निसर्गदत्त भांडवल आणि बाजारभाव

Submitted by केअशु on 3 August, 2020 - 10:50

हॅलो! अरे काका कुठायंस? १५ मिनिटं झाली मला येऊन इथे!

"आलो आलो.अगदी दारात कॅफेच्या."

"हं बोल अमित काय घ्यायचं? मस्त आयरिश कॉफी घेऊया? छान मिळते इथे!"

"मागव तुला काय हवं ते.पण आधी इथं का बोलवलंयस ते सांग!आधीच सकाळच्या प्रकरणामुळे माझं डोकं फिरलंय!"

"हो हो सांगतो.धीर धर! ते फिरलेलं डोकंच ताळ्यावर आणण्यासाठी तुला बोलवलंय इथे!"

"म्हणजे?"

"म्हणजे असं बघ की मी तू काम करत असलेल्या कंपनीतच एच आर विभागात असलो आणि सकाळचा प्रसंग मला माहित असला तरी काही गोष्टी कंपनीतच सांगणं शक्य नव्हतं.शिवाय मी तुझा सख्खा काका असल्यानं पुतण्याला काही कानगोष्टी सांगावाश्या वाटल्या तर नाही का सांगायच्या?"

"अरे असं का म्हणतोस? तो हक्क आहेच की तुला!"

"घे! कॉफी पण आली.पित पित बोलूया!"

"अमित मला एक्झॅटली काय झालं होतं ते सांगतोस जरा.तुझ्याकडून ऐकायचंय मला."

"अरे आपला तो कामगार नाही का सुरेश भाटकर.त्याच्याकडून आपल्या नवीन डिझाईनची असेम्ब्ली करवून घेत होतो.आम्हाला जसं प्रॉडक्ट हवं होतं तसं बनवण्यासाठी त्याला सुचना देत होतो.तर हा बाबा मलाच शहाणपणा शिकवायला लागला.असं नाही तसं करा; २० वर्षं झालं काम करतोय वगैरे बडबडायला लागला.मग माझाही पारा चढला."

"तू पार लायकी काढलीस अमित त्या सुरेशची!२० वर्षं काय उजेड पाडलात? २० वर्षं काम करुनसुद्धा कामगारच आहात; आणि रिटायर होईपर्यंत कामगारच राहणार तुम्ही.हीच लायकी आहे तुमची.आम्हाला इंजिनियर व्हायला किती घासावी लागते ते तुमच्यासारख्या १० वी नापासाला काय कळणार? असंच बोललास म्हणे."

"हो.बोललो.हा १० वी नापास माझ्या शिक्षणावर बोलायला लागल्यावर मी काय ऐकून घेत बसावं का काय?"

"नाहीच ऐकून घ्यायचं पण बोलतानाही मागचा पुढचा विचार करुन बोलायचं.अगदीच तोडायचं नाही.जुना कामगार आहे."

"अरे पण हे त्याला कळायला नको का?आपलं शिक्षण काय ज्याच्याशी भांडतोय त्याचं शिक्षण काय? याला साधं इंजिनिअर या शब्दाचं स्पेलिंग तर माहित असेल का? खरंतर आपल्या लायकीत रहावं अशा अडाण्यांनी."

"हम्म! लायकी!अमित; एखाद्याची लायकी कशावरुन ठरते रे?"

"अर्थात त्याच्या अचिव्हमेंटसवरुन.एखाद्याने मिळवलेलं शैक्षणिक यश,आर्थिक यश यावरुनच."

"अोके.अमित तू एक इंजिनिअरींगच्या चारही वर्षात खूप चांगले मार्क्स घेऊन पास झालेला इंजिनिअर आहेस.मला सांग कसे काय मिळवलेस रे इतके चांगले मार्क्स?

"हॅ हॅ हॅ काका हा काय प्रश्न झाला का? अरे सोप्पंय.मी खूप अभ्यास केला.त्याचंच फळ म्हणून मला चांगले मार्क्स मिळाले."

"खूप अभ्यास केलास म्हणजे नेमकं काय केलंस?"

"हे काय आता? पडेल त्या खस्ता खाऊन यशश्री खेचून आणली.बारावीला असताना जाता १४ की.मी.आणि येता १४ कि.मी.सायकल मारत क्लासला जायचो मी.कारण बाईक घेण्याएवढे पैसे नव्हते बाबांकडे. इंजिनिअरिंगलाही असाच घरापासून लांब राहून हॉस्टेलवर राहून पडेल ते कष्ट घेऊन एकही केटी न लागता शिक्षण पूर्ण केलं मी.आमचं हॉस्टेल काय लायकीचं होतं,काय कदान्न मिळायचं तिथे हे तुला माहितीये."

"तू रोज २८ कि.मी.चा प्रवास बारावीत सायकलवरुन केलास.किंवा हॉस्टेलवर राहून कदान्न खाल्लंस म्हणून तुला इंजिनिअरींगला इतके चांगले मार्क्स मिळाले असं वाटतंय का तुला?"

"अरे बाबा मला इतकंच म्हणायचंय की मी पडेल ते कष्ट घेतले.तक्रार केली नाही."

"मी कुठं नाही म्हणतोय? पण या कष्टांचा आणि तुझ्या शैक्षणिक यशाचा संबंध काय? तुझ्या बारावीच्या किंवा इंजिनिअरींगच्या प्रमाणपत्रावर तू हे भोगलेले त्रास लिहिलेयत का?"

"अरे काय बोलतोयस? असं कोणी लिहितं का?"

"बरं आता दुसरा प्रश्न! तू बर्‍याचदा वर्तमानपत्रात वाचलं असशील की गरीब वस्तीत राहून,झोपडीत राहून,कुटूंबात इतर कोणीही शिकलेलं नसतानाही अमुक तमुक या मुलाच,मुलीचेे १०वीच्या,१२ वीच्या परीक्षेत,स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश अशा बातम्या असतात."

"हो असतात.त्याचं काय आता?"

"त्याच झोपडपट्टीत अजूनही काही मुलं असतातच.पण मग ती सगळीच मुलं अशी घवघवीत यश मिळवणारी का नसतात? तू मघाशी तुझ्या कष्टांबद्दल बोललास.इथे या झोपडपट्टीतल्या लोकांचा रोजचा दिवस संघर्षमय असतो.मग ते कष्ट ते हाल सोसून झोपडपट्टीतली सगळी मुलं घवघवीत शैक्षणिक यश का मिळवत नाहीत? सांगू शकतोस?"

"तुला नेमकं म्हणायचंय काय?"

"तू किंवा असे बरेच लोक शारिरीक कष्ट सोसणे हा शैक्षणिक किंवा आर्थिक यशातला खूप महत्त्वाचा भाग मानतात जे तितकसं बरोबर नाही.शारिरीक कष्ट सोसण्याचा भाग हा यशात फार कमी असतो.पण अनेकजण भावनेच्या आहारी जाऊन आपण किती हालअपेष्टा सोसून यश मिळवलं ते सांगत बसतात.शारिरीक कष्टालाच सगळं महत्त्व देणं म्हणजे भावनिकतेच्या आहारी जाणं.जसा आता तू गेलास."

"बरं मग एखाद्याच्या शैक्षणिक किंवा आर्थिक यशात महत्त्वाचा भाग कोणता ते सांगशील का आतातरी?"

"एखाद्याचा विशिष्ट विषयातल्या आकलनाचा वेग आणि चांगली स्मरणशक्ती या दोनच गोष्टी तुम्ही एखाद्या क्षेत्रात किती प्रमाणात यशस्वी व्हाल ते ठरवतात.याचा अर्थ अन्य कोणतेही फॅक्टर्स तू म्हणतोस ते यश मिळवण्यात सहभागी नसतातच असं नाही बरंका.पण हे दोघे सर्वाधिक महत्त्वाचे.

"जरा उलगडून सांगतोस का?"

"थांब याचं उत्तर तुझ्याकडूनच मिळवतो.‍अमित मला सांग तू इंजिनिअरींगलाच का गेलास?काय कारण होतं?"

"मला गणित आणि विज्ञान हे दोन विषय खूप आवडायचे.पहिल्यापासून या दोन विषयात मला खूप गती होती.मला आठवतंय एकदा तर मी आठवीत असताना नववीच्या पुस्तकातली गणितंही अगदी सहज सोडवली होती.विज्ञान प्रदर्शनांमधे तर मी बरीच प्रमाणपत्रं मिळवलेत.बरंच कौतुक व्हायचं माझं"

"बरं हे पहिल्यापासून आवड होती म्हणजे नक्की कधीपासून?"

"आता ते नेमकं कसं रे सांगणार? पण साधारणपणे गणित इयत्ता पहिलीपासून असतं ना आपल्याला.शिवाय परिसर अभ्यासाच्या रुपाने विज्ञानही असतंच की पहिलीपासून.अजून मागे म्हणालास तर बालवाडीत मला १ ते १०० अंक पाठ होते चांगलेच.असं आईनं सांगितलं होतं मला."

"म्हणजे साधारण इयत्ता पहिलीपासूनच तुला गणित आणि विज्ञान यांची खूप आवड होती असं समजूया?"

"हो.तसं समजायला हरकत नाही."

"मग ही गणिती बुद्धिमत्ता,ही विज्ञान-तंत्रज्ञानाची आवड तुझ्यामधे अचानक इयत्ता पहिलीतच कुठून आली?"

"आता ते मी कसं सांगणार?कुठून आली ते?आली असेल जेनेटिकली किंवा असंच काहीतरी कारण असेल.मला नीट माहिती नाही या विषयातली.तूच सांग काय ते!"

"बरोबर आहे तुझं.म्हणजे याचा अर्थ तुझ्यात जी गणिताची,विज्ञानाची आवड होती म्हणजेच गणितं पटापट सोडवता येण्यासाठी किंवा वैज्ञानिक तत्वं लवकर समजण्यासाठी मेंदूत ज्या काही हालचाली वेगानं व्हाव्या लागतात त्यासाठीचं सॉफ्टवेअर निसर्गानं तुला या जगात आणतानाच तुझ्या मेंदूत टाकलंय.तुझी गणिती,विज्ञानिक चांगली आकलनक्षमता तू जन्माला आल्यापासूनच आहे.फक्त तिचे दृश्य परिणाम दिसायला इयत्ता पहिली उजाडावी लागली.बरोबर का?"

"हं असावं असंच काही."

"मग जी गोष्ट तुला आयतीच मिळालीय किंवा निसर्गाने तुझ्या मेंदूत टाकलीय तिचं श्रेय तू स्वत:ला 'इतकं' का देतोयस? तू केवळ त्या निसर्गानं दिलेल्या वरदानाचं निमित्तमात्र आहेस.तू ही चांगली आकलनक्षमता त्या जोडीने येणारी चांगली स्मरणशक्ती या दोन्हींसाठी जन्माला येण्यापूर्वी देवाकडे किंवा त्या निसर्गाकडे रितसर अर्ज वगैरे केला होतास का?"
"शिवाय अजून एक गोष्ट तुझ्या अहंकाराला कारणीभूत ठरली ती म्हणजे तुझ्या या इंजिनिअरींगच्या ज्ञानाला असलेला चांगला बाजारभाव."

"हे काय आता?"

"हो.हा जो भाटकर आहे ना तो उत्तम रंगावलीकार आहे.बर्‍याचशा समारंभात बोलवतात त्याला रांगोळी काढायला.पण रांगोळी काढण्याच्या कलेतून कितीसे पैसे मिळणार? मग जिथे काम केल्यावर दर महिन्याला थोडेफार पैसे निश्चित मिळतील असं कुठलं ठिकाण? तर एखादा कारखाना.यानंही तेच केलं.आपल्या कंपनीत लागला वीस वर्षांपूर्वी.पण त्या उलट तुझं.ज्या गोष्टीची तुला अतोनात आवड होती त्याच गोष्टीला चांगला बाजारभावसुद्धा आहे.त्यामुळेच तर आज एका चांगल्या पोस्टवर काम करतोयस."

"पण यामुळे त्याचं बोलणं योग्य होतं असं नाही ना होत?"

"नाहीच होत.त्याचंही आणि तुझंही.तुला हवं तसं मशिन असेंबल करुन देत नव्हता ना तो.ठीकाय. तुझ्या वरिष्ठांना तसं कळवणं हा उपाय होता ना? त्यांनी काय तो योग्य उपाय नक्की केला असता.थेट त्याची लायकीच काढण्याचा मार्ग अवलंबलास तू.इथेच थोडं चुकलं तुझं.कालपरवा आलेला माणूस आपल्या अनुभवाला नाकारुन त्याला हवं तसं काम करुन घेतोय.आपल्याला २० वर्षांनी जेवढा पगार किंवा मान मिळतोय तितका या तरण्या पोराला १ वर्षानंतरच मिळतोय हे पाहिल्यावर थोडी असूया वाटणं साहजिक आहे.हे आपल्यासारख्या उच्चशिक्षिताला आधी कळलं पाहिजे.त्या भाटकरचं शिक्षणच कमी आहे.त्याला तुला इतका पगार का देतात हे नाही पटकन समजणार.अशावेळी आपणच थोडं समजावून घ्यायचं.

"हम्म! माझ्याही चुका होतात खरं संवाद साधताना.यापुढे नक्की काळजी घेईन."

"ती घेच.पण जेव्हा जेव्हा कधी हा शिक्षणामुळं आलेला इगो डोकं वर काढेल तेव्हा तेव्हा मी दिलेलं हे लेक्चर आठव म्हणजे येशील ताळ्यावर."

"हं समोरच्याला पटवण्यासाठी काय करावं लागेल यात तुझी आकलनशक्ती चांगलीच आहे हे आलंय माझ्या लक्षात!"

"अरे! मग काय? उगाच का हा तुझा काका एच आर खात्यात काम करतोय?"

"बरं बरं.चलो इसी बात पे अौर एक कॉफी हो जाए!"

"लग्गेच मागव!"

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults