माझा देव

Submitted by SANDHYAJEET on 26 September, 2020 - 12:32

माझा देव !!!

देव फक्त मनातला का प्रत्यक्षातला उत्तर समजावून घेण्याचा आणि देण्याचा हा छोटासा प्रयत्न !!!

आज रोहितच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस होता. बरीचवर्ष बघितलेलं त्याचं स्वप्न आज प्रत्यक्षात उतरलेलं होत. स्वतःच्या हिमतीवर, हुशारीवर आज त्याला गुगल मध्ये महिना हजारो अमेरिकन डॉलर्स पगाराची नोकरी मिळाली होती. इथपर्यंत येण्यासाठी त्यानं जे कष्ट केले होते, एकेक शिखर पादाक्रांत केले होते ते फक्त स्वबळावर, त्यात कोणाचाही कसलाही वाटा नव्हता. देव, नशीब असल्या फालतू गोष्टींवर तर साधा विचार करायलाही त्याने कधी वेळ दिला नव्हता. आज परत एकदा स्वकर्तृत्त्वाचा अभिमान वाटून त्याचा ऊर भरून आला होता. जो कोणी आनंदाची बातमी ऐके तो तो त्याच्या कष्टांबरोबर त्याचे नशीब आणि देवाचेही गुणगान गाई हे ऐकून मात्र त्याला राग येत असे. मी स्वतः नशीब, देव अजिबात मानत नसताना आजूबाजूची लोकं का उगाचच नशीब आणि देवाचा संबंध जोडतात असे त्याला वाटे.

स्वतःच्या कर्तुत्वाबरोबर जगात फक्त एकाच व्यक्तीचे त्याला कौतुक वाटे, ते म्हणजे त्याची आत्या. आंगठेबहादूर असलेल्या आई वडिलांच्या पोटी जन्म घेतलेली आत्या त्याच्यासारखीच स्वकष्टावर शिकून आय सी यु स्पेशलिस्ट डॉक्टर बनली होती. दोन मुली आणि आय सी यु स्पेशलिस्ट डॉक्टर असलेल्या यजमानांबरोबर तिचा संसार एकदम परफेक्ट चालला होता. आत्याची लहानपणापासून असलेली जिद्द, अपार कष्ट करण्याची तयारी यामुळेच ती इथपर्यंत पोहोचून जगातल्या सर्व सुखांना पायाशी लोळण घ्यायला तिने भाग पाडले होते. जीवनाबद्दलची तिची मतं ऐकली की रोहितला मंत्रमुग्ध झाल्यासारखे वाटे. तिची एकच सवय त्याला आवडायची नाही ती म्हणजे आयुष्यात घडलेल्या प्रत्येक गोष्टीचे श्रेय ती देवाला देत असे. मुलींना तिने गणपती स्तोत्र, मारुती स्तोत्र, आरत्या असं बरच काही शिकवलं होत. पूर्ण फॅमिली मिळून रोज संध्याकाळी शुभमकरोती म्हणून देवाचे आभार मानत असत. दरवेळी त्याचा ह्या गोष्टीवर तिच्याशी वाद होत असे. ” देवाला तू मानत नाहीस आणि तू मानावेसे अशी माझी जबरदस्तीही नाही. तू देव मानला नाहीस तरी काही हरकत नाही असं बोलून दरवेळी ती हा विषय सोडून देत असे.

आपल्यापैकी कितीतरी लोकांनाही प्रश्न पडत असतील. देव आहे का. देव मानायचा की नाही. असला तर त्याच किती योगदान असत आपल्या यशात. आपल्याला माहीत असणारे देव, श्रीकृष्ण, श्रीराम ह्यांनी खरंच मनुष्यजन्म घेतला होता का. रामायणं, महाभारत ही फक्त एक गोष्ट आहे का खरंच घडलं आहे.

देव मानला की उपासतापास, खाण्यापिण्याची बंधन येतात म्हणून काही लोक, खास करून तरुण लोक देव मानायचं टाळतात. कोणत्याही ग्रंथ, पुराणात, गीतेमध्ये असे कुठेही लिहून ठेवले नाही की देवाला भेटण्यासाठी उपवास करावा लागेल, श्रावण पाळावा लागेल , मासमच्छी खाता येणार नाही.

मनुष्यप्राणी हा इतर प्राण्यांपेक्षा वेगळा आहे. इतर प्राणी जन्माला येतात, खातात, पितात, नवीन पिढी जन्माला घालतात आणि मरतात. या चार कामांच्या पलीकडे त्यांना खास असं आयुष्याचं काही ध्येय नसतं. मनुष्यप्राण्याला स्मृती, बुद्धी देऊन थोडंसं खास बनवलेलं आहे. त्याचा उपयोग करून जर का त्यानं काही नियम स्वतःला घालून जीवन जगलं तर एक प्रकारची आयुष्याला शिस्त, सुसूत्रता येईल. जनावरं करत असलेली चार काम सोडून अजून काहीतरी चांगलं करण्यासाठी मनुष्यप्राण्याला निर्माण केलेला आहे, ती निर्मिती सफल होईल. प्राणी काय मिळेल ते खाऊन जगतात, उदरनिर्वाह करतात. उद्या जर कोरोनाने सगळं जगचं बुडालं, खाण्याजेवनासाठी दुसरा पर्यायच उरला नाही तर जगण्यासाठी दुसऱ्या प्राण्याला खावचं लागेल, मांसाहार करावाच लागेल, मग त्यावेळी श्रावण काय, गणपती बसले काय आणि नवरात्र चालू असली काय.

देव आहे की नाही या प्रश्नाचं उत्तर शोधायला आपण शास्त्र मानणाऱ्या लोकांनी अध्यात्म शास्त्र आणि डोळ्याला पुरावे देणारी इतर जीव, रसायन, भौतिक, खगोल इत्यादी शास्त्रांचा एकत्र विचार केला पाहिजे, असं मला वाटतं. ऑक्सिजन दिसत नाही याचा अर्थ तो अस्तित्वात नाहीच असं म्हणून चालणार नाही. ऑक्सिजन नसेल तर आपण जगू शकणार नाही. आता कोरोनाच्या पँडेमिक मध्ये तर ऑक्सिजन किती महत्वाचा आहे हे सगळ्यांनाच कळलं आहे.

संपूर्ण ब्रह्मांड अतिशय युनिफॉर्म, एकसारख्या अचल, अजिबात न बदलणाऱ्या तत्वांच्या आधारे रोज वर्षानुवर्षे चालू आहे. प्रत्येक स्तरावर निसर्गातल्या अगदी छोट्यातल्या छोट्या ते मोठयातल्या मोठ्या गोष्टी अगदी ठरल्याप्रमाणे एकही सेकंद इकडे तिकडे न होता वेळेवर चालू आहेत. गुरुत्वाकर्षण स्थिर राहते, त्याच चोवीस तासात पृथ्वी फिरते, प्रकाशाचा वेग बदलत नाही, पृथ्वीवरच पाणी, ऑक्सीजन, पृथ्वीचं सूर्यापासून, चंद्रापासूनच अंतर एकदम बरोबर आहे , पृथ्वीवर आणि आपल्यापासून दूर आकाशगंगांमध्ये आण्विक, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, खगोलशास्त्र अजिबात न चुकता व्यवस्थित काम करत आहेत.

सूर्योदय, सूर्यास्त, चंद्रोदय, चंद्रास्त, आकाशगंगा, सगळे तारे, ग्रह एकदम वेळेवर काम करत आहेत. वीकएंड म्हणून दर रविवारी आपण सातच्या ऐवजी दहाला झोपून उठतो. अनंत वर्षांपासून रोज वेळेवर उगवणाऱ्या सूर्याने असं कधीच केलं नाही. हे सगळं बघीतलं की ब्रह्मांड हे आपोआप निर्माण झालेलं नसून इतका गुंतागुंतीचा निसर्ग, कधीही रहस्य न उलगडलेला मानवी मेंदू आणि अगणित रंग, आकार ओळखणारा मानवी डोळा निर्माण करणारा कोणीतरी खूप हुशार निर्माता असला पाहिजे असं वाटतं .

जिवंत सृष्टी ही विश्वात असलेल्या निर्जीव पदार्थातून निर्माण होऊ शकत नाही. म्हणूनच सजीव प्राणी निर्माण करणारा विश्वाचा निर्माता पण एक जिवंत प्राणी आहे, एक अमूर्त संकल्पना, नुसता तर्क नाही, असा विश्वास ठेवावा असं वाटत. मनुष्याच्या प्रत्येक पेशीमध्ये डीएनए आहे आणि त्याचा एक तंतोतंत संदेश आहे जो पेशी कशी वर्तन करतो हे ठरवितो. हा संदेश एका विशिष्ट भाषेत एक अद्वितीय वर्णमाला वापरुन लिहिलेला आहे. ही स्पेसिफिक भाषा आणि संदेश कसा निर्माण झाला हा विचार केला की निर्मात्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवावा अस वाटतं.

बिग बँग थेअरीच्या आधारे शास्त्रज्ञांना खात्री आहे की आपल्या विश्वाची सुरुवात ऊर्जा आणि प्रकाशाच्या एका प्रचंड स्फोटाने झाली. अस्तित्वात असलेल्या प्रत्येक गोष्टीची ही एक खास सुरुवात होती. हा अचानक प्रकाश आणि पदार्थाचा स्फोट का आणि कशामुळे झाला याबद्दल मात्र शास्त्रज्ञाकडे कोणतेही स्पष्टीकरण नाही. जीव, पहिला मनुष्यप्राणी कसा निर्माण झाला हे अजूनही रहस्यच आहे. कोंबडी आधी का अंड प्रश्न अजूनही अनुरुत्तरीतच आहे.

अध्यात्म शास्त्राच्या आधारे विचार करायचा म्हटलं तर रामायण आणि महाभारताचं उदाहरण घेता येईल. हजारो वर्षांपासून संपूर्ण भारत देश शेकडो पात्र असलेली रामायण आणि महाभारताची गोष्ट एकदम किरकोळ फरक सोडले तर जशीच्या तशी सांगत आहेत म्हणजे त्यात काहीतरी तथ्य असलं पाहिजे.

आस्तिक आणि नास्तिक अशा दोन्ही प्रकारचे लोक या जगात आहेत. देव मानला नाही तरी चालते पण अध्यात्म पुराणातील आणि शास्त्र दोन्हीतील पुरावे एकदा नीट समजून घेऊन शांतपणे विचार करून स्वतः ठरवलं तर बर होईल, असं मला वाटत. शास्त्राच्यापलीकडे जाऊनही एक शक्ती आहे आणि तिलाच निसर्ग, देव अशी अनेक नाव दिलेली आहेत आणि ती शक्ती नाहीच असं मानून चालण्यापेक्षा ती आहे अशी श्रद्धा ठेवली तर समाजासाठी नैतिकता आणि ज्या मूलभूत उद्याच्या आशेवर सुखदुःखानी न डगमगता मनुष्यप्राणी जिवंत आहे ती आबाधीत राहून एक दिवस त्या शक्तीच्या अस्तित्वाची पुष्टी मिळण्याची possibility नष्ट होणार नाही. प्रत्येकजण मीच सर्वशक्तिमान असं मानायला लागला तर जगातली नैतिकता ही संपेल आणि उद्या जग कस चालणार असा प्रश्न पडेल.

असामान्य अशी ती शक्ती ज्याला देव, निसर्ग अशी अनेक नावे देता येतील, हा मनुष्यप्राण्याचा खूप मोठा मानसिक आधार आहे. काही वाईट घडलं तर कोणाला दोष देणार, तो आहे वर बसलेला हक्काने दोष देता येतो. फ्रस्टरेशन काढता येत. सगळ्या सुख दुःखाच्या गोष्टी त्याच्याशी शेअर करता येतात. अजिबात न कुरकुरता तो ऐकून घेतो, आपल्याला नको असलेले सल्लेही देत नाही. आजूबाजूच्या लोकांना, बायको, मुलाबाळांना दोन दिवसही दुर्लक्षित करून चालत नाही. महिनाभर फोन नाही केला तर मित्र पण तक्रार करतो. सगळ्या आजूबाजूच्या मनुष्यप्राण्यांना, घरात पाळलेल्या कुत्र्या मांजरांना पण लक्ष देण्याची गरज असते पण देवाचं तस नाही. रोज आठवण काढली तरीही तो आहे आणि तीन वर्षांचा गॅप घेऊन परत आठवण काढली तरीही तो तिथेच आहे. तो चिडत नाही रागवत नाही, काही अपेक्षा करत नाही.

रोज आई सी यु मध्ये जीवन मरणाचा खेळ जवळून बघणाऱ्या डॉक्टरांना तो आणखीनच जवळचा वाटतो कारण वैद्यकीय शास्त्राच्या पलीकडे जाऊनही एक शक्ती कार्यरत आहे याची ते वेळोवेळी प्रचिती घेत असतात. मला अभिप्रेत असलेला देव मानणं म्हणजे दिवसभर कामधंधा सोडून नुसतं देव देव करत बसण न्हवे. आपल्याला दिलेलं काम १०० % प्रयत्न करून पूर्ण करायचा प्रयत्न करणे आणि वेळोवेळी, जमलं तर रोज क्षणभर, ” मी ” माझ्या पलीकडे जाऊन, हे संपूर्ण ब्रह्मांड चालवणारी या जगात एक शक्ती कार्यरत आहे तिच्यासमोर नतमस्तक होणे, तिचे आभार मानने एवढाच आहे. गणेशोत्सवाला आणि नवरात्रीत दहा दहा दिवस फक्त शरीरानेच नव्हे तर मनाने पण सामील होऊन, रोज क्षणभर मनापासून अगदी जागरूक राहून जे काही नाव द्यायचे असेल ते देऊन त्या अज्ञात शक्ती चे मनापासून आभार मानले तर रोज निरनिराळ्या अनुभूती देणारी ती शक्ती, “माझा देव” प्रत्यक्षात भेटेलही.

(डॉ) संध्याजीत

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

देवाबद्दलच्या argument ला superficially सपोर्ट करणारे सोयीस्कर आणि बरेचसे अर्थाअर्थी संबंध नसलेले inferences काढून मांडलेला फापटपसारा य वेळा वाचला आहे.
रोहित च्या कथेचे पुढे काय झाले ते वाचायला मिळाले तर छान होईल.

छान लिहिलंय!
आस्तिक-नास्तिक हा मत-मतांतराचा विषय आहे.. माझ्या मते अनुभव,अभ्यास, वय यानुसार माणसाचे विचार ठरतात/बदलतात.

रोहित च्या कथेचे पुढे काय झाले ते वाचायला मिळाले तर छान होईल.... एक कथा म्हणून वाचायला सुरुवात केली आणि....

रोहित विश्वनिर्मितीची Big Bang Theory मानतो. पण स्वनिर्मितीसाठी स्वकर्तृत्वाशिवाय तो कशालाही मानत नाही.
भविष्यात होणाऱ्या स्वतःच्या लग्नासाठीही तो योगायोग, दैव, नशीब, स्वर्गात बांधल्या जाणाऱ्या गाठी असं कशालाही मानत नाही. ज्या प्रमाणे स्वकर्तृत्त्वाने मी माझं आतापर्यंतच जीवन घडवलं तसच पुढचंही स्वतःच घडवणार आहे. लग्नासाठी मुलगीही तो स्वतः शोधणार आहे. ती त्याच्या नशिबात आहे म्हणून त्याला मिळणार आहे असं नाही असं त्याच म्हणणं आहे. भविष्यात जर त्याच मत बदललं तर शेअर करायला नक्की आवडेल.

छान लिहिलं आहे. आपल्याला रोजच्या प्रॅक्टिस मध्ये असे कितीतरी अनुभव येतात, जेव्हा आपण दिलेली ट्रीटमेंट एका विशिष्ट लिमीटपर्यंत च काम करते, हे जाणवते. कितीतरी वेळा अशा येतात, की नाव काहीही द्या, पण काहीतरी एक शक्ती आहे, हे मान्य करावेच लागते .