थोडंसं पेंच आणि बरंचसं ताडोबा – भाग १

Submitted by अरिष्टनेमि on 21 September, 2020 - 12:44
वाघ

महाराष्ट्रात वाघ म्हटलं की ताडोबा आठवतं. कारण जवळपास महाराष्ट्रातले निम्मे-अर्धे म्हणजे ११५ वाघ ताडोबातच आहेत. जवळच्या पेंचमध्येही ६० वाघ आहेत. अर्थात पेंच तसंही ताडोबाच्या अर्धंच आहे म्हणा. पण म्हणून महाराष्ट्रात हमखास वाघ पहायचा तर लोक दोनच ठिकाणं निवडतात; पेंच नाहीतर ताडोबा.

9E3A8273.jpg

पेंच नागपूरहूनच जवळ. एक-दीड तासाचा प्रवास. पेंच तसं मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र मिळून पसरलं आहे. मध्य प्रदेश पेंच जितकं गाजलं आणि लोकांनी डोक्यावर घेतलं, तितकं भाग्य महाराष्ट्र पेंचला नाही लाभलं. महाराष्ट्रात फक्त सिल्लारी गेट पूर्वापार प्रसिद्ध. या गेटला कॅन्टरपण चालतात. स्वस्तात मस्त. आता आता मध्य प्रदेश सीमेवरचं खुर्सापार गेट लोकांनी ‘हिट्ट’ केलं. किती दिवस हे महाराष्ट्र पेंचचं गेट आहे, हेही पर्यटकांना माहीत नव्हतं. ही दोन गेट सोडली तर चोरबाहुली, पवनी, सुरेवानी, खुबाळा, कोलितमारा ही इतर गेट नाही फार चालत. त्यातही चोरबाहुली, सिल्लारी, पवनी आणि खुर्सापार हे एका रस्त्यावर तरी आहेत पण बाकी तीन दिशांना तीन.

पेंचसुद्धा अतिशय सुंदर आहे. पेंच नदीकाठी फुललेली ही क्लिओमची फुलं. ही इथं कोट्यावधी आहेत.

_MG_9748.jpg

आणि या क्लिओमच्या फुलांत रमलेली ही नदी-टिटवी.

_MG_0059.jpg

कोलीतमा-यात पेंच नदीच्या पात्रात मगरीपासून सुरक्षित उंच खडकावर हे बगळे बसले होते. मी थोडा उद्योग करून फोटोचं पेंटिंग केलं.

_MG_8268---Painting.jpg

एका पावसाळी सकाळी पेंचच्या तोतलाडोहचं हे मनोवेधक दृश्य.

_MG_0636a.jpg

२०१७ पर्यंत शेकडो होड्या घेऊन हजारो लोक यात दिवसरात्र मासेमारी करीत. अखेरीस वनविभागानं मोठ्या शर्थीच्या प्रयत्नांनी ते थांबवलं. आता इथं मासेमारांचा गोंधळ नाही, या एका बेटावरून उतरून दुस-या बेटावर पोहत जाणारा वाघ दिसू शकतो. मी पाहिलाय. पण कॅमेराच नव्हता त्या दिवशी.

माकडं पाणी पित होती. वाघ वरुन धावला. अर्धी माकडं काठा-काठानं धावत सुटली. अर्ध्या माकडांनी पाण्यात उड्या मारल्या आणि पोहत निघाली. मागोमाग वाघानं उडी ठोकली आणि पोहत पाठलाग सुरू केला. माकडं जीवाच्या आकांतानं हातपाय मारत होती. पण वाघच तो. त्यानं थोड्याच वेळात पंजाने एक माकड पाण्यातच उलटं-पालटं केलं. पाण्याचा मोठा डोंब उसळला. वाघाच्या तोंडात माकडाची मान होती. काठाशी येऊन वाघ माकडाची हाडं कडाकडा फोडून घास गिळू लागला.
असो.

पेंचपेक्षा प्रसिद्ध ताडोबा. ताडोबाचं नाव भारतातल्या प्रसिद्ध व्याघ्र प्रकल्पांमध्ये घेतलं जातं. जवळ जवळ १३०० चौरस किलोमीटरवर पसरलेलं हे ताडोबाचं दांडगट रान. जाणं येणं जरासं गैरसोयीचं आहे म्हणा. रेल्वे फार सोयीस्कर नाही इथं यायला जायला. रेल्वे, विमान नागपूरपर्यंत. मग बरेच लोक नागपूर किंवा वर्धेला उतरुन येतात. दोन्हीकडनं सारखंच.

आता ताडोबाच्या गेटचं म्हणाल तर कोअर आणि बफर मिळून १९ गेट आहेत. मोहर्ली, खुटवंडा, नवेगाव, कोलारा, पांगडी, झरी, आगरझरी, देवाडा-आडेगाव, जुनोना, रामदेगी-नवेगाव, निमढेला, अलीझंजा, कोलारा झोन, मदनापूर, सिरकाडा, पांगडी झोन, झरी-पेठ, मामला, केसलाघाट. हुश्श!

_MG_2749.jpg

१९ गेट म्हटलं की कधी नाही ते ‘ब्यागा बांधून फिरायला चाल्लेला’ माझ्यासारखा मध्यमवर्गीय (त्यातही कनिष्ठ पद) आडवा होतो. १९??? ही काय गेटची संख्या आहे? रोज एक म्हटलं तर अर्धा महिना इथंच. आणि खर्रर्रच असं राहतो म्हटलं, तर पैसेपण बॅगभर लागतील. पण आहे बुवा असं खरं. चार महीने आधी आरक्षण सुरू होत असल्यानं नियोजन फार अचूक हवं. नाहीतर? मग काय; टूर ऑपरेटरच्या भरवशावर. स्वत: नियोजन करुन जाणारी जनता तशी कमी. एकट्या दुकट्याला तर हा खर्च परवडतच नाही. एक सफारी ४ हजारांपासून ११ हजारांपर्यंत पडते. मुक्कामाचे पुन्हा वेगळे. तरी हौशी लोक ३५-४० हजार खर्च करुन फुल सफारीपण घेतात.

पण ताडोबातही कॅंटर चालतात. एक-दोघांना जायचं असेल तर ही कॅंटर सफारी परवडते. एकदम कमी खर्चात. ४०० रुपये. १५-२० जणांना एकत्र जायचं असेल तरी कॅंटर हा चांगला पर्याय आहे. पण ते ही आधी बुकींग असेल तरच. वेळेवर जाऊन जागा मिळालीच तर घरी गेल्याबरोबर सत्यनारायण घाला नक्की.

जिप्सी सफारी बुकींग आता ऑनलाईन आहे. त्यामुळं तारखा ठरे-ठरेस्तोवर गेटच्या जिप्सी हाऊसफुल्ल. एक वेळ रेल्वे भरणार नाही, त्यात जागा मिळते. पण ताडोबात असं झालं तर तुम्ही पुण्यवान आहात बुवा.

असं तसं करुन रिकामं गेट शोधून बुक करावं, परवडत्या दरात कुठं रहायचं जमतंय का पहावं. एवढं करुन ज्या गेटनं जायचं आहे, त्याच्या जवळ राहण्याची सोय व्हावी, नाहीतर वैताग. रिसॉर्ट कुणीकडं आणि गेट कुणीकडं! असा सारा मामला जमवावा तेंव्हा कुठं जीवात जीव येतो.
बोलो तारारा!

आता एवढं होऊन वाघ दिसला म्हणजे बरं, नाहीतर ‘हॅट सालं! फुक्कट पैसे गेले. काय वाघ-बीघ काय नाही इथं. फसवायचे धंदे आहेत.’ अशा शेलक्या प्रतिक्रिया टाकत दु:खी मनानं आपला घरचा रस्ता जवळ करावा.

एकदा एका गृहस्थांनी फार भारी प्रतिक्रिया दिली. अगदीच लक्षात रहावी. आणि पटली खरं तर मला. ते अनेक वेळा वनभ्रमंतीला जातात. त्यांना कित्येक वेळा वाघ दिसत नाही. मला पेंचमध्ये भेटले त्या दिवशी त्यांची सहावी की कायशी सफारी होती. त्यांना वाघ दिसला नव्हता. पण यावर त्यांचं चक्क म्हणणं पडलं की “वाघ पहायला आम्ही येतो. ती जी वाघ पाहण्याची उत्सुकता असते ना! आणि सतत तणावात असणारे कान, डोळे, कॅमे-याच्या बटणावरचा हात. हे मस्त वाटतं. नशा येते त्याची. वाघ दिसून गेला की पुढची सफारी कंटाळवाणी वाटू लागते. ती शरीरातली-मनातली हूरहूर संपते. रस संपून जातो. हा क्षण मला आवडत नाही.”

शप्पत. काय खरं सांगितलं त्या काकांनी! अफलातून सत्य.

असो. खरं तर आपण फिरतो तेंव्हा वाघ आपल्याला दिसो की न दिसो, त्यानं आपल्याला नक्की पाहिलं आहे याची खात्री तुम्ही बाळगा. कुठं तरी पुतळ्यासारखा थिजलेला किंवा गवतात लोळणारा वाघ कान जागे ठेवून एका डोळ्यानं जगाची सारी खबरबात घेत असतो. तो गवतात दबून बसला तर चक्क दाबून बसवल्यासारखा चेपून जातो; सपाट. बांबूत असला तर हिरव्या-तपकिरी बांबूत त्याच्या अंगावरचे पट्टे बेमालूम मिसळतात. म्हणून काय? तर एकंदरीत वाघ दिसणं हा नशीबाचा खेळ म्हणावा लागेल.

मी पहिला वाघ पाहिला नागझि-यात ध्यानी मनी नसताना. असाच जुलैचा महिना. कंबर-कंबर गवत. तळ्याकाठी मत्स्यगरुड उतरलेला. मासा खात होता. मी दुर्बिणीतून बघत होतो. अचानक तो उडून गेला. काय कळालं नाही बुवा. मी तसाच पहात राहिलो मासा दिसतोय का? कोणी नेतंय का? तिथं वारा नाही, काय नाही अन् झुडपाची पानं हलतायेत. मला काही कळेना. आभाळ भरुन आलंय, कधीही धबाधबा कोसळेल असं डोक्याला टेकू आलंय अगदी. वारा नावाला नाही. हे झुडूप हलतंय कसं? मी दुर्बिणीतून पहात राहिलो. पाच-सात मिनीट. मग ती वाघीण उठून उभी राहिली आणि मागून तीन बच्चे आले तेंव्हा कळालं ते झुडूप नाही, वाघीण पाठीवर झोपून पाय हवेत करुन लोळत होती. ते पट्टे हलत होते अन् मला वाटत होतं की ती झुडपाची पानं हलतायेत. असो.

पण आपण ताडोबाचं बोलत होतो ना! माझं लिहिणं जरा असंच अघळ-पघळ आहे. डावी उजवी करत हल्लू हल्लू आगे.

तर मी काय म्हणत होतो की इतका पैसा खर्च करुन एवढ्या लांबून आल्यावर वाघ दिसो की न दिसो, जे दिसतं आहे त्याचा आनंद लुटायचा की ‘वाघ नाही दिसला हो’ म्हणून रडत रडत जे दिसतं आहे तेही बघायचं नाही हे आपण ठरवायचं आहे.

समजा उत्तरेतून जाता येता वाट वाकडी करुन आग्र्याला एकाच दिवसासाठी गेलात. एक्काच हं! नेमका त्या दिवशी ताजमहाल बंद. मग नियोजन करणा-याला धूम शिव्या. चिडचिड. दिवसभर हॉटेलवर टी.व्ही. पहात बसणं आणि रात्रीच्या रेल्वेनं घरवापसी.

आल्यावर कोणी म्हणतो, “आग्रा!!!!’. अरे वा! दही-जलेबी खाल्लीच असेल. ती पेटंट रेसीपी बरं का.”
“ओह! असं आहे का? नाही बुवा. नाही खाल्ली.”

“किनारी बाजार फिरलात की नाही? कसलं भारी आहे ते मार्केट!”
“नाही बुवा मला हे नव्हतं माहित.”

“बरं. आग्र्याचा प्रसिद्ध पेठा तरी आणलात की नाही? घ्या जरा दोन-दोन पीस, आम्ही पण खाऊ की!”
“आग्र्याचा पेठा प्रसिद्ध आहे? नाही बुवा. गेलोच नाही.”

आपली चिडचिड अजून. ‘अर्रेर्रे………….. ताजमहाल गेलाच होता. पण हेसुध्दा गेलं त्या रागात. आपण पाहिलंच नाही.’ एकदम हेच्च इथं होतं. वाघ-वाघ-वाघ असा धोशा लावून आपण जातो. बाकी काहीच पहायला कुठं थांबत नाही. वाघ दिसला तर ठीक, नाहीतर???
नाहीतर आपला आग्रा होतो..

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

सुंदर फोटो
वाघोबांचे डोळे असलेला फोटो तर अगदी मर जावां.
लिहीलं पण सुंदर आहे. वाघ म्हणजे सिग्नल ला डस्टबिन बॅग विकणारा विक्रेता नव्हे, की तुमची गाडी थांबली की तो धावत दर्शन द्यायला आलाच पाहिजे. योग असेल तर वाघ दिसेल.

माझा आग्रा झालाय!!!

मी नुकताच नोकरीवर लागलो होतो, आमच्या प्रोजेक्टला फंडीग देणाऱ्या संस्थेने जयपूरला ट्रेनिंग ठेवले होते. तिकडून आग्रा चार तासांच्या अंतरावर असल्याने ओघानेच ताजमहाल भेटीचाही बेत आखला. ट्रेनिंग संपल्यानंतरच्या दिवशी पहाटे दोन सहकार्यांसह जयपूरहून शताब्दी गाडीने आग्र्यास गेलो आणि स्टेशनबाहेर पडताच टांगावाल्यास ताजमहालला जायचे भाडे विचारले, तो काही वेळ माझ्याकडे बघतच होता. मला काय झाले म्हणून काही कळेचना. मग म्हणाला साहब, आप कितने दिन आग्रा रुकेंगे, आम्ही संध्याकाळी जयपूरला परत जाणार म्हणून सांगितले, कारण दुसर्या दिवशी जयपूर फिरून रात्री नागपूरला यायचे होते. टांगेवाला हसून म्हणाला साहब, तिकीट निकलनेसे पहले आपने शायद कॅलेंडर देखाही नही. आज जुम्मेका दिन है, ताजमहल बंद होता है. आम्हा सर्वांचे चेहरे बघण्यासारखे झाले होते, हिरमोड झाला होता. ज्याच्या भेटीचा अट्टाहास केला होता, तो क्षण आमच्या चुकीमुळे गमावला होता. नाहीतर आधी शुक्रवारी आम्ही जयपूर फिरून शनिवारी आग्र्यास गेलो असतो. शेवटी टांगेवाल्याच्या सल्ल्यानुसार आग्र्याचा किल्ला व इतर दोन स्थळ बघितली आणि दुपारच्या गाडीचे करंट रिझर्वेशन काढून जयपूरला परतलो. २०१२ सालचा प्रसंग आहे, त्यावेळी नवीन ठिकाणी जाण्याआधी इंटरनेटवर माहिती काढावी, चौकशी करावी असे मुळी ध्यानी आलेच नाही. प्रवासाचा संपूर्ण बेत मीच ठरवला होता. मात्र दोन्ही सहकारी माझ्या हाताखाली काम करत असल्याने ते मला काहीच बोलू शकत नव्हते. ह्यानंतरचे आयतागाजत माझे पुढचे प्रवासबेत फसले नाही. मला जायचे नसले तरी बाबा व काकांना दक्षिण भारताच्या दहा दिवसांच्या भेटीचे नियोजन करून दिले होते आणि दोघांनीही परत आल्यावर माझे खूप कौतुक केले. त्यांचा प्रवास विनाअडथळा व आरामदायी झाला होता. ह्याचे सगळे श्रेय आग्राभेटीला.......

लिखाण आणि फोटो दोन्ही आवडले.
असंच सविस्तर अघळपघळ लिहा.
खरंतर हा विषय असा की समोर बसून ऐकायला जास्त आवडेल.
बघू योग येतोय का!

छान लिहिलंय.
कोलखासला वाघ तेव्हाही (१९८५ -८९) कमीच. पण धारणीफाट्याला रस्त्याच्या बाजूला वाघ दिसतो असे काही लोक हमखास सांगायचे. कोलखासला वाघ पाहिलेलेही बरेच होते. त्यामुळे कोलखासला बरेच वेळा गेलो पण प्रत्येकवेळी आग्रा झाला. तरी मजा खूप यायची.

खरंतर हा विषय असा की समोर बसून ऐकायला जास्त आवडेल.
बघू योग येतोय का!>>> अगदी हर्पेन Happy
हे वाचून खरं म्हणजे लगेच कुठेतरी फिरायला जावंसं वाटतंय. कधी जमणारे काय माहिती!

धन्यवाद जिज्ञासा, maitreyee, mi_anu, उमा_, सामो, राहुल बावणकुळे, वावे, विनिता.झक्कास, चैत्रगंधा, रूपाली विशे - पाटील

@हर्पेन, वावे - खरंच मजा येईल असे एकमेकांचे अनुभव ऐकताना.

@मानव पृथ्वीकर -मेळघाटात वाघ दिसणं तसं कठीणच. अगदी आजही.

मस्त लिहिलंय. हार्पेन ना मम. पहिल्या दोन वाघांच्या फोटोचे काळीज पळवलं. दिल चुरा लिया. माझी इच्छा आहे वाघाला मिठी मारायची. मांजराचे करते तसे वाघाचे लाड करावेसे वाटतात.

लिखाण आणि फोटो दोन्ही एकदम भारी.

यावर्षी पेंचला जायचा प्लॅन केला होता. सगळं नक्की झालेलं आणि ह्या कोरोनाने सगळ्या प्लॅनवर पाणी फिरवलं. Angry आता परत केव्हा जाता येतंय कोण जाणे.

४ एक वर्षांपूर्वी बांधवगडला गेलेलो. असंच पाच सफारी केल्या पण वाघोबांनी काही दर्शन नाही दिलं. पण तरी जंगल सफारी पहिलीच असल्याने मला ते जंगल, ते वातावरण फारच आवडलं.

क्लास लेख न फोटो! वारणा आवडलं. सेम अनुभव.

नागपुरात 6 वर्षे असल्याने पेंच करमाझरी नागझिरा नवेगाव सगळे झाले, ताडोबा शेवटी हुकल Lol

पण काका जे म्हणले ते सत्य. वाघ दिसायच्या आधी आमच्या 10 तरी सफारी झालेल्या. प्रत्येक वेळी वेगळं काहीतरी खास, गरुड, अस्वल लांडगे आदी. पण कर्माझरीला वाघ दिसला अन आमच्या सफाऱ्या बंदच झाल्या.

आता ह्यावर्षीच्या उन्हाळ्यातील ताडोबा कोरोनान खाल्लं Wink

भारी एकदम खूप आवडलं लेखन आणि प्रवास वर्णन
ते वाघ दिसण्याच्या बाबतीतला सल्ला आवडला. मागे आम्ही कान्हाला गेलो असताना तिथल्या गाईडने हेच सांगितले होते. लोक कान्हाला येतात वाघ दिसावा म्हणून प्रयत्न करतात मग दिसला नाही म्हणून रडत परत जातात. कान्हामधे खर तर बारशिंगा नाहीतर ब्लॅक बक बघायला हवे. वाघ कुठे दिसेलही पण हे प्राणी हल्ली दिसनासे व्हायला लागले आहेत. लोक फक्त वाघावर डोळा ठेवून जंगलात येतात. त्यानंतर आम्ही बघितला तो पूर्ण पिसारा फुसवुन थुईथुई नाचनारा मोर. एक नाही दोन मोर. लांडोर कुठेतरी जवळच असेल.
नंतर ताडोबात तो मटकासुर (ही ताडोबातल्या वाघांची नांव) दिसला चांगला १४ मिनिटे, मगर सुद्धा दिसली, माया वाघीणीचे दोन बछडे सुद्धा दिसले पण खूप दुरुन. आता जंगलात जायची इच्छा होत नाही.