माधुरीचा अक्षै (भाग ३)

Submitted by nimita on 24 September, 2020 - 00:10

एक दिवस ताई रंजीला म्हणाल्या,"रंजू, आज जरा संध्याकाळी पण येशील का गं? उद्या पहाटे तुझे साहेब येणार आहेत घरी ; म्हणून सगळं घर अगदी झाडून पुसून नीट स्वच्छ करायचंय मला, कपाटं आवरायची आहेत, खिडक्यांचे पडदे बदलायचे आहेत....आणि हो- स्वैपाकघरात पण बरंच काम आहे....साहेबांना सगळं कसं अगदी व्यवस्थित आणि जिथल्या तिथे हवं असतं... एकदम परफेक्ट असायला पाहिजे सगळं ..."

ताई किती भरभरून बोलत होत्या .. खूप आनंदात वाटत होत्या - साहजिकच होतं म्हणा .. इतक्या दिवसांनंतर साहेब घरी येणार होते ! रंजी पण खूप उत्सुक होती साहेबांना बघायला. ती पण पहिल्यांदाच भेटणार होती त्यांना - म्हणजे तसे साहेबांचे फोटो बघितले होते तिनी ! ताईंनीच एकदा तिला त्यांच्या लग्नाचा अल्बम दाखवला होता. किती छान दिसत होत्या ताई त्यांच्या लग्नात...आणि साहेब पण खूप खुशीत होते...दोघांचा जोडा अगदी शोभून दिसत होता.. 'इठ्ठल-रखुमाई च जनु' ..असं म्हणत रंजीनी मनातल्या मनात दोघांची दृष्ट काढली होती तेव्हा...

तसं रंजीनी ताईंच्या तोंडून साहेबांबद्दल बरंच काही ऐकलं देखील होतं. साहेब कसे हुशार आहेत... ऑफिस मधले सगळे लोक त्यांना किती मानतात... ते कसे हौशी आहेत ...साहेबांच्या आवडी निवडी... अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरून ताईंना साहेबांची आठवण यायची !एखाद्या सुट्टीच्या दिवशी साहेबांनी देश-विदेशातून त्यांच्याकरता आणलेल्या भेटवस्तू काढून बसायच्या....प्रत्येक वस्तूमागे कितीतरी आठवणी लपलेल्या असायच्या...मग त्या हे असं काहीबाही सांगत राहायच्या - जणू काही आपलं मन मोकळं करायच्या रंजीपाशी !! पण मधूनच कधीतरी बोलता बोलता एकदम गप्प व्हायच्या ; आपल्याच विचारांत गढून जायच्या ...तेव्हा त्यांच्या चेहेऱ्यावर दिसणारी उदासी आणि बेचैनी बघून रंजीच्या पोटात कालवायचं... तिच्या मनात यायचं ..'ह्ये कसलं जगनं? आसं लांब लांब ऱ्हाऊन जगन्याला काय मतलब हाये? त्यापरीस चार पैसं कमी मिळालं तरी चालतील, पन येकत्र ऱ्हावं नवरा बायकुनी !!' अशा वेळी रंजीला अशोकची खूप आठवण यायची. त्यांच्या दोघांच्या नात्यातलं प्रेम, रुसवे फुगवे, दोघांना एकमेकांबद्दल वाटणारी काळजी.... रंजीला खुश ठेवण्यासाठीची त्याची धडपड... सगळं सगळं आठवून तिच्या मनातली अशोक बद्दलची ओढ अजूनच वाढायची.

रंजी या सगळ्या विचारांत गुंग असतानाच ताई तिला हलवत म्हणाल्या," काय गं ? येशील ना संध्याकाळी?" रंजीनी भानावर येत होकार दिला.

ती पूर्ण संध्याकाळ खरंच खूप कामात गेली. ताईंना 'काय करू आणि काय नको' असं झालं होतं. त्यांनी रंजीच्या मदतीनी सगळं घर स्वच्छ केलं. दारं खिडक्यांचे पडदे बदलले. घरात ठिकठिकाणी ताजी सुवासिक फुलं सजवली.. साहेबांना अशी ताजी फुलं खूप आवडायची म्हणे! स्वैपाकघरात तर जणू दिवाळीची तयारी चालू होती... सगळं काही साहेबांच्या पसंतीचं !!

ताई अगदी पुन्हापुन्हा सगळं काही तपासून बघत होत्या ..कुठे काही राहून तर नाही गेलं ? शेवटी रंजी त्यांना म्हणाली सुद्धा ," आवं ताई, तुमी तर आसं घाबरून गेलायसा जनु काई कोनी तुमची परिकसा घ्येनार हाये उद्याला... आवं, थोडं काई कमी ऱ्हायलं तरी काय व्होतंय? सायेब काय बी न्हाई म्हननार ... " रंजीच्या या बोलण्यावर ओशाळल्यागत हसत ताई इंग्रजीमधे काहीतरी पुटपुटत त्यांच्या खोलीत गेल्या.

दुसऱ्या दिवशी सकाळी नेहेमीप्रमाणे रंजी ताईंच्या घरी पोचली. आज तिलाही काहीतरी वेगळंच वाटत होतं. इतके दिवस फक्त ती आणि तिच्या ताई.... एकीकडे कामं करता करता रंजीच्या तोंडाची टकळी पण चालू असायची... त्या दोघींच्या त्या विश्वात जणू तिसऱ्या कोणालाच प्रवेश नसायचा...पण आता साहेब सुद्धा असणार होते घरात....रंजीला थोडं अवघडल्यासारखं होत होतं. ताईंनी दार उघडल्यावर ती हळूच खाली मान घालून स्वैपाकघराच्या दिशेनी निघाली. जाता जाता तिनी चोरट्या नजरेनी बघितलं - साहेब बाहेरच्या खोलीत सोफ्यावर बसून पेपर वाचत होते...रंजीची मान अजूनच खाली गेली. ती नेहेमीच्या सवयीप्रमाणे चहाचं आधण ठेवायला लागली ; तेवढ्यात ताई आत येत म्हणाल्या," तुझा एकटीचाच कर चहा...आमचा दोघांचा झाला मगाशीच." रंजीनी ताईंकडे बघितलं... त्यांच्या चेहेऱ्यावरचा आनंद त्यांच्या आवाजात पण डोकावत होता. ताईंचं ते नवं, लोभस रूप बघून रंजीच्या मनात मिश्र भावना निर्माण झाल्या.. एकीकडे ताईंना असं खुशीत बघून तिला खूप बरं वाटत होतं; तर दुसरीकडे साहेबांबद्दल थोडी असूया पण वाटत होती.... 'तिच्या ताईंच्या भावविश्वात तिच्यापेक्षाही महत्वाची एक व्यक्ती आहे'- ही सत्यस्थिती रंजीला अस्वस्थ करत होती.

पण लवकरच तिनी वस्तुस्थिती स्वीकारली. सुरुवातीला ज्या साहेबांबद्दल तिच्या मनात थोडा आकस होता त्याच साहेबांबद्दल आता रंजीला आदर वाटायला लागला. साहेब होतेच तसे - किती काळजी घ्यायचे ते तिच्या ताईंची ... येता जाता ताईंची तारीफ करायचे.. वागणं बोलणं पण किती फक्कड.. रंजीच्या शब्दांत सांगायचं तर - 'येकदम जंटलमन... म्हंजी अगदी अक्षै कुमार वानी !'

त्यांनी रंजीलाही सांगितलं होतं -" मला साहेब वगैरे नको म्हणू... नुसतं दादा म्हण.."

त्यांचं ते एकदम टापटीप राहणं, काट्या चमच्यानी जेवणं, वाक्यागणिक - सॉरी, थँक यु, प्लीज- असे इंग्रजी शब्द वापरणं.... अगदी रंजीनी त्यांना साधा पाण्याचा ग्लास दिला तरी ते तिला 'थँक यू' म्हणायचे.... रंजी खूप भारावून जायची अशावेळी. तिच्याही नकळत ती तिच्या दादांची आणि अशोकची तुलना करायला लागली होती. अशोकचा अव्यवस्थितपणा, त्याचे ते चुरगळलेले मळके कपडे , गालांवर वाढलेले दाढीचे खुंट ,त्याचं ते थोडंसं गावंढळ वागणं , जेवताना तोंडाचा आवाज करत खाणं... या आणि अशा छोट्या छोट्या गोष्टी आता तिला खटकायला लागल्या होत्या. एक दोन वेळा रंजीनी अशोकला त्याच्या सवयी बद्दलण्याबद्दल आडून आडून सुचवलं देखील होतं ; पण अशोकसाठी या सगळ्या गोष्टी दुय्यम होत्या. तो जरी बोलून दाखवत नसला तरी त्याला रंजीचं हे असं सतत त्याच्या वागण्या-बोलण्यात खोट काढणं अजिबात आवडत नव्हतं...

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users