रोज वाटते

Submitted by किमयागार on 31 July, 2020 - 00:01

रोज वाटते खूप लिहावे, दु:ख लेखणीतून वहावे,
अवती भवती काय चालले, शब्दांमधुनी जरा टिपावे.

जिथे जिथे मी गेलो तेथे चिखल पाहिला खूप भयंकर,
दर्शन घडता त्याला माझे त्यात पांढरे कमळ फुलावे.

आज म्हणे तो गेला आहे गाव मनीचे वसवायाला,
मी तर म्हणतो आधी त्याने वास्तवातील जगून घ्यावे.

स्वप्न पहावे जरूर मोठे कष्ट करावे तसेच मोठे,
शिखर यशाचे सर करताना इतरांनाही सोबत न्यावे.

तुला कशाला चिंता छळते लोकमताच्या प्रक्षोभाची,
जसे बोलणे तसे वागणे हेच सूत्र तू मनी जपावे.

----------मयुरेश परांजपे---------
७२७६५४६१९७

Group content visibility: 
Use group defaults