आठवणी ऑलिंपिक्सच्या- माझा अ‍ॅटलांटा ऑलिंपिक्सचा अनुभव- भाग३

Submitted by मुकुंद on 8 August, 2020 - 05:46

मित्रांनो... आता पुन्हा एकदा ऑलिंपिक्सच्या रंजक गोष्टींकडे वळुयात.... आजच्या गोष्टीसाठी आपल्याला पुन्हा एकदा जायचे आहे ऍटलांटा ऑलिंपिक्सला....

मागच्या काही गोष्टीत मी तुम्हाला ऍटलांटा ऑलिंपिक्सचे माझे काही अविस्मरणिय अनुभव सांगितलेले आठवत असेलच. त्या आठवणींबरोबरच ऍटलांटा ऑलिंपिक्सबद्दल सांगताना त्या ऑलिंपिक्सच्या ओपनींग सेरीमनीबद्दल लिहीणे भागच आहे..

कोण विसरु शकेल तो सोहोळा? ऑलिंपिक्सची मोट्ठी मशाल कोण पेटवणार हे नेहमीप्रमाणे याही ऑलिंपिक्समधे सर्वांपासुन लपुन ठेवले होते. ८०,००० प्रेक्षक... ज्यात अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बिल क्लिंटन हेही होते... उत्कंठतेने कोण मशाल पेटवणार याची वाट पाहत होते... मशाल घेउन अमेरिकेची लोकप्रिय जलतरणपटु जॅनेट इव्हान्स जेव्हा स्टेडीअममधे प्रवेशकर्ती झाली तेव्हा सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला... जॅनेटने स्टेडिअमला एक फेरी मारली व ती मोठ्या मशालीच्या खाली येउन उभी राहीली... मग जी व्यक्ती ती मशाल तिच्या हातातुन घ्यायला पुढे आली ती बघुन सर्व स्टेडिअम जल्लोशाने दणदणुन गेले... लटपटत्या पायानी चालणारी ती व्यक्ती होती.... मोहाम्मद अली.... अमेरिकेने जगाला दिलेला आतापर्यंतचा सर्वश्रेष्ठ मुष्टीयोद्धा...!

आज त्याचा हा एवढा मोट्ठा सन्मान अमेरिकेमधे होत होता... पार्किन्सोनीझम झालेल्या.. लटपटत्या.. मोहम्मद अलीचे डोळे... त्या सन्मानाने पाणावलेले होते... व त्याचे ते पाणावलेले.... चकाकते डोळे... सर्व जगाला दिसत होते. अध्यक्ष बिल क्लिंटनही स्वत्:चे अश्रुंनी डबडबलेले डोळे पुसत टाळ्या वाजवत या महान मुष्टीयोद्ध्याचे मनापासुन कौतुक करत होते. १९६४ मधे सनी लिस्टनला हरवुन हेवीवेट बॉक्सींगचा अनभिषिक्त सम्राट झालेल्या या मोहाम्मद अलीला हा मान देण्यामागचे कारण काय होते?तेवढेच नाही तर तेव्हाचे ऑलिंपिक अध्यक्ष... वान ऍंटोनियो समरांच यांच्या हस्ते.... या मोहाम्म्मद अलीला सुवर्णपदकही देण्यात येत होते... कशाबद्दल हे सुवर्णपदक? मोहम्मद अली तर या ऑलिंपिक्समधे कुठल्याच शर्यतीत उतरला नव्हता... आणी अजुन तर स्पर्धांना सुरुवात सुद्धा झाली नव्हती... तर काय कारण होते या आगळ्यावेगळ्या सुवर्णपदक वितरण सोहोळ्यामागे? का मिळत होता अलीला आज हा एवढा मोठा...ऑलिंपिक्सची मशाल पेटवायचा मान?कशाबद्दल होते हे सुवर्णपदक?का एवढे अलीचे डोळे अश्रूंनी डबडबलेले होते? का अध्यक्ष बिल क्लिंटनचेही डोळे आज पाणावले होते?

या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवायला आपल्याला जायला लागेल.... इसवीसन १९६० सालात... ऍटलांटा ऑलिंपिक्सच्या आधी.... ३६ वर्षापुर्वीच्या अमेरिकेत... जो काळ १९९६ च्या काळापेक्षा अतिशय वेगळा होता... त्या अमेरिकेत.... की जी आजच्या अमेरिकेपेक्षा खुपच वेगळी होती...

१९६० च्या अमेरिकेचे वर्णन ऐकताना आजच्या पिढीला त्यावर विश्वास बसणे कठीण जाईल. अमेरिकेतली गुलामगीरी अमेरिकन सिव्हील वॉर नंतर... १८६५ पासुन जरी नष्ट झाली असली तरी १९६० च्या अमेरिकेत... क्रुष्णवर्णियांना मिळणारी वागणुक ही अतिशय हीन दर्जाची होती. त्या लोकांना बसमधे व ट्रेनमधे बसण्याच्या वेगळ्या जागा होत्या... त्यांच्या मुलांना वेगळ्या शाळा होत्या... त्यांना व्हाइट अमेरिकन लोकांच्या उपहारगृहात प्रवेशास व त्यांच्यात मिसळण्यास बंदी होती... त्यांना मतदानाचा हक्क नव्हता... एकुण काय तर.. ते लोक अमेरिकेत दुय्यम दर्जाचे नागरीक म्हणुन जगत होते.

अश्या काळात क्लॅशियस क्ले उर्फ़ मोहाम्मद अली... याचा जन्म अमेरिकेच्या कंटाकी राज्यात लुईव्हील इथे झाला. आपल्या मुष्टीयुद्धाच्या कौशल्यावर... या क्लॅशिअस क्लेची केवळ १८ वर्षाचा असताना..... १९६० च्या रोम ऑलिंपिक्स साठी जेव्हा निवड झाली.... तेव्हा याचा आनंद गगनात मावेनासा झाला. १८ वर्षाच्या कोवळ्या क्लॅशिअस क्लेला आपल्या सॅग्रीगेटेड जिवनाच्या पलीकडच्या जगाची अजुन ओळख झालेली नव्हती. तो अजुन त्याच्याच विश्वात रमुन गेला होता.. तो व त्याचे क्रुष्णवर्णिय सवंगडी... फक्त "निग्रो" लोकांसाठी राखुन ठेवलेल्या उपहारगृहात व क्लब्समधे मजा करत फिरायचे. त्यात त्याला काहीच वावगे वाटत नव्हते. कारण त्याला अजुन याच्या बाहेरचे मुक्त जग माहीतच नव्हते. त्याच्या मते तो जे अनुभवत होता तेच "नॉर्मल " जिवन होते

तर असा हा नाइव्ह पण उत्साहाने ओसंडुन जाणारा क्लॅशिअस क्ले... १९६० च्या रोम ऑलिंपिक्सला येउन दाखल झाला. सगळ्यांना त्याने गर्वाने आधीच सांगीतले होते की मी सुवर्णपदक मिळवायला इथे आलो आहे... माझ्याबरोबर आधीच फोटो काढुन घ्या असे तो विनोदाने सगळ्यांना तिथे सांगत होता.आणी खरोखरच त्याने लाइट हेवी वेट गटातले सुवर्णपदक पटकावुन त्याचे शब्द खरे केले. १८ वर्षाच्या क्लॅशिअस क्लेच्या आनंदाला पारावार राहीला नाही. त्याला त्याच्या सुवर्णपदकाचा एवढा अभिमान होता की तो ते पदक २४ तास गळ्यात घालुन ऑलिंपिक व्हिलेजभर फिरायचा. असेच फिरत असताना एकदा एका रशियन वार्ताहराने त्याला प्रश्न केला की.... एक "निग्रो" म्हणुन त्याचे काय मत आहे की अमेरिकेत त्याच्या सारख्या "निग्रो" ला व्हाइट अमेरिकन लोकांच्या उपाहारगृहात जाउन जेवता येत नाही?त्यावर त्याने पटकन उत्तर दिले की मी जिथे जाउ शकत नाही अश्या उपाहारगृहांची संख्या जिथे मी जाउ शकतो त्यापेक्षा खुपच कमी आहे... आम्हाला अमेरिकेत जे पाहीजे ते खायला मिळते.. आमच्या देशात मस्त गाड्या आहेत आणी अमेरिका जगातला सगळ्यात ग्रेट देश आहे... पण १८ वर्षाच्या बिचार्‍या कोवळ्या क्लॅशिअस क्लेला काय माहीत होते की लवकरच अश्या ग्रेट देशात त्याला कोणता अनुभव अनुभवयाला मिळणार आहे...

रोम ऑलिंपिक्सनंतर अमेरिकेत परत आल्यावर त्याच्या गावात अलीचे जंगी स्वागत झाले. त्याच्या घरी त्याच्या वडिलांनी त्यांच्या घराच्या पोर्चवर अनेक अमेरिकन झेंडे फडकवले होते. त्या पोर्चमधे अलीने त्याच्या वडिलांबरोबर पोझ देउन वार्ताहरांना फोटो काढायला सांगीतले... अर्थातच तेव्हाही त्याचे लाडके सुवर्णपदक त्याच्या गळ्यात लटकवलेले होतेच! त्याचे त्या पदकावर खुप प्रेम होते... तो ते झोपतानासुद्धा गळ्यातच ठेवायचा... थोड्याच दिवसात त्या पदकावरचा सोन्याचा वर्ख निघुन जाउ लागला इतके त्याने ते वापरले. अली व ते सुवर्णपदक.... सगळ्या लुईव्हील गावात अलीची अशी इमेज प्रसिद्ध झाली. अलीच्या मुष्टीयुद्धाच्या कौशल्याला पारखुन लुईव्हीलमधले अनेक लक्षाधीश व्हाइट माणसे अलीला त्यांचे कार्ड देउन गेली. त्यातल्या काहींना त्याचा एजंट बनण्याची इच्छा होती.त्यांनी त्याला सांगीतले की त्याला कधीही कसलीही मदत लागली तर त्यांना नुसता फोन करायचा... ते त्याच्या मदतीला धाउन येतील....

अश्या या सुवर्णपदक विजेत्या अलीला एक दिवशी लुईव्हीलच्या महापौराने त्याच्या कार्यालयात येण्याचे निमंत्रण दिले. त्या व्हाइट महापौराला अलीचे सुवर्णपदक काही प्रतिश्ठीत पाहुण्यांना गर्वाने दाखवायचे होते. बिचारा अली मोठ्या उत्साहाने व गर्वाने महापौराच्या कार्यालयात गेला. तिथे गेल्यावर तो महापौर उपस्थीत असलेल्या पाहुण्यांना अलिचे सुवर्णपदक दाखवुन सांगु लागला की अलीने रोमला एका रशियन वार्ताहराला कसे सडेतोड उत्तर दिले की "निग्रो" असुनही अलीला कसे लुईव्हीलमधे राहायला आवडते... वर पुढे जाउन त्या दिडशहाण्याने.. पदरचे मोडुन.... असेही अलीच्या देखत सांगीतले की... अली त्याला म्हणाला की आफ़्रीकेत सापांशी लढत बसण्यापेक्षा किंवा चिखलाच्या भिंती असलेल्या झोपडीमधे आयुष्य घालवण्यापेक्षा माझे इथले लुईव्हीलमधे "निग्रोचे" जिवन केव्हाही चांगले आहे... व असे म्हणत तो गोरा महापौर अलीसमोर काय अली? बरोबर ना? असे म्हणत खो खो हसत सुटला... पण त्याने खुप अपमानीत होउन अलीला खुप वाइट वाटले की उगाच आपण त्या रशियन वार्ताहराला खोटे सांगीतले की अमेरिका एक महान देश आहे म्हणुन... त्याला त्या क्षणी मेयरच्या त्या वाक्याची खुप शिसारी आली व उद्वेगाने त्याने तिथुन ताबडतोब काढता पाय घेतला...

मेयरच्या कार्यालयातुन घरी जाताना.... तो व त्याचा मित्र रॉनी किंग... वाटेवरच असलेल्या एका "व्हाइट ओन्ली" उपहारगृहात हॅंबर्गर व मिल्क शेक ऑर्डर करायला थांबले. ऑर्डर घेणार्‍या मुलीने अलीला सांगीतले की ते "निग्रो" असल्यामुळे त्यांना या "व्हाइट ओन्ली" उपहारगृहात काही खायला मिळणार नाही. अलीने तिला सांगीतले की हे बघ... माझ्या गळ्यातले सुवर्णपदक बघ... मी आपल्या देशासाठी ऑलिंपिक्समधे हे मिळवले आहे... मी कोणी साधासुधा "निग्रो" नाही. त्या मुलीने ही गोष्ट मालकाला सांगीतली. मालकाने अलीला येउन सांगीतले की तो ऑलिंपिक विजेता असु दे नाही तर अजुन कोणी असु दे... तो व त्याचा मित्र "निग्रो" असल्यामुळे त्यांनी तिथुन ताबडतोब चालते व्हावे... इथे " निग्रो" लोकांना येण्याची मनाइ आहे. रॉनीने अलीला त्या अनेक मिलीअनर्स व्हाइट लोकांची आठवण करुन दिली व त्यांना फोन करायला सांगीतले. पण अलीला त्यात कमीपणा वाटला. त्याला वाटले की त्याच्या ऑलिंपिक्समधील कर्तुत्वाच्या बळावर त्याला अशी हीन वागणुक मिळायला नको होती. अशी अपमानीत वागणुक न मिळण्यासाठी त्याचा ऑलिंपिक पराक्रम पुरेसा ठरायला पाहीजे होता असे त्याला प्रामाणिकपणे वाटत होते. त्याने त्या व्हाइट लोकांना फोन करण्यास नकार दिला.एव्हाना हे सगळे बघुन त्या उपहारगृहातले एक व्हाइट मुलांचे टोळके अली व त्याचा मित्र रॉनी यांच्या दिशेने येउ लागले.त्यांनी अलीकडे त्याचे सुवर्णपदक त्यांच्या हवाली करण्यास फर्मावले. एव्हाना अलीचे.. तो सुद्धा एक ऑल अमेरिकन बॉय आहे.. हे इल्युजन.. धुळीस मिळाले होते. त्या काळात अशी व्हाइट मुलांची टोळकी... "निग्रोंना" एकटे दुकटे गाठुन... मरेसपर्यंत मार द्यायची. हे माहीत असल्यामुळे अली व त्याच्या मित्रानी तिथुन मोटरसायकलवरुन ताबडतोब पोबारा केला. पण त्या व्हाइट मुलांच्या टोळक्याने त्यांचा पाठलाग करायला सुरुवात केली.

बराच पाठलाग केल्यावर... कंटाकी.. इंडीयाना बॉर्डरवर.. ओहायो नदीवरच्या जेफ़रसन ब्रिजवर.... त्या व्हाइट टोळक्याच्या दोन म्होरक्यांनी अलीला व त्याच्या मित्राला गाठलेच. त्यांच्यामधे प्रचंड मोठी मारामारी झाली व अलीने व त्याच्या मित्राने त्या म्होरक्यांना रक्त येइसपर्यंत बदडुन काढले.... अली व रॉनी सुद्धा थोडे जखमी झाले. पण त्या टोळक्याने तिथुन काढता पाय घेतला. ते गेल्यावर अली व रॉनी ब्रिजवरुन खाली चालत.... ओहायो नदीवर.. रक्ताचे डाग व कपडे धुवायला ब्रिजच्या खाली गेले... रॉनीने अलीचे... रक्ताने माखलेले सुवर्णपदक स्वछ धुतले व आपल्या गळ्यात घातले.. ते सुवर्णपदक अलीपासुन प्रथमच वेगळे झाले होते व अली त्या पदकाकडे प्रथमच एक दर्शक म्हणुन बघत होता... आणी अचानक अलीला त्या क्षणी त्या पदकाचे महत्व अजिबात वाटेनासे झाले.... महापौराच्या कार्यालयापसुन ते आतापर्यंतच्या मारामारीपर्यंतच्या आजच्या घटनांमुळे.... अलीला त्या क्षणी... त्या सुवर्णपदकाची शिसारी येउ लागली. रॉनीने ते पदक आपल्या गळ्यातुन काढुन परत अलीच्या गळ्यात टाकले... पण अलीला अचानक ते पदक व्हाइट माणसांनी... त्याच्या मानेभोवती टाकलेल्या जोखडासारखे.. एकदम जड भासु लागले... ते दोन्ही मित्र परत वर... चालत चालत.. ओहायो नदीवरच्या त्या जेफ़रसन काउंटी ब्रिजवर आले... वर ब्रिजवर परत आल्यावर अली त्या पुलाच्या कडेला.. एकटाच चालत गेला.... अलीने आपल्या गळ्यातले ते सुवर्णपदक गळ्यातुन काढले व हातात धरले...त्याने थोडा वेळ नदीकडे पाहुन विचार केला व... मग त्याने ते सुवर्णपदक ओहायो नदीच्या त्या रोरवणार्‍या प्रवाहात.... जोरात भिरकावुन दिले...... त्याला एकदम हलके हलके वाटु लागले... इतके दिवस त्याला प्राणप्रिय असलेले ते सुवर्णपदक.. ओहायो नदीच्या प्रवाहात वाहात चालले होते.... व अलीला असे वाटत होते की त्याची "व्हाइट होप" बरोबरची सुटी आता संपली होती....

Fast forward 36 years... to 1996... at Atlanta Olympics.....

आणी आज.. ३६ वर्षांनी.... त्याच अमेरिकेत... अमेरिकन अध्यक्ष व अमेरिकन जनतेच्या समोर... ३ बिलिअन्स टिव्ही दर्शकांच्या समोर.... पाणावलेल्या डोळ्याने अली ऑलिंपिक्सची मशाल पेटवत होता... व टाळ्यांच्या कडकडाटात.... वॉन ऍन्टॉनियो समरांचच्या हातुन... ते ३६ वर्षापुर्वी नदीत भिरकावुन दिलेले.. त्याचे ऑलिंपिक्स सुवर्णपदक.... मानासकट.. त्याला आज परत मिळत होते....

Group content visibility: 
Public - accessible to all site users