पालकत्वाचा काटेरी मुकुट -किस्सा दोन

Submitted by नादिशा on 27 August, 2020 - 05:10

काही दिवसांपूर्वी सहज यू ट्यूब वर काहीतरी शोधताना करताकरता "सुबोध दादाची गोष्ट" असे नाव दिसले."अनिमाची दम्मा" अशा नावाची गोष्ट दिसली .मी व्हिडीओ चालू करून पाहिला पूर्ण आणि मला खूप आवडला. मग मी ती गोष्ट डाउनलोड केली आणि स्वयम ला- माझ्या मुलाला पहायला लावली. (खरेतर ऐकायला लावली - मी असे का म्हणतेय, हे पुढे सांगणारच आहे. )त्यालाही ती आवडली. छोटीशीच गोष्ट होती, पण मनाला भावणारी होती, सुबोध भावेंनी छान सादर केली होती. स्वयमला मनापासून आवडली, ह्याची खात्री पटल्यावर मी या यू ट्यूब चॅनेल चे सबस्क्रिप्शन घेऊन टाकले . आणि तेव्हापासून स्वयम रोज एकेक गोष्ट पाहतो आहे. (ऐकतो आहे. )

मला यातील सर्वात जास्त काय आवडले असेल, तर गोष्टी ला सुरुवात करताना सुबोध मुलांना जी सूचना देतात , ती सूचना. सुबोध मुलांना सांगतात, "मी जी गोष्ट सांगणार आहे ना तुम्हाला, ती डोळे मिटून ऐकायची. ऐकताना त्यातील पात्रे, वातावरण डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करा. "मला खूप भावली ती गोष्ट.

स्वयमला कळायला लागल्यापासून मी त्याला रात्री झोपताना रोज एक गोष्ट सांगायचा नियम केला . दवाखाना -घर एकहाती सांभाळताना कितीही थकवा आली, तरी यामध्ये खंड पडू दिला नाही. अगदी बाहेरगावी, कुणा नातेवाईकांकडे गेलो तरीही नाही.मग तर तिथे असणारीही मुले गोष्ट ऐकायला यायची.

आपण सांगत असणारी गोष्ट ऐकण्यामुळे मुले एकाग्रचित्त व्हायला शिकतात. सुरुवातीला चंचलपणा असतो, पण हळूहळू ती अगदी तल्लीन होतात, रमून जातात त्या गोष्टीमध्ये.त्यांची कल्पनाशक्ती वाढीला लागते. स्वयम दीड वर्षांचा असल्यापासून चित्रे काढायला लागला, त्यामध्ये या गोष्टी ऐकण्याचा फार मोठा हात आहे.

सुरुवातीला मी त्याला माझ्या स्मरणातील गोष्टी सांगितल्या. मग पुस्तके आणून पुराणांतील, इतिहासातील गोष्टी सांगायचे.एखादा सण आला, तर त्यामागची कहाणी सांगायचे, मग हळूहळू इसापनीती, पंचतंत्र,अल्लाउद्दीन आणि जादूचा दिवा, हॅन्स अँडरसन च्या परीकथा, देशोदेशीच्या, वेगवेगळ्या भाषांमधील बालकथा, अकबर बिरबल,अशा वेगवेगळ्या गोष्टी सांगत राहिले.

मुलांचे भावविश्व अगदी निरागस असते. त्याला आकार देण्यात, ते रंगीबेरंगी बनवण्यात, त्यांच्यामध्ये चांगले गुण, चांगले संस्कार रुजवण्यामध्ये खूप मदत होते गोष्टींनी.

आता वेगवेगळ्या व्हिसीडी उपलब्ध आहेत. यू ट्यूब वर व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते रेडीमेड मुलांच्या हातात देऊन त्यांना गोष्टी पहायला देऊ शकतो आपण. पण त्यामध्ये मुलांच्या कल्पनाशक्तीला फारसा वाव राहत नाही.कुणीतरी त्यांच्या कल्पनेप्रमाणे काढलेल्या कार्टून्स मध्ये बांधून टाकतो आपण मुलांना. सीमित करून टाकतो मुलांची कल्पनाशक्ती. मग त्याच प्रतिमा मुलांच्या मनात राहतात. बी. आर. चोप्रांचे महाभारत आपण सर्वांनी आपल्या लहानपणी पाहिलेले आहे. त्यानंतर काही जणांनी महाभारत परत आणले . पण आपण त्यामध्ये रमत नाही, ते भावत नाही आपल्याला. कारण लहानपणी पाहिलेली च महाभारतातील पात्रे आपल्या मनात घर करून आहेत, त्या जागी दुसरे कुणी पाहू शकत नाही आपण.

आपण सगळेजण आपल्या लहानपणी आकाशातील ढगांमध्ये वेगवेगळे आकार शोधण्याचा खेळ खेळलो आहे. जरा आठवून पाहूया तो. प्रत्येकाला ढगांमध्ये वेगवेगळे आकार दिसायचे. बरोबर ना? हा फरक प्रत्येकाच्या कल्पनाशक्ती मुळे पडायचा. तीच गोष्ट इथेही लागू पडते.एखादी राजाची गोष्ट मी सांगत असेन, तर माझ्या डोळ्यासमोर राजाची जी इमेज येईल, तीच ऐकणाऱ्याच्या डोळ्यासमोर येईल असे नाही, त्याची वेगळी कल्पना असू शकतेच ना !नव्हे ती असतेच. तर अशी कल्पना करण्याचा खेळ मनातल्या मनात गोष्ट ऐकताना खेळता येतो. ही संधी व्हिडिओ पाहताना नाही. दुसऱ्याच्या कल्पनेत जबरदस्ती बसवतो आपण मुलांना यामुळे.त्यांना प्रतिभेच्या अवकाशात मुक्त विहार करण्याची संधी नाही देत.

गोष्ट ऐकवताना आपली भूमिका फक्त मुलांना त्या विश्वात घेऊन जाण्याची असते. जसजसे वय वाढेल त्यांचे, तसे ती त्या ऐकलेल्या गोष्टीवर प्रश्न विचारू लागतात, ते प्रश्न विचारणे त्यांच्या डोक्यात विचारप्रक्रिया चालू असल्याचे द्योतक आहे.त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यात आपली कसोटी लागते. मुलांची चौकसबुद्धी वाढीला लागते यामुळे.मुलांचे विचार कोणत्या दिशेने जात आहेत, हेही आपल्याला समजू शकते त्यांच्या प्रश्नांमधून.

अगदी खरे सांगायचे तर स्वतः गोष्टी सांगणे/वाचून दाखवणे, हे खूप संयमाचे काम आहे.मुलांना मोबाईल वर कार्टून मधील गोष्टी दाखवणे किंवा व्हीसीडी लावणे, हे त्याहून फार सोपे आहे.आपला वेळ वाचतो, मुलांना गुंतवून टाकता येते, आपण आपले काहीतरी करायला मोकळे होतो, आपली शक्ती वाचते.आपली सुटका होते जणू.

पण आपली दुप्पट-तिप्पट वाया गेली, तरी शक्ती - वेळ घालवून मुलांना गोष्ट सांगितली पाहिजे.न थकता, एखादेवेळी आपल्याला अडचणीत आणणारे जरी असले, तरी त्यांच्या प्रश्नांवर न चिडता त्यांना समजतील अशी, त्यांच्या भाषेत, खरी उत्तरे देऊन त्यांचे कुतूहल शमवले पाहिजे, शंका निरसन केले पाहिजे.बहू आयामी बुद्धिमत्ता त्यामुळे मुलांना लाभते.

सतत मोबाईल, टी. व्ही., लॅपटॉप, कॉम्पुटर पाहून, त्यावर प्रोग्रॅम्स पाहून चलत्चित्रे-हलणारी चित्रे पाहण्याची मुलांना सवय लागते.तेच आवडू लागते. आणि मग शाळेत गेल्यावर क्रमिक पुस्तके वाचायला त्यांना आवडत नाहीत. त्या स्थिर मजकुरामध्ये त्यांचा मेंदू रमत नाही,आणि परिणामी मुले अभ्यासात मागे पडतात, हा एक मोठाच प्रॉब्लेम सध्या बाल मानसशास्त्रज्ञांच्या लक्षात आलेला आहे.

दीड वर्षांपासून आत्ता नवव्या वर्षांपर्यंत स्वयम च्या चित्रांमध्ये होत गेलेला बदल - सुधारणा जवळून पाहिल्यामुळे मी खात्रीपूर्वक सांगू शकते त्याची कल्पनाशक्ती फुलली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे ब्लॉक्स जेव्हा आपण विकत घेतो, तेव्हा काहींबरोबर त्यांच्या डिझाइन्स पण मिळतात . पण त्या डिझाईन बरहुकूम बनवणे त्याला कधीच आवडले नाही. तो स्वतः च्या कल्पनेने वेगवेगळ्या गोष्टी बनवतो त्यांच्या. अगदी स्वयंपाकघरामधल्या, घरातल्या वस्तूंपासून ते वेगवेगळी यंत्रे, वेगवेगळ्या पद्धतीच्या च्या गाड्या, स्पेसशिप , भविष्यकाळातील ट्रेन पर्यंत काहीही..त्याची कल्पनाशक्ती वाढत गेल्याचे द्योतक आहे हे. त्याच्या प्रश्नांची खोली ज्या प्रकारे वाढली, त्यानुसार वाढीनुसार येणारी प्रगल्भताही आम्ही अनुभवली आहे. चित्रे काढणे, डान्स, भाषण, अभिनय , खेळ सगळ्या गोष्टी स्वयम आवडीने, अगदी समरसून करतो. बहुआयामी व्यक्तीमत्व बनण्याकडे त्याची वाटचाल चालू आहे आणि यामध्ये गोष्टी ऐकण्याची खूप महत्वपूर्ण भूमिका राहिलेली आहे.

सुबोध जाणीवपूर्वक त्यांच्या चॅनेल मधून गोष्ट सादर करत नाहीत , तर फक्त सांगतात /वाचून दाखवतात. डोळे मिटून गोष्ट ऐका आणि ती गोष्ट तुमच्या नजरेसमोर कशी दिसली, त्याचे चित्र काढून मला पाठवा, असे आवाहन सुबोध भावे एपिसोड मध्ये करतात .मनातील प्रतिमा कागदावर उमटवण्यामुळे मुलांच्या प्रतिभाशक्तीला चालना मिळते, हे आम्ही अनुभवले आहे, अनुभवतो आहेत. नावाजलेले कलाकार असल्याने खूप जनसमुदाय सुबोध भावेंच्या पाठीशी आहे.एवढ्या लोकांसमोर ही गोष्ट आणण्याचे महत्वाचे काम सुबोध करत आहेत .मुले गोष्ट ऐकून त्यांच्या कल्पनेप्रमाणे चित्र काढून त्यांना पाठवतात. मुलांना त्यांच्या भावना प्रकट करायला सुबोध वाव देत आहेत , त्याबद्दल ते खरेच कौतुकास पात्र आहेत .

जास्तीत जास्त लोकांनी त्यांचे हे चॅनेल नक्की घ्यावे आणि स्वतः ला वेळ नसेल, तर सुबोध भावेंच्या गोष्टी तरी ऐकण्याची संधी आपल्या मुलांना उपलब्ध करून द्यावी, असे मी आवाहन करेन. एका विचारपूर्वक केलेल्या या महत्वपूर्ण उपक्रमासाठी सुबोध भावे यांचे मनापासून आभार आणि खूप खूप शुभेच्छा !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप छान लिहिले आहे. सुबोध भावेंचे चॅनेल पाहते.

माझ्यासाठी हा फार महत्त्वाचा विषय आहे. मूल पूर्ण दुर्लक्ष करून दुसऱ्यात खेळात मग्न असेल किंवा ओरडत, धडपडत बेडवरून खाली उतरणे आणि मग एखादी वस्तू दिसली की ती पकडायला निघून जाणे, बेडवरच कोपऱ्यात जाऊन पाठ करून बसणे वगैरे Proud
करत असेल तर काय करावे हेच कळत नाही. मी थोडा वेळ एकटीच बडबडत बसते, कानावर पडेल म्हणून, पण मग माझा पेशन्स संपतो.

काही सेकंदांचा गायत्री मंत्र पण संपूर्ण ऐकून घेत नाही. ना जेवताना, ना झोपताना ना खेळताना. काही मुलांना शारीरिक खेळांमध्येच रस असतो आणि गाणी गोष्टी, श्लोक, स्तोत्र वगैरे जमत नाही असे असते का?

कितव्या वर्षापासून मुलं जरा तरी गोष्ट वगैरे ऐकायला लागतात?

आपल्या सर्वांच्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद !
पीनी, मुळात आत्ताची पिढी च खूप चंचल आहे. फार वेळ कशामध्ये रमत च नाहीत. आणि त्यातही काही मुले अजून जास्त च चंचल असतात . पण त्यांना खूप patience ठेवूनच सवयी लावाव्या लागतात.. गोष्टी ऐकवणे, श्लोक शिकवणे, या सर्व च बाबतीत. थोडी आपली सांगायची पद्धत बदलून पाहायची, त्यांचा काय इंटरेस्ट आहे, ते पाहून, त्याचा आधार घेऊन.. आम्ही डॉक्टर्स कसे कडू गोळी साखरेमध्ये घोळवून देतो ना, अगदी तस्से !
मी स्वयम ला तो नकळता असल्यापासून च गोष्टी ऐकवायला सुरुवात केली. पण दीड वर्षांचा झाल्यापासून तो काळजीपूर्वक ऐकायला लागला, असे मला आठवते आहे.
मी त्याला वाचनाची आवड कशी लावली, लावते आहे, यावर माझा लेख आहे -शब्दांशी मैत्री, या नावाचा, तोही वाचून पहा तुम्ही . लिंक आहे --
https://www.maayboli.com/node/76167

लेख आवडला.. मीही यूट्युबवर कोणतीही गोष्ट न दाखवता पुस्तकांमधील चित्र दाखवत गोष्ट सांगणे पसंत करते.. माझ्या दोन्हीही लेकी त्यात बऱयापैकी रमतात.. मग रात्री झोपताना माझी मोठी लेक दिवसभरात वाचलेल्या गोष्टी स्वतहा नव्याने रचून मला सांगते.. त्या गोष्टीतून तीला नक्की काय कळालंय आणि ती कसा विचार करते हे ऐकायला फारच मजा येते.

नादिशा, तुमचं लेखन वाचताना नेहमी माझ्या मनातील विचार तुम्ही लिहिताय, असंच वाटतं. विशेषतः तुमचे पालकत्वाबद्दलचे लेख वाचताना तर, मीच लिहिलंय की काय इतकं जवळचं वाटतं.

माझ्या लेकीला भाषेची गोडी वाटावी अशी इच्छा होती माझी. सासरी कुणाला वाचनाची आवड नाही, त्यामुळे तिच्यात तरी माझं वाचनवेड उतरावं, असं वाटतं. आता ४ वर्षांची आहे ती. पण अगदी १५ दिवसांची असल्यापासून, तिला झोपवण्यासाठी गाणी गायली; माझे उच्चार स्पष्टच असतील याची खबरदारी घेऊन. मग जसजशी मोठी होत गेली, तशी गाण्यांची संख्या वाढत गेली. तिची आंघोळ, मालिश, भरवणं हे सगळं करताना सुद्धा गाणी असायचीच. यू ट्यूब वर दाखवण्यापेक्षा , मीच जमेल तेवढी बालगीते पाठ केली. मग ती झोपेपर्यंत १०-१२ गाणी ऐकायची. मला कंटाळा आला तर, प्लेअरवर लावायची गाणी. त्यामुळे ती दीड वर्षांची झाल्यावर जेव्हा बोलायला लागली तेव्हा फार काळ बोबडी बोलली नाही. व्यवस्थित उच्चार करायला लागली. शिवाय कानावर पडलेले नवीन शब्दही लगेच आत्मसात करायला लागली. आणि कुठला शब्द कुठे योग्य प्रकारे वापरायचा ,हेही शिकली. अडीच वर्षाची असताना तिला चिडवणाऱ्या शेजारणीला, एकदम भन्नाट वाक्य ऐकवून थक्क केलं होतं तिने. आताही खूप छान बोलते आणि नव्याने अवघड शब्द शिकली तरी उच्चार योग्यच करते. मागच्या वर्षी पासून गोष्टी ऐकवतेय माझ्या खजिन्यातल्या. ते खूपच आवडतं तिला. झोपताना ४ तरी गोष्टी ऐकतेच. आता अक्षर ओळख सुरु झालीय. पण लॉकडाऊनमुळे वाचनासाठी चित्रमय पुस्तक मिळायची अडचण झाली.

रेडीमेड मुलांच्या हातात देऊन त्यांना गोष्टी पहायला देऊ शकतो आपण. पण त्यामध्ये मुलांच्या कल्पनाशक्तीला फारसा वाव राहत नाही.कुणीतरी त्यांच्या कल्पनेप्रमाणे काढलेल्या कार्टून्स मध्ये बांधून टाकतो आपण मुलांना. सीमित करून टाकतो मुलांची कल्पनाशक्ती)))))) याबाबतीत अगदी सहमत.
सुबोध भावेच्या चॅनेलबद्दल माहित नव्हतं. मी नक्की ऐकवेन पण माझ्या लेकीला.

सर्वांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
माऊमैया, अगदी खरे आहे तुमचे. आपण मनापासून कष्ट घ्यावेच लागतात. त्याचे फायदे निःसंशय नंतर जाणवून येतात. मुले स्पष्ट बोलणे, त्यांचा शब्दसंग्रह वाढणे, योग्य ठिकाणी योग्य शब्द वापरणे, भाषेची गोडी लागणे, असे खूप फायदे होतात. डॉ. म्हणून सांगते, वयाच्या 5वर्षांपर्यंत मुलांच्या मेंदूमधील पेशींची वाढ जवळजवळ पूर्ण होते. त्यानंतरच्या काळात त्यांचा आकार वाढतो. त्यामुळे मुलांना ती 5वर्षांची होईपर्यंत जेवढ्या चांगल्या सवयी लावता येतील, तेवढ्या लावाव्यात, त्या जन्मभर टिकतात.
माझा वरती पीनी यांना सुचवलेला "शब्दांशी मैत्री "हा लेख वाचून पहा. "आमची मुले वाचतच नाहीत, "ही तक्रार जेव्हा मला शाळांमध्ये पालकांना मार्गदर्शन करायला बोलावतात, तेव्हा बरेच पालक करतात.अशा सर्वच पालकांसाठी तो लेख मी लिहिलेला आहे. खूप कठीण नसते वाचनाची सवय मुलांना लावणे, हे सांगण्यासाठी.

छान ले़ख! भूतकाळात घेऊन गेला.
मुलाच्या लहानपणी गाणी वगैरे रतीब होताच.पण तो बसायला लागल्यावर प्राण्यांची पुस्तके आण्ली. अगदी २-३ पानी पण एका कागदावर दोनच प्राणी असतील अशी.जेवताना आधीच उल्हास असताना ही पुस्तके उपयोगी पडली.तेही आपली त्यासोबत बडबड करूनच.हे कोण आहे माऊ,माऊ कशी करते, मग माऊचे गाणे अशा रीतीने खिमट संपायची.

धन्यवाद देवकी. एकदम खरी गोष्ट आहे, मुलांना त्यांच्या आवडीच्या विषयात गुंतवले, की त्यांना खाऊ घालणे, अंघोळ, brush, कपडे बदलणे वगैरे गोष्टी आपल्यासाठी खूप सोप्या होऊन जातात, हा माझाही अनुभव आहे.