लेखनस्पर्धा - माझा अनुभव - कोविड -१९ - लॉकडाऊन - प्राचीन.

Submitted by प्राचीन on 3 September, 2020 - 12:18

माझा अनुभव - कोविड -१९ - लॉकडाऊन - प्राचीन.
सूर पुन्हा गवसला (तर) खरा.
एरव्हीदेखील या कालावधीत जरा फुरसतीत राहण्याचे दिवस असतात. त्यामुळे ह्या २०२०मार्च अखेर ते जूनपर्यंत रिकामपण ते काय असतं ना, त्याने मला छळलं नाही; अर्थातच आंतरजाल, दूरचित्रवाणी, भ्रमणध्वनी ( हा शब्दप्रयोग करताना नाटकाचा पडदा वरती जातोय, असे उगाच फीलिंग आले;) Wink ) यांनी सोबत केल्याने.. मुद्दामच दिनक्रम आखीवरेखीव ठेवला होता. त्यामुळे रोज पहाटे पक्ष्यांच्या सुमधूर किलबिलाटाचा नाद ऐकून जाग येत असे ..हो, वाहनांच्या आवाजाची सवय असलेल्या कानांनी हा, नितळ शांततेच्या पार्श्वभूमीवर आलेला सूर अलगद व आनंदाने धरून ठेवला होता. पण आमच्या आसपासच्या परिसरात दोन हॉस्पिटल्स असल्याने मधुनच रुग्णवाहिका रोरावत जायची तेव्हा मात्र नेहमीप्रमाणे काहीशी धडधड व्हायची.
अगदी शंभर पावलांवर भाजी, दूध, किराणा वगैरे उपलब्ध होतं. तेव्हा त्यापलीकडे माझ्या पावलांचा परीघ नसे. मी आजवर कधीही बेकिंग केलेले नाही. पण तेव्हा एकुलत्या एका किराणा दुकानात जात असे, तेव्हा सुरुवातीला काही दिवस 'संपलं' कॅटेगरी मध्ये मॅगी, बिस्किटे, बेकिंग पावडर माचिस असे मानकरी होते, ते बघून उगाचच त्यासाठी रुखरुख लागली, हा गमतीचा भाग.
लोकांना पाककौशल्य आजमावण्यासाठी आवड व सवड दोन्ही असावेत तेव्हा. मायबोलीवर तर तेव्हा खाऊच्या पुनर्निर्देशित झालेल्या धाग्याने जे बाळसं घेतलंय ते अजून उतरलेलं नाही. (त्या गुटीचा एक वळसा आमच्याकडूनही दिला गेलाय). चारी ठाव घरी स्वयंपाक, केरवारे, लादी, भांडी यांना या काळातील फिटनेसचे श्रेय द्यायला हवे. (फिटनेस म्हणजे लॉकडाऊनकाळात आजारी न पडणे हो. :फिदी:) आणि इतरवेळी कमीत कमी ऋतुबदलामुळे सर्दी तरी दाखल होतेच. तीही ह्या वेळी दिसली नाही घरात. त्यामुळे मोठ्या (वयाने) माणसांची एक खास प्रसंगी ऐकलेली उक्ती आठवली. "कामाने माणूस मरत नाही कधी".. अर्थात एरव्ही आपण कामापेक्षा त्याच्या कालमर्यादेमुळे थकतो की काय, असेही वाटून गेले.
एक साचेबद्ध दिनक्रम सुरू होता, तरीही त्यात शिळेपण वाटलं नाही. मधूनच नातेवाईकांना फोन, व्यासंगाकरिता निवांतपणा आणि मायबोली यांमुळे असेल. मध्ये कधीतरी कुटुंबाच्या कायप्पा ग्रुपमध्ये काहीतरी नवा विरंगुळा विषय यायचा. उदाहरणार्थ, आपल्या सध्याच्या एखाद्या घरगुती कामात/छंदात आपण मग्न आहोत, असा फोटो पाठवायचा. पण त्यात मेख अशी, की एखाद्या सिनेमात असलेल्या प्रसिद्ध पोझमधील फोटो हवा. माझ्या एका ताईने लगेच 'मदर इंडिया' शैलीत धुण्याची काठी खांद्यावर घेऊन फोटो पाठवला. मला तर काहीच्या काही कल्पना सुचत होती. आवडीचं पुस्तक हातात घेऊन चष्मा लावून भिंतीला टेकून वगैरे बसायचं (ओळखलं असेलच, की दि. दु. ले. जा. मधील काजोल:डोमा:) पण.. मनाला हौस असली तरी वास्तववादी बुद्धी तिला मागे खेचत होती. पुस्तक व चष्मा एवढीच साम्यस्थळं होती ना. मग काय, नुसताच हातात जाडजूड पुस्तक (दुर्दम्य) घेऊन फोटो काढवला व 'दुर्दम्य' हौस फेडली.
आठवड्यात एकदा तरी जोडीला पाव आवश्यक असेल, असे पदार्थ खायची नतद्रष्ट सवय झाली आहे. त्यामुळे लादीपाव न मिळाले तर (कोविडच्या भीतीने आणले नाही ) तर स्लाइसब्रेड आणला. पण कमी वेळा. (पण बेकिंग वगैरे मार्गावर मुळळीच फिरकले नाही)
मे महिना संपता संपता, चक्क लेकाने रात्रीची भांडी घासायचं मनावर घेतलं. त्यानंतर मी एकदा काहीतरी नवीन पदार्थ केला होता. तर म्हणाला, की "वेगळा पदार्थ केला की भांडी खूप होतात ना?" मला हे उद्गार ऐकून एवढं धन्य धन्य झालं ना.. (पुढील काळात एक मत आपल्या गटात राहण्याची शक्यता)... मुळात लॉकडाऊन मध्ये संचारबंदीदेखील असल्याने लेक घरात असणे, माझ्या नजरेच्या टप्प्यात असणे हा एक मोठाच फायदा झाला होता. त्याच्या येण्याजाण्यावर 'देखरेख' व काही वेळा काळजी करणे ह्या गोष्टी सध्या तरी टळल्या होत्या.
सुरुवातीला संध्याकाळी पाचच्या सुमारास इमारतीच्या आवारात एक चक्कर मारत होते. थोडा स्वार्थ थोडा परमार्थ. फुलं विकत मिळत नव्हती तेव्हा आणि आमच्या इमारतीच्या आवारात अनंतराव व दुहेरी तगर इ. मंडळी आहेत. पण नंतर त्यांच्यावर इतरांच्या नजराही पडू लागल्याने माझी फेरी (की फेरा) जरा अगोदर मारू लागले. नजर तर अशी तयार झाली म्हणून विचारता.. पानाआड म्हणू नका की शेंड्यावर, मी अनंताची फुले नेमकेपणाने शोधून, तेही हिसकाहिसकी न करता, घेऊ लागले. एकदा तर फांदीवर चढण्याएवढं कौशल्य व हिंमत दोन्ही दाखवून दिले. (फिटनेसचे परिणाम)
तर, अवगुंठनात चेहरा ठेवून वावरण्याची सवय झाली. पण एकाच शहरात राहून आईवडील भेटू शकत नाहीत, हे स्वीकारायला मात्र वेळ लागला. त्यातल्या त्यात व्हिडिओ कॉल करता येत होता, ही सोय होती. मध्येच एकदा मास्क /अवगुंठन हाताने शिवण्याचाही उपक्रम केला. चार मास्क शिवून होईपर्यंत अनलॉक वन झाले. तो स्वकष्टार्जित मास्क लावून बाहेर पडले असता एक मैत्रीण भेटली. तर तिने "होममेड मास्क वाटत नाही" असे कौतुकोद्गार काढले. अर्थात माझ्या मनात गुदगुल्या झाल्या.
ऑनलाईन काम करताना काही वेळा कपडे बदलण्याचा कंटाळा येत असे. त्यामुळे यावेळी उन्हाळ्यात वापरण्याचे 'बाहेरचे' बहुतेक कपडे 'कपाटाबाहेर' आलेले नाहीत. इस्त्रीचेही काम वाचले.
अनलॉक वन नंतरच स्कूटर बाहेर काढायचे धाडस केले. कारण सुरुवातीच्या काळात अनावश्‍यक कारणाने गाडी घेऊन जाणाऱ्या लोकांच्या गाडीची हवा पोलीस काढत अशा वार्ता होत्या. शिवाय गाडीत बिघाड वगैरे झाला तर दुरुस्त कसा करणार हेही प्रश्नचिन्ह होते. त्यामुळे एवढे दिवसांनी गाडी चालवता येईल का ह्याबद्दलही थोडी शंका होती.
घराबाहेर रोगाचे थैमान व त्यामुळे मनावर येणारं मळभ घालवण्यासाठी भगवंतावरील विश्वास वाढवायला हवा होता. मग रामाचं नवरात्र सुरू झाल्यानंतर सहज थोडी स्वरांच्या माध्यमातून आराधना करावी, असा विचार केला. लेकाला ही कल्पना आवडली. मग हार्मोनियम च्या साथीने पुढच्या बऱ्याच कातरवेळा सुसह्य होत गेल्या.
दरम्यान, सासूबाईंना दोन वेळा (कोणतीही कोविड लक्षणे नसूनही) दम्याचा अ‍ॅटॅक आला, तेव्हा एकही डॉक्टर उपलब्ध नव्हते. कोणत्याही हॉस्पिटलमध्ये कोविड टेस्ट शिवाय घेत नव्हते. मग एवढं हतबल वाटलं होतं ना.. सुदैवाने एका आयुर्वेदिक डॉक्टरांनी केलेल्या उपचाराने त्या बऱ्याच बऱ्या झाल्या.
बाकी, कोविड रुग्ण सापडला म्हणून सील केलेल्या इमारतींबाबत नुसतं ऐकून होते. पण अनलॉक वन नंतर पावलांचा परीघ थोडा वाढवला, तेव्हा घरापासून काही अंतरावर सीलबंद इमारत बघून जरा धास्ती वाटली. एवढा जवळपास धोका पोहोचला आहे हे लक्षात घेऊन. नंतर एक नातेवाईक व काही परिचितांस करोनाने गाठले व मरणवेळ आणली, हे कळल्यावर खचल्यासारखं वाटू लागलं. आणखी बरेच काही सांगण्यासारखे आहे... पण आता एक उल्लेख करून आवरतं घेते.
बातम्या - सुरुवातीच्या काळात म्हणजे, थाळी वाजवणे व दिवा लावणे येथपर्यंत रोजचा कोविड आकडा कळण्याची उत्सुकता होती. मात्र नंतर दिवसागणिक त्याची चढती भाजणी पाहून बातम्या बघणे नको झाले. (विशेषतः तेव्हा नवरोबा शत्रूच्या प्रदेशात असणं आणि तेथील घडामोडींचा तणाव वाढलेला असणं यांमुळे.. तो वेगळाच विषय व अनुभव आहे. पुन्हा कधीतरी.)
याहीपेक्षा वाईट परिस्थितीत असलेल्या लोकांच्या कहाण्या आमच्या परिचयातील स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून समजल्यानंतर, वाईट तर वाटलंच, शिवाय सगळ्यांच्याच भविष्याची चिंता वाटू लागली.
एकंदरीत, कोविड संकटाने जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन काहीसा बदलला खरा. 'काहीसा' अशासाठी म्हणतेय की, भौतिकवादाचा प्रभाव व रेटाच एवढा असतो की स्वतःला त्यापासून जपणं हे दीर्घकालीन व धैर्याचे काम आहे... पाहूया जमतंय का ते..

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लिहिलंय.
हलकं फुलकं.पण तरीही नवरा त्या देशात असल्याने अस्वस्थता असणार.तुम्ही ती चांगली घेतलीत.

मस्त लिहीलेय

आमच्याकडेही इतर दोघांना 'किती भांडी होतात दिवसभरात!' आणि इथलं बेसिन आपल्या तिथल्या घरातल्या बेसिनसारखं आरामदायी नाहीये ना, पाठ दुखते इथे' अशा सारखी वाक्ये म्हणायचा चान्स या लॉकडाऊनमुळे मिळाला Proud

खरे आहे, मी _अनु. प्रतिसादाबद्दल तुमचे व कविनचे आभार. Bw

एवढे दिवसांनी गाडी चालवता येईल का ह्याबद्दलही थोडी शंका होती. >> हे मला पण जाणवलेले.

छान लिहीलेत प्राची Happy

मंजूताई, हर्पेन, विनिता _झक्कास, आराध्या, बोकलत आणि कमला, तुमच्या प्रतिसादामुळे बरं वाटलं. खरंतर हलकंफुलकं लिहिण्याचाच काय, पण गोष्टी तशा घेण्याचाही फारसा सराव नाही. पण प्रयत्न करत असते तसा. Happy Happy

मस्त!
"कामाने माणूस मरत नाही कधी".. >> Why take chances? Wink

मस्त लिहिलंय.
हलकं फुलकं.पण तरीही नवरा त्या देशात असल्याने अस्वस्थता असणार.तुम्ही ती चांगली घेतलीत.>>>+१११११

एकंदरीत, कोविड संकटाने जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन काहीसा बदलला खरा. '>> अगदी खरं.