।।मेलेलं कोंबडं।।। (भाग १)

Submitted by mi manasi on 18 August, 2020 - 10:31

।।मेलेलं कोंबडं।।
(भाग १)

मालकांनी दिलेल्या पगाराच्या नोटा न
मोजताच तशाच हातात गुंडाळून जुई शिलाई मशीनजवळ -आपल्या जागेवर येऊन बसली. तिने मूठ उघडून पाहिली... पाच हजार असतील. हे फारतर एक महिना पुरतील पुढे काय?...

मागच्याच महिन्यात शिंदेकाकूंनी डब्याचे पैसे वाढवून पंच्याहत्तर रुपये केले. दोन
वेळचे एकशे पन्नास.. म्हणजे आता महिन्याचे चार हजार पाचशे होतील …फक्त पाचशे उरतील. इथे दोन वेळा चहा तरी फुकट मिळत होता. सकाळी आल्यावर डब्यातल्या दोन चपात्या खाल्ल्या कि सकाळचा नाश्ता होत होता...

सुट्टीच्या दिवशी सुमाआजींकडे चहा नाश्ता मिळतो. पण आता रोजच सुमाआजींकडे जायचं म्हणजे... पण त्यांच्यापासून लपून तरी कसं राहील? ग्यालरीत नाहीतर त्यांच्याकडे. दोनच तर ठिकाणं आहेत बसायला….

सुमाआजी म्हणायच्या जुईला… “अगं! मीही एकटीच आहे ना? तुला माझी मदत, मला तुझी”...पण जुईला माहित होतं. त्यांचं काय अडणार तिच्याशिवाय? झेपेनासं झालं तर जातील मुलीकडे. मुलगी तर आतासुद्धा एकटी राहू नको म्हणतेय. आजीच तिचं ऐकत नाहीत. म्हणतात...”इकडे मी दोन खोल्यात मावत नाही. तिच्याकडे एका ब्यागेत आणि बसेन त्या कोपऱ्यात असणार ग!”…

दोघीही दिवस ढकलतोय!

त्यावरही आजीचं म्हणणं..."इथे तुझ्यामुळे जीव लागलेला राहतो गं. दोघांना एकमेकांची गरज असते ना तेव्हाच जीव लागतो. गरज संपली कि नुसती शरीराला सोबत.”...

आपल्याला तर आता शरीर आणि मन दोघांनाही त्यांचाच आधार असतो…..

विचार झटकून जुईने पैसे पर्समधे ठेवले…जाऊदे! होईल व्हायचं ते! आजवर कुठे काय ठरवून झालं ते आता होणार? मरणापेक्षा मोठी कोणती शिक्षा राहिलीय आता? सुमाआजीं म्हणतात तसं….‘मेलेलं कोंबडं आगीला घाबरत नाही’….

जुईचं लक्ष गेलं. प्रत्येकजण मालकांपुढे जावून निमूटपणे पगार घेऊन जागेवर बसत होता. आज सकाळी मालक आल्यापासून सगळे गप्पच होते. कधीही काम बंद होऊ शकतं याचा दोन तीन दिवसांपासून अंदाज आला होताच….

जगात सगळीकडेच कोरोनाच्या साथीने थैमान घातलं होतं आणि आता भारतातही त्याची सुरुवात झाली होती. सकाळ संध्याकाळ त्याच्याच बातम्या येत होत्या... मास्क वापरा, एकमेकात अंतर ठेवून राहा...दिवसेंदिवस भीती वाढत होती...

कंपनीच्याही ऑर्डर्स कॅन्सल होत होत्या. शिवाय आता लवकरच लॉकडाउन होईल असंही म्हटलं जात होतं….मालकांनी खरं कधीच काम बंद करायचं ठरवलं होतं. पण मग जातील तेवढे दिवस जातील म्हणत चाललं होतं... आशा मरत नाही ना?…आज मालकांनी झाल्या दिवसांचा सगळा पगारच देऊन टाकला. संपलं सगळं!

सगळ्याचे चेहरे उतरलेले होते. त्यांच्याकडे पाहिल्यावर जुईला वाटलं... आपलं बरं आहे का यांच्यापेक्षा? घरभाडं, लाईटबील, मुलांची फी, औषधपाणी, किती चिंता यांना? आपला खर्च काय? फक्त जेवणाचा डबा, तेल, साबण, बस्स! निलेशने ग्यालरीत राहू दिलंय. थंड पाण्याने का होईना, घरात आंघोळ करू देतोय. अजून तरी त्याचे पैसे मागितलेले नाहीत….

"बघू! काही करता आलं तर मी कळवेन तुम्हाला. आता सरकार काय स्टेप घेईल त्याच्यावर सगळं अवलूंबून!... चला निघूया! सगळ्यांनी काळजी घ्या आपली...सर सलामत तो पगडी पचास...” मालकांनी निघायचा इशारा केला...

सगळे फिक्कट हसले. चेहरे सांगत होते…भीती कोरोनाची नव्हती. कोरोना येईल कि नाही माहित नाही पण भूक रोज येते.…पोट कसं भरायचं?...सगळे शेवटचं भेटावं तसे एकमेकांना भेटले आणि बाहेर पडले. काही स्टेशनच्या रस्त्याला वळले. काही बसच्या. जुई जवळच राहत असल्याने घराकडे जायच्या रस्त्याला वळली…

चालता चालता पावलांबरोबर आता जुईच्या विचारचक्रानेही गती घेतली...

परिस्थिती माणसापेक्षा ताकतवर असते हेच खरं! मोठमोठे उद्योगी हतबल आहेत, तिथे आपल्या दहा माणसांची गारमेंट फॅक्टरी चालवणाऱ्या मालकांनी तरी कसं आश्वासन द्यायचं?...सगळे कधीही कामावर यायला तयार आहेत. भुकेच्या प्रश्नांपुढे महामारीचंही भय नाही वाटत त्यांना...‘मेलेलं कोंबडं आगीला घाबरत नाही’...

"जुई...जुई".....हाक ऐकू आली आणि थांबून जुईने आवाजाच्या दिशेने पाहिलं.रस्त्याच्या पलीकडून हाक मारणाऱ्या सुहासला पाहताच तिच्या कपाळावर आठी पडली..

हा आता येतोय... आठ महिन्यांनी जाऊदे! त्याने कुठे माझं काय होईल याचा विचार केला? माझी लढाई जीवन- मरणाची झाली!…आता वयाची पस्तिशी आली. खोट्या भ्रमात राहायची परिस्थिती नाहीय... जुने घाव बुजून गेलेत. आता नव्याची सुरुवात नको…

विचारसरशी जुई चालायला लागली होती. पण तितक्यात रस्ता क्रॉस करून सुहास तिच्यासमोर आला देखील. तिला थांबावंच लागलं...

क्रमशः

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वावे
Urmila Mhatre
एविता
श्रवू
च्रप्स
हाडळीचा आशिक
प्रितम
कमला
Mrunal Samadhan
धन्यवाद! छान प्रतिक्रियेसाठी आभारी आहे.
कथा शेवटपर्यंत वाचाल अशी अपेक्षा ठेवते. कथेतली जुई आणि ठळक घटना प्रसंग खरे आहेत. ते रंगवलेत मी माझ्या कल्पनेने.
पुढचा भाग आता टाकतेय...