्या वर गवत!!! झाडू गवत, मारवेल, वाळा. मी आता तिथं पोहोचलो. त्याला झोके घेण्यातली गंमत समजली असणार. यावेळी तो उडाला नाही; पण मीच उडालो. आता म्हणा का? तर झाली गंमत अशी की, हा गडी डाव्या हाताच्या बोरीवर झोका खेळतोय. मी पाहतोय हे असा. आणि गवताचा पट्टा संपला तिथं गाडी आल्यावर एकदम लक्षात आलं राव, उजव्या हाताला पिवळंधम्मक जनावर लोळलंय उन्हाला.

Tiger--1.jpg

मला तसे फारसे वाघ दिसत नाहीत. म्हणजे मी मागं लागत नाही म्हणून असेल कदाचित. पण जसं काहीच लोकांना भुतं दिसतात, काही लोकांना नाही. त्याचं काहीतरी गणाशी असतं म्हणतात. राक्षसगण, देवगण, मनुष्यगण. तसं वाघ हमखास दिसणा-या, कधी-कधी दिसणा-या आणि न दिसणा-या लोकांच्या गणाचा अभ्यास केला पाहिजे. आता मी मधल्या गटात समजा. माझा कोणता गण माहीत नाही. पण घाई-गडबडीनं १-२ च फोटो घेतल्यावर त्या वाघोबानं मात्र अशी अतिसुंदर पोझ तोडली आणि उठून माझ्याकडं शेपटी करून आपलं दुंगण दाखवत झोपला. माझा गण कळाला नाही, पण त्याचा गण दिसला. कर्म माझं.

असे हे वाघ. जाऊ द्या. माझं त्याला कौतुक नाही, त्याचं मी कशाला करू? आपण काय नुसते वाघ पहायला आलो नाही. जे दिसलं ते आपलं. नाही का?

बरं मी काय म्हणत होतो? या मगर टाक्याची भानगड माहिताय का? टी-१२ आहे ना ताडोब्याची? पांढरपौनीत फिरते. पहिलटकरीण होती. या मगर टाक्यातच बच्चे दिले होते. यांना १-२ वेतानंतरच ‘आई’ची कर्तव्य आणि जबाबदा-या कळतात.

या टाक्याच्या नावाची गंमत म्हणजे सुरूवातीला ताडोबा मगर प्रजनन केंद्र होतं. त्यावेळी मगरींची पिल्लं आणून या टाक्यांत ठेवत होते. आता मगर प्रजनन केंद्र बंद झालं कधीच. पण टाक्याची हौस भागली नाही आणि टी-१२ ला उल्हास फार. तिनंही म्हटलं असेल बघू तरी मगरीच्या माजघरात बाळं ठेवायची चैन करू या वर्षी.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान चालू आहे लेखमाला. वाचतोय, प्रत्येक लेख काही तरी नवीन शिकवून जातोय जंगल आणि तेथील रहिवाशां विषयी.
आमची वाचन भुक अशीच शमवत रहा, खुप खुप धन्यवाद आणि पुलेप्र.

रच्याकने,
>>>
"मी तसा शीघ्र कवि, पण रसिकांचा तुटवडा आहे; करता काय? असू द्या आता. "
>>>
आम्ही आहोत ना ऐकायला इथे, येऊ द्या बाहेर कलागुणांना . लगेच काय काय टी-५४ च्या तोंडी नाही देणार तुम्हाला. Biggrin

वाह! मस्त भाग हाही आणि फोटो पण भारी! वांदरीणीचा फोटो परफेक्ट आलाय. सांबरशिंगं दरवर्षी नवीन उगवतात हे माहिती नव्हतं. What an expensive courtship!

हा भाग सुद्धा अपेक्षेप्रमाणे झक्कास!
वानरांच्या लीला बघत आमचं बालपण गेलं. आमचं घर पहिल्या मजल्यावर. एका बाल्कनी समोर मोठीच्या मोठी गोदामं. गच्चीवर गेले की दोन बाजुंना मोठी पिंपळाची झाडं.
वानरांची टोळी आली की कधी गोदामावर तर कधी पिंपळाच्या झाडावर त्याचा पाडाव असे. त्यांच्या लीला बघण्यात तासन तास जात. तेव्हा कॅमेरा नव्हता.
एकदा मागच्या भिंतीवर वानरं बसली होती. भिंतीच्या फटीतून साप निघाला. एका वानराने त्याला पकडले एक दोनदा भिंतीवर आपटले. मग त्याचे तोंड त्याने भिंतीवर घासले आणि वर करून मेला की जीवंत बघुन पुन्हा घासले. असे घासून मारून सापाला खाली फेकुन दिले.

वा वा! हा भाग खासच जमलाय!
सांबराचा फोटो क्लास!
रेडस्टार्ट आणि वाघोबाही सुंदर!
गळून पडलेली शिंगं हरणं चघळतात ही माहिती रोचक.

साळिंदराचे काटे अंगात घुसल्यामुळे वाघ जखमी, जायबंदी होऊन पुढे नरभक्षक झाल्याचं जिम कॉर्बेटच्या पुस्तकात वाचलंय. पण एकाचं बघून बाकीचे वाघ शहाणे होत नाहीत का? Lol

झकास!

कसलं मस्त लिहीता हो.
एकदा तुमच्याबरोबरच ४-५ कुटुंबांची ट्रिप काढून तुमच्या नजरेने जंगल बघायला हवे.

मस्त खूप आवडले.

मजा आली वाचताना. काही शब्द तर भारी आवडले वांद्र आम्ही यांना वान्नेर म्हणतो, रोडावर, टुलू टुलू

अफाट सुंदर लिहिलंय .. माहिती तर अतिशय रोचक ..
वाचताना.. कसं सांगू का? असं शेजारी बसून कॅज्युअली गप्पा मारता मारता .. किंवा जंगलाच्या पायवाटेने चालत चालत बोलताय असं वाटत ..
खूप छान आणि बारीक निरीक्षणं आहेत तुमची ..
मला पण काही शब्द आणि लिहिण्याच्या लकबी फार आवडल्या .. टुलू-टुलू किंवा पण मोठा नर असला ना सांबरा-बिंबराचा, डावी उजवी करत हल्लू हल्लू आगे. वगैरे Happy
लिहीत राहा !!
पूर्वी बुद्धपौर्णिमेला मचाणावर बसून व्याघ्रगणना होत असे ..(नुसता वाघ नाही इतर प्राणीही अर्थात ) काही ठिकाणी ते आता बंद झालेय .. तुम्ही असे कधी मचाणावर बसून रात्र घालवली आहे का ?त्याबद्दल वाचायला नक्की आवडेल

धन्यवाद पाथफाईंडर, उमा_ , जिज्ञासा, मानव पृथ्वीकर, वावे, अजिंक्यराव पाटील, mi_anu, जयु, आऊटडोअर्स, हर्पेन, वर्षा, अनिंद्य, सुमुक्ता, मित्रहो, मानव पृथ्वीकर, charcha, anjali_kool
@ मानव पृथ्वीकर - वानरं काय वाट्टेल ते उद्योग करतात, पण असा साप मारला हे अजबच.
@mi_anu - Happy योग असले तर असा फेरफटका नक्की मारता येईल.
@ anjali_kool - रात्र मचाणावर घालवणं हा छान आणि वेगळाच अनुभव आहे. अनेक अनुभव आहेत असे. मी काही अनुभव लिहीन. सध्या लिहायला फार जमत नाहीये.

भन्नाट. फा र मस्त वर्ण न