किल्ल्याचे रहस्य !

Submitted by संयोजक on 23 August, 2020 - 06:49

नमस्कार मायबोलीकर,

आपण सर्वच शाळेत 'इतिहास' हा विषय शिकलो आहोत. पण खरच आपण इतिहास शिकलाय की... वाचलाय??
याच पार्श्वभूमीवर आम्ही एक नवा कोरा उपक्रम घेऊन आलो आहोत.

“दुर्गचरित्र कोडी”!!

-:माहिती आणि स्वरूप:-

या उपक्रमात तुम्हाला चारोळी रूपी कोड्यांवरून केलेल्या वर्णनाप्रमाणे किल्ला ओळखायचा आहे.
२१ किल्यांच्या २१ चारोळ्या!

आम्हाला कल्पना आहे की फक्त चार-चार ओळींमधे मराठेशाहीचा इतिहास मांडणें हि अतिशय अवघड गोष्ट आहे, अशक्यप्रायच म्हणा ना. तरी देखील आम्ही मनापासून केलेला प्रयत्न गोड मानून घ्यावा हि विनंती.

उपक्रमाच्या मागील हेतू हा निव्वळ करमणूक नसून, मराठेशाहीचा दैदिप्यमान इतिहास छोट्याश्या स्वरूपात का होईना पण डोळ्यांखालून जाण्यासाठी केलेली एक आत्मिक धडपड आहे. शिवकालीन इतिहासात व्यक्तिंना फार महत्त्व मिळालंं आहे. पण त्या व्यक्तिंचा कणा असणार्‍या 'किल्ल्यांना' तितकसं महत्त्व अजून तरी दिलं गेलं नाहीये. किंबहुना त्या काळी मिळालेले मह्त्व आपण ते टिकवून ठेवू शकलो नाही.

तर, हे किल्यांच वैभव पुन्हा एकदा सगळ्यांसमोर आणण्यासाठी हे पुष्प आई भवानीच्या चरणी अर्पण!!
“आई जगदंबेला वंदन करून सुरु झालेला हा भाग!! त्यामुळे यश देखील जितपत मिळेल ते आई जगदंबेच्या कृपेने!!”

नियम :-

१) हा उपक्रम त्यातील उत्तरांसकट प्रामाणिकपणे सादर व्हावा.
२) हा उपक्रम असल्याने यात विजेते नसतील.
३) विजेते जरी नसले तरी सगळ्या कोड्यांची उत्तरे बरोबर देणार्‍यास संयोजक मंडळाकडून मानपत्र मिळेल.
४) योग्य उत्तरे देणार्‍यांमधे पहिल्या पाच मावळ्यांनाच हे विशेष असे मानपत्र मिळेल.
५) सर्व उत्तरे ही प्रामाणिकपणे लिहावीत.
६) सगळ्या कोड्यांची उत्तरे एकाच प्रतिसादात देणे बंधनकारक!!

-॥- गणपती बाप्पा मोरया -॥-

१) गिरीदुर्ग मी, अज्ञात माझी स्थापना
प्रताप्राव गुर्जर आणि मोरोपंत पिंगळे
वेढा फोडोनी पाडले इख्लासखाना
नाशिकस्थीत मला आता ओळखा ना.

२) सह्याद्री माझी डोंगररांग
‘प्रचंडगड’ माझे दुसरे नाव
मराठ्यांकडूनि जिंकीले मज तो औरंग
सांगा मी कोण असा हा ‘एकमेव’

३) रायगडस्थित डोंगरी किल्ला
करणे कठीण मजवरी चढाई
मराठ्यांच्या शत्रुंसाठी ‘कारागृह’
३१00 फूट उंचीचा हा किल्ला.

४) मी संपूर्ण काळा पाषाणी
भासतो शिवाच्या नंदीप्रमाणे
गोवेकरांवर नजर माझी पुराणी
कोण हा इतिहासाचा साक्षीदार चिरायुप्रमाणे.

५) कोराईदेवीचे मंदीर अंगावर लेऊनी उभा
कर्नल प्राथरने जिंकीले मज कटाने
त्रिदीवसीय लढाई पाहिलेला मी
त्या आगीत होरपळलेला, कोण मी.

६) बलाढ्य जलदुर्ग कोकणचा मी
बुर्‍हाणखानाचा ३३0 वर्षे अजिंक्य मी
ना जाहलो कधिही मराठ्यांचा
शिव-शंभू नी जाणले मज, आता ओळखा तुम्ही.

७) माझी डोंगररांग महाबळेश्वर
पुरंदरच्या तहातील मी एक
भोरच्या पंतांनी जिंकीले, साक्षी ईश्वर
पाहूया कोण या विचित्रगडाला ओळखेल.

८) सन १६६0 च्या मोहीमेत जिंकीले शिवबाने
सन १७५५ च्या मोहिमेत घेतले तुळाजीने
नानासाहेबाने जिंकायचे राहिलेला मी एकमेव
ओळखता ओळखता स्थलदुर्गावर नजर ठेव.

९) अतिमजबूत मी, बुलंद मी, दुर्जेय मी
आदिलशाहीतून स्वराज्यात आणलेला दुर्ग मी
सुरत लुटी ची संपत्ती याची डोळा पहाणारा मी
नानासाहेबाच्या जावजीने मिळवीलेला दुर्ग मी
इंग्रजांच्या हद्दीत खितपत पडणारा विसापूरचा कोण मी.

१०) कळवणस्थित अतिजीर्ण मी
राघोबा दादा आणि पेशवे
यांची दिलजमाई अनुभवणारा मी
कोण मी, धरब-धारब माझी नावे.

११) छत्रपती शिवाजी महाराजांचा पेशवा
घेवूनी मज, दिला मोघलांसी धक्का
मोरोपंतांनी मजवरी ठेविल्या चार तोफा
गिरीदूर्ग नाशिकस्थित, ओळखेल तो पक्का !!

१२) ठाण्यात व्यवस्थित उभा आहे मी
नाही एकदेखील लढाई पाहिली मी
आजुबाजुच्या अभयारण्यात रमतो मी
२१३७ फूट उंचीचा, ओळखा कोण मी?

१३) दौलताबाद पृथ्वीवर चखोट गड खरा
दौलताबाचे दशगुणी उंच कोणता गड मी
देखताची मज, जाणता राजा वदला
“तक्तास जागा हाच गड करावा”

१४) मराठ्यांची चौथी राजधानी असलेला मी
दोन मासांचा शिवबाचा सहवास लाभलेला मी
सुभानजीने फडकवीलेले मोगली निषाण पाहीले मी
ताराबाईने उद्धरिलेला कोणता हा दुर्ग मी 

१५) दुर्गशृंखलेतील शेवटचा छोटेखानी किल्ला मी
सांगतोय ना सांगलीतले वाळवा हे माझे गाव
पुरे दिलेली एवढीच ओळख, बाकी तूम्हा ठाव
निजाम, मराठे, इंग्रजांना देखीलेला ओळखा कोण मी.

१६) पन्नग्नालय म्हणोनी उदयाच आलो
बाराशे वर्षांच्या इतिहासाने पावन जाहलो
पाहुनी फर्जंदाची उडी, रात्रीच रक्तात नाहलो
ओळखा कोण मी, सिद्दीच्या गुलामीतून मुक्त झालो.

१७) शंकराच्या पिंडीचा आकार मज लाभला
जीर्णनगरात माझा वास सदा राहीला
नाणेघाट डोंगर रांगेतला सदनवर्ग
जन्मला बाळ येथे, कोणता हा दुर्ग.

१८) पाच विभागांचे मुख्यालय म्हणोनी घोषीत
अख्यायिका अमृतप्राशानाची माझ्याइथं
देवांच्या पंगतीत दानव बसला, नेवासेत
मोहिनीने मारीले त्यास, वाहिले नदीरुपी अमृत.

१९) अश्वलायन ऋषिंच्या वास्तव्याने पवित्र झालो
‘अश्वलायनगड’ म्हणवोनी नावारूपास आलो
अकराव्या शतकात भोज राजामुळे निर्मिला गेलो
मोघल, मराठे, इंग्रज तीन सत्तांसी सहवासलो.

२०) नगरचा ओ मी, सर करण्यास कठीण अत्यंत
बाजुला घनदाट जंगले आणि विरळ वस्ती
भरपुर पावसाळे, डोंगररांग माझी कळसुबाई
४५०० फूट उंच, ओळखा की हो आतातरी तुरंत!!

२१) माथेरानी, पक्षी अभयारण्यी असे निसर्ग
रायगडचा एक तेथ, व्यवस्थित गिरीदुर्ग
चढाईस मी साधा, सह्याद्री माझी डोंगररांग
आता मी कोण, हे चट्कन तुच सांग!

-----॥----मायबोली च्या गणेशोत्सव २०२० संयोजन मंडळाकडून हार्दिक शुभेच्छा-----॥----

उत्तरे:
१- साल्हेर
२- तोरणा
३- लिंगाणा
४- कलानिधीगड
५- कोरीगड/शहागड
६- मुरुड-जंजिरा
७- रोहिडेश्वर
८- रसाळगड
९- लोहगड
१०- धोडप
११- मुल्हेर
१२- गोरखगड
१३- रायगड
१४- अजिंक्यतारा
१५- मच्छिन्द्रगड
१६- पन्हाळा
१७- शिवनेरी
१८- रतनगड
१९- सज्जनगड
२०- अलंगगड
२१- कर्नाळा

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे हां उपक्रम.
पण चारोळी ऐवजी पोवाडा संकल्पना असती तर बराच स्कोप मिळाला असता विविधांगी गुणवर्णन करायला.

मी चुकून किल्लीचे रहस्य वाचले, म्हटले किल्ली यांनी काय रहस्य लिहिलंय बघू तर हे वेगळेच निघाले.

दिवा घ्या हो किल्ली ताई

1. साल्हेर
2. तोरणा
6. जंजिरा
12. गोरखगड
13. रायगड
14. अजिंक्यतारा
16. पन्हाळा
21. कर्नाळा

2. तोरणा
5. कोराईगड
6. जंजिरा
16. पन्हाळा
20. हरीश्चंद्रगड
19. सज्जनगड

1.साल्हेर
2.तोरणा
3. लिंगाणा
4. यशवंतगड (रेडीचा किल्ला)
5. कोरीगड
6. जंजिरा
7. रोहीडा
8. सूवर्णदूर्ग
9. लोहगड
10. धोडप
11. मुल्हेर
12. गोरखगड
13. रायगड
14. अजिंक्यतारा
15. बागणी
16. पन्हाळगड
17. शिवनेरी
18. रतनगड
19. सज्जनगड
20. अलंग ? (मात्र तो नगर मध्ये नाही.)
21. कर्नाळा

शालेय इतिहासात तीन चार दुर्गांची नावे येतात - तोरणा, सिंहगड, रायगड, देवगिरी आणि जंजिरा. पण बाकीची किल्ले दुर्गभटके लोकांनाच माहिती आहेत.

इंग्रजांनी तोफा आणल्या लढायांत आणि किल्ल्यांचे अजिंक्यपण संपलं. आणि फितुरी, धाक, लबाडी, यानेही बेलागपणा निरर्थक झाला.

उपक्रम मात्र आवडला आहे.