खंत.. एक व्यक्त करणे

Submitted by पाचपाटील on 17 September, 2020 - 16:05

आजकाल पूर्वीसारखे खंत व्यक्त करणारे लोक राहीले नाहीत.. आधी कसे स्पेशलाईज्ड लोक होते सगळे..
समाजाच्या नैतिक पतनाबद्दल खंत व्यक्त करणारे वेगळे.. वाढत्या व्यसनाधीनतेबद्दल खंत व्यक्त करणारे वेगळे..
घटस्फोटांबद्द्ल खंत व्यक्त करणारे स्पेशालिस्ट वेगळे.. आपली संस्कृती का काय म्हणतात ती लयास चाललीय
म्हणून खंत व्यक्त करणारे वेगळे..
मूल्यहीन राजकारणाबद्दल खंत व्यक्त करणारे तर पैशाला पासरी उपलब्ध.. त्यांचा काही विषय नाही.

आणि शिवाय प्रत्येकाचा वेगवेगळा स्वॅग असायचा..
काही जण नेम धरून खंत व्यक्त करायचे.. तर काही जण सहज आपलं जाता जाता खंत व्यक्त करायचे.. काही जण, जरा काही विचारायला गेलं की खुर्चीतून ताडकन उठून खंत व्यक्त करायचे.. 'आधी खंत, बाकी सगळं नंतर' अशी त्यांची जाज्वल्य निष्ठा.

शिवाय एखाद्या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून जायचं असेल तर कोणकोणत्या गोष्टींबद्दल खंत व्यक्त केली तर चालेल, ह्याची नीट बसून यादी करावी लागायची... शिवाय घरी सांगून जावं लागायचं ''अगं एss.. ऐकतेस काss..मी जरा जाऊन येतो .. त्या अमक्यातमक्यांनी खंत व्यक्त करायला बोलावलंय मला... येताना काही आणायचं आहे काय?''
आजकाल असं कुण्णी कुणाला काssही सांगत बसत नाही हो..!

''काssही राहीलं नाही आता'' असं म्हणत, नजर किंचित खाली झुकवून, चेहरा आणि हात सायमेल्टीनयसली
हळुवारपणे निराशेनं हलवणं, ही एक खंत व्यक्त करायची अत्यंत प्रभावी पद्धत समजली जायची...
समोरच्या श्रोत्यांपर्यंत ते थेट पोहचायचं आणि श्रोतेसुद्धा 'चुकचुक' असा ध्वनी काढून, मान हलवत, उच्छवास टाकत, सेम प्रतिसाद द्यायचे..
आजकालच्या ह्या लाईव्ह स्ट्रिमींगमध्ये अशी डायरेक्ट पोचपावती मिळत नाही, ही माझी अजून एक खोलवरची खंत..!
दुसऱ्या दिवशी सकाळी पेपर उघडून बघावं लागतं की आपण काल जी खंत व्यक्त केली होती, त्यामुळे समाजावर काही मूलगामी परिणाम झाले आहेत की नाहीत ते..!
झाले नसल्यास 'वाचकांचा पत्रव्यवहार' मध्ये अजून एकदा खंत व्यक्त करावी लागते.. तिथंही नाही झाल्यास आपलं हक्काचं आत्मचरित्र असतंच..!
तिथं पानांपानांवर मोकळेपणाने ऐसपैस खंत व्यक्त करता येते..!
बाय द वे..तुम्हाला हवीय का थोडीशी खंत??‌‌..
घ्या हो.. थोडीशी तरी घ्या.. लाजू नका.. एखादा ग्रॅम तरी घ्या..

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहीलयं,
कशाकशाची खंत करत बसणार हो , कारण मगं खंताच खंता आहेत. Just making a conversation type खंत असेल तर मग हरकत नाही. आम्ही अति थंड प्रदेशात असताना सतत वेदर कसं थंड म्हणून खंतवणे हे एक ग्रिटींग स्किल होते. Happy
Hi , how are you , it's so cold today !! औपचारिक आणि सामुहिक खंत होती ती , पुन्हा सुरक्षीत सुद्धा, वाद व्हायचेच नाही , एकमतच व्हायचे.... Happy
लेख आवडला.

पूर्वीची माबो नाही राहीली - ही खंत आमची नाही. आम्ही आत्ता आत्ता जॉइन झालोय. Happy पण पूर्वीची माबो पहायला मिळाली नाही ही खंत आहे मात्र.

सामो खरंय.
आंतरजालावर अनेक वर्ष बागडत असून देखील मायबोली वर खूप उशिरा आले ही एक खंत , आणि मग अनेक उप-खंत Happy