प्रकरण ५: अमेरिकेची व्हिसा (परवाना पद्धत) सिस्टिम: बंधने आणि भारतीयांसमोरील पेच.

Submitted by गुंड्या on 3 September, 2020 - 09:33

तसं बघायला गेलं तर कायदेशीर मार्गाने अमेरिकेत येण्यासाठी १८५ प्रकारचे विविध व्हिसा आहेत. परंतू त्यातील भारतीयांसाठी फारच कमी उपलब्ध आहेत. अमेरिकेचे जगाबरोबर व्यापार संबंध जसजसे विस्तारत गेले तसे विविध प्रकारचे व्हिसा अस्तित्वात आले, उदा. इ-३ व्हिसा; हा व्हिसा फक्त ऑस्ट्रेलियन नागरिकांसाठी आहे.

अमेरिकेची व्हिसा पद्धत प्रायोजकत्वाधारित (Sponsorship based) आहे. अमेरिकेतील व्यक्ती/संस्था/कंपनी/.. कुणीतरी तुम्हाला प्रायोजित करणे गरजेचे आहे. आधीच्या लेखात म्हटल्याप्रमाणे, तुम्ही कौटुंबिक; तुमच्या कुटुंबातील अमेरिकन नागरिक असलेला सदस्य, किंवा रोजगाराच्या माध्यमातून; अमेरिका स्थित कंपनीने, तुम्हाला नौकरीच्या निमित्ताने किंवा शिक्षणाच्या माध्यमातून, अमेरिकेतील विद्यापीठाने तुम्हाला प्रवेशासाठी.. वगैरे मार्गातून व्हिसासाठी अर्ज करता येतो. ह्या व्यतिरिक्त अजून मार्ग आहेत, जसे आश्रित (refugee) म्हणून किंवा आंतरराष्ट्रीय मुसद्दी (diplomat) किंवा आंतरराष्ट्रीय संस्थेत, जसे युनो, वर्ल्ड बँक किंवा तत्सम संस्थांमध्ये नौकरीच्या निमित्ताने वगैरे.

अमेरिकेत कायदेशीररित्या वास्तव्यासाठी लागणारी परवाना (व्हिसा) पद्धत दोन (२) श्रेणींमध्ये विभागली आहे. तात्पुरत्या वास्तव्याचा परवाना (temporary non-immigrant visa) आणि कायम (आजीवन) स्वरूपी वास्तव्याचा परवाना (immigrant visa; permanent residency); ह्यालाच ग्रीन कार्ड असेही नाव आहे. दोन्ही परवान्यांमध्ये तुमचे नागरिकत्व भारतीयच रहाते हे लक्षात घेणे महत्वाचे आहे. भारतीय नागरिक म्हणून तुम्ही अमेरिकेत तात्पुरत्या किंवा कायम स्वरूपी व्हिसावर वास्तव्य करू शकता. परंतू दोन परवाना पद्धतीमध्ये व्यक्तीला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांमध्ये जमीन - अस्मानाचा फरक आहे.

सर्व प्रथम आपण तात्पुरत्या स्वरूपाच्या व्हिसाचा विचार करू. पर्यटन, व्यापार, नौकरी, अमेरिकेतील कुटुंबाला भेटण्यासाठी, किंवा उच्च - शिक्षणासाठी वगैरे विविध कारणांसाठी तात्पुरत्या वास्तव्यासाठी अमेरिकेत लोक येत असतात.

पर्यटन, व्यापार किंवा अमेरिकेतील कुटुंबाला भेटण्यासाठी येणारे लोक बी-१ किंवा बी -२ व्हिसाच्या श्रेणीमध्ये येतात. ह्या परवान्याचा कालावधी १-३ महिने इतका अल्प असू शकतो. ह्या परवान्यावर तुम्ही अमेरिकेत उत्पन्नाधारित नौकरी/व्यवसाय करू शकत नाही.

शिक्षणासाठी एफ किंवा एम श्रेणीमध्ये येतात, तर नौकरीसाठी येणारे एच-१ किंवा एल-१ श्रेणीच्या व्हिसाअंतर्गत वास्तव्य करतात. उच्च - शिक्षण, नौकरीसाठी अमेरिकेतील वास्तव्याच्या परवान्याचा कालावधी २ वर्षांपासून ५-६ वर्षांइतका मोठा असू शकतो.

जर तुमच्या प्रायोजकाने; कंपनीने (sponsor), प्रायोजकत्व (sponsorship) काढून घेतले तर त्या क्षणी तुम्ही बे-कायदेशीर ठरता आणि तुमच्या परतीच्या प्रवासाची सोय कंपनीने (sponsor) करणे अपेक्षित आहे. विद्यापीठाने जर तुमचे प्रायोजकत्व काढून घेतले तरी तीच परिस्थिती.

तुमच्या काम करण्याच्या, शिक्षणाच्या जागेची माहिती, सरकार दरबारी नोंदवणे कायद्याने बंधनकारक आहे. तुम्ही अगदी राहायची जागा (घर) जरी बदलली तरी त्याची सरकार दरबारी नोंद करणे अपेक्षित आहे.

अमेरिकेबाहेर जाऊन (भारत-वारी नंतर) काही विशिष्ठ परिस्थितीमध्ये तुमच्या देशातील (भारतातील) अमेरिकेच्या दूतावासातील परवान्यावरच्या मिळणाऱ्या मान्यतेवर, अमेरिकेतील (पुनः) प्रवेश अवलंबून आहे.

तात्पुरत्या स्वरूपाचा परवान्याला कालमर्यादा आहे, त्यामुळे अमेरिकेतील वास्तव्यासाठी परवान्याचे नूतनीकरण करणे गरजेचे आहे आणि नवीन कालावधी किती द्यायचा हे सर्वस्वी सरकारी अधिकाऱ्यावर अवलंबून आहे.

जेंव्हा तुम्ही तात्पुरत्या परवान्यासाठी नवीन अर्ज करता तेंव्हा अर्जावर काम करणाऱ्या अधिकाऱ्याला असे वाटले की तुम्ही तात्पुरत्या परवान्याच्या माध्यमातून अमेरिकेत स्थलांतरण करण्याचा तुमचा उद्देश (हेतू) आहे तर तुमचा अर्ज खारीज होऊ शकतो.

थोडक्यात काय, तर तुमचे अमेरिकेतील वास्तव्य तुमच्या प्रायोजकाच्या (कंपनी) आणि सरकारच्या मुठीत बंद आहे. तुमच्या वास्तव्यासाठीची पात्रता पदोपदी सरकार दरबारी सिद्ध करणे गरजेचे आहे. वाईट काळात एका क्षणात पायाखालचे जाजम खेचून घ्यावे तसे तुमचे वास्तव्य कधीही संपुष्टात येऊ शकते.

कायम (आजीवन) स्वरूपी वास्तव्याचा परवाना (permanent residency; green card);

ह्या परवान्यावर, कुठल्याही प्रायोजकाशिवाय (without sponsor) तुम्ही आजीवन अमेरिकेत वास्तव्य करू शकता, दर १० वर्षांनी तुम्हाला ह्या व्हिसाचे नूतनीकरण करणे गरजेचे आहे, जे तुम्हीच स्वतः करू शकता. मतदानाचा हक्क सोडला तर अमेरिकन नागरिकाप्रमाणेच तुम्ही अमेरिकेत कुठेही मुक्तपणे राहू शकता.

ड्युअल इन्टेन्ट व्हिसा: जे सध्या अमेरिकेत नौकरी करत आहेत त्यांच्यासाठी ग्रीन कार्डसाठी अर्ज करायची वेगळी पद्धत आहे का? तर नाही, त्यांनाही रोजगाराच्या प्रायोजकत्वाच्या (sponsorship) माध्यमातून त्यांची नियोक्ता (sponsor) (कंपनी), ग्रीन कार्डासाठी अर्ज करू शकते. त्यासाठी कायद्यामधे काही तात्पुरत्या स्वरूपाच्या व्हिसांना ड्युअल इन्टेन्ट व्हिसाचे स्वरूप देण्यात आले आहे. एच - १ व्हिसा, के व्हिसा (अमेरिकन नागरिकांच्या विदेशी जोडीदार - नवरा किंवा बायको), एल व्हिसा (कंपनी - ट्रान्सफर) वगैरे व्हिसांचा ड्युअल इन्टेन्ट व्हिसामध्ये समावेश आहे.

रोजगाराच्या माध्यमातून; समजा अमेरिकेत तुम्ही उच्च - शिक्षणासाठी आलात, मग कंपनीने नौकरीसाठी (एच - १ बी) व्हिसा प्रायोजित केला, किंवा तुम्ही थेट नौकरीसाठी (एच - १ किंवा एल - १) आलात.
मागील अंकात लिहिल्याप्रमाणे एच १ - बीची कालमर्यादा; कमाल कालावधी ६ वर्षे (२००० चा अमेरिकन कॉम्पेटिटिव्ह ऍक्ट AC21) संपायच्या आत जर तुमच्या कंपनीने ग्रीन कार्डसाठी अर्ज केला असेल तर तुम्ही तुमचे अमेरिकेतील वास्तव्य अखंडित ठेवून राहू शकता नाही तर मात्र तुम्हाला तुमच्या देशात परत जावे लागते.

कौटुंबिक प्रायोजकत्वाच्या माध्यमातून;
तुम्ही जर के - व्हिसावर अमेरिकेत राहात असाल, तरी कौटुंबिक प्रायोजकत्वाच्या माध्यमातून तुमच्या अमेरिकेतील वास्तव्यात ग्रीन कार्डसाठी अर्ज दाखल करू शकता.

तुमचा ग्रीन कार्डाचा अर्ज ड्युअल इन्टेन्टच्या माध्यमातून जरी दाखल झाला असला तरी अर्जावर जोपर्यंत निर्णय येत नाही (ग्रीन कार्ड मिळत नाही.) तोपर्यंत तुम्हाला तात्पुरत्या स्वरूपाच्या व्हिसाच्या सर्व बंधनातच रहावे लागते. तसेच तुम्हाला तुमच्या देशाचे (भारताचे), अमेरिकेचे सर्व नियम पालन करावे लागते. उदा, अमेरिकेतील तात्पुरत्या स्वरूपाच्या व्हिसाच्या नूतनीकरणाबरोबर तुमच्या देशाचे पारपत्राचे (passport) देखील नूतनीकरण करत रहाणे गरजेचे आहे.

विविध प्रकारच्या माध्यमातून ग्रीन कार्डसाठी अर्ज करण्यात आणि ड्युअल इन्टेन्ट व्हिसाच्या माध्यमातून करण्यात तुलनात्मक दृष्ट्या काय फरक आहे?

आधीच म्हटल्याप्रमाणे, कौटुंबिक, रोजगार किंवा अन्य माध्यमातून ग्रीन कार्डासाठी अर्ज करता येतो. कौटुंबिक श्रेणीमधून (Family Based) जर तुम्ही ग्रीन कार्डसाठी अर्ज केला असेल तर ग्रीन कार्ड मिळेपर्यंत तुम्हाला तुमच्या देशातच (भारतातच) राहावे लागते, तुमचे ग्रीन कार्ड मंजूर झाल्यावर, तुम्ही त्या परवान्यावर अमेरिकेत प्रवेश करु शकता. रोजगाराच्या माध्यमातून (Employment based) देखील तुम्ही ह्याच प्रक्रियेने ग्रीन कार्ड प्राप्त करू शकता. तुमचा ग्रीन कार्डचा अर्ज सरकार दरबारी प्रलंबित असताना जर तुम्ही तात्पुरत्या स्वरूपाच्या परवान्यासाठी अर्ज केलात तर कधी कधी त्यात गुंतागुंत वाढण्याची शक्यता असते.

अन्य प्रकारातील ग्रीन कार्डचा अर्जदार, ग्रीन कार्ड मिळेपर्यंत त्याच्या मूळ देशातच (भारतातच) वास्तव्य करतो परंतू ड्युअल इन्टेन्ट व्हिसाच्या माध्यमातून ग्रीन कार्डसाठी अर्ज केलेले नागरिक, आधीपासूनच अमेरिकेत वास्तव्य करत आहेत. विविध प्रकारचे कर भरत असून त्याचबरोबर सामाजिक, सांस्कृतिक जीवनात समरसून योगदान देत आहेत. इतकेच नव्हे तर व्यक्तिगत आयुष्य; जसे लग्न, मुले (कुटुंब) अशी आयुष्याची चढत्या क्रमाने होणारी, आकार (स्थैर्य), रुजवातही झालेली आहे.

तुम्ही उच्च - शिक्षणासाठी या, पी. एच. डी. करा, पुढे पोस्ट डॉक्टरेट करा, किंवा थेट नौकरीसाठी अमेरिकेत या, ग्रीन कार्ड मिळेपर्यंत तुमचे येथील वास्तव्य विद्यापीठाच्या, कंपनीच्या (प्रायोजकाच्या) आणि अप्रत्यक्षपणे सरकारच्या निर्बंधातच म्हणजे अस्थिरच राहणार आहे.

** जे वाचक अमेरिकेत राहिले आहेत किंवा तुमचा जर अमेरिकन कर-व्यवस्थेशी संबंध आला असेल, तर तुम्हाला अमेरिकेन नागरिक आणि सरकार, कर पद्धतीबद्दल किती जागरूक आणि गंभीर आहेत त्याची जाणीव असेलच.

भारतीयांसमोरील पेच:

आत्तापर्यंत वाचकांच्या हे लक्षात आले असेलच की एखाद्या सामान्य नागरिकांप्रमाणे किंवा तुम्ही महत्वाकांक्षी असाल तर ते "अमेरिकन ड्रीम"चे लक्ष गाठण्यासाठी ग्रीन कार्ड मिळणे किती महत्वाचे आणि गरजेचे आहे.

तुमचा ग्रीन कार्ड मिळण्याचा कालावधी जितका लांबत जाईल, तितके अधिक काळ तुम्हाला बंधनात राहावे लागणे साहजिकच आहे. जगातील इतर देशांच्या बाबतीत; म्हणजे अगदी इंग्लंड, जर्मनी, पाकिस्तान, भूतान, सँडविच आयलंड पासून कुठलाही देशातील नागरिकांना ड्युअल इन्टेन्टच्या माध्यमातून रोजगाराच्या (ड्युअल इन्टेन्ट) माध्यमातून ग्रीन कार्ड मिळण्याचा कालावधी काही महिने, फार फार तर १-२ वर्ष असला तरी फक्त आणि फक्त भारतीयांच्या बाबतीत हा कालावधी सध्या १५० वर्षे आहे. म्हणजे एका अर्थाने भारतीयांना ग्रीन कार्ड नाकारण्यातच आलेले आहे. ह्यात अडकलेल्या भारतीयांची संख्या १० लाखाच्या आसपास आहे. तुम्ही नुकताच ग्रीन कार्डासाठी अर्ज केला असेल किंवा अर्ज करून १० वर्ष झाली असतील, तरीही तुम्हाला सर्व व्हिसा बंधनातच जीवन जगावे लागते. १० लाख भारतीयांचे अमेरिकेतील जीवन हे कायमच्या बंधनात आणि कुणाच्यावर तरी अवलंबून राहणार आहे. ह्याचा थेट परिणाम त्यांच्या जीवनाच्या गुणवत्तेवर (quality of life) झालेला दिसून येतो. त्यावर सखोल चर्चा करायच्या आधी ग्रीन कार्ड प्रदान करायची सिस्टिम कशी काम करते त्याकडे एक नजर टाकूया. त्या सिस्टिम मधील त्रुटी आणि ही परिस्थिती निर्माण होण्याचे मूळ कारणही समजून घेऊया, पुढील लेखात.

https://en.wikipedia.org/wiki/Dual_intent
https://en.wikipedia.org/wiki/Visa_policy_of_the_United_States
https://www.uscis.gov/green-card/green-card-eligibility-categories
https://travel.state.gov/content/travel/en/us-visas/visa-information-res...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमचा अर्ज खारीज होऊ शकतो. = तुमचा अर्ज रद्द होऊ शकतो. असा बदल करू शकाल का?

लेखमाला वाचतोय.
खालील मुद्दे पुढील लेखात येणार आहेत का?
१. साधारण २००४-५ पर्यंत ग्रीनकार्ड साघारण ३-४ वर्षात मिळत असे. मग अचानक भारतीय लोक मोठ्या संख्येने अमेरिकेत आले का? इतर देशांच्या तुलनेत हे प्रमाण अतिप्रचंड का होते? त्यामुळे ग्रीनकार्ड मिळायला लागणारा वेळ प्रचंड प्रमाणात वाढला का?
२. इ बी-१ साठी भारत आणि चीनसाठी साधारण सारखाच वेळ लागतो, इ बी २ च्या तुलनेत. याचा अर्थ असा होऊ शकतो का की अमेरिकेला आता उच्चशिक्षित पी.एच.डी. लोकांनाच प्राधान्य द्यायचे आहे.
३. भारताप्रमाणेच चीनमधील पण बरेच लोक ग्रीनकार्डच्या प्रतिक्षेत आहेत. भारतीयांप्रमाणे ते पण काँग्रेसमध्ये लॉबिइंग करत आहेत का?
४.अमेरिकेत आज साधारण ३० मिलियन लोक बेरोजगार आहेत (ज्यात भारतीय्/चायनीज वंशाचे लोक पण आहेत). अशा परिस्थितीत अमेरिका ग्रीनकार्ड मुद्दाम हळू हळू देत असेल का?
५.भारतीय लोक आता अमेरिकेऐवजी इतर पर्याय (उदा. कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यझीलंड, सिंगापूर वगैरे) बघत आहेत का?
६.त्यामुळे अमेरिकेला तोटा होईल का? की ते आपली गरज इतर कुठून तरी पूर्ण करतील?

चांगली लेखमाला आहे.

मागच्या २०-२५ वर्षांच्या काळात एम्प्लॉयमेण्ट बेस्ड ग्रीन कार्ड मिळण्याचा कालावधी हा एक वर्ष ते १५० वर्षे इतक्या रेंज मधे कमीजास्त झाला आहे. ९० च्या दशकाच्या मध्यावर आलेल्यांकरता (तेव्हा ग्रीन कार्ड अ‍ॅप्लाय केले हे गृहीत धरून) तो पाच वर्षे असे. मग २००० मधे एका वर्षांत मिळत होते. २००१ पासून पुन्हा हा कालावधी वाढायला सुरूवात झाली. तरी सुरूवातीला ३-३.५ वर्षात मिळत होते. त्यानंतर बहुधा लांबत गेले.

यात अमेरिकन सरकारने काही नियमांमधे बदल केले म्हणून हे झाले, की येणार्‍या भारतीयांची संख्या वाढल्याने - हे नक्की माहीत नाही. २००१ साली एक मोठी (बेकायदेशीपणे इथे असलेल्या लोकांकरता - बहुसंख्य मेक्सिकन्स) अ‍ॅम्नेस्टी योजना जाहीर झाली होती साधारण एप्रिल मधे. त्यानंतर हा काळ पुन्हा लांबायला सुरूवात झाली इतके लक्षात आहे. पण एकूण सरकारी नियमांतील बदलांपेक्षा मागणी वाढणे हेच प्रमुख कारण असावे.

१. साधारण २००४-५ पर्यंत ग्रीनकार्ड साघारण ३-४ वर्षात मिळत असे. मग अचानक भारतीय लोक मोठ्या संख्येने अमेरिकेत आले का? इतर देशांच्या तुलनेत हे प्रमाण अतिप्रचंड का होते? त्यामुळे ग्रीनकार्ड मिळायला लागणारा वेळ प्रचंड प्रमाणात वाढला का?
- नव्वदच्या दशकाच्या शेवटी आणि दोन हजारच्या दशकात शिक्षणासाठी आणि नोकरी निमित्त येणार्या भारतीयांची संख्या बरीच वाढली. पण ग्रिन कार्ड चा बॅकलॉग वाढण्या मागे तेवढं एकच कारण नाही. मुळात १ मिलीयन पैकी फ्क्त एक लाख चाळीस हजार ग्रिन कार्ड इ बी प्रकारात असणे, इ बी ३ ते इ बी २ आंतर्गटीय बदल्या (पोर्टींग) , ग्रिन कार्ड्ची एका गटातून इतर गटात केलेली बदली (स्पीलओवर) ई. इथे अधिक माहिती मिळू शकेल.
https://www.happyschools.com/eb-green-card-spill-over-process/
२. इ बी-१ साठी भारत आणि चीनसाठी साधारण सारखाच वेळ लागतो, इ बी २ च्या तुलनेत. याचा अर्थ असा होऊ शकतो का की अमेरिकेला आता उच्चशिक्षित पी.एच.डी. लोकांनाच प्राधान्य द्यायचे आहे.
- नाही. त्या प्रकारात अर्ज करण्यार्या भारतीयांची संख्या तुलनेने (ईतर प्रकारांपेक्षा) कमी आहे.
३. भारताप्रमाणेच चीनमधील पण बरेच लोक ग्रीनकार्डच्या प्रतिक्षेत आहेत. भारतीयांप्रमाणे ते पण काँग्रेसमध्ये लॉबिइंग करत आहेत का?
- काही प्रमाणात. त्यांचा बॅकलॉग भारतीयांच्या तुलनेत कमी आहे, त्यामुळे असेल कदाचीत.
४.अमेरिकेत आज साधारण ३० मिलियन लोक बेरोजगार आहेत (ज्यात भारतीय्/चायनीज वंशाचे लोक पण आहेत). अशा परिस्थितीत अमेरिका ग्रीनकार्ड मुद्दाम हळू हळू देत असेल का?
- अध्यक्षांनी काही महीन्यापुर्वी "अध्यक्षीय फतवा" काढून सर्व ग्रिनकार्ड देण्यावरती बंधनं आणली आहेत.
५.भारतीय लोक आता अमेरिकेऐवजी इतर पर्याय (उदा. कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यझीलंड, सिंगापूर वगैरे) बघत आहेत का?
- हो.
६.त्यामुळे अमेरिकेला तोटा होईल का? की ते आपली गरज इतर कुठून तरी पूर्ण करतील?
- फक्त भारतीयांच्या जाण्याने किंवा कमी येण्याने अमेरीकेला काहीही फरक पडत नाही.