अमेरिका: उच्च-शिक्षित भारतीयांसाठी; स्वप्नपूर्तीचा देश की वेठबिगारीचा (आधुनिक गुलामगिरीचा) सापळा?

Submitted by गुंड्या on 25 August, 2020 - 19:15

नमस्कार,

सर्वप्रथम एवढे मोठे शीर्षक वाचून देखील तुम्हाला पुढे वाचावेसे वाटले ह्या करता सर्वांचे मन:पुर्वक आभार.
अमेरिकेविषयी मराठी तसेच भारतीय वाङ्मय विश्वातील सर्व लेखन प्रकारात, जसे लेख, ललीत, कादंबऱ्या, लघुकथा, क्रिया-प्रतिक्रिया, उखाळ्या पाखाळ्या, वगैरे वगैरे तसेच अमेरिकेतील चांगल्या - वाईट आणि इतर सर्व गोष्टींचा खिस पाडून झाला आहे. तरी मी ह्या लेखमालेतून असे वेगळे काय सांगणार आहे?

आयुष्यातील काही प्रश्न उघड उघड दिसणारे असतात. हातच्या कंकणाला आरसा कशाला? जसे गरिबी, अत्याचार, सामाजिक जीवनातील विषमता वगैरे वगैरे.
काही प्रश्न माहित असतात पण थोडेसे प्रयत्न करून समजून घ्यावे लागतात उदाहरणार्थ दारूचे व्यसन कसे सोडावे? हे प्रश्न दृष्टीस पडतात परंतु किती दारु पिणे म्हणजे व्यसन हे व्यक्तिगणिक प्रमाण बदलू शकते, मते बदलू शकतात.
पण काही प्रश्न खोलात गेल्याशिवाय समजत नाहीत, मुळात त्यांचे अस्तित्वच जाणवत नाही. उदाहरणार्थ मानसिक समस्या. डोळ्यासमोर तर सगळं आलबेल दिसत असतं, परंतु खोलवर समजून घ्यावं लागतं, तेंव्हा कुठे लक्षात येतं की हि समस्या आहे खरी..? हे असे दडलेले, आड- निबिड जागी रुतून बसलेले प्रश्न समजून घेणे म्हणजे ज्ञानेश्वरांनी हरिपाठात म्हटल्याप्रमाणे पारियाचा रवा घेता परोपरी सारखेच आहे. परंतु एकदा त्या समस्येची नस (नाडी) तुम्हाला अचूक कळली की त्याचे दूरगामी आणि भीषण परिणाम समजून घेणं सोपे जाईल. समस्या निर्माण होण्याचे मूळ कारणही लक्षात घेणे मग फार कठीण नाही आणि त्यावर सांगितलेला उपाय समजणे ही तितकेच सोपे होईल.

ह्या लेखमालेतील भाव आणि मुळ समस्या समजून घेण्यासाठी, किंवा उमजण्यासाठी वाचकांना त्यांची अमेरिकेबद्दलची सामान्यपणे असणारी भूमिका आणि मानसिकता थोडीशी बदलणे किंवा त्याकडे थोड्या वेगळ्या दृष्टिकोनातून बघणे आवश्यक आहे. कदाचित हि लेखमाला वाचताना ती बदलेल किंवा वेगळ्या दृष्टीकोनातून वाचताना समस्येच्या भावाशी एकरूप होता येईल अशी आशा करतो. अन्यथा, फसगत होऊन मुळाशी न पोचता, त्यातून निर्माण झालेल्या परिणामांशीच झोंबत बसण्याची शक्यता अधिक आहे.

तर अश्याच काही दडलेल्या, अनवट जागी लपलेल्या परंतु सूर्य-प्रकाशाइतक्या स्वच्छ सर्वांच्या डोळ्यासमोर लखलखणाऱ्या अमेरिकेतील एका "फर्स्ट वर्ल्ड" खुपऱ्या समस्येबद्दल तुमच्याशी संवाद साधणार आहे.

हि लेखमाला, हा भारत विरुद्ध अमेरिका सामना नाही, ह्याची वाचकांनी नोंद घ्यावी. असलाच तर हा अमेरिका विरुद्ध अमेरिका असा अगदी कलगी तुर्याचा सामना नसून एक तुलनात्मक विरोधाभास असू शकतो.

अमेरिकेमध्ये स्थलांतराच्या प्रक्रियेमध्ये ग्रीन कार्ड हा महत्वाचा टप्पा आहे, ग्रीन कार्ड शिवाय व्हिसा-वरच्या वास्तव्यात अनेक निर्बंध आहेत. ग्रीन कार्ड मिळाले तरी त्या व्यक्तीचे नागरिकत्व भारतीयच राहते ह्याची भारतातील वाचकांनी नोंद घ्यावी. ग्रीन कार्ड मिळाल्यावर ती व्यक्ती व्हिसाच्या निर्बंधातून मुक्त होते. लेखमालेत ह्या विषयावर सखोल निरीक्षणे आणि चर्चा होईलच. आज भारतीयांना ग्रीन कार्ड मिळण्याचा कालावधी १५० वर्षे आहे, जो भारतेतर; म्हणजेच जर्मनी, जपान अगदी जगातल्या कुठल्याही देशातून स्थलांतरित झालेल्या व्यक्तीसाठी काही महिने ते एखाद - दोन वर्ष इतका कमी आहे. हे असे का? ह्याचे काय परिणाम आहेत वगैरे वगैरे प्रश्नावर ह्या लेखमालेतून उहापोह करणार आहे. आज दिनांक २८ जुलै २०२० मध्ये किमान १० लाख उच्च-शिक्षित भारतीय; त्यात सायंटिस्ट, डॉक्टर, इंजिनिअर, कॉम्पुटरवाले सगळे, सगळे ह्या सापळ्यात अडकलेले आहेत. गेली पंधरा वर्ष ह्यातून सुटण्यासाठी शासकीय पातळीवर त्यांची एक चळवळ, धडपड सुरु आहे. आणि बदलत्या परिस्थितीनुसार आता तर ह्या आंदोलनाला अमेरिकेतील त्यांच्या अस्तित्वाच्या लढ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

समस्येच्या स्वरूपाची व्याप्ती बरीच मोठी असल्याने निरनिराळ्या विषयांना; जसे अमेरिकेचा इतिहास, राजकारण, समाज-कारण वगैरे स्पर्श होणे स्वाभाविक आहे, परंतु मूळ विषयापासून दूर न जाता इतर विषय गरजेपुरतेच संदर्भासाठी संक्षिप्त रूपात घेतले आहेत.

ह्या लेखमालेचे उद्दिष्ट काय असेल? तर पुढच्यास ठेच, मागचा शहाणा.. ! कुणी अमेरिकेची स्वप्न बघावी की न बघावी, इथे येण्यासाठी धडपड करावी की न करावी हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतू अमेरिकेत आल्यावर पुढे कुठल्या परिस्थितीमधून आपल्याला जायला लागू शकते ह्या शक्या-शक्यतांची जाणीव करवून देणे. त्यामुळे अमेरिकेची स्वप्ने बघताना आपल्यालाही त्याच रांगेत उभे राहायचे आहे, ह्याची माहिती व्हावी ह्याच जात्यातून आपल्यालाही दळून निघायचे आहे ह्याची जाणीव पुढील पिढीला व्हावी ह्या उद्देशाने करवून आणलेला हा लेखन प्रपंच..

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Amendment XIV
Section 1.
All persons born or naturalized in the United States, and subject to the jurisdiction thereof, are citizens of the United States and of the state wherein they reside. No state shall make or enforce any law which shall abridge the privileges or immunities of citizens of the United States; nor shall any state deprive any person of life, liberty, or property, without due process of law; nor deny to any person within its jurisdiction the equal protection of the laws.
बदलायची आहे अमेंडमेंट?

नवीन घटनादुरुस्ती करून १४ वी घटनादुरुस्ती बदलता येऊ शकते.
(१८ वी घटनादुरुस्ती ही २१ व्या घटनादुरुस्तीनुसार नाकारण्यात आली.)

"नवीन घटनादुरुस्ती करून १४ वी घटनादुरुस्ती बदलता येऊ शकते."
घटनादुरुस्ती करणे सोपे नाही. कारण सध्या दोन्ही पक्षांतील तेढ एव्हढी वाढली आहे की साधे साधे कायदे पास होणे कठीण आहे. केवळ दुसरा पक्ष बोलेल त्याच्या विरुद्ध बोलायचे असे चालू आहे. त्या परिस्थितीत अनेक राज्यांचे एकमत होऊन घटनादुरुस्ती होणे कठीण.

अमेरिकेने काय करावे यापेक्षा भारतीयांनी काय करावे याचा विचार करावा. कारण अमेरिकेचे कायदे आवडत नसतील तर यायचे कशाला इथे?
अमेरिकेत येऊन रहाणे पूर्वी इतके चांगले राहिले नाही. आम्ही अनेक वर्षांपूर्वी इथे येऊन राहिलो. आता आम्हाला नविन येणार्‍या, विशेषतः एच १ सारखे परवाने घेऊन रहाणार्‍या लोकांइतके प्रश्न नसतात. तरी देश उतरंडीला लागला आहे असे दररोज जाणवते.
भारतात काय कमी आहे सध्या की ज्यासाठी इतर देशात जावे? नि अमेरिकेत येणे कठिण असेल तर इतर अनेक देश आहेत. विशेषतः, दुर्दैवाने अमेरिकेत वैद्यकीय मदत लागली तर विम्याचे पैसे देऊनहि पुनः खूप जास्त पैसे लागतात. इतर देशात ते फार स्वस्त आहे म्हणे.

“आम्ही अनेक वर्षांपूर्वी इथे येऊन राहिलो. आता आम्हाला नविन येणार्‍या, विशेषतः एच १ सारखे परवाने घेऊन रहाणार्‍या लोकांइतके प्रश्न नसतात. तरी देश उतरंडीला लागला आहे असे दररोज जाणवते.”

नंद्या४३.. अगदी बरोबर बोललात.

Pages